ब्युटी पार्लर- भाग 6

Submitted by द्वादशांगुला on 23 April, 2018 - 21:48

आधीचे भाग वाचले नसल्यास पुढील लिंकवर टिचकी मारा.

ब्युटी पार्लर भाग 1

ब्युटी पार्लर भाग 2

ब्युटी पार्लर भाग 3

ब्युटी पार्लर भाग 4

ब्युटी पार्लर भाग ५

●●●●●●●●●●●●●●●●●●●

पूर्वभाग-
जसा तो प्रकाश त्या दोघांनी पाहिला, तशी त्यांच्या अंगातून एक भीतीची लहर गेली. त्यांचे डोळे जड झाले. अंगाला विचित्र जडत्व प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं. आपण आता जमिनीत शिरू की काय, असं वाटत होतं. काहीच सेकंदात त्यांचं कपाळ, डोक्याचा मागचा भाग दुखू लागला , मेंदू सुन्न झाला, आणि ते दोघे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.

आता पुढे -
●●●●●●●●●●●●●●●●●●●

बराच वेळ झाला होता. जवळजवळ तीन-चार तास होऊन गेले होते. हळुहळू नाईकांना शुद्ध येत होती. त्यांचं डोकं जड झालं होतं. डोकं धरूनच ते उठले. आधी त्यांना आपण कुठे आहोत, का आहोत, हेच कळेना. थोड्या वेळाने सगळं त्यांच्या लक्षात आलं. जसं त्यांचं लक्ष अजूनही बेशुद्धावस्थेत असलेल्या शिंदेकडे गेलं, तसं ताबडतोब त्यांनी बाजूच्या जगमधलं पाणी तळहातात घेऊन ते शिंदेंच्या चेहर्‍यावर हलकेच शिंपडलं. सोबत त्यांना हाकाही मारल्या. आता हळुहळू शिंदेंनाही जाग येत होती. तेही डोकं धरून उठून बसले. जेव्हा ते दोघेही पूर्णपणे शुद्धीवर आले होते तेव्हा कुठे त्यांना त्या पेटीबाबत आठवलं. त्या विचाराने ते दोघेही झटका लागल्यासारखे उठले आणि त्यांनी त्या पेटी ठेवलेल्या जागी पाहिलं. ती पेटी उघडलेली होती. तिचा वरचा पृष्ठभाग बाजूला टेबलावर होता. त्या दोघांनी वेळ न दवडता पेटीतील सामान पहायला सुरूवात केली. त्यातील कित्येक काळ्या कापडातील जीर्ण ग्रंथ, काही अद्भूत अशा लाकडी , धातूच्या छोट्या डब्या, काळ्या धाग्याची बंडलं, काही विलक्षण चमकणारे रंगीत खडे, एवढं वरचेवर त्यांना दिसत होतं.

शिंदे त्या पेटीतलं एक गलेगठ्ठ पुस्तक बाहेर काढायला गेले, तर त्यांच्या हात तिथपर्यंत पोहोचूच शकला नाही. काहीतरी अदृश्य गोष्ट, शक्ती त्या पेटीतल्या सामानापर्यंत कोणाला पोहचू देत नव्हती. याचा अर्थ या पेटीला कसलंसं अदृश्य संरक्षण कवच होतं नक्कीच. आता हे कसं भेदावं, या विचारात असतानाच नाईकांचं लक्ष सहज त्या बाजूला पडलेल्या पृष्ठभागावर गेलं. तो पृष्ठभाग टेबलावर उलटा होता. म्हणजेच मघाशी वाचलेल्या मंत्राची बाजू पलिकडे होती नि आतल्या बाजूचा भाग दिसत होता. त्याच्या वरच्या बाजूला काहीतरी कोरलं होतं. हीही मोडी लिपीच होती. नाईकांनी नारायणाला स्मरलं, तेव्हा हीही अक्षरं ओळखीची वाटू लागली. त्यावर लिहिलं होतं-

