जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट..!_2

Submitted by अन्नू on 24 March, 2018 - 12:47

प्रणित,

सर्वप्रथम सॉरी!, Happy मी तुझी वही दुसर्‍याच दिवशी परत करणार होते पण नाही जमलं. कारण नेमके त्याच दिवशी रात्रीचे आम्ही सर्वजण मामांकडे गेलो होतो. हा कार्यक्रम अचानक ठरल्याने कोणालाही सांगण्या-बोलण्याची संधीच मला भेटली नाही. शिवाय माझ्या जवळपास कॉलेजच्या कोणीच मैत्रीणी राहत नसल्याने तुझी वही माझ्याकडेच राहून गेली.

मामाकडे जाताना मी ही- वही माझ्याबरोबर अभ्यासासाठी म्हणून घेऊन गेले. पण तिथं इतकं काम होतं की अभ्यासाला मोकळा वेळच देता येत नव्हता. शेवटी काम करता करताच अभ्यास करणं मला भाग होतं. त्यामुळे कुठे जाईल तिकडे मी ती वही वागवू लागले- पिठ मळताना, मामींबरोबर स्वयंपाक करताना, जेवताना, जेवण वाढताना, सोनुला खाऊ घालताना, पाणी भरताना, अगदी रात्री झोपतानासुद्धा तुझी ती वही माझ्या डोक्याशेजारीच असायची! त्यामुळेच तिच्यावर त्या-त्या कामाचे डाग तुला दिसतील Happy माझ्या अशा सततच्या हाताळणीमुळेच नंतर ती हळुहळु फाटत गेली.

हा! आता- फाटलेल्या पानांबद्दल बोलशील तर ते माझ्या आईकडून चुकीने फाडले गेले. किचनमध्ये ठेवलेली तुझी वही, तिला तिचा अवतार बघून रद्दी वाटली आणि तिने त्यातली काही पाने लवंग, मोहरी, मिरची, ओवा, बडीशेप, हळद, अश्या वस्तुंच्या पुड्या बांधण्यासाठी फाडली. आता हे सर्व तुला सांगायचं म्हटंल तर माझं धाडस होत नव्हतं. शिवाय तू रागवणार हे निश्चित! म्हणून मग शेवटी थोडक्यातच लिहुन तुझी माफी मागण्याच मी ठरवलं.

आणि हो, तुझ्या या सर्व नोट्स मी अगोदरच एका चांगल्या वहीत लिहून तुला द्यायसाठी ठेवल्या आहेत बरं! त्यामुळे त्याची काळजी तू करु नकोस. ही वही मी तूला, तू क्लासमध्ये आल्यावर देईन.

बाकी तू मला माफ करशील अशी आशा करते. आणि जर तू मला खरंच माफ केल असशील तर माझ्याबरोबर एक कॉफी घ्यायला नक्की खाली येशील. मी आत्ता कॅन्टीनमध्ये बसले आहे. येशील ना?

-संध्या. Happy

पत्र वाचुन मी अवाक्! या मुलीने क्षणात माझा सगळा राग उतरवला होता. एवढं लांबलचक पत्र (तिच्या म्हणण्यानुसार थोडंसंच) लिहून तिने माझी माफी मागीतली होती. या गोष्टीचे मला कौतुक वाटले आणि हसुही आले. शेवटी ‘कशाला उगीच मागल्या गोष्टींचा राग धरायचा? माफ करुया तिला आणि आता तिच्याबरोबर चहा-कॉफी घेऊन ते बिलसुद्धा आपणच देऊया, तिलाही जरा चांगलं वाटेल.’ असं स्वतःशीच ठरवत मी लायब्रेरीच्या बाहेर पडलो. अर्थात, तिने माझे सर्व नोट्स परत लिहून मला द्यायला ठेवले होते; म्हणून मी तिला माफ केले. असे जर तुंम्ही समजत असाल तर ते Wink साफ चुकीचे आहे. मला तिची माफी मागण्याची पद्धत आवडली होती.

