फ्रेंच भाषेबद्दल दोन शब्द...मराठीमधून!!

Submitted by सॅम on 16 March, 2009 - 10:28

काही कारणांमुळे फ्रेन्च भाषेतील काही विशेष स्वर (जे इंग्लिशमधे नाहीत) इथे लिहिता आलेले नाहीत. त्या ऐवजी e' (e-acute) , u` (u-grave) असं लिहिलं आहे.
----------------------------------------------------------------------
बोनजुर मादाम ए मिसिअर... (Bonjour Madam et Monsieur) अर्थात, नमस्कार सभ्य स्त्री-पुरुषहो,
फ्रेंच भाषा व लोकांबद्दल जगभरात (म्हणजे इंग्लिश बोलणार्‍यांमधे) बर्याच (कान)गोष्टी पसरलेल्या आहेत. त्यातीलच एक त्यांच्या भाषेबद्द्ल. फार गोड (खरं तर रोम्यांटीक) भाषा आहे म्हणतात. माझा व या भाषेचा कधी संबंध येइल असं वाटलं नव्हतं. पण जेंव्हा Long Term प्रोजेक्टसाठी फ्रांसला जायचं पक्क झालं तेंव्हा फ्रेंच शिकण ओघानं आलच.

मी काही फ्रेंचचा 'अभ्यास' केलेला नाही (आणि मराठीचाही!!) पण मला जो काही अनुभव आला ही भाषा शिकताना, तो इथे मांडण्याचा हा प्रयत्न!!

तशी ऐकायला ही भाषा खरोखरच मधुर आहे (तुम्हि म्हणालचं, मग मराठी काय मधूर नाही का?) पण शिकायला फारच अवघड, ते का ते पुढे येइलच. फ्रांसमधे कोणी इंग्लिश बोलतं नाही असं ऐकलं होतं... आता अनुभवही घेतला!! त्यांचपण बरोबर आहे म्हणा, सर्वांना फ्रेंच येत असेल तर दुसर्‍या कुठल्या भाषेत बोलायला ते मराठी थोडेच आहेत!! बरं ते जाउदे, मी विसरलोच की मला फ्रेंचबद्दल लिहायचय, मराठी बद्दल नाही... पण काय करणार, तुलना ही होणारच.

Champs-E'lyse'es
फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'.

आमच्या बाबतीतलाच एक अनुभव सांगतो, माझ्या फ्रेंच बॉसने 'शोंम्सेलिसे' नामक रस्त्याचे बरेच कौतुक केले (फ्रेंच लोक याला जगातला सर्वात सुंदर रस्ता म्हणतात... मला त्याच्या सौंदर्या बद्दल काही म्हणायचे नाही!!!). आम्हि त्याचे सौंदर्य पाहायला गेलो, पण आम्हाला तो रस्ता काही केल्या सापडेना, तिथेल्या सर्वात मोठ्या रस्त्याचे नाव होते, 'चाम्प्स्-इलिसेस'! दुसर्या दिवशी बॉसला हे सांगितल्यावर तो पण चकित. मग त्याच्या हा घोळ लक्षात आला, दोन्ही उच्चार त्याच रस्त्याचे होते, यानंतर तो जागेची नावं लिहिनुच देतो!!

तर सांगायची गोष्ट म्हणजे, आम्ही केला तो इंग्लिश उच्चार आणि बॉसचा होता फ्रेंच उच्चार (आणि बरोबरपण हे सांगायला नको). फ्रेंच उच्चारांच्या नियमांनुसार,
ch - श,
am - एम्,
*s e* - से (Liaison: साधारणत: शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर उच्चार करत नाहीत पण पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर स्वर असेल तर दोन्ही अक्षरे (व्यंजन + स्वर) मिळुन उच्चार करणे, याला 'लिएसाँ' चा नियम म्हणतात),
e' - ए
असे करुन Champs-E'lyse'es ला म्हणायचं 'शोंम्सेलिसे'!!!

