ब्युटी पार्लर- भाग 2

Submitted by द्वादशांगुला on 27 March, 2018 - 19:27

या आधीचा भाग वाचला नसल्यास खाली टिचकी मारा.
https://www.maayboli.com/node/65626

पूर्वभाग -
मग शिंदेंच्या 'साहेब, तुम्ही आराम करा' या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इ. नाईक आपल्या भूतकाळाच्या गर्तेत शिरले, ज्यात शिरणं त्यांनी कित्येक वर्षं टाळलं होतं, नव्हे त्या विचित्र भूतकाळातील आठवणींना मुद्दाम वाईट स्वप्न नाव देऊन ते आयुष्याच्या टप्प्यात पुढे सरकले होते ; पण भूतकाळाच्या जखमेची खपली कधीतरी निघायचीच होती....... जे आता गरजेचं होतं.....

आता पुढे-

●●●●●●●●●●●●●●●●●●●

इन्स्पेक्टर नाईक. जयंत नाईक. एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. पाहताच कोणालीही दरारा नि आदर वाटावा, अशी देहबोली. तरीही कोणाशी जास्त ओळख न करता नीट वागणारी व्यक्ती. सर्वांसाठीच ते आदर्श होते. आतापर्यंत त्यांनी बर्याच किचकट केसेस आपल्या हुशारीने सोडवल्या होत्या. त्यामुळेच हीही केस त्यांच्याच हातात सोपवण्यात आली होती. त्यांचं नाव खात्यात आदराने घेतलं जात होतं. एवढं असलं, तरीही त्यांच्या मनाला स्वतःबद्दल गर्व कधीच शिवला नव्हता. कधी खुशीत असताना चहा आणणार्या पोर्या - रघूच्याही पाठीवर थाप मारणारे. कोणी आजारी वगैरे असलं, की आस्थेने विचारपूस करणारे. असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं.

मात्र ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू होती. सर्वांच्या परिचयाची. पण म्हणतात ना, नाण्याच्या दोन बाजू असतात... त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच
एकटेपणाची , अस्वस्थपणाची, अपराधीपणाची किनार मिळाली होती ; त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वेळी आलेल्या विचित्र टप्प्यामुळे. त्या प्रसंगामुळेच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली होती. एकटेपणात तेच तेच प्रसंग त्यांना खायला उठत. कधी काय होईल हे त्यांना सांगता येत नव्हतं. स्वःतवर सुशिक्षितपणाची झालर चढवून या गोष्टीवर अविश्वास दाखवावा; की जे पाहीलंय, अनुभवलंय तेच सत्य मानून जगावं ; याचं उत्तर द्यायला त्यांची बुद्धी त्यांना अपुरी पडत होती.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज मीनाची मैत्रीण पूजा चौकीत येऊन गेली होती. त्यानंतर इन्स्पेक्टर नाईक घरी आले होते, ते विचांरांच्या गर्तेत बुडूनच. त्यांना काही सुचेनासं झालं होतं. आणि आश्चर्य म्हणजे ज्या कारणामुळे त्यांना अनपेक्षितरित्या त्यांना पोलिस ठाण्यात यावं लागलं होतं -- ती त्यांची बंद पडलेली किती प्रयत्न करूनही चालू न होणारी बाईक एकदा चावी फिरवताच सुरू झाली होती. पण इन्स्पेक्टर नाईकांचं याकडे लक्षच नव्हतं. ते आपल्या तंद्रीतच बाईकवर बसून निघाले. इकडे शिंदे त्यांच्याकडे आश्चर्याने बघतच राहीले.
"साहेबांना खरंच आरामाची गरज आहे. खूपच दगदग करतात ते. गाडी बंद पडली म्हणाले नि आता झटकन सुरू करून गेलेसुद्धा." असं पुटपुटतच ते आत गेले.

