'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' केस ** नव्या संधीसह

Submitted by हायझेनबर्ग on 17 August, 2017 - 11:50

** नव्या संधीबद्दल जाणून घेण्यासाठी केस वाचून झाली असल्यास दुसर्‍या पानावरचा माझा बोल्ड टाईपमधला प्रतिसाद बघा.
https://www.maayboli.com/comment/4105365/edit

दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल

वसंत ऋतू येण्यास अजूनही दोन महिने बाकी असतांना सलग सहा दिवस आणि सहा रात्री आजिबात ऊसंत न घेता पडणार्‍या बर्फाने पर्वतराजीचा ईंचनईंच व्यापला होता. गुडघाभर खोल बर्फातून बाहेर डोक्यावणार्‍या शिळांच्या मागून लांब सुळे आणि करारी नजरेचा सायबेरिअन वाघ झडप घालेल की काय? पाईनच्या ऊंच झाडांमधून गर्जना करत एखादे ग्रिझली अस्वल पाठलागावर येईल की काय? ह्या पर्वतभर अथांग पसरलेल्या बर्फाच्या समुद्रात कुठे साधे खुट्टं वाजले तरी प्रचंड लाट येईल की काय? लाखो वर्षे पृथ्वीला श्वेतनरक बनवून वेठीस धरणारे हिमयुगच परतून आले आहे की काय?
प्रथमदर्शनी कुणालाही असे प्रश्नं पडून एक भयप्रद शिरशिरी त्याच्या मानेवरून ओघळण्याआधी, हा एकवीसाव्या शतकातल्या मनुष्यप्राण्यांच्या जीवनातला एक साधारण दिवसच असावा ह्याची साक्ष देणारा एकमेव पुरावा त्या पर्वतराजीत दिमाखात ऊभा होता. नजर जाईल तिथवर बर्फ लेवून अथांग पसरलेल्या पाईन वृक्षांच्या समुद्रात नांगर टाकून स्तब्धं ऊभ्या सोन्याच्या गलबतासारखे, दुरून बघणार्‍याला हिमगौरीच्या चंदेरी मुकुटावरचे लखाखते सोनेरी रत्नंच भासावे असे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'

8.jpg

घड्याळातली कुठलीही वेळ कायम दिवस रात्रीच्या सीमारेषेवरंच पिंगा घालत असावी ईतपतंच ऊजाडणार्‍या जानेवारीतल्या कडक हिवाळ्याच्या अनेक दिवसांपैकीच तो एक दिवस होता ज्यादिवशी मि. अँड मिसेस ऑस्ट्री चार वाजताच्या शेवटच्या केबल कार ने हॉटेल बुखारेस्ट मध्ये दाखल झाले. पर्वताच्या पायथ्याशी गराज मध्ये गाडी पार्क करून बुखारेस्ट मध्ये येण्यास केबल कार हा एकमेव पर्याय होता. केबल कार आणि सहा मजली बुखारेस्टच्या भोवती ऊभारलेल्या वीस फुटी दगडी भिंतीबाहेर ठेवलेले कुठलेही पाऊल तुमचे ह्या पृथ्वीवरचे शेवटचे असू शकते ह्याची ग्वाहीच जणू बर्फाचा कणनकण ओरडून देत होता.
त्या दगडी भिंतींच्या आड दडलेले हॉटेल बुखारेस्ट मात्रं ह्या पृथ्वीवरचा क्षणनक्षण स्वर्गीय आहे ह्याची हमी देत असावे. विक्टोरिअन काळाची साक्ष देत तीस फुटी ऊंच छताला लटकणारे तीन पुरुष ऊंचीची झुंबरं, संपूर्ण छतावर अप्रतिम नजाकतीने रेखाटलेली ग्रीक देवतांची प्रणयदृष्ये, अनवाणी पायांना गुदगुल्या करणारी मखमली कारपेट, नुकतीच कात टाकून सूर्यप्रकाशात सळसळत झेपावणार्‍या सर्पांसारखे दोन्ही बाजुंनी वर झेपावणारे जिने, सोन्याचा मुलामा दिल्यासारख्या वाटाव्यात अश्या चहूबाजूंच्या भिंती, आणि गूढसे मंद संगीत. जणू दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल म्हणजे ईंद्राची मयसभा, ह्या मयसभेतील एकेक व्यक्ती म्हणजे ईंद्र आणि शची आणि त्यांची बडदास्तं सुद्धां तशीच स्वर्गीय. खर्‍या स्वर्गात बसून पृथ्वीचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळत रहाण्यासाठी मानवाने बनवलेली खिडकी म्हणजे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'.

12.jpg20.jpg

विक्टोरिअन काळातला चेहरा असला तरी हॉटेल, प्रत्येक मजल्यावरती प्रशस्तं आणि भव्य स्वीट्स, जकुझी पासून अल्ट्रा लक्झुरी किचन पर्यंत, बिग स्क्रीन टीव्ही, हजारो चॅनल्स, साऊंड सिस्टिम, सुपरफास्ट ईंटरनेट, अविरत फोन सेवा, लायब्ररी, सिनेमा थिएटर, हीटेड स्वीमिंग पूल, जिम, छोटेसे हॉस्पिटल आणि गरज पडल्यास हेलिकॉप्टर अश्या यच्चयावत सुविधा, सुरक्षा आणि मनोरंजनासाठीच्या अत्याधुनिक तंत्रांनी सुसज्ज होते.
हॉटेल बुखारेस्ट जसे स्वर्गीय होते तसेच अभेद्य देखील. बाहेर निसर्गाने सहा महिने कितीही तांडव केले, कितीही मोठा संहार मांडला तरी बुखारेस्ट मध्ये राहणार्‍या पाहुण्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही की त्यांना कशाची ददात पडणार नाही. एकदा का हॉटेलचे मेन गेट संध्याकाळी सहा वाजता बंद झाले की साधा बर्फातला ऊंदीरही आतून बाहेर जाऊ शकणार नाही की बाहेरून आत येवू शकणार नाही.

