ब्युटी पार्लर- भाग 5

Submitted by द्वादशांगुला on 16 April, 2018 - 14:54

आधीचे भाग वाचले नसल्यास पुढील लिंकवर टिचकी मारा.

ब्युटी पार्लर भाग 1

ब्युटी पार्लर भाग 2

ब्युटी पार्लर भाग 3

ब्युटी पार्लर भाग 4

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

पूर्वभाग-

निश्चिंत मनाने ते या स्मशानापासून दूर जाऊ लागले, तेव्हा अचानक त्यांना खूप अशक्त वाटू लागलं . अंगातली ताकद नाहीशी होत असल्यासारखं वाटू लागलं, नि काही कळायच्या आत ते चक्कर येऊन तिथेच खाली पडले. शुद्ध हरपताना त्यांना एक खंबीर, दुष्ट हसण्याचा आवाज ऐकू आला, नि त्यांचं भान हरपलं.

आता पुढे-
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

इन्सपेक्टर नाईकांना जाग आली तेव्हा त्यांना सर्वात आधी दिसलं , की एक तेजस्वी पुरूष कमंडलूतून त्यांच्या तोंडावर पाण्याचे हबके मारून उठवत होता. त्यांना जरा शुद्ध आली नि ते उठून बसले. ते एक कसलंसं प्रसन्न मंदिर होतं, हं श्रीकृष्णाचं... समोरची एक मुरलीधराची हातात बासरी घेऊन वाजवत असलेली सुंदर दगडी मूर्ती आपल्याकडेच प्रसन्नतेने पाहत आहे, असंच वाटत होतं. आजुबाजूला कमालीची सुंदरता होती. दगडी बांधकाम केलेलं ते मंदिर होतं. उजेड, हवा यायला भरपूर वाव होता. गार वारा मंदपणे वाहत होता. पक्ष्यांची मधूर किलबिल ऐकू येत होती. इन्स्पेक्टर नाईक उठून बसले. ती समोरची व्यक्ती उभी होती. नाईकांनी डोक्याला ताण देऊन पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं की हीच ती व्यक्ती होती, जिने स्वप्नात येऊन आपल्याला मार्ग दाखवला होता. नाईकांचे हात त्यांच्याही नकळत अवचितपणे जोडले गेले. त्या सिद्ध पुरूषाने त्यांना हसतच हात पकडून उठवलं. त्या व्यक्तीने भगवी वस्त्रे परिधान केलेली होती. जटा राखलेल्या त्या व्यक्तीच्या प्रशस्त कपाळावर चंदनतिलक लावलेला होता. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची आश्वासकता, सकारात्मकता होती.

पण इन्स्पेक्टर नाईकांच्या चेहर्‍यावर लगोलग आश्चर्याचे भाव उमटले. त्यांना राहून राहून ते इथे कसे आले होते, हा प्रश्न पडला. त्यांना आपण स्मशानात होतो हेच आठवत होतं. त्यांचा चिंतातूर चेहरा पाहून ती तेजस्वी व्यक्ती चेहर्यावर स्मित ठेवून म्हणाली , " अरे, तुला इथं मी आणलंय. तुझं रक्षणकवच तू काढलेलं पाहून त्या दुष्ट कापलिकाच्या दुष्ट शक्तींनी तुझ्या मनावर आणि शरीरावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. जर मला हे कळलं नसतं तर त्याने तुझा जीव घेतला असता. मी तुला वाचवून इथे आणलंय. तुझी माझी भेट इथेच यावेळी होणार होती, हे निव्वळ प्रारब्ध. पण आता तुला सावध राहिलं पाहिजे. तुझ्या मानसिक बलस्थानांवर तो आघात करण्याचा प्रयत्न करेल. तू मात्र हिंमत सोडू नकोस. तुला वाटत असेल, की या कामासाठी तुझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीची निवड का केलीय. तर यालाही एक कारण आहे. त्या अघोरस्वामीशी व त्याच्या शक्तींशी तुझा परिचय आहेच. तसेच तुझ्यात दैवी आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आहे. तुझ्याजवळच्या नेमक्या शक्तींची माहिती काही त्याला नाहीय. दुसर्या कोण्या सकारात्मक शक्तिशाली साधूंनी जर त्याला मात देण्याचं ठरवलं, तर तो अघोरस्वामी त्यांची शक्ती आधीच ओळखून बचावण्याचे शक्तिनुरूप उपाय करेल व तो वाचेल. तू सामान्य माणूस असल्याने त्याला तुझ्यापासून वाचण्याची गरज वाटत नाही. हेच त्याला मारक ठरेल."

