एक प्रवास- मृत्युचा!

Submitted by मी_आर्या on 27 April, 2011 - 09:37

बिटकोSSSS ह्या पिशव्या घेउन जा बरं! अशी बाबांची हाक आली की माझ्या कपाळात आठी चढायची.
ए मम्मी, बघ ना गं...किती लांबुन रोडवर उभं राहुन हाक मारतात ते! असं आईला म्हणत मी त्या हाकेला 'ओ' देण्याचं टाळायचे हे नेहमीचच! उलट, हॉलमधे कोणी असेल तर जाउन बाबांच्या हातातल्या पिशव्या घ्या असं फर्मावयाचे. बाबांचा खुप राग यायचा, त्यांनी अशी हाक मारली की! मी काय आता लहान सहान आहे का लगेच पळत जायला. का म्हणुन मीच पळायचं? हॉलमधे भाऊ असतात ना बसलेले? वै वै .... त्यात ही अक्षय्य तृतीया म्हणजे मला लहानपणापासुन आवडत नव्हती...ही एक तर येते भर उन्हाळ्यात,वैशाखात! बाबा पितरांचे श्राद्ध वै. खुप मनःपुर्वक करायचे. पण देवाचं काही कुळधर्म/कुलाचर म्हटलं की त्यांची चिडचिड ठरलेली. बरं या वैशाख तृतीयेला आधीच उन्हाने हैराण लवकर उठुन पाण्याची मातीची घागर भरायची, पुरणावरणाचा स्वैंपाक करायचा, ते आधी पितरांचा घास टाकुन आम्हा घरातल्या बायकांना जेवायला उशीर व्हायचा. त्यामुळे अक्षय्य तृतीया हा सण मला अजिबात आवडत नव्हता.
बाबांचं वय ७२. पण अजुनही घराचे सर्व व्यवहार आपल्याच हातात ठेवायचा अट्टाहास. अर्थात आम्हीही कधी प्रयत्न केले नाहीत म्हणा...त्यांच्या हातातुन ते काढुन घ्यायचे. कारण ते जेवढी बाहेरची कामे करतील तेवढं बरच होतं आम्हाला. थोरल्याचं तर लग्न झालेलं.
बाबांचा स्वभाव गेल्या सहा महिन्यापासुन जास्त चिडचिडा झाला होता... नव्हे त्यांना याची जाणिव करुन दिली जात होती त्यामुळे ते आणखी चिडत असत. नातेवाईकांकडुन फसवणुक, अपमानास्पद वागणुक त्यात मुलांची साथ नसल्याने फार हळवेही झाले होते. डायबेटीस, हार्ट ट्रबल,अ‍ॅसिडीटी या सगळ्या आजारांनी कायमचं घर केलच होतं बाबांच्या शरीरात.
सर्व भावंडात मी त्यांची आवडती....आवडती असली तरी माझ्याशीच त्यांचे जास्त वादविवाद होत असत, आणि लहानपणी त्यांच्या हातचा सर्वात जास्त मार ही मीच खाल्ला. पण आता या वयात त्यांना विचार सल्ल्याला कुणीतरी हवं असायचं. बाबा आणि आई यांच्या वयात १२ वर्षाचं अंतर होतं त्यामुळे बाबा त्यांच्या लग्नापासुनच आईचं काही ऐकुन घेत नसत... हो, पण मी मुलगी असुन माझ्याशी सल्ला-मसलत करायचे. माझं नि त्यांचं नातं वडील-मुलगी या ही पलिकडच होतं... एकवेळ त्यांना काय म्हणायचय हे आईला कळत नव्हतं पण मला बरोबर कळायचं. कधी कधी तर आईच्या एखादी वाक्यावर बाबा काय म्हणणार हे मला माहित असायचं मग बाबा म्हणायचे,"बघ, मी अगदी हेच बोलणार होतो किंवा माझ्या डोक्यात अगदी हेच विचार आले होते.
जाने. २००९: मोठ्या काकु वारल्यामुळे आता मोठ्या काकांचं कसं होणार या विचारात बाबा असायचे. काकु जायच्या आधी ८ दिवस आधीच काका घरावरच्या पत्र्यावरुन पडल्याने बेडवरच होते. साधारण १३-१४ तारखेला कॉलनीतल्या एका डॉक्टरच्या आईचं निधन झालं. प्रेतयात्रेला बाबा जाऊन आले. आल्यानंतर त्यांना काय वाटले कुणास ठाऊक...अचानक म्हणाले,"अरे तिरडी बांधायचं शिकुन घ्या रे पोरांनो! त्या ठिकाणी तिरडी कोणालाच बांधता येत नव्हती तर किती फजिती झाली लोकांची!" मी तर बाबांवर उखडलेच,"बाबा, तिरडी बांधायला काय शिकायची गोष्ट आहे? जग कुठे चाल्लय आणि तुम्ही मुलांना काय शिकायचं म्हणताय?" हा विषय तिथेच संपला.