पण ऑस्ट्री दांपत्यासाठी, ज्याचे वैभव बघून हुरळून जावे असा कोपरा वा ज्या वस्तूने डोळे दिपावे असे काहीही दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल मध्ये नव्हते. हॉटेलमधला कोपरा न कोपरा आणि वस्तू न वस्तू मागच्या बारा वर्षात त्यांच्या परिचयाची झाली होती. प्रत्येक वर्षीच्या हिवाळ्याचे तीन महिने स्कॉटलंडमधल्या बिझनेस एंपायरच्या धकाधकीपासून लांब हॉटेल बुखारेस्ट मध्ये आरामात घालवण्याचा त्यांचा नेम बारा वर्षांपासून आजही न चुकता चालू होता. वैभव म्हणावे तर त्यांचे स्वतःचे स्कॉटलंड मधले राहते घर हॉटेल बुखारेस्टमधल्या वैभवापेक्षा कांकणभर वरचढंच वाटले असते. वैभवासाठी नव्हे तर आरामासाठी, मावळतीला लागलेल्या आयुष्यातले काही क्षण मनाचे स्वास्थ्यं जपण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी हॉटेल बुखारेस्टला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्वं होते. त्यांच्याच काय, बुखारेस्टमध्ये पुढच्या काही आठड्यांसाठी रहायला आलेल्या जवजवळ वीस जोडप्यांची कहाणी थोड्याफार फरकाने हीच होती. कोणी साठीचे अतिश्रीमंत गृहस्थं तिसरे लग्नं करून आपल्या तिशीच्या बायकोला घेवून आले होते तर कोणी आयुष्यभराच्या जोडीदाराला काळाने हिरावून नेल्याने जुन्या आठवणी जागवण्यासाठी एकट्यानेच आले होते. नुकतेच कोर्टशिप करू लागलेली वा लग्नाच्या बंधनात अडकलेली काही मोजकी तरूण जोडपीही होती तर काही मोडकळीला आलेले लग्नं वाचवण्यासाठी आलेली जोडपीही होती. एकट्याने येवून राहणारे काही मोजके लोकंही होते ज्यांत आपल्या क्लायंट्सच्या बिझनेससाठी गुंतवणुकदार शोधणार्‍या काही 'कमिशन एजंट' लोकांचाही समावेष होता. पण ह्या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्टं नक्कीच समान होती, ती म्हणजे श्रीमंती. बुखारेस्ट मध्ये आठवड्यासाठी राहण्याचा खर्च सर्वसाधारण लंडनवासीयाच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढा होता.

हॉटेलचा चोवीस तास तत्परतेने काम करणारा स्टाफ, हरतर्‍हेचे खाणसामे, जिम आणि योगा शिक्षक, मसाज करणारे मसूज आणि मसूर, पूर्णवेळ डॉक्टर्स, सुरक्षारक्षक, बिल्डिंग आणि मशीनरी जाणणारे स्थायी ईंजिनियर्स असा सुसज्जं ताफाही बुखारेस्ट मध्ये कायम हजर असे. येणार्‍या पाहुण्यांच्या सेवेत कुठलाही खंड पडू नये ह्यावर हॉटेल व्यवस्थापनाची करडी नजर होती. 'हॉटेल बुखारेस्ट' ह्या नावाला, ब्रँडला पूर्ण युरोपात मोठा मान होता वजन होते.

ऑस्ट्री दांपत्याच्या आगमनानंतर संध्याकाळी सहाच्या ठोक्याला बुखारेस्टचे भरभक्कम दरवाजे त्यादिवसासाठी बंद झाले. साडे सहापासूनच प्रत्येक मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये - ऊंची डिनरसुट आणि गाऊन्स घालून जोडपी ग्राऊंड फ्लोअरवरच्या बॅन्क्वेट हॉलकडे जाण्यासाठी एलेवेटरची वाट बघत घोळक्याने ऊभी आहेत, बॅन्क्वेट हॉल मध्ये न जाता रूममध्येच जेवण मागवणार्‍या जोडप्यांच्या सरबराईसाठी सर्वर लोकांची सर्विंग ट्रे किंवा कार्ट घेवून लगबग चालू आहे, वाईन/ सिगरेट/ पुस्तक/ डीवीडी अश्या काही स्पेशल वस्तू रूममध्ये मागवणार्‍यांसाठी रूम सर्विसच्या तरूण मुलांचीही तत्पर धावपळ चालू आहे - हेच दृष्यं होते.

