जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!_3

Submitted by अन्नू on 27 March, 2018 - 15:11

कॉलेजच्या ग्रॅज्युएशनचे लास्ट इअर. आमच्या क्लासमध्ये दोन-तीन न्यु अ‍ॅडमिशन आले. यामध्ये एक मुलगी सुद्धा होती. साधीच होती पण तरीही सगळ्यात उठुन दिसत होती. दुधाळ रंग, साध्या लुज- लो पोनीटेल टाईप मागे बांधलेले काळेभोर दाट- गुळगुळीत केस आणि तेजस्वी चेहर्‍यावर सतत एक आत्मविश्वासी हास्य! स्वभाव सुद्धा मनमिळावू आणि फ्रेंडली होता तिचा. अगदी ‘परफेक्ट वुमनचीच’ उमपा द्यावी अशी होती ती. तिला पाहताच माझ्या डोक्यात-
‘गोरी गोरी पान! फुलासारखी छाsssन, दाsदा मला एक बायssको आsssण!’ या गाण्याच्या लिरिक्स वाजु लागल्या.

मला तर तिची पर्सनॅलिटी खुsssप आवडली. (आता ती भिष्मप्रतिज्ञा पाणी प्यायला गेली तरी माझी काही हरकत नव्हती!) मला वाटले आपल्या स्वप्नातली हीच का ती सुंदरी?? (कोणत्याही सुंदर मुलीला बघितल्यावर प्रत्येक मुलाला असे का वाटते ते मलाही अद्याप कळालेले नाही, इश्श!) तिच्याशी बोलायला जावं का अशा दुविधेत असतानाच एक दिवस मला ती संधी भेटली. लायब्रेरीमधील पुस्तक परत करायला मी गेलेलो असतानाच ती मला लायब्रेरीच्या विंडोजवळ दिसली. ती आपले पुस्तक घेण्यासाठी तिथे उभी असावी, कारण लायब्रेरीच्या आतमधील पुस्तकावर नजर फिरवत तिची कसलीशी शोध मोहीम चालु होती. मलाही पुस्तक चेंज करायचं होतंच (ज्जे ब्बात! याला म्हणतात लक!) मग काय? धावतच गेलो. तिच्या मागे उभा राहीलो. पण...
बोलायचं काय?
‘एक्सक्युज मी’ ???? छे! ते अगदीच फिल्मी वाटेल...
मग?
काहीच कळेना! उवा पड्या बाईसारखं खराखरा डोकं खाजवत मी मनातल्या शब्दांची धरपकड करु लागलो. (यावेळी कोणी बघितलं असतं ना, तर माकड म्हणून मला नक्कीच झू मध्ये पाठवलं असतं!)
इतक्यात- शरीरातल्या नळ्यानं नळ्या हालवून टाकत एक खणखणीत थाप माझ्या पाठीवर पडली!

"ए हाय!! अरे- क्या हाल है??"
आवाजाने दचकुन मी बाजुला पाहीले तर एक मुलगा वजा मुलगी आपले संपुर्ण बत्तीस दात दिसतील अशा पद्धतीने हसत माझ्याकडे पाहत होती!

‘आता ही कोssण?? क्लासमधली तर नाही, ओळखीचीही वाटत नव्हती, मग नातेवाईक...छे! कॉलेजमध्ये कोण नातेवाईक येणार?’

मी माझ्या डसबिन मेमरीमधून तिची ओळख काढण्यात बुडालो. तोच अजुन एक थाप मारत तिने माझा खांदा उपसुन निघेल अशाच पद्धतीने जोरात हलवला.

"क्या हुआ? मुझे पेहेचाना नहीं??" आता ही कोण ऐश्वर्या की अॅन्जोलिना! जे सर्वजण हीला ओळखतील?
"अरे कल जो तुने, ओ गाना गाया था ना.."

"हाँ...हाँ...." मी काहीतरी आठवल्यासारखा करत. पण हीचा काय संबंध त्यात? माझी पुन्हा तिच्याकडे प्रश्नार्थक नजर!

