एमराल्ड पॅराडाईझ केस

Submitted by हायझेनबर्ग on 5 June, 2017 - 18:17

'एमराल्ड पॅराडाईझ' ह्या सुपर लक्झ्युरियस तीन मजली बिल्डिंग मधल्या तिसर्‍या मजल्यावरच्या पेंट हाऊस नं ३०२ सोडून पाचही फ्लॅट मध्ये दि. ६ मे २०१६ च्या वादळी पावसाच्या रात्री नेहमीचा झगमगाट आणि वर्दळ नव्हती. कारणही तसेच होते 'सेबरलाईन' ह्या रेग्युलर कार्स कस्टमाईझ्ड करणार्‍या कंपनीचे मालक 'देवेन शहा' जे तिसर्‍या मजल्यावरच्या दोन पैकी एका पेंट हाऊस नं. ३०१ मध्ये रहात, त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे 'मनालीचे' आज लग्न होते आणि सगळे पॅराडाईझ निवासी घरचेच लग्नं असल्यासारखे सकाळपासून त्याच कार्यक्रमात गेले होते. कोट्याधीशांचीच सोसायटी ती, सगळे एका चढ एक श्रीमंत बिझनेसमन तिथे रहात, अपवाद नं ३०२. एका मजल्यावर दोन असे सहा अति प्रशस्तं फ्लॅट्स असलेली 'एमराल्ड पॅराडईझ' शहरातल्या प्रत्येकासाठी जणू प्रतिस्वर्गच होता. टेरेस वरती स्विमिंग पूल, स्पा, स्टीम रूम, स्टेट ऑफ द आर्ट जिम, टेनिस कोर्ट, मिनी सिनेमा थिएटर, सेंट्रल एअर कंडिशनिंग, सन रूम, मोठी बाग, दोन लेवल अंडरग्राऊंड पार्किंग, चिल्ड्रेन्स एरिया अशी लग्झुरी तर होतीच पण सिक्युरीटीही तेवढीच कडक, सगळ्या लॉबीज आणि जिने अद्ययावत कॅमेरांनी ईक्विप्ड होते, चोवीस तास गेट्स वर दोन सिक्युरिटी गार्ड्स, ईंटरकॉम, केवळ फ्लॅट ओनरलाच ज्याची जागा माहित असेल आणि ऊघडता येईल असा सेफ्टीवॉल्ट, प्रत्येक मजल्यावर ईमर्जन्सी लाईन्स, जनरेटर बॅकअप, कधीही नादुरूस्त न होणारे एलिवेटर्स असे सगळे.

सहा महिन्यांपूर्वीपर्यंत पेंट हाऊस नं ३०२ मध्ये देवेन शहांचे जीवलग मित्रं 'कार्तिक मेहता' रहात होते. सहा महिन्यांपूर्वी कार्तिकशेठचे अचानक हार्ट अ‍ॅटॅक ने निधन झाले तेव्हा त्यांच्या अतिशय धार्मिक स्वभावाच्या पत्नी 'सारंगीबेन' ते घर आपल्या मुलाच्या नावाने करून, एक खूप मोठी रक्कम एका चॅरिटीला देवून वानप्रस्थाश्रम (त्यांच्या गुजरातमधल्या पवित्र धर्मस्थळी जाऊन सन्यस्तं जीवन जगणे) स्वीकारला. असे करण्याचे एक कारण असेही होते की आजवर घरापासून कायम दूरच राहिलेल्या आपल्या अट्टल बेवड्या, जुगारी आणि बाहेरचे सगळे नाद असलेल्या एकुलता एक मुलगा 'समीर' बरोबर रहाणे त्यांना मान्य नव्हते पण घरावरचा त्याचा वारसा हक्क ही त्यांना डावलायचा नव्हता. सारंगीबेनने घर सोडताच त्याचदिवशी समीर ने घराचा ताबा घेत आपला मुक्काम एमराल्ड पॅराडाईझमध्ये हलवला.

पण ही अरेंजमेंट एमराल्ड पॅराडाईझच्या सगळ्या कुटुंबवत्सल राहिवासींच्या जीवावरच ऊठली. कायम दारू पिऊन धिंगाणा करणारे तरूण, लाऊड पार्ट्या , सदोदित येणार्‍या एस्कॉर्टच्या गाड्या ह्यामुळे एमराल्ड पॅराडाईझ तिथल्या राहिवाश्यांना एकदम नरकासारखे वाटू न लागते तर नवलच. बरं हे सगळे राहिवासी 'काँटॅक्ट्स' वाले पावरफुल लोक असूनही 'समीर मेहता' ला ते शह देवू शकत नव्हते आणि ह्याला कारण होते समीरचा परममित्रं, त्याच्या सगळ्या सवयीतला त्याचा भागीदार 'केशव नाईक' जो रुलिंग राष्ट्रीय पार्टीच्या अतिशय पावरफूल अश्या नेत्याचा एकुलता एक मुलगा होता. बर्‍याच वेळा समीरशी, देवेन शहा सोडून ईतर पॅराडाईझ वासीयांचे खटके ही ऊडाले होते पण सदोदित समीरच्या बरोबरच असलेल्या केशवचा अतिशय खालच्या दर्जेच्या भाषेचा वापर आणि धमकीवजा प्रतिसाद मिळताच सगळ्यांची बोलती बंद झाली होती. मात्रं त्यांच्या मनात अपमान आणि रागाचा लाव्हा खदखदंत होता हे नक्की.

ह्या सगळ्या त्रासावर काहितरी ऊपाय करावा म्हणून एमराल्ड पॅराडाईझ च्या ईतर पाच फ्लॅट धारकांची मिटिंग जेव्हा भरली तेव्हा देवेन शहांनी एक बिनतोड ऊपाय मांडला. सारंगीबेनने समीरसाठी घर ठेवले असले तरी पैशाची तजवीज करून ठेवलेली नव्हती हे त्यांना माहित होते आणि ऊत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्याने समीर त्याच्या 'शोकीन' सवयीमुळे लवकरच पैशांच्या तंगीत येणार हे ते जाणून होते. मात्रं ही आतली बातमी मिटिंगमध्ये ऊघड न करता, बाजारभावाने १५ कोटी किंमत असलेल्या समीरच्या फ्लॅट्साठी समीरला १९ कोटीची ऑफर देण्याचा प्रस्ताव मांडला. पण ह्या प्रस्तावात गोम अशी होती की फ्लॅट त्यांच्या स्वतःच्या नावावर राहिल, तो त्यांच्याच मालकीचा असेल पण ते फक्तं १५ कोटी देतील आणि बाकीचे चार कोटी ऊरलेल्या चार प्लॅटधारकांनी ऊभे करायचे. त्या मिटिंगमध्ये ह्या त्रासाची एवढी मोठी किंमत द्यायला एकही जण तयार झाला नाही पण होकार देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही हेही त्यांना कळाले होते. आपल्या वयात येणार्‍या मुला मुलींना समीरच्या राजरोस चाललेल्या तमाशापासून लांब ठेवायचे असेल तर ही किंमत मोजावीच लागेल ह्याची कल्पना त्यांना आली होती. समीर ह्यापेक्षा कमी किंमतीत फ्लॅट विकणार नाही आणि शहा हा फार डोकेबाज आणि हिकमती माणूस आहे त्याचेही मोठे काँटॅक्ट्स आहेत आणि समीरला ते त्याच्या लहान पासून ओळखत असल्याने समीरच्या तोंडाला तोंड फक्तं तेच समर्थपणे देवू शकतात हेही ते सगळे ओळखून होते.

