अफवेचे बळी

Submitted by हेला on 3 July, 2018 - 14:28

देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं? कुणावरचा तरी राग बाहेर काढल्याचं? आपल्या मनातला न्यूनगंड मारल्याचं? कि उगाच टाईमपास करायचा म्हणून पाच मुडदे पडले याचं ?

लोक किती विकृत झालेत आणि किती बिनडोक आहेत याच या सध्या घडणाऱ्या घटना ज्वलंत उदाहरण आहेत. किमान सारासार विचार करण्याची मानसिकता सुद्धा आपण सोडून दिलेली आहे. झुंडशाही हि अजगरासारखी असते हे कधी कळणार आपल्याला काय माहित. आज ते आहेत उद्या आपण असू एवढं सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाहीये.

काय आहे अफवा ? ग्रामीण भागात लहान मुलं पळवणारी टोळ्या आल्यात म्हणून... याला पुष्टी देण्यासाठी काही महाभाग कुठले तरी व्हिडीओ सुद्धा प्रसारित करत आहेत. सध्या कोणत्याही गावात गेलं तरी याच अफवेची चर्चा. कुणी म्हणतंय अमक्या गावात मागच्या आठवड्यात चार जण पकडले, त्या गावात कॉल केल्यावर तर ते म्हणतात आम्हाला तुमच्या गावात लोक पकडल्याचे कळालंय... किती हा बावळटपणा? गावातले विचारवंत जेष्ठ म्हणावेत असेही या अफवेला बळी पडलेत. कुणीतरी थोडा विचार तर करावा ?

लहान मुलांच्या अपहरणाचा मुद्दा देशात गंभीर आहे.. सोबतच तरुण मुली पळवण्याचे प्रकारही खूप वाढत आहेत.हि लहान मुले या तरुण मुलींचा थांगपत्ताही लागत नाहीये. यांची तस्करी होते हेही सर्वश्रुत आहे, पण हि एक मोठी इंडस्ट्री असल्यामुळे सगळे गप्प आहेत.
पण हे मुलं पळवणारे असे गावागावात फिरत नाहीत. गावात तर शक्यतो हे लोक जातच नाहीत. कारण ग्रामीण भागात आपला परका लगेच ध्यानात येतो. हे लोक शहरी भागातच गुन्हे करतात. सोबत अशा टोळ्यात न फिरता पूर्ण प्लॅन करून अपहरण करतात. पण आता तेही पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. एका टोकाची बातमी दुसऱ्या टोकापर्यंत सेकंदात पोहचू शकते, यामुळे अशी अपहरणे आता कमी होत आहेत.

यापेक्षाही पोट धरून हसावे अशी एक अफवा. म्हणे या टोळ्या किडनी हृदय सुद्धा पळवतात. अक्कल गहाण टाकल्याचा इतका मोठा पुरावा कुठला असू शकतो? किडनी हृदय हे या खेळण्याच्या वस्तू आहेत का? खिशात हात टाकून चोरल्या... शरीराचे असे भाग हे फक्त हॉस्पिटल मधेच काढले जाऊ शकतात. हृदय तर जास्तीत जास्त ६ तास जिवंत राहू शकते. असले अवयव चोरून नेण्यासाठी मोठमोठ्या लॅब सोबत घेऊन फिरावे लगेल. असे पायी चालणारे वा कार ने फिरणारे असले काम करूच शकत नाहीत. इतके साधे लॉजिक... पण आपल्याकडे लॉजिक चालत नाही, झुंडशाही चालते. मेंढरासारखे चालायचे हे आपल्या DNA मधेच आहे.

