एमराल्ड पॅराडाईझ केस

Submitted by हायझेनबर्ग on 5 June, 2017 - 18:17

'एमराल्ड पॅराडाईझ' ह्या सुपर लक्झ्युरियस तीन मजली बिल्डिंग मधल्या तिसर्‍या मजल्यावरच्या पेंट हाऊस नं ३०२ सोडून पाचही फ्लॅट मध्ये दि. ६ मे २०१६ च्या वादळी पावसाच्या रात्री नेहमीचा झगमगाट आणि वर्दळ नव्हती. कारणही तसेच होते 'सेबरलाईन' ह्या रेग्युलर कार्स कस्टमाईझ्ड करणार्‍या कंपनीचे मालक 'देवेन शहा' जे तिसर्‍या मजल्यावरच्या दोन पैकी एका पेंट हाऊस नं. ३०१ मध्ये रहात, त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे 'मनालीचे' आज लग्न होते आणि सगळे पॅराडाईझ निवासी घरचेच लग्नं असल्यासारखे सकाळपासून त्याच कार्यक्रमात गेले होते. कोट्याधीशांचीच सोसायटी ती, सगळे एका चढ एक श्रीमंत बिझनेसमन तिथे रहात, अपवाद नं ३०२. एका मजल्यावर दोन असे सहा अति प्रशस्तं फ्लॅट्स असलेली 'एमराल्ड पॅराडईझ' शहरातल्या प्रत्येकासाठी जणू प्रतिस्वर्गच होता. टेरेस वरती स्विमिंग पूल, स्पा, स्टीम रूम, स्टेट ऑफ द आर्ट जिम, टेनिस कोर्ट, मिनी सिनेमा थिएटर, सेंट्रल एअर कंडिशनिंग, सन रूम, मोठी बाग, दोन लेवल अंडरग्राऊंड पार्किंग, चिल्ड्रेन्स एरिया अशी लग्झुरी तर होतीच पण सिक्युरीटीही तेवढीच कडक, सगळ्या लॉबीज आणि जिने अद्ययावत कॅमेरांनी ईक्विप्ड होते, चोवीस तास गेट्स वर दोन सिक्युरिटी गार्ड्स, ईंटरकॉम, केवळ फ्लॅट ओनरलाच ज्याची जागा माहित असेल आणि ऊघडता येईल असा सेफ्टीवॉल्ट, प्रत्येक मजल्यावर ईमर्जन्सी लाईन्स, जनरेटर बॅकअप, कधीही नादुरूस्त न होणारे एलिवेटर्स असे सगळे.

सहा महिन्यांपूर्वीपर्यंत पेंट हाऊस नं ३०२ मध्ये देवेन शहांचे जीवलग मित्रं 'कार्तिक मेहता' रहात होते. सहा महिन्यांपूर्वी कार्तिकशेठचे अचानक हार्ट अ‍ॅटॅक ने निधन झाले तेव्हा त्यांच्या अतिशय धार्मिक स्वभावाच्या पत्नी 'सारंगीबेन' ते घर आपल्या मुलाच्या नावाने करून, एक खूप मोठी रक्कम एका चॅरिटीला देवून वानप्रस्थाश्रम (त्यांच्या गुजरातमधल्या पवित्र धर्मस्थळी जाऊन सन्यस्तं जीवन जगणे) स्वीकारला. असे करण्याचे एक कारण असेही होते की आजवर घरापासून कायम दूरच राहिलेल्या आपल्या अट्टल बेवड्या, जुगारी आणि बाहेरचे सगळे नाद असलेल्या एकुलता एक मुलगा 'समीर' बरोबर रहाणे त्यांना मान्य नव्हते पण घरावरचा त्याचा वारसा हक्क ही त्यांना डावलायचा नव्हता. सारंगीबेनने घर सोडताच त्याचदिवशी समीर ने घराचा ताबा घेत आपला मुक्काम एमराल्ड पॅराडाईझमध्ये हलवला.

पण ही अरेंजमेंट एमराल्ड पॅराडाईझच्या सगळ्या कुटुंबवत्सल राहिवासींच्या जीवावरच ऊठली. कायम दारू पिऊन धिंगाणा करणारे तरूण, लाऊड पार्ट्या , सदोदित येणार्‍या एस्कॉर्टच्या गाड्या ह्यामुळे एमराल्ड पॅराडाईझ तिथल्या राहिवाश्यांना एकदम नरकासारखे वाटू न लागते तर नवलच. बरं हे सगळे राहिवासी 'काँटॅक्ट्स' वाले पावरफुल लोक असूनही 'समीर मेहता' ला ते शह देवू शकत नव्हते आणि ह्याला कारण होते समीरचा परममित्रं, त्याच्या सगळ्या सवयीतला त्याचा भागीदार 'केशव नाईक' जो रुलिंग राष्ट्रीय पार्टीच्या अतिशय पावरफूल अश्या नेत्याचा एकुलता एक मुलगा होता. बर्‍याच वेळा समीरशी, देवेन शहा सोडून ईतर पॅराडाईझ वासीयांचे खटके ही ऊडाले होते पण सदोदित समीरच्या बरोबरच असलेल्या केशवचा अतिशय खालच्या दर्जेच्या भाषेचा वापर आणि धमकीवजा प्रतिसाद मिळताच सगळ्यांची बोलती बंद झाली होती. मात्रं त्यांच्या मनात अपमान आणि रागाचा लाव्हा खदखदंत होता हे नक्की.

ह्या सगळ्या त्रासावर काहितरी ऊपाय करावा म्हणून एमराल्ड पॅराडाईझ च्या ईतर पाच फ्लॅट धारकांची मिटिंग जेव्हा भरली तेव्हा देवेन शहांनी एक बिनतोड ऊपाय मांडला. सारंगीबेनने समीरसाठी घर ठेवले असले तरी पैशाची तजवीज करून ठेवलेली नव्हती हे त्यांना माहित होते आणि ऊत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्याने समीर त्याच्या 'शोकीन' सवयीमुळे लवकरच पैशांच्या तंगीत येणार हे ते जाणून होते. मात्रं ही आतली बातमी मिटिंगमध्ये ऊघड न करता, बाजारभावाने १५ कोटी किंमत असलेल्या समीरच्या फ्लॅट्साठी समीरला १९ कोटीची ऑफर देण्याचा प्रस्ताव मांडला. पण ह्या प्रस्तावात गोम अशी होती की फ्लॅट त्यांच्या स्वतःच्या नावावर राहिल, तो त्यांच्याच मालकीचा असेल पण ते फक्तं १५ कोटी देतील आणि बाकीचे चार कोटी ऊरलेल्या चार प्लॅटधारकांनी ऊभे करायचे. त्या मिटिंगमध्ये ह्या त्रासाची एवढी मोठी किंमत द्यायला एकही जण तयार झाला नाही पण होकार देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही हेही त्यांना कळाले होते. आपल्या वयात येणार्‍या मुला मुलींना समीरच्या राजरोस चाललेल्या तमाशापासून लांब ठेवायचे असेल तर ही किंमत मोजावीच लागेल ह्याची कल्पना त्यांना आली होती. समीर ह्यापेक्षा कमी किंमतीत फ्लॅट विकणार नाही आणि शहा हा फार डोकेबाज आणि हिकमती माणूस आहे त्याचेही मोठे काँटॅक्ट्स आहेत आणि समीरला ते त्याच्या लहान पासून ओळखत असल्याने समीरच्या तोंडाला तोंड फक्तं तेच समर्थपणे देवू शकतात हेही ते सगळे ओळखून होते.

