येसर आमटी

Submitted by मितान on 18 December, 2013 - 10:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमटी पीठ तयार करण्यासाठी -
गहू - १ वाटी
चणा डाळ - १ वाटी
ज्वारी - १/२ वाटी
बाजरी - १/२ वाटी
धणे - १/२ वाटी
सुकं खोबरं / कीस - १/२ वाटी
जिरे - २ टे स्पू
मिरे - २ टे स्पू
लवंग - ७-८
मसाला वेलची - २
दालचिनी - बोटाच्या दोन पेरांएवढी
दगडफूल - २ टे स्पू

आमटीसाठी -
आमटी पीठ - २ टे स्पून
लसूण - ५-६ पाकळ्या किंवा एक मध्यम कांदा चिरून
लसूण घालणार असाल तर कढीलिंबाची ५-६ पानंही घालायची.
तेल
मोहरी,जिरे
हळद
४ वाट्या पाणी
कोथिंबिर वगैरे..
मीठ

क्रमवार पाककृती: 

गहू, डाळ, ज्वारी बाजरी हे कोरडेच;वेगवेगळे मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मग मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर घरभर घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. एकत्र करून मिक्सरवर कोरडे बारीक दळून घ्यायचे. आता बरणीत भरून ठेवा. पुढचे ३-४ महिने जेव्हा जेव्हा झटपट पण खमंग आमटी खावी वाटेल तेव्हा करा.
आमटीची कृती
आमटीचे पीठ वाटीभर पाण्यात नीट मिसळून घ्या. पातेल्यात तेल गरम करा. जिरं मोहरी लसूण कढिलिंबाची फोडणी करा. मग हवं तेवढं लाल तिखट घाला. त्यावर हे वाटीतलं पीठ घाला. वरून अजून ३ वाट्या पाणी टाका. साधारण ५ मिनिटे उकळू द्या. येसर तयार.
गरम भात, खिचडी किंवा भाकरी पोळी यात कुस्करून ओरपा. चव वाढवण्यासाठी लिंबूपण घाला.

वाढणी/प्रमाण: 
मसाला साधारण १/४ किलो , २ टे स्पू आमटी पिठाची ४ - ५ वाट्या आमटी होते.
अधिक टिपा: 

बर्‍याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ.
मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्‍याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्‍हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत. अशा वेळी पटकन होणारा हा 'कोरड्यास' फार महत्त्वाचा. कार्याच्या तयारीत मसाले भाजण्याबरोबर येसर भाजणे ठरलेलेच. मुहूर्त करायच्या वेळी आणि सूप वाजतं तेव्हा पानात येसर हवाच. पाहुणे परत जातानाही लाडू चिवड्यासोबत येसर नि मेतकुटाचे पुडे देण्याची प्रथा आजही आहे. मला वाटतं की कामाच्या गर्दीत कमी वेळात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा करायला सोपा नि खमंग म्हणून या पदार्थाला येवढे महत्त्व असावे.शिवाय हे पीठ टिकाऊ असल्याने कोरड्या हवामानात वर्षभराचे एकदम करून ठेवता येते. महाल्क्ष्म्यांच्या दिवशी ज्यांच्या घरी रात्रीचा नैवेद्य असतो त्यांच्याकडे दुपारचे जेवण भाजलेले खावे म्हणून येसर नि भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी असते.
आजही माझ्या घरात खिचडी नि येसर हा झटपट होणारा नि सर्वांना आवडणारा हा प्रिय पदार्थ आहे. माझे तर हे कम्फर्ट फूड आहे. पावसातून भिजून आल्यावर किंवा बाहेर कडाक्याच्या थंडीत फिरून आल्यावर येसर ओरपणे म्हणजे स्वर्गसुख !
लहानपणी आजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वाटीत येसर वाढायची. आम्हा मुलांना तो कमी तिखट लागावा म्हणून त्यात कच्च्या तेलाची धार. मग ते तेल येसरावर चांदण्यांसारखं चमकायचं. तयार व्हायची चांदण्यांची आमटी ! माझी लेकही ही चांदण्यांची आमटी आवडीने खाते.
डाएटवाल्यांना गवार, दुधी, वांगे अशा भाज्यांमध्ये रस्सा करायचा असेल तर हे पीठ दाणे किंवा खोबर्‍याच्या वाटणाऐवजी वापरता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई, आजी, पणजी...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडी,धन्यवाद
कोरड्यास म्हणजे कोरड्या सोबत काहीतरी.. म्हणजे भाकरी पोळी अशा कोरड्यासोबत 'कोरड्यास' !

