खुर्ची : ४

Submitted by किल्ली on 23 April, 2018 - 09:19

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
भाग ३ ची लिंक https://www.maayboli.com/node/65842
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कंपनीतील काम संपल्यानंतर शैलेशने गावात जाऊन कोणालातरी विचारावे ह्या हेतूने मोबाइलला मधली photo gallary उघडली. तो folder बघताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे पाहिले ते अविश्वसनीय होते....
सर्व छायाचित्रे गायब होऊन त्यांच्या जागी काही काळ्या रंगाच्या आकृत्या दिसत होत्या. अर्थहीन आणि विचित्र आकृत्या पाहुन शैलेशची पाचावर धारण बसली. आता बघतो ते खरं की काल रात्री पाहिलं ते खरं अशा संभ्रमात तो घरी परतला. आज त्याने ठरवलं होतं की रात्री जे घडेल ते सगळ्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचं आणि लगेच मेलवर attach करून एकमेकांना पाठवायचं. म्हणजे पुन्हा त्या images corrupt होणार नाहीत आणि झाल्या तरी बॅकअप राहील. त्याला जाणवत होतं की हा काहीतरी वेगळा आणि अमानवी प्रकार आहे, पण तरी तो स्वतःच्या समाधानासाठी शक्य ते पूर्ण प्रयत्न करणार होता. काल त्या भयाण प्रसंगातुन मिलिंदने म्हटलेल्या हनुमान चालिसेने वाचवलं होतं. त्यामुळे हनुमान चालिसेचं छोटं पुस्तक खिशात ठेवूनच शैलेश रूमवर आला होता. मयूर घाबरलेलाच होता. आज उशीरा घरी जायचं म्हणजे सगळे असतील असं ठरवून तो ऑफिस मध्ये थांबला होता. मिलींद गावात आधी ज्यांच्या कडे राहत होता त्यांच्याशी ह्या प्रकरणावर फोन वर बोलला आणि त्यांना त्या घराचा इतिहास विचारला. पण झालं असं की हे घर नवीन भागात असल्यामुळे त्यांना काहीही माहिती नव्हती. मिलींदने असंही ठरवलं होतं की, तो चहावाल्याला विचारू शकतो कारण चहावाला त्याच भागात टपरी लावायचा. पण आज टपरीही दिसत नव्हती. त्याने मयूरला सोबत घेतले आणि निराशा लपवत ते दोघे घरी परतले.
घरी येऊन पाहतात तर काय! शैलेश आरामात जणू काही घडलेच नाही अशा थाटात ‘त्या’ खुर्चीवर बसला होता.
"अरे शैलेश, उठ त्या खुर्चीवरून", मयूर करवादला. पण शैलेश ऐकताच नव्हता. इतर दोघे हाका मारून,गदागदा हलवून त्याला खुर्चीवरून बाजूला करत होते तरी तो ढिम्म बसून होता आणि भकासपणे गॅलरीत नजर लावून बघत होता. दोघांनाही ह्या शैलेशला खुर्चीतून कसे सोडवावे ते कळेनासं झालं होतं. मिलींदने पहिले की हनुमान चालिसेचं पुस्तक कोपऱ्यात पडलं होतं. त्याने ते उचलले आणि शैलेशच्या हातावर टेकवले. झटका लागल्यासारखा शैलेश खुर्चीवरून उठला.
प्रकरण तेवढं सोपं नाही हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. मयूर आणि शैलेश खूप जास्त घाबरले होते आणि मिलींद धीर देण्याचा प्रयत्न करत होता. तातडीने ही वास्तू सोडायला हवी ह्या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोचले होते. पण मिलींद चे असे म्हणणे होते की हनुमान चालीसा आपली रक्षा करत आहे. आपण तिचा ढाल म्हणून वापर करू आणि आज काय होते ते रेकॉर्ड करू. आजचा शेवटचा प्रयत्न. आज पुन्हा आपण काही करू शकलो नाही तर आहे त्या परिस्थितीत हे घर सोडू. त्या नक्षीचा अर्थ लावायचाच असे त्याच्या मनाने घेतले होते. त्याने हनुमान चालीसा पठण मनातल्या मनात सुरु ठेवले. पुस्तक दोघानाही दिले.
