जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...! _1

Submitted by अन्नू on 22 March, 2018 - 12:11

20189

पहिल्यापासुनच मुलीं या प्रकाराकडे आंम्ही (म्हणजे स्पेशली मीच) जास्त असं कधीच लक्ष दिल नाही. लहानपणी खेळतानासुद्धा अगदी नाजुक होऊन दाखवायच्या या. जरा काही झालं की लगेच ऊंsss आ..ईsssss
असा भोंगा पसरायला सुरवात! (मला अजुनही अशा मुली रडायला लागल्या ना की खुप राग येतो) मग लगेच तिची आई कुठुनशी वस्सssकन् आंगावर धावत येणार आणि तिच्या मुलीला रडवल्याबद्दल आमच्या पाठीत चांगले चार-पाच धपाटे घालुन जाणार हे ठरलेले!
पण इतक्यानेच तीचे भागणार नाही वर आणखीन आमच्या घरीसुद्धा ही शुभ बातमी न विसरता, कशीही करुन कळवणार. (असल्या आयांचा आंम्ही सर्व मुले बहुमताने निषेध करतो). एका मारातुन आमच कोवळं मन सावरते न सावरते तोच रात्रीचा घरच्या मंडळींच्या रागाचा डोंब आमच्यावर माराच्या स्वरुपात व्हायचा आणि सर्वजण आंम्हाला यथेच्छ बडवुन काढायचे. (यात माझी ती दुष्ट बहीणसुद्धा सामिल होती हे मी पाहीले आहे). त्यामुळेच मुलींबद्दलची आमची मते हळुहळु दुषित होऊ लागली. आता एखादी मुलगी स्वतः हुन जरी खेळायला आलीच तरी,

"एss आंम्ही नाही तुला खेळात घेणार जाss..हा फक्त मुलांचा खेळ आहे, मुलींचा नाही काहीss".

असे काहीतरीच पुळचट् उत्तर देऊन आंम्ही तिला पळवून लावायचो. शाळेमध्ये जायला लागल्यावर मात्र याच मुलींबद्दल नंतर भयानक अनुभव यायला लागले.

आता शाळेमध्ये एखाद्या मुलामुलींची भांडणे होणे ही सर्वसाधारण गोष्ट आणि आमच्या वर्गात तर नित्याचीच गोष्ट होती. अशीच आमच्या एका मित्राची आणि दुसर्‍या वर्गातल्या एका मुलीची भांडणे झाली. कारण शुल्लक होते आणि भांडणाची सुरवात त्या मुलीनेच अगोदर केली होती. (याला मी स्वतः साक्षीदार आहे, त्याबद्दल मी आजही साक्ष द्यायला तयार आहे. एका पायावर नव्हे तर चक्क दोन पायांवर!). त्यानंतर भांडणाच प्रकरण खुप चिघळल. मित्राच्या हस्ते तिच्या झींज्या ओढल्यानंतर आणि खासकरुन तिच्या हस्ते आमच्या मित्राच डोकं फोडून झाल्यानंतरच हे प्रकरण निकालात काढण्यासाठी आंम्ही सर्वजणांनी मिळुन शिक्षकांकडे धाव घेतली. आता येथे शिक्षकांनीही चुक कोणाची आहे ती लक्षात घ्यावी ना अगोदर, पण नाही. बुद्धीमत्ताच मध्ये घुसडवली त्यांनी! आणि तेसुद्धा त्याच मुलींची बाजु घेऊन बोलु लागले. बिच्चाssर्‍या आमच्या मित्राची अक्कल चवाट्यावर आणली हो त्यांनी! किssत्ती गयावया केली त्याने पण नाही. त्याची बाजु घ्यायचे लांबच; पण त्याचे मागचे तसेच यावर्षाचे पेपरातले सगळे गुण त्यांनी बोलता-बोलता सहजरित्या जाहीर करुन टाकले, तेही त्या मुलींसमोर! (इज्जतीचा पंचनामा म्हणतात तो हाsच!) त्यावेळी या प्रकारामुळे आंम्हाला अनपेक्षितपणे चांगलाच जबरदस्त धक्का बसला, आणि पुढे काही क्षण कित्येक वेळा बसतच गेला, मुलीं मात्र आ वासून आमच्याकडेच बघत होत्या (कारण यावेळी आता शिक्षकाच्या यादीमध्ये आंम्हा मुलांच्या गुणांचाही समावेश झाला होता!)

