नास्तिक असणे एक शाप असतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 September, 2017 - 17:38

काल सकाळी दिवस उजाडलाच ते एक टेंशन घेऊन. मी काम करत असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये एक गोंधळ झाला होता. काही लाख युरोंचा क्लेम येण्याची शक्यता दिसत होती. ज्यात चूक कोणाची म्हणून पाठपुरावा करायचा झाल्यास सारी बोटे माझ्याच दिशेने येऊन थांबली असती. आणि ती चूक माझीच होती. छोटीशीच होती, थोडासा धांदरटपणा, थोडा हलगर्जीपणा. पण त्याचे परीणाम फार मोठे होते. जर युरोचे रुपयांत गुणोत्तर मांडले तर मला आयुष्यभर याच कंपनीत फुकट राबावे लागले असते ईतके मोठे.

सकाळचा चहा माझ्या घश्याखाली एवढ्यासाठीच उतरला की अजून त्या गोंधळाचा मेल तीन लोकांच्या बाहेर गेला नव्हता. तातडीने प्रोजेक्ट मॅनेजरने संध्याकाळी एक ईंटरनल स्काईप मिटींग ठेवली. ज्यात एक मी, दुसरे माझे सर, तिसरा तो प्रोजेक्ट मॅनेजर स्वत: आणि क्लायंटची दोन वरच्या लेव्हलची माणसे असे पाचच जण असणार होते. त्या मोठ्या लोकांसमोर काय घोळ झालाय, कश्यामुळे झालाय, कोणामुळे झालाय, हे सारे मलाच सांगावे लागणार होते. त्यानंतर आम्ही सर्व मिळून तो घोळ कसा निस्तरावा याची चर्चा करणार होतो.

दुपारचे जेवण एवढ्यासाठीच घश्याखाली उतरले की माझ्या बॉसने मला सांगितले की वाईटात वाईट म्हणजे तुझी नोकरी जाईल. "यूह कॅन लूज युअर जॉब !".. पण पैश्याचा क्लेम आल्यास कंपनीचा इन्शुरन्स असतो. नुकसानभरपाईसाठी कोणी तुझी कॉलर धरणार नाही.

नोकरी गेली अशी मनाची तयारी केल्यावर जेवण तर घश्याखाली उतरले. पण पोटात ढवळू लागले. दुपारी मी नेहमी जेवल्यावर एकटाच वॉल्कला जातो. हल्ली अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढल्याने ही चांगली सवय लावली आहे. दहा मिनिटे चालतो, दहा मिनिटे एका बाकावर बसतो, दहा मिनिटे पुन्हा परतीचे चालून ऑफिसला पोहोचतो. टोटल अर्धा तास. आज मात्र दोन मिनिटे चालत होतो, दोन मिनिटे बसत होतो. फार काळ स्वस्थ बसता येत नव्हते. दोन मिनिटांनी पुन्हा उठून चालत होतो. चालता चालता डोक्यात त्याच नकारात्मक विचारांना पुन्हा चालना मिळत होती आणि डोके शांत करायला पुन्हा दोन मिनिटे बसत होतो. बसल्यावर पुन्हा दोनच मिनिटांत, ‘आपण असे हातावर हात धरून स्वस्थ बसूच कसे शकतो’ या विचाराने, या भितीने उठून पुन्हा चालत होतो. अगदी वेडा झालो होतो. "आता पुढे काय?" हे विचार डोक्यात येताच छातीतील धडधड वाढत होती. पण ते विचार थोड्याच वेळात प्रत्यक्षात घडणार असल्याने डोक्यातून काढूनही टाकता येत नव्हते.

एखाद्या वडिलधार्‍या माणसाने पाठीवर आश्वासक थोपटावे, आईने कुशीत घ्यावे, गर्लफ्रेंडने ‘सारे काही ठिक होईल रुनम्या’ म्हणत हात हातात घ्यावा, असे आणि बरेच काही वाटत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही आता माझ्या जवळ नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रोज मी एक ते दिड फेरफटका मारतो, पण आज दोन वाजत आले तरी ऑफिसबाहेरच होतो. ठिक पाच वाजता मिटींग होती. पण मला आज पाच वाजूच नये असे वाटत होते. शेवटी सर मला शोधत बसतील आणि जागेवर न दिसल्यास आणखी चिडतील म्हणून नाईलाजाने उठलो आणि पावले ऑफिसच्या दिशेने वळली.