21.jpg

ऑस्ट्री दांपत्याच्या तिसर्‍या मजल्यावरचेही दृष्य फार वेगळे नव्हते - दोन जोडपी एलेवेटर येण्याची वाट बघत एकमेकांच्या ओळखी करून घेत औपचारिक गप्पा मारत होती. त्यांच्या बाजूलाच सुटाबुटातले एक मध्यमवयीन गृहस्थं खिडकीजवळ बॅगेतली बिझनेस कार्ड्स कोटाच्या खिशात ठेवत ऊभे होते. सर्विस एलेवेटर मधून बाहेर आलेला एक सर्वर कॉरिडोर मधून हलकेसे गाणे गुणगुणत सर्विंग कार्ट ढकलत रूम डिलवरी करायला चालला होता तर दुसरी सर्वर नुकतीच एका रूममध्ये डिलवरी करून सर्विंग ट्रे बोटावर फिरवत येत होती. रूम सर्विसचा एक पोरगेलेसा अतिऊत्साही तरूण, हातात वाईन बॉटल घेवून डिलीवरीसाठी चालला असतांना 'आपण येतांना कॉर्क स्क्रू आणायला तर विसरलो नाही ना?' आठवण होऊन वेंधळेपणाने खिसे चाचपडत चालत होता..............आणि तेवढ्यात कुणा पुरूषाच्या जीवघेण्या किंकाळीने तिसरा मजला दणाणून गेला. कॉरिडोर मधल्या आठही जणांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. ते चपापून जागीच थांबत एकमेकांकडे बघत आवाज कुठून आला त्याचा कानोसा घेवू लागले. काही सेकंदात स्त्रीच्या आवाजातली दुसरी कर्कश्यं किंकाळी पुन्हा मजल्यावर घुमली आणि त्या आठही जणांना ती ऑस्ट्री दांपत्याच्या स्वीट नं. ३०२ मधूनच आल्याचा पक्का अंदाज आला. आपल्या अंदाजाची खातरजमा करण्यासाठी एकमेकांकडे विचारणा करत गोंधळलेले आणि मनातून चरकलेले ते आठही जण ३०२ च्या दारासमोर येवून ऊभे राहिले.
दोन क्षण भयाण शांतता पसरली आणि अचानक 'मला मारू नकोस, प्लीज मला मारू नकोस' असा मिसेस ऑस्ट्रींचा प्रचंड भ्यालेला आणि रडका आवाज पुन्हा घुमला. त्यातल्या एक जण ३०२ चे दार ठोठावत 'मॅडम काय झाले, दार ऊघडता का?' म्हणत असतांना त्याचे वाक्य संपते न संपते तोच 'ठ्वॉय' 'ठ्वॉय' आवाज करत बंदुकीच्या दोन जोरदार बारांनी तिसरा मजला पुन्हा दणाणून गेला. गोळ्यांच्या आवाजासरशी ते आठही जण लगबगीने दरवाजापासून लांब झाले. दोन्ही जोडप्यापैकी तरूण जोडप्यातल्या मुलीच्या तोंडातून एक भयप्रद किंकाळी बाहेर पडली तसे तिच्या जोडीदाराने तिला मिठीत घेतले. दुसरे तुलनेने वयस्कर जोडपेही हातात हात घेत एलेवेटरच्या दिशेने झेपावले. हॉटेल स्टाफचे तिघेही जण अजूनही एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघत कॉरिडोरच्या दुसर्‍या बाजुला असलेल्या सर्विस एलेवेटर च्या दिशेने मागे सरकू लागले. आता कुठल्याही क्षणी हातात बंदुक घेतलेला मनुष्यं दार ऊघडून बाहेर येईल आणि पुन्हा गोळीबार करेल असे वाटत असल्याचा ताण अणि भिती त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होती. तणावाचे दोन क्षण असेच गेले असतील नसतील तोच त्या पोरगेल्याश्या सर्वरला अचानक काही तरी दिसले आणि तो पुन्हा ३०२ च्या दिशेने धावत सुटला. चपळाईने त्याने ३०२ च्या दाराच्या बाजूलाच असलेला ईमर्जन्सी फोन ऊचलून '३०२ मध्ये गोळीबार झाला आहे लवकर या' असे ओरडून फोनचे रिसिवर टाकून देत झटक्यात दरवाजापासून बाजूला होत मागे फिरला.
ते आठही जण अजूनही घाबरलेले गोंधळलेले होते, एलेवेटर अजून एकदाही त्यांच्या मजल्यावर थांबले नव्हते. त्यांच्यापैकी प्रत्येकाची नजर अजूनही ३०२ च्या दरवाजावरंच खिळून होती. तितक्यात मजल्यावरचे जिन्याकडे जाणारे दार दाणकन ऊघडले आणि आणि दोन सिक्युरिटी गार्डस धावतपळत तिसर्‍या मजल्यावर दाखल झाले. गार्डस दिसता क्षणी आठही जण ३०२ च्या दरवाज्याकडे बोट दाखवत ओरडले 'आत गोळीबार झाला आहे, ३०२ मध्ये आत्ता गोळीबार झाला आहे'. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच दोघेही गार्ड आपापल्या बंदुका सरसावत ३०२ च्या दरवाजासमोर ऊभे ठाकले आणि त्यांनी त्या आठही जणांना 'कॉरिडोरच्या टोकाला जा, कोपर्‍यात आसरा घ्या' असे ओरडून सांगत ३०२ च्या दरवजापासून लांब, सुरक्षित अंतरावर राहण्यास सांगितले. त्या दोघातला एक जण त्यानंतरचे काही सेकंद ३०२ चा दरवाजा ठोठावत, ओरडत आतल्या व्यक्तीस बंदूक टाकून बाहेर येण्यास सांगत राहिला पण आतून काहीही आवाज ऐकू आला नाही की ३०२ चे दार ऊघडले नाही. दुसरा जण वॉकी टॉकी वरून मेन डेस्कला परिस्थितीची जुजबी माहिती देत होता. पहिल्याने पुन्हा 'आम्ही सिक्युरिटी आहोत रूममध्ये कोणी असल्यास आवाज द्या' असेही ओरडून सांगितले पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. पळत गेलेल्या गार्डसना बघून बॅन्क्वेट हॉलमधले लोक काय झाले आहे ते बघण्यासाठी लॉबी मधल्या फ्रंट डेस्ककडे जाण्यास ऊठू लागताच हॉटेल कॉन्सिअर्ज (हॉटेल मॅनेजर) मि.गुस्ताफनी 'सगळ्यांनी शांतपणे आहे तिथेच बसून रहावे' असा विनंतीवजा सल्ला दिला. सगळ्या रूम्समध्येही 'पुढची सुचना येईपर्यंत रूममधून बाहेर पडू नये' अशी घोषणा झाली. कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांच्या चेहर्‍यावर भिती अजूनही स्प्ष्टं दिसत असली तरी आपल्या डोळ्यांसमोर चाललेले हे नाट्य कसे ऊलगडते ह्याची किंचितशी ऊत्सुकताही डोकावत होतीच. अजून मिनिटभर प्रयत्न केल्यानंतरही आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दोन्ही गार्डसनी दरवाजा ऊघडून आत जाण्याचा निर्णय घेतला.
अश्या गंभीर आणि घातक परिस्थितीत दरवाजा ऊघडून आत कसे जावे त्याच्या अ‍ॅकॅडेमीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणा बरहुकूम, अतिशय सावधानतेने एकेक पाऊल टाकत दोघेही ३०२ च्या प्रशस्तं लिविंग रूममध्ये दाखल झाले. त्यांना मखमली कारपेटवर डोक्यातून आरपार झालेल्या एक आणि छाती फोडून गेलेल्या दुसर्‍या गोळीच्या जखमांतून वाहणार्‍या रक्ताच्या थारोळ्यात ऊताणा पडलेला मिसेस ऑस्ट्रींचा देह दिसला. एका गार्डने त्यांच्या नाकाजवळ बोट नेऊन श्वास तपासत दुसर्‍याकडे बघून नकारार्थी मान हलवली.

18.jpg

दोघेही गार्ड पुन्हा सावध होत एकमेकांना नजरेने ईशारा करत आजिबात आवाज न करता एकेक पाऊल टाकत आत बेडरूमकडे जाण्यास वळाले. बेडरूमला लागूनच असलेल्या बाथरूममध्ये अतिशय मंद प्रकाशात त्यांना कपाळावर कसला तरी जबरदस्तं प्रहार झाल्याने खोक पडलेला मि. ऑस्ट्रींचा बाथरोबमधला निश्चल देह चकचकीत टाईल्सवर अस्ताव्यस्तं अवस्थेत पडलेला दिसला. कपाळावरून रक्ताचे ओघळ चेहर्‍यावर पसरले होते. एका गार्डने पटकन त्यांच्या नाकाजवळ हात नेत श्वास तपासला आणि त्याचे डोळे लकाकले. 'हे सर अजून जिवंत आहेत' तो दुसर्‍याकडे पहात हळूच म्हणाला. दुसर्‍या गार्डने वॉकीटॉकी वरून ३०२ मध्ये तातडीने स्ट्रेचर आणि डॉक्टर ला पाठवण्याची सूचना केली.