५मार्चः ऑफीसातुन घरी आले तर बाबांना त्यांचा नेहमीच्या डॉक्टरकडे (सांगवीतच) अ‍ॅडमिट केल्याचं कळलं. म्हणुन धावतच त्यांना बघायला गेले. सकाळी टॉयलेटच्या मागे घराबाहेर असलेल्या फरशीवर बाबांनी पाण्यासाठी टाकलेला सिमेंटचा पाईप पाणी जात नाही म्हणुन फोडायला घेतला तर छातीत दुखायला लागले. मग आईला घेतलं नि पायी जाउन स्वत:हुन अ‍ॅडमीट झाले होते... ! संध्याकाळी मी गेल्यावर बाबा बाथरुमला जाऊन आले....तेवढ्यात धाकटा भाऊही ऑफीसमधुन आला. त्यावेळेस बाबांना प्रचंड थंडी वाजुन हुडहुडी भरली ...एवढी की अक्षरशः त्यांच्या अंगावर ४-५ चादरी/ब्लँकेट टाकुन वरुन धाकट्याने त्यांना धरुन ठेवलं तरी बाबा थरथरत होते. नंतर सडकुन तापही भरला.आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी ब्लड युरीन सॅंपल घेउन लॅबमधे पाठवले. छातीत दुखणं हा मुख्य प्रॉब्लेम असल्याने या तापाकडे तसं सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. तेव्हा कोणाला ठाऊक होतं, हा ताप नंतर इतकं उग्र रुप धारण करणार आहे आणि त्याच्या रुपात मृत्युनेच त्यांच्या शरीरात प्रवेश केला आहे.
६मार्चला बाबांनी स्वतःच डिस्चार्ज घ्यायला लावला. घरी आल्यावर मी त्यांचा बेड माझ्या बेडरुममधे टाकला... आणी बजावुन सांगितले की रात्री पहाटे उठाल तेव्हा मला आधी उठवत जा म्हणुन.
७मार्च, पहाटे ३.३०वा: बाबा स्वतःच उठुन बाथरुमला गेले होते...मला आवाज आला म्हणुन मी उठुन त्यांना टॉयलेटजवळुन हाताला धरुन आणले व बेडवर बसवले. मला का उठवले नाही? असे विचारले तर काहीतरी असंबद्ध भाषेत बरळायला लागले... का माहित नाही, मला तेव्हा बाबा एखाद्या लहान मुलासारखे भासले म्हणुन मी त्यांना बरं बरं म्हणुन समजल्यासारखं केलं आणि झोपवलं!
दुध गरम करुन त्यांना दुध-हळद दिली.
काहीशी शंका आली म्हणुन आईला उठवुन त्यांच्याजवळ बसवलं आणि धाकटा(नाईट शिफ्टला गेला होता) फोन करुन सांगितले . लहान भाऊ ५ वा. आला त्याला परिस्थिती दाखवली..तेव्हा ही त्याच्याशी बाबा तसेच बोलत होते. त्याने जेव्हा बाबांना जवळ घेतलं आणि आम्हाला बाबांचे पडलेले कान दाखवले आणि म्हणाला तुम्हाला कळत नाही का? हे सिरियस आहेत.

