'केसेसच्या' निमित्ताने

Submitted by हायझेनबर्ग on 14 June, 2017 - 11:59

खरं तर हा धागा पहिली केस ईथे लिहिण्याआधीच टाकायला हवा होता, तेव्हा ते जास्तं संयुक्तिक झाले असते. पण हरकत नाही, ईथून पुढे जे कोणी अश्या केसेस लिहिणार आहेत वा सोडवणार आहेत त्यांना ह्या माहितीचा नक्कीच ऊपयोग होईल असे वाटते.

शाळेत असतांना आपण सगळ्यांनीच भौतिक/रसायन शास्त्राचे प्रयोग केले असतील, भुमितीची प्रमेयं सोडवली असतील व त्या अनुषंगाने प्रयोग वह्याही भरल्या असतील. पुढे कॉलेजात जाऊन अजून किचकट 'एक्सपरिमेंट्स' केले असतील, त्याच्याही पुढे जावून लॅब्ज मध्ये कदाचित रिसर्च वर्कही केले असेल. नोकरी/ कामाच्या ठिकाणी दैनंदिन आयुष्यात स्वतःच्या वा ईतरांच्या कामाचे अ‍ॅनालिसिस केले असेल किंवा साध्या रोजच्या आयुष्यात अमुक घेऊन तमुक केल्याने ढमुक होते (दोन वाट्या तांदूळ व पाणी घेवून, १५ मिनिटे कूकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवल्यास, भात तयार होतो..... असे ) ह्याचा अनुभव घेतला असेल.

ह्या सगळ्या कामांमध्ये एक गोष्टं कॉमन आहे जी आपण जाणता वा अजाणता कायम करत राहतो ती म्हणजे 'क्रिटिकल थिंकिंग/ रिझनिंग', कारणीमीमांसा.

अमुक -> तमुक -> ढमुक
ऊद्देश -> सामुग्री आणि कृती -> निष्कर्ष
प्रमेय -> सिद्धता -> सिद्धं
डेटा -> प्रोसेसिंग -> रिझल्ट

एक ऊदाहरण बघू
-ऊद्देश - दिलेला द्रवपदार्थ अ‍ॅसिडिक आहे की अल्कलाईन ते ओळखणे
-सामुग्री - द्रव पदार्थ, लिटमस पेपर
कृती - दिलेल्या द्रवपदार्थात निळा लिटमस पेपर बुडवा
-निष्कर्ष - लिटमस पेपर लाल झाल्यास द्रवपदार्थ अ‍ॅसिडिक अन्यथा अल्कलाईन वा न्यूट्रल

वर दिल्या प्रमाणे जसे प्रत्येक प्रयोगाचे साधारणतः तीन भाग असतात, तसेच प्रत्येक अर्ग्यूमेंटचे वा केसचे सुद्धा. बेसिस, प्रेमिस आणि कनक्ल्यूजन
आपण खेळलेल्या तीनही केसेस तुम्हाला ह्याच फॉरमॅट मध्ये सापडतील.

बेसिस -> घटनेच्या जागेबद्दल ओळख, पात्रं परिचय, त्यांचे एकमेकांशी असलेल्या हितसंबंधांबद्दची माहिती ( थोडक्यात केसच्या सुरूवातीलाच लावलेले पाल्हाळ, घटना घडण्याच्या आधी सांगितलेली गोष्टं. )
प्रेमिस -> टाईमलाईन, मेडिकल रिपोर्ट, पात्रांचे जाबजबाब, क्राईम सीनची माहिती, प्रासंगिक माहिती ( जसे कॅमेरा खालून गेल्यास कॅमेरात दिसत नाही, गाडीची बोनेट फ्रेम मिसिंग होती ई. ), तांत्रिक माहिती ( कॅमेरा फुटेज, फोन लॉग, बँक अकाऊंट, एंट्री/एक्झिट रेकॉर्ड्स ) आणि खबरींनी पुरवलेली माहिती ई.
कनक्ल्यूजन/ ईनफरन्स -> अनुमान किंवा निष्कर्ष जे आपल्याला वरचे दोन्ही ( बेसिस आणि प्रेमिस ) वापरून काढायचे आहे.