24.jpg

दुसर्‍याच मिनिटाला सर्विस एलेवेटर मधून दोन मेल नर्स आणि एक तरूण डॉक्टर स्ट्रेचर घेवून ३०२ कडे अक्षरशः धावलेच. स्ट्रेचर आत येताच दोन्ही नर्सनी मि. ऑस्ट्रींचा देह स्ट्रेचर वर ठेवला, डॉक्टरांनी पुन्हा एकदा नाडी तपासून पटकन एक ऑक्सिजन मास्क मि. ऑस्ट्रींच्या नाकावर चढवला. स्ट्रेचर घेवून जातांना डॉक्टरने मिसेस ऑस्ट्रींचीही नाडी तपासली पण प्राण त्यांचे शरीर सोडून निघून गेल्याचे त्याची नजर सांगून गेली. डॉक्टर आणि नर्स आले तसे तातडीने सर्विस एलेवेटर ने बुखारेस्टच्या तळमजल्यावरच्या छोट्याश्या हॉस्पिटलमध्ये मि. ऑस्ट्रींना घेवून गेले.
रूम नं ३०२ मध्ये बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सताड ऊघडी होती आणि त्यातून भणाणलेला वादळवारा बर्फाचे शेकडो नाजूक कण आत ऊडवत होता. मागे राहिलेल्या दोन्ही गार्डनी वस्तू न वस्तू जशीच्या तशी जागेवर असलेला पूर्ण स्वीट तीनतीनदा पाहून घेतला पण त्यांना तिसर्‍या माणसाच्या अस्तित्वाच्या कुठल्याही खुणा तिथे मिळाल्या नाहीत.

कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांची भीड आता चेपली होती. डॉक्टर घाईघाईत स्ट्रेचरवर कुणालातरी घेवून जातांना त्यांनी पाहिले होते. ते सगळेच ३०२ च्या दारापाशी येवून आत डोकावत नेमकं काय चाललंय त्याचा कानोसा घेत असतांना तेवढ्यात तिथे आलेल्या कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी त्यांना लांब ऊभे राहण्यासाठी विनंती केली. आत संशयास्पद असे अजून काहीच न दिसल्याने गार्डस लगोलग बाहेर आले. बाहेरंच ऊभ्या हॉटेल मॅनेजर गुस्ताफना आतली पूर्ण परिस्थिती सांगून झाल्यावर हॉटेलच्या नियमांप्रमाणे मि. गुस्ताफनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या सुचनेप्रमाणे लगेचच स्वीट नं ३०२ सील करत त्यांनी एका गार्डला तिथेच रूमबाहेर पहारा देण्याचा हुकूम दिला. फ्रंट डेस्कला कुठल्याही परिस्थितीत मेन गेट न ऊघडण्याचा हुकूम देत त्यांनी दुसर्‍या गार्डची पाठवणी मेन गेटवर पहारा देण्यासाठी केली. कॉरिडोरमधल्या त्या आठही जणांची सगळी माहिती घेवून त्यांनी पोलिस येईपर्यंत झाल्या प्रकाराची ईतर कुणाबरोबरही चर्चा करू नये अशी विनंती त्यांना केली. पाचही पाहुण्यांची पाठवणी त्यांच्या रूम्समध्ये करून शांतपणे जडजड पावलं टाकत ते बॅन्क्वेट हॉल मधल्या पाहुण्यांशी बोलण्यासाठी एलेवेटर कडे निघाले.
हॉटेल बुखारेस्ट मधल्या त्यांच्या मागच्या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही असा प्रसंग अनुभवला नव्हता. एलेवेटरमधल्या त्या वीस सेकंदांच्या प्रवासात बुखारेस्टचा सगळा ईतिहास त्यांच्या नजरेसमोर तरळून गेला. ह्या घटनेची मोठी किंमत बुखारेस्टला सोसावी लागणार आहे, कदाचित बुखारेस्टचे भवितव्यंच क्रुसावर टांगले जाईल आणि आपल्या कारकिर्दीत बुखारेस्टच्या नावाला बट्टा लागला असे वाटून त्यांचे वयोवृद्धं हृदय काळजीने पिळवटून गेले.
बॅन्क्वेट हॉल मधले वातावरण अगदीच गोंधळाचे नसले तरी पाहुणे घोळक्या घोळक्याने काही तरी कुजबुजत होते. तेवढ्यात मि. गुस्ताफचा आदरयुक्तं पण करडा आवाज तिथे घुमला -
लेडीज अँड जंटलमेन, आपल्या हॉटेलमध्ये तिसर्‍या मजल्यावर एक दुर्घटना घडली आहे. घटनेचा कुठलाही तपशील मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. आम्ही पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि बाहेरचे वादळ थांबताच त्वरेने त्यांना ईथे आणण्याची व्यवस्थाही हॉटेल करत आहे. दुर्दैवाने आज संध्याकाळचे सगळे प्रोग्राम आम्हाला रद्दं करावे लागंत आहेत. सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाऊन जेवणाच्या ऑर्डर द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हॉल रिकामा होताच गेस्ट एलेवेटर आणि जिने सर्व पाहुण्यांसाठी बंद करण्यात येतील, पण फोन लाईन्स, फ्रंट डेस्क आणि आमचा सगळा स्टाफ तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतील. तुम्हाला होत असलेल्या गैरसोयीबद्दंल हॉटेल बुखारेस्ट आणि मी वैयक्तिक रित्या दिलगीर आहोत. कुणालाही आपल्या सुरक्षेबाबत शंका वाटण्याचे काहीही कारण नाही. पोलिस येवून गेल्यानंतर घटनेची माहिती सगळ्यांना दिली जाईल पण तोवर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे.' - असे सांगून ते तडक स्टाफला सुचना देण्यासाठी आत निघून गेले.

पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशने तेजाळलेली बर्फाची शुभ्रधवल चादर बाहेर दूरवर पसरलेली असतांना ती रात्रं बुखारेस्टच्या पासष्टं वर्षांच्या ईतिहासातली सर्वात अंधारी रात्रं होती. रात्रभर घोंघावणारे निर्दयी वादळ सुर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडताच शहाण्या बाळासारखे शांत झाले. अर्ध्या तासातंच म्हणजे आठाच्या ठोक्याला केबलकार मधून आलेल्या पोलिसांनी हॉटेल बुखारेस्टमध्ये पाऊल ठेवले. काल संध्याकाळी सहाला बंद झालेले बुखारेस्टचे भले मोठे दार पहिल्यांदाच करकरत ऊघडले आणि पोलिस आत जाताच पाठोपाठ पुन्हा बंदही झाले.

पोलिस डायरीतल्या नोंदी.

