डायरी (गूढकथा) (संपूर्ण)

Submitted by Chetan02012 on 18 January, 2018 - 09:41

ह्या गूढकथेचा एक भाग मी आधी नेकलेस या नावाने आधी प्रकाशित केला होता. पण आता डायरी या नावाने संपूर्ण कथा टाकतोय

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे कस काय शक्य आहे?
मला अजूनही विश्वास बसत नाहीये.
पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत?
But today it’s been 10 years.
म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे.
माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित.
अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes.
मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते.

मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय. मती भ्रष्ट केली १५ मिनिटात.
बरोबर इथे उभा राहूनं मी ह्या शॉपिंग मॉल मध्ये माझ जे काही घरच समान घेतलं होत त्याच बिल भरत होतो. आणि अचानक मॉलच दार उघडल गेल (automatic तर होत) आणि मस्त परफ्युम माझ्या नाकपुड्यामध्ये शिरला.

अरे शहाण्या बाकीच्या सगळ्यांचा परफ्युम सोडून तुला फक्त तो दरवाजा उघल्यावरच बर वास आला रे.
तस नाही रे बाबा आता हे बिलिंग काउन्टर त्या दरवाज्याच्या समोरच तर आहे म्हणजे माझ्या पाठी .
तू गप रे माझ्या आठवणींमध्ये बाधा आणू नकोस .
हा तर मी असा इथे पैसे भरत होतो आणि मस्त सुरेख असा परफ्युम चा सुगंध माझ्या नाकात शिरला.
मी मागे वळून पाहिलं तर ती पाठमोरी मला दिसली. मनातल्या मनात तर आम्ही खुशच होतो सुंदर मुलीला पाहून . तिने काही कारणाने मागे वळून पाहिलं. बहुतेक तिला कळाल असेल मी पाहतोय तिच्याकडे. मी झटकन तोंड फिरवल. पण साला तिचा चेहरा ओझरता दिसला मला आणि हादरलोच न. मी परत मागे वळून पाहिलं तर पोरगी गर्दीत गायब. आणि तेवढ्यात ती बिल वाली कल्मडली.

"Sir, would you like to pay by cash or card?" शीट रे.
तीच होती रे . I’m Sure. माझा पूर्ण विश्वास आहे की ती तीच होती म्हणून. पण साला तू आपल्यावर विश्वास नाही ठेवत.
कुठे गेली यार ती. आक्खा शॉपिंग मॉल शोधून काढला. ह्या सगळ्या लोकांना पण आजच यायचं होत गर्दी करायला . केवढी गर्दी. त्यात तिला नीट पाहिलं हि नाही की तिने काय कपडे घातलेत ते. आता कस शोधणार??
दोन वाजले रे. चल आता . हे एवढ समान घेऊन हिंडत बसलोय दिवसभर. तुझा भास झाला असेल बाबा. घरी खूप काम बाकी आहेत अजून. दोनच दिवस झालेत इथे येउन. घर साफ करायला पण वेळ भेटलेला नाहीये. आजची सुट्टी वाया नको घालवूस. नाहीतर परत ६ दिवस सुट्टी नाहीये. ऑफिसला रखडत जायचं. मरणाची भूक पण लागलीये. ती फ्लॅट ची मालकीण बोलली होती न आज स्वयंपाकीण बाईला सांगते म्हणून भेटायला. काल तर वेळ भेटला नाही आज तरी भेटून घेऊ यार. साल्या भूक लागलीये चल लव........
There she is.......
बोललो होतो तुला ती भेटेल म्हणून. चल पटकन .
ती जी कॅफे मध्ये कॉफी पीत बसलीये ती? हो रे तीच ती रुचा. यार १५ वर्ष झाली रे पण हि अजून जशीच्या तशीच दिसतीये. तेच काळे केस,गुलाबी गाल, नकट नाक आणि बेस्ट म्हणजे तिचे निळे डोळे . फिदा आहे आपण तर तिच्या डोळ्यांवर.
गप रे, काय आता काय इथेच कविता लिहिणार आहेस का तिच्यावर??
तू डोक्यात कॅब्रे नको करू बर का आता. मला बोलायचं रे तिच्याशी. खूप काही सांगायचय. साल पण कॉलेज च्या दिवसात हिम्मत नाही झाली आणि आता अचानक बाई समोर आलीये रे.
अबे कीती वेळ असा कोपऱ्यात उभा राहून बघत बसणार आहे. बॅग उचलून माझे हात दुखातायेत. भुकेने पोटात कावळे आंदोलन करता आहेत. एक काम करू चल त्या कॅफे मध्ये जाऊन बसू. काही तरी खाण्याची ओर्डर देऊ आणि मग पाहत बसू तुझ्या प्रिये कडे.
आईला आयडीया तर झक्कास आहे.

" What would you like to order Sir?"
" Get me one grilled chicken sandwich and fries."
" Anything to drink sir?"
"Coke"
अबे मेनू वर रेट तर बघ एकदा ओर्डर करण्याआधी.
थंड घे रे जरा. बघ ती कशी शांतपणे पुस्तक वाचत बसली आहे. यार काय बोलू मी तिच्याशी?? ती समोर आली की नुसती तंतरते रे. तोंडातून एक शब्द बाहेर निघाला तर शप्पथ. आणि हे फिल्म वाले काहीही दाखवतात एका दिवसात पोरगी पटवतो हिरो. आमच्या लाइफ मध्ये अस का नाही होत?? गेल्या १५ वर्षात एवढ्या मुलींशी बोललो पण अजूनही हिच्याशी बोलण्याची हिम्मत नाही होत राव.
अबे असा डोक खाली घालून काय बसलाय?? हिम्मत कर . चल आगे. अन लढ पठ्ठ्या!! हम हे न तुम्हारे साथ. कर एकदाची हिम्मत. जे असेल ते बोलून टाक एकदाच. जो होगा सो देखा जायेगा. जास्तीत जास्त काय होईल ??? ती ओळख दाखवणार नाही. ठीक आहे न यार. शेवटी बोलला हे समाधान तर राहील मनात. सँडविच आल रे चल आधी ह्या पापी पोटाची भूक भागवू.

"Here you go sir"

अरे पण बोलायला काही टॉपिक तर हवा न यार. कॉलेज मध्ये ३ वर्ष होतो तिच्यासोबत . बाजूच्या बेंचवर बसायची. आणि एक शब्दही नाही बोललो रे तिच्यासोबत अजून. तुला तर माही........
" एक्सक्यूज मी, तू रोहन आहेस न?"
अबे आ वासून काय बसलाय तोंडातला घास संपव नाहीतर माशी घुसेन. पाणी पी पाणी पी.
" अरे ठसका लागला वाटत. हे घे हे घे पाणी पी"
"तू रोहनच आहेस न??
" मी ... मी ... हो..."
" अरे समांथा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग?? मी रुचा. रुचा पंडित ? अरे आपण एकाच कॉलेज मध्ये होतो?"
अबे बोल काहीतरी. नाहीतर तिला वाटेल मुका आहेस. का संधी सोडतोयेस. मंद माणसा.
"रुचा रुचा. एस एस रुचा. अरे वाह इकडे कशी?"
साल्या फेकाड्या हिच्यास मागे तर हिंडत होतास न .
" अरे मी इथे जॉब करते. वर्ष झाल मी इथेच आहे सध्या. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं चला एकट्याने जरा टाईम घालवावा. पण तू इथे कसा???"
अरे मेरी जान बोल. हीच वेळ आहे . हीच संधी आहे. नाही बोललास तर पस्तावशील.
"मी मी ...."
"काय झाल रे?? असा काय बोलतो आहेस मघासपासून ? तुला आवडल नाही का मी अस येण??"
अग ह्या मंद ची टरकली आहे . कधी अक्कल येणार काय माहित हिरो ला.
"नाही ग. अस अस काहीच नाहीये. एकदम ठसका लागला त्यामुळे. I’m also surprised to see you here. मी पण इथेच शिफ्ट झालो २ दिवसापूर्वी. बदली झाली ."