शहांनी हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांच्या डोक्यात एका दगडाने दोन पक्षी मारायचा प्लान तयार होता. झाले असे होते की त्यांच्या मनाविरूद्धं जाऊन 'मनाली' एका कॅथलिक मुलाशी 'असीम' शी लग्न करत होती ज्याच्याशी तिची एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये ओळख झाली होती आणि ती त्याच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन त्याच्यावर पूर्णपणे भाळली होती. गोव्याकडचे एक घर सोडल्यास ह्या मुलाकडे काहीही नाही आणि हा मुलगा अतिशय धूर्त आणि कावेबाज असून दिसतो तेवढा प्रेमळ आजिबात नाही हे देवेन शहांनी ओळखले होते. मनालीवर त्यांचा फार जीव होता आणि असीम तिच्या एकुलत्याएक असण्याचा फायदा घेत आहे हेही त्यांना स्प्ष्टं कळून येत होते. पण त्यांच्या नात्याला विरोध करून आपल्या हाती काहीच लागणार नाही आणि 'मनाने अतिशय भावनाप्रधान पण प्रेमात आंधळ्या झालेल्या' मनालीला आपण कायमचे आपला शत्रू बनवून घेवू हे त्यांच्या पांढर्‍या केसांना आणि काळ्या चष्म्याला चांगले ठावूक होते. म्हणूनच लग्नानंतर मनाली आपल्या डोळ्यांसमोर रहावी ह्या हेतूने त्यांनी हा फ्लॅट चा प्लॅन बनवला होता आणो तो मनाली आणि असीम कडून मान्यही करून घेतला होता. 'अजून एक प्रॉपर्टी' आपल्या बायकोच्या नावावर होत आहे हे कळल्यावर असीम ह्या प्लान ला आजिबात नाही म्हणणार नाही आणि सुरूवातीला 'तळ्यात मळ्यात' असलेल्या मनालीला ही तो नक्की तयार करेल हा त्यांचा होरा चूक निघाला नसता तर नवलच झाले असते.

शनिवारच्या ६ मे चा लग्नं समारंभ आटोपल्यानंतर ७ मेची पॅराडाईझ वासियांची सकाळंच मुळी पोलिस आणि अ‍ॅंब्युलन्स च्या आवाजाने ऊजाडली. समीर मेहताचे त्याच्या राहत्या घरात निष्प्राण शरीर सापडले होते आणि केशव नाईकने प्रचंड आरडाओरड व गोंधळ मांडला होता. रोज सकाळी सातालाच येणार्‍या समीरच्या हाऊसक्लीनरने घरातला नेहमीचा कचरा सिगरेटी/ दारूच्या बाटल्या/ काँडोमची पाकिटे/ विचित्रं औषधांच्या गोळ्यांची पाकिटे/ अस्ताव्यस्तं पडलेले कपडे/ अर्धवट सोडलेले बाहेरून मागवलेले खाणे ई. आवरून झोपमोड होवू नये म्हणून नेहमीच बंदच असलेल्या समीरच्या आज ऊघड्या राहिलेल्या बेडरूममध्ये डोकावले तेव्हा त्याला बेडवर भूत बघितले असल्यासारखा चेहरा करून पडलेला समीर दिसला आणि त्याने लगोलग केशव नाईक ला फोन केला.

हाय प्रोफाईल केस आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याकडून थेट कमिशनर साहेबांकडेच विचारणा करण्यात आल्याने केसचा तपास सुरूवातीलाच क्राईम ब्रँच कडे सोपवला गेला. फोरेन्सिक आणि क्राईम सीन ईन्वेस्टिगेशन टीम्सना बोलावून प्रार्थमिक तपास आणि बिल्डिंग मधल्यांची चौकशी लगोलग सुरू केली पण समीरचा मृत्यू नेमका कश्याने झाला ह्याचा कुठलाही अंदाज आजिबातच येत नसल्याने केस ज्यांच्या समर्थ आणि अतिशय अनुभवी खांद्यांवर सोपवली होती त्या १९९८ च्या बॅचच्या अखिलेश ठाकुरांच्या चढत्या भुवया बरेच काही सांगत होत्या. ठाकुरांनी कठीणात कठीण अश्या चाचण्यांनंतर ज्या दोन ऑफिसर्स ची निवड त्यांच्या टीममध्ये केली होती त्या ऑफिसर निलेश वर्तक आणि शमा मलिक दोघांनीही खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघाल्यानंतर चार वर्षे ठाकुरांच्या करड्या नजरेखाली शिकलेल्या सगळ्या युक्ती प्रयुक्ती वापरूनही फाऊल प्ले चे काहीच धागेदोरे हाती लागत नसल्याने 'ही मेडिकल केसच आहे' असाच प्रार्थमिक होरा केला होता. पण तो किती चुकीचा आहे हे त्यांना ठाकुरांच्या चेहर्‍याकडे बघतांच कळाले होते.
आठवडाभरात दोन डझन वेळा क्राईम सीन ला भेट देवून मिळवलेली माहिती, एक्स्पर्ट टीम्सच्या नोंदी, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि त्यांचे तर्कशास्त्रं ह्यावरून वर्तक आणि मलिक ह्यांच्या डायरीतल्या नोंदी.

* दोन्ही दिवसांच्या टाईमलाईन ऊलट्या क्रमाने वाचाव्यात.

टाईमलाईन ७ मे
सकाळी ९:२८ पोलिस एमराल्ड पॅराडाईझ मध्ये दाखल
सकाळी ९:१२ केशव नाईकचा पोलिस हेल्प लाईन वर फोन
सकाळी ८:५८ शशिकांत नाईक ह्यांचे वकील अ‍ॅड अशोक कटियार ह्यांचा केशव नाईकला फोन
सकाळी ८:४१ केशव नाईकचा वडील शशिकांत नाई़क ना फोन (शशिकांत नाईक - पर्यावरण मंत्री)
सकाळी ८:२९ केशव नाईकचे फॅमिली डॉक्टर निनाद पाध्येंची एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री.
सकाळी ८:११ केशव नाईकची (वय २४) एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
सकाळी ७:३७ गणेश शिंदेचा केशव नाईकला फोन
सकाळी ७:०४ हाऊसक्लीनर गणेश शिंदेची (वय १८) एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री (गणेश शिंदेची आई केशव नाईकच्या घरी हाऊसमेड आहे)

टाईमलाईन ६ मे
(त्यानंतर ७ मे सकाळी ७:०४ पर्यंत कुठलीही एंट्री वा एग्झिट नाही)
रात्री ११:५६ एमराल्ड पॅराडाईझ मधील देवेन शहांच्या दोन गाड्यांची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ११:१३ ते ११:२० दरम्यान एमराल्ड पॅराडाईझ मधील ईतर चार कुटुंबांची एकूण चार गाड्यांची एंट्री (गाडी मालकांचे डिटेल्स ऊपलब्धं)
रात्री ११:११ केशव नाईक ची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ११:०४ डिलिशिअस डाईन ह्या फुड डिलिवरी सर्विसची समीर मेहताच्या घरात डिलिवरी.
रात्री ११:०१ ला दोन एस्कॉर्टस सर्विसच्या मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ९:४० केशव नाईक सहित दोन मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ९:१० समीर मेहताची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री