आता पर्यंत ऑफिसमध्ये सर्वांना हे समजून गोंगाट झाला असेल का? लंचटाईममध्ये सोबत जेवताना सरांनी सेक्शन मॅनेजरला याबद्दल सांगितले असेल का? ऑफिसमध्ये पाय ठेवताच मला केबिनमध्ये बोलावणे येईल का? कोणाच्या नजरेत सहानुभुती असेल, कोणाच्या नजरेत कुत्सितपणा, कोण अरेरे म्हणत असेल, कोण म्हणत असेल बरे झाले जिरली याची... एखाद्या फाशीच्या कैद्याला वधस्तंभाकडे जाताना जे काही वाटत असेल अगदी तसेच मला ऑफिसमध्ये परतताना वाटत होते. पावले जड होत होती, छातीतील धडधड कुठल्याही क्षणी मी हार्ट अ‍ॅटेक येऊन जमिनीवर कोसळेन ईतकी वाढली होती. मला खरेच त्याक्षणी गरज होती ती कुठल्यातरी मानसिक आधाराची. अजून काही वेळ ही धडधड अशीच राहिली तर माझी छाती फाडून बाहेर येईल. नाही नाही, नोकरी जाईल ते परवडले.. पण जीव नाही गेला पाहिजे.. माझी आई, माझे बाबा, माझी गर्लफ्रेंड... माझे कित्येक मित्र.. या सर्वांना मी हवा आहे. आयुष्यात आलेला हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. आज आहे तर उद्या नसेल. मी मात्र असलोच पाहिजे. ही छातीतली धडधड कमी झालीच पाहिजे. सारे काही समजंसपणाचे सुचत होते, पण ती धडधड त्या विचारांनी काही कमी होत नव्हती. कारण मी स्वत:च स्वत:ला मुर्खासारखा धीर देतोय हे जाणवत होते. आयुष्य फार किंमती आहे हे माझ्या मनात येणारे विचार अगदी बरोबर असले तरी माझे मीच मला पटवून देऊ शकत नव्हतो. येणार्‍या संकटाशी लढायची हिंमत, मानसिक बळ मला कुठूनही मिळत नव्हते, आणि अश्यातच त्याची आठवण झाली...

हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून गौरवल्या गेलेल्या परमेश्वराची. सर्व शक्यतांचा विचार करता आता एखादा देवाचा चमत्कारच मला यातून बाहेर काढू शकत होता. पण जगात देव नाही यावर माझा ठाम विश्वास असल्याने तसे होणार नाही हे देखील मला माहीत होते. आणि अचानक मला फार वाईट वाटले. कारण आज जर माझा देवावर विश्वास असता, तर त्याचा मी धावा केला असता. त्याला साकडे घातले असते. आणि अद्रुश्य रुपात तो आपल्या पाठीशी उभा आहे असा विश्वास स्वत:ला मिळवून दिला असता,. आणि भले प्रत्यक्षात कोणीही देव नसला तरी, निव्वळ त्या देवावरच्या विश्वासाने माझ्या छातीतील धडधड नक्कीच कमी झाली असती.
एक क्षण असेही वाटले की हीच योग्य वेळ आहे देवावर विश्वास ठेवायची. आज आत्ता ताबडतोब, बोलूयाच देवाला नवस. आणि ठेवूयाच त्यावर विश्वास. घेऊया तर आज देवाची परीक्षा. काढ मला या संक्टातून बाहेर. मग मानतो तुला...
पण मुळातच विश्वास नसल्याने उगाच आव आणून खोटा विश्वास भासवण्यात अर्थ नव्हता. कारण ते स्वत:लाच पटणारे नव्हते. स्वत:च स्वत:ला असे फसवता येत नाही. थोडक्यात छातीतली धडधड काही कमी होणार नव्हती. आणि ती शेवटपर्यंत झाली नाहीच.

