ब्युटी पार्लर- भाग 3

Submitted by द्वादशांगुला on 4 April, 2018 - 09:22

पूर्वभाग-
मग काका तो दोरा बांधतानाच मला ऐकू जाईल अशाच आवाजात पुटपुटला, "बाळा, तुझ्या हातून जे नकळत झालंय त्याचे परिणाम खूप वाईट आहेत. तो शैव पंथाचा साधू कापलिक होता नि त्याची अघोरी साधना चालू होती. माझी उदी आणि सूत तुझी रक्षा करेलच. पण जपून रहा. खास यासाठीच मी आलोय इथे."
आणि तो त्याच दिवशी निघून गेला. आणि आश्चर्य म्हणजे त्याच संध्याकाळी माझा ताप पूर्णपणे उतरला. दोनच दिवसांत मी पूर्ण बरा झालो. पण माझ्या वाचलेल्या जिवामुळे इतरांना बरंच भोगावं लागणार होतं, यापासून मी अनभिज्ञ होतो.

आता पुढे-

●●●●●●●●●●●●●●●●●●●

(इन्सपेक्टर नाईक )

मी पूर्णपणे बरा झालो होतो. अंगात शक्तीही आली होती. त्या दोर्यामुळे की काय माहीत नाही, पण प्रसन्नही वाटत होतं. पण घरीच असल्यामुळे मला गावात काय घडतंय, हे अजिबात माहीत नव्हतं. एके दिवशी रामूने - माझ्या मित्राने मला सांगितलं की गावात कसल्याशा रोगाची साथ पसरली होती. आजारी लोकांना भरपूर ताप येत होता नि त्यांचे केस पांढरे पडत जात होते. अंगही निस्तेज पडत जाऊन खूप वेदनांनी अखेर ती माणसं मरत होती. गावात कुठल्याच विहिरीला स्वच्छ पाणी लागत नव्हतं. सगळं गढूळ. प्राण्यांवरही कसलंसं सावट आलं होतं. बैल कष्ट करेनासे झाले होते. चांगल्या दुभत्या गायीम्हशी दूध देईनाश्या झाल्या होत्या. झाडंही निस्तेज झाली होती. फळंफुलं देईनाशी झाली होती. वर गावातल्या भगताच्या अंगात म्हणे देवी येऊन तिने त्या कापलिक बाबाचा रोष असल्याचं सांगितलं होतं.

मग त्यामुळे घाबरून शल्या वगैरेंनी ती सीमांतखूण मी पळवल्याचं अख्ख्या गावात सांगितलं होतं. मला भीती वाटायला लागली होती. दुसर्याच दिवशी आई पाणी भरायला गेली असताना तिला हे कळलं. मग काय, आई नि बाबा काय रागवले होते त्या दिवशी! आईच्या डोळ्यात तर पाणीही आलं होतं. मी गावासमोर वाईट ठरलो होतो म्हणून. बाबांनाही लोक माझ्यावरून भलं-बुरं बोलले असावेत. तेही अस्वस्थ वाटत होते. मला माझी लाज वाटत होती. असेच काही दिवस भुर्रकन निघून गेले.

त्या दिवशी मी आई नको म्हणत असतानाही घराबाहेर पडलो. घरात राहून राहून मला वीट आला होता. आई-बाबांशी गावकरी बोलतच नव्हते. जणू आम्हाला वाळीतच टाकलं होतं. माझ्या बाबांना लोक खूप बोलत होते माझ्यावरून. तो बाबा म्हणे गावाला काहीतरी धमकी देऊन गेला होता. त्यामुळे गावाचा सगळा रोष माझ्यावर , माझ्या कुटुंबावर होता. हे सर्व माझ्यामुळे होत होतं. मी ठरवलं होतं, की आता आई-बाबांना आपण त्रास द्यायचा नाही. घर सोडून कुठेतरी दूर निघून जायचं. मी घरातून बाहेर पडून चालू लागलो, पावलं वळवतील तिथे.

