कुतूहल - भाग १

Submitted by मॅगी on 1 April, 2018 - 13:42

आजपासून मी अमितकाकाकडे जॉमेट्री शिकायला जायला लागलो. इतके दिवस आईच शिकवायची मला, एकपण ट्युशन नाही लावली कधीच. पण या दहावीच्या जॉमेट्रीपुढे तिने हात टेकले. हे 'महत्त्वाचं वर्ष' ना, कुणाकडे तरी नीट क्लास लावू असं तिचं म्हणणं! मग मीच म्हटलं,  आपल्या इथले सगळे क्लासवाले चू.. अं.. मंद आहेत. त्यांना तर मीच शिकवेन. मग आयडिया आली, अमितकाका! येस्स, बाबांचा सगळ्यात लहान चुलतभाऊ. त्याने msc maths केलंय आणि तरीही (हेहे) तो एकदम कूलपण आहे. मला भारी समजावून शिकवेल तो. आईला ही आयडिया आवडली म्हटल्यावर ती बाबाला पण नक्की पटवणार. आणि तसंच झालं, बाबाने अमितकाकाला लगेच फोन केला. झालं! आजपासून माझी ट्युशन सुरू.

काकाचं घर आमच्यापासून जरा लांब ऑलमोस्ट सिटीच्या बाहेर चर्च रोडवर आहे. माझ्या पूर्ण पंधरा वर्षाच्या आयुष्यात मी तिथे आत्ता दुसऱ्यांदा चाललो असेन. पहिल्यांदा मी पहिलीत असताना गेलो असेन, तेही काकाच्या घराच्या वास्तुशांतीला. तेच सगळे मोस्टली सिटीत आले की आमच्याकडे येतात. पर एक स्पेशालिटी तो है यहा! चर्च रोडचं नाव काढलं तरी संट्या जाम येडा होतो, संट्याची लाडकी क्रिस्टल राहते ना तिथे! (तशी ती सट्टाक आहे पण त्याला हजारदा सांगितलं हे क्रिस्टल बिस्टल सोड, गर्ल्स हायस्कुलमध्ये बघ कसले एकेक डायमंडस आहेत) हे ट्युशनचं सांगितलं तर मागेच लागेल मीपण येतो म्हणून. पण अमितकाका फक्त मला एकट्यालाच शिकवेन म्हणालाय. तो ऑफिसमधून साडेसातपर्यंत येतो, म्हणून मी साडेसात ते नऊ जाणार आहे त्याच्याकडे. संट्याला कटवला पाहिजे.

तर आज मी पहिल्यांदा जातोय म्हणून आईला मस्का मारून ऍक्टिवा घेऊ का विचारलं. पण आमच्या माँसाहेबच त्या.. भयंकर लेक्चर मिळालं. लायसन्स नाही ना अजून, देतच नाही राव मला गाडी. किती दिवस सायकलवर टिंग टिंग करत जाणार? एकतर वर्गातली सगळी मुलं गाडया घेऊन येतात हल्ली. मग लक्षात आलं, तशीही आई शेजारच्या काकूबरोबर शॉपिंगला गेलीय. पटकन किल्ली उचलली आणि मस्त बुंगाट ऍक्सीलेटर पिळत काकाकडे पोचलो.

तो येईपर्यंत मीनाआजी दहावीवरून जाम पिळत बसली. तीला किती वेळ पटतच नव्हतं की आता बोर्डात नाव वगैरे काही प्रकार नसतात आणि गेल्यावर्षी माझ्या शाळेतल्या दहावीच्या वीस मुलांना ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले हे ऐकून तर ती वेडीच झाली! हाहा! पण मीनाआजीच्या हातचं थालीपीठ म्हणजे एक नंबर! माझ्या आईला असं अजिबात येत नाही. दाबून पाच थालिपीठं खाल्ली. मग काका आल्यावर त्यानेपण जनरल गप्पाच मारल्या, सिलॅबस कुठपर्यंत आला, सध्या जॉमेट्रीसाठी कोण टीचर आहेत, माझा अभ्यास साधारण कसा आहे वगैरे, वगैरे.. त्यांना बाय करून निघालो आणि डोक्यात एक किडा आला. आपण काय सुममध्ये किडे करण्यात हुषारच! म्हटलं त्या क्रिस्टलचं घर तरी कसंय बघावं. आखीर भाब्बी है अपनी!

चर्च रोड खूप मोठा, वळणा वळणाचा आहे, त्याच्या शेवटी जुनं मोठं चर्च आणि त्याच्या बाजूलाच त्यांचं ग्रेव्हयार्डपण आहे. तिथे रस्त्याचा डेड एन्ड होतो. 'डे..ड एन्ड' कसलं भारी मॅच होतं ना! हाहा. तर मी एक एक वळण पार करत स्लोs ली घरं निरखत जायला लागलो. असले भारी बंगले आहेत, सगळे बिझनेसवाले लोक राहतात. सगळी कडे मोठ्या मोठ्या उंच कंपाउंड वॉल्स, काय घंटा उपयोग झाला मी येऊन! आतलं अजिबात काही दिसत नाही. बाहेर अज्जिबात आवाज नाही, झाडच झाडं आणि सुनसान रस्ता. सगळ्या बंगल्यांबाहेर मोस्टली गुलमोहोर नाहीतर फुलांची झाडं होती. रमतगमत एकदम चर्चच्या गेटपाशीच पोचलो.

