फ्रेंच भाषेबद्दल दोन शब्द...मराठीमधून!!

Submitted by सॅम on 16 March, 2009 - 10:28

काही कारणांमुळे फ्रेन्च भाषेतील काही विशेष स्वर (जे इंग्लिशमधे नाहीत) इथे लिहिता आलेले नाहीत. त्या ऐवजी e' (e-acute) , u` (u-grave) असं लिहिलं आहे.
----------------------------------------------------------------------
बोनजुर मादाम ए मिसिअर... (Bonjour Madam et Monsieur) अर्थात, नमस्कार सभ्य स्त्री-पुरुषहो,
फ्रेंच भाषा व लोकांबद्दल जगभरात (म्हणजे इंग्लिश बोलणार्‍यांमधे) बर्याच (कान)गोष्टी पसरलेल्या आहेत. त्यातीलच एक त्यांच्या भाषेबद्द्ल. फार गोड (खरं तर रोम्यांटीक) भाषा आहे म्हणतात. माझा व या भाषेचा कधी संबंध येइल असं वाटलं नव्हतं. पण जेंव्हा Long Term प्रोजेक्टसाठी फ्रांसला जायचं पक्क झालं तेंव्हा फ्रेंच शिकण ओघानं आलच.

मी काही फ्रेंचचा 'अभ्यास' केलेला नाही (आणि मराठीचाही!!) पण मला जो काही अनुभव आला ही भाषा शिकताना, तो इथे मांडण्याचा हा प्रयत्न!!

तशी ऐकायला ही भाषा खरोखरच मधुर आहे (तुम्हि म्हणालचं, मग मराठी काय मधूर नाही का?) पण शिकायला फारच अवघड, ते का ते पुढे येइलच. फ्रांसमधे कोणी इंग्लिश बोलतं नाही असं ऐकलं होतं... आता अनुभवही घेतला!! त्यांचपण बरोबर आहे म्हणा, सर्वांना फ्रेंच येत असेल तर दुसर्‍या कुठल्या भाषेत बोलायला ते मराठी थोडेच आहेत!! बरं ते जाउदे, मी विसरलोच की मला फ्रेंचबद्दल लिहायचय, मराठी बद्दल नाही... पण काय करणार, तुलना ही होणारच.

Champs-E'lyse'es
फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'.

आमच्या बाबतीतलाच एक अनुभव सांगतो, माझ्या फ्रेंच बॉसने 'शोंम्सेलिसे' नामक रस्त्याचे बरेच कौतुक केले (फ्रेंच लोक याला जगातला सर्वात सुंदर रस्ता म्हणतात... मला त्याच्या सौंदर्या बद्दल काही म्हणायचे नाही!!!). आम्हि त्याचे सौंदर्य पाहायला गेलो, पण आम्हाला तो रस्ता काही केल्या सापडेना, तिथेल्या सर्वात मोठ्या रस्त्याचे नाव होते, 'चाम्प्स्-इलिसेस'! दुसर्या दिवशी बॉसला हे सांगितल्यावर तो पण चकित. मग त्याच्या हा घोळ लक्षात आला, दोन्ही उच्चार त्याच रस्त्याचे होते, यानंतर तो जागेची नावं लिहिनुच देतो!!

तर सांगायची गोष्ट म्हणजे, आम्ही केला तो इंग्लिश उच्चार आणि बॉसचा होता फ्रेंच उच्चार (आणि बरोबरपण हे सांगायला नको). फ्रेंच उच्चारांच्या नियमांनुसार,
ch - श,
am - एम्,
*s e* - से (Liaison: साधारणत: शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर उच्चार करत नाहीत पण पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर स्वर असेल तर दोन्ही अक्षरे (व्यंजन + स्वर) मिळुन उच्चार करणे, याला 'लिएसाँ' चा नियम म्हणतात),
e' - ए
असे करुन Champs-E'lyse'es ला म्हणायचं 'शोंम्सेलिसे'!!!