आपल्याकडे कसं, 'क ला काना - का', एकदम सोप्प. फ्रेंचमधे मुळाक्षरं आणि त्यांचे शब्दातले उच्चार यांचा कधी कधी काहीच संबंध नसतो!! जसं 'y' ला 'इग्रेक' आणि 'W' ला 'डुब्लवे' म्हणतात पण शब्दात जर ही मुळाक्षरं आली तर त्यांचा उच्चार तसा होत नाही (इंग्रजी सारखाच होतो). दुब्ल वे म्हणजे डबल व्ही (अर्थात डब्ल्यू)

W ला ड्बल V म्हणतात यावरुन आठवलं, फ्रेंच आकडे पण मजेशिर आहेत.
१ ते १६- (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येक आकड्याला वेगळा शब्द
१७, १८, १९ - dix-sept, dis-huit, dis-neuf, म्हणजे, दहा(आणि)सात, दहा(आणि)आठ, दहा(आणि)नउ!!
२०, ३०, ... ६० - (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येकी वगळे शब्द
२१, २२, ... ३१,..., ६१.. - (मराठी / इंग्रजी सारख) XXवीस / twentyXXX,...
७० - soixante-dix, म्हणजे, साठ(आणि)दहा
७७ - soixante-dix-sept, म्हणजे, साठ(आणि)दहा(आणि)सात !!!
सर्वात विनोदी म्हणजे,
८० - quatre-vingts, म्हणजे, चार(पट)वीस
त्यामुळे,
९९ - quatre-vingts-dis-neuf, म्हणजे, चार(पट)वीस(आणि)दहा(आणि)नउ... ४*२०+१०+९ = ९९... Happy

spelling आणि उच्चार या बाबतीत स्पॅनिश लोकांना मानलं पाहिजे. 'फुटबॉल' चं spelling होतं, 'futbol' !! बार्सिलोनाच्या मेट्रोमधे पुढच्या स्टेशनचं नाव स्पिकरवर सांगतात, असं पॅरिस मेट्रोत करत नाहीत. पण मग वाटलं, जर तसं केलं तर spelling आणि उच्चार यांच्या तफावतीमुळे बाहेरच्या लोकांचा गोंधळच होइल.

हा घोळ इंग्लिश व फ्रेंच लिपी सारखी (Latin) असल्यामुळेपण होतो. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांचे उच्चार चांगले असतात (शब्द वाचता आला तर!!). आम्हि शब्द बरोबर वाचतो पण उच्चार चुकतो.

उच्चार सारखे आणि अर्थ वगळा:
ही भानगड इंग्लिश मधेपण आहे (dear-deer; meat-meet; right-write वगैरे) पण तशी कमी प्रमाणात (मराठी/हिंदीत अशी काही भानगड आहे का हो?) फ्रेंचमधे विचारुच नका...
- ou (किंवा), ou` (कुठे) : दोन्हिचा उच्चार 'ऊ'
- marche (चालणे), marche' (बाजार) : दोन्हिचा उच्चार 'मार्शे'
आणि आजुन बरेच!!

या सगळ्यामुळे माझा तर फारच गोंधळ उडतो... शाळेत असताना स्पेलिंग पाठ करायच्या नावानी बोंबच होती... मराठीत बरं होतं वेलांटी चुकीची असली तरी शब्द वाचता तरी यायचा (आणि अर्थपण बदलायचा नाही).. फ्रेंचमधे तर थोडं स्पेलिंग (किंवा उच्चार) चुकलं की अर्थ बदललाच! हे वरचेच शब्द पाहा ना,
ou (किंवा), ou` (कुठे)
marche (चालणे), marche' (बाजार)

आवाज का शब्दः
अजुन एक वैताग आणणारी गोष्ट म्हणजे, छोटे शब्द. २६ मुळाक्षरं अधिक accented स्वर असताना इतकी कंजुसी का? खालील काही उच्चार पाहा,
आ- a (to have चा एक form)
उ- ou (किंवा), ou` (कुठे)
ए- est (to be चा एक form), et (आणि)
ओ- eau (पाणी)
अं- un (इंग्लिश a सारखं)
ले- lait (दुध)
ने- n' (जन्म)

वरील सर्व गोष्टींमुळे फ्रेंच माणसाशी फ्रेंच बोलणं बरच अवघड होतं (तसं त्याच्याशी इंग्लिश बोलणही सोपं नाही!!). उच्चारातील थोडा फरकही त्यांना कळत नाही. ह्याचं कारण मला वाटतं की आपल्याला कसं कानडी/हिंदी/गुजराथी माणसांनी बोललेलं मराठी(?) पण आपल्याला कळतं तसं ट्रेनिंग ह्या लोकांना नाही मिळत. उत्तर आणि दक्षिण फ्रान्सच्या लोकांच्या उच्चारात बराच जरक आहे असं इथली लोकं म्हणतात (मला नाही माहित!) पण तो तर सोलापुर आणि नागपुरच्या मराठीतला फरक आहे!!

