पुलंना आठवताना....

Submitted by rar on 12 June, 2018 - 12:01

गेले दोन दिवस आणि आजही, पुलं गेल्यानंतर २००० सालच्या लोकसत्ता, मटा मधे लिहिलेले अग्रलेख फेसबुकवर वाचनात आले. आपोआपच पुस्तकांच्या कपाटात फोल्डरमधे नीट जपून ठेवलेली 'जून २०००' मधली अनेक वर्तमानपत्र बाहेर काढली गेली. त्यातले 'अग्रलेख' परत एकदा वाचले गेले. पुलं गेले तेव्हा मी भारतात नव्हते, पण त्या दिवशी पुलंविषयी लेख असलेल्या बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांची एक एक्स्ट्रा प्रत खास माझ्यासाठी आई-बाबांनी घेऊन ठेवली होती. वर्तमानपत्रांचं एक मोठ्ठं बाड आई-बाबा त्यांच्या नंतरच्या अमेरीका ट्रीप मधे माझ्यासाठी घेऊन आले होते.
काल परवा हे सगळे अग्रलेख परत एकदा वाचले. परत एकदा पुलंची खूप आठवण आणि पुलंच्या खूप आठवणी.
शिवाय गेल्या दोन दिवसात आणि आजही अनेकांनी 'पुलंना आठवताना' ह्या मागच्या ८ नोव्हेंबरला काढलेल्या चित्राची आणि ह्या मिनी-राईटपची आठवण काढली. आज मायबोलीवर हे पोस्ट करायला 'पुलंची आठवण' हेच निमित्त...
----------------
पुण्यातल्या एरंडवणे भागातल्या असलेल्या जोशी हॉस्पीटलची लहानशी गल्ली. दोन लहान मुलं, वय साधारण तीन किंवा चार वर्ष, एकमेकांचा हात धरुन त्या गल्लीतनं चाललेली. गल्ली ओलांडून, रस्त्याच्या पलिकडच्या कमला नेहरू पार्क पर्यंत पोचण्यासाठी. आपल्या घराच्या " रुपाली १' च्या गॅलरीतून एका गृहस्थानं त्या बहिण -भावाला रस्त्यानं एकटं जातानं पाहिलं असावं. गॅलरीतून उठून तो गृहस्थ खाली आला, आणि त्या लहानग्यांचं बोट धरून त्यानं त्या दोघांना गल्लीच्या टोकाशी असलेल्या त्यांच्या घरी सुखरुप पोचवलं. तीन चार वर्ष वयाच्या त्या मुलीसाठी 'पुलंनी आपलं बोट धरून आपल्याला घरापर्यंत आणून सोडलं' या वाक्याचा अर्थ आणि त्यातलं अप्रूप अर्थातच त्या वयात जाणवलंही नसणार. पण पुढे जसजशी अक्षर ओळख झाली, शाळकरी वयात वाचन वाढलं तेव्हापासून आजपर्यंत तिला या वाक्याचा खरा अर्थ हळूहळू उलगडत गेला.

पुण्यातल्या एका साध्या मध्यमवर्गीय घरात वाढत असताना लहानपणापासून पुलंची पुस्तकं हा वाचनातला महत्त्वाचा भाग होता. किंबहुना विविध प्रकारच्या साहित्य प्रकारांशी पहिली ओळख ही एका अर्थी पुलंमुळेच घडली. आणि मग हळूहळू पुलं देशपांडे या नावामधली जादू, त्याचं गारूड समजायला लागलं.

एक सीन आजही जसाच्या जसा माझ्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आमच्या घरी 'उमेश' मधे एका दुपार-संध्याकाळी जमलेल्या एक गप्पांच्या मैफीलीचा. घरातला हॉल आणि स्वयंपाकघर ह्यामधलं लाकडी पार्टीशन बाजूला करून मोठी जागा केलेली. घरात काही कार्य-सण असेल तरच हे पार्टीशन बाजूला केलं जायचं. त्या दिवशी देखील एका अर्थी घरात कार्यच होतं.

पुलं, सुनीताबाई, विश्राम बेडेकर, मालतीबाई बेडेकर, श्री. ज. जोशी अश्या सगळ्यांची आमच्या घरी झालेली ती गप्पांची मैफल कालपरवा घडल्यासारखी मला आजही आठवते. "हे लोकं काल आमच्याकडे आले होते आणि दिवाळी नसूनही आईनं काल बेसनाचे लाडू केले होते" असं मी दुसर्‍या दिवशी शाळेतल्या बाईंना आवर्जून उत्साहानं सांगीतलं होतं. त्या वेळी देखील त्या गप्पा समजण्याचं, ह्या लोकांचं योगदान समजण्याचं माझं वय नव्हतं. पण तरीही आपल्या घरी काहीतरी मस्त, विलक्षण घडतंय हे मात्र त्या न कळत्या वयातही नक्कीच जाणवलं होतं. पुढे वाचन वाढलं, ह्या नावांशी, त्यांच्या कामाशी परीचय वाढला तसं तसं ह्या सगळ्या घटनांचं महत्त्व जाणवायला लागलं. आणि एका अर्थी आपण खूप साधं, पण तरीही श्रीमंत, समृद्ध बालपण जगलोय ही जाणीव वाढत गेली.

वाढत्या वयाबरोबर जाणीवा वाढल्या, वाचन कक्षा विस्तारल्या. पुलंच्या लिखाणातील वाक्यांचे, कोट्यांचे, पात्रांचे जाता येता रेफरन्सेस देण्याचं वय आणि फेजही जशी आली तशीच निघूनही गेली. विविध भाषातल्या, विविध देशातल्या लेखकांचं विविध छटांचं लेखन वाचनात आलं. ह्या लेखकांनी निर्माण केलेली अनेक साधी, वेडीवाकडी, कल्पनेच्याही बाहेरची पात्रं माझ्या आयुष्याचा भाग बनली.

