कथा : मैत्रा - भाग १

Submitted by भागवत on 30 July, 2018 - 22:48

प्रकरण – भेट
मैत्रा ऑफिसाच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छतावर खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ... छान आल्हाददायक वातावरण... मंद सुटलेली हवा... यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी एकमेका पासून इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.

तेवढ्यात काहीतरी पडल्याच्या आवाज आला. कोणाचा तरी धक्का लागून वेटरच्या हातातून प्लेट पडली होती. त्यामुळे एका ग्राहकाचा शॅर्ट खराब झाला होता. हॉटेलचा व्यवस्थापक वेटरला रागवत होता आणि तो ग्राहक व्यवस्थापकाला वेटरला रागावू नका म्हणून विनंती करत होता. ग्राहकाने नम्र विनंती फळाला आली आणि वेटर शा‍ब्दिक चकमकीतून सुटला. मैत्रा हे सगळे लांबून बघत होती. तिच्या लक्षात आले तो नम्र ग्राहक दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच ऑफिस मधला कर्मचारी मिहीर होता. अशी माणसे गर्दीच्या सागरात झाकलेले जातात, पण त्यांच्या जवळ जाताच चांगल्या गुणामुळे हिऱ्या प्रमाणे चमकतात.

मैत्रा आणि मिहीर दोघ उच्च विद्या विभूषित होते आणि एकाच कंपनीत काम करायचे. दोघांच्या रहाणीमानात खुप फरक होता. मिहीर हा दुसर्‍या विभागात काम करायचा त्यामुळे मैत्राला त्यांची जास्त ओळख नव्हती. पण त्याच्या बद्दल मैत्रा ने बरेच चांगले ऐकले होते. पण आजची आठवण खूपच ताजी होती. एका CSR (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) कार्यक्रमा साठी ते दोघं एकत्र आले. मात्र मिहीरला त्यांच्या दोघांच्या विचारातील फरक लगेच जाणवला. मैत्रा प्रत्येक वेळेस तिच्या मतावर ठाम राहणारी आणि कोणत्याही परिस्थितीत भूमिका तडजोड न करणारी मुलगी होती. मिहीर मात्र परिस्थितीतून मार्ग काढणारा होता आणि खूपच भावनिक होता. पण दोन विरुद्ध स्वभावाचे माणसे एकत्र आली आणि त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण होऊन ते जवळ-जवळ येत गेली. मग कामा व्यतिरिक्त बाहेर फिरणे सुद्धा हळूहळू चालू झाले. कधी-कधी कॉफी शॉप, हॉटेल किंवा प्रेक्षणीय स्थळ फिरून झाली. मैत्राला एकदा फिरायला जाताना वाटले आपल्यावर कोणी तरी लक्ष ठेवतयं. पण परत तशी घटना घडली नसल्यामुळे तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. पण वेळ जात होता त्याप्रमाणे त्यांची मैत्री घट्ट होत होती.

एकदा फिरायला गेल्यावर मैत्राने मिहीरला विचारले की तुझ्या घरी कोण-कोण असते.

मिहीर उत्तरला “सध्या तरी मी एकटाच. दुसरे कोणी नाही”

“काही भूतकाळात होते आणि मी वर्तमानात जगत असल्यामुळे सध्या मी फक्त एकटाच आहे”

मैत्रा - “तुझे शिक्षण कुठे आणि कधी झाले?”

“माझे बारावी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. त्यानंतर मी स्वत: कमवा आणि स्वत: शिका या तत्वा वर चालून मी इथ वर पोहोचलो आहे.” –मिहीर

मिहीरने त्याचे कॉलेज शिक्षण कुठे आणि कधी झाले याची माहिती सांगितली. हॉस्टेलच्या छान गमती- जमती सांगीतल्या. त्याने शिक्षण आणि नोकरी करताना त्याची कशी दमछाक व्हायची त्याच्या आठवणी सुद्धा उलगडल्या.

कुटुंबा बद्दल बोलायला मिहीर जास्त काही उत्सुक दिसला नाही आणि मैत्राने ही यावर खूप ताणले नाही. परत तो विषय तिने कधीच काढला नाही. मैत्रा मात्र तिच्या कुटुंबा विषयी भरभरून बोलत होती. तिच्या लहानपणाच्या आठवणीत ती रमून गेली. मिहीर सगळं उत्सुकतेने आणि तन्मयतेने ऐकत होता. मैत्रीत वेळ कसा जातो त्यांना कळलेच नाही. जवळपास ३ वर्ष निघून गेले आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली आणि बघता-बघता मैत्राला मिहीर आवडायला लागला.

अवचित भेट...
चित्त सैरभैर...
भावनांना वाट...
जाणीवा सैरवैर...

