महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क

Submitted by दीपा जोशी on 16 August, 2017 - 06:00

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क

(टिपः- हा लेख ७जुलै २०१७ च्या लोकप्रभा अन्कात प्रसिद्ध झाला आहे.)

yellow stone spring 2 IMG_20160702_214616301_HDR.jpg

लेखाचे नाव वाचून दचकायला झाला का? पण मी बरोबर लिहिलंय हं ! खरोखरीच. सध्या उद्रेक होत नाही-पण जागृत आहे -अश्या एका महाज्वालामुखीच्या प्रदेशात तीन दिवस फिरून आलेय. अक्षरशः -कल्पनातीत सुंदर, भव्य , त्याचबरोबर आपल्याला खुजेपणाची जाणीव करून देणारे निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार तिथे पाहायला मिळाले.
त्याचं असं झालं… अमेरिकेत लेकीकडे थोडे दिवस गेले होते, तेव्हा लेक-जावयानी आग्रह केला की सलग ४ दिवस सुट्टी मिळतेय तर कुठे तरी जाऊया. कुठे कुठे जाऊ शकतो, तिथे बघण्यासारखं काय आहे, एव्हड्या उशीरा ठरतंय तर आता तिकिटं कशी मिळणार, राहण्यासाठी बुकिंग आता शिल्लक नाहीय .. अशा सर्व प्रशनांचा सर्वांकडून किस पाडला गेला. आणि, हो -नाही करता करता शेवटी लेकीने फर्मानच काढले. आपण ‘येलो स्टोन नॅशनल पार्क ला’ जाणार आहोत. तुम्ही पाहण्यासारखंच आहे- नव्हे -पाहायलाच हवं हे ठिकाण. ती एकदा जाऊन आलेली असल्याने आम्हाला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता!
पुढचे दोन दिवस नेहमीचं व्यस्त जीवन सांभाळत दोघेही गूगल मध्ये मान खुपसून पुढचा प्लॅन ठरवायला बसली. महाग झाली असली तरी विमानाची पटापट तिकिटे काढून झाली. पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या कारचं बुकिंग करून झालं. अजून महत्वाचा प्रश्न रेंगाळलाच होता. राहायचं कुठं? कारण येलो स्टोन च्या कुठल्याच लॉज मध्ये आता जागा शिल्लक नव्हती. एखाद-दुसऱ्या लॉज मध्ये जागा होती. पण आता दर भरमसाठ लावले गेले होते. अश्या वेळी मुख्य ठिकाणापासून थोड्या अंतरावर आसपासची जागा बघायची आमची नेहमीची क्लृप्ती माञ कामाला आली! आणि ‘येलो स्टोन नॅशनल पार्क’ पासून, कारने तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या एका ठिकाणी लाकडाच्या ओंडक्यांनी बनवलेल्या आणि ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केलेल्या जुन्या पध्दतीच्या ‘ऍन केंट केबिन’ चा आम्हाला शोध लागला. फूट फूट व्यास असणाऱ्या मोठमोठ्या लाकडाचे ओंडके आडवे एकावर एक रचून ‘ऍन केंट केबिन’च्या भिंती, आणि हेच लांबलचक ओंडके उभे एकाला एक जोडून पार्टीशन केले होते. सभोवती ‘ग्रँड टेटोन नॅशनल पार्क’ असल्याने ‘एव्हडं लांब जातोय, तर तेवढाच आणखी एका पार्कचा लाभ आणखी पदरात पडून घेता येईल’ असा सुज्ञ, मध्यमवर्गीय विचार करून ती ओंडक्यांची ‘हिस्टोरिकल झोपडी’ आम्ही पक्की करून टाकली.
अर्थात तो अत्यंत शहाणपणाचा निर्णय होता हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं! कारण, जागेच्या वर्णनात दिल्याप्रमाणे, हिरव्यागार हिरवळीवरची ही छोटीशी, दोन-दोन खोल्यांची आणि जमिनीपासून छतापर्यंत पूर्ण लाकडाची असलेली तीन निवासस्थाने शंभर वर्षांपूर्वीची, आणि खेड्याकडच्या पद्धतीची साधी होती. त्यामुळे, त्या काळच्या लोकांची राहणीमानाची झलक आपण अनुभवत आहोत ही कल्पना भारीच रोमांचकारी वाटत होती. अर्थात स्वयंपाकघर आणि बाथरूम मध्ये माइक्रोवेव्ह, फ्रीझ, बाथ टब, वॉशिंग मशीन वगैरे गरजेच्या गोष्टीं वापरून आधुनिकीकरणही केले होते. फूट फूट व्यास असणाऱ्या मोठमोठ्या लाकडाचे ओंडके आडवे एकावर एक रचून ‘ऍन केंट केबिन’च्या भिंती, आणि हेच लांबलचक ओंडके उभे एकाला एक जोडून पार्टीशन केले होते. आतल्या खोलीतला डबल बेड सुद्धा असाच भल्या मोठ्या गाठी गाठी असणाऱ्या ओंडक्यांचा आणि बराच उंच होता. त्याच्यावर गाद्या, रजया रचल्याने तो आणखीनच उंच झाला होता.
तसं सगळंच फर्निचर जुन्या पद्धतीचं होतं. एखादे वस्तू-संग्रहालय पाहावे तसे सगळे पाहिले! बाहेर आलो तर दूरवर नजर बांधून ठेवणारा ‘ग्रँड टेटोन’ पर्वत दृष्टीस पडत होता. निळा-जांभळा टेटोन पर्वत, आणि मधे - मधे त्याची बर्फामुळे पांढरी- चमकदार दिसणारी टोकदार शिखरे हे सगळं दर्शन केवळ अप्रतिम!

