नृशंसतेचा कडेलोट!

Submitted by अँड. हरिदास on 15 April, 2018 - 06:40

rape.jpg
नृशंसतेचा कडेलोट!

'मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. नुकतेच कठुआ आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्कारांच्या घटना उघडकीस आल्या. एका आठ वर्षाच्या चिमुरडीवर आठ जणांनी अत्याचार करत तिची दगडाने ठेचून नृशंस हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत एका १६ वर्षांच्या तरुणीवर भाजपाच्या आमदाराने व त्यांच्या बगलबच्च्यांनी अत्याचार केला. ’अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच. मात्र या घटनांनाही धर्माचा रंग देऊन राजकारण करण्यात आले. बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी झुंडशाही रस्त्यावर उतरली तर दुसरीकडे अत्याचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी सरसावलेले दिसले. माणूसपण,माणुसकी आणि संवेदना स्वार्थी राजकारणासमोर थिट्या पडत असल्याचे समोर येत असल्याने आज माणसाला खरंच 'माणूसपण' ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. हे विधान वाचून कुणालाही हे वाटेल की, आज शंभर टक्के माणसातील माणूसपण हरविले नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. अर्थात, हे सत्य आहेच.. समाजातील फार थोडेच लोक विकृत प्रवृत्तीचे कृत्य करतात, मात्र त्या विकृतीवर दुर्लक्षितपणाची भूमिका घेऊन केवळ धर्माच्या आणि राजकारणाच्या नावाखाली त्या कृत्याला समर्थन करणाऱ्यांना काय म्हणावं? आपल्याला काय त्याचे, अशी मानसिकता ठेवून गैरकृत्याकडे डोळेझाक करणाऱ्यांच्या माणूसपणावरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

जम्मू व काश्मीर राज्यातल्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या आसिफाचे आठ नराधमांनी अपहरण केले. तिला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार करण्यात आला. बलात्कार करणार्याची वृत्ती इतकी नीच होती कि मंदिर परिसरातच या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची बाहेर वाच्यता होऊ नये म्हणून आसिफाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. जानेवारीत घडलेल्या या घटनेला दडपण्यासाठी आटोकाट पर्यंत झाले. मात्र अखेर बिंग फुटले आणि आरोपींचे अमानुष कृत्य जगासमोर आले. सर्वसामान्यांचा संताप पाहून सरकारला या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी लागली. मात्र यालाही धर्माच्या राजकारणाचा रंग देण्यात आला. आरोपीविरोधात चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांची एक झुंडशाही भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आली. न्यायालयासमोर घोषणा देण्यात आल्या. 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेचे अक्षरशः धिंडवडे काढण्यात आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर कायदे निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते लोकप्रतिनिधी,कायद्यांचे रक्षणकर्ता ज्यांना संबोधले जाते ते उच्चशिक्षित वकील सुद्धा या झुंडशाहीचा एक भाग होते. वास्तविक राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून अशा घटनांकडे बघायला हवे, मात्र हा सामंजश्यपणा ना राजकारण्यांना दाखविता आला ना नागरिकांना..

माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना आहे उत्तर प्रदेशातली. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केले, तेंव्हा गुंडगिरी आणि हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या यूपीत आता ‘रामराज्य’च अवतरणार, असं चित्र उभे करण्यात आले होते. मात्र त्यातील फोलपणा उन्नावच्या घटनेने समोर आणला आहे. उन्नाव गावातील एक १६ वर्षीय मुलीवर उन्नावचेच भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.पीडितेवरील अत्याचाराबद्दल दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या वडिलांना आमदाराचा भाऊ आणि त्याच्या काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या वेळी पोलिस निव्वळ बघ्याच्या भूमिकेत होते. या मारहाणीची तक्रार त्यांनी करताच या गुंडांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी तिची तत्परतेने दखल घेत ‘पीडित’व्यक्तीलाच ‘आरोपी’ केले. अमानुष मारहाणीमुळे झालेल्या जखमांत संसर्ग होऊन ते कोठडीत मृत्युमुखी पडले.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही आपले म्हणणे कोणी ऐकत नाही हे पाहून तरुणीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला तेव्हा देशातल्या सर्व मीडियाचे तिच्याकडे लक्ष गेले.लोकदबाव आणि न्यायालयाच्या आदेशामुळे आमदाराविरोधात अनेक दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला, पण या आमदारांना अटक करण्यासाठी पोलीस गेले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आमदारांचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. इतकेच नाही तर योगी आदित्यनाथ यांचे सरकार सेंगर यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आढळले. त्यामुळे ऊत्तर प्रदेशात फक्त “गुंडगिरी’चा ‘रंग’ बदलला असल्याचे सत्य समोर आले.