मी कॅन्टीमध्ये गेलो त्यावेळी कॅन्टीनच्या एका कोपर्‍यात खुर्चीवर मला ती पाठमोरीच बसलेली दिसली. कुठलातरी विचार करत एका हाताच्या तळव्यावर आपला चेहरा टेकवून खाली टेबलावर ती बोटाने कसल्याशा रेघोट्या ओढीत बसली होती.

मी गपगुमानं तिच्या टेबलासमोरची प्लॅस्टीकची लवलवती खुर्ची ओढून त्यावर (स्वःताला सांभाळत) बसलो. खुर्चीच्या आवाजाने दचकून तिने वर पाहीले आणि तिच्या चेहर्‍यावर हसू उमटले.

"मला माहीत होतं तू मला माफ करणार!!" माझ्याकडे बघत अत्यानंदाने ती उद्गरली.

"मला तुझी कॉफी नको!" तिचे बोलणे संपण्याच्या आत शक्य तितक्या गंभीर आवाजात मी बोललो आणि खर्रर्र्कन तिचा चेहरा उतरला!

"म्हणजे, तू मला अजुन माफ नाही केलस?..” केविलवाण्या चेहर्‍याने कसंसच तोंड करत ती म्हणाली.

“..आय एम रिSअली सॉरी रे, तुझी सगळी वही मी खराब करुन टाकली. मलापण खुप वाईट वाटलं तुझी वही खराब झाली त्याबद्दल. बट बिलिव्ह मी; मी मुद्दाम नाही फाडली तुझी वही. ती चुकून झाली तशी. पण... अरे- मी तर तुला सगळं लिहून दिलं होतं ना, काय झाल होतं ते. मी मुद्दाम थोडी असं करेन?

प्लिज मला माफ कर. आणि तू नोट्सची अजिबात काळजी करु नकोस. मी त्या सर्व नोट्स एका वहीत लिहून ठेवल्या आहेत. तुला बघायचं आहे का?.. थांब तुला दाखवते. बॅगेतच ठेवलेय मी वही. तुझे नोट्स फाटले म्हणून मी स्वतः रात्री जागून तुझ्यासाठी ही नवीन वही आणून त्यात दोन दिवसांत सगळ्या नोट्स लिहून...."

"मी फक्त चहा घेतो, कॉफी नाही!" मध्येच तिच्या बडबडीत खंड पाडत मी म्हणालो आणि चमकून तीने माझ्याकडे नजर टाकली.

"काय?.. मागवतेस ना चहा? कॉलेज भरेल आता" तिच्या ‘आ’ वासून आश्चर्यचकीत झालेल्या चेहर्‍याकडे पाहत मी हसून म्हणालो अन् त्याचसरशी अचानकच आनंदाची एक (भयावह) लहर तिच्या चेहर्‍यावर पसरली. त्या हसण्याने मला उगीच पुर्वीच्या नामशेष झालेल्या चेटकिणींची प्रकर्षाने आठवण झाली!

"..यु मीन.... तू मला माफ केलंस!" आपल्या आवाजातला आनंद दाबत ती म्हणाली आणि नंतर-

“ईईईईsss...अ....” हाताच्या मुठी आवळून डोळे गच्च बंद करत जवळजवळ किंचाळतच तिने आपला आनंद व्यक्त केला!

“थँक गॉSड! कित्ती मोSठ्ठं ओझं माझ्या डोक्यावरुन कमी झालं तुला माहीत आहे! मला तर वाटलं तू आता असाच माझ्यावर रागवून राहणार. बट, थँक्स अ लॉट की तू मला माफ केलंस!" मनावरच खुप मोठ दडपण कमी झाल्यासारखी ती मोकळेपणाने म्हणाली.

"...बरं थांब, मी तुला वही देते." बोलताबोलता तिने बॅग उदसायला सुरवात केली.

"नको- त्याची गरज नाही. मी माझ्या नोट्समधूनच अभ्यास करेन!" माझा (नस्ता) समजुतदारपणा!

"म्हणजे तू अजुन रागवलेला आहेस की काय माझ्यावर?"

"हॅss! तस्सं काही नाही, पण मला माझ्याच नोट्स समजतात दुसर्‍यांनी काढलेल्या नोट्सची भाषा मला समजत नाही." मी माझा पॉईंट स्पष्ट करित बोललो.

