कोबीचा झुणका

Submitted by योकु on 24 January, 2018 - 13:26
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक लहान पण घट्ट कोबी
- २/३ टेबलस्पून तेल
- दोन हिरव्या मिरच्या
- अर्धा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- चवीपुरतं मीठ
- चिमटीभर साखर
- चिमटीभर हिंग
- अर्धा अर्धा चमचा मोहोरी आणि जिरं
- २/३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ

क्रमवार पाककृती: 

- कोबी पातळ उभा चिरून धूवून निथळत ठेवावा
- मिरच्यांचे हातानीच मोठाले तुकडे करून घ्यावे
- लोखंडी कढई दणदणीत तापू द्यावी
- सणकून तापलेल्या कढईत तेल घालावं. लगेचच तापेल ते, तर मोहोरी, जिरं, हिंग हळद आणि मिरचीचे तुकडे एकापाठोपाठ एक वस्तू त्यात घालाव्या; त्यावर निथळलेला कोबी घालून परतावं
- तेल सगळीकडे माखलं भाजीला की मग लाल तिखट घालून परतून झाकण घालावं आणि आच कमी करून एक वाफ येऊ द्यावी. कढई आधी सणसणीत तापल्यानी भाजी मस्त तळसल्या गेली असेल. आता त्यात मीठ, साखर घालून भाजी शिजवून घ्यावी.
- शिजायला एक कणी कमी असतांना डाळीचं पीठ पेरावं आणि एकदा परतून मस्त वाफ येऊ द्यावी. डाळीचं पीठ तसं कमी घातल्यानी, लगेचच शिजेल. आच बंद करून एक पाच मिनिटं झाकण झ काढताच भाजी मुरू द्यावी.
- कोबीचा झुणका तयार आहे. गरम झुणका, भाकरी, चटणी बरोबर हाणावा.

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- पीठ पेरल्या भाज्या सपक चांगल्या लगत नाहीत तर तिखट जरा जास्त घालावं
- पीठ फार जास्तही वापरायचं नाहीय. भाजी जस्ट कोट होईल इतपतच तरच त्याची चव साधेल
- हीच भाजी ज्वारीचं पीठ लावूनही करते कधी कधी आई

माहितीचा स्रोत: 
आई. कोबी जरा जुना असला की अशी भाजी करते ती. कोबीचा विशिष्ट गंध याप्रकारात लपतो.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ... मस्त .. मला नुसती पण आवडते, फोडणीत जिरे, हिरव्या मिरच्या आणि शिजत आली की लिंबू पिळायचे, मिठ, चिमुटभर साखर.. आता अशीही करुन पाहते..

इथे बरीक केलेला कोबी पॅकेट्मधे मिळतो मी अशीच भाजी करायचे फक्त बेसन जास्त घालून थोडं. आनि हे सर्व कोरडं होऊ द्यायचं. थन्ड झाल्यावर भाजी घट्ट होते. ती भाजी आलू पराट्यासारखी दोन लाट्यांमधे ठेवून त्याचे पराठे करायचे. खूप छान लगतात. कोबी थोदा बारीक असेल तर एक
सारखे पराठे होतात.

चिमटीभर साखर >> मेल्या, घालूच नकोस ना मग. Angry

बाकी रेसिपी झक्कास. मी नक्की करून पाहणार, कारण माझ्या आवाक्यातली आहे.
मित्रा तु शेफ का नाही झालास? आणि जरा रेसिपी बरोबर फोटो टाकत जा, म्हणजे दिनेश चा वारसदार शोभशील.

योकु धन्यवाद. दोन दिवसापासून फ्रीजमध्ये पडलेल्या कोबीला कशी सद्गती देवू हा प्रश्न पडलेला मला. आता या प्रकारे करून बघेन.

केली आज. मी थोडं ज्वारीचं पीठ पण घातलेय... भारी लागतेय... धन्यवाद ही रेसिपी दिल्याबद्दल... तेल थोडं जास्त लागतं असं वाटलं कारण जराशी कोरडी झालीये पण चलता है...

छान रेसिपी. मी असं डाळीचं पीठ लावून कोबी फक्त पराठ्यांकरता केला आहे.
एरवी कोबी कसा संपवायचा असं प्रश्न मला अजिबातच पडत नाही. Wink