आता तुम्हि म्हणाल मी फ्रेंच भाषेबद्दल सगळच 'नकारात्मक' बोलतोय, पण तसं नाही, काही चांगल्या गोष्टीपण आहेत (मराठी सारख्या!!)

१. कर्ता महत्वाचा:
कर्त्याप्रमाणे विशेषण, क्रियापद सगळ बदलत. इंग्लिश सारख नाही...
विशेषणात इंग्लिश मधे good boy/good girl. मराठीत कसं चांगला मुलगा/चांगली मुलगी, तसच फ्रेंचमधे bon garcon/bonne fille.
आणि क्रियापदाबाबतीत म्हणाल तर, इंग्लिश मधे I go / you go / they go. पण मराठीत मी जातो / तु जातो(जाते) / ते जातात, तसच फ्रेंचमधे पण Je vais / vous allez / ils vont.

२. आदरार्थी बहुवचन
मराठी(तु-तुम्ही) / हिंदी(तुम-आप) प्रमाणे फ्रेंचमधेही आदरार्थी संबोधन आहे. मित्र/जवळची व्यक्ती असेल तर म्हणायच 'त्यु' (tu) आणि आदरणीय/अनोळखी व्यक्तिसाठी वापरायच 'वु' (vous). इंग्लिशसारख you-you नाही.

३. 'ते', 'तो' आहे का 'ती'?
इंग्लिशमधे बर्याचशा गोष्टी 'it' असतात. मराठीत तसं नाही. त्यामुळे अ-मराठी लोकं 'तो' का 'ती' मधे गोंधळतात आणि सरळ 'ते' म्हणुन मोकळे होतात. पण फ्रेंचमधे ती सोय नाही!!! इथे फक्त स्त्रिलिंग आणि पुल्लिंग (म्हणुनच बहुतेक हे लोक 'रोमँटिक' म्हणुन फेमस आहेत बहुतेक!!!). त्यामुळे नवीन शिकणार्‍याची पंचाइत होते. आता हेच पाहा, 'तो' रस्ता यामागे काही logic आहे? तो सवयीचा भाग आहे. लहानपणी अपोआप ते लक्षात राहातं. पण फ्रेंच शिकताना यामुळे फार त्रास होतो. वर सांगितल्याप्रमाणे विशेषण पण कर्त्याच्या लिंगावर अवलंबुन असल्यामुळे तर्क चुकला तर विशेषण पण चुकलच!

ह्या सर्व बाबी इंग्लिशपेक्षा विशेष आहेत, त्यामुळे आमच्या इथल्या फ्रेंच क्लासच्या बाई सारख या गोष्टी सांगत असतात, तेंव्हा त्यांना सांगावसं वाटत की माझ्या भाषेतही या खुबी आहेत!!!

बघितले फ्रेंच आणि मराठीतले साम्य!! या भाषा वाक्यातल्या प्रत्येक अवयवाला न्याय देतात. त्यामुळे इंग्लिश म्हणजे मी तर म्हणेन सोप्पी (simplified) फ्रेंच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mandarnk,
अननस वरुन आठवलं, आम्हाला क्लासमधे (भारतात) फळांची नावं शिकवलं त्यांपैकी 'अनान' (अननस) आणि 'बनान' (केळी) हे (सोप्प असल्यामुळे) लक्षात राहिलं... मग कोणालाही बाईंनी आवडतं फळ कुठलं
असं विचारलं कि एकच उत्तर, बनान ए अनान!!!

गौरी,
उदाहरण आवडलं!

सर्वांचे आभार.

फ्रेंचमध्ये आनानास असं म्हणतात. Ananas असं स्पेलिंग आहे. त्यामुळे 'अनान' असा उच्चार होणार नाही. Happy
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

माझ्या कंपनीमधे नॉर्वे चे काही लोक आहेत. नॉर्वे मधे Pineapple-Banana आईसक्रिम मिळतं, आणी त्यांना ते आवडतं. आम्ही त्यांना विचारलं की आवडीचं आईसक्रिम कुठलं, की ते मजेशीर उच्चार करत म्हणतात: बनानाऽऽननस (बनाना-अननस) Happy