* महत्वाच्या व्यक्तीं सबंधित नोंदी
- समीर ला जिवंत पाहणारी केशव नाईक शेवटची व्यक्ती.
- डिलिवरी बॉयच्या जबाबानुसार फुड डिलिवरी केशव ने घेतली आणि त्याने त्यावेळी समीर ला पाहिले नाही, नेहमी समीर डिलिवरी घेतो आणि टीपही देतो पण केशव ने टीप दिली नाही.
- एस्कॉर्टस च्या जबानीनुसार ते निघतांना समीर जिवंत होता पण ठरलेले ३० हजार देण्यावरून समीर आणि केशव मध्ये थोडी बाचाबाची झाली.
- केशव नाईक प्रमुख संशयित पण मोटिव काहीच दिसत नाही.
- फ्लॅट नं. २०२ मधील मनीष अवस्थी ह्यांचे ७२ वर्षीय वडील 'भास्कर अवस्थी' तब्येतीच्या कारणाने शहांच्या लग्नाला न जाता घरीच होते. वयाच्या मानाने आश्चर्यकारक फिट आणि करारी, तत्ववादी व्यक्तीमत्व. अनेक प्रश्नांना भास्कर अवस्थी ह्यांनी रागीट टोनमध्ये ऊडवा ऊडवीची ऊत्तरे दिली. भास्कर अवस्थी ह्यांचा देशविदेशातील औषधी वनस्पती गोळा करून श्रीमंत क्लायंटसना त्वचारोगावर होममेड औषधी विकण्याचा बिझनेस होता जो मनीष अवस्थी ह्यांनी एका सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या यशस्वी 'ब्यूटीकॉन फार्मा' कंपनी मध्ये विकसित केला आहे. भास्कर अवस्थी केवळ परंपरागत ज्ञानावर ते औषध बनवत आणि मोठ्ठमोठ्या डॉक्टरांनी हात टेकलेल्या केसेस मध्ये त्यांच्या औषधांचा गूण आल्याचे काही श्रीमंत लोक अतिशय विश्वासाने सांगतात. पण सध्या त्यांचा हा ऊद्योग कैक वर्षांपासून बंद आहे.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार आपल्या १६ वर्षांच्या जुळ्या नातींची छेड काढणार्‍या समीरच्या दोन मित्रांना भास्कर ह्यांनी एका महिन्यापूर्वी मारहाण केली होती आणि त्यानंतर त्यांची समीरशीही जंगी वादावादी झाली होती पण मनीष ह्यांनी वडिलांना आवर घातला. भास्कर बिल्डिंगमध्ये कुणाशीही आणि त्यांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याशीही कोणी जास्तं बोलत नाही. ते न चुकता सकाळी सहा आणि संध्याकाळी सहाला तासाभराच्या वॉक ला जातात आणि गार्डनमध्ये तासभर योगा करतात. पण ६ मेला संध्याकाळी आणि ७ मेला सकाळी ते गेले नाही.
- फ्लॅट नं. २०१ मधील संपत जैन ह्यांचा १८ वर्षांचा मुलगा 'सार्थक जैन' परीक्षेचा अभ्यास असल्याच्या कारणाने लग्नाला न जाता घरीच होता.
सार्थक बीकॉमच्या पहिल्या वर्षाला आहे पण कॉलेज ऊपस्थिती आणि अभ्यासात यथातथाच आहे. कॉलेजात अशी कुठलीही परीक्षा नसतांना अभ्यासाचे कारण पटण्यासारखे नाही. सार्थक लहानपणापासून हौशी मार्शल आर्ट्स स्पर्धामध्येही बर्‍यापैकी सक्रीय असतो.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना, सार्थकची आई ऊज्वला जैन ह्यांनी सार्थक समीरशी बोलतांना किंवा बरोबर जाता येता दिसल्यास कळवण्यास संगितले होते. गेल्या तीन महिन्यात चढत्या वारंवारतेने सार्थकची समीरशी वाढणारी जवळीक गार्ड्सनी त्याच्या आईला कळवली होती आणि मागच्याच आठवड्यात त्याची समीरशी झालेली वादावादीही ज्यावेळी समीरने सार्थकला त्याच्या गर्लफ्रेंड समोर दोन श्रीमुखात लगावल्या होत्या. हे सत्यं सार्थकच्या गर्लफ्रेंडनेही कबूल केले तिला त्यामागचे कारण काही तरी ऊधार असलेल्या पैशांबद्दल असावे असे वाटते.
-फ्लॅट नं १०२ मधील साधूराम गिडवानी ह्यांच्याकडे दिल्लीहून त्यांचा भाचा 'अमित धुप्पर' हा आठवड्याभरापासून त्याचे शहरात काही काम होते म्हणून पाहूणा म्हणून आला होता. ६ मे च्या रात्री तो ही घरीच होता. दिल्लीमध्ये अमित चा ऑफिस सिक्युरिटी सिस्टीम ईनस्टॉल करण्याचा बिझनेस आहे आणि त्याच्या नावावर मारामारी/ धाक दाखवणे वगैरे छोटे मोठे गुन्हे रजिस्ट्र्र्ड आहेत. एकदा नशेत भरधाव गाडी चालवतांनाही त्याला पकडले होते तेव्हा त्याच्याकडे दुर्मिळ अशी नशा येणारी औषधे सापडली होती.
- सिक्युरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना अमित अतिशय चांगला तरूण वाटला होता. त्यांच्यामते सिक्युरिटी सिस्टीम बद्दल त्याचे ज्ञान फार अ‍ॅडवान्स्ड होते. तो त्यांच्याशी बर्‍याच गप्पा मारत असे आणि एक दोनदा अडून अडून त्याने समीर बद्दल जास्तं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांना आता वाटते आहे.
- अमितची चौकशी करतांना तो बोलण्यात अतिशय पटाईत माणूस वाटतो. त्याचा समीर मेहताशी वरवर काहीही सबंध दिसून येत नाही पण त्याचे एकंदर बॅकग्राऊंड आणि वागणे संशयास्पद वाटते.
- फ्लॅट नं १०१ मधील ६० वर्षीय दिनेश कोठारी आपल्या दुसर्‍या पत्नी नलिनी (४० वर्षे) सोबत राहतात ज्यांच्याशी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा 'नवीन' सध्या यूएस मध्ये मेडिकल फील्ड मध्ये पीएचडी करत आहे.
- फ्लॅट नंबर ३०१ मधील देवेन शहा हाय सर्कल मध्ये ऊठबस असलेला माणूस आहे. स्वभावाने शांत, धीरगंभीर पण विचारी व अगदी मोजून मापून बोलणारा अतिशय व्यवहारी माणूस वाटला. शहांनी बाजारभावाने समीर मेहताकडून त्याचे घर १५ कोटी रुपयांना मागच्याच आठवड्यात विकत घेतले होते आणि १५ मेपर्यंत घर खाली करून ताब्यात देण्याचे हमीपत्रं समीरने त्यांना दिले होते ज्यावर दोन्ही पार्टीच्या वकिलांच्या सह्या होत्या आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर मार्गाने झाला होता.
- शहांच्या पत्नी देविका शहा पुर्वाश्रमीच्या देविका अय्यर ह्या कोचीच्या प्रसिद्धं गायनॉकोलॉजिस्ट श्रीनिवास आणि जोस्त्ना अय्यर ह्यांच्या कन्या ज्या स्वतः एक यशस्वी गायनॅक होत्या पण मनालीच्या जन्मानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली.
- मनाली शहा एका मल्टिनॅशनल ऑटोमोबाईल कंपनीत मध्ये मार्केटिंग मॅनेजर. यु एस मधून एम बी ए आणि येत्या काही वर्षात वडिलांच्या 'सेबरलाईन ऑटो' ची धुरा सांभाळेल अशी अपेक्षा. आव आणल्यासारखं रोखठोक बोलणं पण ईमोशनली बायस्ड, चौकशी दरम्यान बायपोलर डिसऑर्डरसाठीची मेडिकेशन्स घरात दिसली.
- असीम पारकर एका बुटीक ईन्वेस्टमेंट फर्ममध्ये रिसर्च मॅनेजर. माचो पण फिशी कॅरॅक्टर. शहा फॅमिली सोडून ह्याचा समीर मेहता प्रकरणाशी काही संबंध वाटत नाही. एका सप्लाय चेन कंपनीत मॅनेजर असतांना वेंडर मॅनेजमेंटमधील फ्रॉड केस मध्ये ह्याचे नाव आले होते पण कंपनीने बोभाटा नको म्हणून केस न करता केवळ कामावरून कमी केले. त्या नंतरच्या कंपनीत सेक्शुअल हॅरेसमेंट चाही आरोप ठेवण्यात आला पण गैरसमजातून झालेला प्रकार म्हणत कंपनीने प्रकरण मिटवले आणि पुन्हा कामावरून काढून टाकले. सध्याच्या कंपनीत 'एथिकल क्लायंट प्रॅक्टिसेस' वायोलेशन म्हणून एनक्वायरी चालू आहे. सध्या नॉन क्रिटिकल असाईनमेंट हॅंडल करतो आहे.
- मनाली आणि असीमच्या लग्नाला शहा सारख्या हुशार माणसाने असीम पारकर ची माहिती न काढता सहजी परवानगी दिली असेल असे वाटत नाही.
- शहांनी वरतून प्रेशर आणून मनाली-असीम दांपत्याला त्यांच्या तीन आठवड्यांच्या प्लॅन्ड हनीमूनला जाऊ देण्याची परवानगी मिळवली व गरज पडल्यास त्यांना दोन दिवसात हजर करण्याची हमी दिली आहे.

