बोला/मना फुलाची गाठ

Submitted by मंजूताई on 17 July, 2018 - 02:34

प्रसंग १:मागच्या वर्षी आई आजारी होती. तिची अन्नावरची वासनाच उडाली होती. काही खायचीच नाही. एक दिवस आम्ही गप्पा मारत जेवत असतांना (आम्ही जेवत व ती जुन्या आठवणीत रंगलेली) तिने 'गाठोडी' बद्दल सांगितले ज्याच्याबद्दल पूर्वी कधी बोलली नव्हती. ज्याकाळी न कळवता जायची पध्दत होती त्या काळातली ही गोष्ट !उपवासाच्या दिवशी मराठवाड्यातल्या जालनाच्या माई देशपांडेकडे गेली होती. माईंना उपास आहे कळताच त्यांनी अगत्याने थांब तुझ्यासाठी खास पदार्थ करते म्हणत गाठोडी करायला घेतली. मराठवाड्यातला हा खास रुचकर व पौष्टीक पदार्थ! एका कपड्यात राजगीर्याची गाठोडी बांधून ती गाठोडी राजगीरा शिजेपर्यंत वाफवून घ्यायची. थंड झाल्यावर ताक, मीठ घालून खायची किंवा ज्यांना गोड आवडतं त्यांनी दूध साखर घालून. आईच्या नाजूक तब्येती विषयी कल्पना असलेली मितान दुसर्या दिवशी आईला भेटायला आली, आली ते आईसाठी 'गाठोडी' घेऊन! आईने खाल्लेलं हे शेवटचं साॅलिड फूड!

प्रसंग२: मार्च एप्रिल महिन्यात नुमलीघर,आसामात होते. नुकतच तिथं नर्सिंग स्कूल उघडलंय. तिथे कायमस्वरुपी वाॅर्डन यायला अवकाश होता, तोपर्यंत तिथलं काम पहायला गेले होते. बिहूच्या सुट्ट्यांमध्ये धेमाजीला (पूर्वी जिथे होते) जायचं व तिथल्या लोकांना व शाळेच्या प्रिंसीपाॅल लखीसरांना भेटायच ठरवलं होतं. पण काही कारणाने जाणं झालं नाही. काम संपल्यावर सरांची भेट न झाल्याची रुखरुख घेऊनच गुवाहाटीला आले आणि तसं तिथल्या मैत्रिणींना बोलूनही दाखवलं. दुसर्या दिवशी निघायचे होते ब्याग भरत होते. तेवढ्यात लखीसरांचा आवाज ऐकू आला. भास तर नाही ना! बाहेर येऊन पाह्यलं तर सर तर होतेच त्याचबरोबर त्यांची बायको व मुलगा! त्यांची बायको कन्याकुमारीला शिक्षकांचं शिबिर करून गौहाटीला परतली होती आणि सर व बाबू (त्यांचा मुलगा) तिला घ्यायला गौहाटीला आले होते.
ह्याला टेलीपथी म्हणा किंवा बोला फुलाची गाठ म्हणा किंवा जो जे वांछील म्हणा....
असे अनुभव मला आले तसे तुम्हालाही असतील. तर सांगा तुमचे असे काही अनुभव ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.” हे वाक्य आठवले. Happy

अनेक घटना आहेत. सान्गते एकेक सविस्तर.

मस्त धागा मंजूताई

आम्ही हिमालयात भटकत होतो. आमची भटकंती म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि पायपिटी यांचा यथेच्छ वापर करत केलेली मनमौजी प्रकारची भटकंती होती, साधारण आराखडा होता पण जी जागा आवडेल तिकडे मुक्काम वाढवला, नको वाटेल तिकडून हलवला, उद्या कुठे जायचे ते आज ठरवले, जे जे हवे ते बघितले, काही ठिकाणी जाताच नाही आले. जे मिळेल ते खाल्ले जिथे जागा मिळाली तिथे राह्यलो. पुण्याहून ञ येण्याजाण्याच्या तिकीटांखेरिज पुर्वतयारीनिशी काहीच नाही. ह्या प्रकारे भटकू शकलो त्याचे कारण सिझनच्या जरा आधीच आम्ही तिकडे फिरत होतो. त्यावेळी डोंगरावर आडरस्त्यावर बर्फच असतो. अक्षय तृतियेला तिकडची डोंगरावरच्या देवळांची कपाटं म्हणजे दरवाजे उघडतात, त्यानंतरच तिकडची वर्दळ वाढते.