लगेच त्याने मित्राला फोन करुन अँब्युलन्स मागवली. हा त्याचा मित्र औंधच्या एका सो कॉल्ड प्रतिष्ठित हॉस्पिटल मधे कामाला होता आणि अ‍ॅंब्युलन्स ही भाड्याने द्यायचा. सकाळी ६-६.३० पर्यंत हॉस्पीटलमधे पोचलो.
हॉस्पीटलमधे एवढ्या सकाळी ज्यु.डॉक्टर्स होते. सिनियर्स येइपर्यंत त्यांनी काही चाचण्या घेतल्या... आणि तात्पुरती जनरलमधे व्यवस्था करुन दिली. १०.३० वाजता सिनियर डॉक्टरांनी तपासणी करुन आम्हाला सांगितले की पॅरॅलिसिसचा माईल्ड अ‍ॅटॅक आहे तरी आपण त्यांना आयसीयुमधे ठेउया. पोटात धस्स झाले... आम्ही कुठल्याही ट्रीटमेंट्साठी तयार होतो. बाबांचं असंबद्ध बोलणं सुरुच होतं आयसीयु मधे मी काही काही निमित्ताने सतरा चकरा मारत होते. नाका तोंडात घातलेल्या नळ्या, ऑक्सीजन मास्क...बाबांना कधी या अवस्थेत पाहिलं नव्हत! ३००-३५० शुगर गेली तरी बाबा नॉर्मल दाखवायचे...त्यांनी कधीच दुखण्याचं कौतुक केलं नाही. नेहमी, "मला काही झालेलं नाही, जेवढं कौतुक केलं ना आजाराचं तेवढा तो वाढत जातो असं म्हणायचे!
त्यांना जेवण भरवायच्या उद्देशाने गेले..बघते तो काय! बाबांनी हाताच्या सलाईनच्या नळ्या काढुन टाकलेल्या.. .. रक्तप्रवाह उलटा चाललाय...बेडशीटवर रक्त सांडतय आणि बाबा जवळच्या बेसिनकडे हात धुण्यासाठी हात पुढे करत होते. कसंबसं त्यांना धरुन पुन्हा बेडवर बसवलं. आणी गप्पा मारत त्यांना बोलतं ठेवल.त्यांचे शब्द काही कळत नव्हते तरी त्यांच्याशी उगाचच इकडचं तिकडच्या गप्पा मारल्या! उगाचच नको तिथे त्यांचा सल्ला विचारत होते त्यामुळे त्यांचा असंबद्ध पणा कमी होत गेला.. वाक्यातला एकेक शब्द ते पुर्ण म्हणायला लागले. दत्तबावन्नीवर माझा विश्वास होता. मधुन मधुन त्यांच्या नाडीवर दत्तबावनी म्हणत होते. संध्याकाळपर्यंत तर बाबा अगदी वाक्य ची वाक्य नॉर्मल बोलु लागले.... पण तरी त्यांचं सलाईनच्या नळ्या काढुन टाकणे चालुच होते. बेडशीट बदलुन वॉर्ड बॉय कंटाळले...मग त्यांना लपवुन हे करणं सुरु होतं. एकदा तर नळ्या काढुन टॉयलेटला गेले...तिथेही रक्त सांडलेलं! दोन दिवस तिथे राहुन पुन्हा बाबांच्या आग्रहानेच १० मार्चला डिस्चार्ज घेतला. तो तेव्हा आलेला ताप काही उतरत नव्हता.
आता बाबांना घरी आणल्यावर आम्ही त्यांना गंमतीनं म्हणायचो ही की 'बाबा ते तुमचं एवढ रक्त गेलं ना त्यात ह्या हृदयातल्या रक्तप्रवाहात अडचण करणा-या गुठळ्याही सांडल्या असणार.'
तापाला उतार नव्हताच.. पुन्हा नेहमीच्या डॉक्टरकडे, त्यांच्या वेगळ्या टेस्टस! टेस्ट्स मधुन काही निष्पन्न नाही. मधे एकदा बाबा अंगणात बसले होते बागेतल्या सोनचाफा आणि अनंत माझ्या सांगण्यावरुन त्यांनी लावलेले पण ३-४ वर्ष झाले दोघाही झाडांना फुलेच येत नव्हती. त्या दिवशी बाबा चिडुन म्हणाले,"जाऊ दे गं ही दोन्ही झाडे काढुनच टाकुया... मी म्हटले," बाबा नको ना, या वर्षी वाट बघु!" .
या सगळ्या प्रकारातुन २७ मार्च हा दिवस उजाडला.
आतेभावाच्या सुनेचं डोहाळेजेवण म्हणुन मी नि आई आकुर्डीला गेलो...तिथेही मन लागत नव्हते.लवकर घरी परत आलो. आल्या आल्या बघितले तर बाबा बाथरुमकडे निघाले होते ...अगदी सावकाश पावले टाकत पण तिथेच त्यांना लघवी झाली. मनात शंकेची पाल चुकचुकली .. हा प्रोस्टेटचा आजार तर नव्हे? उतारवयात पुरुषांना हा त्रास होतो...युरीनवर कंट्रोल रहात नाही वै.वै माहीत होते. तापाचा चढ उतार चालुच होता. बाबा आता मला अ‍ॅडमिट करा रे असं म्हणु लागले होते.आमचीही तयारी होती. १ तारखेला गावाकडुन चुलत भाऊ बाबांना बघायला आला. त्याला बरोबर घेउन पुण्यातले प्रसिद्ध युरॉलॉजिस्टकडे दाखवायला गेलो. पण त्यांनीही रिपोर्ट दिला आणि तसे काही नसल्याचे/ अ‍ॅडमिट करायची गरज नसल्याचे सांगितले. बाबा आता गप्प गप्प असायचे... मधेच नाशिकची बहिण येउन गेली! एक दिवस संध्याकाळी आल्यावर मला म्हणाले,"बिटु, मला नाही वाटत आता मी फार काळ जगेल"! मी हादरलेच पण वरवर सारवासारव म्हणुन उलट बाबांवरच चिडल्यासारखं दाखवलं"बाबा, गेले २० वर्ष तुम्ही डायबेटीस सारखा आजार पोसताय ना तुमच्या शरीरात, मग या छोट्या आजाराला इतकं का घाबरताय?"