नाईकांना तरीही थोड्या गोंधळात पाहून ती व्यक्ती म्हणाली, " मी रामानंद. मी वैष्णवपांथिक आहे. मी माझ्या आयुष्यात साधनेने व तपश्चर्येने बर्याच सिद्धी अन् शक्ती प्राप्त करून घेतल्या आहेत. तुझ्या स्वप्नात येऊन मी तुला पुढची दिशा दिली. यापुढेही मी तुला योग्य ती दिशा दाखवेन. मग मी दाखवलेल्या मार्गावरून जाऊन फलित प्राप्त करण्याचे काम फक्त तुझेच आहे. तुला यश लाभो हीच प्रार्थना. लक्षात ठेव, तुझ्याकडून झालेली एक लहानात लहान चूकही सर्वांसाठीच मारक ठरू शकेल. आणि हे झालं तर त्या अघोरस्वामीच्या शक्ती प्रचंड वाढतील नि मग त्याला आवरण्याचं सामर्थ्य त्या भगवंताशिवाय कोणातच उरणार नाही."

यावर नाईकांनी मान डोलावली. त्यांनी रामानंदांना विचारलं, " स्वामी , पण मग आता पुढे काय करायचं आहे? तो अघोरस्वामी मला कुठे भेटेल? त्याच्या शक्ती कशा संपवू शकतो? " यावर स्वामी म्हणाले," अरे ते सारं विधात्याकडून ठरवलं गेलंय आधीच. आपण त्याचे इशारे समजून कार्य करायचं. आपण उद्या सकाळी नऊला स्मशानाच्या बाहेर भेटू. उद्या आपल्याला तिकडे एक महत्त्वाचं काम पार पाडायचं आहे. येताना शुचिर्भूत होऊन कपाळाला चंदनतिलक लावून ये. मन स्थिर ठेव. मनाची चलबिचल होऊ देऊ नकोस. त्या दुष्ट शक्ती तुला वाटेतच अडवू शकतात. आणि मी तुझ्या दंडाला हा भारित दोरा बांधतोय, तो काहीही झालं तरी काढू नकोस. " असं म्हणून त्यांनी एक केशरी, पिवळ्या रंगाचा दोरा नाईकांच्या दंडाला बांधला. त्यानंतर त्यांनी नाईकांना डोळे मिटायला सांगितलं. त्यांनी डोळे उघडल्यावर ते त्यांच्या घराच्या फाटकाच्या बाजूला उभे होते. त्यांनी पाहिलं, तर दंडाला तो दोरा तसाच होता; म्हणजे हा भास नव्हता.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

दुसर्या दिवशी इन्स्पेक्टर नाईक सकाळी स्मशानाच्या दिशेने निघाले. ते रस्त्याने जात असतानाच अचानक अतिशय वेगाने वारा वाहू लागला. चालणेही शक्य होईना. त्यांनी लगोलग रामरक्षा म्हणण्यास सुरूवात केली, तसं ते वादळ शमलं. थोड्या थोड्या वेळाने हसण्याचे आवाज , धमक्या , काळोख झाल्याचा भास, अचानक वातावरण बदलणं, असल्या गोष्टी होतच राहिल्या. पण न जुमानता धैर्याने ते जातच राहिले. म्हणजे रामानंद स्वामींनी अचूक शक्यता वर्तवली होती. ते स्मशानाजवळ पोहोचले. रामानंद म्हणाले," तू त्या मायावी चालींपुढे स्थैर्य डगमगू दिलं नाहीस. शाब्बास! चल आता आत जाऊया." मग ते दोघे आत गेले, त्या काठीपाशी. इतकी वर्षं झाली, तरी ती काठी अद्याप इथेच कशी आहे, हा नाईकांना परवा इथे आल्यापासून पडलेला प्रश्न त्यांनी स्वामींजवळ बोलून दाखवला. त्यांच्या मनातलं जाणून घेऊन स्वामींनी डोळे मिटले, आणि काही क्षणांनी प्रसन्नपणे डोळे उघडून त्यांना म्हणाले, " अरे, ही काठी म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचं प्रतीक बनलीय. तुला हिची इथे स्थापना करताना कोणी पाहिलं नसल्याने ती कापलिकानेच रोवली, असा गावाचा समज आहे. त्या कापलिकाच्या क्रोधामुळे गावात आलेले अरिष्ट सगळ्यांनी भोगलेय. त्यामुळे तिला कोणीच हात लावला नाही. वर इथल्या शक्तींची जाणीव निसर्गगाला आधीच झालीय. त्यामुळे प्राणी, पक्षी, ऊन, पाऊस, वारा अशांपासून या काठीचं रक्षण झालं. " यामुळे नाईकांच्या शंकेचं निरसन झालं. काठी त्या रक्षणकवचामुळे स्थिर उभी होती. तिच्या वरच्या भागात बांधलेल्या चिंध्या वार्‍यावर हलत होत्या. स्वामींच्या आगमनाने मात्र इथलं वातावरण बदलून गेलं होतं. समोरून उगवणारा सूर्य जणू आशेचा किरणच घेऊन आला होता.