शहांनी हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांच्या डोक्यात एका दगडाने दोन पक्षी मारायचा प्लान तयार होता. झाले असे होते की त्यांच्या मनाविरूद्धं जाऊन 'मनाली' एका कॅथलिक मुलाशी 'असीम' शी लग्न करत होती ज्याच्याशी तिची एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये ओळख झाली होती आणि ती त्याच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन त्याच्यावर पूर्णपणे भाळली होती. गोव्याकडचे एक घर सोडल्यास ह्या मुलाकडे काहीही नाही आणि हा मुलगा अतिशय धूर्त आणि कावेबाज असून दिसतो तेवढा प्रेमळ आजिबात नाही हे देवेन शहांनी ओळखले होते. मनालीवर त्यांचा फार जीव होता आणि असीम तिच्या एकुलत्याएक असण्याचा फायदा घेत आहे हेही त्यांना स्प्ष्टं कळून येत होते. पण त्यांच्या नात्याला विरोध करून आपल्या हाती काहीच लागणार नाही आणि 'मनाने अतिशय भावनाप्रधान पण प्रेमात आंधळ्या झालेल्या' मनालीला आपण कायमचे आपला शत्रू बनवून घेवू हे त्यांच्या पांढर्‍या केसांना आणि काळ्या चष्म्याला चांगले ठावूक होते. म्हणूनच लग्नानंतर मनाली आपल्या डोळ्यांसमोर रहावी ह्या हेतूने त्यांनी हा फ्लॅट चा प्लॅन बनवला होता आणो तो मनाली आणि असीम कडून मान्यही करून घेतला होता. 'अजून एक प्रॉपर्टी' आपल्या बायकोच्या नावावर होत आहे हे कळल्यावर असीम ह्या प्लान ला आजिबात नाही म्हणणार नाही आणि सुरूवातीला 'तळ्यात मळ्यात' असलेल्या मनालीला ही तो नक्की तयार करेल हा त्यांचा होरा चूक निघाला नसता तर नवलच झाले असते.

शनिवारच्या ६ मे चा लग्नं समारंभ आटोपल्यानंतर ७ मेची पॅराडाईझ वासियांची सकाळंच मुळी पोलिस आणि अ‍ॅंब्युलन्स च्या आवाजाने ऊजाडली. समीर मेहताचे त्याच्या राहत्या घरात निष्प्राण शरीर सापडले होते आणि केशव नाईकने प्रचंड आरडाओरड व गोंधळ मांडला होता. रोज सकाळी सातालाच येणार्‍या समीरच्या हाऊसक्लीनरने घरातला नेहमीचा कचरा सिगरेटी/ दारूच्या बाटल्या/ काँडोमची पाकिटे/ विचित्रं औषधांच्या गोळ्यांची पाकिटे/ अस्ताव्यस्तं पडलेले कपडे/ अर्धवट सोडलेले बाहेरून मागवलेले खाणे ई. आवरून झोपमोड होवू नये म्हणून नेहमीच बंदच असलेल्या समीरच्या आज ऊघड्या राहिलेल्या बेडरूममध्ये डोकावले तेव्हा त्याला बेडवर भूत बघितले असल्यासारखा चेहरा करून पडलेला समीर दिसला आणि त्याने लगोलग केशव नाईक ला फोन केला.

हाय प्रोफाईल केस आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याकडून थेट कमिशनर साहेबांकडेच विचारणा करण्यात आल्याने केसचा तपास सुरूवातीलाच क्राईम ब्रँच कडे सोपवला गेला. फोरेन्सिक आणि क्राईम सीन ईन्वेस्टिगेशन टीम्सना बोलावून प्रार्थमिक तपास आणि बिल्डिंग मधल्यांची चौकशी लगोलग सुरू केली पण समीरचा मृत्यू नेमका कश्याने झाला ह्याचा कुठलाही अंदाज आजिबातच येत नसल्याने केस ज्यांच्या समर्थ आणि अतिशय अनुभवी खांद्यांवर सोपवली होती त्या १९९८ च्या बॅचच्या अखिलेश ठाकुरांच्या चढत्या भुवया बरेच काही सांगत होत्या. ठाकुरांनी कठीणात कठीण अश्या चाचण्यांनंतर ज्या दोन ऑफिसर्स ची निवड त्यांच्या टीममध्ये केली होती त्या ऑफिसर निलेश वर्तक आणि शमा मलिक दोघांनीही खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघाल्यानंतर चार वर्षे ठाकुरांच्या करड्या नजरेखाली शिकलेल्या सगळ्या युक्ती प्रयुक्ती वापरूनही फाऊल प्ले चे काहीच धागेदोरे हाती लागत नसल्याने 'ही मेडिकल केसच आहे' असाच प्रार्थमिक होरा केला होता. पण तो किती चुकीचा आहे हे त्यांना ठाकुरांच्या चेहर्‍याकडे बघतांच कळाले होते.
आठवडाभरात दोन डझन वेळा क्राईम सीन ला भेट देवून मिळवलेली माहिती, एक्स्पर्ट टीम्सच्या नोंदी, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि त्यांचे तर्कशास्त्रं ह्यावरून वर्तक आणि मलिक ह्यांच्या डायरीतल्या नोंदी.

* दोन्ही दिवसांच्या टाईमलाईन ऊलट्या क्रमाने वाचाव्यात.

टाईमलाईन ७ मे
सकाळी ९:२८ पोलिस एमराल्ड पॅराडाईझ मध्ये दाखल
सकाळी ९:१२ केशव नाईकचा पोलिस हेल्प लाईन वर फोन
सकाळी ८:५८ शशिकांत नाईक ह्यांचे वकील अ‍ॅड अशोक कटियार ह्यांचा केशव नाईकला फोन
सकाळी ८:४१ केशव नाईकचा वडील शशिकांत नाई़क ना फोन (शशिकांत नाईक - पर्यावरण मंत्री)
सकाळी ८:२९ केशव नाईकचे फॅमिली डॉक्टर निनाद पाध्येंची एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री.
सकाळी ८:११ केशव नाईकची (वय २४) एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
सकाळी ७:३७ गणेश शिंदेचा केशव नाईकला फोन
सकाळी ७:०४ हाऊसक्लीनर गणेश शिंदेची (वय १८) एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री (गणेश शिंदेची आई केशव नाईकच्या घरी हाऊसमेड आहे)