प्रकरण – लग्न
मिहिरचे बालपण गावात झाले होते आणि मैत्रा शहरातील आधुनिक युवती होती. मिहीर मैत्राला फक्त जवळची मैत्रिण म्हणून मान्य होती. तो मैत्राशी एक जवळची मैत्रिण म्हणूनच तिच्यापाशी आपल्या भावना व्यक्त करायचा. त्याने कधी त्यापलीकडे विचार केला नाही पण मैत्राचा सहवास त्याला खूप आवडायचा. आधी कधी त्याची अशी द्विधा मनस्थिती झाली नव्हती. विचारातील फरकामुळे त्याला या प्रेमाची काही शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळेच त्याने आपल्या मनाचा दरवाजा बंदच करून टाकला.

मैत्रा तर मिहीर मध्ये खूप गुरफटली होती. तिला मिहीर शिवाय काही सुचत नव्हते. ऑफिस मध्ये मिहीर, घरी असताना मिहीर सोबत बोलणे. सगळी कडेच मिहीर तिला दिसायला लागला. तिच्या विचारात सुद्धा मिहीर झळकायला लागला. ती मिहीरमय झाली. त्यामुळे कळत-नकळत मैत्रा मिहीरवर प्रेम करू लागली होती. किर्तीला सुद्धा ही गोष्ट माहीत होती. तिने मैत्राला सांगीतले की तू मिहीर जवळ मनातील भावना व्यक्त कर. पण मैत्राची इच्छा होती की मिहीरनेच तिला प्रपोज करावे. पण मिहीरला ते कधीच मान्य झाले नसते. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.

पण ती समस्या किर्तीच्या मध्यस्थीने सुटली. कीर्ति दोघांची मैत्रिण होती. किर्तीला वाटायचे की दोघ एकमेकाला अनुरूप आहेत. किर्ती मन जुळवायचे काम करीत होती. एकदा नाष्टा करताना मिहीरने किर्तीला समजावून सांगीतले की दोघांच्या विचारसरणीत, रहाणीमानातील किती फरक आहे. त्याच्या स्वत:च्या मागे कुटुंबाची काही पार्श्वभूमी नाही. त्याच्या कडे आर्थिक पाठबळ सुद्धा नव्हते. त्याला कोणी आधारस्तंभ सुद्धा नव्हता. किर्तीने सगळी माहिती मैत्राला पुरवली. मैत्राने सगळ्या समस्या मान्य केल्या तरी पण तिचे मिहीर वरील प्रेम काही कमी झाले नाही.

मिहिरचे विचार बुरसटलेले नव्हते. तो या शहरातील वातावरणात पाण्यात जशी साखर विरघळते तसे तो वातावरणात मिसळून गेला होता. मिहिरने परत आपल्या मनाचा दरवाजा किलकिला करून मैत्रावरचे त्याचे प्रेम आणि मैत्राचे त्याच्या वरचे प्रेम यावर अभ्यास केला. प्रेमाचा झरोका बंद केल्यामुळे त्याची बेचैनी खूप वाढली होती. शेवटी त्याला मान्यच करावे लागले की त्याचेही मैत्रावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याने मैत्राचे विचार मान्य केले आणि शेवटी त्याच्या कडे प्रपोज शिवाय काही पर्यायच नव्हता.

मैत्रा आज खुप आनंदात होती कारण मिहीरने आज तिला अविस्मरणीय रित्या लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याने प्रपोज करण्या अगोदर त्याच्या बद्दल सगळी माहिती सांगितली. यथावकाश त्यांचे लग्न जमले. सगळ्यांना खूप आनंद झाला कारण मैत्रा आणि मिहीर हे एक आदर्शवत जोडपे होणार होते. शेवटी एकदाचे विवाह नोंदणी कार्यालयात लग्न लागले. मिहीरचा वयाच्या २८व्या वर्षी मैत्रा सोबत लग्न होऊन त्यांचा राजा राणीचा संसार चालू झाला. घरात दोघेच असल्यामुळे काहीही वादविवाद होण्यास वावचं नव्हता. दोन वर्षा नंतर दोघांत तिसर्‍याचे आगमन झाले.

आस सोबतीची...
दमछाक मनाची...
मैत्री विचाराची...
भाषा जिवलगाची...

कथा : मैत्रा - भाग २

Group content visibility: 
Use group defaults

मिहीर मैत्राला फक्त जवळची मैत्रिण म्हणून मान्य होती >> तो द्विधा मनस्थितीत होता. आपले राहणीमान, विचार प्रेमात जुळतील का आणि टिकतील का विवंचनेत होता.

मस्त चालली आहे कथा.
लोकांना सहवास आवडतो, एकमेकांची सवय होते त्यालाच ते प्रेम समजू लागतात. लग्नानंतर भोपळा फुटतो भ्रमाचा.

लवकर टाका पुढचा भाग !

धन्यवाद च्रप्स!!! आपला प्रतिसाद मला नक्कीच उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!
लोकांना सहवास आवडतो, एकमेकांची सवय होते त्यालाच ते प्रेम समजू लागतात. लग्नानंतर भोपळा फुटतो भ्रमाचा. >> +१