आपल्याकडे कसं, 'क ला काना - का', एकदम सोप्प. फ्रेंचमधे मुळाक्षरं आणि त्यांचे शब्दातले उच्चार यांचा कधी कधी काहीच संबंध नसतो!! जसं 'y' ला 'इग्रेक' आणि 'W' ला 'डुब्लवे' म्हणतात पण शब्दात जर ही मुळाक्षरं आली तर त्यांचा उच्चार तसा होत नाही (इंग्रजी सारखाच होतो). दुब्ल वे म्हणजे डबल व्ही (अर्थात डब्ल्यू)

W ला ड्बल V म्हणतात यावरुन आठवलं, फ्रेंच आकडे पण मजेशिर आहेत.
१ ते १६- (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येक आकड्याला वेगळा शब्द
१७, १८, १९ - dix-sept, dis-huit, dis-neuf, म्हणजे, दहा(आणि)सात, दहा(आणि)आठ, दहा(आणि)नउ!!
२०, ३०, ... ६० - (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येकी वगळे शब्द
२१, २२, ... ३१,..., ६१.. - (मराठी / इंग्रजी सारख) XXवीस / twentyXXX,...
७० - soixante-dix, म्हणजे, साठ(आणि)दहा
७७ - soixante-dix-sept, म्हणजे, साठ(आणि)दहा(आणि)सात !!!
सर्वात विनोदी म्हणजे,
८० - quatre-vingts, म्हणजे, चार(पट)वीस
त्यामुळे,
९९ - quatre-vingts-dis-neuf, म्हणजे, चार(पट)वीस(आणि)दहा(आणि)नउ... ४*२०+१०+९ = ९९... Happy

spelling आणि उच्चार या बाबतीत स्पॅनिश लोकांना मानलं पाहिजे. 'फुटबॉल' चं spelling होतं, 'futbol' !! बार्सिलोनाच्या मेट्रोमधे पुढच्या स्टेशनचं नाव स्पिकरवर सांगतात, असं पॅरिस मेट्रोत करत नाहीत. पण मग वाटलं, जर तसं केलं तर spelling आणि उच्चार यांच्या तफावतीमुळे बाहेरच्या लोकांचा गोंधळच होइल.

हा घोळ इंग्लिश व फ्रेंच लिपी सारखी (Latin) असल्यामुळेपण होतो. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांचे उच्चार चांगले असतात (शब्द वाचता आला तर!!). आम्हि शब्द बरोबर वाचतो पण उच्चार चुकतो.

उच्चार सारखे आणि अर्थ वगळा:
ही भानगड इंग्लिश मधेपण आहे (dear-deer; meat-meet; right-write वगैरे) पण तशी कमी प्रमाणात (मराठी/हिंदीत अशी काही भानगड आहे का हो?) फ्रेंचमधे विचारुच नका...
- ou (किंवा), ou` (कुठे) : दोन्हिचा उच्चार 'ऊ'
- marche (चालणे), marche' (बाजार) : दोन्हिचा उच्चार 'मार्शे'
आणि आजुन बरेच!!

या सगळ्यामुळे माझा तर फारच गोंधळ उडतो... शाळेत असताना स्पेलिंग पाठ करायच्या नावानी बोंबच होती... मराठीत बरं होतं वेलांटी चुकीची असली तरी शब्द वाचता तरी यायचा (आणि अर्थपण बदलायचा नाही).. फ्रेंचमधे तर थोडं स्पेलिंग (किंवा उच्चार) चुकलं की अर्थ बदललाच! हे वरचेच शब्द पाहा ना,
ou (किंवा), ou` (कुठे)
marche (चालणे), marche' (बाजार)

आवाज का शब्दः
अजुन एक वैताग आणणारी गोष्ट म्हणजे, छोटे शब्द. २६ मुळाक्षरं अधिक accented स्वर असताना इतकी कंजुसी का? खालील काही उच्चार पाहा,
आ- a (to have चा एक form)
उ- ou (किंवा), ou` (कुठे)
ए- est (to be चा एक form), et (आणि)
ओ- eau (पाणी)
अं- un (इंग्लिश a सारखं)
ले- lait (दुध)
ने- n' (जन्म)

