जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_7

Submitted by अन्नू on 17 April, 2018 - 12:49

वास्तविक तीने जायला हवं होतं, पण ती गेली नाही.
मी इतकं तुसडेपणाने ‘हो’ म्हणूनदेखील ती न जाता निमुटपणे माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. आणि टूकूर-टूकूर आपली क्लासरुम न्याहाळू लागली. कधी प्रॅक्टीस करणार्‍यांकडे तर कधी घरी जाणार्‍या स्टुडंटकडे एवढंसं तोंड करुन बघू लागली. मध्येच समोर बसलेल्या मुलामुलींच्या थट्टा मस्करीकडे बघून स्वत:शीच जणू केविलवाणी हसू लागली. तिच्या त्या प्रकाराकडे बघून मला कसंसंच झालं. प्रॅक्टीकलवरचं लक्षच उडालं आणि पुन्हा एकदा आमच्या मनाने कच खाल्ली!

पावणे सात वाजत आले होते. बाहेर बर्‍यापैकी अंधार पडायला लागला होता. रस्त्यावर दिवेलागणी झाली होती.. आज लेक्चर उशीरा संपल्याने सगळ्यांना जायला उशीर झाला होता. काहींनी तर प्रॅक्टीस न करता- ‘उद्या येतो’ म्हणत सरळ घरचा रस्ता धरला होता. मी मात्र आजची प्रॅक्टीस आजच करायची म्हणून थांबलो होतो तर ही बाय बसली माझीच वाट बघत!
आता काय?

“चला” विंडो क्लोज करत मी गपगुमानं उठलो-

बाहेर येताच तीने पहिल्यांदाच माझ्याशी बोलायला सुरवात केली (चक्क!)
ऐन वेळी काही वाटलं नसतं. पण यावेळी तिच्या बोलण्याने जरा बरं वाटलं. मीही तितक्याच मोकळेपणाने तिच्याशी गप्पा मारल्या. ब्रीज आल्यावर पुन्हा तीच ‘फोन’ चाप्टर सुरु झाला!
ठरल्याप्रमाणे नवघररोडला तीने जाण्याची खुण केली आणि ती निघून गेली.

त्या दिवसानंतर रोजचीच ती रुटीन पडली. लेक्चर संपल्यावर वीस पंचवीस मिनिटं प्रॅक्टीस की नंतर तीच्याबरोबर घरी.
या वेळेत आमच्यात बोलणं असं काही होत नव्हतंच. रोजचाच तीचा तो फोन चालू असायचा. आणि मी रस्ता, माणसं, स्टेशन, दुकानं असा परिसर नव्यानं न्याहाळत तिच्याबरोबर चालत असायचो! एखाद-दुसर्‍या वेळी ती फोनवर बोलताना मला खुणेनंच काहीतरी बोलायची तेवढंच.
एकदा तीने चालताना मध्येच माझ्याकडे बघत ‘सुंदर’ असं अर्थी बोटं केली-

“काय?” मी काहीच न कळून तिला विचारलं. तर तीने रस्त्यापलिकडे असलेल्या लालचुटूक बोरं अन् चिंचांकडे बोट करत माझं लक्ष तिकडे वेधलं.

“मला खुप आवडतात, मस्त लागतात नै” ती (तिथल्या-तिथेच) फोन बाजुला करत हळू आवाजात म्हणाली.

“बरं” मी म्हणस्तोवर ही दहा पावलं पुढे!

पण असं क्वचितच व्हायचं. ऐन वेळी ती फक्त फोनमध्ये गुंग असायची. इतकी की तीला आजुबाजुच्या गाड्यांचंही भान नसायचं. त्यामुळे माझ्या नाकी नऊ यायचं!
तीच्याबरोबर कुठून आणि कसं चालावं हेच समजायचं नाही. डाव्या बाजुनं चालावं तर ही गाड्यांच्या मधूनच चालायला लागायची. बरं मित्र असता तर त्याला हाताला धरुन माझ्या बाजुनं तरी चालायला लावला असता. तीला कसं हाताला धरुन आपल्याकडे ओढणार?
तसंच- उजव्या बाजुनं चालावं तर रिक्षा अशा घासून जायच्या की, तीच्या एक पाऊल मागे राहूनच मला चालायला लागायचं. त्यात ही शहाणी अशी की, पुढून कोणी आलं तर, ती त्याला आतल्या बाजुला वाट करुन पुढे जायची. म्हणजे तीला आतून चालता यावं या गडबडीत आम्हीच रस्त्याच्या मधोमध आलेले असायचो!

