थालीपीठ भाजणीची उकळपेंडी

Submitted by राहुल बावणकुळे on 30 December, 2017 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. एक वाटी थालीपीठ भाजणी
२. दीड वाटी ताक
३. दोन मोठे चमचे तेल
४. अर्धा चमचा प्रत्येकी मोहरी व जीरे
५. पाव चमचा हिंग
६. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
७. आठ-दहा कढीपत्त्याची पाने
८. एक चमचा लाल तिखट
९. पाव चमचा हळद
१०. चवीप्रमाणे मीठ
११. मूठभर कोथिंबीर
१२. चिमूटभर साखर (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. सुरुवातीला मंद आचेवर कढईत ५-७ मिनिटे एक वाटी थालीपीठ भाजणी कोरडीच खमंग भाजून बाजूला काढून घ्या.
२. आता कढईत दोन मोठे चमचे तेल घालून गरम झाल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, जीरे, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करा.
३. फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून त्याला गुलाबी होईस्तर परता.
४. कांदा मऊ झाल्यावर १ चमचा तिखट, पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घालून एक वेळा नीट ढवळून घ्या (चिमूटभर साखर ऐच्छिक).
५. आता थालीपीठ भाजणी घालून, २-३ मिनिटे परतून घ्या आणि दीड वाटी ताक घालून चांगली दणदणीत वाफ काढा.
६. खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरा.

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तींसाठी (एक वाटी थालीपीठ भाजणीची दोन ते अडीच वाट्या उकळपेंडी होते)
अधिक टिपा: 

१. थालीपीठ भाजणीत गहू, ज्वारी, बाजरी, चणा व उडीद डाळ असल्याने, पूर्णान्न होत. आणखी पौष्टिक करायला मेथीची मुठभर पानेही घालू शकता.
२. घरी एकटे आहात, चपाती/थालीपीठ बनवायचा कंटाळा आला असल्यास पोटभरीचा उत्तम पर्याय आहे. ब्रंचसाठीही उत्तम पर्याय आहे,
३. थालीपीठ भाजणी कोरडीच व खमंग भाजण्यावरच उकळपेंडीचा स्वाद अवलंबून आहे (त्यासाठी आच मंदच ठेवावी, जळता कामा नये).
४. आधी थालीपीठ भाजणी कोरडीच भाजायची असल्याने फोडणीत जरा जास्तच तेल लागते (शिवाय विदर्भातील हवामान कोरडे असल्याने तेल जास्तच वापरले जाते).
५. मी उकळपेंडी शिजवायला ताक वापरले आहे, त्यामुळे किंचित आंबटपणा येतो. मात्र पूर्व विदर्भात गव्ह्याच्या/ज्वारीच्या पीठाची उकळपेंडी केली जाते आणि ती शिजवायला गरम पाणी वापरतात.
६. उकलपेंडी मऊसर व्हायला, एक वाटी थालीपीठ भाजणीला दीड वाटी ताक पुरेसे आहे. मोकळी आवडत असल्यास १ वाटी ताक घालावे.
७. लाल तिखटाने खमंगपणा येतो, तसा हिरव्या मिरचीने येत नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक वैदर्भीय पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20171230_124838.jpg

आम्ही उकडपेंडी म्हणतो..
यावर धागा आहे शायद..
आम्ही दही किंवा आंबट ताक टाकतोच टाकतो..आणि मोकळी करतो..

@ टीना: होय, बहुधा तुमचाच धागा आहे. खरतर मी थालीपीठ भाजणीची बनवली मात्र पाककृती लिहिताना मी गव्ह्याच्या पीठाची लिहिली होती. संबधीत बदल केला आहे.

@ webmaster & admin: प्रतिसादात फोटो टाकता येतो मग पाककृतीत फोटो का टाकता येत नाही? हेही थोडके नसे, आधी प्रतिसादातही फोटो टाकता येत नसे.

मस्तच, फोटोपण भारी.

आम्ही ह्याला मोकळी भाजणी म्हणतो. कोकणात भाजणी करताना मुख्य घटक तांदूळ मग आख्खे उडीद मग बाकी सर्व, मोस्टली अशी पद्धत.

परत भाजत नाही आम्ही, ताकात भिजवून फोडणीत कांदा परतला की मग घालतो, लसूण छान लागते यात.

@ टीना: होय, बहुधा तुमचाच धागा आहे.>> माझा नसावा.. बहूतेक दिनेशदांनी टाकलेली ह्याची रेसिपी..
आमच्याकडे मोकळी करतात उकडपेंडी त्याचा हा फोटो..
.

मस्त रेसिपी. माझ्या साबा गव्हाच्या पिठाची करतात. मोकळीच करतात त्या. त्यावर खाताना वरून थोडा बारीक चिरलेला कच्चा कांदा घातला तर खाताना "बाइट" येतो जरा आणि चवीला पण मस्त लागतो. तेल घालताना हात कचरत असल्याने माझी सांबाच्याइतकी खमंग नाही होत, पण आता भाजणीची करून पहायला हवी जमते का.

आम्हीही मोकळ म्हणतो. आणि थालीपीठ करण्यासाठी जशी भाजणी भिजवतो ( कांदा कोथिंबीर तिखट मीठ घालून) तशी भिजवून थेट फोडणीत घालून परतून परतून मोकळी करतो. मस्त लागते. करायला हवी एकदा .. खूप दिवसांत केली नाही Happy

मस्त रेसिपी.
आम्ही मोकळ भाजणी अशी करतो.
आता तुमच्या पद्धतीने करून पाहीन.

त्यावर खाताना वरून थोडा बारीक चिरलेला कच्चा कांदा घातला तर खाताना "बाइट" येतो जरा आणि चवीला पण मस्त लागतो.>> +१
उकडपेंडीवर वरुन कच्चा कांदा हवाच.. मी टाकलेला फोटो कांदा टाकायच्या आधीचा आहे नाहीतर दिसला असता Lol