स्वामींनी 'ओम नमो नारायणाय ' या मंत्राचा अखंड जप करण्यास सांगितला आणि त्यांनीही आपल्या खड्या आवाजात मंत्रोच्चरणास सुरूवात केली. त्यांनी कमंडलूतील पंचामृताने त्या काठीभोवती दहा पावलं व्यासाचं वर्तुळ आखण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यानी उरलेलं पंचामृत प्राशन करून नाईकांनाही दिलं. त्यानंतर त्यांनी सोबतच्या पिशवीतून एक शेला काढला. त्यांनी सांगितलं, की तो रामनवमीला चाफळच्या पालखीवेळी रामाला नेसवलेला शेला होता. त्यांनी तो शेला त्या काठीला गुंडाळला. तसे त्या काठीच्या तळाजवळच्या मातीतून आतून चित्कारण्याचे, रागाने ओरडण्याचे, विचित्र आवाजात रडण्याचे आवाज येऊ लागले. जोराचा वारा वाहू लागला अन् काही वेळातच हे आवाज नाहीसे झाले. यावर स्मितहास्य करत स्वामी म्हणाले, " या शेल्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा नि शक्ती आहे. त्यामुळे त्या कापलिकाच्या शक्तीला मर्यादा पडल्या आहेत. तो आता कुठल्याही मार्गे कोणाचा जीव घेऊ शकत नाही . त्याला आता नष्ट करणं सोपं पडेल."

इतक्यात त्यांना काही आवाज ऐकू आले," मी तुम्हाला सोडणार नाही... मी तुमचा बदला घेईन. माझ्या शक्ती अडकवल्या आहात काय ... मी त्या परत मिळवीन... मग तुमची खैर नाही..." यावर स्वामींनी पिशवीतून कसलीशी पूड काढली आणि ती आसमंतात भिरकावली. त्यानंतर हे आवाज बंद झाले. स्वामींच्या चेहर्‍यावर पुसटसं प्रसन्न हास्य होतं. आपल्या गंभीर स्वरात ते नाईकांना म्हणाले," आता तुझं इथलं कार्य संपलंय. मी तुझ्या अनुपस्थितीतही याचा बंदोबस्त करू शकलो असतो, पण तुझ्यामुळे हे कार्य सोपं झालं. मला एकट्याला पाहून त्याने मी आधी म्हटल्याप्रमाणेच सर्व शक्ती पणाला लावून आपल्या शक्ती वाचवल्या असत्या. पण यामागे तुला पाहून त्याला एका सामान्य माणसापासून अपाय नाही असं वाटलं, आणि त्याने इथेच चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे एका कापलिकाच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्याची शक्ती हिरावणं महत्त्वाचं असतं. असो. तुला आता यापुढे सावध रहावं लागणार. तो अघोरस्वामी आता चवताळला असणार. तू वाचून रहा. मी तुला त्याला हरवण्याकरता एक पायरी चढायला मदत केली आहे; पण पुढची तुझीच लढाई आहे. यातलं माझंही कार्य संपल्याचा मला आदेश आलाय. तरी मी तुझ्यापर्यंत दैवी संदेश पोहोचवण्याचं कार्य करेनच. तू आता परत मुंबईला निघून जा. आणि संकटात नारायणाला आठव. तोच तूला मार्ग दाखवेल." त्यांनी हे बोलता बोलता खालची स्मशानातली माती उचलली, आणि ती एका पूडीत बांधून ती नाईकांकडे सोपवली. "याचं स्पष्टीकरण तुला लवकर मिळेल. " असं सांगून त्यांनी नाईकांना जाण्याची आज्ञा केली. ती पूडी खिशात घालून ते चालू लागले. काही पावलं चालून नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं, तर स्वामी तिथे नव्हतेच. ते अचानक लुप्त झाले होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज इन्स्पेक्टर नाईक गावाहून निघाले. त्यांनी बस पकडली नि ते लवकरच मुंबईला पोहोचले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पटकन वर्दी चढवली आणि ते चौकीत गेले. अपेक्षेप्रमाणेच केससंबधी काही बातमी नव्हती. तेवढ्यात त्यांच्या समोर शिंदे आले. ते म्हणाले, " साहेब, तुम्हाला मी फोनवर सांगितलं होतं, त्याप्रमाणे ती पुस्तकं आणि इतर साहित्य असलेली माझ्या वडिलांची पेटी मी इथे आणलीय. ते हयात असताना कोणालाच हात लावून देत नसत. त्यात खूप बहुमोल ज्ञान असावं. मी ती उघडूनही न बघता इथे आणलीय. कारण ती उघडलीच जात नव्हती. आपण दोघं मिळून ती उघडायचा प्रयत्न करूया. आज संध्याकाळी माझ्या घरी या. " होकारार्थी मान हलवून नाईक दुसर्या कामाला लागले. संध्याकाळी घरी जाऊन त्यांनी साधे कपडे चढवले आणि लगोलग शिंदेंच्या घरी पोहोचले. शिंदेंनी त्यांचं हसत हसत स्वागत केलं.

