योगचा योग जुळवून आणावा

Submitted by राजेश्री on 22 June, 2018 - 00:27

योगाचा योग जुळवून आणावा !

योगेन चित्तस् पदेंन वाचाम् |
मलम् शरीरस्य च वैद्यकेन ||
योकापरोत्तम प्रवरं मुनीनाम् |
पतंजली प्रांजलीरानतोस्मि ||
(या श्लोकाचा अर्थ असा की,त्या पतंजली मुनींनी योगशास्त्राने मन,व्याकरण शास्त्राने वाणी व वैद्यकशास्त्राने शरीर या सर्वांची अशुद्धी (मल)दूर केली , त्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना मी नम्रपणे प्रणिपात करतो.)
हि आमच्या योगपरिचय वर्गातील सुरवातीची प्रार्थना योगशिक्षक श्री टकले सरांच्या समर्पित अश्या धीरगंभीर आवाजात हि प्रार्थना आमच्या कानालाच न्हवे तर आमच्या मनालाही शांतीची अनुभूती द्यायची.आणि तो पुढचा एक तास आम्ही सर्व साधक योगमय होऊन जायचो. मनाला योगाच महत्व पटलं कि शरीर त्याचे घडणारे एक एक चांगले परिणाम आपल्या समोर उलघडत जाते. धीर मात्र हवाच.नियमितपणा हवा,सातत्य हवे,नवं काही रोज शिकत आणि करीत राहण्याची तयारी हवी मग सगळंच जमू लागत. हे सर्व जमू लागणं आणि त्यातून आनंद वाटणं म्हणजे योगाचा खरा अर्थ समजून घेतल्यासारखा आहे.
योगशास्त्र हे सगळ्या जीवनाचे सार असलेली एक जीवनशैली आहे.शरीर आणि मनाचा समतोल राखण्याचे हे शास्त्र आहे.हा अभ्यास सर्वांसाठीच आहे.वय,तब्बेत या गोष्टी योगाभ्यासाच्या आड येत नाहीत (स्त्रियांसाठी मात्र मासिक पाळी व गर्भधारणेचा कालावधीत काही योगक्रिया निषिद्ध मानल्या आहेत) योगाभ्यासात एका विशिष्ट पद्धतीने शरीर ताणले जाते आणि श्वासोश्वास घेतला जातो. ही योगाची केवळ प्राथमिक ओळख झाली योगाशास्त्र यापेक्षाही गहन आणि अमर्याद अश्या ज्ञानाचा खजिना आहे.
योगशास्त्राची व्याख्या सांगताना योगशास्त्राचे आद्यप्रणेते श्री पतंजली महामुनी यांनी सांगितले आहे--
' योगश्चित्तवृत्तिनिरोध:' |
'चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग'.अर्थात शरीर व मन या दोहोंवर परस्परपूरक असे संस्कार करून अति चंचल मनाला एकाग्र करून , शरीर व मन शुद्ध करून त्यांच्या परस्पर सहचार्याने पुढील वाटचाल करण्याचा मार्ग योगात सांगितलेला आहे.
पतंजली मुनींनी ज्या निरपेक्ष भावनेने योगाचे ज्ञान जगातील सर्व साधकांसाठी खुले केले तीच निरपेक्ष भावना योगसाधक आणि योगप्रचारकांच्या प्रति अपेक्षित आहे. योगाची यम, नियम,आसन, प्राणायाम,प्रत्याहार,धारणा ध्यान व समाधी अशी आठ अंगे असणारा हा अष्टांगयोग होय. अष्टांगयोगाच्या नित्य आचरणाने साधकास आत्मानुभूतीचा प्रत्यय येतो.योगशास्त्राची बैठक नीट समजावून घेऊन दैनंदिन जीवनातील एक इष्ट व आवश्यक बाब म्हणून योगाचा अभ्यास करावयास सुरवात केली म्हणजे एक गोष्ट निश्चित लक्षात येते कि,'योग म्हणजे सुखी व समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग आहे'
योगाची पहिली पायरी म्हणजे यम यामध्ये अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम सांगितले आहेत दुसऱ्या पायरीत नियम सांगितले आहेत शौच, संतोष,तप, स्वाध्याय,ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत व्यावहारिक जगात जीवन जगत असताना प्रत्येकाने या यमनियमांचा आपल्या जगण्याशी सांगड घालून इष्ट ते आणि शक्य ते यमनियम आचरणात आणणे असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. योगाची तिसरी पायरी आहे आसन,
'स्थिर सुखम् आसनाम् !
