मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 10:51

नमस्कार मायबोलीकरहो!
गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची! दरवर्षी शक्कल लढवून संयोजक नवनवे नियम बनवून मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात. अनेक प्रश्नोत्तरे, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल! पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते. यंदाही आम्ही प्रयत्न केलाय थोडी अवघड, थोडी सोपी अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचा! चला तर मग, बघूया काय आहेत यंदाचे नियम!

विषय क्रमांक १ - "अमृताहुनी गोड"

उत्सव आणि गोड पदार्थ यांचे अतूट नाते आहे. जगभरात बहुतेक कोणताही उत्सव गोड पदार्थ न खाता साजरा केला जात नसेल. पण हल्लीच्या काळात मात्र गोड पदार्थांवर आडवा हात मारताना बरेच जण दहादा विचार करतात. आधुनिक जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयरोगाचे वाढत असलेले प्रमाण आणि आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांची उपलब्ध होणारी माहिती ह्यामुळे बरेच जण साखर खाण्याच्या बाबतीत जागरूक असतात. गोड खायचं तर आहे, पण 'पांढरी साखर' नको आहे असं असताना नेमकं करायचं काय? 'शुगर फ्री डार्क चॉकोलेट' सारख्या पदार्थांना काही पर्याय शोधता येतील का?

तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची साखर, गूळ आणि स्वीटनर नसलेल्या पण तरीही चवीला गोड अश्या काही पाककृती करूया.

स्पर्धेचे नियम :
१. पदार्थाच्या साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर,खडीसाखर, गूळ, काकवी , आर्टिफिशल स्वीटनर (स्टेव्हिया, स्प्लेंडा, स्वीट & लो, सॅकरिन) ह्याचा समावेश नको. तसेच हे घातलेले फळांचे पदार्थ, जॅम्स / जेली/ मार्मलेड सुद्धा नको. मिल्कमेड, कंडेंसड मिल्क / इव्हॅपोरेटेड मिल्क, साखर घातलेले फळांचे क्रश हे ही नको. कॉर्न सिरप नको.
२. मध, अगाव्ही नेक्टर, मेपल सिरप, फळे ( ताजी किंवा फ्रोजन) , फळांच्या फोडी, फळांचा ताजा रस हे चालेल. वरून साखर न घातलेली हवाबंद डब्यातली फळे किंवा साखर न घालता आटवलेला फळांचा रस (मँगो पल्प वगैरे) चालेल. कुठल्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरले ते कृतीत नमूद करावे.
३. एक आयडी एका विषयाची एकच प्रवेशिका देऊ शकेल.
४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २५ ऑगस्ट खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
५. 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
७. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे "अमृताहुनी गोड - <<< पदार्थाचे नाव >>> - <<< आयडी >>>"
८. प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
९. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०. पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा.
११. पदार्थाची चव गोड असणे बंधनकारक आहे.
१२. स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल
१३. 'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही विनंती.
१४.. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१५. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.

====================================================

विषय क्रमांक २ - उपकरणं शरणं गच्छामि

'जेणू काम तेणू ठाय, बिजा करेसो गोता खाय' असं आपल्या शेजारी राज्यात म्हटलं जातं ते पाककृतींच्या बाबतीत अगदी योग्य आहे. घटक पदार्थ, स्वयंपाकाची उपकरणे, वाढायची भांडी ह्यापैकी ज्याचं काम त्याने केलं नाही तर पाककृतीची भट्टी काही जमत नाही. यंदा या उपकरणांच्या चौकटीत राहून आपण पाकसिद्धी करायची आहे.

स्पर्धेचे नियम :
१. स्वयंपाक करताना वापरायच्या उपकरणांच्या २ याद्या खाली दिल्या आहेत, या दोन्ही यादीतील प्रत्येकी किमान एक उपकरण वापरून आपल्याला पाककृती बनवायची आहे. (म्हणजे प्रत्येक पाककृतीत प्रत्येक यादीतले एक अशी किमान २ उपकरणे वापरली असलीच पाहिजेत.) या यादीतील उपकरणे पदार्थ बनवताना महत्वाची असावीत. या उपकरणाशिवाय ती पाककृती पूर्णत्वास नेणे जिकीरीचे असावे. उदा. सजावटीसाठी काकड्या स्लाइसर ने कापल्या किंवा चीझ स्लाइसेस कूकी कटरने कापले असे नसावे.
यादी १ - ढोकळा स्टॅन्ड किंवा इडली स्टँड, अप्पे पात्र, मफिन टिन , स्लो कूकर
यादी २ - पुरण यंत्र, कूकी कटर, सोर्‍या

२. याव्यतिरिक्त बाकीची उपकरणे गरजेप्रमाणे वापरू शकता.
३. पाककृती गोड, तिखट कुठल्याही चवीची चालेल.
४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २५ ऑगस्ट
खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
५. 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
७. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे "उपकरणं शरणं गच्छामि - <<< पदार्थाचे नाव >>> - <<< आयडी >>>"
८. प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे. तसेच कोणती उपकरणे वापरलीत ते स्पष्ट लिहावे.
९. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०. पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा.
११. स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल.
१२. 'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही विनंती.
१३. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१४. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास जरुर येथे विचारा. आरोग्यपूर्ण आणि उपकरणांच्या साहाय्याने पटकन होणारे पदार्थ बनवून यंदा गणपती बाप्पाला खूश करुया! गणपती बाप्पा मोरया!

