“कार" पुराण भाग-२

Submitted by भागवत on 8 July, 2017 - 02:28

लिंक - “कार" पुराण - भाग १

@वाहन वस्तूदर्शनालय
कार वितरण स्वीकारण्यासाठी मी एक तारखेला १.३० वाजता निघालो. पु.ल. यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकिटाचे आरक्षण केले तरी आम्ही गार्डाच्या डब्बात जाणार त्या प्रमाणे मी किती ही वेळेचे नियोजन केले तरी मला किमान एक तास तरी उशीर होणार. अश्या वेळी मित्राचा किंवा नातेवाईकाचा पूर्वानुभव कामास येतो. माझा नातेवाईक मा‍झ्या अगोदर ठरवलेल्या वेळेत पोहोचला होता. त्याने त्याच्या पारखी नजरे खालून गाडीची पाहणी केली त्याचे रंगा बद्दल निरीक्षण बरोबर निघाले. गाडीच्या रंगावर धूळ आणि वाहतुकी मध्ये कागद लागून गाडीचा रंग काही ठिकाणी खडबड वाटत होता. मग गुणवत्ता व्यवस्थापिके सोबत बोलणे झाले. त्यांनी (लेप) कोअटींग करून देतो असे सांगीतले. तो पर्यंत मी बाकीचे राहलेले पैसे भरले आणि दस्तऐवज घेतले. त्यांनी कारच्या रंगावर वर प्रक्रिया करून एक तासात कार परत आणली. तरी मुळ समस्या तशीच होती. मला वस्तु निर्मिती व्यंग आहे यांची शंका यायला लागली. पण तसे काही नव्हते. शेवटी दोन प्रयत्ना नंतर काम झाले आणि कार घरी जाण्यासाठी सज्ज झाली. मग काय आई वडीलांनी पूजा केली आणि प्रात्यक्षिक नंतर आम्ही घरी जाण्यास सज्ज झालो.

मी आता वस्तु घेताना ठराविक पद्धत पाळतो. वस्तुचे गुणधर्म, किंमत आणि वैशिष्ठ्य पाहतो. त्यातून त्या वस्तु बनवणाऱ्या कंपन्या शोधून काढतो. मग त्यातून पाहणी करून कोणत्या व्यवसायिकाच्या वस्तु चांगल्या आहेत ते शोधतो. कंपनी शोधल्या नंतर त्यांची इतरा पेक्षा वस्तू का चांगली आहे यांची चौकशी करतो. मग त्याच कंपनीच्या मा‍झ्या आवाक्यातील दोन वस्तु तुलना करून एक वस्तु निवडतो. गाडीचा रंग ठरवताना मला शेवट पर्यंत सावळागोंधळ झाला होता. ३ महिन्याच्या सगळ्या गाडी निवडणुकीतून मी मारुती सुझुकी यांची बलेनो कार आरक्षित केली. गाडीला ६ महिन्याचा प्रतीक्षा काळ होता. मी माहिती काढून एका नवीन वस्तूदर्शनालय गाडी घेतली जे करून मला गाडी लवकर मिळेल. आणि मला गाडी लवकरच भेटली.

इतिहासाची पुनरावृत्ती होते मी जेव्हा दुचाकी घेतली होती त्या वेळेस मी पहिल्यांदा वाहन कार्यालयात घेऊन जाताना मी वेगवर्धक एवढ्या जोरात फिरविला की दुचाकीचा पुढचा चाक चक्क हवेत होता. लोकांना वाटत होते की मी पुण्यात दुचाकी शर्यत करतोय पण आतून किती घाबरलो होतो हे कोणालाच माहीत नव्हते. चार चाकी वेळेस पण काहीतरी घोडचूक करणार हे विधिलिखित होते. मी चार चाकी घेऊन कार्यालयात गेलो. परत येताना एका दुचाकीने कट मारली आणि मी करकचून ब्रेक दाबल्या मुळे कार मागून एका दुचाकी स्वाराने कारच्या पार्श्वभागाचा मुका घेतला. मित्रांनी आधीच कल्पना दिल्यामुळे काही त्रास झाला नाही. पण त्यामुळे गाडीवर ओरखडे पडले आणि थोडक्यात निभावले. मी काही वेळा साठी चेतावणी निर्देशक चालू केली तर लोक मा‍झ्या कडे विचित्र नजरेने बघत होती. एक वेळेस तर गाडी वाहतुक चौकात थांबलेले असताना गाडी मागे जात होती. मागचे लोक मला पुढे येऊन सांगत होते की गाडी मागे जात आहे. काही तरी चुक व्हायलाच हवी होती ना.