टाईमलाईन ६ मे
(त्यानंतर ७ मे सकाळी ७:०४ पर्यंत कुठलीही एंट्री वा एग्झिट नाही)
रात्री ११:५६ एमराल्ड पॅराडाईझ मधील देवेन शहांच्या दोन गाड्यांची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ११:१३ ते ११:२० दरम्यान एमराल्ड पॅराडाईझ मधील ईतर चार कुटुंबांची एकूण चार गाड्यांची एंट्री (गाडी मालकांचे डिटेल्स ऊपलब्धं)
रात्री ११:११ केशव नाईक ची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ११:०४ डिलिशिअस डाईन ह्या फुड डिलिवरी सर्विसची समीर मेहताच्या घरात डिलिवरी.
रात्री ११:०१ ला दोन एस्कॉर्टस सर्विसच्या मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ९:४० केशव नाईक सहित दोन मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ९:१० समीर मेहताची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री

* महत्वाच्या व्यक्तीं सबंधित नोंदी
- समीर ला जिवंत पाहणारी केशव नाईक शेवटची व्यक्ती.
- डिलिवरी बॉयच्या जबाबानुसार फुड डिलिवरी केशव ने घेतली आणि त्याने त्यावेळी समीर ला पाहिले नाही, नेहमी समीर डिलिवरी घेतो आणि टीपही देतो पण केशव ने टीप दिली नाही.
- एस्कॉर्टस च्या जबानीनुसार ते निघतांना समीर जिवंत होता पण ठरलेले ३० हजार देण्यावरून समीर आणि केशव मध्ये थोडी बाचाबाची झाली.
- केशव नाईक प्रमुख संशयित पण मोटिव काहीच दिसत नाही.
- फ्लॅट नं. २०२ मधील मनीष अवस्थी ह्यांचे ७२ वर्षीय वडील 'भास्कर अवस्थी' तब्येतीच्या कारणाने शहांच्या लग्नाला न जाता घरीच होते. वयाच्या मानाने आश्चर्यकारक फिट आणि करारी, तत्ववादी व्यक्तीमत्व. अनेक प्रश्नांना भास्कर अवस्थी ह्यांनी रागीट टोनमध्ये ऊडवा ऊडवीची ऊत्तरे दिली. भास्कर अवस्थी ह्यांचा देशविदेशातील औषधी वनस्पती गोळा करून श्रीमंत क्लायंटसना त्वचारोगावर होममेड औषधी विकण्याचा बिझनेस होता जो मनीष अवस्थी ह्यांनी एका सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या यशस्वी 'ब्यूटीकॉन फार्मा' कंपनी मध्ये विकसित केला आहे. भास्कर अवस्थी केवळ परंपरागत ज्ञानावर ते औषध बनवत आणि मोठ्ठमोठ्या डॉक्टरांनी हात टेकलेल्या केसेस मध्ये त्यांच्या औषधांचा गूण आल्याचे काही श्रीमंत लोक अतिशय विश्वासाने सांगतात. पण सध्या त्यांचा हा ऊद्योग कैक वर्षांपासून बंद आहे.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार आपल्या १६ वर्षांच्या जुळ्या नातींची छेड काढणार्‍या समीरच्या दोन मित्रांना भास्कर ह्यांनी एका महिन्यापूर्वी मारहाण केली होती आणि त्यानंतर त्यांची समीरशीही जंगी वादावादी झाली होती पण मनीष ह्यांनी वडिलांना आवर घातला. भास्कर बिल्डिंगमध्ये कुणाशीही आणि त्यांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याशीही कोणी जास्तं बोलत नाही. ते न चुकता सकाळी सहा आणि संध्याकाळी सहाला तासाभराच्या वॉक ला जातात आणि गार्डनमध्ये तासभर योगा करतात. पण ६ मेला संध्याकाळी आणि ७ मेला सकाळी ते गेले नाही.
- फ्लॅट नं. २०१ मधील संपत जैन ह्यांचा १८ वर्षांचा मुलगा 'सार्थक जैन' परीक्षेचा अभ्यास असल्याच्या कारणाने लग्नाला न जाता घरीच होता.
सार्थक बीकॉमच्या पहिल्या वर्षाला आहे पण कॉलेज ऊपस्थिती आणि अभ्यासात यथातथाच आहे. कॉलेजात अशी कुठलीही परीक्षा नसतांना अभ्यासाचे कारण पटण्यासारखे नाही. सार्थक लहानपणापासून हौशी मार्शल आर्ट्स स्पर्धामध्येही बर्‍यापैकी सक्रीय असतो.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना, सार्थकची आई ऊज्वला जैन ह्यांनी सार्थक समीरशी बोलतांना किंवा बरोबर जाता येता दिसल्यास कळवण्यास संगितले होते. गेल्या तीन महिन्यात चढत्या वारंवारतेने सार्थकची समीरशी वाढणारी जवळीक गार्ड्सनी त्याच्या आईला कळवली होती आणि मागच्याच आठवड्यात त्याची समीरशी झालेली वादावादीही ज्यावेळी समीरने सार्थकला त्याच्या गर्लफ्रेंड समोर दोन श्रीमुखात लगावल्या होत्या. हे सत्यं सार्थकच्या गर्लफ्रेंडनेही कबूल केले तिला त्यामागचे कारण काही तरी ऊधार असलेल्या पैशांबद्दल असावे असे वाटते.
-फ्लॅट नं १०२ मधील साधूराम गिडवानी ह्यांच्याकडे दिल्लीहून त्यांचा भाचा 'अमित धुप्पर' हा आठवड्याभरापासून त्याचे शहरात काही काम होते म्हणून पाहूणा म्हणून आला होता. ६ मे च्या रात्री तो ही घरीच होता. दिल्लीमध्ये अमित चा ऑफिस सिक्युरिटी सिस्टीम ईनस्टॉल करण्याचा बिझनेस आहे आणि त्याच्या नावावर मारामारी/ धाक दाखवणे वगैरे छोटे मोठे गुन्हे रजिस्ट्र्र्ड आहेत. एकदा नशेत भरधाव गाडी चालवतांनाही त्याला पकडले होते तेव्हा त्याच्याकडे दुर्मिळ अशी नशा येणारी औषधे सापडली होती.
- सिक्युरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना अमित अतिशय चांगला तरूण वाटला होता. त्यांच्यामते सिक्युरिटी सिस्टीम बद्दल त्याचे ज्ञान फार अ‍ॅडवान्स्ड होते. तो त्यांच्याशी बर्‍याच गप्पा मारत असे आणि एक दोनदा अडून अडून त्याने समीर बद्दल जास्तं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांना आता वाटते आहे.
- अमितची चौकशी करतांना तो बोलण्यात अतिशय पटाईत माणूस वाटतो. त्याचा समीर मेहताशी वरवर काहीही सबंध दिसून येत नाही पण त्याचे एकंदर बॅकग्राऊंड आणि वागणे संशयास्पद वाटते.
- फ्लॅट नं १०१ मधील ६० वर्षीय दिनेश कोठारी आपल्या दुसर्‍या पत्नी नलिनी (४० वर्षे) सोबत राहतात ज्यांच्याशी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा 'नवीन' सध्या यूएस मध्ये मेडिकल फील्ड मध्ये पीएचडी करत आहे.
- फ्लॅट नंबर ३०१ मधील देवेन शहा हाय सर्कल मध्ये ऊठबस असलेला माणूस आहे. स्वभावाने शांत, धीरगंभीर पण विचारी व अगदी मोजून मापून बोलणारा अतिशय व्यवहारी माणूस वाटला. शहांनी बाजारभावाने समीर मेहताकडून त्याचे घर १५ कोटी रुपयांना मागच्याच आठवड्यात विकत घेतले होते आणि १५ मेपर्यंत घर खाली करून ताब्यात देण्याचे हमीपत्रं समीरने त्यांना दिले होते ज्यावर दोन्ही पार्टीच्या वकिलांच्या सह्या होत्या आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर मार्गाने झाला होता.
- शहांच्या पत्नी देविका शहा पुर्वाश्रमीच्या देविका अय्यर ह्या कोचीच्या प्रसिद्धं गायनॉकोलॉजिस्ट श्रीनिवास आणि जोस्त्ना अय्यर ह्यांच्या कन्या ज्या स्वतः एक यशस्वी गायनॅक होत्या पण मनालीच्या जन्मानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली.
- मनाली शहा एका मल्टिनॅशनल ऑटोमोबाईल कंपनीत मध्ये मार्केटिंग मॅनेजर. यु एस मधून एम बी ए आणि येत्या काही वर्षात वडिलांच्या 'सेबरलाईन ऑटो' ची धुरा सांभाळेल अशी अपेक्षा. आव आणल्यासारखं रोखठोक बोलणं पण ईमोशनली बायस्ड, चौकशी दरम्यान बायपोलर डिसऑर्डरसाठीची मेडिकेशन्स घरात दिसली.
- असीम पारकर एका बुटीक ईन्वेस्टमेंट फर्ममध्ये रिसर्च मॅनेजर. माचो पण फिशी कॅरॅक्टर. शहा फॅमिली सोडून ह्याचा समीर मेहता प्रकरणाशी काही संबंध वाटत नाही. एका सप्लाय चेन कंपनीत मॅनेजर असतांना वेंडर मॅनेजमेंटमधील फ्रॉड केस मध्ये ह्याचे नाव आले होते पण कंपनीने बोभाटा नको म्हणून केस न करता केवळ कामावरून कमी केले. त्या नंतरच्या कंपनीत सेक्शुअल हॅरेसमेंट चाही आरोप ठेवण्यात आला पण गैरसमजातून झालेला प्रकार म्हणत कंपनीने प्रकरण मिटवले आणि पुन्हा कामावरून काढून टाकले. सध्याच्या कंपनीत 'एथिकल क्लायंट प्रॅक्टिसेस' वायोलेशन म्हणून एनक्वायरी चालू आहे. सध्या नॉन क्रिटिकल असाईनमेंट हॅंडल करतो आहे.
- मनाली आणि असीमच्या लग्नाला शहा सारख्या हुशार माणसाने असीम पारकर ची माहिती न काढता सहजी परवानगी दिली असेल असे वाटत नाही.
- शहांनी वरतून प्रेशर आणून मनाली-असीम दांपत्याला त्यांच्या तीन आठवड्यांच्या प्लॅन्ड हनीमूनला जाऊ देण्याची परवानगी मिळवली व गरज पडल्यास त्यांना दोन दिवसात हजर करण्याची हमी दिली आहे.