"हाँ तो, वही तो ऑडीअन्स में पिछे बैठे थे हम सब लोग!"

“हाँsss...." आत्ताशी माझ्या डोक्यात ट्युब पेटली. (म्हणजेच मागच्या टोळक्यांत बसुन 'राज' मधल्या बिपाशासारखी वेळीअवेळी किंचाळणारी हीच का ती भवानी!)
"अरे यार क्या फाडू (?? नक्की ही मुलगीच आहे ना?) गाना गाया था तू, क्या चिल्लाया, क्या गला फाडाs...”
ही माझी तारीफ करतेय की माझी इज्जत काढतेय?

"सच्च में कमाल कर दिया। सारे लोग तुझपे फिदा थे और हमारा ग्रुप तो तेरा फॅन ही हो गया यार!!" या प्रशंसेने मात्र माझी कॉलर ताठच झाली. क्षणात मी हवेत तरंगु लागलो आणि स्वर्ग तर जणु माझ्या एक हात... पायाखालीच गेला होता! माझी तोंड भरुन स्तुती करणार्‍या या एकुलत्या एका फॅनला बघुन मला पटाssपटाss त्याचे मुकेच घ्यावेसे वाटले, पण समोरची फॅन, मुलगी असल्याने मी स्वतःला तिथेच आवरते घेतले. त्यानंतर काही वेळाने तिने माझा निरोप घेतला. ती गेली.
मी मात्र माझ्याच धुंदीत एखादा मोठा स्टार असल्याच्या अविर्भावात अजुनही आपली छाती काढुन डोक्यांवरच्या अस्ताव्यस्त (बिनातेलाच्या) केसांवरुन हिरोसारखा हात फिरवत होतो आणि त्याच वेळी...
माझ्यासमोर उभी राहीलेली ती मात्र आश्चर्याने माझ्याकडे बघत होती!

"मिताsली.... त्या ऑथरच पुस्तक नाहीए इथं. सर्व संपलेत. तू हे घेऊन जा ना!" काचेरी विंडोच्या बिळातून कुठूनशी लायब्रेरीयन म्हणाली आणि तिने तिकडे नजर फिरवली.

"नको हो, यात काहीच नाहीए. मी बघितलंय हे पुस्तक. ह्म्म्मss... बरं मग एक काम कराल का- मला तेच द्या मघाशी तुंम्ही दाखवलेलं! ह्म्म!" ओठ रुंदावून भरभरुन स्माईल देत ती लायब्रेरीयनला म्हणाली आणि लायब्रेरीयन पुन्हा पुस्तकांच्या ढिगार्‍यात गुडुप झाली.
तिच्या बोलण्याने मला काहीशी शंका आली.

"तुंम्ही शाळेत शिक्षिका आहात का?" मी तिच्याकडे पाहत प्रश्न विचारला. (झाला, परत आमच्यातला ए.सी.पी प्रद्युमन जागा झाला!)

अचानक आलेल्या प्रश्नाने तिने माझ्याकडे नजर टाकली.

"नाही तर!" प्रश्नार्थक नजरेने बघत ती म्हणाली. आणि पुन्हा लायब्रेरीमध्ये पाहत आपल्या शोधमोहीमेला लागली.

"पण मला असं का वाटतंय की तुंम्ही शिक्षिकाच आहात म्हणून!." मी पण हटवाद्यासारखा एकाच प्रश्नावर कायम!

मग मात्र मनात काहीतरी विचार करत तिने माझ्याकडे नजर फिरवली आणि माझे निरीक्षण करु लागली.
"का?- कशावरुन?"

"नाही म्हणजे तुमचं बोलणं- इतरांना असं समजदार व्यक्तीसारख संबोधणं मला एखाद्या शिक्षिकेसारखंच वाटतं. म्हणजे.. शिक्षक कसा एखाद्या लहान मुलाला अगदी समजावून देत बोलतो तसंच... आय मीन त्या प्रकारचं तुमचं बोलणं आहे.. म्हणजे- तुंम्हीही तशाच पद्धतीने बोलता ना म्हणून आपलं साधं गेसिंग..."
माझ्या केविलवाण्या हावभावांकडे बघुन मात्र ती तोंडावर हात नेत खळाळून हसली.