fig2 grand teton mountainIMG_20160701_211527519_HDR.jpg’ग्रँड टेटोन’ पर्वत

‘येलो स्टोन’ हा ज्वालामुखी आहे

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे (म्ह्नणजे ५ वाजता! ) उठून आवरून ‘येलो स्टोन पार्क’ ची वाट धरली. १८७२ साली निर्माण झालेले हे पार्क अमेरिकेतलं (आणि कदाचित जगातलंही) सगळ्यात पहिलं पार्क आहे. जागतिक वारसा-स्थळ म्हणून मान्यता असलेलं येलोस्टोन पार्क म्हणजे एक सध्या उद्रेक होत नसलेला पण ‘सक्रीय’ असलेला महा -ज्वालामुखी आहे. अमेरिकेच्या वयोमिंग राज्याच्या वायव्य भागात याचा ९६ टक्के भाग येतो, तसंच ते मोन्टाना आणि आयडाहो या दोन राज्यांच्या काही भागातही पसरलं आहे. अर्थात पार्कची निर्मिती झाली तेव्हा ही वेगवेगळी राज्ये म्हणून अस्तित्वात देखील नव्हती. या पार्कचं नाव त्या प्रदेशातून वाहणाऱ्या ‘येलो-स्टोन‘ नदीच्या नावावरून पडलं आहे. लाव्हा थंड झाल्यानंतर तयार झालेल्या खडकांच्या थरातून वाहताना खडक झिजून खूप खोल घळई तयार होत गेली. आता तर १२०० फूट खोल आणि ४००० फूट रुंद, ४० किलोमीटर लांब अशा महा-घळई मधून नदी वाहते आहे. आणि तिच्या दोन्ही बाजूना लालसर, गुलाबी, जांभळट, नारिंगी अश्या विविध छटा असणाऱ्या पण मुख्यत्वे करून पिवळ्या रंग असणाऱ्या खडकांचा डोंगराळ भाग दिसतो. अच्छा! म्हणून तिचं नाव ‘येलो - स्टोन’ तर.
इथला तसराळ्यासारखा थोडासा खोलगट पठारी प्रदेश म्हणजे ‘बेसिन’. नऊ मुख्य ‘बेसिन्स’ आहेत. प्रत्येक बेसिन मध्ये असंख्य मोठमोठे उष्ण पाण्याचे झरे आणि त्यातून निर्माण होणारे छोटे मोठे हजारो ‘गिझर्स‘ म्हणजेच कारंजी आहेत.
तर हा ‘येलो- स्टोन ज्वालामुखी’ म्हणजे आत्तापर्यंत तीनदा महा- उद्रेक झालेला ज्वालामुखी. पहिला उद्रेक एकवीस लाख वर्षांपूर्वी, दुसरा तेरा लाख वर्षांपूर्वी, आणि शेवटचा सहा लाख चाळीस हजार वर्षांपूर्वी. हे सगळे तप्त लाव्हाचे शक्तिशाली उद्रेक भयंकर विनाशकारी होते. त्या त्या वेळच्या सृष्टीला क्षणात होत्याची नव्हती करून सोडणारे. हजारो किलोमीटर जमिनीवर राखेचे थर पसरवणारे. शेवटच्या उद्रेक झाला तेव्हा ज्वालामुखीचं मुख आत कोसळले. आत ओढल्या गेलेल्या त्या भागामुळे तेथे पंधराशे स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाच्या राक्षसी आकाराचा उथळ वाडगा तयार झाला. त्यानंतरही एक लाख साठ हजार वर्षांपूर्वी अजून एक छोटा उद्रेक झाला. आता यावर कोणी म्हणेल कि, ‘ह्या! .. लाखो वर्षांपूर्वी झाला ना उद्रेक.. मग आता काय त्याचे’…पण, तेव्हा तयार झालेल्या ‘मॅग्मा‘ मधली उष्णता अजूनही भूपृष्ठाखाली आहे. पृथ्वीवरील जमिनीखालील उष्णेतेमुळे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पैकी अर्ध्या या भागात एकवटल्या आहेत. दरवर्षी छोटे छोटे हजार एक भूकंप तेथे होत असतात; तर सर्व मिळून दहा हजार भू-औष्मिक वैशिष्ठ्ये आहेत. असं म्हणतात की, तांत्रिक दृष्ट्या- पुढचा उद्रेक कधीही होऊ शकतो. म्हणूनच त्या विषयातले तज्ज्ञ, इथल्या हवामान आणि भू-स्तरीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. अर्थात काही तज्ज्ञांच्या मते अगदी नजीकच्या काळात उद्रेक होणार नसल्याने तेथे जाणे सध्या तरी सुरक्षित मानले जाते.

