जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_6

Submitted by अन्नू on 11 April, 2018 - 10:32

मुलींचा माझ्याशी ‘क्रश’ म्हणून जास्त असा संबंध आला नाही. आला तो अगदीच मोजक्या मुलींच्या बाबतीत आला. तुल्लू ही त्यातलीच एक. दुसरी- जेव्हा मी ‘एफ.वाय.जे.सी’ च्या सुट्टीत बोरिवलीला सेल्स एजेंट म्हणून काम करत होतो तेव्हाचा.

काही कामानिमित्त गोरेगावला गेलेलो असताना रात्री परतायला उशीर झाला. म्हणजे जवळजवळ अकराच वाजले होते. त्यावेळी एक मुलगी स्टेशनवर आली होती. आता तो प्लॅटफॉर्म, जागा, ठिकाण, मला काही-काही आठवत नाही. आठवतात ते फक्त तीचे डोळे!

हो, कारण ती पुर्णपणे काळ्या बुरख्याआड होती. आश्चर्य वाटेल, पण ती कशी दिसते हेही मला माहीत नव्हते. तोंडाभोवती घेतलेल्या तिच्या, काळ्या कपड्यांच्या दोन पडद्यांमधून दिसणारे डोळे मात्र कमालीचे सुंदर होते. आजतागायत असे डोळे मी कधी पाहिले नाही. अनुभवले नाही. खरंच- जगातलं सगळं सौंदर्य त्या इवल्याश्या दोन डोळ्यांत जणू तीनं एकवटून ठेवलं होतं. ते डोळे नव्हते ते एक जग होतं, एका वेगळ्याच स्वर्गातून अवतरलेलं. एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार!

काही क्षण तिला बघून माझं नियंत्रण सुटल्यासारखं झालं होतं. नाही म्हटलं तरी नजर आपोआप तिच्याकडे खेचली जायची. डोळ्यांत गुंतायची. मी स्वत:ला हरवून तिच्यात वहावला जायचो!
असं कितीतरी उशीर चाललं. त्या नादात ट्रेन पकडायचंही भान मला राहिलं नव्हतं..

कमाल असते ना!
प्रत्येक मुलीमध्ये 'ती'चे असे खास गुण असतात आणि या गुणांवरच मुलं फिदा असतात. कोणाचे डोळे बोलके असतात. कुणाचे ओठ आकर्षक असतात. कोणाचे केस मोहक असतात. कोणाचे फेसिंग, तर कोणाची अदा मारक असते. काल-परवापर्यंत माझेही हेच मत होते. पण एका मुलीने मात्र माझी सगळी गणितं चूकीची करुन टाकली!
आजही मी तीच्यात नक्की काय पाहिलं असा प्रश्न मला वारंवार पडतो आणि मनाच्या स्क्रिनवर निल(NIL) असंच उत्तर येतं...

भाईंदर वेस्टचं ‘कंप्युटर स्टेशन’
अगदी नावाजलेलं म्हणता येणार नाही पण तिथे फिज जरा बर्‍या वाटल्या म्हणून मी तिथे अ‍ॅडमिशन घेतलं.
शिकवणीच्या पहिल्या- एक दोन दिवशी त्यांनी आमची बेसिक करवून घेतली आणि नंतर आम्हाला एका वेगवेगळ्या चालू बॅचमध्ये ढकलून देण्यात आलं.

काही कळत नसेल तर हटून पुढे बसायचं हा माझा दहावीपासूनचा मंत्र, मी इथेही आजमावला आणि शिक्षिकेच्या पुढच्या रो’त अगदी मधोमध आम्ही जागा फिक्स केली! नवखे असल्याने कंप्युटरचा ग चा म कळत नव्हता. त्यामुळे नस्त्या शंका (आणि त्या फक्त मलाच का पडत होत्या कुणास ठाऊक!) निर्माण होत होत्या. मग त्या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या डाव्या बाजुला, एल च्या आकारात दिसणार्‍या टॅबच्या असोत, रुलवर दिसणार्‍या मापट्याच्या आकाराच्या असोत, की राईट साईडला दिसणार्‍या छोट्याशा रुलर व्हिवरच्या असो. मी ते बिनधास्त विचारायचो. आणि समोरच्या शिकवणारीला आणखीनच भंजाळून सोडायचो! कदाचित त्यामुळेच हळूहळू शिकवणीची मॅडम माझ्यावर खार खाऊन असायची. कॉलेजमध्ये असणार्‍या लेक्चर सारखेच इथेही एम् एस् ऑफिस, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, टॅली आणि नेटवर्कींग याला वेगवेगळे शिक्षक होते.