"हो, मी मुलांना शिकवते!.. (येस्स- अंदाज एकदम बरोबर!)
"..पण मी काही शिक्षिका नाही." मध्येच पच्चssकन थुंकावं तशी ती बोलली.

आ? हा काय प्रकार आहे? शिकवतेसुद्धा आणि म्हणते, मी शिक्षिका नाही!

"म्हणजे?.." काहीच न समजुन मी तिच्याकडे पाहीले.

"अरे म्हणजे मी चौथी पर्यंतच्या मुलांची घरी शिकवणी घेत होते. मी शाळेची शिक्षिका वगैरे नाही काही"
(घ्या, आता हीची पण अरे तुरेचीच भाषा!)

"हाँ! अस्सं- अस्सं." मी पण मला काहीतरी समजल्यासारखा दुजोरा दिला.
"..तुमचं न्यु अॅडमिशन ना इथे?" माहीत असुनही खुळचटासारखा माझा दुसरा प्रश्न!
"हो."
"या अगोदर कुठल्या कॉलेजमध्ये होता?"
"अभिनवला."
"अभिनवला?, पण मग अचानक तिथुन इथं का? आय मीन ते तर डिग्रीपर्यंत कॉलेज आहे ना!"
"हो! पण मी मध्यंतरी कॉलेजच सोडलं होत.."
"का?"
"काही नाही रे, काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते."
"हुं,.. मग आता पुन्हा अॅडमिशन? घरच्यांनी सांगितल असेल जा परत म्हणून!"
"अहं घरच्यांनी नाही- सुनिलच बोलला जा म्हणून."
"सु..सुन्नीssल..(??) म्हणजे कोण फ्रेंन्ड का..?" माझी जिभ काहीशी अडखळल्यासारखी मला जाणवली.

"..ऊम्म्म्म...हुं!! बॉयफ्रेंड.....!!!!!(????)" लटालटा मान हलवुन मध्येच टुचुक्कन दाना टीपणार्‍या कोंबडीसारखी मान हालवत ती म्हणाली आणि त्याचवेळी 90ज् च्या दूरचित्रवाणीवर रात्रीच्या बारा-एकच्या नंतर सप्तरंगी पट्ट्या पडुन येणार्‍या एका लाँग बिपसारखी माझ्याही कानात आरपार एक दीर्घ ध्वनी घुमु लागली.... टूऊऊऊऊऊऊऊऊऊऊईईईईईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग................................

आणि मग तिने आपल्या पुराणकथेला सुरवात केली!.....
‘ऐकाssssss......’

"सुनिल आणि मी कॉलेजात असल्यापासूनच एकमेकांना ओळखत होतो. नंतर त्यानेच मला प्रपोज केलं. आणि मीही ते एक्सेप्ट केलं (तिची हलकीशी लाजण्याची अॅक्शन. अन् माझी- केविलवाणी हसण्याची!)

“हॅ हॅ हॅ..” (हस- हस मेल्या, तू असाच हसत मरायचास!)

“माझ्या घरच्यांनाही त्यानेच सांगितले आणि त्याने माझा हात मागितला- त्यांच्यासमोर!”

“चक्क?” (रड रड्या रड!)

“मग? पण आता ओळखीचाच म्हटल्यावर ते तरी कशाला नाही म्हणतील? हो की नाही?” मी मान डोलावली. (कशाला हलवली कुणास ठाऊक! तीनं फक्त ‘हो की नाही’ विचारलं म्हणून हलवली इतकंच!)

“म्हणाले हो. मग काय? घरच्यांच्याच वतीनं साखरपुडा झाला आता लग्नच तेवढं व्हायचं बाकी आहे. (खळ्ळ्ळ्ळ्ळ.....!!!”)