मला बर्‍यापैकी इंग्लीश बोलणारी लोक भेटली आहेत काही भागातच. डबलिन (ireland) सारख्या छोट्या भागा मध्ये लोक प्रयत्न तरी करतात इंग्लीश मध्ये बोलायला. पण पॅरीसमध्ये एकदम आठी पाडतात इंग्लीशमध्ये बोलले की. इंग्लड मध्ये काही पॉकेट्स तर आपल्याकडे तुसड्याने बघतात इग्लीश बोलले की. एकदा रस्ता चुकले असल्याने ४ तास रडकुंडीला आले. रस्त्याची नावे इंग्लीशमध्ये नाहीच. अगदी पाया पडून सुद्धा कोणी इंग्लीश एकून थांबून मदत करत न्हवते म्हणून जरा भीतीच वाटायला लागली एकटे फिरायला भाषा येत नाही म्हटल्यावर. शाळेतले फ्रेंच म्हणजे एकदम टाकावू. ते काही उपयोगी नाही पडले. Happy बरे जे काय इंग्लीश बोलतात ते कमालीचे फास्ट. आपल्यापेक्षा फास्ट एकदम.
तेव्हा इथे कुठे कोणाला जायचे असेल तर बर्‍यापैकी त्यांच्या भाषेचे ज्ञान ठेवलेले बरे हा अनुभव आला आता.

लेख छान आहे... जॅपनीज आणि मराठी मधे खूप साम्य आहे.. क्रियापद, लिंग, वाक्यरचना, काळ हे सगळं बर्‍यापैकी सेम आहे.. फक्त तिथे script ही मोठी अडचण आहे.. ! त्यामानाने बहूतेक युरोपियन भाषा शिकायला सोप्या जात असतील...

मनुस्विनी..
डबलिन (ireland) सारख्या छोट्या भागा मध्ये लोक प्रयत्न तरी करतात इंग्लीश मध्ये बोलायला. >>>>> ireland हा यु.के. मधला एक देश आहे ना??? मग तिकडे इंग्लिश बोलत नाहीत??? आयरीश भाषा व्यवहारात एव्हडी वापरली जाते का? कारण बेलफास्ट ला तरी पूर्ण इंग्लिश बोललं जातं...

इंग्लड मध्ये काही पॉकेट्स तर आपल्याकडे तुसड्याने बघतात इग्लीश बोलले की. >>> माझं काहितरी confusion होतयं... इंग्लड मधे इंग्लीश च बोलणार ना??

adm धन्यवाद!
हे मात्र बरोबर, लिपी ओळखिची असल्यामुळे बरीच मदत होते. मला नेहमी प्रश्ण पडतो की बाहेरची लोकं जपान/चीन्/कोरियामधे पत्ता कसा शोधत असतील? रस्ता/जागेच नाव कसं वाचणार? आपला काही अनुभव?

मनुस्विनी.. मझापण जरा गोंधळ झालाय... इंग्लडमधे इंग्लिश नाह,?, रस्त्याची नाव इंग्लीशमध्ये नाहीच?, शाळेतले फ्रेंच म्हणजे एकदम टाकावू?
तु वेगवेगळ्या जागांबद्दल बोलतियेस का?

कोणत्याही भाषेत संवाद साधण्यासाठी लागणारा वेळ व्यक्तिपरत्वे बदलतो.
ते तर आहेच.

इंग्रजी व फ्रेंच या दोन्ही भाषांत अनेक शब्द समान असले तरी त्यांचे उच्चार अतिशय वेगळे असतात
उच्चार वेगळे असतील पण बर्‍याच लोकांनी मला सांगितल की फ्रेंच ,जर्मन भाषा ज्या लोकांना इंग्रजी येत त्यांना शिकण्यासाठी सोप्या आहेत म्हणुन्.पण ६ महिन्यात विचार करुन १-२ वाक्यच बोलता येत असतील तर भाषा अवघड म्हणायची.

वरती psg ने म्हटल्याप्रमाणे सोपी आहे spanish इतर भाषा पेक्षा.
बर मग स्पॅनिश किती महिन्यांमध्ये ठिकठाक शिकता येईल????स्पॅनिश भाषा ,स्पेन हा देश याबद्दल कुणाला माहीती असल्यास कृपया लिहावी
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

यूके मध्ये सर्व भागात इंग्लीश नाही बोलत. हो, डबलिन मध्ये आयरीश चालते पण इंन्ग्लीश मध्ये देखील बोलतात. पण आपल्याला वाटते तसे इंग्लड मध्ये काही भागात नाही बोलत इंग्लीश मध्ये.
स्पॅनीश तशी सोपी आहे शिकायला. काही शब्द तर आपल्याच भाषेतून उचलले असे वाटते.
पैसे - पेसू(मला नीट उच्चार लिहिता येत नाहीये इथे पण तसाच sound होतो जवळपास आपण पैसे म्हणतो तसा,अर्थ सुद्धा एकच)
असे बरेच शब्द आहेत.
सबूरा.... वगैरे अर्थ सेम असणारे .....