"अरे या तुझ्याच नोट्स मी कॉपी केलेल्या आहेत! माझं अ‍ॅडीशन असं काही नाही." हसत तिने माझा पॉईंट मलाच सुनावला. आणि माझ्यासमोर एक चांगली नवीन करकरीत नोट्सची वही ठेवली. (आतल अक्षर मात्र तितकच भयानक होत ते मला नंतर समजलं. तिच्या मते ती तिची धावती लिपी होती! ज्याने नंतर ऐन परिक्षेत माझी धावता-पळता भुई थोडी केली होती!! )

"काकाss दोन फSस्ट् क्लाSस स्पेशल चहा! दोन कचोरी- चार समोसा पाव- एक प्लेट गरमागरम बटाटा- कांदा भजी मिक्स ,मिरची आणि-”

तिने टेबलावरची लाल बॉटल गदागदा हलवून बघितली-

“सॉस आहे ना?- हं. पाणी कुठंय??” खडाखडा जग वाजवून उलटापालटा करत ती बडबडली.

“काका पाणी द्या ना आधी! आणि दोन बॉटल स्लाईस, एक स्प्राईट द्या इकडे पाठवून- लवकssर!!!" काका नामक कँटीनवाल्याला भंजाळून सोडत तिने लांबलचक ऑर्डर दिली.

‘बया, घरुन उपाशीच आली की काय??’ आवंढा गिळत मी पाकीटातील चिल्लर मोजली!

त्यानंतर तिने माझ्याकडे बघत जी बडबड चालू केली- ती मग नंतर त्यात - मी इकडे गेले- मी तिकडे गेले, मी हे केलं -मी ते केलं, मला हे आवडतं- मला ते आवडतं, मी मामाच्या घरी गेल्यावर असं झालं, आणि तिथं तसंच झालं, मी जेवणातलं हे बनवायला शिकले- मी ते शिकले, मला हेच येत नव्हतं नि मला तेच येत नव्हतं, मग मामीने मला असं शिकवल- मग मी असं शिकले, नंतर त्यात अशीच गंमत झाली नि माझी अशीच फजिती झाली....

क्लासरुमजवळ येईपर्यंत! तिने माझं अस्सं डोक खाल्लं कि शेवटी मघाशीच हीला माफ न करता मी सरळ-सरळ हीचा गळा दाबला असता तर किती बरं झाल असतं असं मला वाटून गेलं! पण त्या दिवसापासून मात्र आमची चांगलीच गट्टी जमली. ती आता माझ्याशी अगदी दिलखुलास (आणि माझं डोकं फुटेपर्यंत!) बोलू लागली. आपण हीला पाहीलं त्यावेळी इतकी शांत दिसणारी मुलगी एवढी बडबडी असु शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती बडबड ती तिची?!! पण नंतर तिच बडबड मला आवडू लागली. कुठल्याही गोष्टीवर ही अगदी बिनधास्तपणे बोलायची आणि हीच गोष्ट मला हिच्यात जास्त भावली. हळुहळु मला तिच्याबद्दल आवड निर्माण होऊ लागली. आपल्यासाठी अगदी परफेक्ट चॉईस आहे ही, असे मला वाटु लागले. आंम्ही आता तासन् तास कॉलेजमध्ये बोलत बसु लागलो. रोजच्याच आमच्या शिराळ गप्पा-गोष्टी, थाट्टा-मस्करी, हसणं-खिदळणं चालू झालं. 'आपण प्रपोज करावा का?' मनात एक विचार डोकावला पण लगेच- 'नको अगोदर परिक्षा होऊ दे मग विचारु’ असे म्हणत मी माझे प्रपोजल तुर्तास पुढे ढकललं.

नंतर आमची फर्स्ट टर्म एग्झाम एकदाची झाली आणि दुसर्‍याच दिवशी ही बया पेढ्याचा पुडा घेऊन कॉलेजात हजर झाली.!(???)

'पास झाल्याबद्दल पेढे? छे! कालच तर परीक्षा संपली आज लगेच रिझल्ट कसा?' मला काहीच समजेना. ती मात्र खुदकत माझ्याच दिशेने येत होती आणि रस्त्यात भेटेल त्याला पेढ्याचा प्रसाद देत होती. ह्म्म देवाला वगैरे गेली असेल. पण कधी सांगितलं नाही मला ते! मी विचारात असतानाच ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचलीसुद्धा होती.