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इन्स्पेक्टर परब यांच्या चेहऱ्यावर असलेल्या भावांवरून किंवा कोणत्याही भावांच्या अभावांवरून हवालदारांनी ताडले की प्रकरण हाताच्या बाहेर जायला लागलय...
इन्स्पेक्टर परब मात्र हातातील तिच्या मृत्युच्या दाखल्याकडे पाहत होते.
रुचा पंडित….
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
साल्या मी बोललो म्हणून विचारलस तरी तिला. नाहीतर नुसता दिवसाढवळ्या स्वप्न रंगवत बसला असतास तीची...
तस नाही रे राजा ..... तुला कस सांगू तेच कळत नाहीये....
अबे मला काय सांगतोस.... मला सगळ माहितीये बे... मी आहे म्हणून तू आहेस... नेहमी लक्षात ठेव....
तुझी अशी फालतुगिरी चालते न म्हणून काही बोलावस वाटत नाही मला.....
गप बे.... माझी फालतूगिरी आयुष्यभर तुझ्या अंगचटीला आहे बघ .....
पण ती आल्यावर तुला आराम आहे राजा.....
लेट्स सी .....
वोह जब नजदीक होती हे तो साला पूरी दुनिया उलटी घुमने लागती हे यार .....
अबे पुराने मूव्ही के फ्लॉप हिरो ... बंद पड......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ ऑगस्ट २०१४
आताशा अस वाटू लागलाय कि तो माझ्या आजूबाजूलाच आहे...माझ्या मनाची तळमळ एवढी का वाढते आहे??? माझ मलाच कळत नाहीये ....
१० वर्ष झालीयेत आता, तरीही मी दररोज न चुकता त्याचा एवढा का विचार करते????
जस काही तो माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे...
सुरुवातीला सगळ काही एक गम्मत म्हणून झाल होत....पण आता सगळ बदलल आहे अस वाटत ... दिवसेंदिवस अजून अस्वस्थ वाटायला लागलय.....
ते दिवस वेगळेच होते नुकतीच कॉलेज मध्ये आले होते... आधी जिला अवतीभोवती फक्त मुली दिसत होत्या अश्या मुलीला एकदम जर का तुम्ही खऱ्या मुलामुलीच्या जगात आणून ठेवल तर कोणतीही मुलगी बावरनारच न हो?? तसच माझही झाल..... काहीच सुचत नव्हत ...... मग मैत्रिणी बनत गेल्या.. काही वर वर ..काही जिवाभावाच्या... पण तरी कॉलेज मध्ये मुल पण होती म्हणून खूप बावरले होते... आणि त्या कॉन्वेन्ट च्या मुलीतर कसल्या बिनधास्त बोलायच्या मुलांशी...मला तर घामच फुटायचा हे सगळ पाहून... आता खरच स्वतःवरच हसायला येत हे सगळ आठवून!!!! एक महिना तर त्या कॉलेज मध्ये सेट होण्यातच गेला,,, मग कुठ शेवटी माझी गाडी रुळावर आली ......
आणि त्यातच ते सुरु झाल .....
अचानकच मी वर्गात आल्यावर मुलांचा गोंधळ सुरु होण.... वहिनी आली..वहिनी आलीच्या हाका सुरु होण..... कळसच झाला....
वर्गाच्या बाकांवर जेव्हा माझ नाव लिहिलेलं मला कळाल तेव्हा माझा पारा चढला ....
काय फालतुगिरी?.... केवढी रडले होते मी... हे अस सगळ पहिल्यांदाच घडत होत... आणि फक्त माझ्याच बाबतीत...
दररोज सकाळी पहिल्या लेक्चर च्या आधी माझ नाव फळ्यावर .... आणि वर्गात टीचर आल्यावर पहिला प्रश्न.. कोणाचा नालायकपणा आहे हा??? नशीब कधी विचारलं नाही की कोण आहे ही मुलगी म्हणून....शरमेने मेलेच असते मी...
आणि ज्या मुलासोबत माझ नाव जोडलं गेल होत त्याच्याकडे बघितल्यावर तर कीव येत होती...
come on ... he was looking like a village kid ...
एकदा त्याला एकटा पकडून काय ओरडले होते मी!!! बिच्चारा एखाद्या कोवळ्या कोकारासारखा मान खाली घालून ऐकत होता....एक शब्दही तोंडातून बाहेर काढला नाही बेट्याने..मलाच कसतरी झाल म्हणून निघून गेले मी .... तरी पुढचे २ दिवस त्याचाच विचार करत होते... काय वाटल असेल त्त्या बिचाऱ्याला??...
पण आता ३ वर्षांपूर्वी त्याचा फोटो पाहिला फेसबुक वर आणि गारच झाले मी... हा खरच तो होता ??
केवढा बदललाय हा !!!! अस वाटत न की..................
बापरे ....
काश मी त्याला त्यावेळी स्वतःहून विचारलं असत....
आणि आज माझ स्वप्न जणू काही अस्तित्वात आल... पुस्तकातून नजर वर गेली आणि तो समोर..... जीव असा टांगणीला लागला होता.... पोटात खूप मोठा गोळा उठला... हातातला कॉफीचा कप तोंडापर्यंत गेलाच नाही.....एखाद्या राजकुमारीने स्वतःच्या स्वप्नातल्या राजकुमाराची आठवण काढावी आणि तो समोर यावा अश्या परीकथेसारखी अवस्था झाली माझी......
केवढा गोंधळलेला दिसत होता........माझ्याकडे तर भूत बघाव तस बघत होता...
२ दिवसांनी परत भेटायचंय ....... २ दिवस .......
रात्र बरीच झालीये..... उद्या काम बरच आहे... झोपायला हव....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज तिला परत भेटायचं रे....
अबे सकाळपासून ५० वेळा सांगून झालय... बंद पड आता नाहीतर समोरच काम पूर्ण नाही झाल तर तो बॉस चालू होईल....
गप रे... मला काहीच सुचत नाहीये यार... समोरच्या स्क्रीन वर मला फक्त तिचाच चेहरा दिसतोय बघ .......
आसमान की परी हे वो..
मेरे ख्वाबो की मलिका...
वही मेरी जिंदगी और वही मेरी रुह ...
तुझे चाहता हु मै इस कदर,
की दुनिया को भुला बैठा,
तेरी एक हसी के बदले,
अपनी जिंदगी भुला बैठा…….
अबे ओ मिर्झा गालीब, समोरचा command चुकला बघ... error message तुझ्या carreer मधला मोठा पूर्णविराम दाखवतोय....
खड्ड्यात गेल राव आजच काम!!!!
मेरी जान, चल आता आतमध्ये. सकाळपासून २ ओळी टाइप केल्या आहेस आणि ७ चैतन्यकांड्या विझवल्या आहेस फुकाड्या.....
मागचे दिवस आठवता आहेत रे....तुला आठवतंय तिला प्रपोज मारायचं म्हणून १५ दिवस दररोज बाथरूम मध्ये डोक्याला शॅम्पू लावून, केसांच्या वेगळ्या वेगळ्या स्टाइली करून , अमिताभ सारख आरश्यात पाहून डायलॉग पाठ करायचो .........
हो आठवतंय आणि मग आई बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवून ओरडायची "तासतासभर काय नखरे करतोय रे पोरींसारखे नालायका, बाहेर निघ लवकर..."
साल्या तू प्रत्येक गोष्टींमध्ये गोमच शोध.....
सगळ काही तिच्यासाठीच होत यार....आपली स्कूटी चालवताना पण रस्त्यापेक्षा अर्ध लक्ष आरश्यात असायचं आणि हवेने उडणारे केस बघून तुला विचारायचो की "साला अपने ये बाल देखके वो तो फिदा हो जायेगी ना??"..
हो... आणि मी तुला म्हणायचो "पळ!!!!"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मेरे भाई , खिशाला परवडणार हॉटेल बघायचं रे....४ दिवस झालेत येवून... हातात अजून पगार आला नाहीये... आणि उधळपट्टी सुरु....अम्याला कळाल तर लगेच बोलेल "साल्या मुलीवर उडव तू .. मित्रांची वेळ आली की खिशाला भोक पडत तुझ्या!!"
"जास्त वेळ वाट पाहायला नाही लावली ना मी तुला??"
हो पूर्ण २० मिनिटे आणि ४३ सेकंद
"नाही ग, बिलकुल नाही... आत्ताच पोहोचलो बघ..."
"जायचं आत??"
मी म्हणतो तेव्हा माझ्या पोटाला चिमटा काढतोस ... ती म्हटली म्हणून आख्ख्या हॉटेल मधले पदार्थ मागवलेस रे....
"तू बिलकुल चेन्ज नाही झालीस ग"
"असेल बहुतेक, पण तू खूप चेन्ज झाला आहेस... मस्त पर्सनैलिटी झालीये तुझी..."
"ही...ही... काहीही !!"
"अरे नाही खरच.... आणि केवढा लाजतोस रे तू मुलीसारखा..."
अग आता कोणीतरी मुलीसारख वागल पाहिजे ना....
"छे ग... पण खरच वाटल नव्हत परत भेटशील म्हणून..."
"अरे, जग छोट आहे ... आज नाहीतर उद्या भेटलोच असतो "
क्या डायलॉग हे भाई...
"बोलण्यात अजूनही तुला तोड नाहीये..."
....
....
....
....
"ए चल मला जायला हव... दोन तास कसे गेले कळलच नाही रे जुन्या आठवणींमध्ये... सॉरी बर का... निवांत भेटू... and thanks again for dinner..."
दोस्ती का एक उसूल हे मैडम... दोस्ती मे नो सॉरी नो थँक्स...
"ए काहीही नको बॊलुस...नंतर भेटूच परत.... चल तुला ऑटो मध्ये बसवतो."
एक मुलगा आज बराच खुश आहे ..
अबे कुत्र्या काय नुसता मध्ये मध्ये करत होतास रे.....किती दुर्लक्ष कराव तुझ्याकडे....
हाहाहा .... चला घरी....
पहिली भेट ... पहिली डेट....पहिल्या क्रश सोबत.... जिंदगी इसी का नाम हे...
तिच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो रे...काय मस्त स्माईल करते रे ती ... तिची प्रत्येक अदा म्हणजे मला सजा होती...हे सगळे क्षण कुठे साचवून ठेवू रे ... तूच सांग....
चल बाळा घरी चल..... उद्या आपला बॉस.... तुझा रिपोर्ट बघून सांगेनच ....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१० ऑगस्ट २०१४,
कितीतरी दिवसांनी एवढे हसले मी काल ... कालची संध्याकाळ खरच खूप मजेत गेली.. आज दिवसभर कामात लक्षच नव्हत... फक्त रोहनच....खरच काय झालय मला??? ही माझ्या हृदयात त्याची आठवण आल्यावर जी धडधड वाढते आहे ते काय आहे नक्की...एक नवीन आशेचा किरण आलाय माझ्या आयुष्यात... नवीन आहे की जुना ??? जुनाच म्हणावा.. ..
दिवसभर त्याच्याशीच chat करत होते आज ..फक्त तो नी तोच....
काही लिहावसच वाटत नाहीये आज.... तो आणि तोच.....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
“अहो ... अहो, वाजलेत किती पहा .... सकाळी ड्यूटीवर जायचय... एक वाजलाय... चला झोपायला...”
बायकोच्या हाकेने इन्स्पेक्टर परब वर्तमानात परत आले..हातातल्या डायरीकडे सुन्न नजरेने पहात मान टाकलेल्या सिगरेटचा शेवटचा झुरका मारून ते उठले....रुचाच्या डायरीने डोक्यात उठवलेल्या वादळाला बरोबर घेवूनच बायको पाठोपाठ बेडरूम च्या दिशेने पावले टाकू लागले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
२० नोव्हेंबर २०१४
त्याच प्रेम फार निरागस वाटत.. तोही खूप निरागस वाटतो..कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्यावर प्रेम करतो तो.. कधी बोलला नाही हे तो..आणि यापुढे कधी बोलणार पण नाही..पण मला माहितीये. Woman intuitions. माझी नजर चुकवून नुसता बघायचा माझ्याकडे. त्याच्या नजरेत कधी लालसा किंवा वासना नाही दिसली मला.. दिसली ती फक्त निरागसता. म्हणूनच मलाही आवडायचा तो..आणि आतातर माझं प्रेम आहे त्याच्यावर.
