"कार" पुराण - भाग ३

Submitted by भागवत on 27 June, 2018 - 07:33

“कार" पुराण भाग-1 : https://www.maayboli.com/node/62741
“कार" पुराण भाग-२ : https://www.maayboli.com/node/63037

याचं महिन्यात १ तारखेला बलेनोचे(कार) १ वर्ष पूर्ण झाले. तसे मी या अगोदर “कार” पुराण या मालिकेत दोन भाग लिहिले आहेत. तर गाडीला १ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आणि त्यावरील अनुभवा साठी तिसरा भाग लिहायला काहीच हरकत नाही. नाही का?

मा‍झ्या सोसायटी मध्ये मी दररोज थोडा वेळ चालतो. एक दिवस मला लाल रंगाची बलेनोची गाडी चमकत असताना दिसली. दुसर्‍या वेळेस कार मालक त्या गाडीची एकदम आत्मीयतेने पोलिश लावून पुसत होता. गाडी एकदम चकाकत होती. दररोज अर्धा तास तो गाडी स्वच्छ करतो. त्यामुळे त्याची गाडी एकदम टापटीप असते. त्याचे कार सोबत एक खास जवळीक किंवा बंध जाणवले. तशी मला कधी भावनिक आत्मीयता जाणवली नाही कार सोबत. कारण मी कधीच गाडी स्वत: धुतली नाही आणि कधी वेळच दिला नाही गाडी चालवण्याशिवाय. तसे गाडीला सुद्धा भावना असतात हे सप्रमाण सिद्ध होते कारण लॉरा, पिंटो कारच्या पाठीमागे इमोशन(Emotion) असे लिहिले आहे. बऱ्याच कार वर माझी कार (My Car) असे लिहिलेले असते. माझी कार (My Car) नावाचा वितरकच पुण्यात आहे.

१ वर्षात कारच्या तीन मोफत सेवा (Car Service) झाल्या. त्यात पहिल्या कार सेवा होऊन आल्या नंतर मी गाडी सरळ रेषेत चालवली तर गाडी हळूहळू रस्त्याच्या डाव्या बाजूला जात होती. मी मित्रांकडून पुष्टि करून घेतली. मी सरळ नाकासमोर चालणारा माणूस आणि गाडी डावीकडे जात असल्यामुळे लोक मला डाव्या विचारसरणीचा समजतील आणि मला पश्चिम बंगाल ऐवजी केरळला जावे लागले असते त्यामुळे मी परत गाडी सर्विस साठी पाठवली. गाडी दुरूस्त करून परत आल्या नंतर मी परत सारथ्य केले तर गाडी आता हळूहळू उजव्या बाजूला जात होती. लोक मला उजव्या विचारसरणीचा जास्त झुकलेला समजतील यामुळे गाडी परत दुरूस्त करून आणली. तरी त्यांनी चाक संरेखन (Wheel Alignment) व्यवस्थित करून दिले नव्हते. असे हे मा‍झ्या सोबत तिसर्‍या मोफत दुरूस्ती सर्विसिंगला सुद्धा झाल. चाक संरेखन आणि मा‍झ्या कारच काय वाकडे आहे काहीच कळत नाही.

एकदा मी कारने गावी जात होतो त्या वेळेस चालक गाडी चालवत होता. दिवाळीचे दिवस होते. एक दुचाकी स्वार एका क्षणात बाजूने आला आणि स्वत:ची दुचाकी कारला घासून बाजूला जाऊन पडला. कट मारण्याच्या नादात कारच नुकसान झालं आणि तो आणि त्यांच्या कुटुंबासह बाजूला जाऊन पडला. दोन मिनिटे काय झाले हे काही कळलेच नाही. मग पुढे थांबून परिस्थितीचा अंदाज घेतला. बऱ्याच वेळेस लोकं मारामारी करतात. पण आम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली. त्या माणसाची कुटुंबाचे आम्ही हॉस्पिटल मध्ये नेऊन प्राथमिक उपचार केले आणि तेथून निघालो. अलबत मा‍झ्या गाडी मागे कोणतीही दुसरी गाडी नव्हती नाही तर काय झाले असते त्या कुटुंबाचे देव जाणे. गोष्टीचे सार असे की महामार्गावर अनुभव नसेल तर चालक घेऊन जा. पण जास्त जोखीम घेऊ नका. जीवन विमा, कार विमा असणे किती गरजेचे आहे हे मला त्या वेळेस कळले. मी त्या वेळेस हुश्श केले कारण हे दोन्ही मा‍झ्या कडे होते. परंतु खरा विमा (Insurance) अध्याय तर पुढे वाढवून ठेवला होता.
मी दुसरी मोफत सर्विस आणि विमा प्रतिपादन (Claim) एकदाच केले. आणि तिथेच माझा हिरमोड झाला. कारण प्रतिपादन घेताना दुचाकी स्वाराने केलेले नुकसान दुरूस्ती कंपनी ने मान्यच नाही केली आणि फक्त अर्धेच काम करून दिले तेही एका दरवाजाची दुरूस्ती आणि ओरखडे मिटवण्याचे. प्रतिपादन आकार मात्र १००० रुपये भरावा लागला. बिल भरपूर झाले पण मन पूर्ण समाधानी झाले नाही. तुम्हाला विमा मध्ये काय क्लेम होत? काय होत नाही? ही सगळी माहिती माहीत असली पाहिजे. गाडी दुरूस्त करण्यास किती दिवस लागतील यांचा सुद्धा अंदाज आखता आला पाहिजे. परंतु एक अद्दल घडली विमा कंपनीला गृहीत धरण्याची.