शिंदेंनी त्यांना घरातल्या आतल्या खोलीत नेलं. तिथे टेबलावर ती गूढ पेटी होती. ती लाकडाची, बारीक नक्षीकाम केलेली, भक्कम पेटी होती. चौरसाकृती, जवळपास अर्ध्या मीटरची. तिच्या प्रत्येक बाजूला मधोमध धातूच्या बारीक अशा, जवळपास 15 × 9 सेमीच्या पट्ट्या फुलीच्या (×) आकारात ठोकल्या होत्या. त्या फुल्यांवर शंकराच्या नृत्यमुद्रेची नक्षी होती. पेटीच्या वरच्या भागात कसलासा काळा धागा गुंडाळून बांधला होता. नाईकांनी त्या पेटीला हात लावला, नि त्यांना झटका लागल्यासारखे ते मागे झाले. शिंदेंनी त्यांना सावरलं. याचा अर्थ त्या पेटीच्या रक्षणासाठी बरीच दक्षता घेण्यात आली होती. शिंदेंचं लक्ष नाईकांच्या दंडाकडे गेलं, नि सारंकाही त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, " साहेब, हा दोरा तुम्हाला त्या रामानंद स्वामींनी बांधला होता ना? त्यामुळेच तुम्हाला या पेटीला हात लावता येणार नाही. "

इन्स्पेक्टर नाईकांच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून शिंदे म्हणाले, " साहेब, तुमचा हा धागा एका वैष्णव पंथाच्या साधूने बांधलाय. आणि ही पेटी रक्षित केली आहे माझ्या शैव पंथाच्या वडिलांनी. आधी हे लक्षात घ्या की अनादी काळापासून शैव आणि वैष्णव पांथिक लोकांमध्ये वैर आहे. त्यांच्या साधनाकृतींतही तफावत आहे. वैष्णव सकाळी साधना करतात, तर शैव रात्री. वैष्णव मंदिर, पहाड येथे उपासना करतात , तर शैव स्मशानात. वैष्णव सात्त्विक आहार - जसे भाज्या, फळे, दूध इ. पत्रावळी, ताटं यांतून घेतात, तर शैव कच्चं मांस, फक्त भाजलेलं मांस असं सामिष अन्न मेलेल्या माणसाच्या कपाल- म्हणजेच कवटीतून खातात. वैष्णव विष्णूची भक्ती करतात, तर शैव शिवाची. वैष्णव शांत स्वभावाचे तर शैव रागीट, उग्र. एकमेकांची निंदा करणं, कुरघोड्या करणं, आपलाच पंथ वरचढ कसा, हे दाखवणं, ह्यात त्यांच्या कित्येक पिढ्यांनी सुख मानलं. मध्यंतरी एकमेकांचं बहुमूल्य साहित्य, संदर्भग्रंथ यांचा नाश करण्याची सुरूवात झाली. त्यामुळे यापासून वाचण्याकरता बाबांनी वैष्णव पांथिकांना वा वैष्णव पंथ मानणार्‍यांना या अनमोल ठेव्यापासून दूर करण्याकरता या पेटीला भारमंत्रित केलं असावं. तुम्हाला या पेटीला हात लावण्याकरता तो धागा काढावा लागेल. ... पण तुम्हाला तर रामानंदजींनी धागा न काढण्याची सक्त ताकीद दिली आहे... मग तुम्ही फक्त बाजूला उभे रहा. कृती मी करतो. पण हे उघडायचं कसं? याला तर झाकणही दिसत नाहीय."

यावर नाईक विचार करायला लागले. त्यांच्या आता सर्व लक्षात आलं होतं. आता फक्त ही पेटी उघडायची होती. तिला तर कडीही दिसत नव्हती. इतक्यात नाईकांना एक कल्पना सुचली. त्यांनी शिंदेंना तो दोरा काढण्यास सांगितलं, पण तो निघेना. तो दोरा किती जोर लावला तरी हलतच नव्हता. मग तेवढ्यात नाईकांचं लक्ष पेटीच्या वरच्या भागाकडे गेलं. तिकडे काहीतरी बारीक अक्षरात, वेगळ्या लिपीत काहीतरी कोरलं होतं. ती बहुधा मोडी लिपी होती. म्हणजे या पेटीला बराच मोठा इतिहास असावा. नाईकांनी डोळे बंद केले, एकवार रामानंद स्वामींनी सांगितलेला मंत्र जपला, आणि त्यांनी त्या अक्षरांकडे पाहिलं. त्यांना चक्क ती अक्षरं जवळची वाटत होती, ती अक्षरं त्यांना हळूहळू उलगडू लागली होती. जसं जसं समजेल, तसतसं त्यांनी ते मोठ्याने बोलायला सुरूवात केली.