* खबरींकडून समजलेली माहिती
- केशव, समीर आणि नवीन कोठारी एकाच ज्युनिअर कॉलेज मध्ये असतांना त्यांनी नवीनला (जो 'गे' आहे) त्याच्या जेंडर आयडेंटिटी वरून खूप बुली केले होते जेणेकरुन नवीनने एका अयशस्वी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर भारतातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मनात नसतांना कोठारींना एकुलत्या एक मुलाला अमेरिकेला पाठवावे लागले आणि त्याची मानसिक ओढाताण होवू नये म्हणून आईचा आजार ही त्याच्यापासून बरीच वर्षे लपवून ठेवावा लागला. ह्या कारणाने कार्तिक मेहता आणि दिनेश कोठारींचेही आपापसातले संबंध अनेक वर्षे ताणले गेले होते. पण समीर ही मेहतांच्याही हाताबाहेरची केस आहे हे जसे समजत गेले तसे आणि अमेरिकेत जाऊन ऊलट आपल्या मुलाचे सुरळीतच चालू आहे हे ऊमगून कोठारींनी मेहतांशी सबंध सुधारण्यासाठी मागच्या वर्षभरात पुढाकार घेतला होता. पण समीर वर त्यांचा प्रचंड राग होताच.
- शहांची मुलगी मनाली आणि समीर मेहता हायस्कूलमध्ये एकाच वर्गात होते आणि एकमेकांचे चांगले मित्रं होते. शहा आणि मेहता फॅमिली वर्षातून दोनदा विदेशात फॅमिली टूरवर फिरायला जात असंत. पण कॉलेजच्या पहिल्या वर्षात अचानक काहीतरी बिनसलं आणि मेहतांनी समीरला घरी न ठेवता हॉस्टेलवर रहायला पाठवलं, मनालीही त्यावर्षी फार काही कुणाला दिसली नाही.