जम्मू मधील घटना असो कि उत्तर प्रदेशातील दोन्ही घटनांमध्ये रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या डोक्यात सत्तेचा उन्माद घुसला असल्याचे दिसून आले. बलात्कारासारखे अमानवीय कृत्य करणारे नराधम राक्षसी वृत्तीचे आहेतच..त्यांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहेच. मात्र कुठल्याही नीती-नियमाची पर्वा न करता बलात्कारासारख्या जधन्य आरोपातील आरोपींच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणारी झुंडशाही मनोवृत्तीही अत्यंत घातक म्हणावी लागेल. दिल्लीतील निभर्या प्रकरणानंतर संपूर्ण देश एकदिलाने निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी उभा ठाकला होता. परंतु आज कठुआ आणि उन्नाव घटनेचे राजकारण केले जात आहे. सत्ताधारी, प्रशासन या सर्वांच्याच भूमिका संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. माणसाचा स्वार्थ आज माणुसकी धर्मापेक्षा वरचढ ठरू लागला असून त्याला आता कायद्याचाही धाक उरला नसल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे. अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचं सामाजिक स्वस्थ बिघडविणारा नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा नराधम जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच त्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारा किंव्हा त्याचं समर्थन करणारा गट देखील सामाजिक स्वास्थासाठी हानिकारक असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आणखी एक बातमी आली आहे. गुजरात मध्ये 9 वर्षाच्या एका चिमुरडीवर अनेक दिवस बलात्कार आणि खून. आटोपसी मध्ये 86 जखमा सापडल्या आहेत Sad

<<अपराधीक कृत्य करणारा नराधम जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच त्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारा किंव्हा त्याचं समर्थन करणारा गट देखील सामाजिक स्वास्थासाठी हानिकारक असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही. >>
------- सहमत.... सर्व प्रकार धक्कादायक आणि माणुसकीला घृणास्पद वाटाव्या अशा आहेत.

भयानक आहे हे. ती बातमी वाचवेना अक्षरशः. तमाम माणुसकीवरचाच विश्वास उडावा अशी घटना.
केवळ त्या लहान मुलीचा अमुक धर्म म्हणून तमूक धर्माच्या लोकांना हे कृत्य समर्थनीय वाटणे आणि पुन्हा जे घडले ते सो कॉल्ड धार्मिक पवित्र स्थळी !! वा रे वा! धर्म आणि देव या संकल्पनांना कुठे नेऊन ठेवलंय आपण?!

निषेध करायला शब्द सापडत नाही. सामान्य लोकांचा रागही वांझोटा आहे.
ह्या अशा घटनांत सहभागी गुन्हेगार, तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे आणि ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालणारे राजकारणी आणि सामान्य लोकंही ह्यांना हत्तीच्या पायी देणं किंवा सौदीत दिल्या जाणार्‍या कडक शिक्षा वगैरे शिक्षा मला अतिशय योग्य वाटतात.