त्यावर लिहिलं होतं :

घं घं घमघोर राजते भीही
कं कं कमधेय धीयते क्ष्मासु।
क्लीं क्लीं कालीखड़ग विद्यत्यत्र
वं वं जगत्देवता भैरवाय नमः ॥

नाईकांनी शिंदेंना ह्या मंत्राचं उच्चारण करतच तो दोरा काढायला सांगितला. तेही तो मंत्र मोठ्याने बोलू लागले. त्या मंत्रोच्चाराने म्हणा, वा कशाने, पण वातावरण गूढ , तणावपूर्ण झालं होतं. क्षणाक्षणाला काय होईल याची उत्सुकता वाटत होती. शिंदेंनी या मंत्राची तीन आवर्तनं पूर्ण केल्यानंतर जखडलेला तो दोरा हळुहळू सुटू लागला. अशी तीन मंत्रोच्चरणाची तीन आवर्तनं म्हणजेच नऊ वेळा मंत्र बोलल्यावर तो दोरा पूर्णपणे सैल पडला आणि शिंदेंनी तो सहजतेने काढला. तरीही पेटी उघडायचा मार्ग दिसेना. इतक्यात नाईकांचं लक्ष पेटीच्या डाव्या बाजूच्या धातूच्या फूलीवर गेलं. तिच्या बाजूला एक अर्धकडीच्या आकाराच्या तोंडाचं, दांडा असणारं एक धातूचं हत्यार दिसलं. ते तिकडे वर असलेल्या लाकडी भोकात ठेवलं होतं. त्यांच्या सूचनेनुसार शिंदेंनी ते काढलं. याचं काय करायचं, या विवंचनेत असतानाच नाईकांच्या कानात एक पुटपुटल्यासारखा गूढ आवाज आला, "त्या अवजाराने त्या धातूपट्टीका काढ." नाईकांनी हे शिंदेंना सांगितलं. सोबतच पेटीवरचा मंत्र उच्चारण्याचंही सांगितलं. आणि काय आश्चर्य, अवजाराचा स्पर्श होताच त्या धातूच्या ठोकलेल्या पट्ट्या पानासारख्या गळून पडत होत्या. एक एक करत सर्व पट्ट्या निघाल्या.

जशी शेवटची पट्टी काढली, तसा शंखातून येतो तसा आवाज त्या पेटीतून आला आणि त्या पेटीचा वरचा पृष्टभाग वर आला. इन्स्पेक्टर नाईक आणि शिंदे थोडे मागे झाले. ती पेटी किंचित हलत होती. आता ती पेटी उघडत होती. तिच्या आतून एक डोळे दिपवणारी प्रकाशाची तिरिप आली आणि तो पृष्ठभाग टेबलावर बाजूला पडला. त्या प्रकाशात काहीतरी होतं नक्कीच. जसा तो प्रकाश त्या दोघांनी पाहिला, तशी त्यांच्या अंगातून एक भीतीची लहर गेली. त्यांचे डोळे जड झाले. अंगाला विचित्र जडत्व प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं. आपण आता जमिनीत शिरू की काय, असं वाटत होतं. काहीच सेकंदात त्यांचं कपाळ, डोक्याचा मागचा भाग दुखू लागला , मेंदू सुन्न झाला, आणि ते दोघे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

क्रमशः

- द्वादशांगुला.

तळटीप :

ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

द्वादशांगुला खूपच सुंदर....स्वामींच वर्णन अफाट सुंदर शब्दात लिहीलयस....आता त्या पेटीतल्या रहस्याने उत्सुकता चाळवलीये.....कथेचे सगळे भाग एकच नंबर आहेत...पण हा भाग विशेष आवडला...

घं घं घमघोर राजते भीही
कं कं कमधेय धीयते क्ष्मासु।
क्लीं क्लीं कालीखड़ग विद्यत्यत्र
वं वं जगत्देवता भैरवाय नमः ॥

श्लोकाची रचना तु केलीयेस?

द्वादशांगुला खूपच सुंदर....स्वामींच वर्णन अफाट सुंदर शब्दात लिहीलयस....आता त्या पेटीतल्या रहस्याने उत्सुकता चाळवलीये.....कथेचे सगळे भाग एकच नंबर आहेत...पण हा भाग विशेष आवडला..>>>> खूप धन्यवाद आदिसिद्धी. Happy

श्लोकाची रचना तु केलीयेस?>>>>>> तुझा अंदाज 100% बरोबर आहे. खरंतर या श्लोकाची रचना आठवड्याभरापूर्वी एका दुसर्या भयकथेकरता केली होती, पण ती अर्ध्यातच सोडली. पण एवढं डोकं खाजवून आणि संदर्भ चाळून बनवलेला श्लोक त्यागणं रूचेना. म्हणून इथे वापरलाय तो श्लोक. वाटतोय ना कापलिक असेल असा?

Excellent !!!

तू खरंच नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली बालायडी आहेस का असा विचार मनांत चमकून जातो.. हा केवळ घ्यायचा म्हणून घेतलेला संशय नाही तर तुझ्या लेखणीच्या सशक्तपणामुळे तो वाटतो आहे.. हा संशय म्हणजेच तुझ्या लेखणीचा गौरव आहे ! Happy

चित्रदर्शी लिखाण आहे, वाचत असताना मी सगळं समोर प्रत्यक्ष घडताना बघत होतो.