इन्स्पेक्टर नाईक विचार करतच घरी कसे पोहोचले त्यांनाच कळलं नाही. जणू ठरवल्याप्रमाणे हालचाली करत त्यांनी बाईकची चावी काढून ती खिशात टाकली, चालतच उजव्या बाजूच्या खिशातून घराची चावी काढली, यंत्रवतच त्यांनी दाराच्या कुलूपात चावी फिरवून दार उघडलं. आणि जणू शक्ती गेल्याप्रमाणेच ते सोफ्यावर बसले, नव्हे विसावलेच. ती स्वप्नं, ते चेहरे, ती विचित्र माणसं, ते भयानक प्रसंग ... त्याला कित्येक वर्षं उलटून गेली, तरी त्यांच्या अंगाला कापरं सुटलं होतं. त्यांचं मन त्यांना बजावत होतं, हे सारं पुन्हा सुरू झालंय. यातून आपली सुटका नाही. जेव्हा देशभरात ह्या घटना घडू लागल्या होत्या, तेव्हा त्यांच्या अंतर्मनाने त्यांना सुचवलं होतंच, की याचं नि आपल्या पूर्वायुष्यातील त्या प्रसंगांचं नातं आहे. पण त्यांनी हे सुरूवातीला उडवून लावलं होतं. पण आता कुठे ताळमेळ बसत होता. ते परत आपल्या पूर्वायुष्यातले ते प्रसंग आठवू लागले...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

(इन्स्पेक्टर नाईक )

हे सुरू झालं ते मी अठरा- एकोणीस वर्षांचा असताना. मी जन्मापासूनच रामगड या ना धड शहर, ना धड खेडे अशा नुकत्याच शहरीकरण चालू असलेल्या तालुक्याच्या गावात रहायचो. घरची परिस्थिती बरी होती, मुळात घरचे वातावरण मोकळे होते. अंधश्रद्धेला, थोतांडबाजीला विरोध करणारे होते. त्यामुळे साहजिकच मीही सत्यवादी बनलो. एक दिवस सहज मित्रांमध्ये गप्पा मारताना राजू बोलला, "मी ऐकलंय नदीजवळच्या स्मशानात एक बाबा आलाय. खूप शक्ती आहेत त्याच्याकडे असं मी ऐकलंय. "
यावर शक्यानेही मान डोलावली. तो म्हणाला, "रात्री साधना सुरू असतात म्हणे त्याच्या. जटावाला, दाढीवाला, काळे कपडे घालून असतो तो. माझा काका भरभराटीसाठी त्याला कालच काळ्या पिसांचा कोंबडा देऊन आलाय. बरीच लोकं कायकाय देतात त्याला त्यांची रखडलेली कामं पूर्ण करायला. "
यावर मुळात सत्यवादी असलेला मी ठामपणे बोललो, "हे सर्व थोतांड आहे. पक्की बुवाबाजी आहे ही. तो बाबा तिकडे आपल्या लोकांना काबूत करतोय. स्वतःचा फायदा करून घेतोय, दुसरं काही नाही. हे थांबवलं पाहिजे!"

यावर धूर्त शल्या बोलला पटकन, "ते समाजसेवेचं नंतर बघ, आधी मला त्या स्मशानात एकटा जाऊन दाखव." यावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. मी एकटा स्मशानात जायचा विचार करून चरकलो. नाही म्हटलं तरी तिथली जळती प्रेतं, मातीवर पसरलेली राख, तिथला तो घुसमटून टाकणारा वास, याचा विचार करूनच मळमळायला होत होतं. माझ्या चेहर्यावरचे भाव वाचून राजू बोलला, "काय रे फाटली का?" यावर त्यांचा एकच हशा पिकला नि मी यांना दाखवूनच द्यायचं ठरवलं. मी बोललो,"मी जाईन तिथे एकटा नि तुम्हाला तिथं काही नसतं, तो बाबा खोटा आहे, हे दाखवूनच देईन. कधी जाऊ मी तिथे सांगा. " यावर शल्या बोलला, "येत्या शुक्रवारी पौर्णिमा आहे. तू त्यादिवशी सगळीकडे सामसुम झाल्यावर जायचं नि तिथली कोणतीतरी वस्तू तू गेलेल्याची खूण म्हणून उचलून आणायची. काय? " यावर सगळे "हो, हो. " म्हणाले. मी किंचित चरकलो होतो. कारण स्मशानात जाण्याचा माझा काही अनुभव नव्हता. वर पौर्णिमेच्या रात्री म्हणजे.... मी स्वतःला समजावलं. मन घट्ट केलं नि त्यांना होकार भरला.