तर, सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेपासुनच मुलीं या आंम्हा मुलांच्या शत्रुपक्षात विलिन झाल्या. त्यानंतर कित्येक वेळा मला टॉम अ‍ॅन्ड जेरीच कार्टुन (हे मी त्यावेळी खुप आवडीनं बघायचो आता मात्र राग येतो!) बघताना टॉमच्या जागी आंम्ही निरागस मुले आणि जेरीच्या जागी त्या दुष्ट मुली दिसु लागल्या. ज्या आंम्हाला सतत छळताना दिसत होत्या.(हा एखादा मानसिक रोग तर नाही ना, समजदार व्यक्तीने कृपया यावर आपले मत कळवा.) मुलींबद्दल माझे दुषित मत आता कधीच बदलणार नाही, असेच माझ्या घरच्यांना किंबहुना मलाही वाटु लागले होते पण नाही; वेळ बदलली, काळ बदलला आणि माझ्यातही बदल झाला. (हा बदल ९वी- १०वी च्या परिक्षेच्या काळापासुन सुरु झाला असावा असा माझा अंदाज आहे, कारण त्यावेळीच या मुली माझ्याशी सलगी करत गोड बोलत 'उत्तर सांsग ना रेss' म्हणुन गवळणीसारख्या माझ्या भोवती पिंगा घालीत होत्या. शिवाय त्यावेळच्या पिक्चरचाही प्रभाव होताच. आणि म्हणुनच 'मुली इतक्याही वाईट नसतात' हा विचार सारखाs माझ डोकं खात होता)

हायस्कूलचे शिक्षण पुर्ण करुन मी कॉलेजात गेलो त्यावेळी भोवती फिरणार्‍या सुंदर्‍या तर मनाला अधीकच वेडाऊ लागल्या. काही मुली आपापल्या जोडीदारासोबत थट्टामस्करी करत, हसताना, खिदळताना लाजताना पाहुन, मनात उगीचच गुदगुल्या होऊ लागल्या आणि मग नकळत माझे मनही स्वप्नांच्या दुनियेत हरवु लागलं. एखादी अशीच सुंदरी माझ्याही आयुष्यात येईल अन माझे पार आयुष्यच बदलवुन टाकेल. ती माझ्यावर आतोनात प्रेम करणारी असेल आणि मीही गर्वाने तिच्या खांद्यावर हात टाकुन ही माझी गर्लफ्रेंड म्हणुन ऐटीत भाव खात मिरवेन (तेही त्या मला चिडवणार्‍या अमितच्या नाकावर टीच्चुन! सारखा मुलींच्या घोळक्यात बसलेला असतो, इम्रान हाश्मी कुठला!!).पण कशी दिसायला असेल ती? मग माझ्या मनामध्ये अनेक स्त्री व्यक्तीरेखा उभ्या राहील्या...

तर ती असेल... निळ्या डोळ्यांच्या ऐश्वर्यासारखी, की गालावर खळी पडणार्‍या प्रिती झिंटासारखी? ह्म्म.... गोड गालातल्या गालात हसणार्‍या रानी मुखर्जीसारखी!, अहं....करीना सारखी, नॅss....काजल अगरवाल, त्यापेक्षा अनुष्का शेट्टी, नको अंss.... हां जेनेलिया डिसोझा.... दिपीका..... आयेशा..... अमिशा.. प्रियांका.. रिमी- दीया- ईशा- त्रीशा- कॅट्.... शीट्! काय चाललय हे? कसले विचार मी करतोय? हॅ!! माझा मलाच राग आला.

आत्तापर्यंतच्या या विचार-विनीमयानं डोक चांगलच भणभणायला लागलं. शेवटी परीक्षेच्या अभ्यासारखे, 'अजुन खुप वेळ आहे पुढचे पुढे बघु' असे स्वतःला बोलुन मी क्लासच्या बाहेरच्या कॉरिडोअरमधे मोकळी हवा खाण्यासाठी गेलो. त्याचवेळी, जुन्या देवाच्या ट्रेडीश्नल पिक्चरमधे जसे एखाद्या साक्षात्कार झालेल्या माणसाचे डोळे, प्रत्यक्ष देवानेच दर्शन दिल्यानंतर त्या भव्य-दिव्य तेजाने दिपतात तस्सेच माझेही डोळे दिपले गेले. (अर्थात माझ्याबाबतीत हे साक्षात्काराने झालेले नसुन दुपारच्या कडक उन्हामुळे झाले होते. समोर कॉलेजच्या बिल्डींगच्या मोठाल्या तिरप्या काचांवरुन उन्हाचा रिफ्लेक्ट मी उभा असलेल्या जागेवरच प्रखरपणे होत होता. हाच तो चमत्कार आणि हेच ते तेज! पण त्यावेळी तरी मला तो साक्षात्कारच वाटला!)