महत्कालीयन्त्रम् वर्तते अत्र।
परः कर्तुं न शक्यते विनाशः॥
कापलिकस्य अस्य सूचकमणि।
तस्य मनःशान्तया कार्यनिधानम्॥

हे नाईकांनी शिंदेंना वाचून दाखवलं. विचार करतानाच ती अक्षरं अचानक गायब झाली. या ओळींचा काय अर्थ असू शकेल, अन् इथे नेमकं काय सुचवलं आहे, हेच मुळी दोघांच्या लक्षात येईना. पहिल्या ओळीप्रमाणे तर हे महाकालीयंत्र योजून निर्माण केलेलं संरक्षण कवच आहे, असं लक्षात येत होतं. दुसर्या ओळीप्रमाणे तर जवळजवळ निक्षून सांगितलं होतं, की परकी व्यक्ती या कवचाचा नाश करू शकत नाही. तिसरी, चौथी ओळ बहुधा संलग्न असावी. त्यानुसार तरी एवढंच कळत होतं, कापलिकाची ओळख असणारी गोष्ट, त्याच्या मनःशांतीचा, कार्याचा ठेवा. इथे तर कोडं घातलं होतं. असं काय असू शकतं, जी कापलिकाची ओळख आहे. कापलिकाकडचं कपाल वा कवटी... नाही , ती त्याला मनःशांती देऊ शकत नाही. मग काळी वस्त्रे... तीपण तर मनःशांती देत नाहीत. मग काय असावं बरं... विचार करता करता नाईकांनी सहज आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातला, तर त्यांच्या हाताला एक कागदी पूडी लागली. त्यांनी लगेच ती खिशातून बाहेर काढली अन् त्यांना आठवलं की हीच पूडी त्या दिवशी रामानंद स्वामींनी दिली होती. या पूडीत त्यांनी त्या स्मशानातली माती नव्हती का भरून दिली... हं बरोबर!! स्मशान!! हीच तर कापलिकाची ओळख. इथेच तर साधना करून तो अभूतपूर्व मनःशांती मिळवतो. त्याचं अघोरकार्यही तर तो स्मशानातच पूर्ण करतो. या कोड्याची उकल हीच असू शकेल.

नाईकांनी हे लगेच शिंदेंना सांगितलं. आता कुठे अर्थ लागला होता. पण तीच अक्षरं अचानक कशी गायब झाली, हे मुळी कोडं होतं. पण या दोघांना मात्र या पुस्तकांचा, वस्तूंचा अभ्यास करायचा होता. स्मशान हे जरी उत्तर असलं, तरी यापुढे काय करून हे कवच नष्ट करायचं, हे त्यांना माहीत नव्हतं. विचार करताना नाईकांच्या कानांत मघाचाच गूढ आवाज आला," ती तुझ्याकडील स्मशानातील अस्थींची राख अधिक माती अशी विभूती आहे, ती त्या कवचावर टाक. टाकताना त्या पृष्ठभागावरील मघाचा मंत्र म्हण. अस्थींच्या राखेची विभूती ही विध्वंसाचं प्रतीक तर माती हे स्त्रीत्वाचं, सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. म्हणून याने महाकालीयंत्राचा प्रभाव थांबेल." नाईकांनी हे लागलीच शिंदेंना सांगितलं नि ती पूडी उघडली. पूडीतली माती हातात घेतली अन् 'घं घं घमघोर...' असा तो मघाचा मंत्र उच्चारत त्या अदृश्य कवचावर सारखेपणाने अंथरली. नि तापत्या लाल लोखंडावर पाणी शिंपडल्यावर जसा चर्र आवाज होतो, तसा तो नंतर आलेला आवाज संपूर्ण खोलीत घुमला. आता थोड्यावेळाने जसं सगळं शांत झालं, तसं शिंदेंनी पेटीत हात घालून वस्तू हाताळायला सुरूवात केली. आता पेटीतल्या वस्तू हाताळण्याबाबत काहीच अडथळा नव्हता. आता तर नाईकांनीही त्या वस्तू हातात घेऊन पहायला सुरूवात केली होती.