* खबरींकडून समजलेली माहिती
- केशव, समीर आणि नवीन कोठारी एकाच ज्युनिअर कॉलेज मध्ये असतांना त्यांनी नवीनला (जो 'गे' आहे) त्याच्या जेंडर आयडेंटिटी वरून खूप बुली केले होते जेणेकरुन नवीनने एका अयशस्वी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर भारतातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मनात नसतांना कोठारींना एकुलत्या एक मुलाला अमेरिकेला पाठवावे लागले आणि त्याची मानसिक ओढाताण होवू नये म्हणून आईचा आजार ही त्याच्यापासून बरीच वर्षे लपवून ठेवावा लागला. ह्या कारणाने कार्तिक मेहता आणि दिनेश कोठारींचेही आपापसातले संबंध अनेक वर्षे ताणले गेले होते. पण समीर ही मेहतांच्याही हाताबाहेरची केस आहे हे जसे समजत गेले तसे आणि अमेरिकेत जाऊन ऊलट आपल्या मुलाचे सुरळीतच चालू आहे हे ऊमगून कोठारींनी मेहतांशी सबंध सुधारण्यासाठी मागच्या वर्षभरात पुढाकार घेतला होता. पण समीर वर त्यांचा प्रचंड राग होताच.
- शहांची मुलगी मनाली आणि समीर मेहता हायस्कूलमध्ये एकाच वर्गात होते आणि एकमेकांचे चांगले मित्रं होते. शहा आणि मेहता फॅमिली वर्षातून दोनदा विदेशात फॅमिली टूरवर फिरायला जात असंत. पण कॉलेजच्या पहिल्या वर्षात अचानक काहीतरी बिनसलं आणि मेहतांनी समीरला घरी न ठेवता हॉस्टेलवर रहायला पाठवलं, मनालीही त्यावर्षी फार काही कुणाला दिसली नाही.

* काही प्रासंगिक माहिती
- वरच्या नोंदीतले बिल्डिंगमध्ये हजर असलेले (भास्कर अवस्थी, सार्थक जैन, अमित धुप्पर) आणि नसलेले (नवीन कोठारी) सोडून ईतर सर्व पॅराडाईझ बिल्डिंग निवासी लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये बर्‍याच वेळा दिसत आहेत.
- कुठल्याही मजल्यावर एलेवेटरने आल्यास एक फ्लॅट डावीकडे आणि एक ऊजवीकडे आहे आणि एलेवेटर समोरच्या भिंतीवरचा कॅमेरा एलेवेटर मधून बाहेर आलेला माणूस कुठल्या दिशेने गेला हे दाखवतो. त्या कॅमेराला चुकवणे शक्य नाही.
- मात्रं एका मजल्यावरच्या एका फ्लॅट मधून दुसर्‍यामध्ये कॅमेरा लावलेल्या भिंतीला लगटून कॅमेराच्या खालून गेल्यास तो अँगल कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही
- जिन्यांमध्ये लावलेल्या सगळ्या कॅमेरांमध्ये एक अँगल असा आहे ज्याची आधी माहिती असल्यास जिन्यातूनही कॅमेरामध्ये न दिसता एका मजल्यावरून दुसर्‍यावर जाता येते पण त्यासाठी हा अँगल वापणारा माणूस प्रचंड अ‍ॅथलेटिक असायला हवा .
- बिल्डिंगला डाव्या आणि ऊजव्या दोन्ही साईडला जिने असून ते प्रत्येक मजल्यावर प्रत्येक फ्लॅटच्या दरवाजाच्या बरोबर समोर आहेत.
- वरती टेरेसवरच्या स्विमिंग पूल, सनरूम वगैरे फॅसिलिटी आणि खाली दोन मजल्यांचे पार्किंगही ही जिन्याने अ‍ॅक्सेस करता येते.
- पण कोणताही माणूस दोन्ही जिन्यांच्या दोन्ही पार्किंग लेवलवरच्या वा टेरेसच्या दरवाजातून आत वा बाहेर आल्यास तो बाहेर लावलेला कॅमरा चुकवू शकणार नाही.
- थोडक्यात कॅमेरा अ‍ॅंगलची जाण असलेला आणि ऑलरेडी बिल्डिंगमध्ये असलेला अ‍ॅथलेटिक माणूस जिने आणि प्रत्येक मजल्याच्या कॉरिडोअर मधून कॅमेरात न दिसता सहज जा ये करू शकतो पण तो टेरेस वा पार्किंग मध्ये आल्यास कॅमेरामध्ये हमखास कैद होणारंच.
- सहा मे च्या रात्री तिसर्‍या मजल्यावरच्या लिफ्टसमोरच्या कॅमेरामध्ये ११:५६ ते ७:०४ मध्ये कोणीही कॅप्चर झालेले दिसले नाही पण त्याआधी ९:३० ला लिफ्टच्या दरवाज्यावर एक सावली सरकतांना आणि पुन्हा ९:३७ ला तशीच सावली सरकतांना पुसटशी दिसत आहे. हा केवळ कॉरिडोअरच्या खिडकीतून कडाडणार्‍या विजांच्या प्रकाशाचा खेळ आहे की कोणी भिंतीला लगटून कॅमेरा खालून सरकत गेले हे सांगणे अवघड आहे.
- बिल्डिंग कंपाऊंडची भिंत ओलांडून वा गार्ड्सना चुकवून येणे सेन्सर्स मुळे केवळ अशक्य आहे.
- प्रत्येक फ्लॅटला ऑटोमेटेड लॉक्स आहेत जे चावीने वा वन टाईम नंबर कीपॅड वर टाकून वापरता येतात. चावी नसल्यास घराचे ऑथोराईझ्ड मालक वा कुटुंबीय त्यांच्या फोनमधले सॉफ्टवेअर वापरून हा वन टाईम नंबर जनरेट करू शकतात. एका फ्लॅटच्या मालकाने त्याच्या फोनवरून जनरेट केलेला वन टाईम नंबर फक्तं आणि फक्तं त्याच्या घराच्या लॉकवर चालतो.
- चुकीची चावी वापरल्यास वा दोनदा चुकीचा नंबर की-ईन केल्यास त्या फ्लोअरवरचा अलार्म वाजू लागतो आणि खाली सिक्युरिटी गार्डसनाही अ‍ॅलर्ट जातो.