कडक शिक्षा वगैरे गोष्टी कायद्याचे राज्य असते तेव्हा इथे माणूसकीला काळीमा फासणारे गुन्हे तर घडल्यानंतरची टाईमलाईन पहाता कायदा सर्वांसाठी समान नाही हेच पुन्हा अधोरेखीत झाले. अशा परीस्थितीत कागदोपत्री कायदे केले तरी काय फरक पडणार आहे? तुमची तक्रारच नोंदली गेली नाही तर न्याय कुठे मिळणार? या नृशंस गुन्ह्यानंतर गुन्हेगारांना पाठीशी घालायचे जे प्रयत्न झाले ते पाहून फार हताश वाटत आहे. कदाचित जनक्षोभ बघता राजकीय खेळी म्हणून कडक कायदे होतीलही पण त्यामुळे ग्राउंड रिअ‍ॅलिटी बदलणार नाही.

कडक शिक्षा वगैरे गोष्टी कायद्याचे राज्य असते तेव्हा
>>>>
सहमत आहे. असे काही कडक कायदे झाले तर सामान्य आणि निष्पाप माणसे आणखी चिरडली जातील..

निषेध करावा तितका कमीच..
बलात्कारापेक्षा जास्त भिती या दडपणारयांच्या वृत्तीची वाटते ..

अतिशय घृणास्पद कृत्य . उलट्या काळजाची माणसं (?)
माणसं पण म्हणवत नाही . जनावरं आहेत हे लोकं . एका लहान मुलीवर अत्याचार करताना लाज कशी वाटली नाही? आणि त्या गुंडाचं समर्थन करायला मोर्चे ??? कसले भिकार लोकं आहेत !

याहून निर्लज्जपणा म्हणजे आता सोशल मीडियावर अत्याचार झालेच नाहीत, आधीच असिफा मेली होती , तिचे नातेवाईकांच कृत्य आहेत असे संदेश फिरू लागलेत . कुठून येते ही सडकी मनोवृत्ती Angry

असिफाला श्रद्धांजली. काय लिहावे हेच कळत नाही. पण या नराधमांना फक्त आणी फक्त वखवखलेल्या कुत्रांच्या वा लांडग्यांच्या तावडीत द्यावे, जे सात- आठ दिवस उपाशी आहेत. मग यांना कळेल की आपण कसे मनुष्यरुपी पिसाळलेले लांडगे आहोत.

या गुन्हेगारांना व त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्व लोकांचा, आणी भाजपाचा निषेध ! उन्नाव, कठुआ, दिल्ली व सुरत येथील सर्व नराधमांना फाशी द्यावी नाहीतर वर लिहीले आहे तसे करावे.

अक्षरशः वाचवत नाहीत ह्या बातम्या!

एका लहान मुलीवर अत्याचार करताना लाज कशी वाटली नाही? आणि त्या गुंडाचं समर्थन करायला मोर्चे ??? कसले भिकार लोकं आहेत ! >>> खरच ! काय बोलावं कळत नाही.

भयानक आहे.
आणि त्याचे समर्थन कर णारे लोक असावेत हे अजूनच भयानक!
तुम्ही गुन्हेगाराचा (हा श ब्द फार बुळबु ळीत आहे , जे झालं त्यासाठी) धर्म बघून त्याला सपोर्ट कर णार! Disgusting.

असा गुन्हा झालाच नाही, झालाच असल्यास विरोधकांचीच चाल वगैरे पोस्ट फिरू लागल्यात.
तसेच मिडिया विकली गेली आहे. निवडकच दाखवते. अमुकतमुक बातम्या कधी बाहेरच येत नाही असाही एक सूर आहे.
मला आजवर समजले नाही मिडीया नक्की कोणाला विकली गेली आहे. प्रत्येक जण एकदुसरयाकडे बोट दाखवतेय.
मागेही मी एक धागा काढलेला. खरी बातमी तटस्थ नजरेतून मिळवायची असेल तर सोर्स काय. हल्ली काही कळेनासेच झालेय.
फेसबूकवर तर असे काही घडले तर जाणे नकोसे वाटते. लोकं ज्या पक्षाचा झेण्डा घेऊन फिरतात त्यांना निर्दोष सिद्ध करणे ईतकाच त्यांचा अजेंडा असतो. त्या बाजूची बातमी कुठूनतरी मिळाली की तीच खरी या थाटात शेअर करत वल्गना केल्या जातात. ईतरवेळी दोन्हीकडच्या मित्रांना खुश करायला प्रत्येक पोस्ट लाईक करतो. पण अश्यावेळी मात्र चीड येते..