वरील सर्व गोष्टींमुळे फ्रेंच माणसाशी फ्रेंच बोलणं बरच अवघड होतं (तसं त्याच्याशी इंग्लिश बोलणही सोपं नाही!!). उच्चारातील थोडा फरकही त्यांना कळत नाही. ह्याचं कारण मला वाटतं की आपल्याला कसं कानडी/हिंदी/गुजराथी माणसांनी बोललेलं मराठी(?) पण आपल्याला कळतं तसं ट्रेनिंग ह्या लोकांना नाही मिळत. उत्तर आणि दक्षिण फ्रान्सच्या लोकांच्या उच्चारात बराच जरक आहे असं इथली लोकं म्हणतात (मला नाही माहित!) पण तो तर सोलापुर आणि नागपुरच्या मराठीतला फरक आहे!!

आता तुम्हि म्हणाल मी फ्रेंच भाषेबद्दल सगळच 'नकारात्मक' बोलतोय, पण तसं नाही, काही चांगल्या गोष्टीपण आहेत (मराठी सारख्या!!)

१. कर्ता महत्वाचा:
कर्त्याप्रमाणे विशेषण, क्रियापद सगळ बदलत. इंग्लिश सारख नाही...
विशेषणात इंग्लिश मधे good boy/good girl. मराठीत कसं चांगला मुलगा/चांगली मुलगी, तसच फ्रेंचमधे bon garcon/bonne fille.
आणि क्रियापदाबाबतीत म्हणाल तर, इंग्लिश मधे I go / you go / they go. पण मराठीत मी जातो / तु जातो(जाते) / ते जातात, तसच फ्रेंचमधे पण Je vais / vous allez / ils vont.

२. आदरार्थी बहुवचन
मराठी(तु-तुम्ही) / हिंदी(तुम-आप) प्रमाणे फ्रेंचमधेही आदरार्थी संबोधन आहे. मित्र/जवळची व्यक्ती असेल तर म्हणायच 'त्यु' (tu) आणि आदरणीय/अनोळखी व्यक्तिसाठी वापरायच 'वु' (vous). इंग्लिशसारख you-you नाही.

३. 'ते', 'तो' आहे का 'ती'?
इंग्लिशमधे बर्याचशा गोष्टी 'it' असतात. मराठीत तसं नाही. त्यामुळे अ-मराठी लोकं 'तो' का 'ती' मधे गोंधळतात आणि सरळ 'ते' म्हणुन मोकळे होतात. पण फ्रेंचमधे ती सोय नाही!!! इथे फक्त स्त्रिलिंग आणि पुल्लिंग (म्हणुनच बहुतेक हे लोक 'रोमँटिक' म्हणुन फेमस आहेत बहुतेक!!!). त्यामुळे नवीन शिकणार्‍याची पंचाइत होते. आता हेच पाहा, 'तो' रस्ता यामागे काही logic आहे? तो सवयीचा भाग आहे. लहानपणी अपोआप ते लक्षात राहातं. पण फ्रेंच शिकताना यामुळे फार त्रास होतो. वर सांगितल्याप्रमाणे विशेषण पण कर्त्याच्या लिंगावर अवलंबुन असल्यामुळे तर्क चुकला तर विशेषण पण चुकलच!

ह्या सर्व बाबी इंग्लिशपेक्षा विशेष आहेत, त्यामुळे आमच्या इथल्या फ्रेंच क्लासच्या बाई सारख या गोष्टी सांगत असतात, तेंव्हा त्यांना सांगावसं वाटत की माझ्या भाषेतही या खुबी आहेत!!!