त्याच्या सोबत दिवस खूप छान जात आहेत.खरच कळत नाहीये की हे सगळं खरं आहे की माझ्या मनाचे भास.तो भेटून आता ४ महिने झालेत..वेळ घड्याळाची किल्ली फिरवावी तसा निघून जातो.माझं मन मला सांगत तो लवकरच माझा होईल. आत्ता आत्ता तो माझ्या आयुष्यात आला पण असं वाटत की तो जनम जनम से माझाच होता.. माझं मलाच हसू येतंय.. काय लिहिते आहे मी..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"परब काय ठरवलं मग आत्महत्या आहे की मर्डर?"
"सर, आत्तातरी मी खात्रीशीररित्या काही सांगू शकत नाही."
"बरं पोस्टमार्टेम रिपोर्ट काय म्हणते आहे?"
"पोस्टमार्टेम नुसार उंचावरून पडून कवटी फुटून मेंदूला झालेली जबर दुखापत आणि अविरत रक्तस्त्राव यामुळे मृत्यू एवढंच कळू शकलंय. त्याव्यतिरिक्त बॉडीच्या पायावर फक्त एक डीप कट आहे. तो ही बाल्कनी च्या ग्रिल मुळे पडलाय. त्याशिवाय झटापट किंवा जबरदस्ती झाल्याची काहीही चिन्ह पोस्टमार्टेम आणि गुन्ह्याची जागा येथे सापडली नाहीयेत. आणि आत्महत्या म्हणावं तर काही नोट किंवा काही पत्र असं काहीच सापडलं नाहीये. तपासा अंतर्गत मृत व्यक्तीला काही मानसिक ताण घराचं टेन्शन वगैरे अजून तरी समोर आलं नाहीये. तरीही काही विचित्र गोष्टी समोर आल्या आहेत त्यांचं स्पष्टीकरण भेटलं तर नक्कीच काहीतरी ठामपणे सांगता येईल.एक दोन दिवसात केस संपवून तुम्हाला फाईल सबमिट करतो."
"ओके परब. आय डोन्ट डाऊट युअर कॅपॅबिलिटी... जास्त ताण घेऊ नका. आणि उद्या रात्री जरा बंगल्यावर या. मेजर परांजपे येणार आहेत. बेस्ट ऑफ लक"
"नक्की सर"
एक कडकडीत सॅल्यूट मारून इन्स्पेक्टर परब कमिशनर दातारांच्या केबिन मधून बाहेर आले.
ज्या गोष्टी गुन्ह्याच्या तपासादरम्यान समोर आल्या होत्या त्या दिसायला फार सोप्या होत्या पण स्वीकारायला अवघड. त्यामागचं स्पष्टीकरण शोधन हे समोरच आव्हान होत, आणि हेच पूर्ण करणं हे परबांचं काम होत.
"५२११, ५११३ चला गाडी काढा डॉ. सावंतांकडे जायचंय"
एवढ बोलून परब कॅप आणि हातात पोलीसी छडी घेऊन जीपकडे चालायला लागले. परबांचा आवाज ऐकून दोन्हीही हवालदार हातावर घेतलेली अर्धवट मळलेली तंबाकू तशी तोंडात टाकून परबांच्या मागे पळत निघाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
२५ डिसेंबर २०१४
उद्या माझा वाढदिवस. बरोबर २५ वर्ष पूर्ण होतील मला उद्या. आणि मला माझं गिफ्ट सुद्धा भेटलंय. रोहन ...उद्याच्या संपूर्ण दिवसाच प्लांनिंग सुद्धा करून ठेवलय त्याने.मूवी ला जायचा प्लॅन आहे 7.30 चा शो.ऑफिस सुटल्यावर मला तो घ्यायला येणार आहे. खुपश्या वर्षानंतर मी माझा वाढदिवस खरच एन्जॉय करणार आहे. त्याला रात्री मी घरी बोलावलंय. माझं नाशिबही चांगलय की माझी रूम मेट घरी गेलीये.तसा मी आधी विचार केला होता की त्याला एकदा घरी बोलवावं. पण म्हटलं नको. It has to be a special occasion for special things. आणि उद्या special occasion आहेच. Special दिवसही आहे आणि माझ्यासोबत special व्यक्तीही असेल. तसा खूप खूप लाजाळू आहे माझा रोहन. पण का कोणास ठाऊक मला वाटत की उद्या तो मला विचारलेच, नक्कीच विचारेल. पण थोडीशी भीती वाटते आहे . तो खरच विचारेल मला?? आणि नाही विचारलं तर?? का तोही दुसऱ्या मुलांसारखा असला तर??फक्त आणि फक्त एकच गोष्टीच्या मागे. नाही.. नको असा विचार नको.. रोहन खूप चांगलाय. पण तो खरच होईल माझा?? कायमचा?? खूप वर्ष वाट पाहिलीये मी त्याची..एवढं अधीर होऊन चालणार नाही. त्याला माझ्या या मनातल्या भावना उद्या माझ्या तोंडावर दिसता कामा नयेत. बस अब इंतजार हे कल का.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरे केवढ्याच आहे ते.??. किंमत पाहिलीस का??
किमतीच काय घेऊन बसला आहेस मित्रा? पैसा हात का मैल हे..
अरेरे.. आधी सांगायचं ना.. ईतकी वर्ष फुकट अंघोळ करतोय..वही मैल निकालकर बेचके आते ना बे..
बंद पड रे.. किती चिव-चिव करशील??
वाह बेटा.. मी चिव चिव करतोय?? अर्धा तास झालाय तू इथे बेड वर लोळत त्या हातातल्या नेकलेस कडे डोळे फाडुन बघत बसला आहेस. किंमत किती तर नगद 3500/- फक्त. जेमतेम ५ महिने झाले नाहीत आपल्याला इथे येऊन आणि तुझे वायफळ खर्च झालेत सुरू. अरे मुलींवर एवढा खर्च नसतो रे करायचा. आपण कमावतो किती?? उडवतो किती?? लक्ष असू देत रे..
ते सोड मला सांग तू डेस्टिनी वर विश्वास ठेवतो का रे??
आता तू जर ठेवत असशील तर मला पण ठेवावाच लागणार ना मित्रा. पण मला सांग आता परत या प्रश्नाच बोट पकडून तू थेट तिच्यावरच पोहोचणार असशील. हो कि नाही?
गप.. but I believe that we were destined to meet each other. म्हणून तर मला या शहरात जॉब भेटला. अन लगेच पुढच्या दिवशी ती मला भेटली. आणि आज ५ महिने झाले ती भेटून.
हो ना, आणि तू तर मुलांची नावे सुध्दा ठरवली असशील ...
बस कर रे बाबा ..किती बोलशील ...
तुझी फालतूची बडबड बंद करून जरा माझ्या एका प्रश्नाचं गुपचूप उत्तर देशील का?
आता गुपचूप कसं काय माणसाने बोलावं हो?
पाणचट विनोद नको करुस. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
बोला राजे बोला आम्ही ऐकतो आहे.
अरे रुचाला हा नेकलेस आवडेल ना?
माझ्या बाळा , माझ्या सोन्या माझ्या भावा ५६ वेळा विचारून झालंय हे तू आता. दया कर माझ्यावर जरा.
सांग रे बाबा.
चांगला आहे रे, आपल्याला आवडला म्हणून आपण घेतला. ते पण ३५०० खर्च करून.आता तिला आवडणार की नाही हे तीच तिला ठरवू दे यार.
अतिशय अरसिक आणि भावनाशून्य माणूस आहेस तू.
Thanks for the compliment.
उद्या तिचा वाढदिवस आहे. एवढं चालत. आणि तू प्लीज आई सारख माझ्या मागे लागू नकोस कळलं का?? अरे उद्या तिने घरी सुद्धा बोलावलं आहे मला...
तुला एकट्यालाच नाही मी पण आहे तुझ्यासोबत कळलं.
बापरे!!!! हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवतोय. नीट लक्ष्यात ठेव . उद्या तिकडे गेल्यावर तोंड पूर्णपणे बंद ठेवायचं. एका शब्दानेही काही बोललास तर याद राख...
अरे पण मला तोंड कुठे आहे???
तुझ्यापुढे ना डोकं जरी फोडलं तरी कमीच आहे.. देवा उचल रे बाबा..
सांभाळून मित्रा.. देव कधी कधी खरच ऐकतो बरं का!!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
7 वाजताचा शो आहे, ऑफिसला दांडी मारून लंच नंतर पळून आलास. हे ठीक आहे . पण 4.30 लाच काय तयार होऊन बसला आहेस घोड्या???
ईश्क ने गालिब निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के।
ओ गालिब साहेब पुरे आता पुरे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"जास्त वेळ वाट नाही ना पाहायला लावली ??"
हिला काय एकच वाक्य येत का रे?? आणि बाई वेळेवर या की.. वाड्यावर आत्ताच नको.
"छे छे काहीही का. आत्ताच आलो बघ मी पण.. आणि it's your birthday today. दुनिया की हर गलती आज तुमहें माफ़ हे."
कुठून कुठून शिकून येतोस हे सगळं तू.. आणि ती बघ केवढी लाजते आहे.
"आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला."
"Thank you!!"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"मूवी मस्त होती ना ग??"
"हे काय विचारणं झालं?? शाहरुख ची मूवी म्हणजे फुल्ल भारी"
अग अग माझी आई माझ्या डोळ्यावर आणि मनावर केवढे अत्याचार केलेस ग तू. त्या शाहरुख ची मूवी दाखवण्याऐवजी third degree दिली असती तर बर झालं असत.
"हो ते तर आहेच... आणि त्यात तुम्ही शाहरुख च्या डाय हार्ड फॅन हो ना?"
"कोई शक??"
"बिलकुल नाही... बर उशीर झालाय. जेवण काय घेऊ?? व्हेज की नॉन-व्हेज??"
"काहीही घे मला सगळं चालेल."
"अग अस कसं?? आज तुझा वाढदिवस आहे सगळं तुझ्या पसंतीच. और ये गुलाम आपकी खिदमत मे हाजीर हे."
हिंदी मूवी कमी बघ रे
"गुलाम वगैरे काहीही का रे?? आणि बऱ्याच रोमँटिक मूड मध्ये दिसतेय आज स्वारी?"
"हा हा... अग अस काही नाहीये... थांब मी जेवण घेऊन येतो"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अग आता दार तर उघड"
"अरे हो हो...चावी तर शोधू देत. जीन्स मध्ये सापडते का लवकर माहितीये ना??"
अरे हरामी थोडा तर कंट्रोल ठेव. दार तर उघडू देत तिला..
ए नालायका असल काही बोलू नकोस माझ्या मनातही नाहीये काही
"काही बोललास का तू??"
"नाही ग. हा पाऊस पण ना असा अचानक कसा आला काय माहीत तेही डिसेंबरमध्ये. पूर्ण ओला झालोय बघ मी."
"दरवाजा उघडला बघ... आत येऊन फ्रेश हो... काय एवढी मोठी गोष्ट."
आज कोणाचीतरी मज्जा आहे ......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
केवढा बोलतोस रे तू.. मला धड मूवी पण एन्जॉय नाही करू दिलास.
अरे तो बकवास मूवी माझ्यावर अत्याचार छळ होते..आणि काय रे मला बोलतोस, तू तरी पाहत होतास का मूवी.. संपूर्ण लक्ष तिच्याकडेच होत तुझं...
बर ते सगळं सोड.. मला माझ्या प्रश्नाच सरळ उत्तर दे जरा..
बोला राजे बोला..
मी जे आत्ता केलय ते आवडेल का रे तिला???
अरे नतद्रष्ट माणसा हे जे काही तू केलं आहेस ना हे जर तू एखाद्या मित्रासाठी केलं असत ना तर आयुष्यभर फुकट दारू पाजली असती त्याने तुला.
पुन्हा फालतु पणा ..जेवढं विचारलं आहे त्याच उत्तर दे रे भावा.
बर... हे बघ तुला एक कल्पना देतो की तू काय केलं आहेस आणि तेही पूर्वीच्या लेखकांच्या भाषेत..