हे अफवांचे पीक हळूहळू शमेलही पण तोपर्यंत किती बळी घेईल माहित नाही. यामुळे आता एक वेगळीच समस्या समोर येणार आहे. आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जाणेही लोकांना अशक्य होणार आहे. कुठे मुलगा रडायला लागला तरी लोक मारायला सुरुवात करतील. याहीपुढे जाऊन काही शक्यता पाहुयात. तुम्ही प्रवासात एखाद्या गावात गेलात. तिथल्या स्थानिकांशी काही कारणाने वाद झाला... त्यांनी फक्त मुले चोरणारी टोळी म्हणू बोंब मारावी, लोक शेकड्याने येऊन तुम्हाला मारायला सुरुवात करतील. आणि तुमचा जीव घेऊनच थांबतील. या निमित्ताने आपले एखादे जुने वैर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला लुटण्यासाठी अशीच आरोळी ठोकायची. चार पाच जणांनी मारायला सुरवात करायची सगळं काही चोरायचं, आणि मग मुलं चोर म्हणून ओरडायचं, लोक येऊन मारायला लागतील, चोर राहिले बाजूलाच. एखादा अनोळखी अशाच प्रकारे रस्त्यात अडवून त्याच्याकडून खंडणी मागितली जाऊ शकते, नाही दिली तर आरडाओरडा करील अशी धमकी दिली कि तो जवळच सगळं काही काढून देईल. कितीतरी भयंकर शक्यता या प्रकारांमुळे समोर येत आहेत. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सुद्धा फक्त अफवेचेच बळी असतील अशी शक्यता सुद्धा आपण गृहीत धरू शकत नाही. अफवेच्या असून कुणीतरी आपले इप्सितही साध्य केले असेल... या घटना अशाच याचा पर्यटनावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक अनोळखी नवखा चोर आहे असेच समजून मारहाण केली जात आहे. या बिनडोक लोकांच्या च्या हेही लक्षात येत नाहीये कि आपलं गाव सोडलं तर आपणही बाहेर गावासाठी अनोळखी असतो. शहरात तर कुणीच कुणाला ओळखत नाही. हि परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. पोलीस म्हणतात संशयितांना पकडून आमच्या ताब्यात द्या. प्रत्येक अनोळखी संशयित म्हटला तर लोकांचं फिरणं अवघड होऊन जाईल. दिसला कि पकड आणि दे पोलिसात, पोलिसांनी त्याची चौकशी करून एक दोन दिवस डांबून मग सोडावे. सगळी अनागोंदी माजणार नाही का असल्या प्रकारामुळे ?

यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावकऱ्यांच्या डोक्यात वाळवळणारा हा अफवेचा किडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ठरवलं तर आठ दिवसात हे प्रकार बंद होऊ शकतील. गावागावात स्थानिकांना निर्देश देणे अवघड नाही. सरकारकडून तरी अजून ठोस अशी काही भूमिका दिसत नाहीये. आणि सरकार यावर ठोस कारवाई करत नसेल तर या प्रकरणामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत का अशी शंका घ्यायला निश्चित जागा राहील.
_

श्रीकांत आव्हाड

https://www.facebook.com/shrikant.avhad/posts/2073791532687517

Group content visibility: 
Use group defaults

लेख अगदी पटला. फक्त
<<सरकार यावर ठोस कारवाई करत नसेल तर या प्रकरणामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत का अशी शंका घ्यायला निश्चित जागा राहील.>>
हे कशासाठी? सरकारने कारवाई करावी, असं म्हणणं बरोबर आहे.
मी हे यासाठी म्हटलं कारण कर्नाटकातही असे प्रकार घडले.

<यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावकऱ्यांच्या डोक्यात वाळवळणारा हा अफवेचा किडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ठरवलं तर आठ दिवसात हे प्रकार बंद होऊ शकतील. गावागावात स्थानिकांना निर्देश देणे अवघड नाही. >

धुळ्यातल्या घटनेत हेही केलं गेलं होतं. दुसरीकडचा प्रतिसाद इथे डकवतोय.

जमावातल्या डोकं ताळ्यावर असलेल्या काहींनी त्या पाच जणांना ग्रामपंचायत ऑफिसात बंद केलं आणि जमावाला पोलिसांची वाट पहायला सांगितलं. जमावानं पंचायत ऑफिसचं दार तोडून त्यांना मारलं. आलेल्या पोलिसांच्या विनावणीला जुमानलं नाही. त्यांनाही मारहाण केली. पोलीस आले तोवर दोघे जण जिवंत होते , ते मेल्याची खात्री झाल्यावर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी पंचायत सदस्यांना अफवांबद्दल सांगितलेलं. लोकल टीव्ही आणि पेपरात जाहिराती दिलेल्या.

आसाम की त्रिपुरामध्ये तर अशा अफवांचं निराकरण करायचं काम ज्याला दिलंय, त्याचाच बळी गेला.

पकडल्या गेलेल्या किंवा गायब झालेल्या कथित मारेकर्‍यांचे नातलग, आमचा बाळ्या तेव्हा तिथे नव्हताच. त्याला उगाच धरलंय, असं सांगतात. मारहाण आणि हत्येच्या प्रकरणाबद्दल मात्र त्यांना काहीही म्हणायचं नसतं, असं वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांत दिसतंय.

