खुर्ची : 2

Submitted by किल्ली on 11 April, 2018 - 02:57

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढे काय होणार हे माहित असलेला तो टपरीवाला चहा देणारा मात्र भयाण रीतीने फ्लॅट कडे बघून हसत होता !!!!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जेवणानंतर सगळ्यांनीच थोडीशी ताणून दिली. थोड्या वेळाने पसाऱ्याची आवराआवर करताना मिलींद म्हणाला, "वा यार, भारी जेवण झालंय. खानावळ असल्यामुळे आधीच्या रूम मध्ये जेवणाचा काही प्रॉब्लेम नव्हता. इथे मात्र उद्यापासून स्वतः शिजवून खायचं आहे, आहे ना लक्षात !! कधी तरी ,सुट्टीच्या दिवशी, गावात जाऊया जेवायला पण रोज आपआपल्या टर्न नुसार स्वयंपाक करायचा ."
"हो रे आधीच ठरलं आहे आपलं, आता पकवू नको. संध्याकाळ झालीये चक्कर मारून येऊ समुद्रावर, इथला सुर्यास्त बघण्यासारखा असतो असं ऐकलंय. आपला नेहमीचा टपरीवरचा चहावाला सुट्टीच्या दिवशी किनाऱ्यावर गाडी लावतो, आज त्याच्याकडे भेळ, चहा, कॉफी, मॅगी आणि इतर स्नॅक्स मिळतील . त्यामुळे रात्री येताना तिकडेच थोडंसं चटरफटर खाऊन येऊ." असं शैलेश म्हणाला तेव्हा त्याची ही कल्पना सगळ्यानांच पटली आणि भटकंती करायला पोरं घराबाहेर पडली
मयूर: "अरे हे काय, ही लिफ्ट बंद आहे"
मिलींद: "लाईट गेले असतील "
मयूर: "अरे नाही, आहेत लाईट तो बघ तिकडे दिवा"
मिलींद: "आता सोड ना, उतरायचं तर आहे आपल्याला, चल मूड खराब करू नको"
असं म्हणून सगळे खाली उतरले.
मयूर :"अरे शैलेश तू कुठे होतास? "
शैलेश: "मी लिफ्ट ने आलो "
मयूर:"अरे पण ती बंद आहे "
शैलेश: "काय बोलतोस !! कुछ भी "
मयूर:"हो , म्हणजे तू आमच्यासोबत उतरला नाहीस असं तुला म्हणायचं आहे का "
शैलेश: "अर्थात!"
मयूर :"पण तू होतास, आम्ही बोलत होतो तुझ्याशी, ए मिल्या सांग ना ह्याला !"
शैलेश: "अरे खरंच सांगतो, मी मोबाईल विसरलो म्हणून परत आत गेलो आणि घेऊन आलो. मग मी तुमच्याबरोबर कसा असेन?"
मिलींद: “बास करा ना आता, आधी इथून निघूया. नसत्या शंका कुशंका काढून आजची सुट्टीची संध्याकाळ वाया नका घालवू यार, एकतर आधीच फ्लॅट मध्ये गुदमरायला होत होतं म्हणून बाहेर आलो भटकायला तर तुम्ही गावातल्या लोकांसारखं बोअर करत आहात. लेट्स गो!”
मयूर:”ठीके चल”
गप्पा मारत आणि हसत खिदळत सगळे किनाऱ्यावर आले. चहाटपरीवाला तिथे होताच. आज त्याचा व्यवसायात चांगला फायदा होत होता . त्यांच्याकडे पाहात चहाटपरीवाला भयाण हसला. त्याचे ते हसणे मयूर ने पाहिले आणि त्याच्या काळजात भीतीची एक लहर दाटून गेली पण त्याने दुर्लक्ष केले.
मनसोक्त भटकून झाल्यावर खाण्यासाठी कंपू टपरीकडे वळला. तिथे चटपटीत भेळ आणि इतर पदार्थ पोटभर हादडून पोरांनी मोर्चा घराकडे वळवला. एव्हाना अंधार पडला होता आणि सगळीकडे सामसूम झाली होती.
शैलेश: “तो टपरीवाला विचित्रच आहे ना जरा”