बघितले फ्रेंच आणि मराठीतले साम्य!! या भाषा वाक्यातल्या प्रत्येक अवयवाला न्याय देतात. त्यामुळे इंग्लिश म्हणजे मी तर म्हणेन सोप्पी (simplified) फ्रेंच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. ज्यांना इंग्रजीशिवाय दुसरी भाषा माहिती नाही ते लोक फ्रेंच किंवा स्पॅनिश शिकताना स्त्रीलिंग अन पुल्लिंग यांचा फार ( म्हणजे फारच) बाऊ करतात.

फ्रेंच मधे कर्त्यानुसार क्रियापद पण बदलतं का - तो जातो, ती जाते वगैरे ? स्पॅनिशमधे क्रियापद बदलत नाही बहुतेक फक्त ते el किंवा ella बदलतं असं मी समजते

काय मस्त लिहीलेय.. लगेच फ्रेंच शिकावे असे वाटू लागले.
तसा नवरा शिकत होता.. दमला पण! उच्चार दमवतात जाम! Sad

फ्रेंच भाषेत कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलत नाही.

या प्रसिद्ध शॉम्सालिसेचं जो दासँ याने गायलेलं एक मस्त गाणं आहे..
http://www.youtube.com/watch?v=OAMuNfs89yE

मस्त लेख.. धन्यवाद Happy
मात्र फ्रेंच भाषेत 'ड' हा उच्चार नाही. त्यामुळे 'w' साठी 'दुब्लबे' असे हवे. Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

गेल्या वर्षी एक क्लांयट फ्रेंच होता. त्या अण्णाचे इंग्रजी काही झेपेना. दर आठवड्यात मंगळवारी ही गोची व्हायची. Happy मग मी त्याला मिटींग नोटस पण पाठवतजा असे सांगीतले. त्यावरुन मी काय समजायचो, आणि ते काय असायचे, ह्याचा गोंधळ निस्तरावा लागायचा. आठ महिने त्या माणसा सोबत काढले, विचित्र उच्चारांसहित.

(एकदा त्याने गंमतीत सांगीतले, "यु गाईज आर क्रेझी, झेड ला झी, झी काय लावलयं सारखं" मी म्हणलं अण्णा, मी पण तुमच्यातलाच आहे, झेड वाला, आता सवयीने झी झालोय. Happy

(थोडे विषयांतर झाले).

छान!
<<<फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'.

अगदी! मार्सेय्य, व्हर्साय, शॅटू, बोर्दू, मोलान रू... (हे उच्चार पण चूक असू शकतील.)
आमची चांगलीच दांडी उडाली होती. त्यांना आमचं इंग्लिश पण समजत नव्हतं. आम्हाला फ्रेंचमधलं ट्रेनचं टाईमटेबल वाचून आपण शिकलो ते मंडे....संडे इ. बद्द्ल शंकाच यायला लागली.
बार्सिलोना-स्पेन पुष्कळ बरे त्यामानाने. बरंच काही समजत बोललेलं.

<<<<फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'>>

खरं म्हणजे हे अजिबात बरोबर नाही. विशिष्ट स्वर व व्यंजनं एकत्र आली की त्यांचा उच्चार कसा होतो हे लक्षात आलं की उच्चार करणं अगदी सोपं आहे. या उच्चारांचे नियम बदलत नाहीत. इंग्रजीत 'but' , 'put' या शब्दांचे उच्चार वेगळे होतात. मात्र फ्रेंच भाषेत तसं नाही. उच्चाराचा नियम हा पाळला जातोच.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

नाही रे बाबा चिनूक्सा! मी फ्रेंचचा अगदी धसका घेतलाय. वेळ मिळाला तर इटालियन शिकेन म्हणतेय, आपलं अर्धं म्हणणं हातवारे करून तरी समजावता येईल.

<<सर्वांना फ्रेंच येत असेल तर दुसर्‍या कुठल्या भाषेत बोलायला ते मराठी थोडेच आहेत!! >>

यात मराठी माणसाने वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. मराठी लोक हे वसुधैव कुटुंबकम् व हे विश्वचि माझे घर असे मानतात. शिवाय ते किती हुषार आहेत, कुठलीहि भाषा किती लवकर शिकून बोलू शकतात, हे दाखवण्यासाठी ते मुंबई, पुणे इ. अस्सल महाराष्ट्रीय शहरांतदेखील मराठीचा वापर शक्यतो टाळून इतरच भाषा बोलतात.