थोडक्यात
बेसिस -> प्रेमिस -> कनक्ल्यूजन किंवा बेसिस + प्रेमिस -> कनक्ल्यूजन

एक ऊदाहरण बघू
बेसिस - बँकेत कामाला असलेला विनोद रोज ठाण्यावरून दादरला जाण्यासाठी सकाळी ७ ची लोकल पकडतो
प्रेमिस - काल सकाळी ७ वाजता ठाणे स्टेशनात रुळांवर विनोदचा मृतदेह सापडला

कनक्ल्यूजन काढतांना काही गोष्टी, मुद्दे अझ्यूम करणे/ गृहीत धरणे सगळ्यांनाच जरूरीचे आहे, सगळ्यांच्या हिताचे आहे. त्या गोष्टी किंवा मुद्दे काय आहेत ते खाली ५ भागात जनरलाईझ्ड केले आहे -

१) बेसिस आणि प्रेमिस दिले आहेत तसे १००% सत्य मानणे
-विनोद बँकेत कामाला आहे
-विनोद रोज लोकल ट्रेनने दादरला जातो
-ठाणे स्टेशनात रूळावर विनोदचा मृतदेह सापडला

२) बेसिस आणि प्रेमिस मध्ये दिलेली माहिती कनक्ल्यूजन काढतांना गृहीत धरणे वा वापरणे
-विनोदचा मृत्यू आधीच विषप्रयोगाने झाला असावा
-विनोदला त्यादिवशी कल्याणला जायचे असेल
-विनोदचे लोकल ट्रेनच्या ड्रायवर/मोटारमनशी वैर असेल
-विनोदचा मृतदेह सापडण्याची वेळ चुकली असावी

३) बेसिस आणि प्रेमिस मध्ये दिलेली माहिती बदलणे
-विनोद बँकेत कामाला आहे पण त्यादिवशी बँक हॉलिडे असेल असे समजू
-विनोद रोज लोकल ट्रेनने दादरला जातो पण त्यादिवशी त्याला एक्सप्रेस ट्रेनने जायचे असेल असे समजू
-ठाणे स्टेशनात रूळांवर विनोदचा मृतदेह सापडला पण ते रूळ वापरात नसलेल्या लाईनचे आहेत असे समजू

४) बेसिस आणि प्रेमिस मधल्या माहितीतला परस्पर संबंध बदलणे
-विनोदला ७ वाजता बँकेसाठी निघायचे असते म्हणूनच ठाणे स्टेशनातून ७ वाजता ट्रेन निघते

५) आपले जजमेंट/रॅशनॅलिटी बेसिस-प्रेमिस मध्ये वापरणे
-विनोद बँकेत कामाला असल्याने शिकलेला असावा त्यामुळे त्याने स्कायब्रिज न वापरता रूळ ओलांडला हे पटत नाही
-जनरली ९ वाजता ऊघडणार्‍या बँकेत काम करणारा विनोद ७ वाजता घरातून निघेल हे पटत नाही
-७ ची लोकल गेली तरी ७:१० ची लोकल विनोद पकडू शकतो, १० मिनिटे वाचवण्यासाठी तो रूळ का ओलांडेल?
-ठाण्यात बँका असतांना विनोद दादरला काम करण्यासाठी का जाईल?

कनक्ल्यूजन - रूळ ओलांडतांना विनोदचा गाडीची धडक बसून अपघात झाला असावा, त्याला कोणीतरी ढकलले असावे किंवा त्याने आत्महत्या केली असावी.

हे झाले बेसिस आणि प्रेमिस कसे वापरावेत वा वापरू नयेत ह्याचे ठोकताळे. अजूनही बारीक सारीक डूज आणि डोन्ट्स आहेत पण सगळेच ईथे लिहित बसत नाही. अर्थात ही बेसिक माहिती सगळ्यांना असणारंच ह्याबद्दल शंका नाही पण 'केसेसच्या' निमित्ताने मला तिचा पुन्हा ऊहापोह करणे जरूरी वाटले ईतकेच. वरचे ठोकताळे वापरूनही प्रत्येक जणाचे बेसिस आणि प्रेमिस मधल्या माहितीचे ईंटरप्रिटेशन वेगवेगळे असू शकतेच आणि त्याबरहुकून त्यांचे कनक्ल्यूजन सुद्धा वेगळे असू शकते, जी ह्या खेळातली खरी मजा आहे. विनोदच्या केस मध्ये अपघात, खून आणि आत्महत्या हे तीनही कनक्ल्यूजन्स बरोबर आहेत. जर प्रेमिस मध्ये असेही दिलेले असेल की 'विनोद रुळांवर असतांना दुसर्‍या कुणाला तिथे बघितले गेले नाही' तर मग खुनाची शक्यता दुर्लक्षित करता येईल. 'विनोदचा पाय रूळाच्या सांध्यांमध्ये अडकलेला होता' मग आत्महत्येच्या शक्यतेवरही विचार करण्याची गरज ऊरत नाही आणि कनक्ल्यूजन 'अपघात' असे म्हणू शकतो. मी पुन्हा प्रेमिस मध्ये 'विनोदची नेहमीची ऑफिस बॅग मिसिंग आहे' असे टाकले की 'अपघात' सोडून 'खून आणि आत्महत्या' ह्या दोन्ही शक्यता नव्याने ओपन होतात.
थोडक्यात बेसिस वा प्रेमिस मध्ये दिलेली असल्याशिवाय ती माहिती मी कनक्ल्यूजन काढण्यासाठी वापरू शकत नाही.