शैव आणि वैष्णव पंथाच्या अनुयायांमधील वैर छान चितारलंय.. खरंतर हे वैर अज्ञानापोटी दोन्ही पंथाच्या अनुयायांनी शेकडो वर्षं बाळगलं आहे. जे संदर्भ तपासून तू येथे मांडलेलं दिसतंय, हे अभिनंदनीय आहे.
पण दोन्ही बाजूच्या मुळ पुरूषांमध्ये हा वैरभाव नाहीये. दोघेही एकमेकांना पुरक आहेत. दोघांमध्ये एकमेकांप्रती भक्तीची आणि सेवेची चढाओढ आहे. शिवाच्या ध्यानांत राम आहे आणि वैष्णवपंथीयाला अवधूत अवस्था शिवबिजानंच प्राप्त होते !

त्या श्लोकाचा अर्थ खाली प्रतिसादांमधून स्पष्ट करावा असं सुचवतो कारण तुझ्या सगळ्याच वाचकांना संस्कृत समजत असेल असं नाही. मलाही नाही समजत.. Proud

पुढच्या भागाची आता आतुरतेनं वाट बघतोय..त्यामागे आता पुढे काय होणार यासाठीची उत्सुकता नाहीये तर तुझं लिहीलेलं वाचायला मिळणार म्हणून आतुरता आहे ! Happy
पुलेशु !

माझ्या बालबुध्दीला पडलेला एक प्रश्न. मागच्या भागातच विचारायचा होता. आता इथे विचारतो.
ती अभिमंत्रीत काठी इतके वर्ष तिथेच कशी राहीली? स्मशानाचा उपयोग तर होतच असेल ना? एखाद्या गुहेत असती तर समजू शकते की द्रुष्टीस पडली नाही.

बापरे आनंद खूप खूप धन्यवाद! एवढ्या कौतुकाची सवय नाहीय हो... Lol

तू खरंच नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली बालायडी आहेस का असा विचार मनांत चमकून जातो.. हा केवळ घ्यायचा म्हणून घेतलेला संशय नाही तर तुझ्या लेखनीच्या सशक्तपणामुळे तो वाटतो आहे.. हा संशय म्हणजेच तुझ्या लेखनीचा गौरव आहे ! Happy>>>>>>> म्हणजे मी लिखाणात प्रगती करतेय तर. Happy खरंतर लहानपणापासून फ्लॅटसंस्कृतीत राहिल्याने माझ्याही नकळत वाचनाची गोडी लागली आहे. साने गुरूजींपासून शिवाजी सावंतांपर्यंतच्या शब्दांचे बादशहा असणार्या काही लेखकांच्या प्रतिभा शब्दांतून अनुभवल्यात. त्यामुळेच शब्दांशी खेळत खेळत मन सांगतं ते लिहित जाते. चौथीपासून कविता करते, आता माबोवर दहावीत आल्यानंतरच कथालेखन सुरू केलंय. आणि लिखाणाचं म्हणाल तर जोपर्यंत मनाला वाटत नाही की आपण मनासारखं लिहिलंय, तोपर्यंत लिहिणं, कट करणं सुरूच असतं. आणि वर हल्ली या ब्युटी पार्लर साठी बरेचसे संदर्भही चाळावे लागतात.कधीकधी वाटतं, मीच मांत्रिक हवे होते.... Proud
म्हणून मी भाग टाकायला उशीर लावते, हाही आरोप आहे सर्वांचा. Lol आणि त्यासाठी मी सर्वांची जाहीर माफीही मागते, पण नाईलाज आहे..

पण दोन्ही बाजूच्या मुळ पुरूषांमध्ये हा वैरभाव नाहीये. दोघेही एकमेकांना पुरक आहेत. दोघांमध्ये एकमेकांप्रती भक्तीची आणि सेवेची चढाओढ आहे. शिवाच्या ध्यानांत राम आहे आणि वैष्णवपंथीयाला अवधूत अवस्था शिवबिजानंच प्राप्त होते !>>>>>> अच्छा. याबद्दल पुसटसं वाचलं होतं. पण हे असंही असेल, माहीत नव्हतं. अतिरिक्त माहितीबद्दल धन्यवाद. याचा मला पुढील भागांत नक्की उपयोग होईल.

त्या श्लोकाचा अर्थ खाली प्रतिसादांमधून स्पष्ट करावा असं सुचवतो कारण तुझ्या सगळ्याच वाचकांना संस्कृत समजत असेल असं नाही. मलाही नाही समजत.. Proud>>>>>> हं. समजावते.

मुळात घं,कं, क्लीं, वं हे बीजमंत्र आहेत , विविध मानसिक , शारीरिक रोग दूर ठेवण्यासाठी, आणि मानसिक स्थैर्यासाठी. त्यांचा अर्थ काही माहीत नाही.

घं घं घमघोर राजते भीही>>
घमघोर- घं + अघोर अशी संधी होते.
वाक्याचा अर्थ असा की अघोरशक्ती पृथ्वीवर राज्य करते.

कं कं कमधेय धीयते क्ष्मासु।>>
कमधेय- कं + अधेय अशी संधी होते.
वाक्याचा अर्थ असा की या शक्ती पृथ्वीवर आहेत.