आता वाचकहो आमचा नायक आणि नायिका आपल्या फ्लॅट मध्ये आलेले आहेत.
आमची नायिका ताजीतवानी होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलेली आहे.
नायक याच संधीची वाट पाहत होता. तो मांजरीच्या पावलाने उठला आणि हळूच आवाज न करता त्याने बाथरूमची कडी बाहेरून बंद करून घेतली. नायकाने त्याच्या सॅक मधून मेणबत्त्या बाहेर काढल्या. एक एक करून मेणबत्त्या त्या घराच्या शयनगृहात लावल्या. नायिकेच्या नकळत आणलेल्या वाढदिवसाच्या केकची बाहेरील आवरणं काढून तो केक त्याने व्यवस्थित पलंगावर ठेवला. केकच्या आजूबाजूला ही त्याने नायिकेच्या पसंतीची व्हॅनिला फ्लेवर ची मेणबत्ती लावली. केक वर एक सुरेख अशी बार्बी ची मेणबत्ती ठेवली. त्या केक वर इंग्रजी शब्दांमध्ये "Happy birthday to You my love" अस कोरिवपणे रेखाटलं होत. पुढेच त्याने त्या स्वर्गलोकीच्या अप्सरेसाठी (म्हणजे आमची नायिका) विकत घेतलेल आणि स्वर्गलोकीच्याच अप्सरेसाठी बनवल आहे की काय असच वाटणार लोभस, अप्रतिम आणि रेखीव अस कंठभूषण (नेकलेस) ठेवलं. त्या शयनकक्षेतील मेणबत्त्या सोडून सर्व दिवे त्याने मालवले.आता त्या शयनगृहात फक्त आणि फक्त अगणित प्रेमी युगुलांच्या प्रणयचेष्टा अनुभवलेल्या त्या आकाशीच्या चंद्राचा प्रकाश आणि मेणबत्त्यांचा मिणमिणता दिवटा पिवळसर प्रकाश पडला होता. एक (म्हणजे व्हॅनिला चा) मंद सुगंध त्या आभेमध्ये पसरला होता. साक्षात ययातीच्या शयनगृहाची प्रतिमा तिथे अवतरली होती. त्या केक वर आणि त्या कंठभूषणावर पडलेल्या त्या प्रभेमुळे प्रणयरम्य वातावरणात अजून भर पडत होती. यात कमी होती की काय म्हणून नायकाने त्याच्या भ्रमणध्वनी यंत्रामध्ये इंग्रजी सांद्र संगीत सुरू केलं. बाहेर चाललेल्या दबक्या पावलांच्या खेळाची आमच्या नायिकेला कानोकान खबर नव्हती, ते सांद्र संगीताचे सूर कानी पडेपर्यंत....