तो प्रकाश ते तेज इतके होते की मला डोळे पुर्णपणे उघडणे अशक्यच होते. त्यामुळे खिशातील इंटरनॅशनल डॉन (अंदाज बोरोबर! दाऊदच.) सारखा मोठ्ठा काळ्या रंगाचा गॉगल काढला. हा गॉगल खरा म्हणजे आमच्या थोरल्या बंधुंचा. त्यामुळे तो मला नुसता मोठ्ठाच नाही तर खुपच विचित्र दिसत होता. पण त्यावेळी कुणीतरी मला, 'हा गॉगल ना तुला खुsssप छान दिसतो; बाहेर जाताना घालुन जात जा...!', असा फुकटचा सल्ला दिला होता.(मी अजुन्ही त्या व्यक्तीला शोधत आहे, गावाला लग्गेच जाऊन येतो म्हणून तो प्राणी अद्याप बेपत्ता आहे.) त्यामुळे भावाला न सांगताच मी हा गॉगल त्याच्या कपाटातून लांबवला. तर हा गॉगल मी रजनीकांत स्टाईलने (न फिरवता फक्त) डोळ्यांवर चढवला. आता जरा बssरं वाटल, तेज जरा कमी झाल्यासारख वाटलं. मग मी कॉरीडोअरच्या त्या छातीपर्यंत उंच असलेल्या कट्ट्यावर आपले दोंन्ही हात कोपरावर उभे ठेवत आणि पंजांच्या बोटांचे जाळे करुन ते टोपीच्या पुढे आलेल्या भागासारखे कपाळावर आडवे धरत, समोर बघत उभा राहीलो. नेमके याच वेळी माझ्या बाजुलाच उभ्या असलेल्या एका मुलीचा काहीतरी गैरसमज झाला असावा.
"आपको किधर जाना है क्या? कहो तो मै छोड देती हूँ" त्या कोमल हृदयीन मुलीने माझ्याकडे सहानुभुतीने बघत विचारले.

"अँss...?" आपला उजवा हात कानाजवळ (एखाद्या बहीर्‍या माणसा सारखा) धरुन समोरच्या तेजापासुन चेहर्‍याचे संरक्षण करीत आणि डोळे अगदीच बारिक करुन मिचमिचत मी तिच्याकडे बघितले!

"आपको कही जाना हो तो मै आपको छोड देती हूँl" ती पुन्हा त्याच नाजुक आवाजात म्हणाली.
ही अशी का म्हणतेय मला? काही वेळ मी बुचकाळ्यात अन् ती माझ्या (मदतीच्या) विचारात! एकमेकांकडे बघत तसेच उभे होतो. त्यानंतर मी तिच्या त्या बोलण्याबाबतचं कारण विचारणार इतक्यात-

"अंजु यहाँ क्या कर रही है तु? तुझे मिस बुला रही है, चल जल्दी" असे म्हणुन तिची एक मैत्रीण अंजु नामक त्या तिच्या मैत्रीण वजा समाजसेविकेला घेऊन जाऊ लागली. मी अजुनही तिच्याकडे बघत बुचकाळ्यात आणि तिही चालताचालता मला बघत माझ्या (मदतीच्या) विचारात!

"अंजु क्या हुआ? पिछे क्यो देख रही है बार-बार?" पाठीमागे केविलवाणी नजरेने माझ्याकडे बघत असलेल्या अंजुला तिच्या मैत्रीणीने शेवटी विचारलेच.

"अरे ओ अंकल देख ना, बेचारे! रास्ता भुल गये है शायद; मैने सोचा उनकी मदत करु, अंधे लग रहे है ना इसलिए...!"