असे सकारात्मक स्पष्टीकरण द्यावे, नकारात्मक लिहू नये. (ज्याला मराठीत positive outlook म्हणतात तसे असावे.)

दुसरे उदाहरण सकारात्मक स्पष्टीकरणाचे किंवा ज्याला मराठीत positive spin म्हणतात त्याचे: भारतातील रहदारी ही बेशिस्त नाही! रस्त्यावर माणूस येतो तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी, शक्यतो वेळच्या वेळी पोचण्यासाठी येत असतो, उगीच कायद्याचे निमित्त सांगून उशीर करायला नाही. शिवाय जनसंख्या खूप आह, त्या सर्वांनाच रस्त्याचा वापर करायचा असतो. म्हणून शक्यतो जमेल त्या पद्धतीने पुढे पुढे सरकत जाणे, व रस्ता इतरांना मोकळा करणे हेच बरोबर नाही का?

तर आता परत आपण सगळे फ्रेंच शिकण्याकडे वळू.

मला काही फ्रेंच भाषा अवगत नाही..आणि त्याची फारशी माहिती पण नाही...पण आपला लेख खूपच माहिती पुर्ण आहे...

मी असे ऐकले आहे की पुर्ण युरोप मधे, UK सोडले तर, बाकी कुठेही English बोलले तर लोक गुन्हा केल्यासारखे बघतात आणि बर्‍याच वेळेला French किंवा German भाषाच जास्त वापरली जाते...
हे कितपत खरे आहे??...थोडे विषयांतर आहे पण French भाषेचा विषय आला आहे म्हणुन बोलतो Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

मस्त लिहिलं आहे. फ्रेन्च शिकावीशी वाटायला लागली Happy
जगभरातल्या भाषांमध्ये स्पॅनिश (म्हणजेच एस्परांटो ना? का दोन्ही वेगळे?) शिकायला सर्वात सोपी म्हणतात.
तसंच मराठीही शिकायला अगदी सोपी, कोणीही अ-मराठी लवकर समजू, बोलू शकतो..
-----------------------------------
Its all in your mind!

खुपच छान लिहीलय
तरीपण थोडस सांगावस वाटतय Happy
(Bonjour Madam et Monsieur) अर्थात, नमस्कार सभ्य स्त्री-पुरुषहो >>>
माझ्या तोकड्या माहीतीनूसार 'Bonjour' म्हणजे सुप्रभात
संधी सोडवायचा झाला तर Bon + jour
Bon= सुंदर/
jour = दिवस
Bonjour= सुंदर दिवस
Bonnui = शुभ रात्र
Bonsware = सु संध्याकाळ
.
पण लेख मस्तच Happy

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

जर्मन पण काही बाबतीत अशीच आहे - कर्ता महत्त्वाचा, ते -तो - ती असे फरक, आणि आदरार्थी बहुवचनाबाबत. लिहिलं तसं वाचतात, त्यामुळे अर्थ काहीही समजला नाही, तरी जर्मन अस्खलित वाचू शकणारे लोक पण असतात Wink

जर्मनचा अस्सल इंगा कळतो 'relative sentences' मध्ये. एकदा सुरु झालेलं वाक्य डायरेक्ट पानाच्या शेवटीच संपतं!

केदार,
स्कँडिनेव्हिया आणि नेदरलँडमध्ये मध्ये बहुतांश लोकांना इंग्रजी येतं, आणि ते बोलायला तयारही असतात.
मध्य युरोपमध्ये भाषा आणि राष्ट्रीय अस्मिता घट्ट जोडलेल्या आहेत. आपली भाषा समजणारा माणूस तो आपला माणूस. त्यामुळे जर्मनी आणि फ्रांसमध्ये इंग्रजी येऊनसुद्धा वापरायला नाखूष असतात लोक. इटलीमध्ये बोलायची तयारी असली, तरी विशेष कुणाला येत नाही इंग्रजी.