अशी आसनांची व्याख्या श्री पतंजली मुनींनी योगसूत्रात केली आहे. आणि आसनांची ही जशी व्याख्या आहे तोच त्याचा शरीरांतर्गत परिणामही आहे. आसनांच्या अवस्थेत योगसाधकाला स्थिरत्व आणि सुख असे दोन्ही परिणाम प्राप्त होतात. हे स्थिरत्व प्राप्त होण्याची प्रक्रिया हि क्रमाने येते यामध्ये शारीरिक ताण हा असह्य नसावा तर तो सुखकारक असला पाहिजे .आसनांच्या या अभ्यासामुळे शरीरशास्त्र अभ्यासाचा नवा पैलू आपल्यासमोर येतो.कोणत्याही शारीरिक बैठकीत किंवा स्थितीत सुखावह व यातनाविरहित रीतीने मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र व एकाग्र राहता येणे हे आसनांच्या अभ्यासाने साधले पाहिजे.आसन,प्राणायामाचे शरीरांतर्गत परिणाम प्रत्यक्ष अनुभवायास मिळणे हे या अभ्यासाचे साध्य आहे.
चंचल अश्या चित्ताची एकाग्रता व्हावी व मूलतः स्वयंप्रकाशी असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून योगाच्या चौथ्या अंगात प्राणायामाचा अभ्यास सांगितलेला आहे. भौतिक बंधनातून हळूहळू परावृत्त व्हायला हवे त्याबाबतचे स्पष्ट मार्गदर्शन प्रत्याहार या पाचव्या अंगात केले आहे. तदनंतर ध्यान,धारणा व समाधी ही योगाची अखेरची तीन अंगे आहेत या तीन अंगांचा अभ्यास करीत असताना मानवी देहात सुप्तवस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीची जागृती होते व काही अतींद्रिय शक्ति, सिद्धी प्राप्त होतात या सिद्धी प्राप्त झाल्यावर मोहाने त्याच्या मागे न लागता पुढे प्रगती करीत गेले तरच योगाचे अंतिम साध्य गाठता येईल , अन्यथा नाही.थोडक्यात योग म्हणजे आत्मा व परमात्मा यांची एकरूपता हे साध्य अनेक मार्गांनी गाठता येते.भक्तीच्या मार्गाने गाठले जाते त्या मार्गाला भक्तियोग म्हंटले आहे,ज्ञानमार्गाने हे साध्य गाठले तर त्या ज्ञानयोग म्हंटले आहे याच पद्धतीने राजयोग,हठयोग,ध्यानयोग,प्रेमयोग,कर्मयोग इत्यादी योगाचे अनेक प्रकार प्रचारात आहेत.सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना आसन व प्राणायाम या दोन अंगावर जास्त भर देऊन साधक आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ ठेऊ शकतात.
शरीरातील विविध इंद्रिये व संस्था उदा. श्वसन,रक्ताभिसरण , पचन,उत्सर्जन,इ. तसेच स्नायूसमूह , मेंदू, मन यासारख्या घटकांची कार्यक्षमताहीं योगामुळे वाढीस लागते.योगा वर्गात कपालभाती,जलनेती,वमनधौती अश्या शुद्धीक्रिया शिकवल्या जातात त्या योगे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा या क्रियांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जसजसे वय वाढत जाईल तसतसे प्राणिज घटकांचे प्रमाण कमी होत जाते शरीरांतर्गत स्निग्धता कमी होऊन लवचिकता कमी होत जाते आणि साहजिकच वयोमानापरत्वे आपल्या हालचालीवर मर्यादा येऊ लागतात.आसनांमुळे शरीराची कावचूकता वाढण्यास मदत होते.म्हणजेच योगात आरोग्याचे केवळ ज्ञान न मिळता त्यावर मात करण्यासाठी आसनांचे उपचार ही आहेत. थोडक्यात मन आणि शरीर यांचे परस्परसंबंध समजावून घेणे त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि आपली इच्छाशक्ती विधायक कार्याकडे वळवणे हेच योगाचे व्यावहारिक जीवनातील साध्य आहे.