टाईमलाईन - पार्किंग गराज, केबल कार आणि हॉटेलमधल्या लॉबी व कॉरिडोर मधल्या वेगवेगळ्या कॅमेरांमध्ये कॅप्चर झालेल्या हालचाली

  • -दुपारी १:०० क्लिनिंग साहित्याची एक भली मोठी कार्ट घेवून रूम क्लीनर लेडी रूम नं ३०२ मध्ये गेली
  • -दुपारी २:०० क्लिनिंग कार्ट घेवून क्लीनर लेडी रूम नं ३०२ मधून बाहेर पडली
  • -दुपारी ३:०० ऑस्ट्री दांपत्याने त्यांची लँडरोवर बुखारेस्टच्या पर्वताच्या पायथ्याला असलेल्या गराजमध्ये पार्क केली
  • -दुपारी ३:३० ऑस्ट्री दांपत्याने केबल कारमध्ये प्रवेश केला
  • -दुपारी ४:०० ऑस्ट्री दांपत्याचे हॉटेल बुखारेस्ट मध्ये आगमन
  • -दुपारी ४:१० तिसर्‍या मजल्यावरच्या कॅमेरामध्ये ऑस्ट्री दांपत्य गेस्ट एलेवेटरने वर येवून त्यांच्या रूममध्ये गेल्याचे दिसत आहे.
  • -दुपारी ४:११ ऑस्ट्री दांपत्याच्या सामानाची ट्रॉली आणणारा बेलबॉय सर्विस एलेविटरने तिसर्या मजल्यावर आला आणि दोनच मिनिटात रिकामी ट्रॉली घेवून सर्विस एलेवेटरने खाली गेला.
  • -दुपारी ४:४० मि. ऑस्ट्री रूममधून बाहेर पडून मेन गेटमधून बाहेर गेले.
  • -दुपारी ५:२० मि. ऑस्ट्री मेन गेटमधून आत येवून रूममध्ये गेले.
  • -संध्या. ५:३० मिसेस ऑस्ट्रींनी फोन करून जेवणाची ऑर्डर दिली.
  • -संध्या. ६:१० डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मध्ये गेला.
  • -संध्या ६:११ मिसेस ऑस्ट्रींनी फ्रंट डेस्कला फोन करून 'त्यांचा सावत्रं मुलगा आणि त्याची बायकोही हॉटेलमध्ये थांबले आहेत का?' ह्याची चौकशी केली.
  • -संध्या ६:२० रिकामी डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मधून बाहेर आला.
  • -संध्या ६:२४ मिसेस ऑस्ट्रींनी त्यांच्या योगा टीचरला ऊद्या सकाळच्या सहाच्या क्लासला येत असल्याचे एसएमस पाठवून कळवले.
  • -संध्या ६:२८ मिसेस ऑस्ट्रींनी दुसर्‍या दिवशीच्या मसाज सेशनसाठी हॉटेल वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग केले.
  • -संध्या ६:३४ तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये पहिली किंकाळी ऐकल्याचे लोकांच्या हालचालीवरून दिसते आहे.
  • -संध्या ६:३७ वाईन सर्वर ने ईमर्जन्सी कॉल केला
  • -संध्या ६:३९ दोन सिक्युरिटी गार्ड्स ३०२ समोर दाखल
  • -संध्या ६:४२ सिक्युरिटी गार्ड्सनी ३०२ चे दार ऊघडून आत प्रवेश केला

क्राईमसीन/ फॉरेन्सिक डिटेल्स

  • -बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सोडल्यास पूर्ण रूम मधली एकही वस्तू जागची हलली असावी असे वाटत नाही
  • -कधी कधी पाहुण्यांकडून खिडक्या ऊघड्या राहिल्याने थंड हवा, बर्फ आत येवून रूमचे आणि हिटिंग सिस्टीमचे नुकसान होते म्हणून हॉटेल मॅनेजमेंटने चार पाच वर्षांपूर्वीच सगळ्या रूम्समधल्या खिडक्या लॅच करून खिडक्यांचे हँडल्स काढून टाकले आहेत.
  • -हँडल शिवाय खिडकी ऊघडणे अशक्य आहे. खिडकी ऊघडणार्‍याने नक्कीच हँडलच्या खोबणीत हँडल बसवून आतून खिडकी ऊघडली असावी.
  • -हॉटेलमध्ये पूर्वी राहून गेलेल्या कुणालाही ही हँडलची बाब माहित असणे शक्य आहे. खिडक्या स्टँडर्ड असल्याने बाहेरून असे हँडल विकत घेऊन येणे फारंच सोपी गोष्टं आहे.
  • -हँडल वापरून खिडक्या ऊघडता आल्यास खिडकीतून सज्जावर ऊतरून बाजूच्या ३०४ रुममध्ये किंवा रेलिंगच्या आधाराने चढून वरच्या ४०२ रूममध्ये जाणे शक्यं आहे.
  • -बेडरूममधल्या नाईटस्टॅंडवरच्या स्टीलच्या फ्लॉवरपॉट खाली पाण्याचे बर्फ जमलेले होते. तो पॉट धुण्याचा प्रयत्नं केला गेला असावा. ओल्या पॉटवरून पाणी निथळल्याने आणि ऊघड्या खिडकीतून अतिथंड बर्फाळ हवा येत असल्याने निथळलेल्या पाण्याचे बर्फ झाले.
  • -फ्लॉवर पॉटवर मि. ऑस्ट्रींच्या हाताचे अगदी पुसट ठसे आहेत आणि त्यांच्या रक्ताचा एक बारीक थेंबही पॉटवर मिळाला.
  • -खिडकीतून, खाली साचलेल्या बर्फावर कोणीतरी ऊंचावरून ऊडी मारल्याने बुटांच्या खोल खुणा दिसत आहेत. बर्फाचा थर जाड पण भुसभुशीत असल्याने ऊडी मारणार्‍याला दुखापत होण्याचा काही धोका नव्हता. ऊडी मारल्याचा आघात मोठा असल्याने रात्रीतून बर्फ पडूनही ऊडीच्या खुणा शाबुत आहेत.
  • -रात्रीतून भरपूर बर्फ पडल्याने, ऊडी मारल्यानंतर जर खुनी (एक किंवा अनेक) चालत वा 'स्की' करून गेला असल्यास त्याच्या बुटांच्या किंवा स्कीच्या खुणा पुसल्या जाणे सहज शक्य आहे.
  • -बर्फातल्या ऊडीच्या खुणा बरोबर ग्राऊंड फ्लोरवरच्या रूम नं १०२ च्या खिडकीबाहेर दिसत आहेत.
  • -हॉटेलचे मेन गेट सहालाच बंद झाल्याने ऊडी मारणार्‍याला हॉटेलमध्ये पुन्हा हॉटेलमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यं आहे.
  • - काल रात्रीच्या हिमवादळात प्रोटेक्टिव गिअर घालून चालत किंवा स्की करून जाणे पाईन वृक्षांच्या गर्दीमुळे आणि अतिप्रचंड शिळांमुळे अशक्यप्राय आहे. खुन्याने असे धाडस केले असल्यास ते नक्कीच जीवघेणे ठरले असण्याची शक्यता आहे.
  • -हॉटेलला लागून असलेल्या मशिनरी रुममध्ये खुन्याने आसरा घेतला असल्यास त्याला तिथे वादळापासून निवारा मिळणे सहज शक्यं आहे.
  • -मशिनरी रूममध्ये कोणी तरी आसरा घेतल्याचे, छोटेसे हीटर वापरल्याचे आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले अन्न खाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
  • - तपासकार्य चालू असतांना हॉटेलचे मेन गेट पूर्णवेळ बंदच होते.
  • -मिसेस ऑस्ट्रींच्या बोटातली डायमंड वेडिंग रिंग आणि गळ्यातले मुल्यवान नेकलेस असा एक मिलिअन ब्रिटिश पौंडाचा ऐवज गायब आहे.
  • -मि. ऑस्ट्रींची वेडिंग रिंग बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवर मध्ये मिळाली.
  • -डायनिंग टेबलवर फोर कोर्स मेन्यू चे डिनर वाढून ठेवलेले होते त्याला कोणी हात लावलेला दिसला नाही, पण एक बोल पूर्ण रिकामा होता.
  • - घटनेच्या वेळी तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये ऊपस्थित असलेले पाच पाहुणे, तीन स्टाफ, दोन गार्डस, दोन मेल नर्स आणि डॉक्टरच्या जबानीत जे घडले त्याविषयी सांगतांना कुठलीही विसंगती आढळून आली नाही.