त्या बॅचमध्ये माझा दुसरा दिवस होता. पुढे (खार खाऊ) मॅडम शिकवत होत्या. इतक्यात काचेवर हलकीशी टकटक झाली आणि मॅडमची परमिशन घेऊन एक मुलगी आत आली. खांद्यावरची बॅग काढत माझ्या डाव्या बाजुच्या चेअरवर बसली. मॅडमनं लगेच नोट्स लिहायला सांगितल्या. आम्ही सगळेजण त्या वहीवर खरडायला लागलो. मधेच माझ्या लक्षात आलं- बाजुची मुलगी माझ्याच वहीत बघून लिहीतेय!

बोंबला!
आमचं इंग्लिश एकतर भयानक होतं. व्हेरिअस(various) ला आम्ही व्हेरी अस (very us) असं लिहित होतो! तर तीला काय दाखवायचं? डोंबल?
मनात उगीच दडपण वगैरे यायला लागलं. मी वहीवर आडवा हात धरत झरझर लिहायला लागलो. बिचारीची निराशा झाली असावी. तीने मॅडमला पुन्हा एकदा मागची ओळ रिपिट करायला लावली. मॅडमनं तीला ओळ परत वाचून दाखवली. यावेळी तीने शेजारणीच्या वहीत बघत आणि मॅडम सांगत असलेले शब्द जोडत पटापट लाईन पुर्ण केली. थोड्या वेळानं मॅडमचा अत्याचाराचा वेळ संपला आणि आपल्या जाडजुड चार पुस्तकांचं ओझं (ही बया का वागवत होती कुणास ठाऊक, येत तर काही नव्हतं!) सावरत ती बाहेर गेली.

बाजुला बसलेल्या मुलीनेही मग शेजारणीची वही घेत तीच्या उरलेल्या रिकाम्या जागा भरल्या. वही परत देताना तीनं तीला काहीतरी विचारलं. शेजारणीनं नकार देत मान डोलावली. निराशेनं चुकचुकत तीनं वही बंद केली. सहज तीचं माझ्याकडे लक्ष गेलं.

“तुंम्ही काल ट्युटोरिअलला होता?” माझ्याकडे वळत तीनं विचारलं.

“अ?- हो” हुश्शार विद्यार्थ्यासारखी कॉलर ताठ करत मी उद्गरलो.

“मला तुमची वही द्याल?- मला कालचे नोट्स लिहायचे आहेत!” धप्पकन बरोबर पार्शभागावर आपटावं असा चेहरा झाला माझा. (बन अजुन हुश्शार!)

“ह्यॅ.. हॅ!!...” मी कसंनुसं हसत तीच्याकडे बघितलं.

“माझं अक्षर बरोबर नाही”

“चालेल मी लिहीन”

माझ्या डोळ्यांसमोर माझ्याच इंग्लिशचे भयानक शब्द माझ्यावर खदाखदा हसत अन् मला वाकुल्या दाखवत ब्रेक डान्स करायला लागले..

“नको!!” झटकन वही दाबत मी उद्गरलो

“का?”

“म्-माझ्या स्पेलिंग मिस्टेक्स खुप आहेत. आणि मध्ये-मध्ये लिहायचंही राहून गेलंय” केविलवाणे भाव चेहर्‍यावर आणत मी- तीला दिसूच शकणार नाही अशा पद्धतीने फाड्फाड् पानं पलटत नोट्स दाखवल्या.
चुचकारत तीने मागे नजर टाकली. मागे बसलेल्या दुसर्‍या एका मुलीला तीनं विचारलं. तीनं होकारार्थी मान डोलवत तीला, आपली वही देऊ केली आणि माझा जीव भांड्यात पडला!