पुरे पुरे ...अहो वर्तमानात या... आणि चांगल आहे का ते सांग आधी..
"रोहन, अरे दरवाजा का बंद केलाय बाहेरून??अरे उघड ना."
"आलो आलो!!"
अरे बोल ना आता पटकन...
भोxxxx आता काय ताजमहाल बांधतो तिच्यासाठी.. नक्कीच आवडेल तिला..जा दार उघड.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

"Cheers"
तीनही स्कॉचचे ग्लास एकमेकांना स्पर्शून प्रत्येकाचा तोंडाला लागले.
इंस्पेक्टर परब, कमिशनर दातार आणि मेजर परांजपे दातारांच्या बंगल्यामधील गार्डन मध्ये बसले होते.
मागे सखाराम उभा होता त्यांना काही पाहिजे की नाही हे पाहायला.
"थँक्स सर"
"थँक्स काय परब. तुम्हाला केस मधून जरा आराम भेटावा आणि या परंजपेने आणलेली स्कॉच चांगल्या कामी लागावी म्हणून तर जमलोय आपण."
एक मोठा हशा पिकला, आणि अपेयपानासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली.
"आराम कसला कमिशनर साहेब. खरच सांगतो माझ्या एवढ्या १५ वर्षाच्या करिअर मध्ये वरवरून एवढी सोपी वाटणारी साधी केस पण पूर्णपणे भंबेरी उडवणारी कधीच पहिली नाही." परब हातातल्या ग्लासकडे बघत बोलले.
"परब, तुम्ही येण्याच्या आधी दातार मला हेच सांगत होता. नक्की केस काय आहे काय??" मेजर परंजपेंनी संभाषणात भाग घेतला.
"आणि तेच पाहतोय मी परब, माझ्या एवढ्या वर्षांच्या ड्युटी मध्ये एखाद्या केसच्या मागे तुम्हाला एवढं अपसेट झालेलं पाहिलं नव्हतं. आणि पहिल्यांदा तुम्ही मला पूर्णपणे अंधारात ठेवलं आहे. हिही गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे." दातार थोडे काळजीच्या स्वरात उद्गारले.
"सर तस काही नाहीये पण ही केसच अशी आहे की मी जर तुम्हाला काही सांगितलं तर एक सिनियर ऑफिसर म्हणून तुम्ही माझ्या क्षमतेवर शंका घ्याल."
"हे कधीच शक्य नाहीये परब. मला तुमची विचारबुध्दी आणि योग्यता चांगलीच माहीत आहे . त्यामुळे तुमच्या क्षमतेवर शंका घेणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल."
"पण तरी सर.." जरा गंभीर होत परब बोलले
"बर तुम्हाला जड जात असेल तर या परांजपेला सांगा... एकतर हा केससाठी पूर्णपणे तिऱ्हाईत आहे. आणि आपणही बघू मिलिटरीवाले डोकं वापरतात की नाही." खेळकर हसू तोंडावर घेत दातारांनी जरा मूड बदलला..
"Challenge Accepted. परब तुम्ही सुरू करा.. पहिल्यापासून सविस्तर सांगा इच अँड एव्हरी डिटेल्स" एवढं बोलून परंजपेंनी परबांकडे थोडी खुर्ची सरकवली.
"ठीक आहे सर माझ्याही मनावरचं दडपण जरा कमी होईल......
त्यादिवशी रात्री 12.30 च्या दरम्यान आम्हाला फोन आला. फोन उर्मीका हाइट्स नावाच्या उच्चभ्रु वस्तीतल्या सोसायटी च्या चेअरमन चा होता. माणूस अतिशय घाबरलेला होता. त्याच्याकडून एवढंच कळाल की त्या सोसायटी च्या E-विंग मधून कोणीतरी उडी मारून आत्महत्या केली आहे. ही माहिती रात्रपाळी च्या SI ने मला लगेच घरी कॉल करून कळवली.मी तडक गाडी काढून घटनास्थळी पोहोचलो. ड्युटी इन्स्पेक्टर आणि हवालदार आधीच पोहोचले होते.
त्यांनी बॉडीभोवती बॅरीकेड लावून ठेवले होते. आणि बघ्यांची गर्दी हाकलून लावायचं काम चालू होतं.फॉरेन्सिक टीम पोहोचली होती. बॉडीचे फोटो आणि आऊटलाईन काढायाच्या कामात ते व्यस्त होते.जरा आजूबाजूला चौकशी केल्यावर आम्हाला कळाले की 12 ते 12.15 च्या सुमारास एक मोठी किंकाळी आणि एखाद मोठं गाठोडं पडल्याचा आवाज झाला. रात्रीच्या शांततेमध्ये तो आवाज खूप मोठा जाणवला. डुलक्या घेत असलेल्या वॉचमनची झोप पूर्ण उतरली. तो आवाजाचा शोध घेत निघाला. आवाजामुळे आजूबाजूच्या फ्लॅट्स चे लाईट्स चालू झाले होते. थोडं पुढं आल्यावर वॉचमनला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली डेड बॉडी दिसली आणि त्याच्याही तोंडातून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. पळत बूथ मध्ये जाऊन त्याने इंटरकॉमवरून चेअरमन ला फोन लावला. तो पर्यंत बरेच लोक जमा झाले होते. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन चेअरमनने लागलीच आम्हाला फोन केला. डेड बॉडी पाहून नक्की कोणत्या मजल्यावरून पडली हे सांगणे अवघड होतं.म्हणून त्या बिल्डिंग मध्ये त्या बाजूला जेवढी बाल्कनी असलेली घर होती तिकडे आम्ही चौकशी सुरू केली. पुढच्या 20 मिनिटांमध्ये खुलासा झाला की सहाव्या मजल्यापर्यंत सगळं काही व्यवस्थित होत. सातव्या मजल्यावरचा फ्लॅट आतून बंद होता आणि बेल वाजवूनही काही उत्तर भेटत नव्हते. आठव्या मजल्यावरचा फ्लॅट बाहेरूनच बंद होता आणि टेरेसच्या दरवाज्यालाही चेअरमनने काही कारणामुळे कुलूप लावलेलं होत. म्हणून टेरेसचाही काहीच प्रश्न नव्हता. आता राहिला सातवा मजला. प्रत्येक मजल्यावर फक्त दोनच फ्लॅट्स होते, 3BHK चे. सातव्या मजल्यावरचा दुसरा फ्लॅट बाहेरूनच बंद होता महिन्याभरापासून. मग सातव्या मजल्यावरचा संशयास्पद फ्लॅट आम्ही दरवाजा तोडून उघडला.बाहेर मि. संदीप पंडित नावाची पाटी होती. आतमध्ये सर्व रूमचे लाईट्स बंद होते. लाईट्स चालू करायचा प्रयत्न केला पण मेन स्विच ऑफ होता. तो चालू करून आम्ही सगळ्या लाईट्स चालू केल्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अरे काय करतोयस नक्की?? मघाशी पण खुळचट सारख बाथरूमचा दरवाजा बंद केलास. आता मला मागे वळून डोळे मिटायला लावतो आहेस."
"काही नाही ग. वळ पाहू मागे एकदा."
डोन्ट वरी ग.. मला विश्वास आहे याच्यावर.
"अरे आता डोळ्यांवर पट्टी का बांधतो आहेस तू??"
"किती बोलतेस ग तू?? शांत राहा जरा आणि मी नेतोय तिथे चल."
हा हा.. काय बेशरम माणूस आहेस रे तू?? डोळ्यांवर पट्टी बांधून मुलीला बेडरूम मध्ये नेतोयस.!!
"रोहन, अरे असा काय सस्पेन्स आहे रे हा??"
"Have some patience birthday girl....
आलो आता आपण. मी तुझ्या डोळ्यांवरची पट्टी काढतोय. डोळे मिटुनच ठेव बर का!!!
.. आता अलगद डोळे उघड.. SURPRISE!!!!!"
" आईशप्पथ.!!!!!... रोहन.. बापरे!!!!! किती सुंदर दिसतंय !!!!! WOW HOW ROMANTIC!!!!!!!!"
"अग ए वेडाबाई, रडतेस काय अशी??"
हो ना का रडतीयेस?? आणि ते पण ह्या नालायकाच्या कुशीत शिरून??
"आनंदाचे अश्रू आहेत रे...!!!! खरच एवढं भारी माझ्यासाठी कोणीही कधीही केलं नव्हतं रे!!!"