"हाँ- हे घे.." लडीवाळपणे माझ्या तोंडात एक पेढा कोचत ती मुरडत माझ्या समोरच्या खुर्चीत बसली.

"अरे वा पेढे! कशासाठी? आज काही खास आहे का?" माझी उत्सुकता.

"अरे हे घे तर खरं! मग मी सांगते.." अजुन एक पेढा तोंडात!

“वाSS क्या बॉत है! ऑज इतके पेढे भॉरवले जातॉयत."

"भरवतेय पण तू खातोयस कुठे नीट? घे!" तोंडात अजुन एकाची भर!

"ऑग पॉन हाँग तॉर.." पुढचे शब्द तोंडातच! यावेळी एकदमच तीन पेढे मुटके करुन तोंडात ठोसले गेले होते!

"तुला पेढे आवडतात ना म्हणुन मुद्दाम आणलेत मी!" लाजुन गालातल्या गालात हसत ती म्हणाली अन् मी चमकलो.

मलाच आवडतात ना? मग सगळ्या कॉलेजला वाटायची काय गरज? आणि नेमके आजच? माझ्या डोक्यात अजुनच गोंधळ उडाला.

"ओगॉ ऑन् ऑजोच कॉ??" सुजलेल्या तोंडातुन मी कसेबसे शब्द बाहेर काढले.

"आहे तशीच गोष्ट! तू अगोदर हा पेढा घे बघु!" आता मला खरंच वैताग आला. ही बया पेढ्यावर पेढे माझ्या तोंडात अशी का ठोसतेय?

"ऑगॉ तॉ कॉरॉन् सॉSअंग तॉर्!!!"

"अरे- माझं लग्न ठरलंय!!!....... ईईईईssss.....अ! हाऊ एक्साईटींग ना..............." (!!!!!!!!!!!????????....)

"आँssख्खूsssss ऊंsss ऊंssss..... आँssख्खोsssssssओ....... ऑsख्खॉss ख्खॉss ख्खॉ......."

"ए- काय झालं? ठसका लगला का?" मी हातानेच ठिक आहे असं दाखवलं. आणि तिने पुढच्या भारूडाला सुरवात केली.

‘ऐकाsssss...!!!’

"तुला माहीती आहे मी पहील्यांदाच तुझी वही घेऊन मामाकडे गेले होते ते? अरे- त्याच तर वेळी मला बघायला पाहुणे आले होते! (माझ्या दंडावर एक हलकीशी चापट! आईई गंss...)
आईच बोलली कुठे सांगु नको. असं सांगायचं नसतं अगोदरच. लग्न जमत नाही. म्हणून तुलाही नाही सांगितलं. आज लग्नाची तारीख ठरली ना- म्हणून पहीली बातमी तुलाच देतेय! (मध्येच उगीचच तीचं खिदळणं आणि माझ्या छातीत कळ येणं) अरे त्या वेळी एकीकडे माझ्या लग्नाची बोलणी होत होती आणि मला इकडे स्वयंपाक काहीच येत नव्हता. किती ऑक्वर्ड वाटत होत मलाS! पण मग मामीनेच मला हाताशी घेऊन दोन आठवड्यातच सगळा स्वयंपाक शिकवला. आणि मी आता सगळ्याsत चांगला स्वयंपाक बनवायला शिकले! (आपली नसलेली कॉलर ताठ करत ती म्हणाली.) पण तरीही तुला सांगते, पहील्या-पहील्यांदा मला इतकं घाबरायला झालेलं.. काय बोलायचं? कसं बोलायचं? काहीच माहीत नव्हतं अगदी बावचळुनच गेले होते मी. पण नंतर काहीच वाटल नाही. एकदSम बिनधास्त झाले मी!

हम्म... (मी मान डोलावली)

अरे होs, ते मला बघायला आले त्यांचा गमतीचा किस्सा तर सांगितलाच नाही मी तुला! (मेलेल्या माणसाला बायका हलवतात तसं यावेळी तिने मला गदागदा हलवत जागं केलं)

..त्यावेळी ना सकाळपासूनच आमच्यात पाहुण्यांची रांग लागलेली होती आणि झालं असं की...."