आधीसारखा त्यांना झटका बसला नव्हता, कारण बहुधा तो काळा दोरा काढल्याने, त्या चहुबाजूंवरच्या धातूच्या पट्ट्या हटवल्याने तसंच ते महाकालीयंत्राचं कवचही निकामी केल्याने ही असामान्य पेटी आता सामान्य झाली असावी. काहीतरी लक्षात आल्यासारखं वाटून सगळ्यात आधी नाईकांनी त्या चमकत्या, प्रकाशमान खड्यांना हातात घेतलं. ते खडे हाताला उबदार वाटत होते. ते निरनिराळ्या रंगांचा प्रकाश आजूबाजूला टाकत होते. पण ते हातात घेतल्यावर त्यांना त्यातल्या शक्तीचा प्रत्यय आला होता. त्यांच्या प्रकाशाकडे एकटक काही क्षण पाहिल्यावर मेंदूवर गुंगी चढल्यासारखा, आपण विचारहीन होत असल्यासारखा भास होत होता. आता त्यांना कळलं की पेटी उघडल्यावर दिसलेल्या प्रकाशाने ते बेशुद्ध का पडले होते. बरेच वर्षं पेटी बंद असल्याने त्यात साठलेला प्रकाश मोकळा झाल्याने त्याने मोठ्या प्रमाणावर या दोघांवर परिणाम केला होता. म्हणून त्यांची शुद्ध हरपली होती. नाईकांनी ते अद्भूत खडे परत पेटीत ठेवले. त्यांनी शिंदेंना या खड्यांबद्दल विचारलं, तर ते म्हणाले, की त्यांनाही याबद्दल काही माहीत नाही.

आता नाईकांनी त्या धातूच्या, लाकडाच्या डब्या उघडून पहायला सुरूवात केली. त्या प्रत्येक पेटीत कसलीशी काळी पूड होती. प्रत्येक पेटीतली पूड म्हणावं तर सारखी , म्हणावं तर वेगळी होती. त्यांच्या रंगाच्या छटा, हाताला होणारा स्पर्श किंचीत वेगळा होता. त्या डब्या पाहून शिंदे म्हणाले," साहेब, लोकांचे क्लेश, रोग, अशांती, दुःख घालवण्यासाठी या विभूती माझे वडील वापरायचे. त्याची चिमुटभर पूड खायला व कपाळावर लावायला द्यायचे. गुणही यायचा, कारण या सिध्दहस्त विभूती आहेत. दुर्मिळ अशा." यावर नाईकांनी आश्चर्याचे उद्गार काढले. ते असं पहिल्यांदाच ऐकत होते. थोड्या वेळात पेटीतल्या सर्व वस्तू, सामग्री पाहून झाल्या. काळ्या वस्त्रांची घडी, विविध झाडांच्या बारीक काठ्या, खूपच पूर्वीच्या काळी असायचं तसं वाळूचं घड्याळ, धातूचे प्रतिकात्मक मानवी मुंडके गोवलेली माळ, काळ्या लोकरीच्या धाग्याचा गोंडा असलेली माळ, प्रतिकात्मक शिंग बांधलेली माळ, अगरबत्त्या, धूप, असं काहीबाही पेटीच्या तळाशी सापडलं. या पेटीतल्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी शक्ती होती, असं जाणवत होतं. अघोरस्वामीला नेस्तनाबूत करायला या वस्तूंचा मोठा उपयोग होणार होता.