पण तरीही आज ह्या विस्तारलेल्या अवकाशात वावरतानाही मनात एक जाणीव आणि कृतज्ञता खूप पक्की आहे. ती म्हणजे ' लहान वयात साहित्याच्या, शब्दांच्या एका अद्भुत दुनियेत, पुस्तकांच्या राज्यात देखील पुलं देशपांडे ह्याच माणसाचं बोट धरून आपण प्रवेश केला आहे.

 #RememberingPL

पूर्वप्रकाशित (८ नोव्हेंबर, २०१७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय! हे आधीही वाचलं होतं आणि आवडलं होतं.
पु. लं. चं बोट या जन्मात तरी सुटणार नाही याची खात्री आहे मला!

मस्त!

पुलंच्या लिखाणातील वाक्यांचे, कोट्यांचे, पात्रांचे जाता येता रेफरन्सेस देण्याचं वय आणि फेजही जशी आली तशीच निघूनही गेली. >>> ही माझी कधीच गेली नाही. कदाचित सुरूच उशीरा झाल्याने असेल. पुस्तके लहानपणी थोडीफार वाचली होती, कथाकथनेही ऐकली होती पण तेव्हा जे त्यातले "खरे" विनोद आहेत ते कळायचे नाहीत, बहुतांश शाब्दिक कोट्यांवरच किंवा "तबला वाजिवतंय का मांडी खाजिवतंय रे" वगैरे वरच हसल्याचे आठवते. पण हे वाक्य 'रावसाहेब' मधले सर्वात किरकोळ वाक्य असेल हे बर्‍याच नंतर जाणवले. मग पुढे रोजच्या प्रसंगांत काही संदर्भ आठवू लागले. ही फेज कधी जाइल असे वाटत नाही. साधा घरी उभा ठेवलेला झाडू पाहून लगेच "मग हीर नाय मोडत?" आठवते Happy

पुलंच्या व्यक्तिचित्रणातून पी जी वुडहाउस ची ओळख झाली आणि अगदी वरच्या चित्राप्रमाणे त्यांनी एक नवीन दालनच उघडून दिले. त्यामुळे ते चित्रही एकदम रिलेट झाले.

पुलंच्या व्यक्तिचित्रणातून पी जी वुडहाउस ची ओळख झाली आणि अगदी वरच्या चित्राप्रमाणे त्यांनी एक नवीन दालनच उघडून दिले. त्यामुळे ते चित्रही एकदम रिलेट झाले.

अगदी ! मराठी माध्यमातून शाळा शिकलो असल्याने सुरुवातीची एकदोन पुस्तके जड गेली पण एकदा "क्लिक" झाली की मग जाम मजा येते.

फा, सहमत. अगदी कधी एखाद्या मिटींग मधे असताना सुद्धा, प्रेझेंटेशन चमकदार करण्यासाठी उगाच फाफटपसारा मांडून, कुणी उगाचाच निरुपयोगी महिती द्यायला सुरूवात केली की 'म्हशीच्या मालकाचं नाव धर्मा मांडवकर, ही एक नवी माहिती मिळाली' हे हटकून आठवतं.

बर्याच देसी कार्यक्रमांना बेशिस्त बघितली की 'आमच्या लोकांच्या ढुंगणावर हंटर हवा सदैव, काय! हंटर' आठवतं.

कुठल्याही परिस्थितीत, आपल्या स्वभावाला धरून वागणार्या माणसाकडे पाहून, 'उंटानी तिरकच चाललं पाहिजे, हत्तीनं सरळच चाललं पाहिजे' म्हणणारी 'तुझं आहे तुजपाशी' मधली गीता आठवते.

असे, अनेक संदर्भ. छे! ह्या माणसाशिवाय कसं तोंड दिलं असतं अशा कित्येक प्रसंगांना?

आरती, लेख चांगलाय.

फा +१
आमचं नेहमीचं म्हणजे 'अहो पेपरवाले काय! द्याल ते छापतात!" हे अंतूबर्वा वाक्य! आणि अशी कित्येक! माझीपण ही फेज कधीच जाणार नाही. सातवीत असताना 'अभ्यास - एक छंद' हा धडा होता पुलंचा, मग उपास, मग ११वीत मराठी घेतलेल्या मैत्रिणीचं पुस्तक चाळलं तर त्यात अंतूबर्वा..
वंगचित्राची शेकडो पारायणं... पुलंबद्दल काही लिहायला घेतलं तर पुन्हा 'अब्द अब्द मनी येती..' अशी अवस्था आणि वर पुन्हा हे जिथे वाचलं ते वसंतराव देशपांड्यांचं व्यक्तिचित्रण...
हे कमी म्हणून की काय, माझी आता ४ वर्षांची असलेली लेक २ वर्षांची होती तेव्हापासून पु ल आबांच फोटो आणि गोष्टीतला आवाज ओळखते. तिचं आवडतं गार्डन म्हणजे पु ल आबांची बाग (पु ल देशपांडे उद्यान), आणी आवडीचं वाक्य म्हणजे 'अगं ए, तू जर पलिकडे जाऊन झोप!' हे म्हैसमधलं!!!

सुरेख लिहिलंय Happy
फा+१ माझी देखील ती फेज जाईल असे वाटत नाही Happy

फा+१ माझी देखील ती फेज जाईल असे वाटत नाही..
आजही एखाद काम नसेल करायच तर 'आम्हाला पावर नाय..' अस म्हणतो.. Happy