"..काsssय..??????" क्षणात मी जवळ-जवळ जोरात किंचाळलोच होतो. त्या समाजसेविकेचे हे उत्तर ऐकुन मला जोराचा धक्काच बसला होता. मी आंधळा? म्हणजे ती मला आत्तापर्यंत आंधळा समजत होती, म्हणून माझ्यावर दया दाखवत होती की काय? माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि डोळे लालभडक झाले.
माझे ओरडणे इतक्या जोरात होते की आत्तापर्यंत तेथील कॉरीडोअरमधील सर्वजण माझ्याकडेच टवकारले होते. ती सुद्धा मध्येच माझा ओरडण्याचा आवाज ऐकुन दचकुन मागे वळुन बघु लागली.
आता काही वेळ त्याच नजरेने आंम्ही दोघेही एकमेकांकडे बघत होतो. फरक फक्त एवढाच होता की, माझ्या ओरडण्याने ती बुचकाळ्यात तर मी (जीवे मारण्याच्या) तिच्या विचारात! त्याच वेळी बाजुच्या रुम मधुन "अंजुsss.." असा एक आवाज आला आणि ती अंजुडी लगेच तिकडे निघुन गेली. मी मात्र चरफडत तिथेच उभा होतो. आपल्या नंतरच्या कथेत या अंजुडीनामक पात्राला घेऊन मध्येच तिचा गळा दाबुन निर्घुणपणे व्हीलनद्वारे खुन करायचा आणि त्याबद्दल बक्षिस म्हणून व्हीलनला त्या कथेत अजरामर करायचे. असे मी मनोमन ठरवले.

कॉरीडोअरच्या दुसर्‍या बाजुला गेल्यानंतर माझे डोळे दिपणे कमी झाले होते आणि आता तो गॉगलही मी कधीच खिशात कोंबला होता. मग हळुहळु नजर स्थिरावत मी कॉलेजच्या मेन गेट जवळ आत येणार्‍या- जाणार्‍या विद्यार्थ्यांना पाहण्यात गुंग झालो तोच.... तिने मला दर्शन दिले! म्हणजे-
मघाचा साक्षात्कार याच्यामुळेच की काय? (मी कशाची लिंक कशालाच जोडु लागलो!) खरंच ती.. ती मला दिसली होती.... हो तिच ती,... माझ्या मनातली सुंदरी!!! (आता मनातली होती की नाही ते माहीत नाही कारण तिच रुपच डिसाईड झाल नव्हत. फक्त सुंदर होती- भयाSण सुंदर. आमच्या भाषेत बोलायच तर एकदम रापचिक आयटम!) डोळ्यावरचा गॉगल सावरत ती कॉलेजच्या दिशेनेच येत होती. तिला पाहून तर माझी बोबडीच वळली. काय बोलावे, काय करावे तेच कळेना. तेव्हाची माझी अवस्था काsय सांगु तुंम्हालाss, थोडक्यात म्हणजे सगळे शब्द घशाखाली, जीभ दाताखाली, अन त्या गोंधळात बाजूलाच, सुटात-बुटात उभ्या असलेल्या त्या शिक्षकाचा चार हजाराचा बुट माझ्या ३०० रुपड्याच्या घासलेल्या अन् गटारातल्या चिखलात बरबटलेल्या चपलीखाली! ज्यावेळी त्याच्या हे लक्षात आल तेव्हा....
थाड्...
त्याच्या वजनदार हाताची जोरदार थप्पड माझ्या कानाखाली!!!!!
पण माझं कुठे लक्ष होतं तिथं? हँ!.. मी तर माझ्या सुंदरीच सौंदर्य पाहण्यात स्वत:ला केव्हाच विसरुन गेलो होतो, शेवटी काहीतरी बरळत तो शिक्षक तेथुन निघुन गेला. तरी सुद्धा मी माझ्याच धुंदीत! अहा हाss काय रुप होत तिचं... अगदी लेखकाच्या भाषेत बोलायच झाल तर... तर अं....म्म्म...(झाssलं! शब्द सुचायचेच बंद!! माझ ना हे असंच असतं.) ...हाँ, पाणीदार कपडे, लालभडक अंग, पांढरेशुभ्र डोळे, गुलाबी नाजुक केस, आणि काळेभोर ओठ!!????

अरेरे, काहीतरी चुकल वाटतं. लालभडक कपडे, पाणीदार डोळे (अहो लेखकाची बोलायची ती एक पद्धतच असते तशी, आता एवढ्या लांबुन मला ते डोळे कसे दिसले, तेही तिने गॉगल लावलेला असताना? वगैरे प्रश्न काढु नका बर!. हा तर...), पांढरेशुभ्र अंग, काळेभोर दाट केस, आणि गुलाबी नाजुक ओठ! पाहताचक्षणी मंत्रमुग्ध व्हावे अशीच होती ती. मी तर तन-मन-धन (अजुन काही अन् असेल तर ते पण) सर्व काही विसरुन तिच्याकडेच बघत होतो.