माझा स्वतःचा अनुभव इथे द्यायचा झाला तर एका अपघातात मी गाडीवरून पडून डोक्याला आणि खांद्याला मार लागून मी पूर्ण जायबंदी झाले होते.उपचार सुरु असताना डॉक्टर मला म्हणाले होते कि, खांदा पूर्ण recover व्हायला सहा महिन्यांचा कालावधी लागेल आणि ट्रेकिंग ला कधी जाऊ शकते असं विचारल्यावर पूर्ण वर्षभर तरी नाही असा सल्ला आणि दम दोन्ही एकदम मिळाले होते . उपचार चालू असताना दीड महिन्यातच योग विद्या धाम,इस्लामपूर योगप्रवेश वर्ग सुरु होत असल्याचे समजले त्यावेळी माझा खांदा केवळ ३० ते ४० अंशांत फिरायचा आणि डोक्याला मार लागल्याने चालताना थोडाफार तोल जातोय असं जाणवायचे,रोजच्या गोळ्याही सुरु होत्याच. तरी मी रोज पहाटे पाच ला उठून योगवर्गात जाऊ लागले जमतील तशी आसने,जमतील तितके आणि तसे सूर्यनमस्कार घालत राहिले पडल्याच्या तिसऱ्या महिन्यात मी १० किमी. मॅरेथॉन स्पर्धा केवळ साधारणतः एका तासात पूर्ण केली माझा खांदा पूर्ण ३६० अंशात चौथ्या महिन्यात फिरू लागला औषधांबरोबरच पूरक हालचाली,आसने,प्रार्थना आणि प्राणायाम याचा परिणाम हा कि मी दोन महिन्यांच्या आत ऑफिसला रुजू झाले . त्यामुळे माझ्या स्वानुभवच सांगतो की,"योगाभ्यास हा निरोगी आणि दिर्घायुषी कसं जगायचे याचा अभ्यास आहे"
' पिकत तिथे विकत नसतं ' ही म्हण योगाबाबत हीं आपल्या भारतीयांसाठी लागू होतेय कारण केवळ शास्त्रोक्त पद्धतीने योगा शिकणेसाठी परदेशातील हजारो योगप्रेमी लाखो रुपये खर्च करून भारतात दाखल होतात योगाचे ज्ञान आत्मसात करतात आणि त्याचा आपल्या देशात प्रचार आणि प्रसार करतात. आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपले अमूल्य असे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ हरवत आहोत. भारताने संपूर्ण जगाला शारीरिक आणि मानसिक रूपाने निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक अश्या ज्ञानाचा खजिना योगारूपाने खुला करून दिला आहे.शारीरिक आणि मानसिक स्वास्थ हेच या पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यप्राण्यांच्या जीवनाचं अंतिम असं ध्येय आहे.
२१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन'म्हणून साजरा होत असताना हा दिवस नेहेमीच्या डे सेलिब्रेशन संस्कृतीचा भाग होऊ नये आणि योगा हे जर सेलिब्रेशन असेल तर रोज आपल्याला मिळणाऱ्या २४ तासातील १ तास स्वतःसाठी राखून ठेऊन हे सेलिब्रेशन केले गेले पाहिजे.
||हरिओम् ||
(संदर्भ:- १.योगविद्या धाम इस्लामपूर येथील योगप्रवेश व योगपरिचय वर्गातील व्याख्याने.२.योगप्रवेश व योगपरीचय वर्गाची क्रमिक पुस्तके,लेखक:- डॉ. विश्वास मंडलिक.३.विकिपीडिया ४. स्वानुभव)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही विश्वासराव मंडलिक सरांकडून योगाचे धडे गिरविले आहेत्,पण त्यांनी आम्हाला असे व्यवस्थित शिकविले आहे. लेखाच्या सुरवातीस दिलेला श्लोक असा पाहिजे होता.
" योगेन चित्तस्य पदेन वाचा , मलं शरिरस्य च वैद्यकेन , यो SS पाकरोत्तम प्रवरं मुनीनाम ,पतंजलीं प्रांजलीरानतोस्मि "
असो. प्रथमग्रासे मक्षिका पात : झाल्याने लेख वाचण्याची उर्मी झाली नाही, पण लेख सावकाश वाचून प्रतिक्रिया नक्की देणार.