उशीरपर्यंत बडबडत ती तीचा ‘किस्सा’ सांगत होती. आणि मी मात्र उगाच भकासपणे कुठेतरी पाहत आपला- तोंडातील मऊशार पेढे दगडासारखे फोडून खात होतो! त्यावेळी समोर तीन मुलींशी लगट करत बसलेला अमित मात्र माझ्या या केविलवाण्या परिस्थितीवर दात विचकत बसला होता. (बापाला पोराची करामत सांगायला लागणार असं दिसतंय!)

त्या दिवशी माझ्या या छोट्याSशा लव्हस्टोरीचा निर्दयपणे शेवट झाला. या गोष्टीला इथंच पुर्णविराम देऊन विसरुन जाऊया. असं मी त्यावेळी ठरवलं. पण ही बया मला विसरुन देईल तर ना! नेमके फायनल एग्झामच्या आदल्या दिवशीच तिने मला न विसरता आपल्या लग्नाची पत्रिका पोचती केली आणि वरुन छोट्या आमंत्रक (-कि निमंत्रक?) सारखे "माझ्या लग्नाला यॉयचॉ हॉ..!" असं लाडकतच सांगुन निघुन गेली. त्याचा दुष्परिणाम माझ्या पहील्याच पेपरावर झाला. परिक्षेत पेपरामध्ये काहीच सुचेनास झालं, डोकं बधिर झालं आणि डोळ्यांसमोर तर सरळ-

पेढे-पत्रिका, हळदी-कुंकू, गजरे-अक्षता, पान-सुपारी, मंडोळ्या-बाशिंग, वर-वधु, असेच काहीसे दिसु लागले. क्षणभर मी एखाद्या लग्नमंडपात आलो की काय, असा मला भास झाला. तेवढ्यात.. 'पेपर लिही- गाढवा..!!' माझ्या अंतरमनातुन कोणीतरी माझ्यावर खेकसले आणि डोकं झिडकारतच मी मनातले विचार दुर सारले, स्वतःला सावरलं तोच- माझी नजर माझ्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्यावर पडली-

‘पिंटु??’

खाली मुंडी घालुन तो शांतपणे पेपर लिहीण्यात मग्न होता. मला आश्चर्यच वाटले. क्लासमध्ये तर कधी कुठल्या बाप जमान्यात बसलेला तो मला दिसला नाही! लिहीण्या-वाचण्यात कंटाळा, कॉलेजच्या नावाने बोंब, अभ्यासाच्या नावाने शंख!, परिक्षेच्या बाबतीतही कधीच सिरिअस नाही आणि असा पिंटु आज चक्क मन लावुन पेपर लिहीत होता! नाहीतर आंम्ही एका मुलीच्या नादी लागुन बसलोय. मला स्वतः वरच राग आला. 'शिक शिक काहीतरी शिक त्याच्याकडुन!' पुन्हा माझ्या अंतरमनातुन एक उपहासात्मक आवाज आला. पण नंतर दुसर्‍याच क्षणी मला पिंटु बद्दल कुतुहल जागे झाले. मी कधीच त्याला लिहीता वाचताना बघितले नव्हते. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली (ही नको त्यावेळी जागी होते!)

तो काय लिहितोय हे बघण्यासाठी मी बेंचवरुन थोडं पुढे पोटावर झुकत त्याच्या पेपरात हळुच डोकाऊन पाहु लागलो आणि...

‘आँssss.....’

एक जोरदार कळ माझ्या छातीतुन आरपार निघुन गेली. ती कळ उजव्या हाताने दाबत मी तसाच मागे आदळलो! (हार्ट अटॅक म्हणतात तो हाच असावा बहुदा) त्याने आपल्या सर्व पेपरावर-

"'श्रीराम- जयराम- जयजय राम । जय-सिताराम, जय बाबा-हनुमान!”

असल्याच काहीशा लिरिक्स लिहील्या होत्या! आणि पुढचा पेपरही तो अशा ओळीने भरत होता. मुख्य म्हणजे यासाठी त्याने ऑलरेडी दोन पुरवण्या (सप्लिमेंट) जोडलेल्या होत्या!!!