पण काहीही म्हणा ती लाल कलरची घुडघ्यापर्यंत (कशीबशीच) येणारी मिडी तिच्या पांढर्‍याशुभ्र कांतीला चांगलीच उठुन आणि शोभुन दिसत होती. तिने हातामध्ये चार पाच पुस्तके पोटाजवळ घेतली होती यावरुन ती सुंदरतेबरोबरच चांगली अभ्यासु असावी असा मी तर्क केला. (हे तर्क-वितर्क मी, सी.आय.डी सारख्या सिरीअल्स मधुनच शिकलो). ती घाईघाईत सारखी घड्याळात नजर टाकत इकडे-तिकडे बघत येत होती. तिला वाटले असेल कॉलेज भरले की काय. हं, वेडी कुठली, 'अग अजुन चांगली वीस मिनिट बाकी आहेत!' मी मनातच (आणि उगीचच) तिला मोठ्यानं आवाज देऊन सांगितले. जसा काही माझा आवाजच तिला ऐकायला जाणार होता. त्यावेळी अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली; हिंदी पिक्चरमध्ये अशीच एखादी कॉलेजयुवती कुठेतरी घाईघाईने जात असते आणि अचानक बेसावधपणे हिरोला धडकते मग दोघेजण खाली पडतात, हिरो खाली आणि त्याच्यावर हिरोईन (जर डायरेक्टरला हिरोच्या तोंडावर तिचे केस आणायचे असतील तर) नाहीतर कधीकधी मग हिरोईन खाली आणि हिरो वर (यावेळी त्या दुष्ट डायरेक्टरला हिरोईनला सोडायचेच नसेल बहुदा तर) मग त्यानंतर दोघांच्या नजरा मिळतात, हिरोईन त्याच्याकडे बघत गोड हसुन निघुन जाते आणि ते दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडतात! जर आपण पण असेच केले तर? खाली ती सुद्धा तशीच गडबडीत येत होती. बस्स, विचार करायला पुरे आणि मग मी स्पेशली तिला धडकण्यासाठी म्हणुन तिसर्‍या माळ्यावरुन खाली ग्राऊंड फ्लोअरपर्यंत चक्क वेड्यासारखा धावत सुटलो.

ग्राऊंड फ्लोअरला पोहोचेपर्यंत माझा चेहरा आणि अंग घामाने निथळून निघाल होत. तरीही त्यातही एक विजयी हास्य माझ्या तोंडावर होतं. कारण ती अजुन समोरुन येतच होती; इथे पोहोचलीच नव्हती. आता डॅशींगमध्ये आपण तिला धडकणार आणि मग आपली नजरा-नजर...तिचे लाजणे... माझ्या मनात गोड गुदगुल्या झाल्या. गॉगल घालायचा का? एक विचार डोक्यात चमकुन गेला आणि दुसर्‍याच क्षणी त्या दुष्ट अंजुडीची आठवण आली. नको-नको त्या गॉगलमुळे ही पण मला आंधळा समजुन.......

गॉगल घ्यायला खिशाकडे गेलेला माझा हात आपोआप खिशापासून झटकन् दूर झाला. मग डोक्यावरचे केस नीट करत मी एखाद्या हिरोसारखा तिला धडकायला तिच्या दिशेने धावत जाऊ लागलो. पण आतापर्यंतच्या धावण्याने माझी पुर्ण दमछाक झाली होती, अंगात त्राणच उरले नव्हते त्यामुळेच मी धावत तर होतो पण ते चालण्याच्या समान होते, अ‍ॅक्शन मात्र धावण्याची होत होती.
हाsश्शsssss.... हुsश्शsssss...... हाssss....श्श्शsssss.........हुss श्श्शssssssssssssss
आँssss..........?????????????

अचानक समोर डोंगर कोसळल्यासारखा मी जागेवरच आ वासुन थबकलो. कुठुनसा एक भरभक्कम बॉडीबिल्डरचा पिळदार हात तिच्या खांद्यावर विसावला होता!

"हेss स्वीटी यु आर लेट!.."