आजुबाजूने जाणार्या बाया ,माणसं, मुलं सगळे माझ्याचकडे बघत होते, रागाने. मी त्यांच्या रागीट नजरा चुकवत होतो. मान खाली घालून मी चालत होतो. चालता- चालता आपल्याच नादात मी समोरून सायकलवर येणार्या अण्णाकाकाला धडकलो. हा मनमिळाऊ काका नेहमी मला भेटल्यावर 'काय जयत्या , आज कुठं स्वारी!' असं न चुकता विचारायचा. विचारपूस करायचा. एरवी यानं मी त्याला धडकल्यावर ' काय जयत्या, कुठं लक्ष आहे आज?' असंच डोळा मिचकावत विचारलं असतं ; पण आज त्याने चक्क मला तुसडेपणाने ढकललं नि माझ्या अंगावर खेकसला,"काय रे! डोळे फुटलेत का?" मी त्याच्या या रूपाकडे बघतच राहिलो , पण माझ्या नजरेला नजर मिळवण्याची जराही तसदी न घेता तो निघून गेलाही.

मी परत चालू लागलो मान खाली घालून. सर्व गावकर्यांच्या नजरा मला बोचू लागल्या होत्या. मला रडू फुटत होतं. कसाबसा स्वतःला आवरत मी चालत होतो. थोड्या वेळाने गावाचा बसथांबा आला. बसची वेळ नसल्याने तिकडे बसची वाट बघत कोणीच उभं नव्हतं. पण तिकडे सावलीत नेहमीप्रमाणे रानमेवा, भाजी घेऊन विकायला बसणारी रमाआजी होती. खूप चांगली, आस्थेनं विचारपूस करणारी आजी. जवळ पैसे नसले, तरी मुठभर मेवा देऊ करणारी रमाआजी कधीच हेवेदावे ठेवायची नाही, कोणाशी भांडायची तर बातच नाही. खूप प्रेमळ होती ती. मी तिच्याकडे गेलो, बोलायला. आस्थेचे चार शब्द ऐकायला. पण मला बघून ती माझ्या अंगावर खेकसली," का रं! काय काम हाय? इकडं येऊ नको! रानमेवा संपलाय जा!"

मी वेड्यासारखा तिलाही काही उत्तर न देता चालू लागलो. माझी आशा संपली होती. आपण एवढेवाईट आहोत का , ही शंकाही मनाला चाटून गेली. मला आता हे लोक नको होते आसपास. घर तर मागे पडलं होतं. मी तरीही घराच्या विरूद्ध दिशेला असलेल्या गावाबाहेरच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊ लागलो. का, कसं हे मलाही माहीत नव्हतं. मी काही मंदिरात उत्सवाशिवाय जायचो नाही. पण आज जात होतो. तिकडे एरवी गुरव कधीकधीच असतो नि इतर कोणीच नसतं असं रामूकडून ऐकलं होतं म्हणून. मला थोडावेळ एकटं रहायचं होतं. नीट विचार करायचा होता. मी मंदिरात पोहोचलो. तिथं एक बैरागी बसला होता. भगवी वस्त्रं ल्यालेला, जटा-दाढी राखलेला, रापलेली त्वचा असलेला, हडकुळा, कपाळावर शेंदूर फासलेला. त्याच्या चेहर्यावर विलक्षण तेज होतं. बाजूलाच एक गाठोडं नि विचित्र काठी पडली होती. पण त्याला माझ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. तो तिथेच निसरड्या भिंतीला पाठ टेकून डोळे मिटून बसून राहिला, माझी चाहूल लागल्यावरही. हे बघून मी त्याच्यापासून किंचित दूर, कठड्यावर जाऊन बसलो विचार करत.

काय करावं बरं आता. खिशात साधारणतः शहरापर्यंत बसने जाता येईल, इतके पैसे आहेत बहुधा.... अं... कुठे गेले...... हम्म बरोबर परवा पॅन्ट धुवायला टाकली होती तेव्हा आईने दिलेले खिशात सापडलेले पैसे टेबलाच्या खणातच नव्हते का ठेवले.... बापरे आता.... चालतच निघतो कुठेतरी... कुठे जाऊ पण. घरी तर जायचंच नाहीये. माझ्यामुळे आधीच त्यांना एवढा त्रास झालाय, आणखी नको! मीच नालायक आहे... हरामखोर आहे... माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. मला कवडीची अक्कल नाही.... काय गरज होती मला त्या स्मशानात जाण्याची ... माहीत नसताना ती गोष्ट उचलण्याची... का मी उगाच स्वतःच्या बिनबुडाच्या मतांना सिद्ध करायच्या मागे लागलो होतो... आता तर माझा या सगळ्यावर विश्वास बसत चाललाय.... देवा मला काय होतंय...

