दोन मैत्रिणी.. आणि बरेच काही..

Submitted by सखे on 16 December, 2017 - 13:42

शीर्षक: दोन मैत्रिणी.. आणि बरेच काही..

भाग पहिला:- साल १९९६

दाराची बेल वाजली. कलिकाने भूगोलाचे पुस्तक वाचता वाचता दार उघडले. दारात मीनल उभी होती. कलिका ने घड्याळाकडे पाहीले, घड्याळात दुपारचे १ वाजले होते.दीड वाजता त्यांचा भूगोलाचा पेपर होता.
मीनल:- अगं, कले हे काय? अजून तयार नाही झालीस?
कलिका:- अगं होगं, आवरते.
मीनल:- उशीर झाला तर बाई पेपरला बसू देणार नाहीत.
कलिका:- मला आवरायला २ मिनीटे लागतात, असे म्हणत कलिका लगतच्याच खोलीत शाळेचा गणवेश घालायला गेली.
कलिका:- भूगोलाचा 'नॅचरल रिसोर्सेस' हा धडा वाचत होते. माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय. नक्की कुठे काय मिळतं हे लक्षात ठेवता ठेवता वाट लागली. झारखंड मध्ये काय मिळते नी मध्य प्रदेश मध्ये काय! इतकी माहिती आहे की बस्स! त्यात बाईंनी तो धडा इतका बोअर शिकवला... अर्धे जणं वर्गात झोपत होते.
शाळेचा ड्रेस घालून ती बाहेर आली.

मीनल:- मी तर तो धडा ऑप्शनलाच टाकलाय.वेळच मिळाला नाही वाचायला.
कलिका:- हरकत नाही, रस्त्याने जाता जाता मी तुला महत्वाच्या गोष्टी सांगते. तुला 'गाळलेल्या जागा' आणि 'जोड्या लावा' चे पूर्ण गुण मिळवता येतील.
घराला कुलूप लावून दोघी आपले शाळेचे दप्तर पाठीवर अडकवून लगबगीने बाहेर पडल्या. वाटेत कलिका मीनलला महत्वाचे मुद्दे भराभर सांगत होती,मीनल सुध्दा नीट लक्ष देऊन ऐकत होती. बाकी रस्त्यावर काय चालू आहे ह्याकडे दोघींचे लक्ष नव्हते. रस्ता नेहेमीचा असल्यामुळे अंगवळणी पडला होता. झपाझप पाऊले टाकत त्या एकदाच्या शाळेत पोहोचल्या.
चला, वेळेत पोचलो. हातातल्या घाड्याळा कडे बघत मीनल म्हणाली. उगीच घाबरतेस, चल बेस्ट लक - कलिका. तुलाही - मीनल.

तर अश्या ह्या दोघी जणी, कलिका आणि मीनल. पक्क्या मैत्रिणी. फाफे. शाळा,अभ्यास, खेळ आणि बडबड हेच त्यांचे विश्व आणि त्या आपल्या ह्या विश्वात आनंदात होत्या.

मीनलचे चे घर अगदी छोटेसे होतेे. शहरातल्या बाजारपेठे जवळ एक लहानशी खोली (ड्रॉईंग हॉल), त्याला लागून आणखीन छोटे स्वयंपाक घर आणि मोरी. सकाळचे विधी आटोपायला घराच्या बाहेर बाजूलाच जावे लागे. मीनलला आणखी दोन मोठ्या बहीणी होत्या. घरातले वातावरण तसे पुरातन वळणाचे. तिचे वडील देवाला मानणारे. नित्य नियमित देवाची पूजा अर्चा करायचे. बाहेरचे कुणी आले की लगेच त्यांच्यासाठी चहा-पोहे झालेच पाहिजेत आणि पाहुणा जरा बरा ओळखीचा असेल तर जेवावयास ही आवर्जून आग्रह करायचे. सकाळी आणि संध्याकाळी साधारण ३-५ वेळा तरी मीनलचे बाबा 'संध्याला' म्हणजेच मीनलच्या आईला कुठल्यातरी पै-पाहुण्यासाठी चहा करायला सांगायचे.