मयूर: “हो बे, माझ्याकडे चेटकिणीकडे बघितल्यासारखे डोळे करून पाहत होता आणि काय ते त्याचे प्रश्न! म्हणे घरात आधीची आराम खुर्ची आहे का, बसु नका त्यावर नाहीतर त्याची मजा येईल. आम्ही खुर्चीवर बसू नाहीतर भांगडा करू. ह्याला का करायच्या आहेत आगाऊ चौकशा आणि कोणाला मजा येईल विचारलं तर फिदीफिदी हसला. मी सांगतो आपल्या घराबद्दल लोकांना फारच कुतूहल आहे. खासकरून त्या आरामखुर्चीबद्दल! पण काहीही म्हणा ती खुर्ची मस्त आहे रे! एकदम आरामदायक आणि भारी झोप लागते त्यावर मी आल्याबरोबरच थोडा वेळ पहुडलो होतो. नंतर तुम्ही सगळे झोपला होतात तेव्हाही मी त्यावर बसून छान कॉफी घेतली, एक कविताही लिहिली! आपल्या बाल्कनीतुन दिसणाऱ्या निसर्गाची कमाल !! रूम वर गेल्यावर ऐकवतो. मला तर असं वाटत आहे की माझा निद्रानाशाचा त्रास आता कायमचा संपेल.”
"ती खुर्ची वापरलीस तर तूच कायमचा संपशील बेटा, राहू नका त्या घरात. एका माझं "
अचानक कोणीतरी मागून येऊन म्हणाला.
शैलेश: "काय हो काका, घाबरावलंत ना. हे आपले चौकीदार काका, आपल्या इमारतीत खालच्या बाजूला राहतात. पण काका असं का म्हणत आहात?"
"नाही बोलणार, मी नाही बोलणार" असं म्हणत काका आले तसे निघून गेले.
मिलींद “काय यार किती अंधश्रद्धाळु लोक असतात एकेक. काकांचं पण वय झालाय आता. इकडे तिकडे लक्ष देऊ नका गाईझ, गावात अशा अफवा आणि समजुती असतातच. मी आधी गावात राहत होतो तेव्हा असं ऐकलं आहे, काही होत नाही.चला पाय उचला पटपट. झोप येत आहे. उद्या सकाळी उठून ऑफिसला जायचंय.”
सगळे गंभीर झाले होते. मिलींदच्या बोलण्याला रुकार देऊन शांततेत सगळे घरी परतले, अंथरुणं घातली आणि झोपायला गेले. लवकरच पोरांना गाढ झोप लागली. मध्यरात्र होत आली होती.
बरोबर १ वाजता घड्याळाने ठोका वाजवला. काहीतरी जळाल्यासारखा वास सगळीकडे पसरु लागला होता. वातावरण पाहता पाहता काळ्या धुराने भरून गेले.
कुणीतरी आवळून धरलंय अशी तीव्र भावना असह्य झाल्यामुळे मयूर किंचाळत उठला. आजूबाजूचं अभद्र, अमंगल वातावरण पाहून त्याची बोबडीच वळली. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. बाकीच्यांना हलवून जागं करण्याचा तो प्रयत्न करत होता. घड्याळ ठोक्याचं नसूनही त्याने ठोका का वाजवला ह्या प्रश्नानं त्याची भीती अजून वाढवली.
मनात त्याने देवाचा धावा सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण कसल्यातरी नकारात्मक शक्तीने मन ताब्यात घेतलं होतं आणि देवाचं नावही धड घेता येत नव्हतं. हाताला आत्यंतिक वेदना जाणवली तसे त्यांनी पाहिलं तर त्याचे दोन्ही हात………………………………………………………………………………………………………………………………..

हातांची अशी अवस्था बघून तो मनातल्या मनात आक्रोश करायला लागला.एका भयाण नाट्याची सुरुवात झाली होती आणि कमकुवत मनाचा मयूर खुर्चीचा पहिला बळी ठरला होता !!
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह !!!
पुढच्या भागाची उत्सुकता लागलेय

So nice

So nice