आता या दोघांनी आपला मोर्चा त्या जाडजूड पुस्तकांकडे वळवला. आतातरी त्यांना आशा होती, की यात त्या कापलिकाला धडा शिकवायला काहीतरी मिळेल म्हणून. त्यांनी एक पुस्तक उघडून पाहिलं. ते जीर्ण झालं होतं. कागद अगदी जाड, खरखरीत, काळवंडलेला होता. पहिल्या पानावर शंकराचं रौद्रावतारातलं चित्र होतं. त्यानंतरच्या पानांवर फक्त श्लोक होते, ज्यातून ते कधी, कशासाठी वापरायचे, याचा काहीच अर्थबोध होत नव्हता. निराशेने त्यांनी दुसरं पुस्तक उघडलं. त्यातही तीच तर्‍हा. काळ्या बासनात गुंडाळलेल्या प्रत्येक ग्रंथात श्लोकांशिवाय काहीच नव्हतं. पण नाईकांना त्या काळ्या वस्त्रांच्या घडीखाली काहीतरी दिसलं. त्यांनी पाहिलं की तिथे एक शे-दोनशे पानी चोपडी होती. मळकट खाकी रंगाची. पहिल्या पानावर काळ्या शाईने विचित्र आकृती काढली होती. त्यात चक्क मराठीत देवनागरी लिपीत लिहिलं होतं. त्यात शिंदेंचे वडील टिपण लिहीत असावेत. शिंदे म्हणाले," हे तर माझ्याच वडिलांचं अक्षर आहे. पण या चोपडीबद्दल मला माहीत नाही. "

नाईकांनी त्यात लिहिलेलं चाळायला सुरूवात केली. विविध विभूतींची माहिती, दुर्गम भागातील कापलिक ठिकाणांची माहिती, सिध्दहस्त कापलिक बाबांविषयीची माहिती, धूनी व तिच्या योग्य मांडणीचे निर्देश, स्मशानसाधना, शवसाधना, शिवसाधना, साधनेचे पर्वणीयोग, असं बरचसं लिहिलं होतं. चाळता चाळता त्यांची बोटं एका पानावर येऊन थांबली. तिथे लिहिलं होतं,

" ॥ शिवोहम् ॥

त्या शिवाची लीन भक्ती करण्याचे भाग्य मोजक्या लोकांनाच मिळते. त्यातला एक बनून मला आनंद होतो. मला कापलिकत्वाची दीक्षा ज्या गुरूंकडून मिळाली , त्यांच्याकडूनच आदिनाथला मिळाली. आदिनाथ. जो अघोर शक्ती प्राप्त करून घेतल्यापासून स्वतःला अघोरस्वामी म्हणवून घेतो. त्याला जगावर आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. पण मी त्याला असे करू देणार नाही. त्याच्या शक्ती माझ्याहून जास्त आहेत. त्याने चुकीच्या मार्गाने त्या मिळवल्या आहेत. एक सच्चा कापलिक नदीपात्रात सोडलेली प्रेते, पुरलेली प्रेते वापरून शवसाधना पूर्णत्वास नेतो. पण याने खून करून आत्मे आपल्या वश करून शक्ती वाढवल्यात. त्याने त्याचे साधन माणसाचे केस करू नये बस्स. साधं वाटलं तरी फार प्रभावी माध्यम आहे हे. आणि पर्वणीकाळात तर जास्तच. तरी मी खरा कापलिक आहे. त्याला अद्दल घडवावीच लागेल. यात माझा जीव गेला तरी चालेल. "

हे वाचून इन्स्पेक्टर नाईकांना आणि शिंदेंना धक्का बसला. हे अपेक्षितच नव्हतं. याचा अर्थ हा अघोरस्वामी शिंदेंच्या वडिलांच्या आयुष्यातही आला होता. त्यानेच मारलं असावं का शिंदेंच्या वडिलांना... शिंदेंना तर याबाबत काहीच माहीत नव्हतं. आपल्या वडिलांना एका स्वार्थी कापलिकाने मारलं, एवढंच त्यांना माहीत होतं. आपल्या वडिलांकडून अघोरस्वामीचा उल्लेख त्यांनी कधीच ऐकला नव्हता. फक्त त्यांचे वडील शेवटच्या काही महिन्यांत खूप तणावात होते, रात्र रात्र स्मशानसाधना करायचे, त्यांनी पूजा वाढवली होती; हेच शिंदेंना आठवत होतं. पण जर वडिलांच्या मृत्यूमागे अघोरस्वामी असेल, तर शिंदे त्याला अजिबात वेळ सोडणार नव्हते. त्या चोपडीची यापुढील पानं तर कोरी होती. त्या कोर्‍या पानांमुळे दडलं गेलेलं छुपं सत्य या दोघांच्या हतबलतेपुढे भयाण हसत होतं...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

