हॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी

Submitted by भास्कराचार्य on 28 July, 2018 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- चायनीज चिली ऑईल
- श्रीराचा हॉट सॉस
- सॉय सॉस
- व्हिनेगर
- तिळाची पेस्ट / तिळाची चटणी
- फोलपटमुक्त शेंगदाणे
- लसूण
- कांद्याची पात
- कोथिंबीर
- एखाद-दोन हिरव्या भाज्या, उदा. लेट्यूस, ब्रोकोली, पालक
- तेल
- नूडल्स
- शाकाहारी मंडळींसाठी टोफू, मश्रूम्स. मांसाहारी मंडळींसाठी चिकन किंवा सीफूड. (हे नसल्याने काही बिघडत नाही. फक्त भाज्यांबरोबरही नूडल्स खाता येतात.)
- पाणी

क्रमवार पाककृती: 

हॉट पॉट स्टाईल जेवण ही चिनी जेवणाची खासियत आहे. पुढ्यात चालू गॅसवर ठेवलेला पॉट असतो, त्यात ब्रॉथ उकळत असतं. तुम्हाला हवे तसे सॉस त्यात घाला, तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या, नूडल्स, राईस, टोफू, चिकन, काय हवं ते तुम्हाला हवं तितकं खा! काय थाट असतो महाराजा! आता घरी असा पुढ्यात हॉट पॉट घेता येणं अंमळ कठीणच, पण तरी त्या स्टाईलच्या नूडल्स खाता येणं शक्य आहे. गरमागरम वाफाळत्या नूडल्स तुम्हाला हव्या त्या चवीमध्ये तयार करून पटकन खाता येतात, आणि फार वेळही लागत नाही. ही त्याची पाकृ. वर मुद्दामच कुठल्याच जिन्नसाचं प्रमाण दिलं नाही, कारण तेच - तुम्हाला हव्या तश्या प्रमाणात तुम्ही ते जिन्नस घेऊ शकता. मी काय केलं ते खाली सांगतो.

सॉसची तयारी -

हा आधी नूडल्स ज्या बोलमध्ये खायच्या आहेत, त्याच बोलमध्ये तयार करून ठेवावा. मग पुढच्या पायरीकडे जावे.

१. ३ मोठे चमचे चायनीज चिली ऑईल बोलमध्ये घेतलं. हे मी घरी केल्याने मला जास्त छान चव लागली, असं मला वाटलं. त्यात २ चमचे भरतील इतकी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि १ चमचा भरेल इतका बारीक चिरलेला लसूण घालून एकजीव केलं.

२. त्यात १ छोटा चमचा भरेल इतका सॉय सॉस घातला. हा खूप जास्त घातला, तर चव फार खारट वाटते. म्हणून जरा बेतानेच घातला. त्यावर चवीला बॅलन्स करायला २ चमचे व्हिनेगर घालून पुन्हा एकजीव केलं.

३. ह्या मिश्रणात १ चमचा तिळाची पेस्ट घातली. मला एकंदरीत वरच्या सगळ्या 'हीट'ला बॅलन्स म्हणून थोडा तीळ घालावासा वाटतो. पण हे न केल्याने फार काही बिघडणार नाही. त्यावर चवीपुरता हॉट सॉस घालून घेतला. मग कोथिंबीर चिमूटभर पसरली आणि कुरकुरीतपणा यावा म्हणून शेंगदाणे घातले अर्धी मूठ.

हा झाला सॉस तयार! अगदी ५ मिनिटांत होतो. वाटल्यास गोष्टी थोड्या बेताबेताने घालून चव बघून त्यानुसार प्रमाणाचा अंदाज घ्यावा.

भाज्या -

१. वरील ज्या हिरव्या भाज्या, टोफू, मश्रूम्स वगैरे घेतलं असेल, ते उकळत्या पाण्यात २ चमचे तेल टाकून त्यात शिजवून घ्यावं. किती 'टेंडर' हवंय त्यानुसार हा कालावधी बदलू शकतो. मी लेट्यूस आणि ब्रोकोली जवळपास ३-४ मिनिटे शिजवलं.