पण पुरातन विचारवादी असले तरी मनाने चांगले होते. कलिकेच्या घरचे वातावरण वेगळे होते त्यामुळे त्यांना ती थोडी फॉरवर्ड वाटायची.
तिच्या घरी देवघर असले तरी ती कुठलाही उपास करत नाही ह्याचे मीनलच्या बाबांना नवल वाटे. मैत्रिणींच्या इव्हेंट किंवा कार्यक्रमासाठी कधी ७.३० पेक्षा जास्त उशीर होणार असेल तर कलिकाला मीनालच्या वडिलांना, त्यांची परवानगी मिळवण्यासाठी, मनवावे लागायचे.
पण मीनलच्या बाबांनी कलिका वेगळी आहे म्हणून तिचा कधी दुस्वास केला नाही किंवा मीनलने हिची संगत सोडली तर बरे! असेही त्यांना कधी वाटले नाही.

मासिक पाळीच्या वेळेस वेगळे बसण्याची मीनलच्या घरी पद्धत होती. एकंदरीत घरी चार बायका असल्यामुळे कुणी ना कुणी आलटून-पालटून त्या छोट्याश्या हॉल मधला एक कोपरा व्यापून, वेगळे बसलेले असायचे. मीनलला पाहुणे आले की त्यांच्या समोर हॉल मध्ये एका बाजूला कोपऱ्यात बसायला ऑक्वर्ड वाटे. एकदा तीला कलिका म्हणाली - 'तुम्ही इतक्या चार जणी आहात, सर्वे मिळून बाबांना सांगत का नाही - आता हे सगळं कुणी पाळत नाही. शिवाय, खोली लहान आहे तेंव्हा जागेची पण अडचण होते'. तशी मीनल म्हणाली - 'अगं आम्ही एकदा म्हणालो होतो. तर बाबा नाराजीने म्हणाले की ठीक आहे, मग त्या दिवसांमध्ये ते घरातल्या देवांची पूजा करणार नाहीत.' कलिकेला खरेतर समजले नाही 'अगदी नाही केली देवाची तीन दिवस पूजा तर काय बिघडले?' पण तिने विषय ताणला नाही.
एकदा अशीच ती मीनलच्या घरी गेली असतांना मीनल कोपऱ्यात बसली होती. तिला आणि तिने वापरलेल्या वस्तुंना कुणीही शिवायचे नव्हते.
तिने वापरलेले जेवणाचे ताट,कपडे तिच्या बाजूलाच एकीकडे नीट ठेवलेले होते. कलिका समोरच्या पलंगावर बसून गप्पा मारत होती. तेंव्हा मिश्किल आणि खट्याळ कलिकेच्या मनात एक विचार आला आणि सहज गप्पा मारता मारता तिने जाऊन मीनलला हात लावला. तिला अपेक्षित होते तेच झाले. घरच्यांनी तिलाही मीनलच्या शेजारी बसवले. आता त्या दोघींनाही कुणी शिवायचे नव्हते.हा सगळा प्रकार काही मिनिटात झाला. हे कलिकाच्या हातून चुकून झाले असेच इतरांना वाटले तरी मीनलच्या हे लक्षात आले होतेे.
मीनलने डोक्याला हात मारत 'वेडाबाई' म्हणत कलिके कडे प्रेमाने बघितले. तशी कलिका गालातल्या गालात हसत म्हणाली- 'अगं असुदेत, आतातरी मी तुझ्या शेजारी बसू शकते ना? आणि आपण एकत्र अभ्यास करू शकतो ना?' मीनलला ह्याचा मनोमन आनंद झाला.

असेच दिवस भर्रकन सरले. आता त्या दोघी कॉलेजात होत्या.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
अगदी माझ्या शाळेच्या दिवसांची आणि माझ्या एका सख्ख्या मैत्रीणीची आठवण आली.
मीनल सारखंच घर होतं तिचं. आणि तिचं नाव मीना होतं. Happy
पुलेशु.