धाड्ड!!!
लायब्रेरित येत मी हातातील पुस्तक जोरात टेबलावर आपटलं.
'काय शिस्त वगैरे आहे की नाही? ज्याला आपण पसंत करावं त्यावर दुसर्‍यानं अगोदरच लेबल लावून ते बुक केलेलं असावं? अरे पचका पचका म्हणजे किती करायचा?’
मनातच(!) जोरजोरात ओरडत मी मुकेपणाने ओठ हलवत हवेत हात नाचवत होतो.
इतक्यात माझं लक्ष समोर गेलं आणि माझ्या मनातील विचारांना कच्चकन ब्रेक लागला.
माझे हावभाव पाहून अमितने समोरच्या पाटीवरील ‘कीप सायलेंस’च्या मध्ये ‘आऊट’ शब्द टाकून त्याचा अर्थ ‘कीप आऊट सायलेंस’ असा केला होता आणि आता स्वत:च्या खुर्चीत बसून माझ्याकडे बघत आपली बत्तीशी दाखवत होता.

‘लायब्रेरीच भान ठेऊन शांत बसलोय रे, नाहीतर असाच जमिनिवर लोळावला असता!

दाताड्या तू चारचौघात बाहेर भेटच- तुला सांगतो बरोबर’ मनात म्हणत मी आपल्या मर्दानी मनगटाला पिळ दिला. इतक्यात-

“स्स्.. हात दुखतोय का?” फुसक्या बारसारखा नुसताच श्वासांच्या हवेने भरलेला एक काळजीयुक्त नाजुक स्वर गळ्याच्या खोSल गर्तेतून कुठूनतरी माझ्या कानावर आला आणि माझी दृष्टी आवाजाच्या दिशेकडे वळली. तर बाजुच्याच कोपर्‍यात..

आमच्याच क्लासमधली मुलगी- नूतन बसलेली.

अगदीच मेटाकुटीला आलेली शरीरयष्ठी आणि गरीब गायीसारखी दिसणारी चर्या. तीचा कोमेजलेला चेहरा पाहून मलाच कसेसे झाले. (काय खाते की नाही ही बिचारी!)
क्लासमध्येसुद्धा अगदी शांत असणार्‍या या मुलीचे मला नेहमी कुतुहल वाटत असे. हीला कधीही बघितली तरी ही आपल्याच तंद्रीत हरवल्यासारखी असायची. कुठल्या स्वप्न, जग, भावविश्वात तरंगत असायची कुणास ठाऊक!

असंच कॉलेजच्या फंक्शनच्या दिवशी ही स्टेजवर ग्रुप डान्ससाठी आली होती. आत्ताचं- दीपिकाच्या ‘घुमर’ गाण्यासारखंच मराठीतलं कुठलंसं फेमस गाणं होत. त्यात एका स्टेपला मुलींनी एकाच वेळी उजव्या बाजुनं एक- एक, असं करत तीन वेळा स्वत:भोवती गिरक्या घ्यायच्या होत्या. पण ऐन वेळी हीच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, मुलींनी उजव्या बाजुनं गिरक्या घेताच हीनं एकटीनंच गर्रकन डाव्या बाजुनं गिरकी घेतली. परत एकदा घेतली. मग दोन वेळा अशी उलटी प्रदक्षिणा घेतल्यावर, पुन्हा ती त्यांच्या स्टेप्समध्ये स्टेप्स मिळून नाचायला लागली!
जेव्हा हे सांगून मी तिला याचं कारण विचारलं तर, मलाच उलट म्हणाली,

“तुझं बरं माझ्याकडे लक्ष होतं?!!”

अगं ग्रुपमध्ये डान्स करत असताना एका सेम स्टेपला जर एखादी मुलगी भंजाळल्यासारखी भलतीच स्टेप करत असेल तर ते सगळ्यांत उठून दिसणार नाही का?
पण बया यामुळे संशयानंच माझ्याकडे (तिच्यामते-) तिक्ष्ण नजरेने बघायला लागली.