* काही प्रासंगिक माहिती
- वरच्या नोंदीतले बिल्डिंगमध्ये हजर असलेले (भास्कर अवस्थी, सार्थक जैन, अमित धुप्पर) आणि नसलेले (नवीन कोठारी) सोडून ईतर सर्व पॅराडाईझ बिल्डिंग निवासी लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये बर्‍याच वेळा दिसत आहेत.
- कुठल्याही मजल्यावर एलेवेटरने आल्यास एक फ्लॅट डावीकडे आणि एक ऊजवीकडे आहे आणि एलेवेटर समोरच्या भिंतीवरचा कॅमेरा एलेवेटर मधून बाहेर आलेला माणूस कुठल्या दिशेने गेला हे दाखवतो. त्या कॅमेराला चुकवणे शक्य नाही.
- मात्रं एका मजल्यावरच्या एका फ्लॅट मधून दुसर्‍यामध्ये कॅमेरा लावलेल्या भिंतीला लगटून कॅमेराच्या खालून गेल्यास तो अँगल कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही
- जिन्यांमध्ये लावलेल्या सगळ्या कॅमेरांमध्ये एक अँगल असा आहे ज्याची आधी माहिती असल्यास जिन्यातूनही कॅमेरामध्ये न दिसता एका मजल्यावरून दुसर्‍यावर जाता येते पण त्यासाठी हा अँगल वापणारा माणूस प्रचंड अ‍ॅथलेटिक असायला हवा .
- बिल्डिंगला डाव्या आणि ऊजव्या दोन्ही साईडला जिने असून ते प्रत्येक मजल्यावर प्रत्येक फ्लॅटच्या दरवाजाच्या बरोबर समोर आहेत.
- वरती टेरेसवरच्या स्विमिंग पूल, सनरूम वगैरे फॅसिलिटी आणि खाली दोन मजल्यांचे पार्किंगही ही जिन्याने अ‍ॅक्सेस करता येते.
- पण कोणताही माणूस दोन्ही जिन्यांच्या दोन्ही पार्किंग लेवलवरच्या वा टेरेसच्या दरवाजातून आत वा बाहेर आल्यास तो बाहेर लावलेला कॅमरा चुकवू शकणार नाही.
- थोडक्यात कॅमेरा अ‍ॅंगलची जाण असलेला आणि ऑलरेडी बिल्डिंगमध्ये असलेला अ‍ॅथलेटिक माणूस जिने आणि प्रत्येक मजल्याच्या कॉरिडोअर मधून कॅमेरात न दिसता सहज जा ये करू शकतो पण तो टेरेस वा पार्किंग मध्ये आल्यास कॅमेरामध्ये हमखास कैद होणारंच.
- सहा मे च्या रात्री तिसर्‍या मजल्यावरच्या लिफ्टसमोरच्या कॅमेरामध्ये ११:५६ ते ७:०४ मध्ये कोणीही कॅप्चर झालेले दिसले नाही पण त्याआधी ९:३० ला लिफ्टच्या दरवाज्यावर एक सावली सरकतांना आणि पुन्हा ९:३७ ला तशीच सावली सरकतांना पुसटशी दिसत आहे. हा केवळ कॉरिडोअरच्या खिडकीतून कडाडणार्‍या विजांच्या प्रकाशाचा खेळ आहे की कोणी भिंतीला लगटून कॅमेरा खालून सरकत गेले हे सांगणे अवघड आहे.
- बिल्डिंग कंपाऊंडची भिंत ओलांडून वा गार्ड्सना चुकवून येणे सेन्सर्स मुळे केवळ अशक्य आहे.
- प्रत्येक फ्लॅटला ऑटोमेटेड लॉक्स आहेत जे चावीने वा वन टाईम नंबर कीपॅड वर टाकून वापरता येतात. चावी नसल्यास घराचे ऑथोराईझ्ड मालक वा कुटुंबीय त्यांच्या फोनमधले सॉफ्टवेअर वापरून हा वन टाईम नंबर जनरेट करू शकतात. एका फ्लॅटच्या मालकाने त्याच्या फोनवरून जनरेट केलेला वन टाईम नंबर फक्तं आणि फक्तं त्याच्या घराच्या लॉकवर चालतो.
- चुकीची चावी वापरल्यास वा दोनदा चुकीचा नंबर की-ईन केल्यास त्या फ्लोअरवरचा अलार्म वाजू लागतो आणि खाली सिक्युरिटी गार्डसनाही अ‍ॅलर्ट जातो.

* समीरशी निगडीत काही बाबी
- समीरच्या फोनमध्ये काही वाह्यात फोटोज, विडिओज आणि त्याच्या केशव व त्याच्यासारख्याच ईतर मित्रांच्या आणि एस्कॉर्ट कंपन्यांच्या कॉंटॅक्ट्स शिवाय फार काही मिळाले नाही.
- एमराल्ड पॅराडाईज मधल्या देवेन शहा आणि सार्थक जैन शिवाय ईतर कुणाचे काँटॅक्ट डीटेल्स त्याच्या फोन मध्ये मिळाले नाहीत.
- तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या एका दुर्गम खेड्यातून समीरच्या नावाने आलेले एक पाकीट तेवढे घरात 'आक्षेपार्ह' वाटेल असे मिळाले ज्यात एक 'अंगारा/ऊदी' सदृष्य राखेसारखा पदार्थ मिळाला. गुजरातला त्या खेड्यात गेलेल्या टीमने तो अंगारा समीरच्या आईने त्याच्या वागण्यात सुधार व्हावा ह्या मायेच्या आणि धार्मिक हेतूने पाठवल्याचे मान्य केले आहे आणि त्या धार्मिक स्थळावर तो अंगारा मुबलक प्रमाणात ऊपलब्धं आहे.
- ६ मे रात्री ९:०२ वाजता समीर मेहताच्या फोनवरून देवेन शहांच्या फोन वर एक कॉल झाला जो २ मिनिटे सदतीस सेकंद चालला.
शहांना ह्या बद्दल विचारले असता त्यांनी समीर ने लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि ऊपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्तं करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले.
- गणेश शिंदेने सकाळी जमा केलेला कचरा लगोलग गारबेज श्यूट मधून टाकून दिल्याने ग्राऊंड फ्लोअरवरच्या मोठ्या गारबेज कलेक्टर मध्ये जिथे बिल्डिंगचा आठवड्याभराचा कचरा जमा झाला होता त्या कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याचे अ‍ॅनालिसिस करतांना फार कष्टं पडले. समीर मेहताच्या घरातला नेमका कचरा वेगळा काढता न आल्याने ह्या अ‍ॅनालिसिस मधून फार काही महत्वाचे हाती लागले नाही.

* पोस्टमॉर्टेम/ मेडिकल रिपोर्ट
मृत्यूचे कारण - शरीरातील वायटल सिस्टिम्स आणि ऑर्गन्स एका मागोमाग एक बंद पडत गेले. जणू मेंदूतूनच असे करण्यास आज्ञावली दिली गेली होती.
- विष वा तत्सम प्रकाराचा कुठलाही ट्रेस सापडला नाही. बॉडीवर कुठलेही बाहेरून केले गेलेले वार वा टोचण नाही.
- सबजेक्ट काही काळ कोमात गेला असल्याने मृत्यूची पिन पॉईंट वेळ सांगणे कठीण पण साधारणत: रात्री २ ते सकाळी ६ दरम्यान हे झाले असावे.
- पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत पण त्यातले काहीही लीथल नव्हते. - एखादी अन आयडेंटीफाईड मेडिकल कंडिशन ट्रिगर झाली असण्याचा संबंध असू शकतो.
- नैसर्गिक मरण की आत्महत्या किंवा खून काहीही खात्रीलायक रित्या सांगता येणे अवघड आहे पण हा अगदी दुर्मिळाती दुर्मिळ प्रकारचा नैसर्गिक मृत्यू असावा असे सगळे केस फॅक्टस तपासल्या नंतर हा क्षेत्रातल्या सगळ्या तज्ञांचा होरा आहे.
- अंगारा/ऊदी सदृष्य पदार्थामध्ये काही भयानक विषारी केमिकल्स मिळाले आहेत पण सबजेक्टने ते घेतले असावेत असे वाटत नाही कारण त्या केमिकल्सचे परिणाम जीवघेणे पण मेडिकल जगतांस माहित असलेले आहेत. ह्या अंगार्‍याचा सो-कॉल्ड 'धार्मिक' सोर्स ताबडतोब बंद करावा.

कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे पण नक्की काहीच प्रुव करता येत नाहीये हे कळून ठाकुर, वर्तक आणि मलिक ह्यांच्या टीमने एकही संशयित ठोस पुराव्या अभावी ताब्यात न घेता 'मेडिकल कंडिशन' म्हणत 'समीर मेहता' केसचा अहवाल वरती पाठवला आणि कमिशनर साहेबही मंत्री साहेबांना 'एवढा आकांड तांडव करायची गरज नव्हती' म्हणत ऊत्तर देवून मोकळे झाले.