* समीरशी निगडीत काही बाबी
- समीरच्या फोनमध्ये काही वाह्यात फोटोज, विडिओज आणि त्याच्या केशव व त्याच्यासारख्याच ईतर मित्रांच्या आणि एस्कॉर्ट कंपन्यांच्या कॉंटॅक्ट्स शिवाय फार काही मिळाले नाही.
- एमराल्ड पॅराडाईज मधल्या देवेन शहा आणि सार्थक जैन शिवाय ईतर कुणाचे काँटॅक्ट डीटेल्स त्याच्या फोन मध्ये मिळाले नाहीत.
- तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या एका दुर्गम खेड्यातून समीरच्या नावाने आलेले एक पाकीट तेवढे घरात 'आक्षेपार्ह' वाटेल असे मिळाले ज्यात एक 'अंगारा/ऊदी' सदृष्य राखेसारखा पदार्थ मिळाला. गुजरातला त्या खेड्यात गेलेल्या टीमने तो अंगारा समीरच्या आईने त्याच्या वागण्यात सुधार व्हावा ह्या मायेच्या आणि धार्मिक हेतूने पाठवल्याचे मान्य केले आहे आणि त्या धार्मिक स्थळावर तो अंगारा मुबलक प्रमाणात ऊपलब्धं आहे.
- ६ मे रात्री ९:०२ वाजता समीर मेहताच्या फोनवरून देवेन शहांच्या फोन वर एक कॉल झाला जो २ मिनिटे सदतीस सेकंद चालला.
शहांना ह्या बद्दल विचारले असता त्यांनी समीर ने लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि ऊपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्तं करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले.
- गणेश शिंदेने सकाळी जमा केलेला कचरा लगोलग गारबेज श्यूट मधून टाकून दिल्याने ग्राऊंड फ्लोअरवरच्या मोठ्या गारबेज कलेक्टर मध्ये जिथे बिल्डिंगचा आठवड्याभराचा कचरा जमा झाला होता त्या कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याचे अ‍ॅनालिसिस करतांना फार कष्टं पडले. समीर मेहताच्या घरातला नेमका कचरा वेगळा काढता न आल्याने ह्या अ‍ॅनालिसिस मधून फार काही महत्वाचे हाती लागले नाही.

* पोस्टमॉर्टेम/ मेडिकल रिपोर्ट
मृत्यूचे कारण - शरीरातील वायटल सिस्टिम्स आणि ऑर्गन्स एका मागोमाग एक बंद पडत गेले. जणू मेंदूतूनच असे करण्यास आज्ञावली दिली गेली होती.
- विष वा तत्सम प्रकाराचा कुठलाही ट्रेस सापडला नाही. बॉडीवर कुठलेही बाहेरून केले गेलेले वार वा टोचण नाही.
- सबजेक्ट काही काळ कोमात गेला असल्याने मृत्यूची पिन पॉईंट वेळ सांगणे कठीण पण साधारणत: रात्री २ ते सकाळी ६ दरम्यान हे झाले असावे.
- पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत पण त्यातले काहीही लीथल नव्हते. - एखादी अन आयडेंटीफाईड मेडिकल कंडिशन ट्रिगर झाली असण्याचा संबंध असू शकतो.
- नैसर्गिक मरण की आत्महत्या किंवा खून काहीही खात्रीलायक रित्या सांगता येणे अवघड आहे पण हा अगदी दुर्मिळाती दुर्मिळ प्रकारचा नैसर्गिक मृत्यू असावा असे सगळे केस फॅक्टस तपासल्या नंतर हा क्षेत्रातल्या सगळ्या तज्ञांचा होरा आहे.
- अंगारा/ऊदी सदृष्य पदार्थामध्ये काही भयानक विषारी केमिकल्स मिळाले आहेत पण सबजेक्टने ते घेतले असावेत असे वाटत नाही कारण त्या केमिकल्सचे परिणाम जीवघेणे पण मेडिकल जगतांस माहित असलेले आहेत. ह्या अंगार्‍याचा सो-कॉल्ड 'धार्मिक' सोर्स ताबडतोब बंद करावा.

कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे पण नक्की काहीच प्रुव करता येत नाहीये हे कळून ठाकुर, वर्तक आणि मलिक ह्यांच्या टीमने एकही संशयित ठोस पुराव्या अभावी ताब्यात न घेता 'मेडिकल कंडिशन' म्हणत 'समीर मेहता' केसचा अहवाल वरती पाठवला आणि कमिशनर साहेबही मंत्री साहेबांना 'एवढा आकांड तांडव करायची गरज नव्हती' म्हणत ऊत्तर देवून मोकळे झाले.

केवळ आठच महिन्यानंतर म्हणजे १३ जानेवारी २०१७ च्या सकाळी समीर मेहता ज्या बेडरूममध्ये भूत बघितल्यासारखा चेहरा करून मरून पडला होता त्याच बेडरूममध्ये असीम पारकरचे निष्प्राण शरीर भूत बघितल्यासारखे पडलेले शहा फॅमिलीची हाऊसमेड अलका प्रसाद ने सकाळी सात वाजता पाहिले . शहा फॅमिली एक आठवड्यापूर्वीच यु एस मध्ये कॅलिफोर्नियातल्या मनालीच्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेली होती आणि ठाकुर, वर्तक आणि मलिक पुन्हा त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मजल्यावरच्या त्याच रूममध्ये तश्याच एका वादळी रात्रीनंतर एखादा भयानक नॉस्टेल्जिआचा अ‍ॅटॅक आल्यासारखे ऊभे होते.

******************************************************************************************

समीर मेहताच्या केसमध्ये नक्की काय झाले असावे आणि ठाकुर, वर्तक व मलिक ह्यांच्या टीमने असीम पारकरची केस कशी बघावी आणि त्यांना काय मिळू शकते ह्याची ऊत्तरं हवी आहेत.
तुमच्या मते दोन्ही केस एकंच आहेत की वेगळ्या तेही सांगा. दिलेले केस फॅक्ट्स वापरून आपापली थिअरी मांडा, प्रश्नोत्तरांची गरज नाही.
थोडक्यात समीर मेहताचा खून झाला असे वाटत असल्यास तो कोणी कसा व का केला त्याचे एक प्लॉजिबल एक्स्प्लनेशन हवे आहे आणि त्यावरून असीम पारकरच्या केस कडे बघण्याची दृष्टी सुद्धा.
एखादी थिअरी पटल्यास त्याला प्लस एक (+१) नक्की करा, आपल्या थिअरी पेक्षा दुसर्‍याची चांगली वाटल्यास मोठ्या मनाने त्याला प्लस वन द्याल अशी अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम भारी.
माझे तर्क नंतर लिहिते. असीम पारकरच्या केसबद्दल अजून काही वेगळी माहिती आहे का?

समीर मेहताचा खून ट्रायल असेल. खरं टार्गेट असीम पारकर असेल.

एकदा वाचून झालयं, पुन्हा वाचावं लागेल, बरीचं नावं आल्येत. तुम्ही काहि पर्याय देऊ शकता का ?

एस्कॉर्ट सेवा - तरुणींचे लिपस्टिक - काही विशेष घातक पदार्थ - किसिंगमुळे समीरच्या पोटात जावून मृत्यु - मास्टरमाइंड भास्कर अवस्थी (वैद्यकीय जडीबुटी ज्ञान + कॉस्मेटिक्स )

समीर मेहताचा खून ट्रायल असेल. खरं टार्गेट असीम पारकर असेल. + सहमत

दोन्हि खुन एकाच व्यक्तिने केले असावेत असे वाटते + सहमत

भूत बघितल्यासारखा चेहरा करून

भूत बघितल्यासारखा चेहरा करून मेलेले दोघे यावरून लगेचच शेरलॉक होम्सची 'डेव्हील'स फूट'वाली कथा आठवली. कदाचित या दोन्ही केसेसमध्येही तशीच काही वनस्पती /घटक इंव्हॉल्व्हड आहे, त्या भास्कर अवस्थीकडून मिळवलेला. हा घटक निर्माण करणे, बाळगणे इललीगल असल्याने कदाचित त्याचा उद्योग बंद पडला असावा पण त्याचा साठा त्याच्याकडे असावा.