आजवर मी समजायचो की नास्तिक लोकं म्हणजे फार डेअरींगबाज. त्यांना देव नावाच्या कुबड्यांची गरज पडत नाही. पण आज मला समजले, संकटात सापडले की ज्याची गाळण उडायची त्याची ती उडतेच. मग आस्तिक असो वा नास्तिक. फरक ईतकाच, की आस्तिक लोकं देवाचा जप करत मन:शांती मिळवतात. पण त्याचवेळी नास्तिक विचारांचा माणूस छातीतील धडधड टाळू शकत नाही. भले देव जगात नसला तरीही आस्तिकांना मिळणारी मन:शांती मात्र खरीखुरी असते. पण तीच नास्तिक ईतक्या सहजी मिळवू शकत नाही. खर्रंच, नास्तिकत्व हा एक शाप असतो.

__________________________________________

लेख ईथेच संपला, पण किस्सा अनुत्तरीत राहायला नको.

__________________________________________

छातीतल्या त्याच धडधडीसह मी ऑफिसला पोहोचलो. क्लायंटची माणसे संध्याकाळी हजर राहू शकत नसल्याने मीटींग दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ठेवण्यात आली असे समजले. छातीतली धडधड तात्पुरती थांबली. दुसर्‍या दिवशी म्हणजे आज पुन्हा एकदा ती मिटींग तासभर पुढे ढकलली गेली. अखेर सहा वाजता एकदाची झाली. अर्ध्या तासांतच संपली. निव्वळ आश्चर्यकारकरीत्या मी यातून सहीसलामत सुटलो. या आधी मला कल्पना नसलेली काही नवीन माहीती समोर आली, ज्यानुसार फार मोठा आर्थिक फटका बसला नव्हता. आणि जो थोडाथोडका बसला होता त्यात माझी एकट्याचीच चूक नव्हती, थोडीफार क्लायंटचीही चूक असल्याचे पुढे आले. तसेच माझी चूक देखील "बडे बडे प्रोजेक्ट मे ऐसी छोटी छोटी गलतिया होती रहती है" म्हणून सोडून देण्यासारखी होती.

मिटींग संपल्यावर मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मी तसाच बॉसच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांच्यासमोर केवळ एक समाधानाचा सुस्कारा टाकून परत आलो. एकीकडे आनंद होत होता, तर दुसरीकडे मनात विचार येत होते.. जर मी काल देवावर विश्वास ठेवायचा असे ठरवून त्याचे नामस्मरण केले असते, तर आजच्या चमत्कारानंतर माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला असता. आणि कदाचित ते चांगलेच झाले असते. कारण नास्तिक असणे हा शाप असतो हे मला काल उमगले होते.

- समाप्त -

ईतर नास्तिकांनी आपापले विचार झरूर मांडा
शुभरात्री शब्बाखैर....
शुक्रिया,
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफ, Lol
पण लिहीलंय भारी! नेहेमीसारखाच ऋन्मेषटच दिलाय...

धन्यवाद रेव्यु,

च्रप्स, स्टोरी Happy
हा देखील नास्तिक लोकांना असलेला एक शापच झाला.
हेच जर मी आस्तिक असतो आणि हाच अनुभव मला आलेला देवाचा अनुभव म्हणून लिहिले असते तर तुम्हाला एकतर ते खरे वाटले असते किंवा खरे वाटले नसते तरी त्याला असे स्टोरी बोलून माझ्या भावनांना दुखावले नसते.
पण नास्तिकांना भावना नसतातच असा एक सर्वसाधारण समज असतो Happy

मी वयाच्या १७ व्या वर्षी नास्तिक झालो .तेव्हापासून आजपर्यंत मला देव नावाच्या कुबड्यांची गरज पडलेली नाही.
अगदी परवाच मला खूप अस्वस्थ वाटून बीपी शूट झाले होते,श्वास सोडताना जीव जातोय कि काय असे वाटत होते.कदाचित माईल्ड ॲटॅक होता .खुप घाबरलो होतो पण देव नावाचं काहीच त्यावेळी आठवलं नाही ,हार्डकोअर रॅशनल असावे लागते यासाठी.
तुझ्याबाबतीत सांगायचे तर तुला पॅनिक ॲटॅक आला होता.नेटवर panic attack सर्च करुन बघ.