बाकी युरोप विषयी माहित नाही.
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

एस्पेरांतो वेगळी. फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन आणि संस्कृताच्या मिश्रणातून बनलेली ती भाषा आहे. शिकायला फार कठीण नाही. महिन्याभरात उत्तम बोलता येते. www.lernu.net या संकेतस्थळावर ती शिकता येते.

bon soir (उच्चार - बोन्स्वार) म्हणजे good evening.
Bonjourचा अर्थ सुप्रभात असा असला तरी नमस्कार, hello या अर्थीसुद्धा वापर केला जातो.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

या फेंचांशी दोन वर्षे झटापट केली ना मी. नाते सुधारले ना मी. आता मला लिहिलेली थोडीफार समजते पण ऐकलेली ???
माझे एक्सेल चे संपूर्ण शिक्षण फ्रेंचमधून झाले !!!

वरील लेख खूप आवडला.. विशेषतः मराठी भाषेशी असलेलं साधर्म्य!

>फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'
अगदी २००% खरे आहे... व्यक्तीगत अनुभव. अर्थात जितकं जास्ती रोज बोलावं लागेल तितका सराव होतो अन थोडा कमी गोंधळ होतो इतकच..
>मी असे ऐकले आहे की पुर्ण युरोप मधे, UK सोडले तर, बाकी कुठेही English बोलले तर लोक गुन्हा केल्यासारखे बघतात आणि बर्‍याच वेळेला French किंवा German भाषाच जास्त वापरली जाते...
हे कितपत खरे आहे??...
हेही १००% खरे आहे.. दोन महिने होतो युरोपात. तरिही त्या छोट्या कालावधितही ते जाणवलं. किम्बहुना, जर्मनी मधे तर इंग्रजी बोललात तर घोर पाप केल्यागत बघतात असा अनुभव आला. इतरही युरोपियन देशात कमी अधिक फरकाने तोच अनुभव आला. फ्रांस मधे तर फारच अडचणीत आलो होतो, हातातील नकाशा अन दूरून दिसणारा eifel tower केवळ या बळावर बर्‍याच दिशा, स्थानके अन ठिकाणे यांचे माग शोधले होते. फ्रांस मधे जर्मन बोलणारे कमीच दिसले.
आमच्या टिम मधे रोमानियाची बया होती.. तीच धड ना इंग्रजी धड ना जर्मन.. (मूळ रोमानियन भाषा वेगळीच आहे म्हणे). तेव्हा बरेचसे संवाद अगदी विनोदी होत असत.
आपल्याकडे "साहेबाच" इंग्रजी शिकले असल्याने अमेरीकेतही विशेषतः technical writing मधे त्रास व्हायचा. colour, labour, च्या जागी color, labor वगैरे.. "रबर" या मराठी, इंग्रजी शब्दावरून अमेरी़केत भयाण विनोद झालेले आहेत .. Happy
देश विदेशातील अनेक ठिकाणी जर signs बंधनकारक नसत्या तर अगदी कुठल्या प्रसाधनगृहात वा शौचालयात जायचे इथपासून समस्या उद्भवल्या असत्या नाही! काही ठिकाणी भाषेपेक्षा "चित्रांना" पर्याय नाही हेच खरे! (तरीही युरोपात कुणिही कुठेही काहीही "करतात" तो भाग वेगळा) Happy

उत्तम लेख! Happy
छानच जमलाय.. मजा आली वाचताना!

एवढ्यातेवढ्या कारणाने लगेच आपली भाषा सोडून देऊन दुसरी भाषा जवळ करणे (आणि वर त्याचा अभिमान बाळगणे!) यात माझ्या मते सार्‍या जगात भारताचा आणि सार्‍या भारतात आपल्या मराठी लोकांचा पहिला क्रमांक लागेल.. मराठी भाषेचं याहून दुर्दैव ते कोणतं?