अरे.... अरे .. अरे.. ओये होये....मेरे भाई का पेहला किस.... क्या बात हे.. पोरग मोठं झालं.. .. फिश... फिश.....
"ए रडू बाई... चल केक कापू आपण.”
"HAPPY BIRTHDAY TO YOU... HAPPY BIRTHDAY TO YOU... HAPPY BIRTHDAY TO YOU DEAR RUCHA... HAPPY BIRTHDAY TO YOU"
ए मूर्खां... ए बैला.. चल उठ.. बाल्कनी मध्ये घेऊन जा तिला... उस चांद के सामने, तेरे सामने वाले इस चांद को वो साडे तीन हजार वाला चांद जैसा हार पेहना दे.
" रुचा, कसा वाटला ग हा नेकलेस तुला?"
"खूपच सुंदर आहे... पण घातल्याशिवाय याची सुंदरता कळणार नाही म्हटलं, काय??"
पोरगी खूपच फॉरवर्ड आहे रे.
"अग मग विचारतेस काय? बघ की घालून."
अरे मूर्खां बघ काय घालून?? जा तिला घेऊन बाल्कनीमध्ये आणि तिथे घाल.
"हट्ट... अस नाही तू घाल मला. हे घे. आणि हो इथे नाही बाल्कनी मध्ये.. चंद्रप्रकाशात."
"जैसी आपकी मर्जी मॅडम..."
च्यायला ह्या पोरीला माझा आवाज ऐकू येतोय की काय?? जा मजनू जा अपने लैला के पिछे पिछे..
"रोहन, अरे लाजतो काय... ये ना"
जा रे उठ ..जा तिच्या मागे.
"बघ आकाशात चंद्र कसा दिस......"
मूर्खां पळ रेलिंग सटकल पकड तिला...
"रोह......आ...."
-------–---------------------------------------------------------------------------------------------------------------
कमिशनर दातार आणि मेजर परांजपे इन्स्पेक्टर परबांची गोष्ट मन लावून ऐकत होते.मागेच उभा असलेला सखाराम ग्लास रिकामा होताच पुढचा पेग भरत होता.
"लाईट्स येताच आम्ही आतमध्ये शिरलो. हॉल मध्ये काही चपला होत्या. एक बेडरूम उघडी होती . बाकी दोन्ही लॉक होत्या. किचन मध्ये एका पिशवीत साधारण दोन माणसांचं जेवण कोमट अवस्थेत पार्सल च्या बॉक्स मध्ये डायनिंग टेबल वर ठेवलं होतं. तिसऱ्या बेडरूम मध्ये एक मंद सुगंध आणि मोबाइल वर शांत गाणी चालू होती. ड्युटी इन्स्पेक्टर ने मोबाइल ताब्यात घेतला.. बेडरूम मधली एक खिडकी जिथून दुसऱ्या बेडरूमच्या बाल्कनी पर्यंत जाता येत होतं ती सताड उघडी होती.. मी लगेच एका हवालदाराला त्या खिडकीतून घरच्या बाहेर पडायचा कोणता मार्ग आहे का बघायला पाठवलं आणि walkie-talkie वरून खाली असलेल्या पोलिसांना आजूबाजूच्या एरिया मध्ये कोणी संशयास्पद सापडतय का पाहायला पाठवलं. तोपर्यंत खिडकीतून गेलेला हवालदार परत आला आणि त्याने सांगितलं की दुसऱ्या बाल्कनी मधून पाईप वरून एकेक बाल्कनी मध्ये उतरून पळण्याचा मार्ग आहे.
आम्ही परत बेडरूम कडे वळालो. पूर्ण बेडरूम मध्ये अर्धवट जळालेल्या मेणबत्त्या होत्या. बेडवर एक अर्धवट कापलेला केक होता.आणि बाल्कनीमध्ये अर्धवट तुटलेल ग्रिल तसच लटकलेल्या स्थितीत होत.म्हणजे जे काही झालं होतं ते याच फ्लॅट मध्ये झालं होतं. आम्ही त्या तुटलेल्या ग्रिलची नीट तपासणी केली.ग्रिल मुद्दाम कापलेलं दिसत नव्हतं.पूर्णपणे गंजल्यामुळे थोडं वजन पडून ते एका बाजूने तुटलं होत हे निश्चित.संपूर्ण फ्लॅट मध्ये झटापट झाल्याची काहीच चिन्ह नव्हती.त्यामुळे प्रथमदर्शी हा एक अपघात होता हे कळत होतं. पण एवढ्यात निष्कर्ष काढून उपयोग नव्हता. ती एक आत्महत्या किंवा एक वेल प्लॅनड मर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती."
"फ्लॅट मधल्या बऱ्याचश्या गोष्टी पुरावा म्हणून फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून दिल्या. फ्लॅट बोटांच्या ठश्यांसाठी परत एकदा चेक केला. मग आम्ही फ्लॅट सील करून आणि डेड बॉडी पोस्टमार्टेम साठी पाठवून आम्ही तिथून निघालो. गस्तीवरच्या पोलिसांना त्या एरिया मध्ये कोणीही संशयास्पद सापडलं नाही. फ्लॅट मध्ये सापडलेला अजून एक महत्वाचा पुरावा म्हणजे ही डायरी."
अस बोलून परबांनी ती डायरी परंजपेंकडे वाचायला दिली.
१५ मिनिटांत परंजपेंनी डायरीमधला परबांनी हाय लाईट केलेला मजकूर वाचला.
"फॉरेन्सिक लॅब मधून बोटांच्या ठश्यांचा रिपोर्ट आला. फ्लॅट मधल्या वस्तूंवर 2 व्यक्तींचे ठसे होते. याचाच अर्थ दोन व्यक्ती फ्लॅट मध्ये त्या रात्री होत्या हे निश्चित पण डेड बॉडी एकच. त्या बाजूने पुढील तपासला सुरुवात झाली.
ती डायरी आणि तो फ्लॅट रुचा पंडित ईचा होता हे तर स्पष्टच होत. पुढे डायरी आणि फ्लॅट मध्ये सापडलेल्या सॅक मधलं id कार्ड यावरून रोहन पवार हे नाव समोर आलं. Id कार्ड वरून कंपनी तर कळलीच होती. आणि मग आम्ही त्या नावाची पूर्ण जन्मकुंडली काढली.
रोहन पवार. कॉम्पुटर इंजिनीअर. मूळचा नाशिक मधला. रुचा पंडित सुद्धा नाशिकचीच राहणारी. दोघांनी एकाच कॉलेज मधून डिग्री घेतलेली. रोहन 6 महिन्यांपूर्वी इथे बदली होऊन आलेला.चांगल्या नामांकित कंपनी मध्ये कामाला. जवळच त्याने भाड्याने घर घेतलं होतं. कंपनीमध्ये विचारपूस केल्यावर कळाल कामाच्या बाबतीत तो परिपूर्ण होता.कोणाला कसलाही त्रास नाही का कधी कामात हलगर्जीपणा नाही. पण सर्वात मोठी खटकणारी गोष्ट म्हणजे त्याचे असे कोणीही मित्र नव्हते. संपूर्णपणे एकलकोंडा. बऱ्याच लोकांनी सांगितलं तो कधी कधी एकटाच बडबडत असायचा.हातवारे करायचा.. कधी ऑफिस मध्ये जास्त मिसळला नाही. मोकळ्या वेळात मोबाइल वर गप्पा मारायचा नाही तर एकटाच बसून असायचा.त्यामुळे साहजिकच तो एक थट्टेचा विषय झाला होता..त्यामुळे त्याची खेचायला कोणी कमी करत नव्हते. आणि त्या गोष्टीमुळेच ऑफिसमध्ये कळाल होत की त्याची एक रुचा नावाची गर्ल फ्रेण्ड होती. आणि तिचा फोटोही त्याच्या कॉम्पुटर वर वॉलपेपर होता.
हे ऑफिसच झालं. त्याच्या घराच्या आसपासही तीच गत त्याला बरेचदा लोकांनी एकटा बडबडताना पाहिलं होतं. रस्त्यातून जाताना, घरात , आणि काही हॉटेल मध्ये सुद्धा. मला ही सगळी कोणत्यातरी मानसिक आजाराची लक्षणे वाटली म्हणून मी ताबडतोब मानसोपचारतज्ञ डॉक्टर सावंत यांची भेट घेतली."
एवढं सांगून परबांनी त्या दोघांना डॉक्टरांशी झालेलं संपूर्ण संभाषण सांगितलं.
–----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"परब, तुम्ही जे सांगता आहात त्यानुसार I believe these are symptoms of schizophrenia. See schizophrenia is a mental disorder that affects the person's ability to think, feel and behave clearly.
याची लक्षण म्हणाल तर मनात सतत विचित्र भास होणं,मनात शंका संशय येणं,स्वतःशी पुटपुटणं,विनाकारण चिडचिड,एकलकोंडेपणा,विचित्र हातवारे करणं अस वरवर दिसून येत.