वाच रे ऋ बाळा.
http://www.independent.co.uk/news/science/atheists-more-intelligent-than...
The theory — called the 'Intelligence-Mismatch Association Model' — was proposed by a pair of authors who set out to explain why numerous studies over past decades have found religious people to have lower average intelligence than people who do not believe in a god.

http://www.independent.co.uk/news/science/atheists-more-intelligent-than...
The researchers also examined the link between instinct and stress, emphasizing that people tend to operate on instinct during stressful times, for instance, turning to religion during a near-death experience.
The researchers argue that intelligence helps people rise above these instincts during times of stress.

ऋन्मेष छान लेख,
मागे दर आनंद नाडकरणींचे एक पुस्तक वाचले होते,
त्यांत त्यानी REBT पद्धतीबद्दल सांगितले आहे,
कोणत्याही परिस्थितीच्या परिणामांचा पूर्ण स्पेक्ट्रम आपण मनात पाहायचा,
सुखांत पिक्चर म्हणजे कोणालाही काहीही फटका न बसता प्रॉब्लेम सुटला,
सगळ्यात भयंकर शेवट म्हणजे तुझी नोकरी जाणार.
फायनल औटकम या दोन शक्यतांचा मध्ये कुठे तरी असेल.

जर तू (कोणीही) हा 2 टोकाचा स्वीकार केला तर मधला कोणताही औटकम काय असेल याची टेन्शन येण्याचे करण राहणार नाही.
पर्यायाने देवाची आठवण येणार नाही Happy

शक्य असल्यास स्वभाव-विभाव, आणि विषादयोग ही पुस्तके वाच.

इथे भारंभार धागे काढायचे आणि इतरांनी काढलेल्या धाग्यांवर जाऊन भारंभार प्रतिसाद द्यायचे थांबवून कंपनीच्या कामात , ज्यामुळे रोजीरोटी मिळते , त्या कामात लक्ष घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवला तर अशा चुका सहज टाळता येतील. मग आस्तिकांनी आपल्यासाठी देवाला वेठीला धरायचा किंवा नास्तिकांनी मी देव मानतच नाही मग आता फक्त आपले बिपि जितके वाढेल तितके बघू म्हणायचा प्रसंगच येणार नाही.

देव आहे रे बाबा... या जगात खरेच देव आहे. नाहीतर तुमची नोकरी गेली असती आण परिणामी इथे मायबोलीकरांना तुम्हाला फुल्लटाईम झेलावे लागले असते. या संकटातून समस्त मायबोलीकर थोडक्यात वाचले हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीये.

इथे ' देव' सन्कलपनेची व्यख्या देणे आवश्यक आहे.
एक मुलगा आईबरोबर देवळात जातो. मित्र त्याला विचारतात की त्याचा देवावर विश्वास आहे का तर तो
म्हणतो " नाही, पण माझा आईवर विश्वास आहे, व माझी देव तीच आहे त्यामुळे मी तिच्यासाठी देवळात गेलो"

If we use the gauge of 'religiousness' used by 'independent'( of UK) research, we have to say that saints and great people like Dnyaneshwar and Ramdas had ' low average intelligence.
Of course that is difficult to buy. I think no rational thinker would buy that.

रामदास धार्मिक होते असे अजिबात म्हणता येणार नाही,
रादर ते तेव्हच्या धर्माच्या चौकटीत राहून " देवांक काळजी"
देव सगळे पाहून घेईल या संकल्पनेचा विरोधच केला होता असे वाटते.

इथे ' देव' सन्कलपनेची व्यख्या देणे आवश्यक आहे.
एक मुलगा आईबरोबर देवळात जातो. मित्र त्याला विचारतात की त्याचा देवावर विश्वास आहे का तर तो
म्हणतो " नाही, पण माझा आईवर विश्वास आहे, व माझी देव तीच आहे त्यामुळे मी तिच्यासाठी देवळात गेलो" >>>> +11111

माझेही असेच आहे, माझा देवावर विश्वास नाही, पण मम्मीसोबत सगळ्या मंदीरात जाते, नमस्कार पण करते.