२ एप्रिलः बाबांनी मला त्यांच्याकडे बोलावुन जवळ बसवले.. त्यांच्या बॅगातले एकेक कागद, डायरी दाखवत मला त्यांचे एल आय सी पॉलिसी, फंडातले पेपर्स वै. सगळी माहिती दिली. आणि वर सर्वांना म्हणाले...."आताच काय लागतील माझ्या सह्या तर घ्या रे पोरांनो... बघा मला आताच सही करता येत नाहीये, हात थरथरतोय, तुम्हाला पुढे पैसे लागतील! असं म्हणत दोन-३ को-या चेक्सवर सह्या केल्या. मी अवाक...पण त्यांचे मन सांभाळण्यासाठी काहीबाही उत्तरे दिली.

५ एप्रिलः तापाला उतार नव्हताच... बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे घेउन गेलो. त्यांनी नेहमीप्रमाणे डायबेटीसच्या , तापाच्या सगळ्या टेस्टस केल्या. काही मेडीसीन दिले. आता आमच्याकडे ३-४ डॉक्टरचे मेडीसीनस झाले होते...एवढ लक्षात ठेवणं म्हणजे मुश्किलीचं काम होत. कारण बाबांच्या डायबेटीस, अ‍ॅसिडीटीच्याही गोळ्या होत्या त्यात पॅरॅलिसिस आणी या तापाच्या गोळ्या औषधांची भर पडलेली. त्यात दिवसभर घरी असणारी आईच...तिला इंग्रजी वाचता येत नव्हतं...म्हणुन मी एका कागदावर लिस्टच बनवुन दिली. सकाळी नाष्ट्याच्या आधी ह्या.. नाष्ट्यानंतर ह्या. बाबांचं जेवणही हळु हळु कमी होत गेलं होतं.
१२ एप्रिल, रविवारः आज सर्वजण घरी होते. आज वहिनी डिलीवरीसाठी माहेरी बडोद्याला जाणार होती. त्यासाठी तिचा भाऊ आला होता. बाबांना आंघोळ वर्ज्य असल्याने रोजचं स्पंजिंगच चालु होत.. त्यात उन्हाळा लागलेला म्हणुन सर्वानुमते बाबांना आंघोळ घालण्याचं ठरलं. पण बाबांचा नकार होता "बघा बरं , मला काही झालं तर तुम्ही जबाबदार"! मी म्हणाले"बाबा, चालेल! मी जबाबदार पण तुम्ही आंघोळ करा आज"! आईला दमा असल्याने मीच बाबांना बाथरुममधे खुर्चीवर बसवुन बाबांना आंघोळ घातली! नंतर त्यांना स्वच्छ कपडे घालुन आमच्या बागेत बसवलं जिथे बाबांनीच वेगवेगळी झाडं जोपासली होती. त्यांच्या आवडत्या पेरुच्या झाडाखाली बसवलं! उगाचच मनात विचार,' बाबा, मन भरुन बघुन घ्या तुमची झाडं.. तुम्ही हे खस्ता खाऊन बांधलेलं घर, तुमचं वैभव! " मनात वाईटच विचार का येतात कुणास ठाऊक! बाबा खाली मान घालुनच बसलेले... घर, झाडं काहीच त्यांनी बघितलं नाही!