कोण्या एका काळी या भूतलावर राक्षस राहत असल्याची आख्यायिका आहे. त्यांची प्रजाती पुन्हा पृथ्वी वर अवतरल्याचे हे उदाहरण आहे. आशा नराधमांना भर चौकात ठेचून मारलं पाहिजे.

असिफाला श्रद्धांजली. काय लिहावे हेच कळत नाही. पण या नराधमांना फक्त आणी फक्त वखवखलेल्या कुत्रांच्या वा लांडग्यांच्या तावडीत द्यावे, जे सात- आठ दिवस उपाशी आहेत. मग यांना कळेल की आपण कसे मनुष्यरुपी पिसाळलेले लांडगे आहोत.

या गुन्हेगारांना व त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्व लोकांचा, आणी भाजपाचा निषेध ! उन्नाव, कठुआ, दिल्ली व सुरत येथील सर्व नराधमांना फाशी द्यावी नाहीतर वर लिहीले आहे तसे करावे.
+1111

या गुन्हेगारांना व त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्व लोकांचा, आणी भाजपाचा निषेध ! उन्नाव, कठुआ, दिल्ली व सुरत येथील सर्व नराधमांना फाशी द्यावी नाहीतर वर लिहीले आहे तसे करावे.
+1111
>>सहमत.. अब की बार नाही नारी पे वार चे घोषणा करणाऱ्यांचेही निषेध

कोण्या एका काळी या भूतलावर राक्षस राहत असल्याची आख्यायिका आहे. त्यांची प्रजाती पुन्हा पृथ्वी वर अवतरल्याचे हे उदाहरण आहे. >>> राक्षसांनाही लाजवतील अशी प्रजाती आहे ही. अशा गुन्हांतल्या दोषींसाठी फाशीच्या शिक्षा फारच सौम्य आहे. यांना विकलांग करुन समाजात कोठेही तोंड दाखवता येवू नये अशाप्रकारे जिवंत ठेवण्याची तरतूद कायद्यात हवी. बलात्कारासारखी आयुष्यभर जाळणारी पीडा देणार्याला फाशी म्हणजे आयुष्यातून मुक्ती देण्यासारखे आहे.

ह्या सर्व चर्चेवर मला माजी पंतप्रधान श्री.अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आठवते
उठो द्रौपदी वस्र सँभालो |अब गोविंद नआयेगे। कब तक आस लगाओगीतुम | बिकी हुई अख़बारो से
कैसी रक्षा मांग रही हो तुम| दुःशासन दरबारोसे स्वयम जो लज्जाहीन पढ़े है|वै क्या लाज बचाएंगे
कलतक केवल अंधा राजा |अब गूंगा बहेरा भी है |
ओठ सील दिये जनता के| कानों पर पहरा भी
तुम कहो ये अश्रु तुम्हारे |किसको क्या समजायगे