अजून तर बरच काही पहायचय तुला. जेव्हा तुझ्या मेंदुला देव या संकल्पनेची खरोखर गरज वाटेल त्यावेळी ती प्रतिक्षिप्तपणे स्वीकारली जाईल. तोपर्यंत विज्ञान आहेच. एकदा अस्तिक हा कायमचा अस्तिक नसू शकतो तसेच नास्तिक वा अज्ञेयवादाचे आहे

त्रन्मेष, मानवी समुहातल्या चाणाक्ष लोकांनी स्वताच्या स्वार्थासाठी राबवलेली संकल्पना म्हणजे देव व कर्मकांडे. या भानगडीत न पडता तु स्वच्छंदी जिवन जगतो हे अनुकरणिय आहे.

पगारे धन्यवाद, आणि हो. नास्तिक असणे शाप असे मला त्या क्षणाला वाटले तरी मला शेवटपर्यंत माझे नास्तिकत्वच जपायचे आहे. किंबहुना या घटनेनंतर मला समजले की मी आस्तिक बनूच शकत नाही.

नेटवर panic attack सर्च करुन बघ.
>>>>>
सिंजी धन्यवाद, आपले अश्या गोष्टींचे वाचन बरेच आहे. शोधतो मी नंतर. माझ्याबाबत असे बरेचदा होते. दुर्दैवाने मी अश्या क्षेत्रात शिक्षण घेतलेय ज्यात मला रस नाही आणि त्यामुळे बिन आवडीचे काम करावे लागतेय ज्यात मी एक्स्पर्ट नाही. त्यामुळे असे प्रसंग बरेचदा घडतात माझ्याशी.

सोनू, ईंग्लिश Happy

बाकी, religious people to have lower average intelligence than people who do not believe in a god. हे फार स्फोटक विधान आहे. बरे झाले ईंग्लिशमध्ये लिहिलेत त्यामुळे फार लोकांना समजले नाही. अन्यथा धागा पेटला असता Happy

जर तू (कोणीही) हा 2 टोकाचा स्वीकार केला तर मधला कोणताही औटकम काय असेल याची टेन्शन येण्याचे करण राहणार नाही.
>>>>>>
सिम्बा, येस.
कदाचित असे असावे, मी मनाची समजूत काढायचा प्रयत्न करत असलो की फार तर माझा जॉब जाईल तरी मी त्यासाठी तयार नव्हतो.
तसेच त्या अंतिम परीणामासोबत ती मानहानीकारक वा अपमानास्पद प्रोसेस देखील मला टेंशन देत असेल.

एक सहज आठवलेले उदाहरण, कदाचित याच्याशी रिलेट होऊ शकते.

कॉलेजात असताना पास संपल्यावर बरेचदा बिनधास्त विदाऊट तिकीट प्रवास केलाय. आता चुकूनही करत नाही. पण जेव्हा कधीतरी ट्रेनमध्येच अचानक समजते की अरे आपला पास संपला आहे तर एवढे टेंशन येते, एवढे टेंशन येते की बस्स विचारू नका..
जरी मी मनाला पटवले की फार तर शेपाचशे रुपयांचा फाईना काय तो होईल तरी टेंशन येतेच.
यालाही दोन कारणे असू शकतात.
एक म्हणजे जरी मनाला समजावले तरी अक्कलखाती पाचशे रुपये घालवायला मन तयार होत नाही.
दुसरे म्हणजे टिसीने आपली व्हाईट कॉलर पकडणे, त्यात ऑफिसमधील कोणी पाहिले तर डबल बदनामी, ज्याची मनाला धास्ती वाटत असावी.

मी पण आस्तिक आहे पण काय करू ज्या बाबा ला फोल्लो करायला जातो तो जेल मधेच जातो... दर 6 महिन्याला बाबा आणि अम्मा बदलाव्या लागतायत..

धागा पेटणे वगैरे काही नाही. हे वाच, मग असे गैरसमज होणार नाहीत.

>> 'नास्तिक व्यक्तींचा आयक्यू अधिक असतो, याचा अर्थ आस्तिक व्यक्ती मूर्ख असतात, असा अर्थ माझ्या संशोधनातून काढण्यात येऊ नये. धर्म आणि आस्तिकतेतून व्यक्तीला आत्मविश्वास तसेच अन्य काही बाबी मिळतात. मात्र जास्त आयक्यू असलेल्या व्यक्तीकडे त्याच्या वैचारिक क्षमतेमुळे या बाबी आधीच असतात. त्यामुळे त्याला कदाचित त्याची गरज नसू शकते.' <<

http://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/-/article...