तो शुक्रवार अखेर उजाडलाच. मी संध्याकाळपासून गप्पगप्पच होतो. मी कसंबसं जेवण आटोपलं. 'झोप येतेय' , म्हणून लवकरच मी माझ्या खोलीत झोपायला गेलो. घरी सांगायचा प्रश्नच नव्हता. मी आत गेलो. काहीसं दडपण आलंच होतं. मी सगळी तयारी केली. एक प्लास्टिकची छोटी पिशवी खिशात कोंबली, तिकडून उचललेली खूण ठेवायला. एक छोटी टाॅर्चपण दुसर्या खिशात न विसरता टाकली आणि पलंगावर बसून सगळीकडे शांत होण्याची वाट पाहू लागलो. कारण जर मला कोणी एवढ्या रात्री स्मशानात जाताना पाहिलं असतं, तर माझी वाटच लागली असती. आज का कोण जाणे , पण दहा- अकराच्या सुमारासच सगळीकडे सामसुम झालं.

मी मनाला धीर देतच माझ्या खोलीच्या बाहेर पडलो. खिसे परत चाचपडून पाहिले, सगळं घेतलंय ना ते बघायला. मग मी दबक्या पावलांनी घराच्या मागच्या दाराकडे गेलो. हळूच कडी उघडली. बाहेर पडलो नि दार लावून घेतलं. बॅटरी खिशातून काढून ती चालू केली. मी चालू लागलो. आज पौर्णिमा असूनही बराच काळोख होता. पण माझं त्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. मी एका मधल्या वाटेने साडेदहाच्या सुमारास स्मशानात पोहोचलो. तिकडला धूपाचा , जाळल्याचा वास थेट आपल्यातल्या आत्म्याला थडकतोय, असं वाटत होतं. आसपास चिटपाखरूही नव्हतं. अशा या नको त्या वेळीच मित्रांनी सांगितलेले भुतांचे अनुभव आठवत होते. मी दबकतच स्मशानाच्या सीमेच्या जवळ आलो. इतक्यात माझ्याजवळची बॅटरी बंद पडली. मी मनोमन चरफडलो. पण आता एवढं येऊन मागे तर फिरायचंच नव्हतं.

मी इथे स्मशानात पहिल्यांदाच आलो होतो. त्या वातावरणावर एक अवकळा पसरली होती. आजूबाजूला बरीच पिंपळ, वड, चिंच अशी लावारिस वेडीवाकडी झाडं आपले हात पसरून उभी होती. त्यांच्यात कितीतरी बीभत्स, जबडा वासलेल्या , नाचर्या आकृत्या तयार होत होत्या. मी शिताफीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. स्मशानाच्या सीमेवर काटेरी कुंपणामध्ये प्रवेशाच्या दोन बाजूंना दोन उभ्या कमानी होत्या. मी त्या कमानींच्या बरोबर मधून जात होतो, इतक्यात त्या मुक्या सुन्न शांततेत टिटवीचा कर्कश आवाज घुमला नि मी अनपेक्षितपणे दचकलो. ती टिटवी माझ्या पाठच्या दिशेने भुर्रकन आली नि माझ्या अगदी कानाजवळून पुढे उडत गेली. मी परत दचकलो नि त्या उडत्या टिटवीवर माझी नजर गेली. माझ्या बरोबर समोर असलेल्या, थोड्या जास्त अंतरावर असलेल्या त्या अजस्र पिंपळाच्या झाडाच्या पानांत ती थोड्याच वेळात लुप्त झाली. माझं सहज लक्ष त्या झाडाच्या शेंड्यावर गेलं अन् मी आपादमस्तक चरकलो........... कारण त्या झाडाचा शेंडा जिथे संपत होता, त्याच्या बरोबर वर आकाशात चंद्राचं वर्तुळ होतं, ........ जे पूर्णपणे काळंठिक्कर पडलं होतं!!!!