असो, निदान युरोपातील "प्रगत" राष्ट्रांची ही उदाहरणे ऐकून तरी आपले "अनुकरणप्रिय" बांधव काही धडा घेतील एवढीच आशा..

पुन्हा एकदा लेखाबद्दल अभिनंदन!

अरे बाबरे एवढा चांगला जमलाय लेख!! सर्वांचे धन्यवाद!!

chinoox
चांगलच फ्रेंच येतं वाटतं आपल्याला. दासँ च्या गाण्याबद्दल धन्यवाद. अशी सोप्पी गाणी भाषा शिकायला बरीच मदतीची ठरतात. मला खालिद (दिदी फेम)च्या आइशा मुळे बरेच शब्द लक्षात राहिले.
<<खरं म्हणजे हे अजिबात बरोबर नाही>>
बरोबर आहे तुमचं. एकदा नियम कळाले की उच्चार सहसा चुकत नाही, पण वरती म्हणल्या प्रमाणे घोळ होतो कारण इंग्लिश आणि फ्रेंच लिपी सारखी आहे आणि इंग्लिश बहुतेक सर्वांना येते! त्यामुळे आपण इंग्लिशसारखा उच्चार करायला जातो (आणि तिथेच चुकतो).

bhagya
बार्सिलोना-स्पेन पुष्कळ बरे त्यामानाने>>
हो माझापण हाच अनुभव आहे.

zakki
बरोबर बोललात (मराठीतुन, ekdam correct)

kedar123
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
'Bonjour' म्हणजे सुप्रभात पण 'Hello' याअर्थीपण वापरतात.
संधी सोडवायचा झाला तर>> हा हा... फ्रेंच मधे संधी!
Bonjour = सुंदर दिवस>> चुक, सुंदर (चांगला) दिवस (good day) म्हणजे bonne journee (दिवस स्त्रिलिंगी आहे म्हणुन bonne (bon नाही))

gouri_bargi
<<जर्मनचा अस्सल इंगा कळतो 'relative sentences' मध्ये.>>
जर्मनमधे संस्कृतप्रमाणे बरेच शब्द एकत्र येउ शकतात का? कधी कधी फार फार मोठे शब्द बघतो मी.
आपल्याला जर्मन येत असेल तर थोड वाचायला अवडेल.

Mandar_Kamalapurkar
<<युरोपातील "प्रगत" राष्ट्रांची ही उदाहरणे ऐकून>>
मला वाटतं भारतीयांच्या मते "प्रगत" ("अनुकरणीय") राष्ट्र म्हणजे अमेरिका! फ्रान्सबद्दल काही माहिती देखिल नाही भारतात (Eiffel Tower सोडुन). इथल्या बर्याच गोष्टी अनुकरणीय आहेत. अजुन लेख लिहायचा विचार आहे, त्यात येतिलच काही गोष्टी.

>> आमच्या बाबतीतलाच एक अनुभव सांगतो, माझ्या फ्रेंच बॉसने 'शोंम्सेलिसे' नामक रस्त्याचे बरेच कौतुक केले (फ्रेंच लोक याला जगातला सर्वात सुंदर रस्ता म्हणतात... मला त्याच्या सौंदर्या बद्दल काही म्हणायचे नाही!!!). आम्हि त्याचे सौंदर्य पाहायला गेलो, पण आम्हाला तो रस्ता काही केल्या सापडेना, तिथेल्या सर्वात मोठ्या रस्त्याचे नाव होते, 'चाम्प्स्-इलिसेस'! दुसर्या दिवशी बॉसला हे सांगितल्यावर तो पण चकित. >>

अगदी जस्साच्या तस्सा अनुभव मी पॅरिसमधे शॉर्ट टर्म प्रोजेक्टवर असताना घेतलाय Happy