ती कोणाबरोबर बोलते हे रहस्य तीने मला दुसर्‍या हफ्त्यात सांगितलं. तो फोन तीच्या बॉयफ्रेंडचा होता. त्याच्याशी ती रोज क्लासमध्ये येता-जाता बोलत असायची. काय बोलायची कुणास ठाऊक, पण बोलायची. आता सकाळी विधीला गरम पाणी घेतलं की गार, इथपासून जरी सुरु केलं तरी अर्ध्यातासात आमचं दिवसभराचं बोलणं संपतं. मग हीचंच कुठचं एवढं गुर्‍हाळ चाललेलं असायचं काय माहित!
याबाबतीत मितालीलाही मी एकदा कॉलेजमध्ये विचारलं होतं की-

“हे प्रेम करणारे एवढे काय बोलत असतात गं? आम्हाला इथे एक मिनिट बोलायचं म्हटलं तरी काय बोलायचं असा प्रश्न पडतो आणि हे नुसते नॉनस्टॉप सुटतात!”

त्यावर तीनं हसून उत्तर दिलं होतं, “काहीही”

“काहीही काय? मला तर अस्सा वैताग येतो अशा बडबडीचा-”

“प्रेमात होतं रे असं- खुप काही बोलावसं वाटतं. आणि मुख्य म्हणजे, ते बोलणं कधी संपतच नाही. मीही अगोदर तुझ्यासारखाच विचार करायचे. पण आता मीच सुनिलबरोबर तासंन्-तास बोलत असते”

“पण बोलता काय नेमकं? अन् तेही रोज?”

“विशेष.. असं काही नाही, नेहमीचंच आपलं! पण प्रेम करणार्‍यांच्या बाबतीत तेच खुप सुंदर असतं- तुला आत्ता नाही कळायचं, प्रेम झालं की कळेल बरोबर!”

तीनं सांगितलं होतं. पण मला त्यावेळीही समजलं नव्हतं आणि आत्ताही कळत नव्हतं की- ही लोकं उगीच का बॅलन्स उडवत असतील?
एक मिनिट धरला तरी दीड रुपया! या दीड रुपयात काय-काय करता येईल? छानपैकी एक इक्लेअर चॉकलेट घेता येईल!
मग असाच अर्ध्या तासाचा हिशोब लावला तर किती चॉकलेट येतील? चॉकलेट कसले चांगलं पाव किलो चिकन येईल चिकन! नाहीतर मग एक चायनीज सुप!!
पोट तरी भरेल. बोलण्यानं काय होणार? कप्पाळ!
छे! पण ही लोकं अशा व्यवहाराच्या बाबतीत निव्वळ ‘ढ’!

ती रोजची काय बोलायची ते मी जवळून चालत असूनही कधी ऐकलं नाही आणि ते ऐकून घेण्यात माझा इंटरेस्टही नव्हता. मुळात तिच्याबरोबर सोबत जायचं या पलिकडे मी तीच्यात कधी स्वारस्थ घेतलं नव्हतं. आणि घ्यावं अशी ती दिसायलाही नव्हती.

रंगाने गव्हाळ म्हणजे अगदीच काळी- सावळी.
पावडर लावत असेल-नसेल, माहीत नाही. पण क्लासमध्ये येईपर्यंत ती पावडरही तीच्या तोंडावर टिकलेली नसायची. लिपस्टीक नाही. सेंट नाही. कधी कुठल्या मेकअपच थर नाही. साधी बिंदीही कपाळावर लावायची नाही. गळा मोकळा. हात मोकळे. डाव्या हातात तेवढं एक रिस्टवॉचनामक इवलंसं घड्याळ. कानात कानाबरोबर असलेली छोटी दोन फुलं आणि नाकात- डाव्या साईडला नाकाबरोबरच लावलेली इवलीशी गोल नथ!
बस्स!