२. पाण्यातून भाज्या काढून त्या तुमच्या बोलमधल्या सॉसमध्ये घ्याव्या, आणि चमच्याने एकजीव करावं. मात्र सगळं पाणी निथळू द्यावं. पाणी जितकं कमी बोलमध्ये जाईल तितक्या नूडल्स जास्त चवदार होतील. नाहीतर फार पांचट वाटेल. मी सगळं पाणी आणि तेल काढून टाकून मगच भाज्या बोलमध्ये घेतल्या.

महत्वाचे - सीफूड किंवा चिकन किती वेळ शिजवावे, हे मला माहित नाही. त्यामुळे मांसाहारी मंडळींनी ते नीट शिजवून घ्या. कच्चे मांस वगैरे खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. तेव्हा त्यासाठी तुमचे स्वतःचे अनुमान वापरा.

नूडल्स -

१. मी फ्लॅट नूडल्स घेतल्या होत्या. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या (मॅगीसुद्धा) घेऊ शकत्या. ह्या बेसिकली पॅकेजवर जसं सांगितलंय तश्या पाण्यात उकळून घ्याव्यात. (मी ३-४ मिनिटे शिजवल्या. मग पांढरा स्टार्चचा थर दिसायला लागल्यावर थांबवल्या.)

२. ह्यांचेही पाणी पूर्णपणे निथळून जाईल असे बघावे, आणि गरमागरम नूडल्स गरमागरम भाज्यांबरोबर बोलमध्ये घ्याव्यात. आणि आपला सॉस लगेच नूडल्सच्या अंगप्रत्यंगास लागेल असे बघावे. गरम नूडल्स एकमेकांना स्टार्चमुळे चिकटून लगदा होऊ शकतो. मात्र आपला सॉस स्वतःच नूडलला चिकटून हा चिकटा होण्यापासून वाचवतो, आणि नूडल्सना अंगभूत चवही लागते.

झाल्या गरमागरम हॉट पॉट नूडल्स तयार! फार वेळ न लावता थंड व्हायच्या आत खाऊन मोकळे व्हा. शनिवार/रविवारी नवीन काय करायचं अश्या फंदात असताना पटकन बनवून झटकन खायला हा फार स्वादिष्ट पर्याय आहे. मी गेल्या २ आठवड्यांत दोनदा केल्या.

हा फोटो आज केलेल्या नूडल्सचा.

HotPotNoodles.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

१. नूडल्स व भाज्या, दोघांमध्येही कमीत कमी पाणी असावे.

२. नूडल्स व भाज्या, एकाच वेळेस शिजवून एकाच वेळेस बोलमध्ये घेता आल्यास सर्वात उत्तम.

३. नूडल्सना लगेच सॉसमध्ये एकजीव करावे, जेणेकरून लगदा होणार नाही.

४. मांसाहारी मंडळींसाठी - सीफूड किंवा चिकन किती वेळ शिजवावे, हे मला माहित नाही. त्यामुळे मांसाहारी मंडळींनी ते नीट शिजवून घ्या. कच्चे मांस वगैरे खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. तेव्हा त्यासाठी तुमचे स्वतःचे अनुमान वापरा.

माहितीचा स्रोत: 
मी, हॉट पॉटमध्ये दिसलेल्या प्रकारावरून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति, ती दक्षिण चीनची पद्धत, एकच भांडे दोन भागांत. पण बीजिंगमध्ये प्रत्येकाला स्वतःचा पॉट अशी पद्धत आहे.

आंबट गोड, अगदी पूर्ण पाणी नूडल्समधून जात नाहीच. त्यामुळे अगदी कोरडं होत नाही. सूपी करायचे असतील, तर सॉस जास्त घेऊन करता येईल. मी पहिल्यांदा तसेच केले होते, पण मला हे जास्त आवडले. Happy

Pages