रसग्रहण-बालकवी-औदुंबर कविता

Submitted by ..सिद्धी.. on 27 February, 2018 - 04:14

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

बालकवींनी शब्दबद्ध केलेली निसर्गदृश्याचे वर्णन करणारी ही कविता.निसर्गातील विविध घटनांचे चित्रदर्शी वर्णन हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
दोनही तटांवर हिरवळ घेऊन वाहणारा झरा आपल्याला सुरूवातीला भेटतो.दूर टेकडीवर एक छोटेसे गाव वसले आहे.त्याच्या आजूबाजूला पाचू पसरल्यासमान हिरवेगार शेतमळे विखुरले आहेत.याच हिरवाईतून सर्पासारखी नागमोडी वळणे घेत डोहाकडे जाणारी पायवाट निर्माण झाली आहे.
अशाच त्या शांत डोहाच्या तटावर औदुंबराचे झाड पाण्यात पाय सोडून निवांत विश्रांती घेत आहे.असे हे देखणे निसर्गदृश्य बालकवींनी आपल्या काव्यातून चितारले आहे.
निळासावळा झरा,हिरवे शेतमळे ,हिरवी कुरणे या रंगसंगतींच्या माध्यमातून त्या दृश्याला जिवंतपणा बहाल केला आहे.निसर्गातील प्रत्येक गोष्टीला एकेक समर्पक उपमा दिल्याने कवितेला अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे. तसेच शेवटच्या ओळीने औदुंबराचे दर्शनी स्थिररूप प्रत्ययकारी दाखवले आहे.
'हिरव्या समृद्ध जीवनातून निघालेली पांढरी पायवाट' हे रूपक समाजातील परित्यक्ता स्त्रियांसाठी वापरले आहे.तिला कोणताही खंबीर आधार नसतो.त्यामुळे जीवनाच्या एका क्षणाला ती कंटाळते आणि मृत्यूच्या काळ्याशार डोहात आपले जीवन समर्पित करण्यासाठी जाते. यावेळी सर्वसाक्षी परमेश्वराच्या रूपातील औदुंबर स्थितप्रज्ञ राहून हे पाहत आहे. असे विफल जीवनदर्शन ही कविता देवून जाते.त्यामुळे ही कविता वाचकाला समाजदर्शन घडवणारी आहे.

--आदिसिद्धी

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या आताच्या बारावीच्या परीक्षेसाठी सराव म्हणून ही कविता घेऊन मी त्याचे रसग्रहण केले होते.योगायोगाने ती बालकवींची होती.तीच इथे मराठी भाषा दिनानिमीत्त लिहीली.

छान ! Happy
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!! Happy
कला, वाणिज्य की विज्ञान???

आजकाल कुणि असल्या साध्या, सोप्या, निसर्ग डोळ्यासमोर उभा करणार्‍या सुंदर कविता लिहीतात का?

कदाचीत लिहीत असावेत.पण तितकासा खोल अर्थ असलेल्या कविता फारश्या दिसत नाहीत.अर्थात याला अपवाद असतील.पण जुन्या कवींच्या कवितांमध्ये रमायला होतं.विशेषतः त्यातल्या शब्दांचा वापर भुरळ पाडतो.

बाकी नवीन कवींच्या कविता कशा असतात ते तुम्ही 'चाफा' ही केशवकुमारांची विडंबनपर कविता वाचून ठरवा. 'झेंडूची फुले ' काव्यसंग्रह.

चांगलं लिहिलंय.
औदुंबर कवितेचे(सुद्धा) लावू तितके अर्थ लागतात.
मला ही नवव्या इयत्तेत होती अभ्यासाला.
कधी कधी वाटतं, बालकवींनी बसला शी जुळणारा आणि वृत्तात बसणारा असला हा शब्द टाकला असेल, आपण उगाच डोके फोडतोय Lol

>>>>'हिरव्या समृद्ध जीवनातून निघालेली पांढरी पायवाट' हे रूपक समाजातील परित्यक्ता स्त्रियांसाठी वापरले आहे.तिला कोणताही खंबीर आधार नसतो.त्यामुळे जीवनाच्या एका क्षणाला ती कंटाळते आणि मृत्यूच्या काळ्याशार डोहात आपले जीवन समर्पित करण्यासाठी जाते. यावेळी सर्वसाक्षी परमेश्वराच्या रूपातील औदुंबर स्थितप्रज्ञ राहून हे पाहत आहे. असे विफल जीवनदर्शन ही कविता देवून जाते.त्यामुळे ही कविता वाचकाला समाजदर्शन घडवणारी आहे.>>>>>>> बाप रे!! असाही अर्थ लावता येतो.