"एss हे काय लिहीतोयस पेपरात???" मी त्याला मागुन ढोसलतच रागाने विचारले. तसं त्याने हळुवार माझ्याकडे बघितले. एखाद्या शांsत महायोगीसारखा तारवठलेल्या डोळ्यांनी-(ह्याने खरंच रात्री घेतली होती का?) ओठावर बोट ठेवत मला शांत राहण्याचा इशारा दिला.

"हे काय आहे?" मी पुन्हा आवाजावर नियंत्रण ठेवत त्याला विचारले.

“अभ्यास केला नाही यार. काहीच सुचत नाही, म्हणून जप करतोय. (यावेळी मला उगीच ‘शंख करतोय’ असे ऐकू आले!)

निदान यामुळे तरी सर मला काही मार्क्स देतील!!! (?)"

हायला! यानं अभ्यास केला नाही म्हणून सरांच्यावर इमोशनल अत्याचार करणार का हा?

आणि सरांनीही असेच मार्क्स द्यायला ते काय रामाचे आणि हा काय हनुमानाचा अवतार आहे का?

वाईट्ट वाटलं!

काही क्षण मला, माझा पेपर पिंटुला द्यायचा मोह अनावर झाला. पण अर्धा तास झाला तरी मी माझ्या नावाखेरीज त्यात काहीच लिहिलेले नसल्याने तो (नस्त्या आगाऊपणाचा) मोह मी वेळीच आवरला.

हो! नाहीतर मोकळा आहे म्हणून त्यातही पिंटु बाबा ‘जय राम- श्रीराम’च्या लिरिक्स लिहून ठेवायचे!

त्या परिक्षेनंतर पिंटु मला कधीच दिसला नाही. फक्त एवढंच समजल की तो त्याच क्लासमध्ये राहीला. कदाचित त्याच्या दिव्य जपाने प्रभावित होऊन सरांनीसुद्धा रिमार्क मध्ये अशाच लिरिक्स लिहून हा मुलगा माझ्याच क्लासमध्ये रहावा म्हणुन देवाकडे भारी भक्कम साकडं घातलं असावं! पण या सर्व प्रकारामुळे देव आणि भक्त या दोन गोष्टीपासून मात्र मी चांगलाच धसका घेतला.

एकंदरच्या या सर्व प्रसंगामुळे तरी मी कानाला खडा लावला! मरो त्या मुली अन् मरो त्यांचे ते सौंदर्य! लक्षच द्यायचे नाही आता, असे ठरवून मी माझी भिष्मप्रतिज्ञा एका फुलस्केपवर खरडली. (कालांतराने ती चपात्याच्या टोपलीत- नंतर कचर्‍याच्या डब्यात गेल्याचे मला समजले) तशी मी ती पुर्णही केली होती! कारण मला आठवतेय त्याच काळात काही मुली उगीचच मैत्रीच्या बहाण्यानं माझी जास्त जवळीक करायला बघत होत्या. पण मी मात्र त्यांना ढुंकूनही बघितलं नव्हतं!

त्यातल्याच त्या दोन ललना! (नको- नाव नको सांगायला)

तर या दोघी, रंभा-मेनका यांच्याकडूनच शिकवणी घेत असल्यासारख्या वागायच्या. मुलांच्या रो-मध्ये पुढच्याच बेंचवर बसायच्या. कधी लक्ष गेलंच तर माझ्याकडे बघून हसून टाटा केल्यासारख्या हात हालवायच्या. तर कधी माझ्या समोर घिरट्या घालायच्या.

आमचा बेंच तर त्यांनी- त्यांचं सासरंच बनवून टाकलं होतं. कधीही या. गप्पा मारत बसा. रिसेसमध्ये डबा खा. खरकटं सांडून जा! कधी आम्ही बेंच सोडून जरा इकडे तिकडे गेलो की हात पसरुन ताणूनच द्या!

आता अशा झोपल्यावर त्यांना जागं तरी कसं करायचं? टेबल वाजवावा तर त्यांच्या अवयवांनी सगळ्या बेंचवर कब्जा केलेला. उरलासुरला केसांनी आच्छादलेला!