पन खूप सोपि भाषा आहे तशी.

पण आपल्याला वाटते तसे इंग्लड मध्ये काही भागात नाही बोलत इंग्लीश मध्ये. >>> ओह... हे महित नव्हतं मला... कुठली भाषा बोलतात मग तिथे? आणि कुठला भाग हा?

छान आहे लेख. सग्ळ्यांच वाचून अस वाट्तय की शिकून बघितल पाहिजे. Happy

छान आहे लेख.

Nostalgic होऊन गेले एकदम! फ्रेंच भाषा अत्यंतं गोड आहे!! सुरुवातीलआ खूप अवघड वाटते शिकायला, पण एकदा basic grammar/conjugation लक्शात आलं कि खूप मजा येते!! तुम्हि कोणा कडून शिकता हे खूप महत्वाचं ठरतं. मला तरी फ्रेन्च (खरे- फ्रऑन्स देशात जन्मून्-वाढलेले)
instructors आणी बाकि इन्सट्रक्टर्स मध्ये खूप फरक जाणवायचा!! अर्थात--with a couple of exceptions like माधुरि पुरंदरे/मादाम Reddy...वग्रे.

फ्रेन्च शीकताना मजा-मजा खूप होतात्....एक अशिच आठवण म्ह्ण्जे-- "Qu'est ce que c'est?" --- म्हण्जे--" हे काय आहे?" याचा उच्चार "केस कसे?" असा होतो. मी एकदा बहीणीला -जीला फ्रेन्च काही कळत नसे...तीला तिच्या एका science journal मधल्या diagram बद्द्ल विचारलं---"Qu'est ce que c'est?" --ती म्हणालि--"विस्क्ट्लेत्--जरा विंचर" :--)...

पण एकन्दरीत फ्रेन्च शिकणे khoooop enjoyable आहे!

पण एकन्दरीत फ्रेन्च शिकणे khoooop enjoyable आहे!

अहाहा काय बोललात ! मी फ्रेन्च शिकणं जरा जास्तच एंजॉय केलं. फ्रेन्च पेक्षा, फ्रेन्च शिकवणारीकडे जास्त लक्ष दिलं. अरे फ्रेंच म्हणजे प्रेमाची भाषा. आता ते व्याकरण वगैरे थोडंच महत्वाचं आहे? पण हे सगळ्याना पटलं पाहिजे ना.....

मग काय फ्रेंच मधे नापास झालो आणि माझं फ्रेंच संपलं !

पण अशा गोष्टींच दु:ख न करता आयुष्यात पुढे जायचं हे पण त्या फ्रेंच संस्कृतीकडून शिकलो.. आणि रशियन शिकायला लागलो ते अजून शिकतोच आहे...... ! Happy

वैशालीत गेलो की विश्वाला आम्ही 'केस कसे' असं विचारायचो.. Happy

माधुरीताई भन्नाट शिकवायच्या. मला सहा महिने शिकवलं त्यांनी. त्यांच्या वर्गात आम्ही मरठी-फ्रेंचमध्ये चारोळ्या करायचो.
उदा.,
मारी म्हणाली पिएरला ,'दॉने मुआ ल पँ'
पिएर म्हणाला मारीला,'व्हने आ दमँ'...

अजय,
Allianceला सहा प्रोफेसरणींनी त्यांच्या विद्यार्थ्यांशी लग्नं केली आहेत. Happy

विषयांतराबद्दल क्षमस्व.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

simm
>>> "केस कसे?" ---- "विस्क्ट्लेत्--जरा विंचर"
लय भारी Lol
अजय, सगळ्या भाषा try करणार आहेस वाटतं?!
simm, अजय, धन्यवाद!!