१३ एप्रिलः आज बाबांना आमच्या फॅमिली डॉक्.कडे न्यायचेच्...या उद्देशाने संध्याकाळी घरी आल्यावर सगळे जण बाबांना घेउन जुन्या सांगवीतल्या आमच्या जुन्या फॅमिली डॉक्.कडे गेलो. त्यांनी पटापट ज्या ब्लड युरीन टेस्ट सांगितल्या त्या केल्या. दुस-या दिवशी रिपोर्ट आला आणि ते डॉक. आमच्यावर उखडलेच," इतके दिवस काय करत होता तुम्ही लोक? उद्याच्या उद्या यांना औंधच्या त्या प्रसिद्ध हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट करा"! तेव्हा कुठे आम्हाला बाबांच्या सिरियसनेसची कल्पना आली. तेव्हा कळलं की आपण एम एस्सीला स्टडी केलेला हाच तो बॅक्टेरीया E.coli. हा तर माणसाच्या शरीरातला नॉर्मली ऑकरींग जिवाणु, शेवटी त्यानेही बाबांशी उभा दावा साधला होता तर!
बाबांच्या युरीनरी ट्रॅक्टला याचेच इन्फेक्शन झाले होते... आणि ते इतके वाढले होते की १ ml सँपल मधे १.५ लाख जीवाणु होते.
१५ एप्रिलः लगोलग या दिवशी डॉक.ची अपॉईंटमेंट घेउन सकाळी दहालाच बाबांना अ‍ॅडमिट केले. घरुन निघतांना बाबांना थोडंफार खाउनच पाठवलं होत. बाबांबरोबर घरातुन बाहेर पाय काढतांना देवाची रक्षा लावली,"बाबा, उभ्याने जात आहात, आणि उभ्यानेच तुम्हाला परत यायचय- आडवं नाही!!" देवाने माझी हाक ऐकली नाही. पुन्हा त्याच नळ्या, ऑक्सीजन मास्क, यावेळेस सलाईनच्या बरोबर अँटीबायोटीक्सची इंजेक्शन्स पण होती.
दुपारी जेवणासाठी आई -भावाला घरी पाठवले. १ वाजता हॉस्पिटलमधले जेवण आले. चवळीची भाजी व चपाती ...बाबांनी अर्धीच चपाती खाल्ली असेल! त्यांना लगेच त्रास व्हायला लागला...जोरजोरात श्वास घेउ लागले! म्हणुन मी सिस्टरला बोलवायला पळाले तर त्यांचा लंच टाईम होता! २-३ वेळेस स्वतः जाऊन बोलावुन आले तेव्हा एकदाच्या त्या आल्या...बाबांना तपासले लगेच नर्स! वॉर्डबॉय !!असे ओरडत धावाधाव करु लागल्या! आम्हाला बाहेर काढुन देण्यात आले होते..त्यामुळे आत काय चाललय काहीच कल्पना येत नव्हती! मी घाबरुन आई/भावाला फोन करुन घरुन बोलावुन घेतले. त्यावेळेस कसं बसं बाबांना बरं वाटलं!
नंतर कळले, त्यावेळेस बाबांचे हार्ट फेल झाले होते.
नंतर रोजचा तापाचा चढ उतार नेहमीचच चालु होतं.. हॉस्पीटलमधे अँटीबायोटीक्सची इंजेक्शनांचा मारा सुरु होता... त्याच्या स्ट्राँग डोस ने हार्टला प्रेशर येत होते. त्यात शुगरचा चढ उतार सुरु होता. सगळं ट्रायल अँड एरर बेसीसवर! इकडे आमच्याही सुट्ट्या...मधुनच ऑफीसला जाणे सुरु होते. नाशिकहुन बहिण आलेली होती. ती हॉस्पीटलमधे असल्याने आम्ही ऑफीसकडेही लक्ष देऊ शकत होतो.
बहिणीला तर बाबा म्हणालेले की "अरे पोरांनो, आताच माझी काय सेवा करायची करुन घ्या... नंतर पस्तावाल बरे! " बाबांचे हात पाय बारीक झाले होते. एकदा सहज हात बघितला तर पांढरा फटक हात, पिवळी पडलेली, चिरा पडलेली नखे! वाईट वाटायचे...बाबांच्या तर आता संवेदना ही कमी होत होत्या...बोलणं तर जवळजवळ नाहीच! धाकटा हॉस्पिटलमधे रात्री झोपायचा...सकाळी सकाळी चहा द्यायला जायचा तेव्हा छान बोलायचे...पण आमच्याशी नाही. सिस्टर टेस्टींग साठी दिवसातुन ४ दा रक्त न्यायच्या त्यावेळेस सुई टोचतांना सुद्धा बाबा निर्विकार असायचे.
मधुन मधुन बाबांच्या आयसीयुच्या वा-या सुरु होत्या. गावाकडुन सगळे नातेवाईक भेटायला येउन जात असत. बाबा, सर्वांना हात जोडुन नमस्कार करत आणि काही चुकलं असेल तर माफ करा असे हुंदके देत म्हणत. बाबांना अशा अवस्थेत आम्ही कधी पाहिलच नव्हतं... विचित्र वाटे! पण चमत्कारावर विश्वास होता... काहीतरी चमत्कार व्हावा आणी बाबा यातुन उठुन बसावेत असं वाटे.