क्काय... मी चक्क मोठ्याने बडबडत होतो.... वेड लागलंय मला. तो बैरागीही माझ्याकडे बघायला लागलाय... पण, पण त्याच्या डोळ्यांत इतरांसारखं रागाचं वादळ नाहीये, तर आहे सहानुभूतीचा वर्षाव. पण तरीही मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवलं. दुसरीकडे जाऊन बसलो नि माझे विचार परत गरागर फिरायला लागले...

मी का केलं असं.... माझं आयुष्यच बदलून गेलंय... सगळ्यांनी मला वाईट ठरवलंय... मीच वाईट आहे... मला जगून काही फायदा नाही ... मी मरायला पाहिजे.. मला जीव द्यायलाच हवा... मी ताडकन उभा राहिलो. इतक्यात त्या शांततेत आवाज घुमला,
"थांब!"

त्या आवाजात विलक्षण जरब होती. सकारात्मकताही होती. प्रेमळ धाक होता त्या आवाजात. मी चमकून पाहिलं. तो आवाज त्या बैराग्याचा होता. तो उठला , माझ्याजवळ आला, त्याने वडिलांसारखा माझ्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला. मला बाकड्यावर बसायची खूण केली. प्रेमळ पणे माझा हात थोपटत तो म्हणाला, "बेटा, जीव द्यायचा विचारही करू नकोस. थोड्याच दिवसांत हे मृत्यूसत्र तात्पुरतं थांबणार आहे नि काही वर्षांनी कायमचं जेव्हा तो सुप्त ज्वालामुखी परत धगधगेल. त्याला नष्ट करण्यासाठी देवाने तुला साधन बनवलेलं असेल तर... "

तो बैरागी बोलला ते माझ्या अजिबात लक्षात आलं नाही ते पाहून तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "समजेल, समजेल, वेळ आल्यावर सगळं समजेल. आणि यापुढे स्वतःला जप. तो नाग खवळून जागा झालाय. तुला देव मार्ग दाखवेल बेटा. " बोलता बोलता त्याने माझ्या हातात त्याची वेगळ्याच आकाराची, लाल भगव्या चिंध्या वर बांधलेली काठी सोपवली. नि मूकपणे मला याची गरज पडेल असं सांगितलं.

मी होकार भरून तिकडून निघालो. घरी परतायला. त्याला परत माझ्या जिवाला धोका आहे का हे विचारायला मागे वळलो तर तो बैरागी तिकडे नव्हताच. आजुबाजूलाही दिसत नव्हता कुठे. मी याचा विचार करतच घरी पोहोचलो. आई चिंतेतच होती. मी काही न बोलता माझ्या खोलीत जाऊन शांतपणे बसून राहिलो; सुन्नपणे.

दुसर्या दिवशी मला स्वप्न पडलं की माझ्यासमोर एक तेजस्वी पुरुष उभा आहे. त्याच्या सांगण्यावरून मी त्या स्मशानात चाललोय एकटा. स्मशानात त्या कापलिक बाबाचं साहित्य जवळ पडलंय. कोणी दिसत नाहीय आसपास. मी त्या बाबाने आखलेल्या गोलाकार मंडलात जाऊन ती बैराग्याने दिलेली काठी खुपसली नि मोठ्याने म्हणालो, "मीच नेली होती तुझी सीमांतखूण. माझ्यामुळे तुझ्या कामात व्यत्यय आला ना, तर मला त्रास दे. गावाला नको. " हे ऐकून चारीकडून बीभत्स हसण्याचे आवाज आले नि मी जागा झालो. पण काहीतरी ठरवल्याप्रमाणेच सकाळी उठलो नि त्या स्मशानात गेलो. आज का कोण जाणे मला भीती वाटत नव्हती. पानं सळसळत होती. वारा जोरात वाहत होता. जे साहित्य जसं मी स्वप्नात पाहिलं होतं तसंच तिकडे होतं. ती काठी मंडलात रोवली. ती जवळपास वीतभर आत गेली. तिच्यावरच्या चिंध्या वार्याने फडफडत होत्या. जे स्वप्नात बोललो होतो तेच बोललो मी. लगोलग बीभत्स हसण्याचे आवाज आले नि त्यात एक आवाज घुमला, " माझी शक्ती या काठीतल्या शक्तीने खेचतो आहेस काय... संपवेन . तुला संपवेन. कापलिक आहे मी... हाहाहाहाहाहा.... तुझ्या मागेही काही शक्ती आहेत. त्या संपवायला माझी सध्याची शक्ती अपुरी आहे. जा गावाला सोडलं मी. मी परत येईन. लक्षात ठेव, माझ्या शक्ती वाढल्यावर पहिलं भक्ष्य तूच असशील... " नि तो आवाज शांत झाला. पानांची सळसळ , वार्याचा वेग सारं मंदावलं. मी ती खुपसलेली काठी बाहेर काढणार, इतक्यात मनात कसला गंभीर ,शांत ,प्रसन्न आवाज आला, "ती भारलेली काठी काढू नकोस. गावाला त्यामुळेच संरक्षण मिळेल." मी ती काठी तशीच ठेवली नि प्रसन्न मनाने घरी परतलो.