काही करायला जावावं तर भलताच अर्थ निघायचा. आणि नावानं हाक मारावी तर त्यांची नाव धड लक्षात राहत नव्हती.

टिनू मिनू सारखीच यांची जुळी नावं!

हेही करुन भागत नसे म्हणून की काय- कधीकधी, मी बेंचवर बसलेलो असताना टुन्नकन उड्या मारुन या सहज माझ्याकडे पाठ करुन बसायच्या!

म्हणजे बरोबर आमच्या पुढ्यातच त्यांचं...

अगगं..

माणसानं कंट्रोल करावा तरी किती?

त्यांना मी आवडायचो इथपर्यंत ठिक, पण हे असंच करा- असं कुठच्या शास्त्रात दिलंय.

आणि नेमक्या स्त्रीयाच यात निपुण असतात. सतत पुरुषांवर हा खेळ आजमावत त्यांचा छळ करत असतात. कारण त्यांना माहीत असतं हे त्यांचं एकमेव प्रभावी शस्त्र आहे!

तर या जोडगोळीनं वर्षभर माझा पिच्छा पुरवला. मी मात्र निर्णयावर ठाम!

थोडक्यात मी माझी भिष्मप्रतिज्ञा तंतोतंत पाळली. हा, पण एक अपवाद मात्र नक्की झाला.

खरं सांगायच तर मी काय, माझ्याजागी कोणी जरी असतं तरी तिला पाहण्याचा मोह आवरला नसता! अगदी सॉफ्ट आणि फ्रेश फेस होता तिचा. ब्राईट, चार्म, क्युटनेस, सर्व काही त्यात एकवटलं गेलं होतं. बघितल्यावर नुसतं बघतच रहावं असं. नावही तिला शोभेलसंच होतं- तुल्लू. (हे मात्र ओरिजनल नाव आहे हं!) हे नाव मला आमच्या मिसकडून कळालं. प्रथम नावाचा अर्थ माहीत नसल्याने ते ऐकताच मी डोक्यावरुन गर्रर्रकन बोटं फिरवली. तशी मिस माझ्याकडे बघतच बसली.

“तुला काय म्हणायचं आहे ते कळलंय मला, पण तुल्लू म्हणजे काय टकलू नाही!” मिस मलाच टोला हाणत म्हणाली. अर्थात त्या नावाचा अर्थ मला नंतर उशीरा कळाला.

तर- तुल्लू काझी (आय थिंक काझीच आडनाव होतं तिचं) या मुलीच्या बाबतीत मात्र आमचं मनावरच नियंत्रण सुटायचं. खुप वेळा वाटायचं, तिला भेटावं. तिच्याशी फ्रेंडशीप करावी. बोलावं, निदान ‘हाय’ ‘हॅलो’ पुरतं तरी! पण नाही. कदाचित काही गोष्टी स्वप्नातच चांगल्या दिसतात. मी कधीच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. एकतर तिची लाईफस्टाईल पुर्णपणे वेगळी होती आणि दुसरं म्हणजे ती सिलेक्टेड फ्रेंडशीपमधली असावी किंवा तिचे फ्रेंड्सही अगदीच हायफाय असावे असे मला वाटत होते. असो,

हीच्याबाबतीत एक इन्सीडेंट मला आठवतो- म्हणजे तो का झाला, कशामुळे झाला, याचा अर्थ अजुनही मी लावू शकलेलो नाही.

त्या दिवशी मराठी वाड्:मय विभागाचे प्राईज डिस्ट्रीब्युशन होते. मराठीच्या मिसने मला आणि दुसर्‍या एका मुलाला टेबलावर सजवलेल्या ट्रॉफिजकडे लक्ष ठेवायला थांबवले होते. त्यामुळे मला खुपच कंटाळा आला होता. मी त्याच्याशी गप्पा मारत कसातरी वेळ घालवत होतो. पोलिटेक्निकल बिल्डींगच्या ऑडिटोरिअल रुमला- डाव्या बाजुच्या भिंतीजवळ, तिथेच दोन सलग टेबल जोडून त्याच्यावर सैन्याच्या शिस्तीत, ती बक्षिसे ठेवण्यात आलेली होती आणि त्याच्या एका टोकाला आंम्ही दोघे बोलत उभे होतो. बोलताना असंच सहज कोणीतरी टेबलाच्या पलिकडल्या टोकाला आल्याचे जाणवले. मी फारसे लक्ष न देता तिकडून तोंड फिरवून मागच्या टेबलाला टेकून उभा राहीलो. टेकताना मागे टेबलाला दोन्ही बाजुंनी पकडत आधार घेतला. काही वेळाने पलिकडच्या व्हाईट ड्रेसवाली व्यक्तीसुद्धा आधारासाठी टेबल पकडत त्यावर रेलली अन्-