तर असे करता करता आम्ही उत्तराखंडातल्या मंडल गावात पोहोचलेलो आणि अनुसुया पर्वतावर (दत्तजन्मस्थान) अत्रीमुनींचा आश्रम आहे तिथे मुक्कामाकरता चढून जायचे होते. तिकडे त्या आधी कधीच गेलेलो नव्हतो पण वरती एका ठिकाणी रहायची सोय होते असे कळले होते. तो दिवस गुढीपाडव्याचा होता (इतके दिवस म्हणजे साधारण आठवडाभर, जे मिळेल ते खाऊन काढल्याने) आपल्या नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड-धोड खाऊन व्यवस्थित साग्रसंगीत जेवण करून साजरा करू असे म्हणत होतो. वर पोचल्यावर कळले की तिथे वस्ती अशी नाहीच. आम्हाला वाटले होते तसे तिथे दत्ताचेही देऊळ नव्हते. देऊळ होते ते अनुसुया मातेचे. तिथे वरती, मंदीर, पुजार्‍याचे घर आणि अजून एक दोन घरे इतकेच बांधकाम वरती. हे कळल्यावर आता कसलं गोडधोड आणि कसलं काय, जेवण व्यवस्थित मिळालं तरी खूप असा विचार मनात आला. मंदीरात एक कुटुंबातर्फे साग्रसंगीत पुजा चालू होती. गुढीपाडवा म्हणजे चैत्र नवरात्र प्रारंभ. त्यानिमित्ताने खास देवीला म्हणून दिल्लीहून ते कुटुंब आले आहे असे कळले. त्यांची पुजा आटोपली की दर्शन घेऊन मग पुढे जाऊ असे ठरवले. रहायची जागा तिथून अजून जराच पुढे आहे असे तिथल्या एका माणसाने सांगीतले.

आम्ही आमच्या पाठपिशव्या ठेवून जोडे काढून हातपाय धुतोय न धुतोय तितक्यातच मंदीराच्या पुजार्‍यांनी आम्हाला सांगीतले की प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आम्हीही बर म्हटले त्यांनी आम्हाला दर्शन घेण्याकरता जागाही करून दिली. आम्ही दर्शन घेतले आणि (साखर फुटाणे, बत्तासे सदृष्य) प्रसाद देतील म्हणून वाट पाहू लागलो. तर कळले की प्रसाद म्हणजे जेवण आम्ही आढे वेढे घेऊ लागता दुसर्‍या एका माणसाने सांगीतले तिथे वरती आज हेच जेवण दुसरीकडे काहीही मिळणार नाही. आम्ही सांगू लागलो अशी अशी रहायची आणि जेवायची सोय होते असे कळल्याने आम्ही आलो आहोत तर तो म्हणाला ती सोय त्या माणसाकडेच होणार पण दुपारचे जेवण मंदीरातच घ्यायचे प्रसादाला नाही म्हणायचे नाही. मग अशा रितीने अत्यंत अनपेक्षितरित्या त्या विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी अत्यंत चविष्ट सात्विक चारीठाव पदार्थ असलेलं जेवण ज्यात गोडाचा शिरा देखिल होता खायला मिळालं. तसेच रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही वर चढत असताना खाली उतरणारे एक सद्गृहस्थ भेटले होते तेही आले आणि त्यांनी खालून बर्फी आणली होती. ते खरेतर गृहस्थ नव्हे तर तिथेच राहणारे संन्यासी होत. ते मराठीच होते आणि अनुसुया पर्वतावर साधनेकरता मुक्काम ठोकून होते. शिवाय ते एक दत्त मंदीर बांधण्याच्या प्रयत्नात होते. त्यासंदर्भातल्या कामाकरता ते खाली उतरल्यावर दोन चार दिवस खालीच राहणार होते. पण काही कारणामुळे लगेच परत वर आले. त्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेसही भाकरी, लिंगडा म्हणून रानभाजी, रानलसणीच्या पातीची चटणी, डाळ भात असा जोरदार बेत होता.

ता.क. माझे नंतर परत तिकडे जाणे झाले नाहीये पण असे कळते की आजमितीला दत्तमंदीर बांधून पुर्ण झाले आहे.

क्रिकेट मॅच हरण्याबाबत बद्दल तर माझ नेहमी खर होत.. त्यामुळ माझे मित्र मैत्रिणी मला क्रिकेट मॅच चालू असताना मला मॅच विषयी काहीच बोलून देत नाहीत...
माझं अस बरच काही अचानक बोललेलं खर होत.