एका स्पेशल केसची माहिती

  • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये किचन ओट्यावर "$WOLF$"अक्षरे कोरलेली एक चांदीची अंगठी सापडली आहे जे फार चक्रावणारे आहे.
  • - चार वर्षांपूर्वीपर्यंत बुखारेस्ट सारख्याच ईतर चार विंटर हॉटेल्स मध्ये 'विंटर वुल्फ' नामक क्रूर आणि निर्दयी चोराने, चोरीच्या ईराद्याने दोन लेस्बियन जोडपी, एक घटस्फोटित आणि एक विधवा अश्या सहा श्रीमंत स्त्रियांचे वेगवेगळ्या वर्षी निर्घूण खून पाडले होते.
  • -प्रत्येक वेळी त्याने वापरलेली खून करण्याची पद्धत वेगळी होती.
  • - प्रत्येकवेळी मयतांच्या अंगावरून अतिशय मौल्यवान ज्वेलरी चोरली गेली होती आणि घटनास्थळावर "$WOLF$" कोरलेली चांदीची अंगठी सापडली होती.
  • - चार वर्षांपूर्वी पोलिसांच्या पाठलागात 'विंटर-वुल्फ' पोलिसांसमक्षं खोल दरीत पडला होता, पण अद्याप त्याची बॉडी मिळवणे शक्यं झाले नव्हते.
  • - 'विंटर वुल्फचे' खरे नाव 'डोरिअन व्हाईट' होते. तो अतिशय चलाख आणि पट्टीचा स्की खेळाडू होता.
  • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये सापडलेली अंगठी 'विंटर वुल्फ' च्या अंगठीसारखीच होती पण तिचा आकार मागच्या चारही अगठ्यांपेक्षा थोडा मोठा होता, आणि "$WOLF$" अक्षरेही ईटालिक फाँट मध्ये नव्हती.
  • - जिवंत असतांना 'विंटर वुल्फ' विषयी पेपरमध्ये बरीच माहिती छापून येत असे ज्यात काही माहिती खरी होती तर काही नुसत्याच वदंता. त्याच्या चोरी आणि धाडसाविषयीच्या गोष्टी लोक मोठ्या चवीने चघळत.

मेडिकल रिपोर्ट

  • -मिसेस ऑस्ट्रींचा मृत्यू छातीत आणि डोक्यात घुसलेल्या गोळीमुळे झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावाने झाला.
  • -त्यांच्या पोटात फक्तं वाईन आणि रक्तात अक्लोहोल सापडले.
  • -मि.ऑस्ट्रीं च्या कपाळावर बेडरूममधल्या फ्लॉवरपॉटचा वार झाला. हा वार घेरी येवून बेशुद्धं होण्या ईतपतच जोराचा होता पण जीवघेणा नव्हता.
  • -रूमची खिडकी ऊघडी असल्याने रूममधे १२ तासापेक्षा जास्तं वेळ अतिथंड हवा भरून राहिल्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ सांगता येणे अवघड आहे.
  • पण मृत्यू संध्या. सहा ते रात्री आठ च्या दरम्यान झाला असावा असे वाटते.

मि. ऑस्ट्रींचा जबाब

  • - मी पावणेपाच वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर चालायला गेलो होतो आणि साधारणतः अर्धा तास चालून सवा पाचला रूमवर परत आलो.
  • - चालून आल्यानंतर पाच दहा मिनिटं आराम केला आणि सूझनला जेवणाची ऑर्डर द्यायला सांगून मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो.
  • - आंघोळ करून मी बाथरूममध्येच आवरत होतो तेव्हा अचानक बाथरूमची लाईट बंद झाली, मस्तकावर काही तरी जोरात आदळले, वेदनेमुळे मी ओरडलो आणि मला घेरी आली... बस्स मला त्यापुढचे काहीच आठवत नाही.
  • - मी डोळे ऊघडले तेव्हा हॉस्पिटल बेडवर होतो आणि डोके प्रचंड ठणकत होते.
  • -मी माझी वेडिंग रिंग आंघोळ करतांना बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती.

३०२ च्या रूम सर्विस रेनर्ड फ्रॉस्ट चा जबाब

  • -मी सहाच्या आसपास जेवणाची डिलवरी घेऊन आलो असेल.
  • -मी आत आलो तेव्हा मिसेस ऑस्ट्री वाईन पीत होत्या आणि फोनवर काही तरी पहात होत्या. त्यांनी कुणाला तरी कॉलही केला होता
  • -त्यांनी मला जेवण डायनिंग टेबलवर सर्व करायला सांगितले. त्यांची फोर-कोर्स डिनर मेन्यूची ऑर्डर होती- स्टार्टर्स, सॅलड, आँट्रे आणि डिझर्ट. मी आमच्या हॉटेलच्या ट्रेनिंगप्रमाणे सगळे नीट टेबलावर मांडले आणि निघून गेलो.
  • - मि. ऑस्ट्री काही दिसले नाहीत पण ते बाथरूम मध्ये असावेत असे मला वाटते कारण नळाच्या पाण्याचा आवाज येत होता.
  • -तिसर्‍या मजल्याचा 'मल्टी-कोर्स डिनर' सर्वर मीच असल्याने मी पुन्हा दुसर्‍या रूमची जेवणाची ऑर्डर घेऊन आलो होतो तेव्हा गोळीबार झाला, आमची 'लाईट मील' सर्वर डॉटी आणि 'वाईन रनर' एग्जीही होते तिथे.
  • - (डायनिंग टेबलचा फोटो दाखवून रिकाम्या बोलबद्दल विचारले असता) बहुतेक त्या बोलमध्ये मी अ‍ॅल्युअमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले ग्रिल्ड पोटॅटो ठेवले होते.