म्हणजे एक प्रकारे मॉब लिंचिंग हे न्यु नॉर्मल होऊ लागलंय. कारणं वेगवेगळी असतील. मरणारे आणि मारणारे वेगवेगळे असतील कधी गोहत्येचा संशय, कधी मुलींची छेड काढली, कधी मुलं पळवणारे.

अड्ड्यावर टाकलेला प्रतिसाद एडिट करून>>>>>>>

Height म्हणजे जो मुले चोरण्याचा व्हिडीओ viral झाला आहे, तो पाकिस्तानात मधल्या एका एजेन्सी ने " child safely" भाष्य करणाऱ्या डॉक्युमेंटरी मधला एडिटेड भाग आहे.
ज्याने कोणी हे मेसेज fwd केले त्याला ढीग वाटत असेल आपण समाजाप्रती जबाबदारी दाखवली वगैरे...पण प्रत्यक्षात त्याने एक भस्मासुर मोठा करायला मदत केली असते,

सोशल मीडियावर अफवा पसरवणारे 3 प्रकारे काम करतात-

1) टोटल खोटा विडिओ /कँटेंट बनवून टाकणे (वरचा मुले पळवण्याचा व्हिडीओ त्यात येईल, एक डॉक्युमेंट्रोसाठी मुद्दाम शूट केलेला सेट अप विडिओ आहे तो)

2) खऱ्या गोष्टीचे एडिटेड व्हिडीओ बनवून टाकणे (राहुल गांधी चे आलू की फॅक्टरी वाला विडिओ आठवत असेलच सगळ्यांना)

3) खऱ्या घडलेल्या गोष्टीचा विडिओ, पण त्याच्या बरोबर असणारा मेसेज त्याला चुकीचा संदर्भ देतो, (एक सैनिकी गणवेशातील माणसाला लोक मारत आहे असा व्हिडीओ काश्मीर मध्ये पहा सैनिकांना कसे मारतात म्हणून फिरत आहे, हा व्हिडीओ काश्मीर मधलाच आहे पण त्याचा संदर्भ चुकीचा आहे, )

यात प्रत्येकाने "कशावरून मला दिसते आहे ते त्याच संदर्भाने म्हंटले आहे?" असे स्वतः ला विचारावा आणि समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर तो व्हिडीओ पुढे पाठवू नये.

बिरबलाच्या गोष्टीत खरे आणि खोटे यात 4 बोटे अंतर आहे असे बिरबलाने उत्तर दिले होते (कानाने ऐकतो ते खोटे, डोळ्याने पाहतो ते खरे)
पण आजच्या काळात ते अंतर पूर्ण पुसले गेले आहे.

on second thought लोक खरेच जर वरचा प्रश्न विचारू लागली तर भारतातील ९०% लोकांना द्कानेबंद करायला लागतील

वर भरत नि म्हंटले आहे तशी खदखद पूर्ण समाजात आहे,
त्याला फक्त एका ट्रिगर ची गरज असते, लहान मुलाला होत असणारी मारहाण, स्त्रीवर होणारा अत्याचार, कुठेतरी दुकानात होणारी लुटालूट याचा कुठलाही व्हिडीओ, आणि त्याबरोबर प्रक्षोभक भाषेत लिहिलेला एक मेसेज ता ट्रिगर पुरवतात, आणि मग वर सारख्या घटना चालू होतात.

आलेला मेसेज पडताळून पाहणे ही सवय आपल्याला कधी लागलीच नाहीये, त्यामुळे ही आम्ही विरुद्ध ते, ही विभागणी अगदी सोपी होऊन गेली आहे.

धुळ्यातली आणि तशाच प्रकारच्या इतर घटना खुप दु:खद आणि मोठी चिड आणणार्‍या आहेत. घटनेची, बातमीची शहानिशा करायचा नाही.... आणि अगदी टोकाची भुमिका घ्यायची. Sad Angry

आता मारल्या गेलेल्या निरपराधी लोकान्ना परत आणता येणार नाही.

यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी.
<<

असल्या कितीही ताकिद, सक्ति सरकारने केली तरी तुम्ही भारतीय त्याला जुमाननार आहात का ? सरकारी नियम, कायदे मोडणे हे तुम्हा भारतीय लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. तेंव्हा सरकारने कितीही कडक कायदे, नियम केले, तरी तुम्ही भारतीय त्याला शेवटी वाटाण्याच्या अक्षताच लावणार.