आस्तिक हा सुशिक्षित असु शकतो पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता त्यात नसते.पुराणांना तो कवटाळतो इसापनितीला लाजवतील अशा कथांवर तो विश्वास ठेवतो प्रतिप्रश्न
विचारण्याची सोडा त्याबाबत विचार करण्याबाबतही तो मानसिकद्रुष्ट्या पंगु असतो.

आता महात्मा फुले किंवा गाडगेमहाराज हे लौकिकद्रुष्ट्या शिक्षितमध्ये मोडत नाहित पण त्यांचे विचारच इतके क्रांतिकारी आहेत की स्वताला तथाकथित सुशिक्षित समजणारे हे त्यांच्यापुढे साफ निष्प्रभ ठरतात.

आपल्या देशात बालपणीच श्रध्देचे इंजेक्शन देउन मुलांना मानसिकद्रुष्ट्या पंगु केले जाते.

इथे भारंभार धागे काढायचे आणि इतरांनी काढलेल्या धाग्यांवर जाऊन भारंभार प्रतिसाद द्यायचे थांबवून कंपनीच्या कामात , ज्यामुळे रोजीरोटी मिळते , त्या कामात लक्ष घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवला तर अशा चुका सहज टाळता येतील.
>>>>>
साधनाजी, म्हटले तर हा अवांतर प्रतिसाद आहे, कारण माझ्या किंवा कोणाच्याही कामात होणार्‍या चुकांबद्दल हा लेख नाही. पण विषय निघालाच आहे तर सांगू ईच्छितो की माझ्या ऑफिसचे टेंशन मी घरी घेऊन जात नाही, घरचे मायबोलीवर घेऊन जात नाही, आणि मायबोलीचे ऑफिसकामामध्ये मिसळत नाही. सगळीकडे मी माझ्या शेड्यूल, टाईमटेबल, आणि प्रायोरीटीनुसार स्विच ऑन / स्विच ऑफ होतो. ते देखील अगदी सहज होतो.
उदाहरणादाखल आताचेच घ्या ना. दिवसा वेळ मिळताच येथील प्रतिसाद वाचून घेतले. प्रतिसाद द्यायला हात शिवशिवले तरी लंच टाईमचा साडेसात मिनिटांचाच वेळ माबोसाठी दिला असल्याने ईथे काही लिहिले नाही. नंतर कामाच्या नादात मायबोली म्हणून काही माझ्या आयुष्यात आहे हे देखील विसरून गेलो. मग घरी गेल्यावर चहापाणी करत फॅमिलीला वेळ दिला. आता जो तो आपल्या कामाला लागल्यावर एका निवांत क्षणी ईथे एकेक प्रतिसादांना उत्तर देत आहे Happy

तर तो
म्हणतो " नाही, पण माझा आईवर विश्वास आहे, व माझी देव तीच आहे त्यामुळे मी तिच्यासाठी देवळात गेलो"
>>>>>>>
अंजली,
याला आईवरचे प्रेम म्हणतात. आईवर विश्वास आहे हे कारण यात चुकीचे आहे. कारण आईने देवावर विश्वास ठेवला म्हणजे देव आहे. असा त्याचा अर्थ झाला. जो ईथे त्याला अभिप्रेत नसावा.

अजून तर बरच काही पहायचय तुला. जेव्हा तुझ्या मेंदुला देव या संकल्पनेची खरोखर गरज वाटेल त्यावेळी ती प्रतिक्षिप्तपणे स्वीकारली जाईल.
>>>
प्रकाशजी, लेटस सी Happy
मला त्या क्षणाला असे वाटले की ती देवाची गरज भासण्याची वेळ होती. आणि तरीही माझा देवावरचा अविश्वास किंवा देव नाहीये यावरचा विश्वास अढळ असल्याने मी आस्तिक होऊ शकलो नाही.
पण अजून आयुष्यात बरेच काही बघायचे आहे हे मान्य असल्याने मी नास्तिकच राहणार असे काही चॅलेंज नाही करू शकत.

Pages