scenearyIMAG2096.jpg

ही माहिती मिळाल्यावर आता आपल्याला साहजिकच तो ज्वालामुखी आणि तिथे तयार झालेला ‘उथळ वाडगा’ पाहायचे असतात. पण दिसणार कसा ? कारण, हे पार्क आणि आपण उभे असलेली जागा, म्हणजेच हा महा -ज्वालामुखी आहे! आणि पार्कचा बराचसा भाग म्हणजे, तो राक्षसी वाडगा आहे. म्हणजे, डायरेक्ट आपण महा- ज्वालामुखीच्या तोंडावरच उभे असतो म्हणा ना! ते पण, सध्या उद्रेक होत नसला, तरी ‘सक्रीय ’ असणाऱ्या आणि कधीही उद्रेक होऊ शकणाऱ्या ज्वालामुखीच्या !..... बापरे..... त्या कल्पनेचं जागीच उडायला झालं !
थक्क करणारे सृष्टीचे नाट्य
या ज्वालामुखीच्या ‘सकरिय’तेची झलक आम्हाला लगेचच पाहायला मिळाली.
गाडीतून जाताना दूरवर जमिनीवरून पांढऱ्या धूरासारखे काही दिसत होते. जवळ जाऊन पाहतो तर तो होता उकळत्या पाण्याचा झरा. त्यातून पांढऱ्या रंगाच्या वाफा निघत होत्या. त्यामध्ये सल्फर -डाय - ऑक्साईड, कार्बन- डाय - ऑक्साईड, हायड्रोजन -सल्फाइड, वगैरे… वगैरे वायूंचं मिश्रण असल्याने या वाफा पांढऱ्या दिसत होत्या. या सगळ्या वायूंमुळे ,तिथले वातावरण रासायनिक प्रयोगशाळेत असतो तश्या एका विशिष्ठ वासाने भरून गेले होते. खाली जमिनीवरून उकळते पाणी वाहत होते, त्यावरून या वाफा मंद गतीने, तरंगत तरंगत पुढे जात होत्या. पुढे वेगवेगळ्या ‘गिझर बेसिन’ मध्ये जागोजागी असे धुरकट वाफानी वेढलेले उकळत्या पाण्याचे झरे, उकळते पाणी असणारी आणि कडा , छोटी-मोठी कुंडं दिसले. तिथे फार वेळ उभे राहणे शक्य होत नाही, कारण वातावरणातील हायड्रोजेन सल्फाइडचे सारखे वायूंचे प्रमाण खूप असल्याने डोळे चुरचुरायला लागतात.
बिस्कीट बेसिन मधला ‘ज्वेल गिझर’ पाहिला तेव्हा १०-१२ फूट रुंदीच्या खड्ड्यातून आधी उकळतं पाणी खदखदतंय असं दिसलं. त्याची पातळी वाढत गेली…. क्षणात ते झुईईईई आवाज करून उंच उसळलं.. आकाशाकडे झेपावलं आणि बघता बघता पन्नास-साठ फूट उंच कारंजे काही मिनिटांसाठी निर्माण झाले. हे ‘फाउंटन- गिझर’ होते. म्हणजे भू- पृष्ठाखालील उकळते पाणी भूपृष्ठावर येताना अचानक निर्माण झालेल्या वाफेच्या दाबामुळे आकाशाकडे झेपावते आणि कारंज्यासारखे उंच उडते, काही मिनिटांसाठी पाण्याचा एक स्तंभच तिथे निर्माण होतो.