@वाहन सारथ्य चाचणी
भला मोठा परिसर, एकंदरीत एव्हढी सुंदर सरकारी विभागाची इमारत मी पहिल्यांदाच बघत होतो. नाही तर कळकट रंग चांगला दिसेल असा रंग असतो शासनाची कचेरीला. इमारतीला शोभेल असा रंग, खाली खाते विभाग, स्वच्छ स्वच्छताग्रह, झाडाची योग्य काळजी घेतलेली, पार्किंग साठी मुबलक जागा. वरच्या मजल्यावर प्रशिक्षण वर्ग आणि त्यात वाहतूक विभागाचे नियमाची माहिती दाखवणारे फलक, सुसज्ज असे बांधकाम. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कसी करावी याची माहिती एका कोनाड्यात लावली आहे. ४ प्रकारचे वेगवेगळे भव्य चाचणी मार्ग. वधू वर परिचय मेळाव्यातील मुलीच्या बापा प्रमाणे सगळी लोक एका हातात अर्ज पकडून उभी होती. त्यात वरून तापलेले ऊन आणि काही वेळ पाऊस पाणी. आज मला झाडाचे महत्व कळले. मोठा परिसर बसायला रस्त्याच्या कडेला भरपूर जागा. मस्त शेतात बसण्याची जाणीव झाली. प्रत्येक सोसायटी मध्ये बसण्यासाठी बाक वाटप होतात पण इथे नावाला सुद्धा बाके नव्हती. जसे लोक मेळाव्यात मंचकावर जाण्यासाठी क्रमांक लावतात त्या प्रमाणे सगळ्यांना आपला क्रमांक कधी येईल याची उत्सुकता होती. मुलीचा बाप लग्ना मध्ये मंडपात सगळी कडे फिरून विचारपूस करतो त्या प्रमाणे आम्ही या चाचणी मार्गा वरून त्या चाचणी मार्गा वर परीक्षेसाठी फिरत होतो.

विमुद्रीकरणाच्या वेळेस आपला वित्तसंस्थेत कधी क्रमांक येईल याची जशी उत्सुकता असते त्या प्रमाणे आम्ही १२ जणांची वाट बघण्याशिवाय आणि खरी परीक्षा देण्यासाठी वेळच भेटत नव्हती. मी पहिला १ तास भरपूर प्रयत्न केला. मला फी भरल्या नंतर प्रशिक्षण वर्गात बसायला सांगीतले. तिथे कोणीच नव्हते. मी बराच वेळ वाट बघून विचारपूस केली. त्यात त्यांनी माहिती पुरवली की मा‍झ्या सारखे ६-७ जण आल्यावर आम्हाला १ तासाचे प्रशिक्षण होईल. पण वाहन प्रशिक्षण केंद्रातील लोकांना सरळ प्रवेश होता. जर तुम्हाला फुकट मध्ये स्वतावर हास्य करून घ्यायचे असेल तर मध्यस्थी कडे न जाता स्वत: अर्ज भरण्यासाठी आणि शाश्वत अनुज्ञप्ति चाचणी साठी जा. मी सरळ हिशोबनीस च्या कार्यालयात मध्ये प्रवेश केला. पण सगळे कागदपत्र असून सुद्धा माझी त्यांनी अर्ज खारीज केला. अर्जा मध्ये ५० चुका दाखवल्या. आधी तुम्हाला चाचणीची शुल्क भरले का विचारणार? तुम्हाला तुमची स्वत:ची कार चालवायला परवानगी नसल्यामुळे तेथील कार चालवण्यासाठी रुपये भरावे लागतात. मागील अनुभवा वरून पत्ता दाखल्याचे ३ वेगवेगळे दस्तऐवज, पॅन ओळखपत्र, शिकाऊ अनुज्ञप्ति, जुने शाश्वत अनुज्ञप्ति, आणखी बरेच काही दस्तऐवज यांची फाइल ठेवली होती. तरी पण अधिकार्‍याने माझे कागदपत्र अडवले. विविध कारणे सांगून हा कागद नाही तो कागद नाही आणि स्वत:ची गाडी आणली नाही अश्या सबब सांगितल्या. त्यांनी मला विचारले कोणती गाडी चालवणार मी सांगीतले कोणतीही तर तो म्हणतो अरे मा‍झ्या घरून गाडी आणू का. दस्तऐवज वेबसाईटवर अपलोड करायला सांगीतले. पण ते काही अपलोड होत नव्हते. तरी पण मला सगळ्या चाचणी करण्यासाठी पूर्ण दिवस लागला.

'चार'चाकी 'चार'ओळी

स्विफ्ट, डीझायर खास, सिटीचा मात्र क्लास
पोलोचा स्वत:चा थाट, ८०० प्रसिद्ध आणि मास

i१०, i२० यांना चाचणी फेरीत दुसरा मान
बलेनोचे मूल्यवर्धित वैशिष्टे फारच छान

टीयागोची कमी किमतीत खास सेवा
टीगाॅरचा कमी किमतीत जास्तच मेवा

काही कारची सरासरी खरच पहावेना
सियाज, वेन्टो यांची किंमत मात्र परवडेना

अमेझं आणि जॅझ्झ ची बातच न्यारी
WR-V आणि इर्तीगा यांचा जलवा भारी

इकोस्पोर्ट आणि ईटीओसं एकदम मस्त
डॅस्टर आणि क्रेटा मात्र फुल टू जबरदस्त

समाप्त!!!

तळटीप - "कार" पुराण हा ब्लॉग हा निखळ मनोरंजना साठी लिहिलेला आहे. त्यात कोणाला दुखावण्याचा हेतु नाही.
शब्द : चेतावणी निर्देशक - Warning Indicator, अनुज्ञप्ति - License, वित्तसंस्था - Bank,वेग वर्धक - Accelerator, चाचणी फेरी - Test Ride

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादा साठी धन्यवाद चैत्रगंधा!!! आपला प्रतिसाद मला उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!