तेव्हा मला कळलं की त्या बैराग्याने मला का काठी दिली होती. त्या काठीत सकारात्मक शक्ती होती, जिने त्या बाबाच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्याची गावापुरती एकवटलेली शक्ती खेचून त्याला हतबल केलं होतं. त्याच्यावर बंधनं पडली होती गावापुरती .आता गावाला त्याच्यापासून काहीही धोका नव्हता, असं मला मनोमन वाटत होतं. ते खरच ठरलं. रोगाची साथ गेली. प्राणीही सतेज दिसू लागले. झाडांनाही बहर आला. पण काही दिवस मला ती स्वप्नं येतच राहिली. एका गूढ काळोख्या कोणत्यातरी आसुरी देवीच्या गाभार्यात मी धावतोय. मागून अमानवी शक्ती पाठलाग करताहेत. असं स्वप्न पडायचं. कित्येक कापलिक बाबांच्या घेरावात मी उभा आहे नि मला पाहून ते असूरी हसताहेत असं. फारच भीतीदायक स्वप्नं होती ती. कालांतराने तीही थांबली. मला वाटलं की हे सारं थांबलं होतं. पण खरंतर सुरू झालं होतं. अदृश्यरीत्या. मी मग गाव सोडलं नि शहरात आलो. पोलिसभरती होऊन परीक्षा दिल्या नि इन्स्पेक्टर झालो. भूतकाळ हळुहळू पुसट होत गेला होता.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

इन्स्पेक्टर नाईकांना रूजू होऊन कित्येक वर्षं उलटून गेली होती. आता भूतकाळ परत मानगुटीवर बसेल असं त्यांना जराही वाटत नव्हतं. पण त्यांच्या मनाला आतून वाटत होतं, 'हे सगळं परत सुरू झालंय. तो कापलिक आपल्या शक्ती वाढवतोय. शिंदे त्या दिवशी बोलले होते ग्रहणाचं....' त्यांच्या डोक्यात हा विचार चमकला नि त्यांनी उठून कॅलेंडर हातात घेतलं. गेल्या महिन्यात थोड्याच दिवसांच्या अंतराने ग्रहणं झाली होती. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. त्याचदरम्यान केस कापले जाण्याचं प्रमाण जास्त होतं. वर ते पूजाला पडलेलं स्वप्नही याच्याचकडे बोट दाखवत होतं. तो कापलिक आपल्या शक्ती वाढवत असावा. त्याचीच करणी असावी ही.

इन्स्पेक्टर नाईकांना विचार करता करता झोप कधी लागली त्यांनाच कळलं नाही. दुसर्याच दिवशी सकाळी शिंदेचा फोन आला, की पूजाचाही खून झालाय. तसाच. जसा मीनाचा झाला होता. पूजा घरी असताना तिचे लाल झालेले केस मीनासारखेच कातरले होते नि तिच्या डोळ्यांत भीती होती. दुसरा खून झाला होता या प्रकरणात. काहीतरी करणं गरजेचंच होतं.