तसा तिचा चेहरा आणि वर्तन हे भयंकर परस्पर विरोधी होते. आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट मी पाहिले होते. एकदा असाच कॉलेजच्या कट्ट्याजवळ उभा असताना ही कॅनटीनमधून चालत येत होती. हातात काहीतरी पेपर असावा. कपडे पिळावेत असा तो- ती पिळून काढत होती. तेही चेहर्‍यावर गरीब गाईचे भाव आणून- सहज! जेव्हा ती सेकंड फ्लोअरला- क्लासरुमजवळ पोहोचली, तेव्हा तिच्या हातातल्या करकरीत न्युजपेपरच्या वळकट्या तेवढ्या राहिल्या होत्या. तिला विचारलं- तर म्हणे,

‘कँटीनमध्ये असाच पडला होता, कोणी वाचत नव्हतं म्हणून घेतला’

अरे?? वाचत नव्हतं म्हणजे काय?- नवीन पेपर होता तो, नंतर कोणीतरी वाचलाच असता की, नाहीतर कॅन्टीनवाल्याने बटाटेवडे ठेवण्यासाठी तरी घेतला असता. का टेबलावर पडलाय म्हणून सरळ त्याच्या पिळून-पिळून चिंध्या करुन टाकायच्या? काय कपडे आहेत की काय ते पाणी काढायला!

छे! पोरीनं पार बधीर करुन सोडलं. वाटलं, हीच्या सानिध्यात येणार्‍याला ही असंच पिळून काढणार, तर ते प्रात्यक्षिक नेमकं माझ्यावरच घडलं!

लायब्रेरिमध्ये चांगला वाचत बसलेलो असताना अचानक माझा चेहरा वेदनेनं पार उभा-आडवा, वाकडा-तिकडा- गोल-तिरका, शटकोनी-उटकोनी कशाही पद्धतीने विचित्र शेप घेत गेला.

‘सू.. हाss…’ करत मी मांडीवर चोळत तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला तर ती थंड नजरेने माझ्याकडे बघत होती (ही गुंड्यांच्या घरची तर नाही ना?)

मी बघताच जीव गेलेल्या, मरगळत्या (कि फुसकत्या?) आवाजात म्हणाली-

"अरे या ओळीचा अर्थ काय?"!!!!

अगं बिनडोक येडे, त्यासाठी मांडीला असा भयानक चिमटा घेण्याची काय गरज होती? हलवून विचारलं असतंस तरी सांगितलं असतं की!
तुझ्यात जीव नाही म्हणून दुसर्‍याचे जीव काढतेस का!
त्या दिवशी तिच्या बाजुला कोणीही का बसत नव्हतं ते कळालं.
आणि हीच थंड खूनशी मुलगी, आत्मियतेने- कळवळून(?) वगैरे माझी चौकशी करत होती! (बोंबला!)

“काय झालं?”
“काही नाही” मी खुर्चीत बसत रागाने म्हणालो. त्यावर तीला काय वाटलं काय माहीत. पण तीच्या चेहर्‍यावरची एक रेषही हलली नाही! (एरव्हीही ही अशीच असते, तोंडावरची माशीही न हलणार्‍या हॉरर सिनेमातल्या हिरोसारखी!)

“तुझंपण लग्न ठरलंय का?” मी अनाहूतपणे बोलून गेलो. त्यावर तिने ‘दुनियादारी’तल्या शिरीनसारखे पेंगुळते डोळे माझ्याकडे वळवले (ऐन वेळी ही नक्कीच देशी दारुच्या गुत्त्यावरली बेवडी म्हणून खपली असती!‌)
चेहर्‍यावर मात्र तेच ढिम्म एक्सप्रेशन्स!

“हो ठरलंय ना” ती शांत मिस्कील सुरात उद्गरली.

“वा!!! कोणाशी?”

“तुझ्याशी!!!”