गेला आठवडाभर सगळे लाज वाटली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे वगैरे वगैरे ओरडताहेत. कोणाला लाज वाटली पाहिजे? निर्भया झाल्यानंतर असे वाटले होते की ही तर नृशंसतेची नीचतम पायरी. अत्याचारांचे डोळ्यांसमोर इतके भयानक चित्र उभे राहिले की अख्खा देश ढवळला गेला, वाटले यानंतर कुणा स्त्रीवर हा प्रसंग येणार नाही. ते वाटणे काही दिवसातच धुळीला मिळाले. निर्भयावर जे अत्याचार झाले त्यापेक्षाही खालच्या पायरीवर जाऊन अत्याचार करण्यात आले. कोणाला लाज वाटली तेव्हा? कसला देश ढवळून निघाला? काल पर्वा गुजरातेत सेम असिफाची पुनरावृत्ती झाल्याची बातमी वाचली. ते करणाऱ्यांना लाज नव्हती वाटली? त्यांनीही निर्भया, तिच्यानंतरच्या शेकडो व लेटेस्ट असिफा प्रकरण ऐकले असणार, त्यांनीही फेसबुकवर जावून लाज वाटली पाहिजे लिहिले असणार व नंतर संधी मिळताच स्वतःही तेच केले असणार. निर्भया नंतर जसे देशभरात मेणबत्ती मोर्चे निघाले तसे आताही निघाताहेत. त्या सगळ्यांचे मत अर्थातच 'लाज वाटायलाच हवी' हे आहे.. मग निदान मोर्चात सामील झालेल्या पुरुषांपासून तरी स्त्रिया सुरक्षित झाल्या असणार म्हणायला हवे. कारण लाज वाटायला हवी असे वाटणाऱ्यानी स्वतः चे वर्तन इतरांना लाजवेल असे न करण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. तसे होतेय का? नाही. कारण या देशातले पुरुष आता कुठल्याही कायद्याला घाबरत नाहीत. कितीही कडक कायदे केले व कितीही नृशंस गुन्हे केले तरी त्यातून वाचवणारे वकील त्यांना मिळतील, त्यांनी गुन्हा केलाय हे ढळढळीत दिसत असतानाही त्यांना शिक्षा होऊ नये यासाठी जीवाचे रान करणारे समर्थक त्यांना मिळणार, मेणबत्ती मोर्चासोबत हेही मोर्चे निघणार, चुकून एखाद्याचा गुन्हा सिध्द झालाच तरी शिक्षेची अंमलबजावणी शक्य तितकी लांबणीवर टाकण्यात त्यांना यश येणार. असे गुन्हेगार लोक उजळ माथ्याने समाजात हिंडत राहणार, त्यांच्या आयुष्यात काहीही पडणार नाही, त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही, उलट जितका पैसा/सत्ता त्यांच्या हातात असणार तितके पायचाटू त्यांच्याभिवती गोळा होणार, हे पायचाटू 'होता है होता है' म्हणून स्वार्थासाठी यांच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणार. मात्र एखादी अभागीनी त्यांच्या तावडीतून जिवंत राहिलीच तर तिला बाहेर तोंड दाखवणे हा समाज कठीण करणार.

निर्भयाचे गुन्हेगार अजून सुप्रीम कोर्टात आहेत, तिथून ते राष्ट्रपतींकडे जातील दयेचा अर्ज घेऊन. त्यात अजून 5 वर्षे जातील. तोवर तिचे आईबाबा जिवंतपणी मरण यातना भोगत राहतील. फास्ट ट्रॅक कोर्टाचा हा निकाल!

कितीही कडक कायदे करा, कडक शिक्षा करा, मुलींना ज्यूडो कराटे शिकवा, काहीही उपयोग नाही. समाजाला कधीही काहीही वाटले नव्हते. निषेध, काळ्या फिती, लाज वाटणे वगैरे सगळे वरवरचे आहे. जेव्हा संधी मिळते तेव्हा हे सगळे बासणात बांधून ठेवले जाते.

साधना सहमत. बाकी काय लिहीणार?

जे लोक फेसबुक वर आहेत त्यांनी आप पार्टीच्या कपिल मिश्राच्या फेसबुक पेज वर जाऊन पहावे. लहान बालक व बालिका यांना जशी जात धर्म नसतो, तसाच तो नराधमांना पण नसतो. मी वर लिहीलेच आहे, तसे कुणीही मंत्री संत्री, आमदार - खासदार, साधु- फकीर जर कोणत्याही नीच कृत्यात सामिल असतील तर त्यांना फाशीच द्या. पण आजकाल दोन्ही धर्माचे लोक एकमेकांवर इतके तुटुन पडलेत बस्स!