“मी उद्या देते हा!” वही चाळत तीने तीची वही आपल्या बॅगेत कोंबली. मला उगीच माझ्या भूतकालीन वहीची आठवण आली आणि मी चटकन तीच्या तोंडाकडे नजर टाकली.

‘छे-छे! ही नाही अशी करणार’ तीच्या डोळ्यांवरच्या टीपिकल काकुबाई चश्म्याकडे बघत मी स्वत:शीच पुटपुटलो. नेमक्या त्याच वेळी तीनं माझ्याकडे बघितलं.

“न्यू अ‍ॅडमिशन का?”

“अ?- हो, कालच आलो”

ती गोड हसली. आणि मला पहिल्यांदाच तिच्या चेहर्‍यात ‘बिच्छु’ तल्या रानी मुखर्जीचा हलकासा भास झाला! म्हणजे-
आय डोन्ट नो पण..
तिची चेहेरेपट्टी आणि ती ओठ दाबून गालात हसण्याची लकब त्याच प्रकारची होती!

“***” तीने हात पुढे करत आपलं नाव सांगितलं. (अह्ं- इथे मी तीचं नाव सांगणार नाही. कारण.. कळेलच पुढे)

मीही नाव सांगत अगदी मित्रासारखा तीच्याशी शेकहँड करायला हात पुढे केला, तर बयेनं माझी पुढची जेमतेम तीनच बोटं- तीही अगदी टोकं- तेही टच होतील न होतील अशीच हातात (की पुढच्या बोटांत) घेत शेकहॅन्ड (होता?) केला!
पहिल्या भेटीतच मला संकोचल्यासारखं झालं आणि तीचा रागही आला. इतकीच सिलेक्टीव्ह आहेस तर मग हात तरी कशाला पुढे करायचा? नुसतं हाय म्हणून नाव सांगितलं असतं तरी चाललं असतं की! आणि नसतं सांगितलं तरी कोणाचं काय जाणार होतं!

“काय करता?”

“आत्ताच टीवायची एग्झाम दिली” मीही तितक्याच फॉर्मली उत्तर दिलं.

“हाssS..आ?!! कोणत्या कॉलेजमधून?”

“एस एन”

“एस एन?” तीनं चमकून माझ्याकडे बघितलं, “अय्या खरं?- मी पण एस एनलाच आहे!”

“हो?” मी उगीच आश्चर्य वगैरे वाटल्याचा अविर्भाव केला- (निदान मुलींसमोर तसं दाखवण्याची पद्धत असते, नाहीतर मुली भावनाशून्य, खडूस, आखडू वगैरे उपमा लावून मोकळ्या होतात)

“कोणत्या क्लासला?”

“एफवाय बीकॉम”

“एफवाय् बीकॉम? पण मी तुम्हाला कधी बघितलं नाही कॉलेजमध्ये. म्हणजे, मी तीन वर्ष तिथे होतो. आमच्या बाजुलाच कॉमर्सचे क्लासही आहेत. तिथे कधी तुंम्ही दिसला नाहीत ते”

“हो कारण मी नव्हते नं तिथे, आत्ता जाणारै”

“म्हणजे?”

“म्हणजे, तुम्ही जशी आत्ता टीवायची एग्झाम दिलेय ना? तशीच मी आत्ता.. ट्वेल्थची दिलेय!
आता निकाल लागेल. त्यानंतर मी या जूनपासून एफवायबीकॉमला जाणार- सिनिअरला!”

“तरीसुद्धा टीवायला असताना तरी तुंम्ही एकदातरी दिसायला हव्या होतात की!”

“अहो पण मी ज्युनिअरला होते नं- ट्वेल्थला! आमचं ज्युनिअरचं कॉलेज दुपारचं असतं. तुमचं सकाळचं! तुंम्ही जायचा त्यावेळी आमचं कॉलेज भरायचं, मग कसं दिसणार?” ती मला समजावून सांगत बोलली.

“तुम्ही लायब्रेरीमध्ये आला होतात का कधी?” काहीसं आठवत मी म्हणालो.

“हो, बर्‍याच वेळा”

“मग तरी मी तुम्हाला दिसलो नाही? उशीरपर्यंत मी लायब्रेरितच असायचो! लायब्रेरीच्या मिस तर आंम्हाला चांगलं ओळखतात”

“हो?” तीनं ओठ मुडपत मान डोलावली.