तीन उंच सुळके असलेलं, टाईडवाला व्हाईट रंगवलेलं चर्च आहे. मधल्या सगळ्यात उंच सुळक्यावर भलाथोरला क्रॉस आहे. लाकडी असावा पण पार ढगात पोचलेला. गेटपण असलं उंचच उंच लोखंडी आहे आणि वर अगदी भाल्या सारखे टोचे लावलेले होते.  त्याच्यावर जुनाट गंजलेली कमान, 'सेंट पीटर्स चर्च'. म्हटलं ok! त्या गेटला कुलूप बिलुप काहीच नाही, मी गाडीवरूनच एका हाताने ढकलून पाहिलं. जोरात कररर.. आवाज करत ते मुंगीहून कमी स्पीडने उघडायला लागलं. मला एकदम कुठूनही हॉरर शोचा तो 'टॅ डॅन.. टॅ डॅन.. टा डा डा डा डा डा' वाला ओपनिंग ट्रॅक सुरू होईलसं वाटतंय. अचानक वारा पण जाम सुटलाय. डोक्यावर कुठल्यातरी झाडाच्या पंधरावीस फांद्या काड-कुड आवाज करत जोरजोरात हलतायत. जाम काळोख आहेच पण बहुतेक पाऊससुद्धा येईल आता. एखादी फांदी बिंदी माझ्यावर पडायच्या आत घरी गेलेलं बरं. उद्या सायकलवर येतो टिपी करायला. ऍक्टिवाला डेंट आलेला दिसला तर आई मला कमीत कमी सतरा डेंट आणेल.

-------------

आज सायकलवर ट्युशनला आलो. अमितकाका बेस्ट आहे, मस्त मजा येतेय. खूप ऍडिशनल गोष्टी सांगून शिकवतो तो. जसं आता ह्या चर्चचे उदाहरण देऊन त्याने sacred geometry बद्दल सांगितलं. खूप जुन्या काळी रोमन, ईजिप्शियन अगदी आपल्या भारतीय लोकांनीसुद्धा आपापली चर्च, पिरॅमिड, मंदिरं बांधताना विशिष्ट जॉमेट्रिक प्रपोर्शन वापरली होती जी त्यांच्या दृष्टीने पवित्र होती. कसलं कूल ना! अगदी देवाने हे जग निर्माण करतानाही भौमितीक सिद्धांत वापरले आहेत म्हणे. हे मी नाही, प्लेटो म्हणतो की 'God geometrizes continually'! मला खूपच इंटरेस्टींग वाटायला लागलंय जॉमेट्री आता. तेवढ्यात नऊचे ठोके पडले आणि मी तिथून निघालो. बाहेर येऊन गेट लावताना अचानक आठवलं, आज पुन्हा क्रिस्टलचं घर शोधणार होतो म्हणून लगेच सायकल वळवली.

हा चर्च रोड अगदी स्मूद, डांबरी आहे. नुकताच पाऊस पडायचा थांबला त्यामुळे रोडवर सगळीकडे लहान लहान तळी साठली आहेत. नाहीतर आमचा कै. दादासाहेब भोंगळगावकर रस्ता! म्हणजे आमच्या इथल्या नगरसेवकाचे आजोबा. च्यायला, त्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे ओळखून दाखवा. काळोखात रस्त्यावरच्या दिव्यांची प्रतिबिंब डबक्यात चमकतायत. तरी बरं माझ्या सायकलला लाईट बसवलाय, नाहीतर धडपडलोच असतो.

चर्चच्या अलीकडच्या वळणावर एक लेमन यलो रंगाचा जुना बंगला आहे. खूप वर्षांपूर्वी रंग दिलेला वाटतो, अगदी पोपडे सुटलेत त्याचे. तो एकच बंगला व्यवस्थित दिसतो कारण त्याला कंपाउंड वॉलच नाही. साधं निवडुंगाचं कुंपण आहे. जरा थांबून बघू म्हटलं. अंगण किती वर्षात झाडलं नाही कुणास ठाऊक. पाचोळ्याचा पाऊल बुडेल इतका थर जमलाय. फॉरेनला वगैरे असणार मालक. समोर दोन क्रेसेंट शेपच्या पायऱ्या, त्यावर पुढे आलेला लहानसा पोर्च आणि भलं मोठं अँटिक दार आहे. त्या पोर्चवरपण भरपूर धूळ असणार, स्ट्रीट लॅम्पमुळे तेवढंच दिसतंय. पाऊस थांबलाय पण वरून एक झाड बरोबर डोक्यावर टपटपतंय.