अल्पना, Happy

बहूतेक तरी नाही मिळत येसर दुकानांमध्ये. यावेळी औरंगाबादला चौकशी करेन मिळतं का बाजारात. आमच्याकडे याला येस्सूर आमटी म्हणतात.

येस्सूर करण्याची पद्ध्त माहीत नाही मला, गावाकडून येतो येस्सूर घरी नेहेमी. आमटी करताना त्यात तेल, मोहरी, भरपूर लसूण आणि तिखट घालतात गावाकडे. कढीपत्ता आणि कोथिंबीरीचे लाड नसतात गावकडच्या आमटीत. आई मात्र घालते.

हो सयो, वर्षाच्या तिखटा-मसाल्याबरोबर करून ठेवलेलं असतं हे पण पीठ

वरदा, अल्पना , हे पीठ पुण्यात तरी नाही मिळत. काल एक माबो कर मित्र नि मैत्रिण ही आमटी अतिशय आवडीने जेवले. दोघेही भारताबाहेर. त्यांना देण्याएवढे पीठ तयार नव्हते म्हणून खूप दुकानं पालथी घातली. मिळाले नाही. म्हणून आज निदाम रेसिपी लिहून ठेवली. ती मैत्रिण तिकडे करेल.
बाय द वे, एखाद्या सुगरण गृहोद्योगाला ही रेसिपी करायचा आग्रह करावा काय ?? Happy

पिठं आणि मसाले एकत्र भाजून केली तर दुधाची तहान ताकावर भागेल काय? त्यात थोडं शिंगोळ्याचं पीठ पण घालता येइल.

मस्त वाटले वाचुन. करुन बघता येईल. धन्यवाद मितान.

बाय द वे, एखाद्या सुगरण गृहोद्योगाला ही रेसिपी करायचा आग्रह करावा काय ?? >>>>. ते पराग आहेत ना मायबोलीवर? त्यान्चे सकसचे प्रॉड्क्ट्स आहेत ते. त्याना सान्गा करायला. पराग लाईटली घ्या.

नाहीतर केप्रवाले बघा.

मस्त वाटतेय आमटी .. Happy रेसिपी लिहिली सुद्धा खुप छान ..

पिठल्याची कझिन? Happy

इकडे ज्वारी बाजरी नाही तर बार्ली वगैरे वापरून करता येईल का असा एक विचार येत आहे ..

मला आमच्या इथल्या इं. ग्रोत गहू, बाजरी ची छोटी पाकीटे दिसली होती. मी पीठं भाजून घेऊन प्रयोग करणार आहे. अर्थात ओरीजिनल चाखली नसल्याने प्रयोग कितपत जमला कळणार नाही.

मितान, अगं ही जवळपास कुळथाच्या पीठीसारखीच. कोकणात कुळीथ भाजून, मसाल्यांबरोबर दळून पीठ तयार करून ठेवतात.
त्याची अशीच आमटी करायची. हेच... भरपूर लसूण वगैरे घालून.
इथे कुळीथ मिळत नाहीत. मला येसर करून ठेवता येईल.
मस्तच रेसिपी. आणि त्यावरची टिप्पणी खास.

येस्सर....सोलापूरला मैत्रिणींच्या घरी चव घेतली आहे याची. मस्त प्रकार.
दाद - हो कुळिथ पीठासारखंच हे पण पीठ असतं.

सिंडरेला, स्वाती२
तयार पिठं आणि मसाले वापरून प्रयोग करून बघायला हरकत नाही. फक्त हे आमटीचे पीठ आपल्या नेहमीच्या पिठाएवढे बारीक नसते. जरा भरडच असते. तरीही, तुम्हाला चव आवडली तर नक्की सांगा. अजून एक शॉर्टकट सापडेल !
वरदा, कुरियर करू का ? Happy

ए, मस्स्स्त वाटतेय येसर आमटी.. ते पीठ कुठे विकत मिळालं तर माझ्यासाठीही एक पुडी घेऊन ठेवा Wink
मराठवाड्यात जावं का वर्‍हाडाबरोबर?

येसर वाचून मलाही कुळथाच्या पिठल्याची आठवण झाली. पण ते एवढं झणझणीत नसतं.

मितान, लिहिलंयसही छान Happy

आमटी तर खमंगच वाटतेय. तोंपासु एकदम. कधी खाल्ली नाहीय. पण तू लिहिलं आहेस त्याहून मस्त. चांदण्यांची आमटी. Happy

Pages