केवळ आठच महिन्यानंतर म्हणजे १३ जानेवारी २०१७ च्या सकाळी समीर मेहता ज्या बेडरूममध्ये भूत बघितल्यासारखा चेहरा करून मरून पडला होता त्याच बेडरूममध्ये असीम पारकरचे निष्प्राण शरीर भूत बघितल्यासारखे पडलेले शहा फॅमिलीची हाऊसमेड अलका प्रसाद ने सकाळी सात वाजता पाहिले . शहा फॅमिली एक आठवड्यापूर्वीच यु एस मध्ये कॅलिफोर्नियातल्या मनालीच्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेली होती आणि ठाकुर, वर्तक आणि मलिक पुन्हा त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मजल्यावरच्या त्याच रूममध्ये तश्याच एका वादळी रात्रीनंतर एखादा भयानक नॉस्टेल्जिआचा अ‍ॅटॅक आल्यासारखे ऊभे होते.

******************************************************************************************

समीर मेहताच्या केसमध्ये नक्की काय झाले असावे आणि ठाकुर, वर्तक व मलिक ह्यांच्या टीमने असीम पारकरची केस कशी बघावी आणि त्यांना काय मिळू शकते ह्याची ऊत्तरं हवी आहेत.
तुमच्या मते दोन्ही केस एकंच आहेत की वेगळ्या तेही सांगा. दिलेले केस फॅक्ट्स वापरून आपापली थिअरी मांडा, प्रश्नोत्तरांची गरज नाही.
थोडक्यात समीर मेहताचा खून झाला असे वाटत असल्यास तो कोणी कसा व का केला त्याचे एक प्लॉजिबल एक्स्प्लनेशन हवे आहे आणि त्यावरून असीम पारकरच्या केस कडे बघण्याची दृष्टी सुद्धा.
एखादी थिअरी पटल्यास त्याला प्लस एक (+१) नक्की करा, आपल्या थिअरी पेक्षा दुसर्‍याची चांगली वाटल्यास मोठ्या मनाने त्याला प्लस वन द्याल अशी अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा आणि चीकूने आधी ओळखले तसे समीरचा देवेन शहांना ९:०२ ला झालेला अडीच पेक्षा जास्तं मिनिटांचा कॉल सस्पिशियस होता कारण जवळीक नसतांना, शहांनी त्याच्या सारख्या माणसाला लग्नाला बोलावण्याची शक्यता फारंच धुसर असतांना आणि लग्नाची एवढी गडबड असतांना शहा समीरशी एवढ्या वेळ बोलले म्हणजे काहीतरी प्रेसिंग मॅटर असले पाहिजे. समीरचे एकंदर कॅरॅक्टर बघता त्याने पैशांचीच डिमांड केली असणार अन्यथा मनाली संबंधित काही भांडाफोड वगैरे अशी धमकी दिल्याची शक्यता असावी. पुन्हा समीरची बिल्डिंग मधल्या सगळ्यांशी भांडणे झाली असतांना त्याचे आणि शहांचे कधी भांडण झाल्याचे ऐकिवात नाही ह्याचा अर्थ काही कारणाने समीरशी ऊघड ऊघड भांडण करण्याच्या स्थितीमध्ये ते नाहीत. खबरींंकडून मनाली आणि समीरचा समजलेला भूतकाळ बघता शहांचा हात नक्कीच दगडाखाली अडकलेला होता.
तर समीरने ऐन लग्नाच्या वेळी पैशांची केलेली डिमांड आणि त्यांची स्वतःची लग्नातली ऊपस्थिती बघता शहांनी त्या फोनवरच त्याला घराचा वन-टाईम-पासवर्ड दिल्याची आणि सेफ्टी वॉल्टचेही डिटेल्स सांगून त्यात जे काही आहे ते घेण्याची परवानगी दिली. एका मुलीच्या बापाला पुरेपुर खिंडित पकडल्यावर ईतक्या लगेच थेट त्यांच्या घरातला 'सेफ्टी वॉल्ट' ऊघडून जे काही त्यात आहे ते घेण्याची परवानगी मिळाली हे ऐकून समीर नक्कीच एक्साईट झाला असणार. त्याने कॉरिडोरमधल्या कॅमेराचा मुद्दा ऊपस्थित केला असेल तेव्हा शहांनी त्याची ही अ‍ॅक्शन कॅमेरामध्ये कैद होवू नये म्हणून त्याला कॅमेरा लावलेल्या भिंतीखालून सरकत जाण्याचाही सल्ला दिला असेल किंवा समीरने ती ऐनवेळी लढवलेली युक्तीही असू शकेल. तर ती सावली खुद्द समीरचीच होती. आता त्या वॉल्टमध्ये होते काय तर कदाचित चार करोड रुपये वा तेवढ्या किंमतीचे हिरे वगैरे आणि शहा सारख्या धनाढ्य माणसाकडे असू शकतील अश्या काही किंमती गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचे 'मर्डर वेपन' ज्याच्या भरवशावरच शहांनी सहजासहजी समीरला दरवाजा ऊघडून वॉल्ट अ‍ॅक्सेस करण्याची परमिशन पटकन दिली. मर्डर वेपन जे खरंतर समीरसाठी नव्हे तर असीम साठी बनवलं गेलं होतं पण भयंकर हुषार आणि विचारी शहांनी ऐनवेळी समोरूनच चालत आलेल्या संधीचा 'समीरच्या डेस्परेशनचा' फायदा घ्यायचे ठरवले. हे मर्डर वेपन समीर स्वतः आपल्या घरात घेवून आला आणि त्याने नकळत स्वतःच्या हातांनीच स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला.

समीरच्या दृष्टीने जगातली सर्वोच्य मजा होती स्त्रीसुख जे त्याच्या मनाली बरोबरच्या टीनएज वयापासून ते अजूनही कायम येणार्‍या एस्कॉर्टस वरून दिसतंच होते. त्याबाबतीत तो फारंच कंपल्सिव असावा हेही शहांच्या ध्यानात आले असेल. जसे कुठलेही विष माणसाच्या बॉडी फ्लुईड (ऊदा. रक्तं, घाम) किंवा अन्नातून वा फुफुसातून पास झाल्याशिवाय असर करत नाही तसेच शहांच्या सेफ्टी वॉल्ट मध्ये असलेले 'स्पेशल ल्युब्रिकंट वापरून बनवलेले काँडोमचे पाकिट' ज्यातले स्पेशल ल्युब्रिकेशन पुरूषाच्या 'स्पेसिफिक बॉडी फ्लुईड' च्या संपर्कात येताच एक डेडली चेन रिअ‍ॅक्शन घडवून आणते. काही तासांत हृदयाचे ठोके हळूहळू स्लो होत जाऊन सगळ्या वायटल ऑर्गन्स ना ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय मंदावत जातो व ते हळूहळू निकामी होत राहतात, जसे साधारण बर्‍याच विषप्रयोगानंतर होते. अशी कंडिशन फाईट करण्यासाठी माणसाचे जागे रहाणेही तेवढेच महत्वाचे असते. नॉन वायटल ऑर्गन्स निकामी होतांनाची वेदना विक्टिमच्या चेहर्‍यावर राहते आणि तो हळूहळू कोमात सरकून शेवटी प्राण सोडतो. 'सुपर अ‍ॅक्सलरेटेड नॅचरल डेथ प्रोसेस'. डायरेक्ट बॉडीमध्ये ईंजेक्ट होत नसल्याने त्याचा मागे काही ट्रेसही रहात नाही. ह्युमन रिप्रॉडक्शन सिस्टिम संबंधित अनेक दशके काम करणारे तीन तज्ञ घरात असतांना असे वेपन डिवाईज करणे शहा आणि अय्यर फॅमिलीसाठी आवाक्यातले काम होते. पण समीर आजिबात काहीही विचार न करता एमराल्ड पॅराडाईझमध्येच असतांना एवढ्या तडका फडकी ती वस्तू वापरेल ह्याचा अंदाज शहांना सुद्धा नसेल. तो लग्नाच्या दिवशी एमराल्ड पॅराडाईझमधेच मेल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आणि ह्यात पोलिस मनालीचा पास्ट तिला खोदून खोदून विचारू नये आणि त्यांच्या हाताला आपल्याकडे काही मोटिव होते हे लागू नये म्हणून त्यांनी तिला हनिमून ला पाठवण्याची परवानगी मिळ्वली. गणेश शिंदे ने नकळत घरातला कचरा लगोलग फेकून दिल्याने 'क्राईम सीन' जसा असायला हवा होता तसा राहिलाच नाही. समीरनेही झोपण्यापूर्वी आंघोळ केली असण्याची शक्यता होती.