हायला, शॉकच बसला. हे काय नवीन आता? बयेची लक्षणं काही नीट दिसत नव्हती. घरचे बोलत होते ते बरोबर होतं, मुलीपासून सावध रहा...
मला गप्प राहिलेलं बघून तीच पुढे म्हणाली-
“हो तर, माझ्या नवर्‍याचं नाव प्रणित..” मध्येच बाजुच्या मैत्रीणीच्या कानात खुसूरफूसूर करत माझं आडनाव कन्फर्म करत बोलली-

“प्रणित **** आहे”

मी कसंनुसंच हसलो. गालात जिभ घोळवत ती भलत्याच नजरेनं मला आजमावत राहीली...
तीच्याबरोबरच्या त्या वातावरणात मला उगीचच ‘प्यासी चुडैल’ वगैरेचं फिलिंग यायला लागलं. इतक्यात तीनं दुसरा बॉम्ब फोडला-

“सग्गळं ठरलंय. पत्रिकापण छापायला दिल्यात- बोल कधी करतोस लग्न? अ?”

मर तिच्यायला!!

तसाच सरळ टेबलावरचा बोजा बिस्तारा कसाबसा गुंडाळत भूत मागं लागल्यासारखा लायब्रेरितून बाहेर पळत सुटलो...
ती अन तीची मैत्रीण मागू ‘अरे अरे’ करत खदाखदा हसत सुटल्या!

नूतन प्रकारानंतर मी मुलींना बिचकूनच राहायला लागलो. काय माहीत अशीच कुठली प्यासी डायन ‘हॉSS...’ करत ड्रॅक्युला सारखी माझ्या मानेवर दात घूसवेल ती! त्यामुळे मुलीपासनं मी हातभर अंतर ठेऊन वागण्याचं ठरवलं. पण मुलीच ना त्या, आमचा असा पिच्छा कसा सोडतील?

एक तर भर दुपारी घरातच घुसली होती.
अगं, आजुबाजुला कोणी चिटपाखरु नाही. समोरचा रुम बंद. बाजुच्या घराला टाळा. आमच्या घरातही मी एकटाच. आणि अशात घरात काय घुसतेस?
सेल्स एजंट म्हणून आंम्हीही काम केलं होतंच की. पण असं अविचाराने वेडेपणाचं धाडस कधी केलं नव्हतं.
दुपारच्या एकांताच्या वेळी-अवेळी तू एका तरुण मुलाच्या घरात बिनदिक्कत जातेस?
मी तरुण आहे गं- एकटा तरुण! अर्थ समजतोय का? मग जरा तरी घाबर!
बघ माझ्याकडे बघ!
पण नाही! ही बया मात्र बिनधास्तपणे, स्वत:च्या घरात वावरत आल्यासारखी सरळ येऊन सोफ्यावर बसली अन छानपैकी गप्पा झोडायला लागली!

एवढं अवघडून गेल्यासारखं झालं. एकतर मी असा कधी एकटा मुलीबरोबर राहिलेलो नाही. त्यात ही अशी एकांत गाठून आलेली तरुणी. छातीत धडधड तर होणारच ना! आंम्ही मस्त कट्रोल करु हो. पण सिमोल्लंघन इकडून नाही- पुढच्या पार्टीकडूनही होऊ शकतंच की! मग?

त्यावेळी मला खरंच- दिलीप प्रभावळकर सारखं, ‘ए डोळे बघ, डोळे बघ. हा.. घाबर-घाबर!’ असं तिला म्हणावसं वाटलं. पण त्याने ती घाबरेल की, करमणूक होऊन आणखीन हसत बसेल, याची शंका आली म्हणून मीच गप्प बसलो. (छे! या मुली ना, मला घाबरतच नाही ब्वॉ!)

आणि हे आत्ताच नाही बरं. पुर्वीपासूनचंच होतं.
शाळेत आमची याच्याहून दयनीय अवस्था होती. तिथे तर या चार पाच जणी गराडा टाकून मला बदाबदा बदडून घ्यायच्या- का तर म्हणे, त्यांचा आवडता खेळ आहे हा!
रिसेस झाली रे झाली कि आल्याच-

‘प्रणित, चल खेळायला..
..तू पळ हं- आंम्ही मस्तपैकी(???) तुला मारु!'
पहिल्यांदा तोंडी सांगायच्या मग खिदळत सगळ्याजणी हात धुवून घेतल्यासारखा एकाचवेळी, धपाधप मारायला सुरवात करायच्या, की खेळ चालू!