दोन्ही रात्री वादळी होत्या, म्हणजे कदाचित थंडी पडलेली असू शकते ज्यामुळे हिटिंग सिस्टम ऑन केली गेली असावी. त्याद्वारे तो विषारी घटक वेपराईझ होऊन त्याद्वारे मृत्यू झाला. यामध्ये नियोजित खून फक्त समीरचा असावा. कारण असीमच्या केसमध्ये पुन्हा वादळ येईल, थंडी पडेल आणि असीम हिटिंग सिस्टम ऑन करेल हे खुन्याला आधी प्रेडिक्ट करता येणे शक्य नाही.

खून करण्याचे प्लॅनिंग शहा दाम्पत्याचे असावे. मनाली व समीरमध्ये प्रेमसंबंध बऱ्याच पुढच्या लेव्हलपर्यंत गेले असण्याची आणि नंतर समीरने त्याबाबत सर्व जबाबदारी नाकारल्याची शक्यता आहे. मनाली त्या वर्षभर कुणालाच फारशी न दिसणे व तिची आई व आजी गायनॅक असणे, हा पॉईंट येथे लक्षात घेता येईल.

समीर जोवर त्या एमराल्ड परडाईझमध्ये राहत नव्हता तोवर शहांना काळजीचे तितके कारण नव्हते पण तो तेथे राहायला आल्यावर मुलीचा मानसिक आजार त्यामुळे ट्रिगर होऊ शकण्याची धास्ती त्यांना वाटली असू शकेल.

तसेच फ्लॅट विकत घेण्याआधी इंस्पेक्ट करण्याच्या मिषाने हिटिंग सिस्टममध्ये विषारी घटक ठेवणे त्यांनाच शक्य आहे.

आणखी एक शक्यता म्हणजे समीर आणि असीम दोघांचाही काटा मनालीने काढला असावा, पण हे तिच्या वडिलांना माहीत असावे. त्यामुळे समीरचा खून झाल्यावर चौकशी झाली तर तिने चुकून सगळे कबूल करून बसू नये म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट वापरून तिला हनिमूनला पाठवले. तीन आठवड्यांत सगळे शांत होईल,अशी त्यांची अटकळ होती जी खरी ठरली.

असीमसोबत राहताना तिचा बहुधा भ्रमनिरास झाला असावा व त्याचे खरे हेतू तिला कळले असतील. थंडीचे दिवस असल्याने तो कधी ना कधी हिटर लावेलच अशा हिशोबाने ट्रॅप सेट करून ती परदेशी गेली.

श्रद्धाची मनाली थिअरी +१
दोन्ही खूनच, मनाली कल्प्रिट, तिच्या मानसिक आजारामुळे. पण हीटर चे तितके नाही पटत, पहिला खून मे मधे झाला आहे . अंबज्ञ यांची लिपस्टिक / कॉस्मेटिक थिअरी इन्टरेस्टिंग आहे.

पण ती पण रात्र वादळी पावसाची होती, विजा कडकडत होत्या असा उल्लेख आहे. त्यामुळे उतरू शकते तापमान.

लिपस्टिकमध्ये जीवघेणा घटक असेल तर काहीतरी त्रास त्या एस्कॉर्ट ना पण झालाच असता, तसा तो झाल्याचा उल्लेख नाही.

मेहता फॅमिलीची हाऊसमेड अलका प्रसाद ने सकाळी सात वाजता पाहिले . मेहता फॅमिली एक आठवड्यापूर्वीच यु एस मध्ये कॅलिफोर्नियातल्या मनालीच्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेली होती<<<<<<

इथे शहा फॅमिली हवे ना?

मनालीचा मानसिक आजार कळल्यावर तिच्याशी कुणी लग्न करणार नाही अशी शहांना काळजी असावी. त्यामुळे असीमला पैसे, प्रॉपर्टी देऊन का होईना पण लग्न करू दिले मनालीशी. त्याचे आधीचे उद्योग त्यांना माहीत असावेत आणि त्याच्यावर दबाव राहावा म्हणून आपल्याच बिल्डिंगमधला फ्लॅट त्याला घेऊन दिला असावा. यामुळे समीर पण मनालीपासून लांब जाईल हा अजून फायदा.

परंतु समीर तिला गतायुष्यातील गोष्टींवरून ब्लॅकमेल करेल, अशी तिला भीती वाटली असावी, म्हणून तिने खुनाचा प्लॅन केला. तिचेच लग्न त्यादिवशी असल्याने कुणालाही तिचा संशय येणे शक्य नव्हते.

जबरी आहे!

खून नाईकने केला असावा- पैश्याच्या इश्यूवरून. मेहताने १९ ऐवजी १५ कोटीत घर विकणे, शेजारच्या मुलाशी पैश्यावरून वाद, ३० हजारांवरून केशवशी वाद. काहीतरी ड्रग वापरून खून केला असावा. असीमला घर ताब्यात मिळाल्यावर खुनाचा पुरावा मिळतो, तो केशवला ब्लॅकमेल करतो म्हणून केशव त्याला पण संपवतो.

अप्रतिम कथा...!!
श्रद्धा... गोष्ट पूर्णच झाली की... मला पण परफेक्ट वाटते ही थिअरी... Happy

श्रद्धा सही थिअरी आहे कदाचित स्ट्राँगेस्ट मोटिव कुणाकडे असेल असा विचार करून पकडलेली लाईन खूपच कन्विन्सिंग आहे.

शेरलॉक फॅन्स ना 'डेविल्स फुटचा' रेफरंस आठवणार हे माहित होतेच म्हणूनच कटाक्षाने फायरप्लेस चा रेफरंस टाळला आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग असल्याचे सांगितले. Wink तसेही भारतात हीटर वा फायरप्लेसची गरज जम्मू सिमला कुलू मनाली सोडून फार कुठे पडत नसावी.

हो ते शहाच हवे.. नजरचुकीने झाले .. दुरुस्ती करतो.

मला खरं तर तो वाचक एखाद्या प्रतिसादावर + साईन वापरून मतदान करू शकतात त्या टाईप चा धागा काढायचा होता जेणेकरून मोस्ट कन्विन्सिंग थिअरी कायम प्रतिसादात वरती राहिल.. पण धागा ऊघडतांना काहितरी चूक झाली बहुधा.

विषारी घटक वेपराईझ व्हायचा अजून एक मार्ग म्हणजे मायक्रोवेव्ह. समीरने बाहेरून अन्न मागवले होते आणि अख्खी फॅमिली युएसला गेल्याने एकट्या असीमने फूड ऑर्डर करून खाल्ल्याची शक्यताही खूप आहे. दोन्ही दिवशी पाऊस असल्याने अन्न डिलिव्हर होईपर्यंत गार झाले असण्याची शक्यता आहे. सिक्युरिटी गार्डच्या इथे डिलिव्हरी बॉय एंट्री करत असताना तिथे बहुधा तो अमित धुप्पर हजर असावा. त्याच्याबद्दल सिक्युरिटी गार्डचे मत चांगले असल्याचा उल्लेख आहे. तो विषारी घटक समीरपर्यंत पोचवण्यात त्याचा सहभाग आहेच. त्याला मनालीने सुपारी दिली असावी आणि अशा प्रकारचे गुन्हे करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय असावा. असीमच्या वेळेला तो मानालीचाच फ्लॅट असल्याने तिला विष प्लांट करणे कठीण गेले नाही.

अजून एक म्हणजे शहांना समीर मरावा असे बहुधा शेवटपर्यन्त वाटत नसावे. म्हणून ते अमितला थांबवत असावेत. पण 9.02 ला समीरने त्यांना धमकावणारा कॉल केला असावा पैशांसाठी. त्यामुळे त्यांनी निरुपाय होऊन अमितला प्लॅन एक्झिक्युट करायला सांगितले. यावरून 9.30 आणि 9.37 च्या सरकत्या सावलीचा रेफ जुळतो. त्यानंतर लगेचच समीर फ्लॅटवर आला. फोन रेकॉर्ड्स फक्त समीरची तपासली गेली, इतरांची नाही.