प्रारब्ध. कधी कोणतं वळण घेईल हे कोणालाच माहीत नसतं. इन्स्पेक्टर नाईक अन् शिंदेंच्या आयुष्यातही तसंच झालं होतं. आणि यापासून तो शक्तिशाली कापलिक अघोरस्वामी ही वाचला नव्हता. एघका निनावी घनदाट अरण्यात एका मोठ्या दगडावर बसून तो अघोरस्वामी विचारमग्न होता. रागाने, सूडाच्या भावनेने तो पेटून उठला होता. त्याचे तांबरलेले डोळे, रागाने थरथरणारं अंग त्याच्या मनातला विखार सांगत होते. त्याच्याजवळ आता काय उरले होते, काही नाही. जिवाची बाजी लावून मिळवलेले शक्तिशाली आत्मे मुक्त झाले होते. जवळच्या अद्भूत शक्तींवरही बंधनं लादली गेली होती. निसर्गावर थोड्याबहूत प्रमाणात मिळवलेलं नियंत्रण गमावलं होतं. जगावर अधिपत्य गाजवायला लागणारी शक्तीच तो गमावून बसला होता. अचानक त्याला काहीतरी आठवलं. त्याने आकाशाकडे पाहिलं, चंद्राची कोर बारीक होती खूप. म्हणजे दोन दिवसांनी अमावस्या. तो भेसूर हसला. त्यादिवशी ती विशिष्ट पूजा केल्यास आपल्या शक्तींवरची बंधनं तुटणार होती. मग काही तो कोणालाच सोडणार नव्हता.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

त्या दिवशी इन्स्पेक्टर नाईक हताशपणे घरी परत आले होते. शिंदेंच्या वडिलांच्या पेटीत त्या कापलिकाच्या संहारासाठी काहीच मिळालं नव्हतं. फक्त गुंता वाढत होता. नाईकांना खात्री होती की तो अघोरस्वामी नाईकांचा सूड उगवण्याचे उपायच शोधत असणार. तो आपल्या शक्ती परत मिळवण्यासाठी वाटेल ते करेल, याची नाईकांना कोण जाणे शाश्वती वाटत होती. पटापट पावले उचलायला हवी होती, हातात वेळ होता तोपर्यंत. त्याचसोबत सगळं डोकं शांत ठेवून करायचं होतं. अन्यथा घडलेली छोट्यातली छोटी चूकही घातक ठरू शकली असती. पण नाईक निडर होते. ते त्या एका क्षणाची वाट बघत होते, जेव्हा ते आणि अघोरस्वामी समोरासमोर असतील. अघोरस्वामीला नेस्तनाबूत करणं सोपं नसलं, तरी अशक्यही नव्हतं.

इकडे शिंदेंना मोठा धक्का बसला. ते इन्स्पेक्टर नाईकांसोबत ज्या कापलिक बाबाच्या मागे लागले होते, तोच बाबा त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातही आलेला असावा. हा फक्त योगायोग नक्कीच नसावा. त्यानेच तर नसेल केला वडिलांचा खून... जर तोच तो असेल, तर मात्र ते या बाबाला सोडणार नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी शिंदेंनी ते पान परत वाचून काढलं. त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या होत्या. आता त्यांनी त्या चोपडीचं पहिलं पान उघडलं. त्यावरची ती आकृती विचित्र होती. पानभर छोट्या रेषा, जाड- बारीक ठिपके, वेगळीच चिन्हे, यांनी बनलेली ती एखादी यंत्र आकृती वाटत होती. तिच्या चारही कडांना काळसर लाल रेषा ओढलेली दिसत होती. ते बहुधा रक्त असावं. या यंत्रावर विभूती, कुंकू, राख, यांचा अभिषेक केल्याच्या खुणा दिसत होत्या. चारही कोपर्‍यांना 'ॐ अघोराय नमः। ' असं लिहिलं होतं.