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल. >> आधीच्या वर्षीच्या कार्यक्रमांप्रमाणेच एंट्री जश्या येतील तश्या प्रकाशित होतील आणि मतदान स्पर्धा संपल्यानंतर काही काळासाठी ओपन राहणार... ह्यावेळीही असेच आहे का?
कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या दिवसात येणार्‍या एंट्री जास्तं भाव खातात आणि मागाहून येणार्‍यां एंट्रींना वाचकांचा सुरूवातीचा जोश ओसरल्याचा फटका बसतो. थोडी ऊशिराने पण दिलेल्या वेळेत एंट्री पाठवणार्‍याची तशी काही चूक नसते पण ह्या phenomenon चा adverse परिणाम त्यांना मिळालेल्या कमी मतांवर होतांना दिसतोच. टायमिंग ईश्यू मुळे वाचकाचे मत आधीच ठरले गेलेले असते.
सगळ्या एंट्र्या एकदमच वाचकांसमोर आल्यास जास्तं निष्पक्षं मतदान होऊ शकेल असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
माफ करा, मी कधी स्पर्धेत भाग घेतला नाही पण निरिक्षणातून असेच होतांना दिसले आहे.

टायमिंग ईश्यू मुळे वाचकाचे मत आधीच ठरले गेलेले असते.>> असे वाटत नाही. गेल्या वर्षी बाईमाणूस यांची एंट्री शेवटी येऊनसुद्धा त्या स्पर्धेत पहिल्या आल्या होत्या. टायमिंग ईश्यू मुळे पाकृवर प्रतिक्रिया कमी अधिक येऊ शकतात, पण मत देताना बेस्ट पाकृलाच मत दिले जाते.

मॅगी +१. मी गेल्या वर्षी अगदी शेवटच्या रात्री प्रवेशिका दिलेली. तरीही मायबोलीकरांनी पसंती नोंदवलेली.
प्रवेशिका स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि मतदानाची तारीख यांत पुरेसा अवधी असतो. मतदानाच्या धाग्यावर सगळ्या प्रवेशिकांची यादी असते.

छान कल्पना! Happy
मागच्यावर्षी पण मजा आलेली. 'म ', 'य' , 'ब' , 'ल' आठवतंय !! Happy Happy

"अमृताहुनी गोड" - एक शंका आहे यासाठी . मिल्क पावडर चालेल का यासाठी..इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजेच मिल्क पावडर नव्हे ना ?

स्मिता श्रीपाद - साखर विरहित असेल मिल्क पावडर तर चालेल.
जाई. - साखर किंवा हाय फ्रुक्टोझ कॉर्न सिरप असे काही घातलेले नसेल तर चॉकलेट चिप्स / पीनट बटर / चॉकलेट सॉस चालतील. असे साखर / कॉर्न सिरप विरहित घटक वापरल्याने पदार्थात गोडवा येणार नाही. पण कृतीत हवे असले तर वापरता येतील.

मेपल सिरप बद्दल थोडे अधिक - हे खरोखर मेपल सिरप असावे. Aunt Jemima आणि तत्सम प्रसिद्ध ब्रॅण्ड चे सिरप बर्याच वेळा कॉर्न सिरप , कॅरमेल आणि फूड कलर वापरुन बनवलेले मेपल 'फ्लेवर्ड' सिरप असते. ते चालणार नाही.

( ही एन्ट्री नाही)
एक प्रयत्न-
१) सामग्री - खवा, खजूर, शिंगाडे पीठ.

२) हे वापरून केली आज डबलडेकर बर्फी.

एक फुकाची शंका. एकच पाकृ दोन्ही स्पर्धेत बसेल अशी असेल तर ग्राह्य धरलं जाईल का?
उदा - कुठली तरी डाळ/ धान्य भिजवून शिजवून पुरणयंत्रातून बारीक केलं. गोडाकरता मध/फळं वापरून ईडली स्टँड मध्ये सोर्‍याच्या साहाय्यानी शेवईटाईप करून वाफवलं. सर्व करतांना वरून मध घालून सर्व केलं.

खूप व्हेग आयड्याची कल्पनाए पण आली टाळक्यात तर विचरली...

Pages