चिन्मय, स्पॅनिश भाषा तशी शिकायला मला खुप ही सोप्पी वाटली नव्हती, एक उच्चार सोडले तर कारण जसे लिहीतो अगदी तसेच उच्चार करायचे. आत्ताची नविन पिढी सोडली तर जुन्या लोकांना अजिबातच इंग्लिश येत नाही.
स्पॅनिश मध्ये सुद्धा कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. म्हणुन बोलतांना सर्वनामं बोलतच नाहीत. e.g.
¿que hago? what do I do? (So actually it is ¿que yo hago? yo is 'I')
¿que haces? What do you do?
¿que hacemos? what do we do?
काही स्पेसिफीक additional alphabet आणि काही alphabet चे वेगळे उच्चार आहेत. कुठल्या शब्दावर जोर द्यायचा ते à सारख्या डोक्यावरच्या चिन्हानी दाखवायचे असते.
e.g. Màlaga - 'मा..लागा' (आमची सिटी).
स्पॅनिश मध्ये अ उच्चार नाहीच फक्त आ.
ट, ड, ण सारखे स्ट्रॉन्ग उच्चार नाहीत, सगळे त, द, न.
J चा उच्चार ख ऐकू येतो पण तो actually उच्चार गळ्यातुन काढलेला स्ट्रॉन्ग ह असतो. Jesus - खेसुस (जीसज क्राइस्ट.)
LL चा उच्चार y सारखा म्हणजे य किंवा ज असा होतो.
rr चा उच्चाअसे एक अल्फाबेट आहे त्याचा र्र असा उच्चार होतो.
एक दोन महिने तरी लागतील वाटते शिकायला. मी तसा एक महिन्याचाच क्लास केला होता पण मग टिव्ही बघुन आणि घर मालकिणीशी बोलुन बोलुन मला जरा सहा महिन्यात बोलता यायला लागली होती, स्पेन मध्ये राहुनही Sad

मनुस्विनी तु म्हणतेस ते खरे आहे मात्र पैशांना दिनेरो असे म्हणतात. पेसेटा ही त्यांची युरो च्या आधीची करंसी होती.

अजय - मि म्हणालेच होते--"तुम्हि कोणा कडून शिकता हे खूप महत्वाचं ठरतं" तुमच्या बाबतीत context बदलला इतकच :-).

चिनूक्स- वैशालि मध्ये विशवा नविन आहे का? आम्हि तेव्हा वासूशि बोलायचो फ्रेंच मध्ये. तो टिपिकल 'शेटटी' टोन मध्ये म्हणायचा--'तुम्हि मावशी लोक माजा मराटि पन कराब करनार आनि एन्ग्लिस पन कराब करून सोडनार!'

विषयांतराबद्दल क्षमस्व.

फ्रेन्च-मराठी चारोळी क्युट!! माधुरि आम्च्यात खूप भाणडंणं लावून द्यायचि!! एखाद्या ज्वलंत विशयाचि आळी वर्गाच्या सुरुवातिला सोडआयचि--आम्हि खुप तावा-तावानि फ्रेन्च मध्ये बोलायचो---मधे शब्द जसे अडतील तसे माधुरि हळुच सुचवायचि.....त्यातून अम्हि बरंच काहि शिकलो! तेव्हा राग यायचा खूप्---पण जरा वय वाढल्यावर ही भाशा शिकवायचिच एक टॅक्ट आहे हे ल़क्षात आलं. कोणत्याहि भाषेत तुम्हाला एकदा वाद नीट घालता आला कि ति भाषा तुम्हाला आलि...असं कुठे तरि वाचल्यावर हे उमगलं.

Champs-Elysees बरोबरच अजून एक Dasin चंच खुप क्युट गाणं शिक्ल्याचं आठवतय---"Petit Pain Au Chocolat"--"पुति पँ ओ शोकोला' --त्यात एक बेकरी वाला खूप क्युट अस्तो---पण त्याला चष्मा लाग्लेला अस्तो त्यामुळे त्याला त्याच्या बेकरित रोज एक सुन्दरी येत अस्ल्याचं कळतंच नसतं. एकदा चष्मा लाव्ल्यावर त्याला लक्षात येतं-- मग त्यान्चं लग्न होऊन त्यान्ना खूप चिल्लि-पिल्लि होतात्...असं काहि...youtube वर किन्वा बाकि कठे मिळालं तर बघायला पाहिजे.