म्हणजे आज चक्क खग्रास चंद्रग्रहण होतं! शल्यानं मला चांगलंच अटकवलं होतं! तरीच आज सगळीकडे लवकरच सामसुम झालं होतं आणि पौर्णिमा असूनही वाटेत काळोख होता. चांदण्याही कुठेतरी गुप्त झाल्या होत्या. आता स्मशानाच्या आतल्या अंगातून घनगंभीर मंत्रोच्चाराचा आवाज येत होता. मी जरा नजर बारीक करून बघितलं , एक हडकुळा, बारीक अंगयष्टीचा , काळी वस्त्रे परिधान केलेला माणूस होता तो. त्याच्या आजुबाजूला काळ्या सावल्या नाचत होत्या. तो एका पेटलेल्या धूनीसमोर बसला होता नि मध्ये त्यात काहीतरी एका हातभर लांब वस्तूने टाकत होता. मी नीट बघितलं, ते हाड होतं, बहुधा माणसाचंच!!! तरीही धीर करून मी आत पाऊल ठेवलं. मी ठरवलं, उगाच विषाची परीक्षा नको. इथे आसपासच जे काही मिळतंय, ते घेऊन मी परत जायचं ठरवलं. तिकडे बाजूलाच काहीतरी लालसर पडलं होतं. मी ते उचललं. ते ओलसर, मुलायम, धाग्यांसारखं जाणवत होतं. नि खिशातून पिशवी काढली. इतक्यात मला दटावणीयुक्त आवाज आला, "ए... काय करतोयस?" मी खूपच घाबरलो, नि मी धूम ठोकली. धावतच ती उचललेली गोष्ट पिशवीत टाकली. का, कशी कोण जाणे, पण त्या माणसाची विखारी नजर माझ्या पाठीला बोचत होती, मी गावाच्या वस्तीच्या भागात येईपर्यंत.

मला धावताना काट्या- दगडांचं भान नव्हतं. बस्स माझा जीव वाचवायचा होता मला. कसाबसा घरी पोहोचलो, मागल्या दाराने आत गेलो नि सरळ माझ्या खोलीत गेलो. दार लावून घेतलं नि गटागटा टेबलावरच्या जगमधून पाणी प्यायलो. तेव्हा कुठे बरं वाटलं मला. आता कुठे मला आसपासचं भान येत होतं. मी पाहिलं, पाण्याच्या पेल्याला बाहेरून गडद लाल रंग लागला होता. घाबरून माझ्या हातातून पेला सुटला नि 'टण्ण्' आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं, माझ्या तळहातांनाच लाल रंग लागला होता. मला काय ते समजलं. ती गोष्ट जी आपण उचलली तिला बहुदा पाण्यात कालवून शेंदूर लिंपलं असावं. मी ती पिशवी उघडली. त्यात केसांचं पुंजकं होतं. त्याला अर्थात ओलसर लाल रंग होता. मी ती पिशवी तशीच बंद कंली नि तिला एक गाठ मारली. पिशवी पेटीत लपवून ठेवली. मग मोरीत जाऊन खसखसून हात धुतले नि येऊन झोपलो. विचार करता करता कधी डुलकी लागली काही कळलंच नाही.