माझं अस बरच काही अचानक बोललेलं खर होत.>>>>>>>>माझं पण खूप वेळा होतं असं. सिक्स्थ सेन्स आहे आपल्याला Wink

एकदा ऑफिसमधल्या एका मैत्रीणीला यायला उशीर झाला होता. नवीनच दुचाकी घेतली होती तेव्हा तिने.
सगळे विचार करत होते का नाही आली अजुन? तेव्हा मोबाइलचा जमाना नव्हता. माझ्या मनातल्या मनातच मी म्हणत होते पडली बिडली नसेल ना? नवीन गाडी आहे असं काहीतरी.
आणि दुसर्‍या दिवशी ती आली तर खरंच आदल्या दिवशी रस्त्यावर गाडी घसरली होती आणी बरंच खरचटलं होतं.

माझ्या मनातही असे विचार आले की भिती वाटते. ९०% ते खरे होतात आणि बहुतांशी वाईटच Sad

मला मैत्रिणी मुद्दाम त्यांचा रिझल्ट चांगला यावा अशी बोलायला लावतात पण जे मी अचानक बोलते तेच खर होत म्हणजे स्वतःहून बोललेलं खर होत, कुणी बोलायला लावलं म्हणून बोलले मग ते खरं नाही होत.

आर्या, येऊ देत तुझेही अनुभव! हर्पेन, छान अनुभव. प्रणिता, अंजली, दात मोजा Happy बत्तीशी असणार्यांच्या बाबतीत असे घडतात असे म्हणतात.
काही गोष्टी आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत घडल्या तर नवल नाही पण आई व मितान फक्त एकदाच भेटल्या होत्या म्हणून आश्चर्य वाटले. असे अनुभव आले की असं वाटतं आपण इंटररिलेटेड, इंटरकनेक्टेड, इंटरडिपेडेंट आहे म्हणतात त्यात तथ्य असावं.

एक आवर्जून उल्लेख करावा असा.
२०१४ मध्ये नुकताच गोंदवल्याचा अनुग्रह घेतला होता. महाराजांचा फोटो घरात होता. पण एक ऑफीसमध्ये आपलया टेबल वर ठेवण्यासाठी हवा असं मनापासून वाटत होते. त्यातही रंगीत फोटोऐवजी मला अगदी समाधी मंदिरात आहे तसाच ब्लॅक एन्ड व्हाईट डिट्टो तसाच फोटो हवा होता. म्हण्जे हा हट्टच होता माझा.
मन्दिराच्या बाहेरही अनेक दुकाने आहेत तिथे फोटो मिळतात. पण मला प्रत्येक फोटोत चेहरा वेगळा वाटायचा. आणि समाधी मन्दिरातलाच फोटो माझ्या मनात ठसलेला होता.
मे २०१५मध्ये ४-५ दिवसांचे एक नामशिबीर तिथे होणार होते म्हणून मी, सुलभा मुंडळे ( मायबोली आय डी शोभा ) आम्ही नावनोंदणी केली. त्याप्रमाणे गेलो. ऐन वेळी बेळगावच्या एका (अनुभवाने ज्येष्ठ अश्या) डॉक्टर साधिकेशी ओळख झाली होती, ती ही आम्हाला जॉइन झाली. मस्त दिवस चालले होते. त्या ताईंमुळे अनेक ज्येष्ठ, साधनेत 'पोहोचलेल्या' साधकांशी ओळख, चर्चा होत होती. शेवटी निघायच्या दिवशी बाहेर दुकानांमधे फिरून तसा फोटो मिळवायचा असे ठरलेले होते. शेवटच्या दिवशी पुण्यातले एक जण त्या साधिकेला भेटायला आले. त्यांची फेसबुकवर ओळख होती. त्यांचा पुण्यात प्रिटींगचा व्यवसाय.आणि जाताना त्यांनी त्या ताईंना श्रींचा फोटो भेट दिला, म्हणाले की, समाधीमंदिरात आहे तसाच फोटो आपल्याकडे असावा असे वाटत होते म्हणून खूप मेहनतीने त्यांनी तसा फोटो मिळवला. अनेक कॉपीज काढल्या. हे फोटो तयार केले आणि प्रिंट,लॅमिनेट करून टेबलावर ठेवण्याजोगे असे बनवले होते. . आमचीही जुजबी ओळख झाली. त्यातल्या त्यात आपल्या बडबड्या शोभाचीही फेसबुकवर महाराजांच्या ग्रुप मधले म्हणून ओळख होती. आम्ही त्या ताईबरोबर, म्हणून शोभाच्याही हातात त्यांनी फोटोचे पेकेट दिले. मला पेकेट मिळाले नाही हे पाहून मन जरा खट्टू झाले. पण मग शोभाला सांगून थोडे दिवस आपल्याकडे थोडे तिच्याकडे ठेवायचा असं साटंलोटं करू अशी मनात जुळवणी सुरु केली.
त्या दिवशी निघायची घाई म्हणून आम्ही लगेच भोजन प्रसाद, दर्शन आटोपून बस मध्ये येऊन बसलो. आणि बसमध्ये बसल्यावर शोभाला म्हणाले, अग तुला तो फोटो मिळालाय ना आपण काही दिवस तुझ्याकडे , माझ्याकडे असे वाटून घ्यायचे का? आणि शोभाबाई शान्तपणे म्हणाल्या, ''अग ते दोन फोटो आहेत. मलाही आधी वाटलेले की एकच आहे. उघडून पाहिले तर २ होते. निघण्याच्या गडबडीत तुला बोलले नाही. " मी अवाक. ! कारण 'त्या ताईने' त्याच्याकडचा फोटो चेक केला तेव्हा त्यात एकच फोटो होता.
सुखद आश्चर्याचा धक्का होता तो माझ्यासाठी! Happy