याच महत्वाचं लक्षण म्हणजे psychosis. साध्या भाषेत सांगायचे म्हटलं तर हा आजार झालेल्या माणसांना काय खर आहे आणि काय खोट आहे हे कळत नाही. यांना नेहमी काहीना काही भास होत असतात.यांचा वास्तवतेशी संपर्क तुटलेला असतो. खर जग आणि स्वप्नातलं जग या दोन गोष्टींमधली सीमारेषा पुसट होत जाते आणि एक दिवस संपूर्णपणे नष्ट होते.इतर लोक त्यांची मने वाचत आहेत,त्याचे विचार नियंत्रित करत आहेत किंवा त्यांना मारण्याचा कट बनवत असा त्यांना विश्वास असतो किंवा काहींना अंतर्गत आवाज ऐकू येत असतात जे इतरांना येत नाहीत. ज्या व्यक्ती प्रत्यक्षात नाहीयेत अश्यांचे आवाज येतात, सतत कोणीतरी आजूबाजूला आहे असं वाटत.ते काही वेळा एखादी व्यक्ती जी अस्तित्वातच नाहीये तिच्याशीही बोलत असतात.त्यांच्या खोट्या विश्वाने एकदा त्यांचा ताबा घेतला की तुम्ही कितीही पुरावे द्या की हे खोट आहे तरी त्यांचा विश्वास बसणार नाही.उलट जर तुम्ही त्यांचा अजून पाठपुरावा केला तर हे लोक खुनशी, हिंसक सुध्दा बनू शकतात.
बरेचसे सिरीयल किलर हे स्क्रीझोफ्रेनिया आणि मल्टिपल पर्सनालिटी डिसऑर्डर अश्या मानसिक रोगांचे शिकार असतात"
"पण डॉक्टर याची सुरुवात कुठून होते??"
"तुमच्या ह्या प्रश्नच उत्तर देण खरच अवघड आहे. हे सुरू होण्याची अनेक कारणे आहेत.
गुणसूत्रांमध्ये दोष (genetic दोष),एखाद्या घटनेचा धक्का,आनुवंशिकता – रक्तातल्या नातेवाईकांमध्ये आजार असल्यास तर शक्यता अधिक वाढते. आई वडिलांपैकी कोणाला असेल तर 10 ते 20 टक्के आजार होण्याची शक्यता असते.तसेच मानसिक ताणतणाव,ड्रग्स – अमलीपदार्थाचे व्यसन,मेंदूमधील दोषांमुळे जसे, डोपामाईन नावाचे रसायनाचे प्रमाण मेंदूमध्ये वाढल्यास हा त्रास होऊ शकतो."
" मग प्रेम हेही एक कारण होऊ शकत???"
"हो हो का नाही?? आणि त्यातूनही प्रेम जर एकतर्फी असेल तर शक्यता अजून वाढते. सगळी मानस ही सारखी नसतात. प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येकजण जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहील हे तुम्ही तरी पैजेवर सांगू शकता?? कमकुवत मनाच्या माणसामध्ये काही गोष्टी पचवण्याची ताकद नसते. एखाद अपयश, आर्थिक प्रोब्लेम्स, एखादा आजार, प्रेमविरास वगैरे वगैरे मानस पचवू शकत नाहीत. मग काही आत्महत्या करतात ,काहींकडे तेवढही धैर्य नसत.. मग एकळकोंडेपणा,नामुष्कीची भावना... या सगळ्यांची एक साखळी बनते आणि मग माणूस त्याच्या वेगळ्या दुनियेत त्याच्या ह्या प्रश्नांची त्याच्यापुरती उत्तर शोधतो आणि वास्तवाशी त्याचा संबंध तुटतो."
"मानसशास्त्र खरच अवघड आहे!!"
"हा हा...बरं तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो... एक छोटा मुलगा एकुलता एक ज्याचे आई वडील दोघेही कामावर जातात. त्याला आजूबाजूलाही खेळायलाही कोणी नसत. परिस्थितीमूळे तो एकटा पडतो. तो काय करतो, त्याचा एक काल्पनिक मित्र बनवतो. त्याच्याशी गप्पा मारतो..खेळतो. म्हणजे त्याच्या त्या छोट्याश्या मेंदूने त्याच्या ह्या परिस्थिती वर एक उत्तर काढलं एवढंच."
" म्हणजे तो मुलगा एक मानसिक रोगी झाला??"
"नाही हो परब, तो मुलगा उद्या मोठा होतो आणि खऱ्या मित्रांमध्ये आल्यावर लगेच जून सगळं विसरूनही जातो...He is a completely normal fellow.
Hopefully मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली आहेत."
"हो हो ... नक्कीच डॉक्टर... खूप मदत झाली तुमची. And thanks for your time"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्कॉच चा मोठा सिप घेऊन संभाषणाला पुन्हा सुरुवात झाली.
"अहो परब, मग मला सांगा या केस मध्ये अवघड काय आहे?? रोहन च रुचावर प्रेम होतं. आणि रुचासुध्दा रोहन वर प्रेम करत होती हे तर या डायरीतून स्पष्ट होतंय. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रुचा त्याला आपल्या घरी घेऊन आली. हे सुद्धा या डायरीतून कळाल. आता फक्त तिला या गोष्टीची कल्पना नव्हती की रोहन हा एक मानसिक रोगी आहे. आणि तिथेच ती अजाणतेच चूक करून बसली. रोहन ने वातावरणनिर्मिती करून ठेवली होती. दोघांनी केक कापला आणि गप्पा मारायचं निम्मित करून रोहन तिला घेऊन बाल्कनी मध्ये आला. त्याला काय हवं होतं त्याने रुचाकडे मागितलं आणि रुचाने त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला. आणि म्हणून रोहनने तिला गॅलरीत ग्रिल वर ढकलून दिल आणि ते गंजलेलं ग्रिल तुटून ती खाली पडली. आपण काय करून बसलोय हे त्याला कळल्यावर तो सगळं सामान तिकडेच सोडून त्या खिडकीतून खाली उतरला आणि पळून गेला. Case solved...As simple as that... यात कसली भंबेरी उडाली आहे तुमची??? त्या रोहनला पकडा .. चांगला पोलीसी खाक्या दाखवा.. पोपटासारखा बोलू लागेल."
अस बोलून आपल्या डोक्यावर भलतेच खुश होऊन मेजर परांपेनी ग्लास पूर्ण रिकामा केला.
परबांना परांजपेंच्या उत्तराची कीव येत होती. एक अस्पष्ट हसू परबांच्या चेहऱ्यावर होत.
" रोहन आम्हाला केव्हाच सापडलाय मेजर!!"
"मग प्रॉब्लेम काय आहे?? बोलत नाहीये का काही??? का वेड्याच सोंग घेतोय??"
थोडं हसत परंजपेंनी साखरामला ग्लास भरायचा इशारा केला.
"मेजर, रोहन आम्हाला त्याच दिवशी सापडला होता. कारण सातव्या मजल्यावरून पडून रुचा नाही तर रोहन मेला होता. आणि रुचा त्याच फ्लॅट च्या बाल्कनी मधून पडून बरोबर एका वर्षांपूर्वी त्याच दिवशी मेली होती, तिच्या वाढदिवशीच"
परबांच्या या वाक्यानंतर दातारांच्या बंगल्याच्या त्या पोर्च मध्ये गूढ शांततेने प्रवेश केला.
दोघांचे स्कॉच चे ग्लास तोंडपर्यंत गेलेच नाहीत.
"Oh, my goodness!!!!! परब काय बोलता काय आहात??" शेवटी परंजपेंनी त्या शांततेचा भंग केला.
"थांबा मेजर साहेब, इतक्यात चकित होऊ नका. फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट्स नुसार आम्हाला त्या फ्लॅटमधल्या वस्तूंवर दोन व्यक्तींचे बोटाचे ठसे सापडले. एक रोहन चे आणि दुसरे रुचा पंडित चे. आणि माझी भंबेरी उडण्याचं कारण हे की, रुचा एका वर्षांपूर्वी मेली होती, म्हणजे 26 डिसेंबर 2013 ला आणि या तुमच्या हातातल्या डायरीमधल्या नोंदी सुरू होत आहेत 6 ऑगस्ट 2014 पासून. आता तुम्ही म्हणाल की कोणी दुसऱ्याने ती डायरी लिहून तिथे ठेवली असेल.
त्या डायरीवर फक्त आणि फक्त रुच्याचेच बोटांचे ठसे आहेत, आणि त्या डायरीतल हस्ताक्षर आणि रुच्याच्या जुन्या डायरीमधलं लिखाण आम्ही एका हस्ताक्षर तज्ञाकडून तपासून पाहिलं आहे. काडीचाही फरक नाही."
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Due to mental illness the victim has committed suicide.
असा शेरा मारून इन्स्पेक्टर परबांनी फाईल बंद केली.
कमिशनर दातार यांना फाईल देऊन एक कडकडीत सॅल्युट मारून इन्स्पेक्टर परब त्यांच्या केबिन मध्ये परत आले पुढच्या केस च्या तयारी साठी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Use group defaults