"हेsय दीप हाऊज.. युss? हुम्म..(च्यूss क्)" (उजव्या गालावर एक जोरदार चुंबन!)

"...आय अ‍ॅम सॉरी यार, आय वॉज स्टक इन ट्रॅफिक!"

"इट्स ओके. सो नाऊ, कॅन वी गो टु कॅन्टीन फॉर कॉफी?"

"या शुअर! लेट्स गो!" पांढर्‍या रंगाची ती भुतणी आता त्या बॉडीबिल्डरच्या कमरेला हाताने मागुन वळसा घालुन त्याला चिकटत अन् आनंदाने खिदळत त्याच्याबरोबर चालली होती. (हीच होती तीची घाई आणि यासाठीच होती तिची मघाची धावपळ!!)
शीss नुसतीच दिसायला पांढरी होती, वागणे मात्र इतके घाण!. असल्या मुलीने मला समोरुन जरी 'हा' म्हटलं असतं तरी मी तिला साsफ नकार दिला असता (पण प्रत्यक्षात जर हा म्हणालीच असती तर काही वेळ तरी त्याचा विचा...ssर केलाच असता मी..!). कशाला हवी असली चरित्रहीन? शेवटी मी स्वतःला सावरत तेथुन माझा निखळता पाय घेतला!

कॉलेजचे पहीले वर्ष संपत आले!, पण आमच्या (मनातल्या) सुंदरीचा काहीच पत्ता नव्हता. मी मात्र ती येईलच अशा ठाम मतावर होतो. पण नक्की कधी येईल याबद्दल थोडासा (अधिकच) सांशक होतो. म्हणुनच या गोष्टीवर सतत विचार करत होतो. असाच एक दिवस मी एकटाच क्लासरुम मध्ये विचारात बसलेला असताना अनपेक्षितपणे तो गोड आवाज माझ्या कानावर आला.
"हाय!!" विचाराच्या खोल गर्तेतुन खडबडुन जागे होत मी आवाजाच्या दिशेला नजर टाकली. एक गौरवर्णीय सुंदरी माझ्या समोर अवतरली होती. आपल्या मुलायम अशा पिवळ्या ओढणीचे डावे टोक दोंन्ही हातात धरुन त्याच्याशी चाळा करत लेफ्ट टु राईट असे झोके घेत लडीवाळपणे हसत ती माझ्याकडे बघत होती. (सर्वच मुली अशा का झुलतात हे मला कधीही न उलगडलेले कोडे आहे.)

"मी संध्या! मझं ना तुझ्याकडे एक काम होतं" त्याच मधुर आवाजात ती बोलली.
मी हीला कुठेतरी बघितलंय... पण कुठे? माझ्या मनात उगीचच शंका. (सी. आय. डी. चा परीणाम!) अरे हो, ही तर आपल्याच क्लासमधली, सेकंड लास्ट बेंच!

"हा, बोल." तिच्याकडे बघत मी म्हणालो. तसं ऐनवेळी मी कोणालाही अरे-तुरे करत नाही पण याची सुरवात हीनेच केली होती मग मीच का मागे राहायचं?

"तु मराठीतच आहेस ना?" ती.

"हो.का?"

"मला ना तुझ्या मराठीच्या नोट्स हव्या होत्या. अ‍ॅक्च्युअली माझ्या मैत्रीणीं पण दोन दिवस आल्या नव्हत्या आणि दुसर्‍या कोणीच त्या बरोबर लिहीलेल्या नाहीत. आणि ज्यांनी लिहील्या आहेत ते सुद्धा देत नाहीत! त्यामुळे मला..." ती केवीलवाणी चेहर्‍याने स्पष्टीकरण देत म्हणाली.

अरेरे! मला खुप वाईट वाटलं त्यावेळी तिचं. इतकी गोड, सुंदर, सालस मुलगी ती; आणि तिला सुद्धा नोट्स देत नाहीत?!! किती स्वार्थी असतील ते! शी: मग कधीतरी- कुणीतरी मला परमार्थीक सल्ला दिलेला आठवला, 'कधीही कोणी काही मागीतले तर त्याला लग्गेच मदत करायची असते, अशाने आपल्याला पुण्य भेटतं' (हा सल्ला देणाराही तोच! कsसा शोधावा याला आता...)
माझ्यातील दानशुर कर्ण जागा झाला आणि मी तिला मदत करण्यास तयार झालो. (खाल्ली इथंच माती!)