काय कुत्रं आहे की काय? पळ- आम्ही कुचलून काढतो!
दुसरी-तीसरीतल्या पोराचं वय काय? तुम्ही भवान्या मारता काय?
त्या कोवळ्या वयातही हा अत्याचार! (इथं ज्यांना कोणाला वाटत असेल की दुसरी तीसरीतल्या पोरींचा हात तो काय लागणार? त्यांनी हा प्रयोग स्वत:वर करावा. अट एकच- त्या एकापेक्षा जास्त असायला हव्यात आणि निदान तिघिंच्या हातात तरी प्लास्टीकचे जाड- टण्णे कंडे असायला हवेत!)

आता हे सगळं बाईंना सांगावं तर, सरळ तोंड रडवेलं करुन डोळ्यांतनं टपाटप आसवं गाळायला चालूच!

‘तू आमचं नाव सांगितलंस? का रे, आंम्ही काय वाईट केलं तुझं? तुला खेळायलाच तर घेत होतो ना...’

च्यायला! इमोशनल करावं ते या पोरीनीच. साला, यमालाही डसाडसा रडवत धुणी भांडी करायला लावतील मेल्या!

त्या दिवशीही नूतन प्रकरणातून पळून आल्यानंतर, सुटका झाली असं वाटत असतानाच, बरोबर तिसर्‍या लेक्चरला मराठी मिसनं आठवणीनं मला निरोप धाडला- ‘चौथ्या लेक्चरनंतर मला तातडीनं भेटून जा’
झालं!

चौथ्या- म्हणजेच शेवटच्या लेक्चरनंतर मी स्टाफरुममध्ये डोकावलं. त्यावेळी मिस इंटर कॉलेजिएट कॉम्पिटीशनचं काम करत होत्या. मला पाहताच त्यांनी मला आत बोलावून घेतलं.

“तू कार्टून मेकिंगसाठी ठाण्याला जाणार आहेस ना?”

“हो”

“कॉलेज माहित आहे कुठे आहे?”

“कधी गेलो नाही पण- आय’एल मॅनेज-“

“कोर्टनाका माहीत आहे?”

“हो”

“मग कोर्टनाक्यावर उतरलास की, डाव्या बाजुला, स्टेशनला मधून रस्ता गेलाय बघ- जिथे एम्लॉयमेंट ऑफिस लागतं...

हं मग तिथून सरळ खाली जा. तिथे चार रस्ते लागतील. डाव्या बाजुच्या रस्त्यानं सरळ आत चालत गेलास कि तिथेच ते कॉलेज लागेल. नाही समजलं तर एस.एन.डी.टी. कॉलेज कुठे आहे म्हणून विचार- कोणीही सांगेल”
मी मान डोलावली.

“आणि हो- दोन मुलीपण येतील बघ तुझ्यासोबत. एक तुझ्याचसारखी कार्टुन मेकिंगला आहे आणि दुसरी सिंगिंगला. त्यांना ठाण्याचं काही माहीत नाही. कधी गेल्या नाहीत; त्यामुळे त्या सांगत होत्या- ‘दुसरं कोण असलं तर सांगा, आंम्हाला एकट्यानं जायला जमणार नाही म्हणून’. मी तुझं नाव सांगितलं(!) त्या तुझ्याबरोबर यायला तयार झाल्या. एकीनं तुझा फोन नंबर लिहून घेतलाय. ती तुला आज रात्री फोन करेल. काय बरं नाव तीचं..

हं! वृषाली.

वृषाली नाव आहे बघ तीचं. ती तुला फोन करेल. फोन घे. आणि कधी- कसं- कुठून- जायचं ते ठरव. कुठे भेटणार ते अगोदर फिक्स कर. आणि त्यांना एकट्यानं पाठवू नको बरं- त्या तुझ्या भरवशावर येतायत!”
मिसनं मला स्पष्टपणे बजावलं.

मी हताश नजरेनं मिसकडे पाहत राहीलो.....
===================================================================================
क्रमश:
भाग=>>_4

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users