प्रासंगिक माहिती

  • - हॉटेलात दरवर्षी येणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार मिसेस ऑस्ट्री ह्या अतिशय शिष्टं, बोलायला फटकळ व ऊर्मट आणि श्रीमंतीची प्रचंड घमेंड असलेल्या एक अहंकारी स्त्री होत्या.
  • -मागच्या वर्षी, आपल्या एका क्लायंटच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करावी ह्यासाठी मि. ऑस्ट्रींची मनधरणी करत ओळख वाढवू पाहणार्‍या एका स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझचा मिसेस ऑस्ट्रींनी सर्वांसमोर फार वाईटरित्या पाणऊतारा केला होता. मि. मार्टिनेझही गरम डोक्याचेच असावेत त्यामुळे वाद विकोपाला गेला. कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी मध्यस्थी केली तेव्हाच तो वाद थांबला, पण मि. ऑस्ट्री एकदाही मध्ये पडले नाहीत की त्यांनी मिसेस ऑस्ट्रींना एका शब्दाने आवरायचा प्रयत्न केला नाही. मिसेस ऑस्ट्रींनी, मि. मार्टिनेझ ना हॉटेल मधून घालवून देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटवर फार दबाव आणला होता. दोन दिवसांनी मि. मार्टिनेझ स्वतःच निघून गेले पण ह्यावर्षी ते पुन्हा हॉटेल मध्ये ऊतरले आहेत.
  • -मागच्याच वर्षी मि. ऑस्ट्रींचा मुलगा सायमन त्याच्या प्रेयसीला घेऊन त्यांना ईथे भेटायला आला होता तेव्हा मिसेस ऑस्ट्रींनी (ज्या सायमनच्या सावत्रं आई आहेत) त्याचाही अपमान करत त्याला 'तू ह्या मिडलक्लास मुलीशी लग्नं केल्यास मी तुला ईस्टेटीतून एक पैसाही मिळू देणार नाही' सुनावत रूममधून घालवून दिले. सायमनही मिसेस ऑस्ट्रींना बरेच शिव्याशाप देत निघून गेला. त्यांची आरडाओरड ऐकून बरेच लोक गोळा झाले होते. पण मि. ऑस्ट्री तेव्हाही शांतपणे रूममध्ये बसून राहिले.
  • - मिसेस ऑस्ट्रींच्या अगदी ऊलट असे मि. ऑस्ट्रींचे व्यक्तीमत्व होते. शांत, विचारी, धीरगंभीर, आदर वाटावा असे, परंतू ते फारंच कमी बोलत. ते कायम ऊदास रहात नव्हते पण साधे मंदसे हसतांनाही ते कधी दिसले नाहीत.
  • -रूम नं ३०४ मध्ये स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझ ऊतरले आहेत.
  • -रूम नं ४०२ मध्ये मि. सायमन ऑस्ट्री आपल्या बायकोबरोबर ऊतरले आहेत.
  • -रूम नं १०२ मध्ये मि. हिरोशी मात्सुमुरा ऊतरले आहेत. टोकियो मधून थेट हॉटेल बुखारेस्ट मध्ये आलेल्या मि. हिरोशींचे व्यक्तीमत्वं फारंच संशयास्पद वाटते, हॉटेल स्टाफलाही त्यांचा हॉटेलमधला मागच्या एक आठवड्यातला वावर संशयास्पद वाटला. मि. हिरोशींनी पायथ्याच्या गावातून लंडनमध्ये काही कॉल्स केले आणि हार्डवेअर दुकानात खरेदीही केली. त्यांनी लंडनमध्ये केलेले कॉल मिसेस ऑस्ट्रींच्या भावाच्या ऑफिसमध्ये गेल्याचे समजले आहे. मिसेस ऑस्ट्री आणि त्यांच्या भावात वडिलांच्या गडगंज संपत्तीवरून कोर्ट केस चालू आहे जिने गंभीर वळण घेतले आहे. मि. हिरोशी प्रोफेशनल अ‍ॅसॅसिन असू शकतात.
  • -मि. मार्टिनेझ, मि. सायमन ऑस्ट्री आणि मि. हिरोशी तिघांनीही 'घटनेच्या वेळी आपण रूममधेच होतो आणि 'रूम मध्येच रहावे' अशी घोषणा झाल्याने रूममधून बाहेर पडलो नाही, असे सांगितले.
  • -क्लिनिंग कार्टमधली वॅक्यूम क्लीनर आणि ईतर काही सामान काढून जागा मोकळी असल्यास तिथे एखादी व्यक्ती काही मिनिटे बसू शकते. कार्ट चहू बाजूंनी बंदिस्तं असल्याने आतले सामान दिसत नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेमके काय झाले असेल 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' मध्ये?
मिसेस ऑस्ट्रींचा खून झाला असल्यास कोणी, का व कसा केला असेल?
मि. ऑस्ट्रींवरही हल्ला झाला, तो कोणी केला असेल आणि का?

खुनी आणि खुनाबद्दल तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. थोडक्यात पोलिसांच्या रोलमध्ये जाऊन आपल्याला ही केस सॉल्व करायची आहे.
क्लू देण्याची गरज पडू नये असे सध्यातरी वाटते आहे. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत. मी शक्य तेवढ्या प्रतिक्रिया, शक्य तेवढ्या वेगाने आणि शक्य तेवढा मेंदू वापरून वाचत राहीन, समजून घेत राहीन आणि गरज वाटल्यास ऊत्तर देत राहीन.

केस सोडवायला घेण्याआधी हा धागा नक्की डोळ्याखालून घाला
https://www.maayboli.com/node/62828

घटना सोडून वरती बुखारेस्टबद्दल मी जे वर्णन केले आहे ते फक्तं मेकॅनिकली केस सोडवण्यापेक्षा वाचकांना काहीतरी थरारक वाचल्याचा अनुभव मिळावा ह्यासाठीच. ऑस्ट्री दांपत्य आणि केसमधले ईतर लोक एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीही बरेच लिहिले आहे. एकदा का घटनास्थळाचे आणि एकेका व्यक्तीचे कॅरिकेचर समजले की ती वर्णनात्मक माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास ) आणि खुनाची पद्धत समजू शकते. मान्य आहे ही केस थोडी मोठी झाली आहे, माहितीही खूप दिली आहे पण ऊलट त्या माहितीचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

केस सोडवण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!!