spring IMG_20160702_211601114_HDR.jpg

त्यापैकी अत्यंत प्रसिद्ध असलेले, अप्पर गिझर बेसिन मधले दीड- पावणे दोनशे फूट उंच उडणारे उकळत्या पाण्याचे कारंजे म्हणजे ‘ओल्ड फेथफुल गिझर’. हे दर दिड तासांनी उसळणारे आणि पाच मिनिटांपर्यंत आपले भव्य दर्शन घडवणारे कारंजे आहे. भूपृष्ठाखाली असणाऱ्या मॅग्मा मुळे तप्त झालेल्या खडकाच्या संपर्कात भूपृष्ठाखालील पाणी आल्याने त्या प्रचंड उष्णतेमुळे जमिनीच्या पोटातले पाणी किती तापते, आणि त्यामुळे भूपृष्ठावर कशा घडामोडीं होतात यांचे उत्तम उदाहरण आहे.
नॉरिस गिझर बेसिन हा अति तप्त आणि सतत बदलणारा भाग आहे. पांढऱ्या खडकांच्या पोर्सेलीन बेसिन मध्ये लोह- ऑक्साईड मुळे लालसर -नारिंगी पट्टे वरून खूपच छान दिसतात.
बरेच ठिकाणी राख, साठलेले क्षार यांची दलदल आणि चिखलाच्या डबक्यातून सतत बुडबुडे येत होते. कारण, जमिनीखाली असलेल्या उष्णतेमुळे तिथला चिखल अक्षरशः ‘उकळायला’ लागला होता. चिखलातल्या राखेत असलेल्या सल्फर मुळे, इथेही हवेत त्याचा दर्प जाणवत होता. अजून बऱ्याच ठिकाणी तर जमिनीवरच्या छोटी छोट्या उंचवट्यांना गोल भोक होते, आणि त्यातून सतत पाण्याची वाफ बाहेर येत होता. ही धुराडी म्हणजे जणू उद्रेक होण्यापूर्वीचे लहान - लहान ज्वालामुखीच! जमिनीखाली अजूनही बरीच उष्णता साठली आहे ती अशा धुराड्यांचा स्वरूपात बाहेर पडू पहाते.
याशिवाय, इथले मोठमोठे विविध डोह त्यांच्या नैसर्गीक सौन्दर्याने जागीच खिळवून ठेवतात. इंद्रनीळ खड्याच्या निळाईचा शांत आणि सुंदर ‘सफायर पूल’ , आकाशी रंगाचा ‘ओपल पूल’ , नॉरीस गिझर बेसिन मध्ये असणारा आणि पाण्यातल्या सल्फर मुले पिवळ्या झालेल्या पाण्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडल्याने पाचूच्या रंगाचा झालेला ‘इमराल्ड स्प्रिंग’ ही खरोखरीच डोळे तृप्त करणारी सुंदर स्थळे आहेत.