संपत्तीच्या लालसेने असीम घर जावयासारखा समोरच रहायला आला पण आपण असतांना असीम ला बाहेरख्याली पणा करता येणार नाही हे शहांना माहित होते आणि आपण सगळे नसतांना तो डेस्परेशनम्ध्ये काय करणार ह्याचाही त्यांना अंदाज होताच. मुलीच्या घरात शहा दांपत्याला मुक्तं संचार असल्याने 'वेपन' प्लांट करणे आजिबातंच अवघड नव्हते.
प्रथमदर्शनी समीरला मारण्याची मोठी किंमत शहांना मोजावी लागली असे दिसते पण ज्या अर्थी समीर बिल्डिंग बाहेर गेला नाही त्या अर्थी तो ऐवज सीक्रेट वॉल्ट मध्येच आहे आणि ते घर ही शहांच्या मालकीचे असल्याने आज ना ऊद्या तो त्यांना कदाचित मिळेलही.

अमित धुप्पर त्याची औषधे विकण्यासाठीच समीरच्या सवयींची चौकशी करत असेल असे गृहीत धरू शकतो, कारण तशी पाकिटे बघितल्याचे गणेश ने सांगितले असेल आणि समीरच्या पोटात तसे ट्रेसेसही मिळालेही. कोणीही काहीही दिलेले ट्राय करणारा समीर शहांकडून असा दगाफटका होईल एवढा विचार करणार्‍यातला वाटला नाही.

आता ठाकुर, मलिक आणि वर्तक असीमच्या मृत्यू आधीच्या अ‍ॅक्टिविटिज किती ट्रेस करू शकतील ह्यावर त्यांच्या शोधकार्याचे फलित अवलंबून असेल. सासर्‍याला आणि बायकोला चांगले ओळ्खणारे सिक्युरिटी गार्ड , कॅमेरा वगैरे असतांना असीम कुणाला एमराल्ड पॅराडाईझ मध्ये आणण्याची हिंमत करणार नाही आणि समजा दोन्ही केस मधल्या सिमिलॅरिटी वर्क आऊट केल्यानंतर 'मर्डर वेपन' काय असेल ह्याचा अंदाज आला तरी असीमने बाहेर कुठेतरी वापरलेली ती वस्तू ठाकुर आणि टीम एविडंस म्हणून कसा ट्रेस करेल हे ही बरेच अवघड असेल.

व्योमकेश बक्षी मधली ती माचिस बॉक्स ची स्टोरी किंवा डेविल्स फुट थोडेफार इन्स्पिरेशन होते.

मी पहिला पहिला (उत्तर वाचणारा) Lol

मजा आली बे. फक्त "ज्यातले स्पेशल ल्युब्रिकेशन पुरूषाच्या 'स्पेसिफिक बॉडी फ्लुईड' च्या संपर्कात येताच एक डेडली चेन रिअ‍ॅक्शन घडवून आणते." ह्यातले विष किंवा त्याचा effect पोस्ट मार्टेम मधे सापडणार नाही हि लिबर्टि अपेक्षीत नव्हती.

बर्‍याच लोकांचा खूप्प्प्प्प टाईम वेस्ट केला ह्याची कल्पना आली.
अपेक्षा आहे की तो अगदीच 'वेस्ट' गेला नसावा आणि थोडीफार मजा आली असावी. Wink

लॉजिकमध्ये काही तॄटी राहून गेल्या असल्यास नक्की सांगा.

ज्यातले स्पेशल ल्युब्रिकेशन पुरूषाच्या 'स्पेसिफिक बॉडी फ्लुईड' च्या संपर्कात येताच एक डेडली चेन रिअ‍ॅक्शन घडवून आणते." >> हे actually सुचलं होतं पण कुठल्याच रिअ‍ॅक्शन/केमिकलचा ट्रेस मिळाला नाही असं म्हटलं होतं त्यामुळे ती शक्यता गृहीत धरली नाही.

अरेरे चीकू Sad शक्यता तरी मांडायची होती फारफार तर नाही म्हणालो असतो.
श्रद्धाने मोटिव आणि तुम्ही प्रासंगिक घट्नाक्रम सही वर्क आऊट केला मलाही सॉलिड मज्जा आली ते सावली, सेफ्टी वॉल्ट, डोर लॉक वगै ओळ्खल्यावर.
अमित, मैत्रेयी आणि मेधानेही महत्वाच्या गोष्टी बरोबर पकडल्या होत्या.

हो असामी बरोबर आहे >> कुठे तरी बॉडी कशाला तरी एक्सपोज झाली पण काहीच ईंड्यूस न झाल्याने ट्रेस राहिला नाही.

डायरेक्ट बॉडीमध्ये ईंजेक्ट होत नसल्याने त्याचा मागे काही ट्रेसही रहात नाही>>>
body organs मग बंद कसे पडतात जर ते केमिकल किंवा त्या रिअ‍ॅक्शन चे components जर शरीरातच शिरत नसतील तर?

body organs मग बंद कसे पडतात जर ते केमिकल किंवा त्या रिअ‍ॅक्शन चे components जर शरीरातच शिरत नसतील तर? >>> जसे आपण कुठलाही डिसिज काँट्रॅक्ट करतो तसेच.

श्रद्धा तू अमेरिका वा युरप सोडून दुसरीकडे कुठे असशील तर तुला 'हॅट्स ऑफ' एवड्या रात्री एवढा प्रचंड वेळ असल्या टाईमपास गोष्टीसाठी जागं राहिल्याबद्दल.