हाच काय तो तीचा रोजचा लुक. त्यात केसही असे कुरळे की त्याला हेअरस्टाईल नावाची चीजच माहीत नसेल! त्यामुळे ते कुरळे केस ती तशीच मागे घेऊन साध्यापणेच एका क्लिपमध्ये बंदीस्त करुन टाकत होती. या सर्वात भर म्हणजे तीचा तो- वरुन काळ्या कडा असलेला विचित्रसा नंबराचा चश्मा!

आता अशा मुलीकडे का आणि कशाला कोणी अट्रॅक्ट होईल?
अर्थात, आमच्या बाबतीत आम्ही तीची घरापर्यंत कंपनी मान्य केली होती. त्यामुळे ती कशीही दिसत असली तरी एक क्लासमेट म्हणून आम्ही तीच्याबरोबर जात होतो. एवढंच.
आता यात ती अशीच आहे अन तशीच आहे अशा फुटकळ गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नव्हतो आणि कोणाच्या बोलण्याची पर्वाही करत नव्हतो.
असंही एकटं घरी जाण्यापेक्षा तीच्याबरोबर जायचं, त्यात काय? तेवढीच तीलाही सोबत. नंतर-नंतर आमची हीच ‘तोंड’ ओळख एका ‘मैत्रीत’ अन् नंतर ‘जवळीकीत’ कधी बदलत गेली ते कळलंही नाही..

याचा अर्थ ती फोन सोडून माझ्याबरोबर बोलायला वगैरे लागली अशातला भाग नव्हता. ती त्यावेळीही फोनवरच बोलत असायची. फक्त आता काही गोष्टी मित्र म्हणून मोकळेपणाने बोलायला लागली होती. किंबहुना काही वैयक्तीक गोष्टी शेअरही करायला लागली होती. अशातच तीने आपल्या लव्ह स्टोरीची ट्रॅजेडी सांगितली.

तीच्या पप्पांना तीचा प्रियकर दुसर्‍या कास्टमधला असल्याने आवडत नव्हता. त्यांचा त्याला स्पष्ट नकार होता. लग्न करायचेच तर ते आपल्याच कास्टमध्ये कर असे त्यांचे मत होते. (काय करणार समजुत एखाद्याची) तरीसुद्धा तीला त्याच्याबद्दल पक्की खात्री होती (सुपरमॅनसारखी)- वगैरे! (काय करणार समजुत प्रेमात पडलेल्या मुलींची दुसरं काय!)
अशा बर्‍याच बारीक सारिक गोष्टी ती सहज माझ्याशी शेअर करत होती. मीही तीच्याशी बोलत होतो.

चार महिने झाले.
अजुनही ती मला अहो जाहो च्या संबोधनानेच बोलवत होती. या बोलण्याने मी वैतागून गेलो होतो. एके दिवशी मीच तीला बोललो-

“हे अहो जाहो काय बोलतेस सारखं? माझ्यासारखं- अरे तुरे बोलत जा ना- मला चालेल ते!”

त्यावर तीनं तोंडावर हात ठेवत आश्चर्यानं माझ्याकडे असं काही बघितलं की मी खरंच नव्वदी ओलांडलेला म्हातारा असल्याचा मला प्रकर्षाने भास झाला!

‘अय्या.. असं कसं बोलणार?” संकोचत ती उद्गरली.

“का? त्याला काय होतंय?” तीच्या बुजर्‍या स्वभावाचा मला आता खरंच राग यायला लागला होता.
माझ्या बोलण्याने ती जरा घुटमळली. मान डोलवत तीने होकार दिला. आणि मग त्या दिवसापासून तीने माझ्याशी नॉर्मली बोलायला सुरवात केली! फायनली!!
+++++++++++++++++++++++++++++++++++

ग्रुपमध्ये बसलेलं असताना, खासकरुन मुलांना- मध्येच काहीतरी कमेंट पास करुन सगळ्यांना हसवायची सवय असते. अर्थात तो ग्रुप मुलींचाच असावा असं काही नाही- मुलांच्या ग्रुपपध्येही अशीच किंवा याच्यापेक्षाही जास्त थट्टा मस्करी चालते. असंच त्या दिवशी आंम्हाला क्लासमध्ये होम डिझाईन करायला शिकवलेलं होतं. सगळेजण त्याची प्रॅक्टीस करत होते. माझीही प्रॅक्टीस चालू होती. बाजुला बसलेला एक मित्र काहीतरी सुचना देत होता. त्याला कमेंट पास करत मी आपला एक-एक वस्तू तयार करत घर बनवत होतो. आमच्यात चाललेल्या या थट्टा मस्करीच्या संवादाकडे बघून क्लासच्या दोन मुली तिथे आल्या. ‘काय करतोस’ म्हणून विचारायला लागल्या. मीही तितक्याच गमतीनं त्यांना म्हणालो,

“मला राहायला जागा हवीय- मुंबईत भेटत नाही, म्हणून कंप्युटरवर बनवतोय. काय माहीत लग्नानंतर तीच उपयोगी पडेल- भावी बायकोही खुश होईल!”

त्यावर त्या गमतीनं हसायला लागल्या. मी घरातली डोअर मॅटपासून टीपॉय, फ्लॉवर पॉट पर्यंत सगळ्या वस्तू बनवत होतो. त्या दोघी उत्सुकतेनं ते बघत होत्या. बोलता-बोलता बायकोचा विषय मागे पडला. आणि तिथे बसलेल्या मुलीच माझ्या घरात वाटण्या घालू लागल्या. त्यालाही मग मान डोलवत मी होकार दिला आणि पुन्हा घर सजवण्यात गुंग झालो. इतक्यात ती बाजुला येऊन बसली..

“अय्या घर का? मी येऊ राहायला?”

“ये ना आमच्या घरात खुप जागा आहे” ती गालातल्या गालात गोड हसली. इतक्यात एका चौकोनाकडे बोट दाखवत मागे बसलेल्या एकीनं विचारलं

“ये क्या है?”

“ये बेड है- घरमें जमिन पें कैसे सोएँगे? उसके लिए बेड तो लगेगा नं!”

“और ये दरवाजे पे क्या है?”

“डोअर मॅट!”

“और डोअरबेल?”

“लाईट नही है। अंबानी से बात चल रही है!”

“अरे ये खटीया जैसी नहीं लग रही?” मध्येच पच्चकन एक बोलली. त्यावर मीही टोला दिला-

“इतने पैसे में, इतनाईच मिलेंगा!”

पोरी परत चेकाळल्यासारख्या खिदळायला लागल्या. यावेळी मात्र ती अवघडल्यासारखी उडतं हसली. (झाली सुरवात!)

“बेसिन कहाँ है?”

“अरे हाँ! बेसिन तो रह गया नं-”
म्हणत मी एक स्क्वेअर घेत पॅसेजमध्ये बेसीनचा आकार तयार केला.
इकडे ती वरवर हसत संकोचून गेली होती. मध्येच मला डिवचत बोलण्यापासून आवर घालत होती. इतक्यात अजुन एक मुलगी त्या दोघींना जॉईन झाली.

“कुछ खास नही है- नं?” उगीच नाक उडवत नवीन आलेली पोरगी उद्गरली अन् मी तिच्याकडे रागानं बघितलं. इतकी मेहनत घेतोय तरी उणीवा काढण्याच्या सवयी काय जात नाहीत या पोरींच्या!

“मेरी गर्लफ्रेंड को पसंद आया ना, तो बहुत है!” मी माझं मत ठोकून दिलं.

“हाँ” म्हणून तीनं ओठ मुडपून दाखवले. इतक्यात हळूच इकडे हीने मला बोटानं चिमटलंच! ‘कशाला त्यांच्याबरोबर बोलतोयस’ म्हणून खुसफुसत डोळ्यांनी खुणावलं. पण तीच्याकडे दुर्लक्ष करत मी पुन्हा आपलं काम करु लागलो

“बाथरुम कहाँ है?” पुन्हा त्या पोरीनं प्रश्न निर्माण केला

“ये क्या है”

“और बाथटब?”

“नही"

"क्यो?"

"उसकी जरुरत नहीं? बाथरुम में नहाना है- पैर पसार के सोना थोडी है! एक शॉवर है उतनाही काफी है"

"लेकीन शॉवर से क्या होगा? बाथ-टब में लेट के नहानें में ही मजा ही कुछ और है, बडे लोगों जैसे"

"हॅट! गंदे पानी में नहाने से अच्छा शॉवर से नहाना है! कितना अच्छा लगता है बारिश जैसा, और वैसे भी आजकल शॉवर से ही बडे-बडे काम होते है, पता है!”

एकीनं उगीच लाजत तोंडावर हात ठेवला.

“टॉयलेट तो है ही नही” पोरी पुन्हा खुसखुसल्या.

‘गप ना’ उगीच हाताच्या कोपराला चुचकारुन डिवचत तीनं मला डोळ्यांनी दटावलं.

“थांब गं! एवढं मोठं घर केलंय- आणि टॉयलेट नाही म्हणजे काय?” म्हणत मी टॉयलेटचा ग्राफ तयार केला. मग घरातल्या पेंटीग्स, वॉलपेपर, लॅम्प, क्लॉक तयार करु लागलो. ते करताना मस्करीत बोलणं वगैरे चालूच होतं. पण ते बघून तीला मात्र आता अवघडल्यासारखं होऊन गेलं होतं. एखाद्या अनोळखी लोकांत वावरत असल्यासारखी ती कसंसंच तोंड करुन केविलवाणी एकाकी बसली होती. मध्येच मागे उभ्या असलेल्या मुलींकडे लक्ष जाताच बळेच हसून दाखवत होती. शेवटी न राहावून, हळूच पण थोडं ऐकायला जाईल अशा आवाजात ती खुसफुसत बोलली-

“चल निघूया?” अगदी शेवटचंच अस्त्र काढवं तसं तीनं मला डिवचत विचारलं. मी सहज तीच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच तीच्या नजरेत मला एक वेगळाच बदल जाणवला!
काय होतं तीच्या नजरेत? एखादी गोष्ट मनाविरुद्ध होत असल्याचे भाव? एकप्रकारची बैचेनी? अस्वस्थता?- का?...
तीला उशीर होत होता म्हणून, की मी तीचं ऐकून तीच्याबरोबर येत नव्हतो म्हणून.
नाही
ही अस्वस्थता काही वेगळीच होती.

“चल” तीचा मुड ओळखून मी सगळ्यांचा निरोप घेत उठलो. तशी ती तरारली. खुशीनं चटकन उभी राहीली. लगेच बॅग खांद्यावर घेत लाडाने मागे सरकली अन...

क्षणात तिचा उत्साह ढेपाळला! तोंडावरचं चैतन्य कुठल्याकुठे लुप्त झालं. एवढंसं तोंड करुन मग ती परक्यासारखी कोपर्‍यात उभी राहीली. आम्ही जातो म्हणताच मुलींचा तो ग्रुपही आमच्याबरोबर जाण्यासाठी एकदमच उठला होता!
त्यातली एक मुलगी तेवढी पुढे निघून गेली. बाकीच्या आमच्याबरोबरच यायचं म्हणून सोबतीला थांबल्या. मी मुलींबरोबर बोलत बाहेर पडलो. या सगळ्यापासून अलिप्त ती, पाय ओढत सगळ्यांत मागून चालत राहिली..

बाहेर येताच आमच्यात थोडं काही बोलणं झालं. कुठून जाणार वगैरे मी त्यांना विचारलं. त्या सगळ्या आमच्याचबरोबर येणार म्हणून उत्साहात बोलायला लागल्या आणि इकडे हीने चेहराच पाडून घेतला! (हे बरं असतं आपलं मुलींचं, नाही आवडलं- पाड चेहरा!!)
अगदी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावलेल्या कैद्याच्या नामुष्कीनं ती निरस हसली.
मुली उत्साहाने आमच्याबरोबर येतायत तर मी का नको म्हणायचं? येतायत तर येऊ दे! असंपण मला कुठं हनुमान बनवून त्यांना खांद्यावर घ्यायचं आहे?
म्हटलं येताय?- चला! मुलीही चांगलं चला-चला म्हणून आमच्याबरोबर दोन पावलं पुढं आल्या अन्-
एकदमच खदाखदा हसत सुटल्या. मला काही समजेना. मी चक्रावून त्यांच्याकडे पहायला लागलो. तर म्हणाल्या,

“मस्करी करत होतो रे. आम्ही वेस्टलाच राहतो”

म्हटलं, मग येड्यांनो उगीच येतो-येतो म्हणून काय नाचत होता? मी नेतोय की नाही ते बघत होता?
हसून त्या त्यांच्या वाटेनं जायला निघाल्या.
इतका उशीर मागेच उभी राहिलेली ती. कशातही भाग न घेता, घुम्यासारखी- गप्प होती!
मुली जाताना बघताच मात्र अगदी चमत्कारिकरित्या तिच्यात हळूहळू चैतन्य येऊ लागलं. तिघींना तीने हसतमुखाने निरोप दिला- त्या जाताच तीच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव उमटले. वागण्यात नेहमीचा मोकळेपणा आला. ती बोलकी झाली.
आंम्ही राईट टर्न मारुन आम्ही ब्रीजच्या दिशेनं चालायला लागलो. आणि तीने पहिल्यांदाच माझ्याकडे रागाने बघितलं!