"हा घे ना, पण मला उद्या मराठीच्या लेक्चरच्या अगोदर आणून दे बरं का, नाहीतर मिस मला ओरडेल!" मी तिला ताकीत वजा सुचना केली.

"होss होss नक्कीच, मी उद्या दुपारी कॉलेजला आल्याआल्याच तुला ती लग्गेsच परत करेन." तिनेही मला राजकीय नेत्यासारखे आश्वासन दिले. मग मी माझ्या बॅगमधुन माझी नवी कोरी आणि निटनेटकी मराठीच्या नोट्स ची वही तिच्या पुढे केली. यावेळी एखादे लहान चार-पाच वर्षाचे मुल कसे त्याच्या आवडती वस्तु चुट्कन आपल्या हातातुन घेते. तशीच तिनेही माझ्या हातातुन ती वही चुट्कन् घेतली आणि एकदम खुशीतच छातीशी घट्ट दाबुन धरत तुरुतुरु धावत आपल्या बेंचकडे गेली.

झालं, त्या दिवसानंतर ती बया कॉलेजमधुन गायबच! कुठे गेली, कुठे नाही काहीच पत्ता नाही. तिच्या मित्र- मैत्रीणींना विचारले, कॉलेजचे तिच्या ओळखीचे आणखीन कोणी असेल नसेल त्या सर्वांजवळ चौकशी झाली, येथपर्यंत कॉलेजच्या कुत्र्या-मांजरांसकट सगळ्यांच्या जबान्या झाल्या! पण काहीही फायदा नाही. माझी वर्षाची सगळी मेहनत पाण्यात गेली. त्या वहीत माझे वर्षभराचे नोट्स होते. अगदी मेहनतीने आणि जीव तोडुन तयार केलेले! सर्व सर्व गेले!! त्या सालस मुलीला कोणीच का नोट्स देत नव्हतं, त्याचं रहस्य मला आज उलगडलं होतं.

'का तू तिला वही दिलीस? काय गरज होती तुला ती वही तिला द्यायची? मदत करायला निघालाय कुठला! आता झालं ना, गेली तुझी वही. आता काय करणार? कुठे भेटणार ती? अक्कल नसल्यासारखा वागत असतो नुसता, आता बस बोंबलत!' स्वतःवरच मी रागाने ओरडु लागलो आणि पुन्हा दु:खी होऊ लागलो. मला माझ्या वहीची तिव्रतेने आठवण येऊ लागली होती.
तिचे ते गोंडस रुप आता रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर नाचु लागायचं आणि मध्येच तिला वही दिलेला क्षण आठवुन मन तिळतिळ तुटायचं! हा (वहीचा) विरह इतका होता की काही वेळा मी प्रेमात वगैरे पडलो की काय अशी घरच्यांना आणि माझ्या मित्रांनाही शंका यायला लागली होती. माझ्या दुष्ट बहीणीने तर माझ्या बॅगेत, खिशात कुठे चिठ्ठ्या वगैरे सापडतात का याची झडतीसुद्धा घ्यायला सुरवात केली होती.

त्यानंतर दोन आठवडे झाले आणि मी माझ्या इतर अ‍ॅक्टीव्हीटीज मध्ये बिझी झालो. त्या दिवशी मी सकाळपासुनच लायब्रेरीमध्ये माझ्या एका इकोनॉमिक्सच्या प्रोजेक्टवर काम करत बसलो होतो. घड्याळात बारा वाजत होत्या. म्हणजे कॉलेज भरायला अजुन अर्धा तास तरी बाकी होता. मी खाली मुंडी घालुन, ध्यान लावुन ते प्रोजेक्ट करत होतो. इतक्यात मला तोच गोड आवाज आला-

"हाय! बिझी आहेस का?"
या आवाजासरशी मी झटक्यात वर बघितले. आणि तिच(!!) संध्या नामक चेटकीन माझ्यासमोर हसत उभी होती!
तिला बघुन माझी कानशील तापुन त्यातुन धुर निघु लागला.
"तू....!!"

"ही तुझी वही!" माझे बोलणे मध्येच तोडत ती बोलली आणि त्याचवेळी चटका बसावा अशी माझी वही समोर टेबलावर टाकली. मी मात्र तिच्याकडेच रागाने बघत होतो.