सायकल बाजूला लावून त्या गेटवरून डोकावून बघतो..  घरात एकपण लाईट नाहीये. बाहेरच्या काळोखात पोर्चशेजारच्या खिडकीत रस्त्यावरच्या दिव्याची थोडी तिरीप पडली आहे. एक हवेचा झोत आला आणि अचानक घरातून घुंगरू खळखळ वाजायला लागले! आईच्चा! हे काय नवीन आता? हाह! काय डंब्या आहे मी, पोर्चवर विंडचाईम दिसतंय घुंगराचं. जोरजोरात खणखणतंय अगदी. त्याचवेळी डोळ्याच्या कोपऱ्यातून मला खिडकीत काहीतरी हालचाल जाणवली. तिकडे नजर वळवली तर पटकन मेणबत्तीच्या ज्योतीसारखं काहीतरी लहरत क्रॉस झालं. दुसऱ्या खिडकीत पांढरट पडदा असावा बहुतेक. तो जोरजोरात फडफडत होता, आत दिवे नाही आणि फॅन कसा काय? खिडकीची काच तर बंद दिसतेय. वारा येतोय कुठून नक्की? कुणी पडदा धरून जोरात हलवत तर नाही?

"आं ssss" माझ्या खांद्यावर एक जड हात पडला. वळून बघतो तर मागे शेजारचा वॉचमन काठी घेऊन उभा होता. "ऐ, क्या कर रहा है इधर? अच्छे घरका दिखता है! चल भाग इधरसे. वापस दिखा तो छोडुंगा नई" म्हणत त्याने दम दिला. "हां ठिके, ठिके" म्हणून नाराजीनेच निघालो  तिथून. पण त्या घरात कायतरी मिस्टरी आहे नक्की. उद्या शोधच लावतो आता..

--------------

मला हळूहळू जाग आली. डोळे चिकट झालेत नीट उघडत नाहीत. डोळे चोळायला हात वर करतोय पण ते कशाने तरी बांधून ठेवलेत. डोळे खाडकन उघडून इकडेतिकडे पाहिले, बापरे हे कुठे आहे मी? एका लोखंडी हिरव्या कॉटच्या पायाला दोरीने माझे दोन्ही हात गच्च बांधून ठेवलेत. मी खुप प्रयत्न करतो पण दोरी सुटतच नाही. शिट यार! माझे पायपण एकत्र बांधून ठेवलेत. खूप किंचाळतो तरी कुणीही येत नाही. शांत होतो, इकडेतिकडे पाहतो. अगदी बारीकशी काळवंडलेली खोली आहे. सगळीकडे काळोख, प्रचंड उकडतंय. वर फॅन असला तरी बंद आहे. कधी सुरूतरी होता का कुणास ठाऊक! त्याला एक मोठं कोळ्याचं जाळं लोंबतंय. त्याच्या सेंटरला एक जाडा सुरवंट अडकलाय. त्याचं केसाळ अंग थरथरवत तो तिथेच उलटापालटा होतोेय पण सुटत मात्र नाही. एक मोठा कोळी लांबून दबा धरून त्याची मजा बघतोय. रागाने मी नजर हटवतो.

अचानक कानाजवळ गुं..गुं..गुं.. आवाज सारखा कमी जास्त फ्रिक्वेन्सीने येतोय. मी जोरजोरात मान झटकतो. एक माशी आहे. माझ्या डोळ्यासमोर आली. ओह नो.. सरळ माझ्या नाकाच्या शेंड्यावरच येऊन बसली. तिचे पुढचे दोन्ही पाय उचलून एकत्र चोळतेय, सुरीला धार लावल्यासारखी..

आता परत उडाली, तिची गुणगुण पुन्हा कानाजवळ येतेय, शिट! कानाला स्पर्श करत ती हळूहळू आत आत जातेय. आतून तिची गुं गुं पार घुमत माझ्या डोक्यात जातेय. मी जोरात मान हलवतो, खांद्याला घासतो पण काहीच फरक नाही.. ती अजून आत घुसायचा प्रयत्न करतेय, आं sss खूप जोरात कळ आली.. तीला रस्ता सापडला बहुतेक, हुश्श.. बाहेर पडतेय. पंखाच्या आवाजावरून कळतंय..

आं sss मी डोळे उघडले! मी माझ्याच रूम मध्ये गादीवर झोपलोय आणि शेजारी डब्बू बोका बसून माझ्या कानावर पंजा मारतोय.. हा! काय डेंजर स्वप्न! मी पार घामाघूम झालोय. उठून फॅन पाचवर केला नि चादरीने पायापासून डोकं कव्हर करून आकडे मोजायला सुरू केले. १००, ९९, ९८, ९७, ९६ ..

--------------
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users