या यंत्रांचं निरीक्षण करत असतानाच शिंदेंच्या दाराची बेल वाजली. जाताजाता त्यांनी नकळतपणे ती वही बंद न करता ते यंत्राचं पान वर राहील, अशारीतीने दुमडून त्या पेटीच्या एका कोपर्‍याच्या उभ्या पृष्ठभागावर ती वही उभी ठेवली नि ते दार उघडायला गेले. पेपरवाला आला होता, शिंदेंनी पेपर घेतला, सोफ्यावर ठेवला नि परत आत गेले. या काही क्षणांतच शिंदेंकडून नकळत झालेल्या कृतीमुळे गहजब झाला होता. त्या यंत्राचा स्पर्श जसा त्या पेटीच्या पृष्ठभागाला झाला, तसं ते यंत्र चमकू लागलं, आणि त्या पेटीच्या पृष्ठभागातून एक कागद बाहेर आला. इकडे शिंदेंनी ती वही परत उचलली, तर वहीच्या बाजूला हा कागद पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. हा कागद अचानकच कुठून प्रकटला, हे त्यांना समजेना. त्यांनी हा कागद उचलला. हेही शिंदेंच्या वडिलांचंच अक्षर होतं, पण जास्तच घाईत लिहिलेलं वाटत होतं. वाचायच्या आधी त्यांनी नाईकांना याबद्दल सांगून घरी बोलावलं. नाईक लगेच आले. त्यांनाही या पानाचं आश्चर्य वाटत होतं. त्यावर लिहिलं होतं-

'हे शिवा, या दुष्टापासून सर्वांचे रक्षण कर. मी आता स्मशानात आहे. गेले पंधरा तास मी त्या अघोरस्वामीला मात देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण हे शक्य झालेलं नाही. माझ्या प्रत्येक शक्तीला मात देण्याची दानवी शक्ती त्याच्याकडे आहे. प्रत्येक मंत्र निकामी पाडण्याचं सामर्थ्य त्याने कमवलंय. अग्नी भैरव मंत्रापासून श्रीशिवशक्ती मंत्रापर्यंतचे सारे मंत्र त्याने निकामी केले आहेत. माझ्याकडून परलोक विद्येत नकळत लहानशी चूक झालीय, ती मला महाग पडतेय. आता मी वाचू शकत नाही. तो माझं सामर्थ्य खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी मरेन, पण याला सर्वशक्तिनिशी मारण्याची विधी मी लिहून ठेवतोय, जी योग्य व्यक्तीलाच सापडेल. महाभैरवयंत्रामुळे ही वही हवं तिथे जाऊ शकते. मी हिला या पानासह परत पेटीत पाठवतोय.'

यानंतर नाईक आणि शिंदेंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण त्यांना या पानामागे त्या अघोरस्वामीला मात देण्याची विधी मिळाली होती. आता त्याचा अंत निश्चित होता.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

क्रमशः

- द्वादशांगुला.

तळटीप :

ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहीलय.....एकदम मस्त.....आता पुढे काय होईल याची उत्सुकता वाटतेय....पुढचा भाग लवकर टाक.....हा श्लोक पण सुंदर रचलाय.....मागच्या वेळी पेक्षा अर्थ समजायला सोपा होता हा.......तेव्हा ते घं वगैरेमुळे नीट कळलं नव्हतं...पण हा छानच आहे...वाचताना समजत जातो......सगळाच भाग एक नंबर....

धन्यवाद अधांतरीजी Happy
आदिसिद्धी तुझेही आभार. हा श्लोक जरा सोपाच लिहिला होता. जास्त विचार न करता लिहिला. पुढचा भाग जरा लवकर टाकेन.