फ्रेंच भाषा साधारणतः किती दिवसात शिकता येते??
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

chinya1985
फ्रेंच भाषा साधारणतः किती दिवसात शिकता येते??>>
मी तस ठामपणे नाही सांगता येत, माझं सांगतो, अठवड्याला ४ तास असं २ महिन्यात प्रार्थमिक व्याकरण आणि थोडाफार शब्दसंग्रह इतकं आलं (पुण्यात इथे क्लास लावला होता). पण फ्रेंच माणसाशी संवाद करण अजुन येत नाहिये (पॅरिसमधे राहुन ६ महिने झाले)

६ महिन्यात फ्रेंच व्यवस्थित येउ लागल का???इंग्रजीशी साम्य आहे का फ्रेंचच???
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या,
कोणत्याही भाषेत संवाद साधण्यासाठी लागणारा वेळ व्यक्तिपरत्वे बदलतो. साधारणपणे सहा महिन्यात जुजबी फ्रेंच बोलता येतं. अर्थात रोज बोलण्याचा सराव असेल तर.

इंग्रजी व फ्रेंच या दोन्ही भाषांत अनेक शब्द समान असले तरी त्यांचे उच्चार अतिशय वेगळे असतात. उदा., इंटरनॅशनल हे इंग्रजी तर अँतरनासिओनाल हे फ्रेंच. त्यांचं स्पेलिंग मात्र सारखंच. व्याकरणातही बरीच समानता असली तरी फ्रेंचचा लहेजा वेगळा असल्याने तुलना होऊ शकत नाही.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

बरोबर चिनुक्स.
मी आता ६ महिन्यानंतर, आधी विचार करुन १-२ वाक्ये बोलु शकतो. पण संवाद करायचा असेल तर समोरच्या माणसाचे समजले पाहिजे (बरिच लोकं फ्रेंच फार भरभर बोलतात) त्यामुळे फ्रेंच ऐकण्याचा सराव करायचा असेल तर मी फ्रेंच बातम्यफ्रेंच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शब्दसंग्रह.
...तसा मी भाषा विषयात कच्चाच आहे (लहानपणापासुन!)
तरी न हार मानता झुंजत राहायचं फ्रेंच येइपर्येंत! (इथे जीव जाण्याचा संभव नाही, हि लढाइ सेफ आहे!!)

मराठी भाषेत ज्या फळाला पाईनअ‍ॅपल म्हणतात, त्याला फ्रेंच भाषेत अननस म्हणतात. Proud

जर्मन मध्ये पण अननस म्हणतात.

समीर, बरोबर आहे तुमचं निरीक्षण - जर्मन भाषेत मोठे मोठे सामासिक शब्द भरपूर वापरतात. जी गोष्ट सांगायला इंग्रजीमध्ये आपण एक वाक्य - किमान एक clause वापरू, ती जर्मन मध्ये एकाच लांबलचक शब्दात सांगतात, आणि एका इंग्रजी उतार्‍याचं तिथे एक वाक्य बनतं ...
Atom म्हणजे atom
Atomkraft म्हणजे nuclear power
Atomkraftwerk म्हणजे nuclear power station
Atomkraftwerkmitarbeiter म्हणजे worker in nuclear power station
... अजूनही पुढे वाढवता येईल हा शब्द Happy

फ्रेंचमध्ये पण अशीच परिस्थिती आहे का? पॅरिसविषयी, फ्रान्सविषयी अजून अनुभव वाचायला आवडतील तुमचे.

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

गौरी यावरुन आठवले hochzeit याचे मी hoch म्हणजे उंच, zeit म्हणजे वेळ त्यामुळे मी त्याचा अर्थ उंच वेळ थोडक्यात high time असा काढला होता. नंतर कळले hochzeit की म्हणजे लग्न Happy

वा मस्त जमलाय लेख. माझे सध्या स्पनिश शिकायचे प्रयत्न चालु आहेत.:)वरती psg ने म्हटल्याप्रमाणे सोपी आहे spanish इतर भाषा पेक्षा.
...........................................................................................
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन. Proud

Pages