२५ एप्रिल- शनिवार: बाबांचा ऑफीशियली वाढदिवस! दुपारी मी आणि पंत (मेव्हणे) जाऊन पिंप्रीतल्या आमच्या एका ज्योतिषाकडे जाउन आलो. त्याने प्रश्न विचारल्या विचारल्या सांगितले की तुमच्या बाबांची जायची वेळ झालेली आहे. तुम्ही त्यांना आता अडवु शकत नाही. शॉकच बसला हे ऐकुन! नंतर संपुर्ण रस्ता भर रडतच हॉस्पीटलमधे आलो. तर इकडे बहिण, भाऊ यांचे चेहरे प्रफुल्लीत होते. त्यांना विचारले तर म्हणाले की डॉक्टर म्हणतायत, आज बाबांना बरं वाटतय, उद्या सकाळी आपण त्यांना व्हिलचेअरवर बसवुन खाली रिसेप्शन कॉरीडोरमधे फिरवुया..काहीशा विचारतच बहिण्/भावाला हा ज्योतीषाकडचा प्रकार सांगितला तर त्यांनी वेड्यातच काढले! त्यादिवशी अमावस्या पण होती त्यामुळे भिती वाटत होती....दत्तबावनीचे पाठ सुरुच होते. ज्योतीषांचं काही खर नसतं अशी बहिणीची समजुन घालुन मेव्हणे तीला परत नाशिकला घेउन गेले.
आदल्या दिवशी ऑफीसमधे माझ्या हिंदी टायपिंग कामाचे ६००० रु. मिळाले होते! संध्याकाळी आधी बाबांच्या पायावर डोके ठेउन पैसे त्यांना दिले.. म्हटलं,'बाबा, हे तुमच्यासाठी! आपल्याला वैष्णवदेवीला जायचय ना तुम्ही बरे झाल्यावर!" बाबांनी फक्त मान डोलावली...आणि पाठीवरुन आशिर्वादाचा हात फिरवला...शेवटचा आशिर्वाद!!