श्रद्धा माझ्या थिअरी च्या फार फार जवळ आला तुझा हा लेटेस्ट प्रतिसाद बरेचसे नेमके बिल्डिंग ब्लॉक्सही मिळाले आहेत पण जुळवा जुळव वेगळी आहे.
शरीरात गेलेले कुठलेही विष बॉडीली परिणाम दाखवते आणि पोस्ट मॉर्टेम मधूनही सुटत नाही असा असे मला वाटते .

विष पोटात गेलेले नाहीये. त्याच्या वाफा इन्हेल केल्या गेल्या असाव्यात.

बॉडिली परिणाम म्हणजे ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स.

तसेही भारतात हीटर वा फायरप्लेसची गरज जम्मू सिमला कुलू मनाली सोडून फार कुठे पडत नसावी.<<<<<
दिल्लीला थंडीत पडू शकते गरज. अशक्य थंडी असू शकते तिथे. एमराल्ड पॅराडाईझ दिल्लीत आहे का? Happy

विष पोटात गेलेले नाहीये. त्याच्या वाफा इन्हेल केल्या गेल्या असाव्यात.
बॉडिली परिणाम म्हणजे ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. >>> हो पूर्णपणे शक्य आहे पण हाही पुन्हा डेविल्स फुटचाच आधुनिक रेफरंस झाला. आणि कार्बन मोनॉक्साईड सारखे पॉईझनिंगही डिटेक्ट होते.

शहा आणि अमित ह्यांच्यातले कनेक्शन ईंट्रेस्टींग आहे . हा सुद्धा नक्कीच एक प्रॉमिसिंग अँगल होवू शकतो सावलीचा ऊल्लेख केल्याबद्दलही मला कोण आनंद झाला.. Wink

ऑस्सम थिंकिंग श्रद्धा !कीप डिगिंग.

दिल्लीला थंडीत पडू शकते गरज. अशक्य थंडी असू शकते तिथे. एमराल्ड पॅराडाईझ दिल्लीत आहे का?>> खरं तर शहराच्या ऊल्लेखाची आधी गरज वाटली नाही पण पुणे/मुंबई डोक्यात होते.

हा खुन केशव नाइक ने केला असावा
डिलिशिअस डाईन फुडमधुन एखादे पौयझन दिलेले असावे त्यानंतर केशव नाईक तिथुन निघुन गेला. त्या पौयझनमुळे समिर चा रात्रि म्रुत्यु झाला. हाऊसक्लीनर गणेश शिंदे (हाहि त्यात सामिल असावा कारण त्याचि आई केशव नाईकच्या घरी हाऊसमेड आह) एमराल्ड पॅराडाईझमध्ये आला त्याने केशवला फोन करुन समिर मेल्याचे सांगितले व केशवच्या सांगण्यावरुन तिथे असलेल्या संशयास्पद वस्तु कचर्यात फेकुन दिल्या. केशव नाईक तेथे आला व आपल्या फैमिलि डौक्टर द्वारा त्याच्या शरिरातिल पौयझन दुर केले. त्यानंतर केशव नाइक्ने त्याच्या वडिलांना या खुनाचि कल्पना दिलि. म्हनुन शशिकांन नाइकांनि त्यांच्या वकिलांना आधि फोन केला व त्यांच्याशि चर्चा करुन केशव ला पोलिसांना फोन करण्यास सांगितले.

चांगला अँगल आहे पंडित पण कुठलाही डॉक्टर विदाऊट प्रोसीजर डेड बॉडीमधले पॉईझन कसे काढू शकेल?

कुठल्यातरी मार्गाने त्या रुममधली ऑक्सीजन लेव्हल कमी कमी करत नेली गेली का? म्हणूनच समीरने एरवी बंद असलेले रुमचे दार उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तोवर उशीर झाला.

एक मार्ग म्हणजे एलपीजीवर चालणारा वॉटर हिटर.. पण इतक्या अपस्केल बिल्डिंगमध्ये असे हिटर का असतील?

दुसरं म्हणजे अमित धुप्पर टोटल बाजूला टाकून भास्कर अवस्थी आणि जुळ्या नातीपैकी एकजण असे पण पॉसीबल आहे. लग्नाला दोघी सेम कपडे घालून पण मध्ये एकजण आजोबांना मदत करायला परत आली. एकदा खुनासाठीचा घटक दिला की भास्कर अवस्थीना घरी थांबायचे कारण नव्हते पण नातीसाठी थांबले. Happy

विष पोटात गेलेले नाहीये. त्याच्या वाफा इन्हेल केल्या गेल्या असाव्यात.>> बरोबर एखादे विषारि औषध रुमालावर घेउन तो रुमाल त्याच्या नाकावर ठेवला असावा आणि त्याचवेळि घाबरल्यामुळे त्याच्या चेहर्यावर तसे एक्स्प्रेशन्स आले असावेत.

Oh my God Shraddha ! You are too good.
मी ज्या ज्या शक्यतांचा विचार केला होता त्या तू एकदम लीलया टिक करत आहेस. जुळ्या मुलींची त्यापैकीच एक.
पण लॅक ऑफ ऑक्सिजन मुळे होणारे जसे हाय अल्टिट्यूड वर होते परिणाम (ऊलटी वगैरे) आणि मृत्य्यू ही डिटेक्ट करता येतो.

मला वाटते यात 3 फॅमिली involved आहेत,
मनाली ला तो मारावयास वाटतोय, (श्रद्धा ची थिअरी)
2 जुळ्या मुली आणि आयुर्वेद वाले आजोबा यांनी प्लॅन execute केला
मनाली च्या वडिलांनी घरचेच लग्न असल्याने विडिओ कव्हर मिळवून दिले,
तो मार्शल आर्ट्स वाला, अथलीट मुलगा दार उघडायला मदत करतो,(सरकणारी सावली)

आजोबा स्किन रिलेटेड प्रोडक्त बनावट असल्याने , त्वचेतून शोषले जाणारे विष असू शकेल

अजून विचार केल्यावर फक्त शहा आणि अवस्थी फॅमिली इंव्हॉल्व्ह असायची शक्यता जास्त आहे.

अमित धुप्पर हा एक गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे. त्याला इंव्हॉल्व्ह करून घेतले तर तो पुढेमागे यांनाच ब्लॅकमेल करू शकतो. सार्थकच्या कराटे स्किलमुळे समहाऊ समीर मेला असे गृहीत धरले तरी जितके जास्त लोक कटात सामील तितका तो प्लॅन फुलप्रूफ राहायची शक्यता कमी.. सार्थक घरी राहायचे कारण कुणीच बिल्डिंगमध्ये नसताना समीरला भेटून त्यांच्यातले मॅटर बोलून मिटवायचे एवढेच असणार.

केशव नाईकला फक्त पैसे पाहिजे असणार, त्याची इंव्हॉल्व्हमेंट भांडाभांडीपर्यंतच आहे त्या दिवशीच्या इव्हेंटमध्ये.

अवस्थी आजोबा एकूण दोन वेळा योगा करायला गेले नाहीत. म्हणजेच, ते किंवा नात दोनवेळा त्या फ्लॅटमध्ये गेले. एकदा खुनाला कारणीभूत गोष्ट प्लांट करायला, दुसर्यावेळी सकाळी गणेश येण्याआधी ती काढून घ्यायला.

सिम्बा मस्तं मोसाईक थिअरी आहे तुमची ... अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या ओरिएंटेल एक्सप्रेसची आठवण झाली पण पुन्हा विषापाशी येवून गाडी अडते.
जर खून (तो खूनच आहे असे धरून चालल्यास) नेमका कसा झाला ते कळाले की बाकी लिंक्स जोडणे सोपे व्हावे.