अडमा, मी फक्त काही विशिष्ट भागात बघितले, खास करून wales,cornwall,liverpool and Birmingham ठिकाणी मी जेव्हा इंग्लीश बोलले तेव्हा एक weird लूक दिले तिथल्या लोकांनी. एक तर मलाही काही कळत न्हवते जे कोणी इतर भेटले त्यांचे इंग्लीश का माझे त्यांना हाच प्रॉब्लेम होता मला डिरेक्शन विचारताना. काही शब्द एकदम वेगळे असतात पण एकताना इंग्लीश वाटते.(उ.दा. ब्लोक वगैरे) असो.
नंतर मला कोणीतरी म्हणाले की आपल्या इकडे कसे प्रत्येक राज्याचे(south indian, gujarati etc etc) इंग्लीश वेगळे सॉउंड होते तसलाच प्रकार झाला असेल नी आहे तिथे.

मनुस्विनी, आपल्याला इंग्लिश इंग्रजांनी शिकवलं तरी आपले उच्चार त्यांच्यासारखे नाहीत. त्याच्या आवाजात बराच चढउतार असतो. मलातर इंग्लिश सिनेमांमधे जर खास ब्रिटिश उच्चार असतील तरी कधी कधी समजत नाही!! उदा. 007 quantum of solace, Australia वगैरे.

लेख आवडला. केस कसे? चा किस्सा ही मस्त. वाय ला इग्रेक म्हणणे हे बहुतेक ग्रीक i अशा अर्थाने असावे (तसाही y जर व्यंजनांसोबत आला तर बर्‍याचदा i सारखाच चालतो.) आणि दुब्ल वे म्हणजे डबल व्ही (अर्थात डब्ल्यू).

नंदन,
धन्यवाद,
>> Y - इग्रेक - i-ग्रीक >> खरंच की!
>> दुब्ल वे म्हणजे डबल व्ही (अर्थात डब्ल्यू).>>हो. बरोबर.
W ला ड्बल V म्हणतात यावरुन आठवलं, फ्रेंच आकडे पण मजेशिर आहेत.
१ ते १६- (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येक आकड्याला वेगळा शब्द
१७, १८, १९ - dix-sept, dis-huit, dis-neuf, म्हणजे, दहा-सात, दहा-आठ, दहा-नउ!!
२०, ३०, ... ६० - (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येकी वगळे शब्द
२१, २२, ... ३१,..., ६१.. - (मराठी / इंग्रजी सारख) XXवीस / twentyXXX,...
७० - soixante-dix, म्हणजे, साठ-दहा
७७ - soixante-dix-sept, म्हणजे, साठ-दहा-सात !!!
सर्वात विनोदी म्हणजे,
८० - quatre-vingts, म्हणजे, चार(पट)वीस
त्यामुळे,
९९ - quatre-vingts-dis-neuf, म्हणजे, चार(पट)वीस-दहा-नउ... ४*२०+१०+९ = ९९... Happy

हो, आकड्यांच्या बाबत घोळ आहे खरा. फक्त १२ चा आकडा तसा ओळखीचा वाटतो, कारण डझन हे douze वरून आलंय. वारांची नावं पण तशी सोम, मंगळ, बुध बर्‍यापैकी फॉलो करतात - Lundi (Lunar चा जो काही मूळ शब्द असेल त्याशी संबंधित), mardi (Mars), mercredi (Mercury). असंच पुढे ज्युपिटर, व्हीनस, सॅटर्न वगैरे. आता हे खरंच आहे की नाही माहीत नाही, पण लक्षात ठेवायला चांगलं आहे.

ही प्रतिक्रिया लिहिताना अजून एक गोष्ट आठवली. ती म्हणजे डावा आणि उजव्याला प्रतिशब्द. gauche आणि droit यावरूनच इंग्रजीतले गॉश (वेंधळा) आणि अ‍ॅड्रॉईट (कुशल, निपुण) हे शब्द आले असावेत. डावखुर्‍यांवर होणार्‍या भाषिक अन्यायाचा अजून एक मासला Happy

*अरेबिकमध्येही अननसाला तेच नाव आहे Happy

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

नंदन,
>>वारांची नावं पण तशी सोम, मंगळ, बुध बर्‍यापैकी फॉलो करतात
सहिच रे... हा विचार तर मी केलाच नव्हता!!

लेख चान्गला आहे. Canada मधे बोलतात ते फ्रेन्च जरा वेगले असते Canadian-French. स्पेनचे स्पेनिश आणि मेक्सिकोचे तसे.