दुसरी अशीच गोष्ट घडली ती माझे बाबा आजारी होते त्या काळातली. इथे टाकलीय मी ती संपूर्ण माहिती. २००९ हे संपूर्ण वर्षच आमच्यासाठी काळे वर्ष होते. दर ३-४ महिन्यांनी घरातले एकेक जण म्हणजे बाबांकडचे नातेवाईक, काका, आत्या देवाघरी जात होते. त्यावर्षी ५ जण गेले सख्ख्या नातेवाईकांत.
कितीतरी अतर्क्य गोष्टी अनवानाधानाने आपल्या हातून घडत असतात. त्यांचे महत्व तेव्हा कळत नाही. नंतर एकेक लिंक लागत जाते.
५ मार्च ला बाबाना पहिला माईल्ड अटॅक आला. त्या आधी ८ च दिवस, घरात साठलेली मागच्या अक्षय तृतीयेची मडके, दिवाळी संक्रांती ची मातीची बोळकी, किल्यावर ठेवतात ते रंग उडालेली मातीची खेळणी पाहून एका क्षणी मला त्यांचा वीट आला. आणि पायरीवर बसून मी ही सगळी मातीची भांडी, खेळणी आपटून फोडून टाकली. आई नाही म्हणत होती. असे मडके फोडणे चांगले नसते म्हणाली. पण आमचा विश्वास नाही. "तू कुठल्या इसवी सनापूर्वीचे सांगतेस' म्हणून तिला गप केले. आणि मातीचेच आहे ना, मी ते फोडून बागेतल्या मातीत टाकते आहे अशी सारवणी केली. नंतरचा बाबांचा 'मृत्यूकडे प्रवास' मी https://www.maayboli.com/node/25364 इथे नमूद केला आहे.
२७ एप्रिल, सोमवारी बाबा गेले. त्याच्या आधी शनिवारी डॉक्टर म्हणाले होते, की आता बाबांना पुष्कळसे बरे आहे. तर उद्या त्यांना व्हीलचेअर वर बसवून खाली पेसेज मध्ये फिरवू या.. पण रविवारी, माहीत नाही का,मी अजून बाबा हॉस्पिटल मधून लवकर काही घरी येत नाही हा विचार करून कपाटातले त्यांचे व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे वैगरे सगळे २ सुटकेसेस मध्ये भरून माळ्यावर ठेवून दिले. आणि दुसर्या दिवशी पहाटेच बाबा गेले.

पहिला अनुभव किती सुखद ! अश्या अनाकलनीय गोष्टी घडत असतात. तार्किक विचार करता बुध्दीला पटत नाही पण घडलेल्या असतात हे खरे.
मृत्युचे संकेत मिळतात असे म्हणतात.... पण मृत्यु झाल्यावरच त्यांची सांगड लागते वाटतं...

मंजु ताई, मस्त धागा. शिर्षक ही आवडले..
गाठोडी कायम लक्षात राहील आता.. असे पदार्थ दुर्मीळ होत चाललेत..

बाकीच्यांचे अनुभव ही छानच.