गणितात जश्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार प्रक्रिया असतात तसेच डेरिवेटिवज सुद्धा. बेसिस + प्रेमिस वापरून त्यातल्या माहितीवरही आपल्याला डेरिवेटिव मांडता येईल. वरचे डूज/डोन्ट्स वापरून कनक्ल्यूजनला टॉप डाऊन वा बॉटम अप अ‍ॅप्रोच करू शकतो. म्हणजे आधी बेसिस + प्रेमिस मग कनक्ल्यूजन ( ऊदा. दिलेल्या माहितीवरून दिनेश खुनी आहे ) किंवा अगदी ऊलटे, आधी कनक्ल्यूजन आणि मग त्याला भक्कम करणारी बेसिस व प्रेमिस मधली माहिती ( ऊदा. अरूण खुनी आहे असे समजले तर त्याने हे कसे जमवले असावे ).
कनक्ल्यूजन हे गणिताचे ऊत्तर असेल तर ते मिळवण्यासाठी कुठल्या पद्धती वापरता येतील ह्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू.

तीनही केसेसवर विचार करतांना मला फार मजा आली आणि तुम्हा सगळ्यांनाही आली असेल अशी अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय
अब्सॉल्युटली सहमत लॉजिक बाबत Happy

एकदम सिस्टमेटीक .. जबरी.. माझं तर डोकेच भंजाळायचे. यात किती सोपे करून सांगितलेय.. तरी जमणार नाही ती गोष्ट वेगळी Happy

मी प्रयत्न केले होते केसेस सोडवायचा, पण प्रचंड डिटेलींग होते सर्व केसेसमध्ये. एवढे पर्म्युटेशन काॅम्ब्युनेशन होते की नाद सोडून दिला. अचुक धागा शोधून काढणे एवढ्या डिटेलींग मध्ये खरच अवघड. हॅट्स ऑफ. हाब तुसी ग्रेट हो.

हे भारीये!
मला तर केसेसची उकल करण्याच्या कामापेक्षा सर्वांचे प्रतिसाद वाचायलाच भारी मजा येते.

फारएण्ड, तुमच्यासारख्या विचक्षण माबोकरांनी त्या केसेसकडे दुर्लक्ष केलं तर कसं होईल! Wink Light 1

मस्त लिहिलय
अब्सॉल्युटली सहमत लॉजिक बाबत Happy>> +१

खूप मस्त आणि समर्पक लिहिलंय Happy

तुम्ही आयझक असिमॉव्हची "Black Widower's Club" ही सिरीज वाचली आहे का? त्यात हीच मीमांसा दिली आहे. त्यात प्रत्येक गोष्टीत अशीच एक केस पुढे येते आणि क्लब मेंबर्स आपापले तर्कवितर्क चालवून ती उलगडू पाहातात. मग शेवटी सर्व धागे एकत्र करून आणि परफेक्ट लॉजिक वापरून एकजण ती केस सोडवतो. फारच सही आहेत ती पुस्तके! तुम्ही वाचली नसल्यास जरूर वाचा.

पुढचे कोडे कधी? Happy

हाब तुझी sun sign , Virgo का ? >> नाही, सन-मून दोन्ही लीओ आहे.
कशा संदर्भात विचारले, वर्गो वाल्यांसाठी 'तुम्हारे हाथमें एक खून लिखा है' असं काही तरी भाकित असतं का? Lol माझ्या हाताने मी ईतक्यातंच कमीतकमी तीन तरी खून शब्दशः लिहिले आहेत. Proud

नाही वाचली चीकू... असिमोव च्या आर्मचेअर वाल्या एक दोन वाचल्याचे आठवते आहे पुसटसे. वाचायला नक्कीच आवडेल... वेळेचे कसे जमवायचे असा प्रश्नं पडतो.

धन्यवाद सगळ्यांना प्रतिसादाबद्दल.

