माणूस नावाच एक झाड असत !

Submitted by पल्लवीजी on 10 July, 2017 - 14:58

कविता - माणूस नावाच एक झाड असत !

झाड

माणूस नावाचं एक झाड असतं !
रंग, रूप, आकार विविध तरी
सर्वांचं मूळ - मन एकच असतं
त्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

प्रत्येक दिवसाचं पान उगवतं
नवं खुलतं, जुनं गळतं !
कधी आठवणींच्या फांदीवरती
हिरवा फुलोरा बनून टिकून राहतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध
पिवळा रुक्ष, ओला हिरवा वृक्ष
लाल गुलाबी शेंदरी, पानांत खुलतं
जुनी कात टाकून ऋतुरंगात न्हातं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

कधी मायेच्या ओलाव्यास तरसतं,
कधी मायेने कुसुमांचा सडा पाडतं,
कधी बनाच्या हिरव्या दाटीत रमतं,
कधी एकटेच एकांत अनुभवतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

कधी वादळवारा कवेत घेतं
दु:खाच्या पूरात दृढ आधार बनतं
जीवन संघर्षात होरपळून छाया देतं
रखरखत्या वाळवंटात आसरा देतं.
वृक्ष नव्हे, कल्पवृक्ष बनतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

कधी अंतर्मुखी मूळ खोली गाठतं
पाताळ शोधताना स्वर्गात पोचतं !
मग चांदणं लेवून झाड चमचमतं
गोड फुलाफळांचा पाऊस पाडतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !

पल्लवी गुंफेकर
https://youtu.be/U3r-xY668DA

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users