निर्भयाच्या वेळी कोणीही बलात्काऱ्यांचं समर्थन केलं नव्हतं. त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल होऊ नये म्हणून मोर्चे काढले नव्हते. बलात्कार झालाच नाही, मंदिरात झालाच नाही, रोहिग्यांनीच केला असेल अशी पाठराखण केली नव्हती. पंतप्रधानांनी प्रतिक्रिया द्यायची टाळाटाळ केली नव्हती.

भक्तांना कितीही अडचणीचे वाटले तरी सत्ताधारी भाजपाने नीच पणाचे नवीन रेकॉर्ड स्थापन केले आहे. सरळ निषेध करण्यापेक्षा साळसूदपणे व्हॉट अबाउटरी करण्यात भक्त मग्न आहेत.

लोकांचे मेंदू इतके धुतले गेलेत की आपल्या आजूबाजूला असणारी एरवी सर्वसामान्य वागणारी माणसं अशा किळसवाण्या गुन्ह्यांचं trivialization करताहेत Angry

अश्या बातम्या वाचून सुन्न व्हायला होते.
फक्त फाशीची शिक्षा खरेच खूप कमी आहे. हालहाल करत जिवंत ठेवले पाहिजे अश्या नराधमांना जेणेकरून दुसर्‍या कोणाची असे काही करायची हिम्मतच नाही झाली पाहिजे.

आठ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर सामूहिक बलात्कार होतो, तिचा अमानुष छळ करून तिचा खून केला जातो हि घटना खरं तर संपूर्ण मानव जातीला काळिमा फासणारीच... माणसाच्या 'माणुसपणावरच' हा बलात्कार..कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल इतकी ही भयंकर घटना. आपल्या मुलींचं भवितव्य काय ह्या जाणिवेने देशातील करोडो पालक किती अस्वस्थ झाले असतील याची कल्पनाही या घटनेनंतर करवत नाही. त्यामुळे गुन्हेगार नराधमांना विना विलंब अटक करून लवकरात लवकर फासावरच चढवायला हवं याविषयी दुमत असू नये. मात्र सध्या सोशल मीडियावर या विषयावरून जे राजकारण केलं जातंय ते घृणास्पद आणि चिड आणणारं आहे. संपूर्णतः मीडिया आणि सोशल मीडिया याला जबाबदार आहे. बलात्कार झालेल्या महिलेची कोणतीही ओळख दिली जात नाही. तिची जात, तिचा धर्म जाहीर केला जाऊ नये। बहुतेक वेळा हे पाळलं जातही परंतु त्या निरागस मुलीचे फोटो आणि नावासह तिचं राहण्याचं ठिकाण आणि तिचा पोट जातीसह धर्म देण्यामागचं प्रयोजन काय असावं ?हे न उलगडणार कोंढ आहे.
ती निरागस मुलगी देशाची सुपुत्री होती. तीच्या जागी कोणत्याही जाती धर्माची, अगदी पाकिस्तानी मुलगी असती तरी माणूस म्हणून आपल्या भावना तितक्याच तीव्र असायला हव्यात...

या धाग्यावर सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या संवेदना म्हणजे अजूनही माणसातील माणूस जिवंत असल्याचं प्रतीक आहे..
कविवर्य ना धो महानोर म्हणतात
"कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रु माणसाचे माणसाला.."
याप्रमाणे माणसाच्या दुःखाला माणुसकीचे अश्रू देणाऱ्या तमाम संवेदनशिल मान्यवरांचे आभार.. माणसातील माणूसपण जगविण्यासाठी आणि आणि माणसाला माणसात आणण्यासाठी प्रयत्नरत राहूया..!

। त्या निरागस जीवाला न्याय मिळायलाच हवा। खरे गुन्हेगार कोणीही असोत त्यांना भयंकर शिक्षा हि मिळायलाच हवी

खूप डिप्रेसींग वाटते हे सगळे... कुठे चाललेय जग? किती ही क्रुरता भरलीये सगळीकडे? ते व्हॉट्सअ‍ॅप वर फेबु वर फिरणारे व्हिडीओ बघून जीव दडपतोय. माणुस खरंच पशू होत चालला आहे. Sad काय बोलावे तेच समजत नाही.

Pages