शिवाय तुमच्यासाठी सर्व काही सरकारनेच करावे हि तुमची अपेक्षा ! समाजासाठी काय फायदेशीर आहे काय नुकसानदायक आहे ह्याचा कोणताही विचार न करता स्वत:ला आलेले फॉरवर्ड पुढे ढकलताना स्वत:ची बुद्धी वापरायला कधी शिकणार तुम्ही भारतीय ?

"असेल हरि तर देईल खाटल्यावरी" अशी तुम्हा भारतीयांची मानसिकता तेंव्हा तुमचे प्रबोधन करणे खुद्द ब्रम्हदेवाला देखिल शक्य नाही, तुम्ही बसा बोंबलत ऊठसुट सरकारच्या नावाने.

लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी.>>>>>>>>>>>>>>>
सरकार काही करेल या आशेवर राहण्यात अजिबात अर्थ नाही,
सरकार जर स्वत: च्या तोंडाने फोरवर्ड वर विश्वास ठेऊ नका सांगू लागेल तर त्यांच्या प्रचाराचा कणाच मोडेल, तेव्हा ते काहीही बोलनार नाहीत.

खरे सांगायचे तर हि ताकीद देण्याची वेळ निघून गेली आहे,
पहिले लिन्चींग झाले त्यानंतर घडलेला घटनाक्रम आठवा,

त्या विरुध्ध आवाज उठवनार्या लोकांची किती टवाळी केली होती ते आठवा, आपण स्वत: त्या वेळी कुठल्या बाजूने होतो ते आठवा,
पहिली हत्या झाली त्यावेळेसच सरकारने सक्त शिक्षा केली असती, खुन्याच्या तिरंगा वेष्टित शवपेटीला नमस्कार करायला केंद्रीय मंत्री गेले नंसते तर लोकांची भीड चेपली गेली नसती

त्यावेळेला मरणारा मनुष्य मुसलमान आहे, शहरात अश्या गोष्टी होत नाहीत या समाजाखाली शांत राहणाऱ्या लोकांसाठी हि निर्वाणीची सूचना आहे, हे कोणाही बरोबर होऊ शकते, अजून भानावर या...

आपण काय फोरवर्ड करतोय याच्या कडे लक्ष द्या, भले तो कोणताही व्हिदिओ असेल, मेसेज असेल किंवा फोटो असेल, तुमच्या जातीला धर्माला कितीही अपमानित असणारी घटना तुम्हाला फोरवर्ड स्वरुपात मिळू दे, जो पर्यंत घटनेची पडताळणी होत नाही तोपर्यंत ते फोरवर्ड पुढे पाठवू नका.

फारतर तुमचे तुमच्या ग्रुप मधले श्रेय जाईल, पण कोण्या निरपराध माणसाचा जीव जाण्या पेक्षा ते श्रेय गेलेले बरे नाही का?

कदाचित तो निरपराध माणूस अगदी तुमच्या घरातली व्यक्ती सुद्धा असू शकते, कदाचित तुम्ही स्वत:च असू शकता याची जाणीव ठेवा.

हे समीर नामक जे 'तुम्ही भारतीय' तुम्ही भारतीय करत आहेत ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत आणि इथे माबोवर का आहेत?

हेलोबा, समीर भौ फिजीचे आहेत असे ते सांगताहेत. तीनच म्हैने झालेत त्यास्नी इथे येउन. नया है वह.. नया मुल्ला लम्बी बांग Happy

टुम इन्डियन लोग हमारे ज्युतीके बराबर हय..... ळगाण

अरे पण तुम्ही तसलेच मेसेज पसरवून निवडून आलात हे विसर्लात का भौ. आता सरकार विरुद्ध जे मेसेज असतील ते स्फोटक आणि बेजबाबदार आणि त्यांच्याव्र कारवाइ होणार. आणि बाणी आली हो आली....