"सॉरी हा, मला वही द्यायला उशीर झाल्याबद्दल!" कसंनुसं हासत ती म्हणाली.
तिच्याकडे रागाने बघतच मी वही माझ्या जवळ ओढली तशी-

"म्म..म... मी जाते नंतर भेटू" असे म्हणत ती तिथुन धावत निघुन गेली. ती गेल्यानंतर मी माझ्या वहीकडे नजर टाकली तोच..

"आsss आsssssssss............" जबरदस्त झटका बसावा तसा मी खुर्चीतुन उठुन उभा राहीलो होतो. त्या वहीची रद्दीतल्या पुस्तकासारखी हालत झाली होती. सर्व बाजुंनी दुमडुन घड्या... चारी बाजुंचे कोपरे फाटुन चिंध्या... मागच्या बाईंन्डींग केलेल्या भागाची उध्वस्त होऊन दुर्दशा!...... माझ्या कपाळावरची शीर रागाने ताड ताड उडु लागली, हातपाय थरथर कापु लागले आणि चेहरा रागाने लालबुंद झाला. 'आतमध्ये तरी निट आहे का?' माझ्या अंतरमनातुन कुठुनतरी एक आवाज आला. तसा मी वहीची पाने भराभर चाळू लागलो आणि.....

"आsssssss........ हा झटका मघाच्या झटक्यापेक्षा नक्कीच दुपटीचा होता. काय हे????!!! मी स्वतःलाच विचारले. वहीच्या आतल्या सर्व पानांवर...
चिखलाचे डाग!.... धुळीचे डाग!... मातीचे डाग!...... पाण्याचे डाग!.... पिठाचे डाग!.... तेलाचे डाग!.... चटणीचे डाग!.... हळदीचे डाग!.... आमटीचे डाग!.... भाताचे डाग!.... भाजीचे डाग!.... डाळीचे डाग!.... डागांचे डाग...!!!!??? काही क्षण माझ्या डोक्यातही कोणीतरी युद्धातला मिलिटरीमॅन घुसुन आपल्या तोफेने जोरात मारा करुन असेच आवाज करत असल्यासारसखा वाटला..... डाsग...डाsग...डाsग...!!!

त्यातच काही ठिकाणची पानेसुद्धा क्रुरपणे फाडण्यात (नव्हे ओरबडण्यातच) आली होती!
बस्स! या पोरीनं माझं डोकंच आऊट करुन टाकलं.... तिला याचा जाब विचारायलाच पाहीजे. मनाशी ठरवत, रागाने तसाच थरथरत मी तिच्याकडे जायला निघालो आणि हातातील वही चुरगळुन खाली फेकली तोच काहीतरी हळुवार त्या वहीच्या पानातुन येऊन फर्शीवर, तसेच पुढे सरकत गेल्याचे मला जाणवले. (सी.आय.डी. बघण्याचा असा फायदा!) आणि मी त्या दिशेला नजर फिरवली. तिथे एक चौकोनी घडी घातलेला कागद होता. हा माझ्या वहीच्या पानांसारखा नक्कीच नव्हता, कारण तो एक चित्रकलेच्या पानासारखा कोरा आणि जाड होता. पण असला कागद मी तरी वहीत ठेवला नव्हता. मग कोणाचा असेल? मी काहीसा विचार करतच तो उचलून हातात घेतला. चौकोनी घडी घातलेल्या त्या कागदावर माझेच नाव होते. पण अक्षर मात्र दुसर्‍या कोणाचेतरी होते. खुर्चीवर पुन्हा बसत मी त्या कागदाची घडी काढली..
कागदावर डाव्या बाजुला हेडींगवरच पुन्हा माझे नाव होते... प्रणित,
आणि त्याखाली बरेच काही लिहीले होते. मी आता पुढचा मजकुर वाचु लागलो...........

=========================================================================
क्रमशः

भाग=>>_2

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>चिखलाचे डाग!.... धुळीचे डाग!... मातीचे डाग!...... पाण्याचे डाग!.... पिठाचे डाग!.... तेलाचे डाग!.... चटणीचे डाग!.... हळदीचे डाग!.... आमटीचे डाग!.... भाताचे डाग!.... भाजीचे डाग!.... डाळीचे डाग!.... डागांचे डाग...!!!!??? काही क्षण माझ्या डोक्यातही कोणीतरी युद्धातला मिलिटरीमॅन घुसुन आपल्या तोफेने जोरात मारा करुन असेच आवाज करत असल्यासारसखा वाटला..... डाsग...डाsग...डाsग...!!!
Lol