क्लीं क्लीं कालीखड़ग विद्यत्यत्र>>
विद्यत्यत्र- विद्यते + अत्र अशी संधी होते.
वाक्याचा अर्थ असा की कालीमातेची तलवार येथे विलसत आहे.

वं वं जगत्देवता भैरवाय नमः ॥>>
या वाक्याचा अर्थ असा की जगाचा देव असलेल्या भैरवाला (माझा) नमस्कार असो.

ती अभिमंत्रीत काठी इतके वर्ष तिथेच कशी राहीली? स्मशानाचा उपयोग तर होतच असेल ना? एखाद्या गुहेत असती तर समजू शकते की द्रुष्टीस पडली नाही.>>>>
भारी प्रश्न आहे. मला आवडला. ती जागा मूळात त्या कापलिकाने शक्ती प्राप्त करायला वापरली होती. वर गावकर्यांनी त्याच्या रागाचा प्रकोपही पाहिला , (आधीच्या भागात) त्यामुळे तिकडल्या कोणत्याच वस्तूला हात लावण्याची लोकांची हिंमत झाली नाही. नाही म्हणायला तिथे अदृश्य शक्ती असणारच. म्हणून प्राण्यांनाही तिकडे फिरकावंसं वाटलं नाही. आणि नाईकांना ती काठी रोवताना कोणी पाहिलं नाही, त्यामुळे ती कापलिकानेच रोवली असणार हा गावकर्यांचा समज असणार. असं माझं स्पष्टीकरण.

या भागात पण सुधारून टाकू का?

अर्रे ! तू तर अघोरी श्लोक बनवलास.. पक्की कापालिक दिसतीये तू.. Lol जपून रहायला हवं...

कथा टाकायला उशीर झाला तरी हरकत नाही कारण जोपर्यंत मायबोलीवर विशालदादाचं वर्तुळ, बेफींची सनम, ऋन्मेषचे प्रपोज पुर्ण होऊन येत नाहीत तोपर्यंत तुला उशीर झाला म्हणून वाचकांचे बोलणे बसायची भिती नाही ! आणखी एक नाव राहीलंय पण ते जाऊदे...

ओके

मस्तच गं जुई ...श्लोकाची रचना करणं सोपं काम नव्हे...त्याची वृत्त वगैरे बर्याच भानगडी असतात...तरीही तु बनवलास हे कौतुकास्पद आहे....मला अर्थ थोडाफार कळलेला...पण बरं झालं विस्तारीत करून सांगितलास ते......

अप्रतिम
काय तो श्लोक तो अर्थ ... हे सोप नाही.
"तू खरंच नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली बालायडी आहेस का..." हे जर खर असेल तर तुझ्यातल्या लेखिकेला साष्टांग नमस्कार

अर्रे ! तू तर अघोरी श्लोक बनवलास.. पक्की कापालिक दिसतीये तू.. Lol जपून रहायला हवं...>>>>>> Biggrin

कथा टाकायला उशीर झाला तरी हरकत नाही कारण जोपर्यंत मायबोलीवर विशालदादाचं वर्तुळ, बेफींची सनम, ऋन्मेषचे प्रपोज पुर्ण होऊन येत नाहीत तोपर्यंत तुला उशीर झाला म्हणून वाचकांचे बोलणे बसायची भिती नाही ! आणखी एक नाव राहीलंय पण ते जाऊदे.>>>>>>> अच्छा. नाहीतर मला वाटलं होतं की मीच ती माबोकर गोगलगाय!!! Lol

मस्तच गं जुई ...श्लोकाची रचना करणं सोपं काम नव्हे...त्याची वृत्त वगैरे बर्याच भानगडी असतात...तरीही तु बनवलास हे कौतुकास्पद आहे....मला अर्थ थोडाफार कळलेला...पण बरं झालं विस्तारीत करून सांगितलास ते......>>>>>> धन्यवाद हं!

धन्यवाद हं अधांतरीजी आणि गुगु जी Happy

काय तो श्लोक तो अर्थ ... हे सोप नाही.>>>>>>> इच्छाशक्ती आणि तुम्ही करत असलेल्या कामाची आवड यामुळे वरवर कठीण वाटणारी गोष्टही सोपी होऊन जाते, असं कुठेतरी वाचलं होतं आणि अनुभवतही आहे. आणि लहानपणापासून कवितांची सवय. आता मला कविता टाईप करून सुचत नाहीत , तसंच जुन्या टायपायला कंटाळा येतो, म्हणून इथे टाकायचा कंटाळा करते ही वेगळी गोष्ट. वर दहावीलाही संस्कृत घेतल्याने कठीण नाही वाटलं. Happy

तू खरंच नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली बालायडी आहेस का..." हे जर खर असेल तर तुझ्यातल्या लेखिकेला साष्टांग नमस्कार>>>>>>> बापरे नमस्कार- चमत्कार करण्याएवढी माझ्यातली लेखिका सशक्त नाहीय हो.... Happy आणि मी इथे खरंखरं सांगितलंय की मी दहावीत आहे. उगाच कशाला खोटं सांगू. त्यातून ना मला फायदा ना वाचणार्यांना उपयोग. खरी माहिती सांगितली, तर वाचकवर्गामध्ये आपली खरी ओळख पटेल, यावरच माझा विश्वास आहे. म्हणून मी आतापर्यंत इथे माझ्याबद्दल जे जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. Happy

अजून श्लोक लिही असे..अर्थ लावायला मला आवडतं...कोडं सोडवल्यासारखं वाटतं..दहावीतल्या संस्कृतचा फायदा होतो हे बरोबरे तुझं...