बिस्कीट बेसिन मध्ये असणारा इंद्रनील खड्यासारखा ‘सफायर पूल’

fig 5 IakeMG_20160702_223304419_0.jpg

याव्यतिरिक्त पार्क मध्ये गरम पाण्याची मोठी मोठी कुंडे आहेत. अमेरिकेतले सगळ्यात मोठे आणि जगातले तीन नंबरचे ‘ग्रँड प्रिझमॅटिक’ कुंड पाहिले. अबब..... एखाद्या दहा मजली बिल्डिंगला पोटात घेईल एवढं खोल आहे म्हणे! मध्यभागी स्फटिकासारखे निळे पाणी असणाऱ्या या कुंडाच्या कडे-कडेला मात्र ईंद्र- धनुच्या तांबडा, पिवळा,लाल- नारिंगी ,हिरवा, निळा, जांभळा अशा स्फटिकातून दिसाव्यात तशा रंगाच्या छटा दिसतात. तीनशे सत्तर फूट व्यास व दीडशे फूट खोली असणारे हे ‘महा -कुंड’ पाहण्यासाठी भोवती लाकडाचा रस्ता केला आहे. त्यावरूनच चालायचे असते. त्याशिवाय सगळीकडे जागोजागी ‘असुरक्षित जागा’ अश्या पाट्या लावल्या होत्या. अशा ठिकाणी भू-कवच पातळ असल्याने भूपृष्ठाखालील मॅग्माची उष्णता कोणत्याही रूपात बाहेर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे जपून फिरण्याच्या सूचना होत्या जून २०१६ मध्ये एक अति उत्साही पर्यटक ‘नॉरीस गिझर बेसिन’ मध्ये धोक्याची सूचना असतानाही असाच गेला आजूबाजूला भटकायला. पाय घसरून पडला गंधकाच्या गरम पाण्याच्या कुंडात आणि जागीच मेला .

yelow stone springIMG_20160702_211846740.jpg

आश्चर्याची बाब ही, कि इथले सगळीकडचे पाणी अति- उष्ण (म्हणजे बऱ्याचदा उकळतेच!), अति अम्ल किंवा सल्फर व लोह यांच्यामुळे अति क्षारीय असते तरीही त्यामध्ये ठराविक सूक्ष -जीव सृष्टी सुखेनैव तगून आहे. उकळत्या पाण्याचे डोह, झरे, या प्रत्येक ठिकाणी सूक्ष- जीवांच्या जगण्याच्या प्रक्रियांमुळे, लाल, पिवळे, हिरवे, पांढरे, नारिंगी रंगाचे पट्टे दिसतात. त्यांच्यामुळेच कुंडांच्या कडा अशा विविध रंगी दिसतात.
महा घळईतून येलो - स्टोन नदी वाहताना तयार झालेले दोन धबधबे -’अप्पर फॉल’ आणि ‘लोवर फॉल’ ही देखील इथली आकर्षक स्थळे आहेत. यापैकी ‘लोवर फॉल’ ३०० फूट खोल आहे. नायगाराच्या दुप्पट खोलीचा हा धबधबा फेसाळ धारांनी रोरावत उभा कोसळतो, तेव्हा खाली पांढऱ्या फेसाचा डोह तयार झालाय असं वाटतं.

figure 8 lower  water falI MAG2145.jpg येलो स्टोन नदीवरचा ‘लोवर फॉल’