इन्स्पेक्टर नाईकांना काही सुचेनासं झालं होतं. भूतकाळाच्या रिकाम्या राहिलेल्या खाचा बहुतेक परत भविष्यकाळाने भरल्या जाणार होत्या. या केसचा शोधपत्ता एका इन्स्पेक्टरच्या नात्याने करणं अशक्य झालं होतं. काहीतरी होतं जे शोधावं लागणार होतं, आपल्या भूतकाळाला धरून.

(क्रमशः )

-द्वादशांगुला
जुई

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

तळटीप-
ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

छान
आता जास्त वाट पहायला लावू नको

एकच नंबर आहे हा पण भाग.. वाचताना मी स्वतः तिथे आहे असंच वाटत होतं... खूपच आवडला....>>>>>>> धन्यवाद हं आदिसिद्धी. Happy म्हणजे जमलाय म्हणायचा....

ऋन्मेष, सायुरी, नियती , गुगु तुम्हाला धन्यवाद... Happy

आता जास्त वाट पहायला लावू नको>>>> हो. लवकर लिहीन पुढचा भाग... Happy

आताच एक भयकथा पोस्टली.
तुझा हा भाग ही वाचला. छान जमलाय.
पण भीती कशी आवरू हा प्रश्न पडलाय. की बोर्ड चा आवाज ही घाबरवतोय !!
रामरक्षा म्हणत बसणार आता !

आताच एक भयकथा पोस्टली.
तुझा हा भाग ही वाचला. छान जमलाय.
पण भीती कशी आवरू हा प्रश्न पडलाय. की बोर्ड चा आवाज ही घाबरवतोय !!
रामरक्षा म्हणत बसणार आता !>>>>>>>>> Lol

सहिये !!
बैराग्याचं वर्णन हवं होतं...
पुभाप्र ! पुलेशु !

मस्त चाललीये कथा,
इकडचा तिकडचा टाईमपास कमी करून पटापट पूर्ण करा Happy

एक थवाल है.
मारू क्या?
त्या काठीचे काय झाले? अजुन इन्स्पेक्टर नाईकांकडे आहे का?

धन्यवाद भुत्याभाउ , आनंद, सिम्बा, पाफा, चैत्राली -जी Happy

बैराग्याचं वर्णन हवं होतं...>>>>> हम्म बदल करायला हवा. बरं झालं आठवण करून दिलीत. Happy

इकडचा तिकडचा टाईमपास कमी करून पटापट पूर्ण करा >>>>> हो Wink

त्या काठीचे काय झाले? अजुन इन्स्पेक्टर नाईकांकडे आहे का?>>>>> तेही स्पष्ट करते भागात. Happy

आनंदजी काठीबद्दल थोडासा अजून खुलासा केलाय. त्यामुळे हा भाग अधुरा वाटणार नाही. नाहीतर पुढे कुठे ही काठी उभी करावी हा मघाशी प्रश्न पडला होता मला. Happy बैराग्याचंही थोडं वर्णन टाकलंय. दुरूस्तीबद्दल धन्यवाद Happy

द्वादशांगुला,
फार सुरेख लिहितेस तू.. एकदम ओघवती शैली आहे तुझी. आता पुढील भाग लवकर येउ दे.

- प्रसन्न

द्वादशांगुला/जुई, कुठल्याही रहस्य/भयकथेमधे continuity फार महत्वाची असते आणि तू ती नेमकी साधली आहेस. पुढच्या भागाची वाट बघतोय.

खूपच मस्त लिहिते आहेस. पण मधे जास्त वेळ घालवू नको. वाचणार्‍याचा आणि कथेचा टेम्पो जातो.

आणि ते 'दुसर्या' ऐवजी 'दुसर्‍या' लिही.

धन्यवाद प्रसन्नजी, अपूर्वजी, चिऊ जी,दक्षिणाजी, अंकुजी Happy

दुसर्या' ऐवजी 'दुसर्‍या' लिही.>>>>>>>> मी स्मार्टफोनवरून टाईप करते म्हणून ते व्याकरणिक बदल होत नाहीयेत... तरी प्रयत्न करते . Happy

छान चालू आहे कथा!!
खिळवून ठेवतेय... नवीन भागाची प्रतिक्षा. लवकर पोस्टवा

Pages