कशा संदर्भात विचारले, वर्गो वाल्यांसाठी 'तुम्हारे हाथमें एक खून लिखा है' असं काही तरी भाकित असतं का?
>>>
नाही हाब इतका बारीक विचार, अफाट डिटेलिंग , अ‍ॅनेलिटिकल माईंडसेट , लिंडा गूडमन या लेखिके नुसार वर्गोज मधे असतो. म्हणून विचारलं

भारी लिहिलंय.

उत्तम गुन्हेगारी/गुप्तहेर कथा तू नक्कीच लिहू शकशील. सिरिअसली विचार कर याबाबत! >> +1

करू करू लवकरंच काहीतरी करू.... वेळेचा जरा क्रंच चालू आहे. एवढे सगळे विचक्षण (अर्थ ललिता-प्रितीला विचारा Lol ) मायबोलीकर आपला वेळ आणि श्रम ह्यावर लावतात की मला केस मध्ये काही हाफबेक्ड, ओपन धागेदोरे नाही राहिले ना असा धाक पडलेला असतो कायम. Happy

पुढची केस येउद्या लवकरच. माबोवर काहि वाचण्यासाअखं मटेरिअल नाही सध्या.

विचक्षण (अर्थ ललिता-प्रितीला विचारा Lol ) >>>>> Lol

मजा आली वाचायला. खुप दिवसानी माबोवर आल्याने व अजुन ते धागेच पाहिले नसल्याने आधी वाटली 'केसेस' मालिका कुठे टीव्हीवर सुरुये व ते बघुन चर्चासत्र इथे आहे की क्काय?? तर तसे नाहीये म्हणुन हायसे वाटले. मग कोणीतरी लिहिले त्यावरुन हायबर्ग डिटेक्टीव आहेत असेही वाटले. Happy
आता ते धागे सवडीने.

हो. आता मध्यमवर्गीय केस हवी. आणि त्यात कुणी वूडलँडचे शू घालायला नको. ह्या कंडीशन.
जोकिंग... लिहा हाब वाट बघतोय.

पहिल्या तीन केसेस मधल्या संधीसाधू खुन्यांपेक्षा पुढच्या केस मधल्या सिरियल किलरला रेप्युटेशन बिल्ड करायला जरा वेळ द्या हो Lol

हो. आता मध्यमवर्गीय केस हवी>>>

सहमत. म्हणजे आधीच्या हेरिटेज, अक्वा सेरेनिटी, एमराल्ड रिज वगैरे नावांपेक्षा 'केळकर सदन केस', 'जोशी वाडा केस', 'तांब्यांची चाळ केस' असं वाचायला काय भारदस्त वाटेल नाही Wink

चीकू Lol
अहो त्याला वेगळ्या चर्चेचा संदर्भ होता.

असू देत हाब. सेरेनिट्या आणि हेरिटेज वगैरे. जरा ग्लॅमर राहतं. शिवाय आता पेन्टहाउस, सिक्युरिटी कॅमेरे सेफ्टी व्हॉल्ट वगैरे ची सवय झालीय आम्हाला. जोशीकाकूंच्या पाटल्या चोरीला गेल्याची केस सोडवायला वर्थ नाही वाटणार Lol

त्याच संदर्भाने म्हटलय, लोकांच्या luxury आणि necessity च्या व्याख्या वेगळ्या असतात, 'चाळ', 'वाडा', 'सदन' असं आलं म्हणजे आपसूकच मध्यमवर्गीय ठरवला जातो, 'हेरिटेज', 'सेरेनिटी' वगैरेमधे मध्यमवर्गीय लोक राहात नाहीत Wink

'केळकर सदन केस', 'जोशी वाडा केस', 'तांब्यांची चाळ केस' असं वाचायला काय भारदस्त वाटेल नाही >>
असू देत हाब. सेरेनिट्या आणि हेरिटेज वगैरे. जरा ग्लॅमर राहतं. शिवाय आता पेन्टहाउस, सिक्युरिटी कॅमेरे सेफ्टी व्हॉल्ट वगैरे ची सवय झालीय आम्हाला. जोशीकाकूंच्या पाटल्या चोरीला गेल्याची केस सोडवायला वर्थ नाही वाटणार >> Lol काही तासांसाठी का होईना एकदम भारी वाटतं नुसतं मनातल्या मनात त्या अपस्केल टेक्नो घरांमध्ये फिरून घ्यायला. Wink
ओरिजिनल शेरलॉक, पॉरो मध्ये वगैरे कंट्रीसाईड कॅसल्स दाखवले की कसं पहिल्या सेकंदापासूनच गूढ, मिस्टेरियस वाटायला लागतंय. Happy