“चॅक्! माहीत नाही, कधी बघितलंच नाही”

नाक उडवत ती म्हणाली. (हीला नाक होतं?)

बस्स!
त्या दिवसात झालेलं आमचं एवढंच संभाषण! त्यानंतर ती काही बोलली नाही. मी काही विचारलं नाही. क्लास सुटल्यावर आम्ही प्रॅक्टीकलसाठी क्लासरुमच्या बाहेर आलो. काही वेळासाठी तीही होती. पुन्हा ती कधी गेली काहीच समजलं नाही. दुसर्‍या दिवशी पुन्हा गैरहजर!

“वो लडकी नही आयी आज?” माझ्या बाजुला बसलेल्या कृष्णाला मी विचारलं.

“कौन?”

“अरे वो कल मेरे बाजु में नही क्या बैठी थी, वो!”

“अच्छा, वो हिरोईन!”

“हिरोईन?” मी चमकलो. दुसरा मुलगाही यावर मान डोलवत हसायला लागला. त्यांच्या रिअ‍ॅक्शनवरुन ते तीच्याकडे फारसं लक्ष देत नसावेत असं वाटलं.

“अरे, वो अपने क्लासकी हिरोईन है! फिकर मत कर- आ जाएगी”

‘यांना काय दुसरी हिरोईन भेटली नाही का? आणि क्लासची हिरोईन होण्यासारखं तीनं काय एवढं केलं? का तिच्या बेबीडॉलसारख्या दिसणार्‍या लुक आणि कपड्यांमुळे ते असे बोलत होते?’

डोक्यात उगीच किडा वळवळला. इतक्यात क्लासरुममध्ये सर आले आणि त्यावेळेपुरता तीचा विचार मी तिथेच सोडून दिला. पुढच्या दिवशी ती अगदी वेळेवर क्लासमध्ये हजर झाली. चेअरवर बसता-बसता माझ्याकडे बघून ओळखीचं गोडसं हसली. मग बॅगेतली एक वही मांडीवर घेत तीने बॅग पायाजवळ ठेवली अन् चेअरची फळी पुढयात आडवी करत आपल्या सह-मैत्रीणींशी छानशी गप्पा मारण्यात गुंग झाली.

“तुम्ही राहायला कुठे असता?” मध्येच लेक्चर संपताच तीने माझ्याकडे बघून प्रश्न विचारला आणि मी तिच्याकडे आचंब्याने पाहायला लागलो! (या बयेला दुसरी शिकवणी संपल्यानंतर बोलायला सुचलं का?)

“इथेच भाईंदर ईस्टला”

“होss?! ईस्टला कुठे?”

“हे आपलं.. जेसल पार्क आहे ना- त्याच्या बाजुला”

“इथून चालत जाता ना रोज?” (मग काय उडत जाऊ?) काय पण काय विचारतेय ही? वेस्टवरुन ईस्टला- इथल्या इथे रेल्वेचा ब्रिज पार करुन चालत जाणार की, त्यासाठी रिक्षा थेट गोल्डन नेस्टला वळसा घालून नेणार?

“हो” मी संयम राखत उद्गरलो

“माझ्याबरोबर याल?”

“....”

“संध्याकाळचं एकट्यानं जाण्यापेक्षा कंपनी भेटेल, म्हणून विचारतेय”

“ठिक आहे. प्रॅक्टीकलनंतर निघू” मी खांदे उडवत म्हणालो.

तीसर्‍या लेक्चरनंतर आमचं प्रॅक्टीकल सुरु झालं. सगळ्यांनी धडाधड बाहेरच्या हॉलमधल्या कंप्युटरवर उड्या घेतल्या. ही मात्र आरामात डुलत-डुलत बाहेर आली आणि मग बसली एवढंस तोंड करुन इकडे-तिकडे बघत! तीच्यासाठी एकही कंप्युटर उरला नव्हता. शेवटी माझ्या बाजुचा बंद कंप्युटवर चालू करुन देत, सरांनी तीला तिथे बसायला लावले.
चेअरवर बसताच तीने एका हाताने ओढणी सावरत, दुसर्‍या हातात वही पकडली. आणि जी बटनाची खटखट चालू केली ती-