दुसर्या दिवशी मी उठलो. किंचित दमल्यासारखं वाटत होतं. काल आपण किती घाबरलो होतो, याचा विचार करूनच हसू फुटलं. मला माझ्या मित्रांना मी काल तिकडे यशस्वीपणे जाऊन आल्याचं सांगायचं होतं. मी ती पिशवी काढून खिशात घातली नि आमच्या ठरलेल्या जागी सकाळी गेलो. सर्वजण माझीच वाट बघत होते. मी घाबरून गेलोच नसेन, असंच त्यांना वाटत असावं. मी त्यांच्याजवळ गेलो नि त्यांना सारा वृत्तांत कथन केला, अर्थात मी घाबरल्याचं सोडून. पण जसजसं मी सांगत गेलो तसतसे त्यांच्या चेहर्यावरचे भाव बदलत गेले. ते घाबरल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. शल्या बोलला, "ती वस्तू दाखव आधी! " त्याच्या बोलण्यात विलक्षण भीती होती. मी पिशवी काढून तो केसांचा पुंजका त्यांना दाखवला. पण तो आता कालसारखा लाल राहिला नव्हता. तो काळपट लाल पडला होता. हे बघून राजू मोठ्याने बोलला, "जयत्या, त्या केसांवर रक्त लागलंय!!!"

माझ्या हातातून ती पिशवी खाली पडली. त्यातलं ते केसांचं पुंजकं बाहेर आलं नि वार्याने मातीत गोल गोल फिरू लागलं. किती भीतीदायक वाटत होतं ते. आम्ही सारेच चरकलो. शल्या बोलला , "म्हणजे तूच होतास तो!" "म्हणजे?", मी विचारलं.
यावर राजू बोलला,"अरे माझे बाबा सकाळीच सांगत होते, की तो बाबा जाम चिडलाय म्हणे. असा तसा नाय, कापलिक बाबा होता तो.... त्याच्या स्मशानसाधनेतली एक ....-काय ते- .... हां सीमांतखूण की काय चोरून नेली कुणी. हेच असावं ते. त्याच्याजवळच्या सैतानांकरवी म्हणे तो कालच्या ग्रहणाच्या दिवशी आपली शक्ती वाढवणार होता. पण बहुतेक तूच व्यत्यय आणल्याने ते पूर्ण झालं नाही. सकाळीच तो आपलं रामगड सोडून निघून गेलाय...."

मीही घाबरलोच होतो. पण थोडा विचार करून म्हणालो, "अरे गेला ना तो बाबा, म्हणजे संकटच गेलं ना रामगडवरचं. आता का घाबरायचं?" हे बहुतेकांना पटलेलं दिसलं. आता कुठे सर्वांच्या मनावरचा ताण कमी झाला होता. मला मात्र माझं मन सारखं बजावत होतं, जपून रहा!

दोन दिवस असेच गेले. माझ्या मनावरचा ताण बर्यापैकी उतरला होता. पण त्या दिवशीच्या रात्री मला ते स्वप्न पडलं. एक लालभडक डोळ्यांचा, डोक्यावर जटा असलेला, दाढी वाढवलेला, रागीट चेहर्याचा, काळी वस्त्रं परिधान केलेला एक बाबा मला म्हणाला, "तू हवा आहेस..... त्या कालभैरवाला, त्या कपालेश्वराला!" नि मी झटकन जागा झालो. थोडं पाणी प्यालो. पण झोपच येईना. सकाळी मला खूपच अशक्त वाटत होतं. अंग रसरसलं होतं. मला चटका बसेल एवढा ताप आला होता. आईने मग डाॅक्टरांना बोलवलं. औषधपाणी केलं. पण मला बरंच वाटे ना. पंधरा-एक दिवस उलटून गेले होते. लोक आता 'बाहेरची बाधा ' म्हणू लागले होते. पण मुळात नवमतवादी असलेल्या बाबांना हे पटत नव्हतं. माझी थोड्याच दिवसात पार रया गेली होती. माझं वजन घटलं होतं. सर्वांनाच माझी काळजी वाटत होती.