छान गोष्ट,
शेवटचा ट्विस्ट भारी, अगदी अनपेक्षित.

पण सुरवातीचा काही भाग एडिट केलात तर जास्त इंटरेस्टिंग वाटेल गोष्ट,
त्या दोघांचे संवाद वाचताना थोडे कन्फ्युज व्हायला होते,

पेशन्स ठेऊन शेवटपर्यंत वाचले तर त्याचा सिग्निफिकन्स कळतो, पण तितका पेशन्स टिकणे कठीण आहे.

मस्तच जमलीये कथा! पोलिसांबद्दल वाचताना कौतुक शिरोडकरांच्या शैलीची आठवण झाली Happy

आवडली कथा
शेवटचा ट्विस्ट भारी, अगदी अनपेक्षित. > +१

अप्रतिम!!
मी पण मेजर परांजप्यांसारखा खुष झालो पण मित्रा मस्त जिरवलीस .

मस्तच जमलीये कथा! पोलिसांबद्दल वाचताना कौतुक शिरोडकरांच्या शैलीची आठवण झाली +१००

अंदाज आलेला आधीच ड्युएल पर्सनॅलिटिचा..

"मेजर, रोहन आम्हाला त्याच दिवशी सापडला होता. कारण सातव्या मजल्यावरून पडून रुचा नाही तर रोहन मेला होता. >> हे फार अ अ वाटल.. ट्वेस्ट म्हणुन ठिके पण एवढी मोठी न्युज आहे त्यात पोरगा मेला का पोरगी हे पेपरात पन तर आलं असेल ना.. इतर डिटेल्स भले पोलिस रिविल करणार नाही पण मेला तो व्यक्ती मुलगा होता का मुलगी हे त्या केस मधे इतका इंटरेस्ट असणार्‍या व्यक्तीला माहिती नाही हे ना।ई पटत..
बाकी लिहित राहा..

त्या दोघांचे संवाद वाचताना थोडे कन्फ्युज व्हायला होते,>> +१

छान

आदू +११११ Sad
रुचा जर मेलेली आहे तर तिच्या बोटांचे ठसे कुठून आले?? Uhoh

आधीचे. वर्षापुर्वीचे>>>पण त्याचे इन्वेस्टीगेशन तेव्हाच झाले असेल न ऋचा मेली तेव्हाच मग परत ठसे कुठून येतील Sad

आधीचे. वर्षापुर्वीचे>>>पण त्याचे इन्वेस्टीगेशन तेव्हाच झाले असेल न ऋचा मेली तेव्हाच मग परत ठसे कुठून येतील >>>+११ आणि २०१४ मधील डायरीतल्या नोंदी कोणी लिहिल्या?? रोहनने?? अक्षराची नक्कल करून??

साॅरी, मला कथेचा किस पाडायचा नाहीये. पण शेवट वाचून खूपच गोंधळ उडालाय Sad

छान कथा आहे.
भूतांचे ठसे खरंच येत नाहीत का... Lol
रच्चाकने, भूतांकडून शेतीची कामे वैगरे करून घेता येतात असं ऐकलंय..तसं असेल तर मग बोटांचे ठसे वैगरे पण येतीलच की... Wink
पुलेशु. Happy

खरच पेशन्स टिकवणे कठीण आहे

मलाही बोर होत होतं वाचतांना
पण शेवट ईतका अनपेक्षित आहे की खरचं कौतुक वाटलं तुमच
खुप छान लिहिलंय.

माफ करा प्रतिसाद द्यायला खूपच दिवस लावले मी. दिवस काय महिनेच लावले म्हणा की. सर्वांचे आभार
सिम्बा, वावे, चैत्रगंधा, गुगु, ऋतु_निक, सस्मित, अंकु, स्वप्निल..., vichar, विनिता.झक्कास, पाथफाईंडर, akki320 आणि अॅमी मनापासून धन्यवाद.

@टीना...
अहो मेजर परांजपे टूर ला गेले होते . दरम्यान त्यांनी एकदाही पेपर वाचलाच नाही आणि कमिशनर दातारांनी त्यांना काहीच कल्पना दिली नव्हती. फक्त एक केस आहे एवढंच .त्यामुळे मेजर परांजपे संपूर्ण कोरी पाटी होते. आता तर पटल ना?

आता @आदू, सायुरी, सस्मित, आनंद,तुरु,अदिती
अहो इथे भुतं आपल्याया दिसतात की नाही यावरूनच मतभेद चालू आहेत आणि काय राव तुम्ही भुतांच्या ठस्यांच घेऊन बसला आहात?? मतितार्थ एवढाच घ्या की भाई भूत तो अपने मर्जी का मालिक हे. त्याला हवं तेव्हा तो दिसतो, त्याला हवं त्यालाच तो दिसतो आणि त्याला हवं तर तो ठशे सोडून जातो. पटलं का???

आणि आता सर्वांसाठी.
मतकरींची एका पुस्तकातली प्रस्तावना वाचली होती.
"गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते. वाङमयात अशा उत्तम भयकथा पुष्कळ आहेत, त्यांच्यावर अनेक ग्राफिक नॉव्हेल्स, चित्रपट वगैरेही आलेले आहेत. आपल्याकडे नारायण धारपांनी 'चंद्राची सावली' सारख्या अनेक उत्कृष्ट दीर्घ भयकथा लिहिल्या आहेत.

गूढकथेमध्ये, कधीतरी, अनपेक्षित म्हणून गूढ असलेल्या भीतीचा वापर अवश्य केला जातो; पण तिच्यात अशा इतर अनेक तत्त्वांचा समावेश होतो, जी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळी असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही, त्याची कदाचित भीती वाटू शकेलः पण ते मूलतः भीतिदायक नाही, ते गूढ आहे. ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते, गूढ वाटते." इति रत्नाकर मतकरी.
म्हणून माझं अस म्हणणं आहे गूढकथा ही गूढ असते आणि तिचा शेवटही गूढ असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना ती अपूर्ण वाटते. आपल्या सर्वांची कल्पनाशक्ती अचाट आहे . आपल्याला घ्यायचा तो अर्थ किंवा शेवट आपण घ्यायचा आणि कथा पूर्ण करायची.

P.S. याचा अर्थ असा नाही मी जे वर ठस्यांच स्पष्टीकरण दिलं त्यांच रोखाने गोष्ट लिहिली असेल....

दोन शंका
१. भूते नेहमी शत्रूंचा बदला घेतात. इथे रोहन तर तिचा आशिक आहे.... त्याला ती का मारेल ?
२. फ्लॅट्ची किल्ली रोहन कडे कशी आली ?

ही भूताची सूड कथा असेल तर त्यात रोहन्ला मनोरुग्ण असण्याची काहीच गरज नव्हती !

@पशुपत:
फक्त एक जोक म्हणून विचारतो, राग नका मानून घेऊ,
कोणत्या भुताने सांगितलं तुम्हाला की भूत नेहमी बदला घेतात???. मे बी ऋचा एकटी राहून बोर झाली असेल आणि तिने तिला साथ म्हणून रोहन ला घेऊन गेली असेल..
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे.. एकतर त्याला ऋचा ने किल्ली दिली असेल किंवा त्याने मास्टर की बनवून वापरली असेल...
माझी आधीची कॉमेंट वाचा... तुमच्या प्रशांची उत्तर नक्की भेटतील..
काही चुकीचं बोललो असेल तर खरच क्षमस्व..