ही फाईल खोल- ती फाईल खोल- कर बंद!
स्टार्ट- माय कंप्युटर- ई ड्राईव्ह- ओके- क्लोज!
राईट क्लिक- न्यु फोल्डर- ओके!
सिलेक्ट- राईट क्लिक्- रिनेम- एन्टर!
राईट क्लीक- डिलिट- क्लिक्- क्लिक्!!
अक्षरश: सहाव्या मिनिटाला बया कंप्युटरच्या चेअरवरुन बाजुला होऊन थेट माझ्याकडे वळून बसली होती!

“झालं तुमचं? निघूया?” घड्याळात बघत ती मला म्हणाली.

“तुमची प्रॅक्टीस?”

“झाली”

“झाली??” मी चिरक्या आवाजात विचारलं. पाच पॉईंट्सची प्रॅक्टीकल हिनं पाच मिनिटांत केली?

“इतक्या लवकर?”

“हो!” ती तितक्याच सहजतेने उद्गरली.

काही न बोलता मी आपलं वहीत बघत गपगुमानं प्रॅक्टीस करु लागलो. थोडा वेळ तीनं वाट पाहिली. मग मात्र तीची (न थांबणारी) चुळबूळ सुरु झाली.

“झालं?” कससंच तोंड करत ती पुन्हा उद्गरली “लवकर करा न- उशीर होतोय मला” माझ्याकडे बघत ती चुटपुटत म्हणाली. (या पोरींना असं करायला मीच का भेटतो?)

थोड्या वेळानं मलाच वाईट वाटलं. बिचारीला लवकर घरी जायचं असेल आणि आपण आपल्यासाठी तीला अडकवून ठेवत आहोत.
आपण काय कधीही गेलं तरी चालतं. पण ती मुलगी आहे, अंधार पडताना कशी जाणार? विचार करुन मग मी पटापट प्रॅक्टीकल आवरतं घेतलं. एकुलती एक गोल्डन वही दुमडून हातात घेतली आणि तिच्याबरोबर क्लासच्या बाहेर पडलो.

“इथून जाऊ या” उजवीकडे हात करत तीने सुचवलं “या ब्रीजला गर्दी कमी असते”

‘चालेल’ अशा अर्थी मान डोलवत मी तीच्या मागे चालू लागलो.

बस! त्यानंतर उजव्या बाजुला वळल्यानंतर तीने जो फोन कानाला लावला; तो आम्ही रस्ता तुडवून, ब्रीज क्रॉस करुन, स्टेशनरोड संपवून, पार नवघर रोड येईपर्यंत तीच्या कानाला चिकटून होता! मी जणू तिच्या दृष्टीने गायबच होतो.

‘हायला गरज तुला आहे की मला?’

मी रागाने तिच्याकडे बघितलं तर ती- ‘मी इकडून जाते’ अशा अर्थी हात दाखवत नवघर रोडवरुन पुढे गेलीसुद्धा! मी केलेल्या हातालाही तीने बघितल्या न बघितल्यासारखे केले.

अस्सा राग आला त्यावेळी..!
दुसर्‍या दिवशी अगदी ठरवून ठेवलं. हीच्याबरोबर जायचंच नाही. काय फायदा जाऊन? ही तर चकार शब्द काढणार नाही. फक्त फोनला चिकटून राहणार. आपण मात्र पक्ष्यांना भिती दाखवण्यासाठी रानात उभ्या केलेल्या एखाद्या बुजगावण्यासारखं हिच्याबरोबर चालत राहायचं! त्यापेक्षा जायलाच नको. तर पुन्हा संध्याकाळी बया टेबलासमोर हजर!

“व्हायचं आहे तुमचं?”

हळूच खाली झुकून माझ्या चेहर्‍याकडे केविलवाणे पाहत तीनं विचारलं.

“हो!” मी रुक्षपणे बोललो आणि तिच्याकडे बघण्याचे कष्टही न घेता रागाने कंप्युटरवर खटाखटा बटणं दाबत आपली प्रॅक्टीस करत राहीलो...
============================================================
क्रमशः
भाग=>> 7

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users