बरोबर 21 दिवसांनी रामनवमी होती. श्रीराम. विष्णूचा अवतार. त्याच दिवशी माझा एक दूरचा काका घरी आला. तो वैष्णवपंथाचा होता. त्याने सत्मार्गाने बरीच साधना केली होती असं मी बाबांकडून ऐकलं होतं. त्याचा चेहरा तेजस्वी, प्रेमळ होता. तो आल्या आल्या मला भेटला नि माझी विचारपूस केली. त्याला माझं आजारपण कसं कळलं कोण जाणे. त्याने माझ्या कपाळाला कसलीशी उदी लावली. हाताला भारलेला दोरा गुंडाळून बांधायला सुरूवात केली . यावर विश्वास न ठेवणारे आई-बाबाही काही बोलू शकले नाहीत. आपला मुलगा बरा व्हावा हीच इच्छा असावी त्यांची.

मग काका तो दोरा बांधतानाच मला ऐकू जाईल अशाच आवाजात पुटपुटला, "बाळा, तुझ्या हातून जे नकळत झालंय त्याचे परिणाम खूप वाईट आहेत. तो शैव पंथाचा साधू कापलिक होता नि त्याची अघोरी साधना चालू होती. माझी उदी आणि सूत तुझी रक्षा करेलच. पण जपून रहा. खास यासाठीच मी आलोय इथे."
आणि तो त्याच दिवशी निघून गेला. आणि आश्चर्य म्हणजे त्याच संध्याकाळी माझा ताप पूर्णपणे उतरला. दोनच दिवसांत मी पूर्ण बरा झालो. पण माझ्या वाचलेल्या जिवामुळे इतरांना बरंच भोगावं लागणार होतं, यापासून मी अनभिज्ञ होतो.

क्रमशः

-द्वादशांगुला
(जुई)

●●●●●●●●●●●●●●●●●●●

तळटीप-
ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच आहे गं हा पण भाग. इन्सपेक्टरांच पूर्वायुष्य समर्पक शब्दात मांडलयस.पुढच्या भागाची वाट बघतेय.

छान.
कथेत तुझ्या लेखनखुणा टाकल्या नाहीस. (Copyright)

मस्त,
इंटरेस्टिंग होत चालली आहे कथा

कथा उत्तम.. पुभाप्र Happy
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................>>>>
हे वाक्य खूप आवडतं मला Happy

मायबोलीला एक दमदार लेखिका भेटणारेय !!!
सहीये !>>>>+111111
अगदी मनातलं बोललात आनंद.
जुईने छानच लिहीलय.
Edited

बापरे सर्वांना धन्यवाद. मी काही दमदार- बिमदार लेखिका नाही हो.... लिहायला माझे हात शिवशिवतात, म्हणून लिहीत सुटते.

हा भाग काल रात्री 2.00 - 4.00 दरम्यान पूर्ण केला. एकतर भयानक कथानक, वर रूममध्ये एकटीच असलेल्या माझ्या समोरच मोठ्ठाला कपाटाचा आरसा!!! लिहीताना मध्येमध्ये दचकूनच त्यात बघत होते. या आरशाला भूत विषयाची जुनी परंपर आहे ;कारण दीदी एकदा त्यात 3दा 'ब्लडी मेरी' बोलली होती! तीच भीती उतरलीय कथानकात. Happy

हो गं नाव टाकायच राहीलय.ते लिही नाहीतर बिर्यानी व्हायची.>>>>>> शेवटी टाकलंय मी. आणखी कुठे घालू माझं नाव?

. इन्सपेक्टरांच पूर्वायुष्य समर्पक शब्दात मांडलयस.पुढच्या भागाची वाट बघतेय>>>>> संध्याकाळी बहुतेक बसेन लिहायला. जसा होईल लिहून तसा लगेच टाकेन.

यातील स्मशान शैली.>>>>>> ऋन्मेषदा स्मशानशैली म्हणजे?