धन्यवाद सानेश्.अजुन स्पेनबद्दल वाचायला आवडेल
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

मस्तंच आहे लेख.. पाच वर्षांपूर्वी फ्रेन्च शिकत होते. या गोड भाषेची साथ सुटली, पण माझं इंग्लिश कमालीचं सुधारलं- खासकरून उच्चार. हे म्हणजे संस्कृत शिकल्यानं मराठी किंवा उर्दू शिकल्यानं हिंदी सुधारण्यासारखं झालं, नाही का? असो.

फ्रेन्च म्हणजे मदर ऑफ इंग्लिश असल्याचंही काही मानतात (कित्येक शतकांपूर्वी इंग्लंडमध्येही फ्रेन्चच बोललं जात असे.) फ्रान्स म्हणजे कलावंतांची, रोमांचक गोष्टींनी भरलेली भूमी आहे असं मानतात. त्यामुळंच असेल कदाचित पण फ्रेन्चभोवती एक काहीसं गूढतेचं वलय आहे.

पण म्हणून फ्रेन्चची भीती बाळगण्यासारखंही काही नाहीय. जर फोनेटिक स्क्रिप्ट (लिपी)चा अभ्यास केला तर, फ्रेन्चही कळायला अवघड नाही, असं मला वाटतं. (आपली देवनागरी, ही त्याबाबतीत सर्वात प्रगत लिपींपैकी एक आहे हे मात्र खरं. त्यामुळं मराठी येणा-याला फ्रेन्च अवघड नाही वाटणार.)

खरंच, पुन्हा फ्रेन्चचा अभ्यास सुरू करावासा वाटतोय. थँक्स!

जान्हवी

Online फ्रेंच शिकता येईल असे एखादे संकेतस्थळ आहे का?

>> Online फ्रेंच शिकता येईल असे एखादे संकेतस्थळ आहे का?
बरीच आहेत, पण तुम्हाला खरंच भाषा शिकायची असेल तर शिकवणी लावलेली चांगली. तेथे शिक्षकांशी आणि इतर विद्यार्थ्यांशी होणारे संभाशण फार महत्वाचे ठरते.

फक्त तोंडओळख, मजा म्हणुन, hi-bye-thanks आणि आकडे-वार-महिने हवे असतील तर ह्या वेब-साईट आहेत,
http://www.bonjour.com
http://www.frenchtutorial.com/standard/
http://www.bbc.co.uk/languages/french/lj/menu.shtml

आम्ही बरेSच वर्षांपूर्वी क्वेबेक मधे गेलो होतो. मुले लहान होती. (आता ती तुमच्या सर्वांच्या पेक्षा मोठी झाली आहेत. ) एक वेळ पॅरिसमधे फ्रेंचखेरीज दुसरी भाषा बोलतील, पण क्वेबेकमधे कधीहि नाही!

आम्ही वाटेत एका लहान दुकानात थांबलो, नि इंग्रजीत विचारले, 'रेस्ट रूम कुठे आहे?' (आम्ही तोपर्यंत बरेचसे अमेरिकन झालेले असल्याने अमेरिकन जगात सर्वांना समजलेच पाहिजे, न समजेल तो मूर्ख असे आमचे मत बनले होते, शिवाय महाराष्ट्रीय स्वाभिमान होताच अंगात!) .

तर त्याने फ्रेंचमधे काहीतरी सांगितले पण रेस्टरूम कुठे आहे ते दाखवले नाही. त्यामुळे आम्ही फार चिडलो, नि खाण्यापिण्याचे पैसे न देता तिथून चालू लागलो! तो आमच्यामागून फ्रेंचमधून काहीतरी ओरडत बाहेर आला. आम्ही त्याला 'अबे तुझ्या नाना...' वगैरे अनेक शिव्या मराठीत दिल्या. शेवटी त्याने स्पष्ट अमेरिकनमधे म्हंटले पैसे द्या. मग आम्ही त्याला म्हंटले, रेस्टरूम दाखव, तिथे जाऊन येतो नि मग देतो! मुकाट्याने त्याने आमचे ऐकले.

मी पूर्वी जर्मन शिकलो होतो. आता मला परत भारतीय मराठी शिकायला आवडेल. त्यात बरेच शब्द इंग्रजी असतात ते जमतील, पण पंजाबी, उर्दू शब्द समजायला अवघड जाते. दुर्दैवाने भारतात जावेसे वाटत नाही!!

Happy Light 1

Pages