व्वा !!
सुरेख लिहिते आहेस तू. पुढचा भाग लवकर टाक. बाय द वे.. झी ला देतेस का ही कथा...मस्त सिरियल बनवू शकतील. सध्या ग्रहण नी वात आणला आहे, त्या मानाने तुझी कथा, मांडणी दोन्ही एकदम सशक्त

- प्रसन्न

प्रसन्न जी..नको ...तिच्या कथेवर अन्याय होईल तो...नारायण धारपांच्या ग्रहणाला त्यांनी ग्रहण लावलं......हीच्या कथेचं काय वाटोळं करतील ते याचा विचारही करवत नाही......मी कधी त्या सिरीयलचा एक भाग जेवताना पाहिलेला....त्यावरनं आलेला अंदाज आहे हा.....इथला धागा पण वाचलेला....त्यामुळे बिग नो....पाणी आणि माती घालून पार चिखल करून टाकतील....

श्लोक जरा सोपाच लिहिला होता.....
मी पण हेच विचारणार होतो. हे श्लोक तू स्वतः रचतेस का? तसं असेल तर दहावीच्या परीक्षेत तुला संस्कृतमध्ये १००/१०० गुण मिळणारच, अशी खात्री बाळगायला हरकत नाही!

छान चाललीये... Happy

पुन्हा एकदा खुर्ची आणि पार्लर चे भाग एकापाठोपाठ एक प्रकाशीत झालेत Happy योगायोग बघ ना !

खुपचं छान... एका छोट्या मुलीने लिहिले आहे असे वाटतच नाही... एकदम प्रभावी लिहितेस तु... पुढचा भाग लवकर येऊ दे

बाय द वे.. झी ला देतेस का ही कथा...मस्त सिरियल बनवू शकतील. सध्या ग्रहण नी वात आणला आहे, त्या मानाने तुझी कथा, मांडणी दोन्ही एकदम सशक्त>>>>> दिलं असतं , पण सिद्धीच्या मताशी अगदी सहमत. त्या झी वाल्यांनी मागे 'राखेचा' _रात्रीस खेळ चाले ची पण पार चिपाडं केली होती. किती उत्साहाने बघायचे मी तेव्हा.. मग धसकाच घेतला, ग्रहणचा एकही अॅपिसोड नाही बघितला. Happy मग तर माझ्या कथानकाची वाटच लावतील. आणि जर दिलाच त्यांना सिरियल बनवायला, तर कथानकाची वाट न लावण्याचं लिहून घ्यावं लागेल त्यांच्याकडून ..... Wink

प्रसन्नजी, तुला जी, अधरा जी, विक्षिप्त मुलगा ,भाग्यश्रीजी, गुगुजी,किल्ली जी,उमानु जी ! Happy

मी पण हेच विचारणार होतो. हे श्लोक तू स्वतः रचतेस का? >>>>>>> हो ते दोन्ही श्लोक मी स्वतःच रचलेले आहेत. मागच्या वेळेला फक्त बीजमंत्राचा वापर केला होता. हा या भागातला श्लोक हा कोड्यासारखा टाकणार असल्याने मी काही नवीन प्रयोग नाही केला.

असेल तर दहावीच्या परीक्षेत तुला संस्कृतमध्ये १००/१०० गुण मिळणारच, अशी खात्री बाळगायला हरकत नाही!>>>>>> बापरे धन्यवाद हो! Happy पेपरात चुका तर नाही केल्यात. बघू.

पुन्हा एकदा खुर्ची आणि पार्लर चे भाग एकापाठोपाठ एक प्रकाशीत झालेत Happy योगायोग बघ ना !>>>>> अरे हो की... खुर्चीतल्या नक्षी प्रकरणापासून सुरूवात झालीय ही ! Happy

एका छोट्या मुलीने लिहिले आहे असे वाटतच नाही... एकदम प्रभावी लिहितेस तु...>>>>>> धन्यवाद हं.