काही सत्यं अर्धसत्यं असतात; ....... हेच सत्य आहे................>>>>
हे वाक्य खूप आवडतं मला >>>> धन्यवाद किल्ली! दीदीने बनवलेल्या, वरवर स्पंजसारख्या वाटणार्या ,पण आतून पोकळ निघालेल्या केकला पाहून सुचलेलं मला हे! Happy

दीदीने बनवलेल्या, वरवर स्पंजसारख्या वाटणार्या ,पण आतून पोकळ निघालेल्या केकला पाहून सुचलेलं मला हे! Happy>>>>>>>>>>>>>
अशक्य असता तुम्ही धाकट्या बहिणी !!! बिचारी दिदी !!
हे खरं आहे की कुठेही काहीही सुचू शकतं . खासकरून तुमच्या डोक्यात किडे असतील तर !!

अशक्य असता तुम्ही धाकट्या बहिणी !!! बिचारी दिदी !!>>>>>>> Lol

कुठेही काहीही सुचू शकतं . खासकरून तुमच्या डोक्यात किडे असतील तर !!>>>>>>> +11111111111111

हा भाग काल रात्री 2.00 - 4.00 दरम्यान पूर्ण केला.>>>>>> ए माझी बाय, हे असे रात्रीची जागुन बिगुन लिखाण करु नकोस. आधी तब्येत महत्वाची, नो जागरणे. बाकी तुझ्या लेखनाची मी फॅनोबा झालेय. लिहीत रहा, लय भारी!

माझी बाय, हे असे रात्रीची जागुन बिगुन लिखाण करु नकोस. >>>>>> जागून बिगून नाही हो... मी सुट्टीत माझा टाईम झोन बदललाय एवढाच... Lol रात्री शांत वाटतं, कोणी जागं नसतं, म्हणून चांगली लिंक लागते एवढंच. मग पहाटे झोपते ती थेट दुपार- संध्याकाळ दरम्यान उठते. आई काही बोलत नाही, याचा मला फायदाच झालाय. Lol

बाकी तुझ्या लेखनाची मी फॅनोबा झालेय. लिहीत रहा, लय भारी!>>>>>> खूप धन्यवाद.....

बाकी माझी काळजी आहे पाहून बरं वाटलं....

तुझ्या प्रतिक्रीयांच्या टाईम बघून अंदाज आलेला.>>>> Lol
बाकी आईची परमीशन असेल तर लगे रहो.>>>>>>> हो नक्कीच. आईचा काही प्रश्न नाही. तिनं माझ्यापुढे हात टेकलेत...... Lol

माझे आजोबा ज्यावेळी उठतात( पहाटे तीन वाजता) तेव्हा मी पुस्तकं आवरून झोपायला जात असते. पहिले काही दिवस तेही ओरडायचे पण 'ही काही सुधरणार नाही' हे लक्षात आल्यावर त्यांनी ओरडणं सोडून दिलय.

माझे आजोबा ज्यावेळी उठतात( पहाटे तीन वाजता) तेव्हा मी पुस्तकं आवरून झोपायला जात असते. पहिले काही दिवस तेही ओरडायचे पण 'ही काही सुधरणार नाही' हे लक्षात आल्यावर त्यांनी ओरडणं सोडून दिलय.>>>>>>> Lol मी शाळेच्या, परीक्षेच्या वेळेत जास्त जागरण नव्हते करत, पण आता काहीच रूटिन नसल्याने मजा येते.... Happy

धन्यवाद Happy
मी रोज ९ वाजता वाट पहायचो , की ताई आज पोस्ट करनार >>>>> बात कुछ हजम नही हुई.. नऊलाच का बरं?अन् ताई का म्हणालात बरं? म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहात की असंच उगाच? Happy

बाबांच्या अकाऊंट वरून लाॅग इन करणारे असाल तर सांगा. नाहीतर कन्फ्युज व्हायला होतं.
तळटीप:- परवा आलेल्या अनुभवावरून...

बाबांच्या अकाऊंट वरून लाॅग इन करणारे असाल तर सांगा. नाहीतर कन्फ्युज व्हायला होतं.
तळटीप:- परवा आलेल्या अनुभवावरून...>>>>>>> Lol हो पाहिलंय मी त्या धाग्यावर. म्हणून मीही त्यामुळेच विचारलं!

Pages