थोडी हिंट देतो फ्लॅट्सची लोकेशन्स बघता ३०२ नध्ये जाण्यासाठी फक्त ३०१, २०१ आणि १०१ मधल्या लोकांनाच कॉरिडोअर कुठल्यातरी एका मजल्यावर क्रॉस करावा लागेल. १०२ आणि २०२ मधले जिन्यातून येवू शकतात पण ३०२ मध्ये जाण्यासाठी त्यांना कॉरिडोअर क्रॉस करावा लागणार नाही.

मस्त कोडे. श्रद्धा मस्त थियरी.

अमित धुप्पर सिक्युरिटी सिस्टीम एक्सपर्ट आहे. त्याच्या मदतीने सिक्युरिटी सिस्टीम (ह्यात सीसीटीव्ही फूटेज, कॅमेरा पण आलेच) मॅनेज करणे शक्य आहे. ती सरकणारी सावली पोलीसांना मिसगाईड करण्यासाठी असू शकते.

मोस्ट अनयुज्वल सस्पेक्टची थियरी वापरली तर समीरच्या आईनेच त्याचा खून केला असावा. त्यांनी पाठविलेल्या अंगार्‍यामध्ये विषारी केमिकल्स सापडले आहेत. तो अंगारा समीरने खाल्ला नसला तरी कपाळावर, गळ्यावर लावला असावा. अंगार्‍यामध्ये केमिकल्स धर्मिक सोर्स मध्ये मिसळले नसतील. ते सारंगीबेनने मिसळले असण्याची शक्यता आहे. पण ही थियरी असीमच्या मृत्यूशी कनेक्ट होत नाही (किंवा मला करता येत नाही).

श्रद्धाचे एक ऊत्तर जे मला आत्त्तापर्यंतच्या ऊत्तरात खूप कन्विन्सिंग वाटले ते मी सध्यापुरते सर्वोत्तम म्हणून मार्क केले आहे.

बाकी सुरुवातीपासून नुसता कोड्याचा विचार करतेय त्यामुळे लिहायचं राहिलं... कोडं एकदम भारी हायझेनबर्ग! डोक्याला भारी खुराक आहे.

धन्यवाद!

आजिबात जवळीक नसतांना केवळ शुभेच्छा देण्यासाठी २ मिनिटे ३७ सेकंदांचा कॉल तुम्हाला ग्राह्य वाटतो आहे का?
बिल्डिंगमधल्या सगळ्या फॅसिलिटिज, सिक्युरिटी सिस्टीम्स ई. कंसिडर केले का?

आजिबात जवळीक नसतांना केवळ शुभेच्छा देण्यासाठी २ मिनिटे ३७ सेकंदांचा कॉल तुम्हाला ग्राह्य वाटतो आहे का?<<<<<<
नाही. म्हणूनच त्याने पैशासाठी धमकी दिली असावी, मग शहांचा निरुपाय झाला असावा.

बिल्डिंगमधल्या सगळ्या फॅसिलिटिज >> त्या दृष्टीने तो गुप्त सेफ्टी वॉल्ट लक्ष वेधून घेत आहे का? बाकी अमेनिटीज तशा स्टॅन्डर्ड वाटल्या.

जबरदस्त बर्ग नि श्रद्धा

सकाळी ७:३७ गणेश शिंदेचा केशव नाईकला फोन
सकाळी ७:०४ हाऊसक्लीनर गणेश शिंदेची (वय १८) एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री (गणेश शिंदेची आई केशव नाईकच्या घरी हाऊसमेड आहे) >> ह्या टाईम गॅपचा काही संबंध आहे का ?

नाही. म्हणूनच त्याने पैशासाठी धमकी दिली असावी, मग शहांचा निरुपाय झाला असावा. >> एकदम चपखल जे तू आधीही ओळखलेस. शहांचा निरूपाय झाला हे ठीक पण त्यांनी अमित, सार्थक वा भास्कर आणि घरी राहिली असण्याची शक्यता असणार्‍या जुळ्यां पैकी एका मुलीला काही सिग्नल दिला असता तर फोन रेकॉर्ड्स मध्ये आले असते. आणि मॅरेज हॉल मधून कोणी घरी आले असते तर एंट्री एग्झिट रेकॉर्ड ही आला असता.

श्रद्धा +१

मला वाटते की आयुर्वेदिक आजोबा आणि शहा यांनी मिळून खुन केलेला आहे. शहांनी आजोबांना उकसवले आणि आजोबांनी नातीच्या सहाय्याने कुठली तरी जडी-बुटी श्र म्हणतीये तशी ए सी / हिटींग सिस्टीम मध्ये टाकून त्यावरून खुन केलेला आहे आणि मग त्याचीच मदत घेऊन आसीम चा पण खुन झाला.

किंवा मग समीरचा खुन फक्त आजोबा - नातीने केला आणि हे शहांना कळले व त्यांनी आजोबांना ब्लॅकमेल करून आसीम चा खून घडवून आणला.

बर्ग लैच भारी कोडं आहे.

ह्या टाईम गॅपचा काही संबंध आहे का ? >> असामी त्या दरम्यान गणेश शिंदेने समीरची बेडरूम सोडून त्याचे रोजचे हाऊस किपिंग काम केले.

बिल्डिंगमधल्या सगळ्या फॅसिलिटिज >> त्या दृष्टीने तो गुप्त सेफ्टी वॉल्ट लक्ष वेधून घेत आहे का? बाकी अमेनिटीज तशा स्टॅन्डर्ड वाटल्या. >> बिंगो च्या आधी काय असते 'फर्स्ट रो' का ? Wink

भुताचा एवढ्या वेळा ऊल्लेख होवूनही अमानवीय लवर्स पैकी कोणीही भुताचा अँगल धरून केस सोडवू पहात नाहीये Sad
कार्तिक मेहतांना कोणीच सस्पेक्ट मानत नाही का Wink

वेडावाकडा चेहरा ह्यावरून मी भूताचा (भूताचे सोंग घेऊन कोणी तरी आल्याचा) विचार केला होता पण कोणाचे भूत ह्यावरच गाडी अडकली Happy कार्तिक मेहता मेला तर त्याने असीमला का घाबरवावे ?

ह्यावरून वर्तक आणि बेग ह्यांच्या डायरीतल्या नोंदी. >> बर्ग बेग बदलायला हवे.

वेडावाकडा चेहरा ह्यावरून मी भूताचा (भूताचे सोंग घेऊन कोणी तरी आल्याचा) विचार केला होता पण कोणाचे भूत ह्यावरच गाडी अडकली >> कार्तिक मेहता आहेत की तुला हवे असल्यास Proud

कुणीतरी कॉरिडॉर क्रॉस केला असेलच तर ती व्यक्ती शहांच्या फ्लॅटमधून आल्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. कारण इतर मजल्यावरचे लोक तिथले फुटेज कसून तपासले जाईल ही शक्यता असताना कॉरिडॉर क्रॉस करण्याची मेजर रिस्क त्या मजल्यावर घेणार नाहीत.

मर्डर वेपन त्या गुप्त कप्प्यात असू शकते. ती रिमोटली कंट्रोल करता येणारी गोष्ट आहे का?

बर्ग बेग बदलायला हवे. >> बदलले 'मलिक' असायला हवे होते.
आधी श्रद्धाने आणि आता तू काढलेल्या 'नावांच्या' चुकीखेरीज एकही शब्दं बदललेला नाही ह्याची हमी देतो.

मर्डर वेपन त्या गुप्त कप्प्यात असू शकते. ती रिमोटली कंट्रोल करता येणारी गोष्ट आहे का? >> नाही

कारण इतर मजल्यावरचे लोक तिथले फुटेज कसून तपासले जाईल ही शक्यता असताना कॉरिडॉर क्रॉस करण्याची मेजर रिस्क त्या मजल्यावर घेणार नाहीत. >> बरोबर म्हणूनच सरकणारी सावली फक्तं तिसर्‍या मजल्यावरच्या एलेवेटर समोरील कॅमेरातच दिसली.

Pages