तुम्ही जर नवीन कार घेण्याच्या विचारात असाल आणि तुम्ही जर अति सावध आणि बचावात्मक असाल तर तुम्ही एखादी जुनी कार ६ महिने वापरूनच नवीन वाहन घेण्याच्या नादात पडायला पाहिजे. तुम्ही उत्तम सराव करू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही आरामात चालवू शकता तेव्हा नवीन गाडी घ्या. कारण जुन्या गाडीला काही झाले तर काही वाटत नाही पण नवीन कारला काही झाले तर बरेच काही वाटते. कारण कार ही आपल्या अपत्या सारखी असते आपण मुलांना किती ही मारले तरी काही वाटत नाही पण तेच कोणी दुसर्‍यांच्या धक्का लागला तरी आपण भांडतो. त्याप्रमाणे गाडीला आपल्या मुळे ओरखडे पडले तर थोडे दु:ख होते पण आपल्या वाहना वर दुसर्‍याच्या चुकीमुळे ओरखडे पडल्यास आपण त्याला फैलांवर घेतो. असा अनुभव मला एक-दोन वेळेस आला आहे. गाडीची सगळी माहिती तुम्हाला अवगत पाहिजे. नवीन कार वर तुम्ही विनाकारण प्रयोग करत बसणार नाही. गाडी ज्या वेळेस छोट्या उंचवटा वर असते त्या वेळेस मागे यायची शक्यता असते त्यामुळे रहदारी मध्ये असताना योग्य काळजी घेता आली पाहिजे. जास्त रहदारी मध्ये सुद्धा तुम्ही आत्मविश्वास पूर्वक गाडी चालवता आली पाहिजे. कारण कार तुमच्या वागण्याचे मूर्तिमंत प्रतिरूप असते. तुम्ही आळशी असाल तर कार वर धूळ असते. तुम्ही बेजबाबदार असाल तर गाडी सुद्धा तुम्ही बेजबाबदार चालवाल. काळजी युक्त असाल तर काळजीपूर्वक चालवाल. आक्रमक आणि तापट असाल तर तुमचे गुण कार चालवण्यात नकळत उतरतात. योग्य माणूस योग्य पद्धतीने कार वापरतो.

मित्रा सोबत मस्ती करत कार चालवताना खुप मज्जा येते. माझे काही मित्र आंब्याचे लोणचे मुरावे तसे त्यांना गाडी बद्दल माहिती त्यांच्या डोक्यात मुरलेली आहे. तर या मित्रांचा मला सुद्धा खुप फायदा झाला. एकदा मी टमटम ने प्रवास करत होतो त्या वेळेस पत्नीने विचारले कार सोडून टमटम ने प्रवास करताना त्रास होतो का तर मी म्हणालो टमटम, रिक्षा, पीमटी ने प्रवास करायची लाज नाही आणि कारने प्रवास करायचा माज नाही.

नवीन गाडी घेताना पुढील काळजी घ्यावी.
१. मदती शिवाय आत्मविश्वास पूर्वक गाडी चालवता आली पाहिजे. ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गाडी चालवता आली म्हणजे गाडी आली असे होत नाही.
२. जुन्या वाहनावर पुरेसा सराव केला पाहिजे.
३. गाडीची सगळी माहिती तुम्हाला अवगत पाहिजे.
४. विमा काढताना कोणत्या प्रकारचा विमा आहे त्याचे फायदे, तोटे आणि प्रतिपादन कसे, किती, केव्हा आणि कुठे होते याची सविस्तर माहिती असली पाहिजे.
५. गाडी दुरूस्ती किंवा मोफत सर्विसिंग कुठे, केव्हा आणि कमाल त्यामध्ये काय- काय केले जाते यांची जुजबी माहिती असणे गरजेचे आहे.
६. गाडी दुरूस्ती किंवा मोफत सर्विसिंग केल्यानंतर कार व्यवस्थित तपासली पाहिजे.
७. गाडीचे वितरण स्वीकारताना विशेष काळजी घ्यावी. सगळे पेपर एकदा व्यवस्थित तपासले पाहिजेत.
८. गाडीची आठवड्यात एकदा तरी चकाचक करून किंवा जमल्यास धुवून घायला हवी.
९. लांब पल्याचा प्रवास करताना हवा, पाणी, पेट्रोल, दुरुस्ती तपासून खात्री केलेली बरी.
१०. गाडी रात्रीच्या वेळी सुद्धा चालवता आली पाहिजे. कधी वेळ पडेल याची काही खात्री नसते.
११. तुम्ही पुण्यातील लहान-लहान पेठेत छोट्या-छोट्या गल्ली मध्ये विना त्रास आणि शिव्या न खाता, रात्री सिंगल रस्त्यावर, विनासायास रहदारी मध्ये चालवली तरच तुम्ही म्हणू शकता मला ठीकठाक गाडी चालवायला येते.

ब्लॉग "कार" पुराण मालिका समाप्त!!!

तळटीप - "कार" पुराण हा ब्लॉग हा निखळ मनोरंजना साठी लिहिलेला आहे. त्यात कोणाला दुखावण्याचा हेतु नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Namokar!!! आपला प्रतिसाद मला उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!