ज्वालामुखी बरोबरच चैतन्यमय जीवन देखील
जवळपास नऊ हजार किलोमीटर क्षेत्रफळावरचे पर्वतांच्या निळ्या- जांभळ्या रांगांनी वेढलेले हे पार्क म्हणजे, लांबवर
पसरलेली हिरवी हिरवी कुरणे आणि जंगले, त्यातले शेकडो प्रकारचे प्राणी आणि पक्षी, ’लामार व्हॅली’ मधले लांडगे, दऱ्या- खोऱ्या , त्यातून वाहणारी सापासारखी वळणे घेत जाणारी ‘स्नेक’ नदी, पिवळ्या खडकांच्या घळई मधून वाहणारी’ येलो स्टोन’ नदी, आणखीही कुठल्या कुठल्या खळाळत्या पाण्याच्या निळ्याशार नद्या, धबधबे, निळ्या पाण्याने भरलेली सरोवरे, उकळत्या पाण्याचे झरे, बघता बघता आपल्या डोळ्यसमोर जमिनीतून एकदम उसळणारी उकळत्या पाण्याची कारंजी, आणि त्याशिवाय स्वच्छ सुंदर हवा …. एवढे सगळे आहे!

sceneIMAG2105.jpg

आतापर्यंत ‘येलोस्टोन येथे एक ज्वालामुखी आहे’ ही माहिती मनात घट्ट रुतून बसली होती. त्यामुळे, फक्त राखाडी वगैरे जमीन तिथे असणार अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. पण जाताना रस्त्याच्या दुतर्फा, घनदाट ‘लॉज-पोल पाइन’ वृक्षांची जंगले आणि त्यांच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यापर्यंत जांभळ्या, पिवळ्या रान फुलांची किनार असे सुंदर दृश्य सतत दिसत होते. लॉज- पोल-पाईनची झाडे नावातल्या ‘पोल’ म्हणजे- खांबासारखी उंचच्या उंच, सरळसोट असतात. उंच म्हणजे किती उंच? दीडशे-दीडशे फूट इतकी उंच! म्हणूनच रेड इंडियन्स त्यांचा उपयोग त्यांच्या ‘टिपी’ या तंबूसारख्या घरांच्या मधला आधाराचा खांब म्हणून वापरत असत. येलो स्टोन नॅशनल पार्क जवळपास सगळीकडेच हे वृक्ष असणारी जंगले आढळली.
विशेष म्हणजे ज्वालामुखीचा भाग असूनही इथला जवळपास ८० टक्के भाग अशा हजार एक विविध वनस्पती असणाऱ्या जंगलाखाली आहे. या जंगलांमध्ये तीनशे पक्षांच्या जाती, साठ सत्तर जातींचे सस्तन प्राणी आढळतात म्हणे. त्याशिवाय इथले न माणसाळलेले रानगवे आणि ‘ग्रीझली’ म्हणजे भुरकट करड्या रंगाची मोठ्ठी अस्वले ही खास आकर्षणं असतात. उंच वाढलेल्या गवतात सारखं शोधक नजरेने धुंडाळत राहिल्याने आम्हाला बरयाचदा दर्शन झालं रान-गव्याचं. कधी लांबवर काळ्या शिल्पांसारखे सारखे तर कधी अगदी जवळ संथ पणे चरत असलेले रानगवे. आणि एकदा तर अगदी समोरून रस्ता ओलांडताना दिसले भलं मोठं धूड. त्याशिवाय, करड्या रंगाचे अस्वल- आणि त्याचे पिल्लू, , भुरकट कोल्हे, शिंगवाले सांबर, ही जंगलातली जनताही दर्शन देऊन गेली आणि इथे आल्यासारखं ‘कृतकृत्य’ वाटलं.
सगळीकडे एवढं दृष्ट लागण्याजोगं सृष्टी वैभव दिसत होतं, की आपण ज्वालामुखीच्या प्रदेशात फिरतो आहोत हे थोडं विसरायलाच झालं!

IMAG2079.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
‘ऍन केंट केबिन’ चा सुद्धा एखादा फोटो टाका.

छान लिहिले आहे.
आम्ही २ वर्षांपूर्वी गेलो होतो यलो स्टोन आणि टीटॉन ला. अप्रतिम अनुभव. पुन्हा जायला आवडेल नक्की.

2016 मध्ये गेलो होतो, एका ठिकाणी खूप गर्दी होती, विचारला काय आहेतर म्हणे बेयर आहे,
खूप वेळ शोधायचा प्रयत्न केला, लांब कुठेतरी होता, लोक उगाच दिसला दिसला म्हणत होते...

लेखाला दिलेल्या प्रतिक्रियान्बद्दल सर्वान्चे मनःपूर्वक आभार!