२६ एप्रिल, रविवारः दुपारी हॉस्पिटलमधुन आल्यावर डोक्यात काहीतरी किडा वळवळला. घरात उंदीर झालेत नाहीतरी आपण सगळे घरी नसतोच, बाबांना घरी यायला अजुन १०-१५ दिवस तरी लागतील...माळ्यावरच्या बॅगा काढुन त्यात बाबांचे सगळे इस्त्रीचे कपडे भरुन पुन्हा वरती ठेउन दिल्या!! Sad
रात्री ८.३० हॉस्पीटलमधुन फोन"बाबा, सिरियस! लवकर या! " लगोलग थोरल्या भावाला घेउन हॉस्पीटल गाठले. बाबांना आयसीयु मधे हलवत होते...डोळ्यात एकदम पाणीच आले. बाबांच्या जवळ जाउन हाक मारली. "बाबा' ! बाबा डोळे उघडायला तयार नाहीत. फक्त एक हुंकार!
उद्या २७ एप्रिलः अक्षय्य तृतिया उद्याचं काय करायचं हे आईला विचारलं! आईचीही इच्छा दिसली नाही. रात्री बाबांसाठी परत भोपळ्याचं सुप करुन आणलं! १०.३० ते ११च्या सुमारास बाबांना सुप भरवलं आज २-३ वाट्या सुप माझ्या हातुन बाबांनी खाल्लं म्हणुन आश्चर्यमिश्रीत समाधान. का कुणास ठाऊक आज रात्री हॉस्पीटलमधे झोपावे हा विचार येत होता पण बाबांना विचारताच त्यांनी मानेनेच नाही म्हटले.आणि आईकडे बोट दाखवुन,'तिला थांबु दे' असा इशारा केला.
थोड्याशा नाराजीनेच मी व थोरला भाउ घरी परतलो. रात्री झोप येणे शक्यच नव्हते. खालच्या आख्ख्या घरात मी एकटी, वरच्या रुम्समधे मोठा भाऊ!
२७ एप्रिल,२००९ सोमवार, अक्षय्य तृतीया: सकाळी ऑफीसला जायला ६ वा. उठुन कणिक मळायला पीठ परातीत घेतले तोच मोठा भाऊ जिन्यावरुन पळत पळत खाली आला!"बिटु, चल आपल्याला हॉस्पीटलमधे जायचय, बाबा सिरियस झालेत!"
ते तसेच टाकुन हॉस्पीटल गाठले तर लहान भाऊ नि आई धाय हमसुन हमसुन आयसीयुच्या कॉरीडोरमधे रडतायत!"बिटु, आपले बाबा आपल्याला सोडुन गेले गं!!" खुप खुप रडले... आयसीयुच्या कॉरीडोरमधे मोठ्याने रडण्याची चोरी. आत जाऊन बाबांना बघण्याचे हिंमत होत नव्हती. थोडं सावरल्यावर लहान भाऊ म्हणाला.... डॉक. नी अर्ध्या तासाची मुदत दिली आहे...तोपर्यंत नातेवाईकांना बोलावुन घ्या म्हणालेत. म्हणजे बाबांचा अजुन श्वास चालुये? मी आयसीयुमधे धाव घेतली. ५.३० फुटाचा देह कॉटवर निपचीत पडलेला... नाकातल्या नळ्या काढलेल्या होता. कार्डीयोग्राम वै. यंत्र निर्विकार पणे एकच आडवी लाईन दाखवत होत्या. तोंडात फक्त चुन्याच्या निवळीचे पाणी ...त्यात येणा-या बुडबुड्यांवरुन श्वास चालुये असे वाटत होते. रडत रडत परत एकदा नाडीवर दत्त बावनी म्हटली! अस्पष्टशी लाल रेषा कार्डीयोग्रामवर चमकली ... एकदम उत्साह आला. बाबा शुद्धीवर येताहेत वाटतं पण आयसीयुतल्या लोकांनी सांगितलं काही उपयोग नाही. पहाटेच त्रास झाला बाबांना! डॉक. ला बोलावलेलं... पंपिंग केलं, फरक पडला नाही आणि आता ते शेवटचा श्वास घेतायत.खरं खोटं देवाला माहित.. बाबांजवळ तासभर बसुन होतो.

