रसग्रहण-बालकवी-औदुंबर कविता

Submitted by आदीसिद्धी on 27 February, 2018 - 04:14

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

बालकवींनी शब्दबद्ध केलेली निसर्गदृश्याचे वर्णन करणारी ही कविता.निसर्गातील विविध घटनांचे चित्रदर्शी वर्णन हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
दोनही तटांवर हिरवळ घेऊन वाहणारा झरा आपल्याला सुरूवातीला भेटतो.दूर टेकडीवर एक छोटेसे गाव वसले आहे.त्याच्या आजूबाजूला पाचू पसरल्यासमान हिरवेगार शेतमळे विखुरले आहेत.याच हिरवाईतून सर्पासारखी नागमोडी वळणे घेत डोहाकडे जाणारी पायवाट निर्माण झाली आहे.
अशाच त्या शांत डोहाच्या तटावर औदुंबराचे झाड पाण्यात पाय सोडून निवांत विश्रांती घेत आहे.असे हे देखणे निसर्गदृश्य बालकवींनी आपल्या काव्यातून चितारले आहे.
निळासावळा झरा,हिरवे शेतमळे ,हिरवी कुरणे या रंगसंगतींच्या माध्यमातून त्या दृश्याला जिवंतपणा बहाल केला आहे.निसर्गातील प्रत्येक गोष्टीला एकेक समर्पक उपमा दिल्याने कवितेला अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे. तसेच शेवटच्या ओळीने औदुंबराचे दर्शनी स्थिररूप प्रत्ययकारी दाखवले आहे.
'हिरव्या समृद्ध जीवनातून निघालेली पांढरी पायवाट' हे रूपक समाजातील परित्यक्ता स्त्रियांसाठी वापरले आहे.तिला कोणताही खंबीर आधार नसतो.त्यामुळे जीवनाच्या एका क्षणाला ती कंटाळते आणि मृत्यूच्या काळ्याशार डोहात आपले जीवन समर्पित करण्यासाठी जाते. यावेळी सर्वसाक्षी परमेश्वराच्या रूपातील औदुंबर स्थितप्रज्ञ राहून हे पाहत आहे. असे विफल जीवनदर्शन ही कविता देवून जाते.त्यामुळे ही कविता वाचकाला समाजदर्शन घडवणारी आहे.

--आदिसिद्धी

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या आताच्या बारावीच्या परीक्षेसाठी सराव म्हणून ही कविता घेऊन मी त्याचे रसग्रहण केले होते.योगायोगाने ती बालकवींची होती.तीच इथे मराठी भाषा दिनानिमीत्त लिहीली.

छान ! Happy
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!! Happy
कला, वाणिज्य की विज्ञान???

आजकाल कुणि असल्या साध्या, सोप्या, निसर्ग डोळ्यासमोर उभा करणार्‍या सुंदर कविता लिहीतात का?

कदाचीत लिहीत असावेत.पण तितकासा खोल अर्थ असलेल्या कविता फारश्या दिसत नाहीत.अर्थात याला अपवाद असतील.पण जुन्या कवींच्या कवितांमध्ये रमायला होतं.विशेषतः त्यातल्या शब्दांचा वापर भुरळ पाडतो.

बाकी नवीन कवींच्या कविता कशा असतात ते तुम्ही 'चाफा' ही केशवकुमारांची विडंबनपर कविता वाचून ठरवा. 'झेंडूची फुले ' काव्यसंग्रह.

चांगलं लिहिलंय.
औदुंबर कवितेचे(सुद्धा) लावू तितके अर्थ लागतात.
मला ही नवव्या इयत्तेत होती अभ्यासाला.
कधी कधी वाटतं, बालकवींनी बसला शी जुळणारा आणि वृत्तात बसणारा असला हा शब्द टाकला असेल, आपण उगाच डोके फोडतोय Lol