अगदी क्षणात घडली ती क्रिया. काही करण्या समजण्याचीही सवडही मिळाली नाही.

झर्रर्रकन टेबलातून करंट सळसळला. झप्पकन् माझ्या हाताकडे झेपावला. विजेच्या वायरीला चुकून हात लागावा आणि सगळ्या शरीरात असंख्य मुंग्यानी ताबा घेत वीज उतरावी, आपल्या शरीराच्या त्या भागाला बधीर करुन टाकावं तसंच काहीसं झालं. वेगात मुंग्या हातातून पास झाल्या. झटकन् टेबलापासून लांब होत मी कळवळून ओरडलो. हात झाडत हात टेबलाकडे बघू लागलो. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशी पलिकडची व्यक्तीही चटकन् टेबलापासून दूर झाली. माझ्याकडे टकामका पाहू लागली. सहज लक्ष गेलं. तर-

समोर तुल्लू काझी!! जी माझ्या ओरडण्याने बावचळून माझ्याचकडे पाहत होती!! मला वाटतं ते पहिल्यांदाच तिनं मला पाहीलं होतं. पण क्षणभरच.

“काय झालं?” पुढच्या मुलाने मला विचारलं.

“काही नाही रे- करंट बसला” मी तिच्याकडे बघत तसाच हात झाडत म्हणालो. आणि पुन्हा टेबलाला चिटकून कुठे शॉर्ट-सर्किट झालेली वायर वगैरे आहे कि काय ते मी पाहू लागलो. आश्चर्याची गोष्ट अशी कि त्या टेबलाला चिटकूनच काय पण त्याच्या जवळपास कोठेही इलेक्ट्रीक बोर्ड, किंवा वायर नव्हती- जी करंट पास करु शकेल, ते बोर्ड मध्ये दरवाजा सोडून पलिकडच्या भिंतीकडे होतं!

आणि समजा, ते तिथं असतं तरीही करंट पास करु शकलं नसतं- कारण ट्रॉफिज जरी धातुंच्या असल्या तरी तो टेबल पुर्णपणे लाकडाचा होता! तर मग त्यात करंट येण्याचा संबंध येतोच कुठे?? शिवाय मला बसलेला झटका हा साधासुधा हाताच्या मुंग्यानी बसलेला नव्हता. तो एखाद्या विजेच्या झटक्यासारखाच होता!! हे कसं काय होऊ शकतं?

त्या एका इन्सीडेंटचा मला शेवटपर्यंत अर्थ उमगलाच नाही. मग शेवटी- ती फक्त एक सुंदर मुलगी होती- मी तिच्याकडे अट्रॅक्ट होत होतो- आणि म्हणूनच तो मला भास झाला! असा काहीतरी खुळचटासारखा अर्थ लावून मी गप्प बसलो. नंतर मात्र मीच तिला डेलिब्रेटली इग्नोर करायचं ठरवलं आणि तुल्लूचं प्रकरण तिथेच स्टॉप झालं.

त्यानंतर मुली हा विषय माझ्यासाठी बंद झाला.

पण म्हणतात ना एखादी वस्तु पाचविला पुजल्यावर ती आपला माग कधीच सोडत नाही, तशा या मुली जणु माझ्या पाचविलाच पुजल्या गेल्या होत्या! ही नाहीतर ती! पण झटका द्यायला कोणीतरी तयार असणारच!! आणि तशीच एन्ट्री झाली ती दुसरीची....
===================================================================
क्रमश:
भाग=>> _3

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त..

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत