कुतूहल - भाग २ (शेवट)

Submitted by मॅगी on 3 April, 2018 - 00:53

भाग - १

ते स्वप्न पडल्यापासून गेले दोन तीन दिवस जरा घाबरलो होतो. चूपचाप शाळा, अभ्यास, ट्युशन, जेवण शेड्युल गोल गोल सुरू होतं. आताही त्या पिवळ्या बंगल्यासमोरून जात होतो पण आत बघायचा धीर होत नव्हता. पण.. गेल्या दोन तीन दिवसांपासून तिकडे जाण्याची मनाला ओढ लागली आहे. तिथे कुणाला तरी माझी गरज आहे असं सारखं वाटतंय. तिथली झाडं, वाऱ्यावर झुलणाऱ्या डहाळ्या, उडणारी पानं या सगळ्यात काहीतरी एक रहस्य नक्की लपलेलं आहे..

आता कालचंच पहा ना, मी रात्री घरी निघालो आणि त्या गेटसमोर आल्यावर नेमकी सायकल पंक्चर झाली. बाबांची वाट बघत मी तिथेच थांबलो. जोराची सर आली म्हणून जर्किनचं हूड कपाळावर ओढून घेत मी गेटच्या आत शिरून तिथल्या झाडाखाली थांबलो. वाऱ्यापावसाचा एकत्र भरपूर गोंगाट होता, रस्त्यावरचे दिवे बाकबुक करता करता अचानक बंद झाले. मी हळूच खिडकीकडे पाहिलं, आज तिथे गाढ काळोख होता. काहीही जिवंत निशाणी दिसत नव्हती. शेजारच्या झुडपांवर पसरलेल्या वेली पावसामुळे तरारून त्या खिडकीत आधार शोधत लोंबत होत्या.

उं..ह, उं..ग, उं..ह असा काहीतरी विचित्र रडल्यासारखा आवाज कुठूनतरी यायला लागला. मी कान देऊन ऐकलं तरी त्याचा सोर्स काही कळत नव्हता. जरा पुढे गेलो तर नक्कीच कोणीतरी कळवळून रडल्याचा आवाज आहे. त्यातच बंगल्यामागून दोन चिखलात मढलेल्या, अंगावरचे केस आणि शेपट्या ताठ उभ्या केलेल्या मांजरी एकमेकांवर जाम गुरगुरत, भयंकर आवाज काढत बाहेर आल्या. त्यांची कुस्ती सुरूच होती, त्यात तो रडण्याचा आवाज विरून गेला. इतक्यात मागून बाबाचा पण हॉर्न ऐकू आला मग मला पटकन निघावं लागलं.

आज उठल्यावरच मी ठरवलं, कोण तिथे रडत होतं ते शोधयचंच! एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता! असं मी नाही, सल्लूभाय म्हणतो. यावर्षी तर मला सगळ्यांचंच ऐकावं लागतं च्यायला! आज ट्युशनमध्ये शहाण्या बाळासारखं ट्रिगनॉमेट्री शिकलो. पहिल्या इंटर्नल टेस्टमध्ये मला जाम रडवलेलं ट्रिगने. पहिल्या टेस्टवरून आठवलं, उद्या सकाळी इंग्लिशचा एक्सट्रा क्लास आहे, सप्रे मॅम प्रोव्हर्ब्स आणि इडिअम्स शिकवणार आहेत. लवकर उठायला हवं.

आज निघताना मी काकाला सहज त्या पिवळ्या बंगल्याबद्दल विचारलं. तो म्हणाला तिथे गेल्या दोन वर्षापर्यंत एक नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं राहायची. मोठ्या मुलाचं लग्न झालं आणि नंतर ते सगळे कुठेतरी शिफ्ट झाले बहुतेक. हल्ली कोणी दिसत नाही तिथे. त्यांच्याबद्दल फारशी कुणालाच माहिती नाही. नेहमी दार बंद, ना नोकरचाकर. फार आखडू होते, कॉलनीत कधीच मिसळायचे नाहीत. मग लोकही हळूहळू तिकडे लक्ष द्यायचे बंद झाले.

काय विचित्र असतात एकेक लोक! जाऊदे.. म्हणत मी बाहेर पडलो. काकाने सायकल पंक्चर काढून आणून ठेवलीच होती म्हणून बरं. आज पौर्णिमेचा ताटाएवढा मोठा गोल चंद्र समोर दिसत होता. पाऊस नसल्यामुळे आकाश निरभ्र दिसत आहे. (वावा, चिन्या. निबंधात चांगले मार्क मिळणार तुला. डोन्टच वरी!)

पण.. त्या गेटपाशी आल्यावर आज गेट उघडंच दिसतंय. शेजारचा वॉचमनपण गायब आहे.
सायकल लॉक करून मी हळूहळू इकडेतिकडे पाहत आत जायला लागलो.

आज पौर्णिमेच्या प्रकाशात बरंच नीट दिसतय. गार वारा आहे, माझे हातपाय गार पडलेत. पायाखाली पाचोळा वेफर्सवर पाय दिल्यासारखा कुरकुर वाजतोय. एवढ्या पावसात कुजला कसा नाही? पोर्चच्या पायरीजवळ आल्यावर पुन्हा तो विचित्र दबलेला रडण्याचा आवाज ऐकू आला. आज कुणीतरी बाई हमसून हमसून रडते आहे. मधेच तिचे हुंदके कमी कमी होत जातात. बापरे! कोणीतरी नक्कीच अडकलय तिथे. मी पळतच पायऱ्या चढून पोर्चवर पोहोचलो, दारावर जोरात धक्का दिला तर दार खाडकन उघडून मी आतच धुळीत फेकला गेलो. अरेच्चा! दार उघडंच होतं.

खांदा सणकून आपटला. कळ येतेय तरी पुढे जातो. आता काहीतरी खुडबुड केल्याचा आवाज येत आहे. हॉलमधून आत एक अर्धवट फुटलेल्या काचेचं दार दिसतंय. त्या दारावर काळसर डाग पडले आहेत. सगळीकडे खूप धूळ आहे. पडदे कधीच न धुतल्यासारखे कडक झालेत. खिडकीच्या पडद्याना खाली लालसर डाग आहेत आणि ओरबाडून त्यांची सुतंही लोंबत आहेत. आतल्या खोलीत पाय ठेवतानाच अतिशय घाण वास आला. नक्कीच एखादा उंदीर सडलाय. पुढे एक मांजराचा अर्धवट सांगाडा दिसतोय. सगळीकडे बारीक हाडं आणि काहीतरी घाण दिसतेय. नजर उचलून समोर पाहतो तर काय! आईशप्पत!! एक बाई आहे तिथे. फरशीवर पोटाजवळ पाय घेऊन आडवी पडलीय. एका हिरव्या रंगाच्या कॉट च्या पायाला तिचे हातपाय दोरीने बांधून ठेवलेत. केसांच्या लांब जटा, अंगात एक चिंध्या झालेला मळलेला पांढरा सॅटीन गाऊन आहे. अंगभर जखमा, मानेवर काहीतरी खुपसल्यासारखे काळेनिळे डाग आणि फरशीवर पण खूप रक्तासारखे डाग आहेत.

मी तिच्या जवळ जाऊन पाहिलं आणि काय आश्चर्य! ती कण्हते आहे अजून.. म्हणजे इतकं मारलेलं असूनही ती जिवंत आहे. मी पळत जाऊन काचेचा तुकडा आणला आणि तिच्या दोऱ्या कापून हात पाय मोकळे केले.

तीने हाताने तोंडाला बांधलेलं फडकं खूप कष्टाने काढून टाकलं आणि सुजलेल्या तोंडाने म्हणाली, "थॅंक्यु मला सोडवलं.. बऱ्याच दिवसांपासून खूप भूक लागली आहे.. आम्हा सगळ्यांना".. मी घाईघाईने बाबांना कॉल करायला मोबाईल खिशातून काढतच होतो.. पण एक मिनिट..

"काय? सगळ्यांना? म्हणजे अशी अजून लोकं आहेत इथे??" मी विचारलं. "हो" तिने समोर पहात उत्तर दिलं. "कुठे?" मी म्हणालो.

"ते काय तुझ्या मागे!" ती थंड नजर माझ्या मागे रोखून म्हणाली. मी गर्रकन मागे वळेपावेतो एक हडकुळा हात गपकन माझ्या तोंडावर आला आणि डोक्यात काहीतरी आदळून माझ्या विस्फारलेल्या डोळ्यांपुढे अंधार झाला.

-------------

वर्गात सप्रे मॅडम शिकवत होत्या, "curiosity killed the cat! This is a proverb. It means One's inquisitiveness can be dangerous, especially when it extends to things one does not need to know about. Being curious can get you into trouble. It is often used to warn someone against prying into other's affairs. उदा. हा संतोष आपल्या गणपतकाकाना सिक्रेट टेस्टच्या तारखा विचारत होता. हे मला कळणारच ना? तर संतोष please remember, curiosity killed the cat!"

संट्या गोरामोरा होऊन कसाबसा "येस मॅम" म्हणाला.

"It comes from the tendency of cats to want to explore everywhere… they go to extreme lengths to satisfy this and sometimes that results in them getting hurt or even killed."

-------------

खूप प्रयत्न करून डोळे उघडतोय. डोळे चिकट झाले आहेत. किती वेळ गेलाय कोण जाणे. माझं तोंड कशाने तरी बांधलं आहे आणि हातपाय पण त्याच कॉटला बांधून ठेवलेत. मी डोळे उघडले. मी मला वाचवा, वाचवा ओरडायचा प्रयत्न करतो पण तोंडातून फक्त उ..ह, उं..ग एवढंच बाहेर पडतंय. खिडकीतून उन्हाचा एक पट्टा माझ्या पायाजवळ पसरलाय. दारातून एक सावली भराभर माझ्याकडे सरकते आहे..

--------------

सप्रे मॅडम पुढे शिकवत होत्या, "आणि या प्रोव्हर्बचा एक पुढचा भाग पण आहे जो खूप जणांना माहीत नसतो. तो आहे 'but satisfaction brought it back!'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमली आहे.
पण शेवटच्या ओळीचा अर्थ मला लागला नाही .> >>>> मलाही

'त्या' नी त्या मुलाला अडकवुन ठेवले आणि ते मुक्त झालेत का?

मस्त जमली आहे!

शेवटच्या ओळीचा अर्थ मलापण कळला नाही.