मिलिंद: “काहीही झालं तरी तुम्ही हे पुस्तक स्वतःपासून वेगळे ठेवू नका. जर वेगळे करायचेच असेल तर राम नामाचा जप सुरु ठेवा. हा नाममंत्रच आपलं रक्षण करत आहे. आपण त्या शक्तिला टक्कर देणार नाही आहोत. पण नेमकं काय आहे ह्याचा छडा लावण्यासाठी आपण आजचा दिवस प्रयत्न करू. मला माहित आहे आपण खूप सामान्य माणसं आहोत. पण मनाची शक्ती असे कठीण प्रसंग हाताळू शकते. त्यामुळे घाबरू नका. आज आपण सगळं रेकॉर्ड करू. मी गूगल वर वाचलं होत त्यानुसार अशा घटना थर्मल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करता येतात. मी तो कॅमेरा मागवला आहे आणि तो आज आपण वापरणार आहोत. नक्कीच आपल्याला सुगावा लागेल. आणखी एक गोष्ट. मला त्या टपरीवाल्याचा शोध लावायचा आहे. का कोण जाणे, पण तो काहीतरी मदत करू शकेल असं वाटत आहे.”
मयूर: "आपण खूप मोठा धोका पत्करत आहोत. आपल्यापैकी कुणालाच असा प्रसंग हाताळण्याचा अनुभव किंवा ज्ञान नाहीये. केवळ एक कॅमेरा आणि नामजप हे तोकडं पडेल. समजा जर आपण घाबरलो आणि नामजप करू शकलो नाही तर काय? त्या शक्तीने मनाचा ताबा घेतल्यानंतर आपलं स्वतःवर नियंत्रण राहणार नाही. माझं ऐका मित्रांनो, आपण आताच्या आता इथून निघू. रहस्यभेद वगैरे सगळं आज आपण वाचलो तर शक्य आहे मिल्या"
मिलिंद: ” मला थोडासातरी प्रयत्न करू द्या मित्रांनो. मी एक काम करतो, आता ह्या घरात काही सापडते का बघतो. रात्री १० वाजेपर्यन्त माझं काम चालू ठेवतो. काहीही झालं तरी आपण १० वाजता इथून निघू. मग मला यश येवो अथवा न येवो. माझी मनोदेवता सांगत आहे की आज काहीतरी उत्तर सापडेल म्हणून मी इतका आग्रह करत आहे.”
शैलेश: “जशी तुझी इच्छा. पण १०च्या ठोक्याला खाली जायचंच. आता आम्हीही तुला मदत करतो. आपण एकत्रच राहू. सगळ्या गोष्टी मिळूनच करू म्हणजे धीर येईल. खरे तर आम्ही घाबरलो आहोत. पण तुझा आत्मविश्वास बघून तुला मदत करण्याची इच्छा होत आहे. न जाणो आपल्या ह्या प्रयत्नामुळे ही वास्तू मुक्त झाली तर.“
मयूर: “एक मात्र नक्की आहे की, जे काही अभद्र आहे त्याचं मूळ खुर्चीच्या सभोवती रेंगाळताना आढळलं. त्यामुळे त्या दिशेने शोध घेऊया.”
शैलेश: “बरोबर बोललास तू, चला एकएक कप्पा चेक करूया. जुनं furniture आहे , त्यात आधी बघू”
ह्या चर्चेनंतर प्रत्येकजण कामाला लागला. वातावरण अजून तरी नॉर्मल होतं. थर्मल कॅमेरा मिलिंदने चालू करून खुर्चीच्या जवळ ठेवला होता. इतक्यात लाईट गेले. मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या उजेडात शोधकार्य करताना मुलांनी आतल्या खोलीतलं जुनं लाकडी कपाट उघडलं. त्याच्या एका कप्प्यात काही कागद आणि फोटो अल्बम सापडला. जास्तीच्या मेणबत्त्या आणि मोबाइल टॉर्च वापरून नीट वाचता येईल म्हणून सगळे बाहेरच्या खोलीत आले. त्यांनी तो कागद उघडला, ती त्या घराची कायदेशीर कागदपत्रांची विस्कळीत फाईल होती. त्यावर तर काही विशेष सापडलं नाही. मग अल्बम उघडण्यात आला. त्यात काही निसर्ग चित्रे आणि artwork चे फोटो होते. अल्बमची पानं उलटत असताना तिसऱ्या पानावरचा फोटो पाहाताच मयूर जोरात किंचाळला. इतर दोघेही तो फोटो पाहून हबकले होते.
अचानक सगळ्या मेणबत्त्या विझल्या आणि सगळीकडे मिट्ट काळोख पसरला. अल्बम उघडल्या गेल्याच्या क्षणापासून वातावरण बदललं होतं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार पसरला होता. टॉर्च चालत नव्हता. मेणबत्त्या टिकत नव्हत्या. हळूहळू धुराचा वास पसरायला लागला.
सगळी उर्जेवर चालणारी उपकरणे बंद असताना खोलीतला छतावरचा पंखा मात्र गरगर फिरत होता…………………………………
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users