“कशाला त्यांच्याबरोबर बोलत होतास?” तक्रारीच्या सूरात ती उद्गरली.

“का?” बावळट चेहरा करत मी विचारलं

“यापुढे त्यांच्याशी बोलू नकोस”

“का पण?”

“अरे त्या-” मध्येच थांबत तीनं आजुबाजुचा अंदाज घेतला. मग कोणी ऐकलं तर तसंच पळत जाऊन त्यांना सांगेल की काय अशा अविर्भावात ती कुजबूजत्या, खाजगी आवाजात म्हणाली,

“..त्या चांगल्या मुली दिसत नाहीत, तसल्यातल्या वाटतात-”

अ? तसल्यातल्या? म्हणजे कसल्यातल्या??
आणि पेहरावावरुन, दिसण्यावरुन तरी चांगल्या खानदानी घराण्यातल्याच वाटत होत्या. मग हिलाच काय वेगळं दिसलं?

“तुला कसं माहीत? तू ओळखतेस यांना?”

“ओळखायला कशाला पाहिजे? बघितलं नाहीस कशा बोलण्याच्या बहाण्यानं चिकटत होत्या तुला?- कशा कशा नजरेनं बघत होत्या तुझ्याकडे!”
ती तोंड वेडंवाकडं करत बोलली

हायला! मला काहीच कळेना, त्यांनी बघितलं म्हणून काय झालं?
हा, मला माहीत आहे मुली जन्मत:च सैतानी असतात. छळणं, पछाडणं त्यांचा स्वभावच असतो, पण- फक्त बघण्याने?..

“बघण्याने काय होतं?”

“काही होत नाही!” ती घुश्श्यात येत उद्गरली.

“तुला सांगितलं तेवढं कर! त्यांच्यापासून लांब रहा. आणि त्यांच्याशी बोलत जाऊ नकोस. एकतर तू खूप भोळा आहेस, तसल्या नजरांतलं तुला काही कळत नाही, मला कळतं म्हणून सांगतेय!”

मला तिच्यावर जाम हसू येऊ लागलं. उगीच आपलं इवलंसं नाक उडवत अडीच वर्षाच्या मुलीनं, आपण पौढ असल्याचं दाखवत तोर्‍यानं मिरवावं इतकं विनोदी वाटलं मला ते.

“तू विचार करतेस तसं काही नाही. त्या चांगल्याच घराण्यातल्या आहेत..”

“स्स्..!! तुला माझं ऐकायचं आहे का नाही?” ती चिडीलाच आली

“बरं, मी सांगते म्हणून त्यांच्याशी बोलू नकोस- बस्स!!” वैतागून कपाळावर आठी पाडत ती बोलली आणि तीनं माझं बोलणं अर्ध्यावरच तोडून टाकलं. ती अशी का म्हणाली आणि ती या गोष्टीवरुन, माझ्यावर इतकी का रागावली याचं कारण काही मला शेवटपर्यंत समजलं नाही. विषय बदलत ती नंतर माझ्याशी इतर विषयावर बोलू लागली.

रेल्वे ब्रीज आला, नेहमीप्रमाणे तीचा फोन वाजला. फोन उचलत ती त्यात रमून गेली! मागच्या घटनेचा, प्रसंगाचा लवलेशही तिच्या चेहर्‍यावरुन पुसून गेला होता. जणू ती काही बोलली नव्हती आणि आत्ता काही घडलंच नव्हतं!
मी मात्र घरी जाईपर्यंत(!) तीच्या बोलण्याचा अर्थ लावत होतो.
कळत बरंच होतं- वळत काहीच नव्हतं!...
================================================================
क्रमश:

भाग=>> 8

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

पुभाप्र. याच्या अन असंभवच्या पण