ती अभिमंत्रीत काठी इतके वर्ष तिथेच कशी राहीली? स्मशानाचा उपयोग तर होतच असेल ना? एखाद्या गुहेत असती तर समजू शकते की द्रुष्टीस पडली नाही>>>> या प्रश्नाचं उत्तर कथेतही घातलंय. सुचवल्याबद्दल धन्यवाद. Happy

सुधारणा केलीस.. Uhoh आता परत वाचावी लागेन...

>>> इतकी वर्षं झाली, तरी ती काठी अद्याप इथेच आहे, यावर नाईकांना इथे परवा आले होते , तेव्हापासून पडलेला प्रश्न त्यांनी स्वामींजवळ बोलून दाखवला.>>>

{ इतकी वर्षे झाली तरीही ती काठी अद्याप इथेच आहे, हा नाईकांना परवा येथे आल्यापासून पडलेला प्रश्न त्यांनी स्वामींजवळ बोलून दाखवला.}

मला वाटतं याप्रमाणे बदल केल्यास वाक्यात सहजता येईल. बघ बरं.. Happy

बाकी ही काठीविषयक सुधारणा करताना लावलेलं ठिगळ न दिसण्याच्या तुझ्या कौशल्याची दाद द्यायला हवी.

भयकथा प्रकार मला फारसा आवडत नाही आणि भगव्या कपड्यातले कोणीच कधीच आश्वासक, सकारात्मक वगैरे वाटेल यावर विश्वास नाही Wink
पण तरीही लेखनशैली चांगली असल्याने वाचतेय.

भाग ३, ४ आणि ५ आताच वाचले. कथा रेंगाळते आहे असे वाटले. लवकर संपव. उगाच पाणी घालू घालून वाढवू नको. ू

मला वाटतं याप्रमाणे बदल केल्यास वाक्यात सहजता येईल. बघ बरं.. Happy>>>>>>>> हं केलाय बदल. सुचवल्याबद्दल धन्यवाद. Happy

बाकी ही काठीविषयक सुधारणा करताना लावलेलं ठिगळ न दिसण्याच्या तुझ्या कौशल्याची दाद द्यायला हवी.>>>>>>> Lol म्हणजे माझा प्रामाणिक प्रयत्न सफल झाला म्हणायचा!!

भयकथा प्रकार मला फारसा आवडत नाही आणि भगव्या कपड्यातले कोणीच कधीच आश्वासक, सकारात्मक वगैरे वाटेल यावर विश्वास नाही Wink>>>>> कारण हल्ली समाजात अशा कपड्यात फिरणारे बहुधा भामटे, पैशांसाठी असं वागणारे टाईप असतात. पण एखाद्या खर्या साधूला पाहिल्यावर तुम्हाला यावर फेरविचार नक्की करावा लागेल. उदा. वारकरी.

पण तरीही लेखनशैली चांगली असल्याने वाचतेय.>>>>> वाचल्याबद्दल धन्यवाद. Happy

कथा रेंगाळते आहे असे वाटले. लवकर संपव. उगाच पाणी घालू घालून वाढवू नको. ू>>>>>>> हम्म प्रयत्न करते.

केलेला बदल-
<<आधीचे भाग वाचले नसल्यास पुढील लिंकवर टिचकी मारा.

ब्युटी पार्लर भाग 1

ब्युटी पार्लर भाग 2

ब्युटी पार्लर भाग 3

ब्युटी पार्लर भाग 4>> येथे लिंक टाकल्या आहेत.

Katha khup Chan rangliy pan pudhache bhaag lawkar aalet tar aamhala wachakana aanadach hoil . Roj tumchi hi Katha ani Maitri ya doghanche bhaag aalet ki he aadhi pahate me. Door deshat rahun Marathi Katha wachanachi Maja ani bhasheshi bhandun Rahane donhi jaamtay maayboli mule.

धन्यवाद प्रीतीजी Happy लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न करते.

Roj tumchi hi Katha ani Maitri ya doghanche bhaag aalet ki he aadhi pahate me>>>>>> धन्यवाद हं. खरंच, आदिसिद्धीची 'मैत्री ' कथाही भारी चाललीय. मीही वाचतच असते नेहमी. माबोवर तिच्या कथेचा पुढचा भाग पाहिला, की वाचल्याशिवाय चैनच पडत नाही.

Door deshat rahun Marathi Katha wachanachi Maja ani bhasheshi bhandun Rahane donhi jaamtay maayboli mule.>>>>> खरं आहे.

Pages