दुपारपर्यंत गावाकडुन सगळे नातेवाईक आले. संध्याकाळी ६ वाजता बाबांच्या आवडत्या पेरुच्या झाडाखाली आंघोळ घालण्यात आली आणि ७.३० ला बाबांना नेण्यात आले. अक्षय्य तृतीयेचं पितरांना जेउ घालण्याऐवजी बाबा स्वतःच त्यांच्यात जाउन सामिल झाले होते.
२८ एप्रिलः टेरेसवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेले तर सोनचाफ्याच्या झाडाला २-३ फुले आलेली दिसली. लगेच तोडुन आणली.खाली अनंताकडे बघितले तर अनंतालाही एक टप्पोरे फुल आलेले. अगदी त्याच वेळेस बाबांच्या अस्थी आल्या आणि मी ही सगळी फुले बाबांना वाहुन टाकली.

आज दोन वर्ष झालीत. मला माहितीये, आज घरी आई एकीकडे डोळे टिपत असेल... लहान भाउ उदासवाणा बाबांच्या फोटोकडे बघत असणार...मोठाही नि:शब्द असणार! आणि मी ... मी तर वाट बघतेय, कधी बाबांची हाक ऐकु येतेय," बिटको,....... !!!

गुलमोहर: 

नि:शब्द ! खरंच जवळच्या माणसाचं जाणं चटका लावतं! सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेस.

Sad
आर्या,
किती छान लिहिलेयस गं..... बाबांच्या आठवणी लिहून झाल्यावर तुला नक्कीच हलकं हलकं वाटलं असेल ना?

टेरेसवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेले तर सोनचाफ्याच्या झाडाला २-३ फुले आलेली दिसली. लगेच तोडुन आणली.खाली अनंताकडे बघितले तर अनंतालाही एक टप्पोरे फुल आलेले. अगदी त्याच वेळेस बाबांच्या अस्थी आल्या आणि मी ही सगळी फुले बाबांना वाहुन टाकली.>>> काय कमाल असते निसर्गाची... काही वेळा असंच अनाकलनीय घडत असतं...

तुझ्या पप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

बाबा तुला नक्कीच हाक मारत असतील, याची खात्री आहे. नीट कान देऊन, मन लावून ऐक, तुला नक्की ऐकू येईल बघ...

काळजी घे!

Arya, Javal pas yach paristititiun mi hi geli hai , Aj he vachtana mala maza baba athvle 3 versha zali tyna jaun pan ajunhi tyncha Athvanini maza dolyatla pani thambat nahi. Sarvapitri Amavstya hoti tya divshi, geva te varle.

आर्ये.., हे तु इथे शेअर केलेस छान केलेस.
वडील ज्या दिवशी गेले तो दिवस "अक्षय्यतृतिया" शुभदिवस होता.
आशा आहे त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांति लाभली असेल.
धन्यवाद!

Sad
तुम्ही नशीबवान आहात की शेवटच्या काळात तुम्हांला वडलांची सेवा करायचे भाग्य लाभले. सगळेच एवढे नशीबवान नसतात हो. Sad

आर्या वाचुन वाईट वाटले आणी लिखाण खुप सुंदर आहे अगदी आपण स्वता: अनुभवतो आहोत असे वाटले.. Sad
अक्षयतृतिया हा माझ्या साठी तरी खरच बेकार दिवस आहे.. ह्याच दिवशी नको त्या अनपेक्षीत वाईट घटना घडतात.. दरवर्षी बिचकुनच असतो..

@प्राची
तुम्ही नशीबवान आहात की शेवटच्या काळात तुम्हांला वडलांची सेवा करायचे भाग्य लाभले. सगळेच एवढे नशीबवान नसतात हो >> १००% अनुमोदन

सगळे नातेवाईक भेटायला येउन जात असत. बाबा, सर्वांना हात जोडुन नमस्कार करत आणि काही चुकलं असेल तर माफ करा असे हुंदके देत म्हणत. >> Sad ह्याच्या पुढे वाचु नाही शकलो.

आर्या, लेखनाला सुंदर म्हणणे योग्य होणार नाही. भिडलेच! खूप वाईट वाटले.

आपल्या व दिनेश यांच्या तीर्थरुपांना विनम्र श्रद्धांजली!

-'बेफिकीर'!

आर्या, जसं जगलीस ते दिवस, तसं लिहिलयस... वाचताना माझ्या आजूबाजूची हवा जड झाली... श्वास जड झाला.
माणूस आपल्यात असणं आणि ते निघून जाणं... ते जाईपर्यंत त्यांच्या असण्याचा अर्थं सर्वार्थानं ध्यानात येत नाही, हेच खरं.

Pages