'औदुंबर' ही बालकवींच्या नितान्त सुंदर व चिरयौवन निसर्ग गीतांपैकी आहे. या कवितेतील चित्रमयता, रंगसंवेदनादर्शक शब्द, अलंकारांची समर्पक रचना अलवार शब्द असे अनेक विशेष मापदंड ठरावेत. या कवितेचं अंतरंग उलगडून दाखवण्याचा केलेला प्रयत्न हा स्तुत्य आहे. एखाद्या चित्रकाराने कुंचल्याच्या साहाय्याने निसर्गचित्र रेखाटवे तसेच चित्र बालकवी शब्दांतून रेखाटतात. निसर्गातील आनंदाची लयलूट असते. 'फुलराणी','चाफेकळी',श्रावणमास' अशी कितीतरी काव्यचित्र आपल्या मनःचक्षु समोर तरळतात. रसिकाला एक सात्त्विक आनंद होतो. निसर्गाच्या वर्णनातून मानवी भाव कसे पेरावेत हे कदाचित बालकवींसारखे बेमालूम मिश्रण इतरांना विरळच साधले आहे. या कविश्रेष्ठांना लाभलेलं हे प्रतिभासर्थ्याचे अलौकिक देणे आहे. तरीही त्यांच्या मनाला कोठून तरी उदासीनता येत असे. त्यांच्या कोमल हृदयाला काहीतरी बोचणी होती. या रंगभवनांची लयलूट असलेल्या या निसर्गगीतांमधून ही उदासीनता डोकावताना दिसते. स्वतः कवीने 'उदासीनता' या कवितेत "काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतरहृदयाला" असे म्हटले आहे. हीच उदासीनता 'शून्य मनाचा घुमट','परवा',या व अन्य कवितांतून डोकावते. 'औदुंबर' या निसर्गगीतात आलेला निसर्ग त्यातील मानवी भावभावनांची सरमिसळ ही इतकी एकरूप आहे की, वेगळे करून पाहणे म्हणजे ताजमहालाचा एकेक चिरा काढून त्यात काय सौंदर्य आहे असं ठरेल. हिरव्या कुरणांमधून चाललेल्या पायवाटेचे सौंदरदर्शन सापाच्या उपमेतून कसे होईल? 'व्यंजना' हा काव्याचा खूप महत्त्वाचा गुण आहे;पण बालकवींनी आपल्या कवितेतून परित्याक्त स्त्रियांचे दुःख ध्वनित केले आहे. हे थोडं धाडसच वाटतं का! ज्याला त्याला आपलंसं काही मिळणे हा उत्तम साहित्यकृतीचा गुण असतो. पण त्या साहित्यकृतीतून हेच म्हटलं आहे हे स्वादर्शन घडावं. मी मोठा अभ्यासक नाही;पण.......! मला कसलेही दोष दिग्दर्शन करायचे नाहीत. पण 'स्त्रीवादी मराठी कवीता हा प्रवाह मान्य केला; तर 'स्त्रीवादी मराठी कविता' काही तथाकथीत कविश्रेष्ठांच्या कवितांमधून रडगाणं ठरली. यांकडे मला लक्षवेधायचे आहे. मला आणखीही व्यक्त व्हायचे आहे. पण मर्यादेत राहतो! माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. चुकलं असेल;तर ते माझं आहे.

निसर्गसौंदर्याचे फार सुंदर वर्णन करणारी एक सुंदर कविता आहे.
बाकी लोक उगाच भलता अर्थ शोधत बसतात असे मला वाटते.
India म्हणजे
Independent Nation Declared In August सारखे.

जग सुंदर आहे. कुरणे हिरवी आहेत. ' डोह काळिमा' सुद्धा गोड आहे. audumbaraachyaa सावलीमुळे पाणी झाकोळलेय खरे पण ते झाकोळसुद्धा गोड आहे, भयप्रद आणि दु:खार्त नाही. औदुंबर पाण्याला मुद्दाम सावळी छटा देऊ इच्छितोय असे नाही. तो तिथे आहे आणि त्याच्या सावलीखालून पाणी वाहातेय इतकेच काय ते.
कार्य नाही, कारण नाही, कसलाच कार्यकारण संबंध नाही. सहजभाव. जग हे असे आहे. काळे, पांढरे, करडे, रंगीबेरंगी. सुख आहे, दु:ख आहे.
कुठलीही निर्मिती, मग ती साहित्यकृती असो वा चित्र/शिल्प कृती, तळमळीतून, वेदनेतून, मनाच्या तरल अवस्थेतून निर्माण होते. वेदना म्हणजे दुःख असेच नाही. ही प्रसवकालची वेणा असते.