केस सोडवून कंटाळा आल्यास 'दि ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' सिनेमामधे दाखवलेले बुडापेस्ट हॉटेल कसे होते ते ह्या ४ मिनिटांच्या डॉक्यू. मध्ये बघायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=gYMfEKELveQ
विडिओ बघून झाल्यावर केस सोडवायला परत ईथे यायचे विसरू नका Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिस्टरांना मारणे नक्कीच चालले नसते कारण मग संशय शेवटच्या माणसावर (म्हणजे सर्वरवर) आधी आला असता. मिस्टरांना काहीच केलं नसतं आणि मिसेसना मारून खिडकी उघडून पण मेन दारातून पसार झाला असता तर?
मिस्टरांनी रास नहाणात आतून दार लावून घेतलं असतं तर त्याला कदाचित तेच करावं लागलं असतं. कारण आधी मिसेसचा खून आणि मग मिस्टरांना मारणे हा क्रम बदलणे शक्य न्हवते.>>>

बाथरूमचे दार बंद असेल तर त्याला मि ऑस्ट्रीचे ठसे नाही घेता येणार, आणि खिडकी उघडणे, बुटांचे ठसे उमटवणे, आणि जेवण लावणे हा उपद्व्यापही त्या १० मिनिटात आटपायचा आहे, त्यात नेमके मि ऑस्ट्री बाहेर आले, त्यांनी त्याला बघितलं तर परत पंचाईत.
त्यामुळे इथे थोडी risk होतीच.

BTW, त्या सर्व न केलेल्या बटाटयाचे प्रयोजन कळले नाही.

रेनर्डने दोन स्टेपमध्ये प्लॅनिंग केले ह्या खुनाचे.
१) हे काम विंटर वुल्फने केले आहे हा बनाव रचणे
२) आणि जर हा बनाव आहे असे पोलिसांना वाटल्यास त्यांना संशय घेता येईल असा एक गिनि पिग देणे

१) किचन ओट्यावरची अंगठी, ऊघडी खिडकी, सर्व न केलेले अ‍ॅल्यूमिनिअम फॉईलमधले बटाटे (जे खिशात, पिशवीत वगैरे नेता येऊ शकतात),
खिडकीखालच्या बर्फातल्या खुणा, मशीन रूम मधला अ‍ॅल्यूमिनिअम फॉईल आणि हीटरचे स्टेजिंग ह्या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की विंटर वुल्फ (जो क्रूर आणि धाड्सी आहे) तो कसातरी, कधी तरी रूममध्ये आला आणि कांड करून खिडकीतून पळून गेला. त्याने मशीन रूममध्ये
वादळाच्या रात्री आसरा घेतला (बटाट्याची अ‍ॅल्यु. फॉईल सापडल्याने ऑस्ट्रींची रूम व्हाया खिडकी ते मशीन रूम हा पाथ तयार होतो)
आणि पोलिस येण्याआढी कधी तरी डेरिंग करून स्की करत तो निघून गेला.

२) पण ही विंटर वुल्फचीच करणी आहे ह्यावर पोलिसांचा विश्वास बसेलंच असे नाही (कारण अंगठीचे वेगळेपण आणि विंटर वुल्फ चे ४ वर्षांपूर्वी दरीत पडल्याची माहिती) तर मग ते विचार करणार कोणी रचला असू शकतो हा बनाव. त्यांचा पहिला संशयित असेल जो मनुष्यं घटनेच्यावेळी रूममध्ये होता - मि. ऑस्ट्री.
कसा? त्याने सगळे स्टेजिंग करून स्वतःला मारून घेतले. जर त्याने स्वतःला फ्लॉवर पॉटने मारुन घेतले तर मग फ्लॉवरपॉटवर त्याचे पूर्ण ठसे सापडतील . (कारण विंटरवुल्फचे ठसे अंगठीवर नाहीत , खिडकीवर नाहीत, मिसेसच्या बॉडीवर नाहीत तर फ्लॉवरपॉटवर का सापडतील?
तर नाही सापडणार. तर मग त्याला फ्लॉवर पॉट धुण्याची गरजच काय आहे? तर गरज नाहीच. )
मग तो फ्लॉवरपॉट कोणी धुतला तर ज्याने तो शेवटी वापरला असू शकतो - मि. ऑस्ट्रींनी. म्हणजे विंटर वुल्फचा बनाव ऑस्ट्रींनी रचलेला असू शकतो. ( ज्याने हल्ला झाला त्याच वस्तुला टँपर करणे जरूरी होते संशय तयार होण्यासाठी. ) त्यांना विंटर वुल्फने त्याच्याजवळील एखाद्या वस्तूने माझ्या प्रहार केला असे भासवायचे होते पण पाणी ओघळून नाईट स्टँडवर बर्फ साठल्याने फ्लॉवरपॉट पिच्चरे मध्ये आला आणि मग त्यावर
ऑस्ट्रींचे रक्तं व ठसे सापडणे ओघाने आले.

मी आधी म्हंटले तसे ... त्याची सर्वात मोठी रिस्क मि. ऑस्ट्रींनी त्याचा चेहरा किंवा कपडे बघणे ही होती. बाथरूमचे दार लॉक असते तर ते त्याला ऊघडावे लागले असते. तसेही ते लॉक्स नुसती सुई किंवा हेअरपीन घालून प्रेस केले की ऊघडतात. बनावाचा संशय ऑस्ट्रींवर लोटण्यासाठी त्यांना झोपवणे जरूर होते तो फक्तं मिसेसला मारून निघून गेला असता तर लवकर अडकला असता.

बुटांचे ठसे उमटवणे, >> ठसे, मशीन रूममधला सेटअप हे सगळे त्याने आधीच म्हणजे सहाला गेट बंद होण्याआधीच केले, कदाचित ऑस्ट्री ज्यवेळी बाहेर होते त्याच वेळी.

बायदवे... खिडकीतून उडी मारली की मागच्याबाजूला कंपाउंड नाही का? टिपिकली सिक्युअर्ड हॉटेल असेल तर उंचच उंच भिंती इत्यादी नसेल का?
डायरेक्ट डोंगराच्या मागे स्की करून जावं लागेल अशा एज वर हॉटेल का आहे?

हो, हॉटेल त्याच्या चहू बाजूंनी मोकळी जागा, एका कोपर्‍यात मशिनरी रूम आणि मोकळ्या जागेनंतर वीस फुटी ऊंच भिंत असा सेटअप डोक्यात होता.
आणि तसा सांगायचाही प्रयत्न केला. अंदाज येण्यासाठी 'दि ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' ची लिंकही दिली होती.
त्या ऊंच भिंती म्हणजे किल्ल्यासारख्या सीलबंद असे काही नाही, त्यांच्याही पलिकडे जाऊ शकतो. तिसर्‍या फोटोमध्ये दिसते ते हॉटेलचे मेन गेट / डोर बंद झाले की हॉटेल सीलबंद होते.

Pages