दिसतं तसं नसतं

Submitted by Harshraj on 13 June, 2018 - 05:48

" दादा, सफरचंद केवढ्याला दिलं? " एक अतिशय गरीब बाई त्या फळवाल्याला विचारात होती.
फळवाल्याने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं, "१२० रुपये किलो. जास्त घेतले तर स्वस्त पडत्याल."
तरीपण ती रेटून पुढे म्हणाली, " तसं न्हाई, एक सफरचंद केवढ्याला पडलं मग?"
त्यावर फळावला ओरडला, " तसं एक सफरचंद विकत न्हाई मी. "
त्यावर पुन्हा ती म्हणाली, " सांग की रं बाबा, माझ्या लेकराला खाऊ वाटायलाय."
नाईलाजाने म्हणाला, "इस रुपये लागतील बघ. !"
त्या बाईने डोळे मोठे केले, " माsssय, एवढ्या एकाचे इस व्हय?" तिला कळलं नाही काय करावं. बहुदा तिच्याकडं तेवढेही नसावेत. मग तिनं लेकराला समजवायला सुरुवात केली. पण ते पोर रडायचं काही थांबेना. तिला कळत नव्हतं त्याला कसं समाजवावं.
पण दुसऱ्या क्षणी फळवाल्याने तिला हाक मारली, आणि एक सफरचंद देऊ केलं. ती म्हणालीसुद्धा, " माझ्याकडं पैसे नाहीत. " पण तो म्हणाला, " राहूदे बाय, लेकरासाठी दिलंय."
न राहवून मी फळवाल्याला विचारलं, " मी किती वेळ झाले, एवढे किलोभर घेतले ,पैसे कमी कर म्हणतेय, आणि तिला मात्र फुकट दिलंस?? आता नाही का तुझं नुकसान होत?"
त्यावर त्यानं एकच उत्तर देऊन मला गप्प केलं, " बाई, व्यापार अन माणुसकी दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी हाईती. हितं तुमी माझ्याशी घासाघीस करून माल घेताय, ते पण पैसे असताना, अन मॉल मध्ये करताय का असं कधी? त्या बाईला आपल्या लेकराला सफरचंद मिळत नाही याचं किती वाईट वाटत होतं, ते दिसत होतं तिच्या तोंडावर, पन तिनं भिकेसाठी हात नाय पुढं केला. पोराला समजवायला लागली. म्हणून माणुसकीच्या नात्यानं दिलं म्या. त्या एका सफरचंदाच्या नुकसानी मुळं काय माझी माडी बांधायची राहिली नसती. "

आणि यांच्या अगदी उलट एक प्रसंग घडला होता. अहमदाबाद च्या प्रवासात हायवेला नावाजलेले शुगर एण्ड स्पाईस ची शाखा असलेले बरेच हॉटेल्स आहेत. माझी मुलगी साधारण दीड वर्षांची होती. आणि त्या प्रवासात, त्या वेळी तिला दुधाची अत्यंत गरज होती. मी वेटर ला दूध देण्याची विनंती केली( अर्थात मेनुकार्ड मध्ये दूध असे कुठेही नमूद नसल्यामुळे). पण वेटर अत्यंत नम्रपणे म्हणाला, " सॉरी मॅडम, आम्ही तुम्हाला दूध देऊ शकत नाही. " मुलगी खूप त्रासली होती. म्हणून शेवटी मॅनेजर ला सुद्धा तीच विनंती केली, म्हटलं चहा मध्ये दूध टाकातच असाल, मी चहा ऑर्डर करते, त्याऐवजी दूध द्या. . पण तो म्हणाला, " नाही मॅडम, आम्हाला तसं अलाउड नाही. "जरा वैतागून थोडा वाद घालून आम्ही निघालो तिथून .... मुलीला दूध तर हवं होतं..आजू बाजूला पाहिलं तेव्हा एक छोटं चहा च दुकान दिसलं ...तिथे विचारलं तर त्याने लहान मुलाला..दूध हवे असे म्हटले त्याने लगेच कोमट असे दूध एक ग्लास मध्ये दिले आणि पैसे देऊ केले असता नाकारले...
मला कळेनासे झाले ...खरेच कोण मोठे आहे? एवढ्या मोठ्या हॉटेल मधला तो प्रसंग काही विसरता आला नाही. साध्या माणसातले ते उच्च संस्कार आणि मोठ्या हॉटेल मधली ती असंस्कृत वागणूक यातला फरक मनाला चटका लावून गेला..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसं शक्य आहे. हा माझा स्वानुभव आहे. आणि अगदी काही दिवसांपूर्वी मी लिहिला आहे. फेसबुकवर आम्ही साहित्यिक च्या पेजवर सुद्धा पोस्ट केला होता.

मी तरी माझी स्वतःची पोस्ट प्रामाणिकपणे टाकली आहे. पण एखाद्याने ती माझ्या नावासकट शेअर केली नसावी. चोरणारा लिखाण चोरू शकतो पण अनुभव नाही.