भीतीदायक आहे हे.
हल्ली कोणतेही मेसेज फॉरवर्ड करायची भीती वाटते. कुठूनतरी आलेल्या पोस्ट मधल्या फोटोतली बाई घरी दरोडे घालणारी किंवा माणसं मुलं पळवणारी आहेत का याचं खरं खोटं आपण नाही करु शकत.
मॉब लिंचींग मागे हिडन संताप, कुठेतरी हिरो बनू शकण्याचं समाधान अश्या बर्‍याच गोष्टी असतील(मुन्ना भाई एम बी बी एस मधला सुरुवातीच्या १० मिनीटातला सीन).
कदाचित काही लोक 'आवडत नाहीत्/डोक्यात जातात/गेले तर आपली धंद्यातली काँपीटीशन कमी' म्हणून स्कोअर सेटल करायला उठवलेल्या अफवा असतील.
'कोणत्या सरकार च्या काळात वाढलं/कमी झालं' या नेहमीच्या कोंबडी की अंडे वादापेक्षा आजची पब्लिक मेंटॅलिटी 'दोन कानाखाली ठेवून दिल्या तरच आपली बाजू बरोबर मानली जाईल' ही आहे हे भीतीदायक आहे.प्रत्येक मार खाणारा घटक आपल्या पेक्षा दुर्बल घटकावर राग दाखवून स्वतःचा सेल्फ एस्टिम कायम ठेवणार.डोकं कोणीच नाही वापरणार.

सरकार प्रत्येक मोबाईल माॅनिटर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून वागणे गरजेचे आहे. नाहीतर कधीतरी 'लांडगा आला रे आला' सारखी परिस्थिती येईल.

सरकार प्रत्येक मोबाईल माॅनिटर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून वागणे गरजेचे आहे.

--- म्हणजे नेमकं कसं करायचं? माझ्या अंगावर जमाव चालून आला तर काय करायचं मी? Sad

<< माझ्या अंगावर जमाव चालून आला तर काय करायचं मी? >>
-------- एक सामान्य माणुस त्या क्षणाला काहीही करु शकत नाही... ते एकण्याच्या परिस्थितीत नसतात, सान्गितले तरी समजणार नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ निघुन गेलेली असते.... आता कृत्य घडलेले असते, त्यावर पान्घरुण घालणॅ आलेच... एक चुक झाकण्यासाठी पुढे अजुन चुका करायच्या.

अराजक कशाला म्हणायचे ? यादवी आणि अराजकता मधे काय फरक आहे ?

महाराष्ट्रातल्या धुळ्यात सामान्य माणुस सुरक्षित नाही हेच मला स्विकारता येत नाही.

↑ I would add a Whatsapp logo on that mobile screen, to make it more correct. That artist obviously couldn't because of copyright issues and such..

म्हणजे नेमकं कसं करायचं? माझ्या अंगावर जमाव चालून आला तर काय करायचं मी? >>>> मी जमाव येण्याआधीच्या परिस्थितीबद्दल बोलतेय. Whatsapp वर येणारे msgs फाॅरवर्ड करण्याआधी विचार करावा. 'आला msg की कर फाॅरवर्ड' हे चुकीचं आहे. आणि कुणाला मारायला जाताना जरा खरं काय आहे ते पडताळून बघावं. पण वाहत्या गंगेत हात धुणंच जास्त 'फॅशन' मधे आहे आजकाल.

निव्वळ WA ला दोष देता येत नाही. ते निव्वळ वरवरचे कारण आहे. WA नसेल तर दुसरे अजुन काही कारण मिळेल....

Whatsapp किंवा इतर सोशल मिडिया...किंवा सरळ चावडी..ह्या बातम्या कुठेही तयार आणि modify होतात.

देशातले बिघडलेले वातावरण पाहता अनोळखी जमावापासून कोणत्याही कारणाशिवाय कधीही प्राणघातक हल्ला होण्याचा धोका असल्याने स्वसुरक्षेसाठी हत्यार अर्थात बंदूक वापरण्याचा व विनाअट कोणत्याही आक्रमक जमावावर स्वसंरक्षणार्थ चालवण्याचा परवाना मिळावा असा अर्ज केला पाहिजे पोलिसांत.

सर्व जनतेला अफवेवर विश्वास ठेवू नका व जमाव करुन कोणाला मारु नका अन्यथा कडक शिक्षा होईल असा आवाहनाचा एक 2 मिनीटाचा विडिओ आपले पंतप्रधान नक्कीच शूट करू शकतात, जर फिटनेस अवेअरनेसच्या विडिओ वर ३५ लाख खर्च करु शकतात तर..

सरकारी पातळीवर जनतेच्या पैशाने स्वतःच्या जाहिराती करणारे ह्या लोकांच्या जीवावर उठलेल्या अफवेच्या विरोधात पेपर, tv रेडिओ वर जाहिरात, या माध्यमातून जनजागृती करु शकतात.

कोणी मुलं पळवणाऱ्या टोळीवर विश्वास ठेवतं तर कोणी ५ मार्कांचा ज्ञानेश्वर या कथित मुलाखतीवर विश्वास ठेवतं. One believes whatever strengthens his/her pre-existing biases

Pages