आधी म्हणल्याप्रमाणे, तु लिखाणाचा ओघ खूप छान ठेवला आहेस! म्हणजे, कथेच्या दोन भाग प्रकाशित करण्यात जरी ४/५ दिवस जात असले तरी वाचताना लिंक कुठेच तुटत नाही!
अजून एक म्हणजे, हा भाग वाचल्यावर का कुणासठाऊक मला तीन-एक वर्षांपूर्वी संपलेल्या इंग्रजी मालिकेची आठवण झाली. मालिकेचं नाव "supernatural"... जमल्यास बघ, तुला आवडेल असा माझा अंदाज!

अजून एक, हा feedback खरतर तुझ्यासाठी आणि आदिसिद्धी, दोघींसाठी
... you girls are simply be amazing ghost busters!!! cheers to your friendship & keep writing!!! Happy

आधी म्हणल्याप्रमाणे, तु लिखाणाचा ओघ खूप छान ठेवला आहेस! म्हणजे, कथेच्या दोन भाग प्रकाशित करण्यात जरी ४/५ दिवस जात असले तरी वाचताना लिंक कुठेच तुटत नाही!>>>>>>>>>> धन्यवाद अपूर्व जी ! Happy

हा भाग वाचल्यावर का कुणासठाऊक मला तीन-एक वर्षांपूर्वी संपलेल्या इंग्रजी मालिकेची आठवण झाली. मालिकेचं नाव "supernatural"... जमल्यास बघ, तुला आवडेल असा माझा अंदाज!>>>>>> युट्युबवर अॅपिसोडस् मिळतील का? पण अतिजास्त भयंकर नाही ना सिरीयल? मी भूतं वाचते , लिहिते खरी, पण असं काही दृकश्राव्य माध्यमातलं पहायला ततपप होते माझी! Happy कुठे मिळाले या सिरीयलचे भाग तर नक्की बघेन. Happy

अजून एक, हा feedback खरतर तुझ्यासाठी आणि आदिसिद्धी, दोघींसाठी
... you girls are simply be amazing ghost busters!!! cheers to your friendship & keep writing!!! Happy>>>>>>>>याबद्दल स्पेशल थॅन्कस , माझ्याकडून आणि सिद्धीकडून. Happy

युट्युबवर अॅपिसोडस् मिळतील का? पण अतिजास्त भयंकर नाही ना सिरीयल? मी भूतं वाचते , लिहिते खरी, पण असं काही दृकश्राव्य माध्यमातलं पहायला ततपप होते माझी! कुठे मिळाले या सिरीयलचे भाग तर नक्की बघेन. >>>> youtube वर नाही पण, कदाचित amazonprime किंवा hotstar वर मिळतील. अति-जास्त भयंकर वगैरे काहीच नाही. छान मनोरंजक आहे. दोन देखणी तरुण भावंडे, त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून अनुवांशिकपणे मिळालेली क्षमता म्हणजे अदृश्य/अमानवीय जगताशी साधता येणार संवाद... मग त्यानुसार त्यांनी इतरांची केलेली मदत, दुष्ट शक्ती/ सुष्ट शक्ती... ware-wolves, dracula, setan, lucifier, angels, demons .. अशा सर्व बायबलवर आधारलेल्या गोष्टी!

youtube वर नाही पण, कदाचित amazonprime किंवा hotstar वर मिळतील. >>>>>>>> अच्छा मग बघते तिकडे. मिळाले अॅपिसोड तर नक्की बघेन.

अति-जास्त भयंकर वगैरे काहीच नाही. छान मनोरंजक आहे. दोन देखणी तरुण भावंडे, त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून अनुवांशिकपणे मिळालेली क्षमता म्हणजे अदृश्य/अमानवीय जगताशी साधता येणार संवाद... मग त्यानुसार त्यांनी इतरांची केलेली मदत, दुष्ट शक्ती/ सुष्ट शक्ती... ware-wolves, dracula, setan, lucifier, angels, demons .. अशा सर्व बायबलवर आधारलेल्या गोष्टी!>>>>>>>>>>>> हां मग भारीच!! बघायला मजा येईल.

Pages