अखेर

Submitted by र।हुल on 27 June, 2017 - 10:49

दुर कुठंतरी अंधाराच्या पोकळीतून आवाज आला,
"कोण आहेस?"
"मी.. मी काळ." गडगडाटी हसत त्यानं उत्तर दिलं.
"कुणाचा?"
"ह्या सगळ्या सृष्टीचा."
"सगळंच तर हिरावलंस तू ह्या धरेचं. आणखी काय हवंय?"
"आता तुझा प्राण."
"मी निराकार आहे."
"असेल पण तुला मी घडवलंय, माझ्याच कल्पनेनं!"
"हा तुझा भ्रम आहे. मी स्वयंभू आहे."
"कसला स्वयंभू? ह्या धरेचा विनाश होताना कुठं होतास मग तू? का नाही त्याचवेळी मला थांबवलंस?"
"माझ्या अस्तित्त्वावर शंका घेणारा तू..आपल्या स्वार्थासाठी सगळ्या मर्यादा ओलांडणारा तू..तुला तू केलेल्या कर्मांची शिक्षा मिळायलाच हवी, ह्या विचारानं मी तुला वाहवत जाऊ दिलं. आता तुझी अखेर आलीच..सिद्ध हो मृत्यूला."
"माझ्याबरोबर तुझाही विनाश अटळ आहे."
"हा तुझा भ्रम आहे! थांब तूं, तुला माझं साकार स्वरूप दाखवतो.."
हळूहळू त्याच्या मन:चक्षूं समोर चतु:र्भुज भगवंताचं स्वरूप आकार घेऊ लागलं..आणि इतक्यात एक कडाडणारी लखलखती विज आकाशातून वेगानं खाली झेपावली त्याचा घास घेण्यासाठी...

―₹!हुल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.