भारत. Happy

कोडी (क्लूलेस वगैरे) सोडवताना जागणे माझ्यासाठी नॉर्मल आहे. Proud

ह्यातले विष किंवा त्याचा effect पोस्ट मार्टेम मधे सापडणार नाही हि लिबर्टि अपेक्षीत नव्हती. >> +१

बाकी पूर्ण कल्पना भारी होती.

body organs मग बंद कसे पडतात जर ते केमिकल किंवा त्या रिअ‍ॅक्शन चे components जर शरीरातच शिरत नसतील तर? >>> जसे आपण कुठलाही डिसिज काँट्रॅक्ट करतो तसेच.>>>>>>>
पण त्या disease चे bacteria/viruses जे कोणी असतील ते शरीरात सापडतात, रोगाचे निदान होऊ शकते.
हे थोडे farfetched वाटते आहे.

बाकी कोडं मस्त होतं. भरपूर red herrings होते Happy

हाब. भारी.
आज सकाळी फार वेळ देता आला नाही याचं वाईट वाटतय. पण भन्नाट मजा आली.
बायदवे, ते मेडिकेशन फक्त मेल ऑर्गनलाच टच होतं ट्रेसेसही फीमेल ऑर्गनला टच होत नाहीत हे थोडं लिबर्टी आहे ना?
आणि असीमची केस पुढ्चं पझल का?

हो अमित थोडीफार लिबर्टी होती हे सपशेल मान्य!
फक्तं मेल सिस्टिम मधल्या वाय क्रोमोजोम आणि मेल फ्लुईडच्या स्पेसिफिक कंपोझिशनशी अतिशय बेसिक लेवलवर रिअ‍ॅक्ट होवून नॅचरलीच रॅपिडली म्युटेट होणारे काही तरी असे अपेक्षित होते. मेडिकल करेक्टनेसचा फार बाऊ केला नाही फक्तं 'ईंनजेक्ट वा ईनहेल न झाल्याने अनट्रेसेबल' असे दाखवायचे होते.
समीरची केस सोडवली की असीमची केस काय आहे ते कळेल आणि ही काही तरी रिपिटेटिव प्लान्ड अ‍ॅक्ट आहे एवढेच दाखवायचे होते.

बरोबर आहे चीकु थोडा अजून विचार करायला हवा होता... बर्‍याच दिवसांपासून डोक्यात घोळत होती काल एकदम अर्ध्या तासात लिहूनच टाकली.

थोडा अजून विचार करायला हवा होता >> श्रद्धेने असा बदल केला असता 'समीर सेफ उघडतो त्यात बंगाली बाबाने शाहला दिलेली अंगठी असते. लकाकणारी अंगठी बघून समीर खूश होतो नि बोटात घालतो. त्या अंगठीमधे जादू ई शक्ती असते कि स्त्री च्या संपर्कात आल्यावर तिची शक्ती activate होउ लागते नि सुमारे दोनेक तासांनी (म्हणजे समीर सोयीस्कर रित्या एकटा असताना) अंगठीमधून एक हडळ्/प्रेतात्मा/जखीण (आपापल्या आवडीनुसार घालून घ्या) बाहेर येते. तिला बघून समीर गचकतो. मग तो आत्मा अंगठी काढून घेऊन परत शाहच्या तिजोरीत आपल्या मालकाकडे नेउन ठेवतो नि गायब होतो. कसला च ट्रेस राहिला नाही बघा.' Happy बर्ग बडवणार मला आता नक्की.

असामी कधीपासून भुतांच्या मानगुटीवर बसला आहे आणि आजिबात सोडायचे नाव घेत नाहीये एवढाच ट्रेस मला लागला Wink

त्या असीमच्या जागी मी किती वेळा असामी लिहून खोडले असेल Wink

हाइंड साईट मध्ये, पोलिसांनी होम अ‍ॅक्सेस लॉग (विथ की ऑर ओटीपी) घेतले नाही ही एक घोडचूक केल्येय.

बायदवे, कॅमेराच्या खालुन व्यक्ती पास होते आणि ते रेंज मध्ये नाही हे समजू श़कतो, पण समीर ओटीपीने घरात शिरलाय. सो राजरोस मेन डोरवर त्याने पिन टाईप केला आहे. मेन डोरवर कॅमेराचा अ‍ॅन्गल नाही हे केवळ अशक्यच. सो शहांनी त्या टेकनो पोराची साथ घेऊन कॅमेरे हॅक करणे आवश्यक ठरते.

जबरंदुस कोडे... माज्या बुद्दीला झेपलेच नाही...
अभिनंदन श्रद्दा आणि हिझेंनबेर्ग...

वा मस्त कोडे होते. मजा आली वाचायला.

मैत्रेयीची शंका मलाही आलेली. ट्रायल म्हणून खूनाची रिस्क घेणे. पण ते तसे नसून अनप्लानड होते म्हणा किंवा दोघेही खुन्याच्या लिस्टवर होते हे नंतर समजले.

कथेतून सामाजिक संदेशही गेला. असंगाशी संग प्राणाशी गाठ. वाईट ईतकेच की ज्याला लोकं सुरक्षाकवच म्हणून वापरतात त्यानेच बळी घेतला.

बाकी अश्याप्रकारे अनट्रेसेबल मृत्यु सद्यस्थितीला शक्य आहे की याकडे कल्पना म्हणून बघायचे. प्लीज हे क्लीअर करा. लोकं घाबरली तर निरोध वापरायचे बंद करतील. किंवा त्यावरचे ल्युब्रिकंट धुवून त्याला घरचे तेलतूप लावायला सुरुवात करतील Happy

बाकी शेरलॉक होम्स वगैरे कधी वाचलेच नसल्याने हे टोटली नवे होते त्यामुळे जास्त मजा आली. अशी कथाकोडी तुम्हाला आणखी बनवायला जमत असतील तर येऊ द्या..

<<<बायदवे, ते मेडिकेशन फक्त मेल ऑर्गनलाच टच होतं ट्रेसेसही फीमेल ऑर्गनला टच होत नाहीत हे थोडं लिबर्टी आहे ना?>>>

ह्यामधे स्पेशल केमिकल काँडोमच्या फक्त आतील बाजूला लावले असल्यास जोडीदाराला त्याचा संपर्क होण्याची शक्यता पूर्णपणे/बर्‍याच अंशी एलिमिनेट होईल..

कोड्याइतकीच सर्व चर्चा थरारक.
श्रद्धा, चिकू __/\__
मजा आली.
काल कोडं वाचल्यावर सर्व डिटेल्सचा माझ्या डोक्यात जाम गडबडगुंता झाला. त्यामुळे मर्डर मिस्टरीजची फॅन असूनही विचार आणि तर्क थोड्यावेळाने सोडून दिले होते.

ज ह ब ह री ही होतं हे...

थोडं उशिरा पाहिलं, तो पर्यंत संपलं होतं कोडं... नेक्स्ट टाईम...

बादवे,
स्पेशल केमिकल काँडोमच्या फक्त आतील बाजूला लावले असल्यास जोडीदाराला त्याचा संपर्क होण्याची शक्यता पूर्णपणे/बर्‍याच अंशी एलिमिनेट होईल..>>>
काँडोम्स पॅक्ड असताना रोल्ड स्टेट मधे असतात हे लक्षात घेता आतल्या बाजूला लावलेलं केमिकल हे बाहेरच्या बाजूलाही लागणारच.
त्यामुळे ते फीमेल ऑर्गनच्याही संपर्कात येणारच.

रच्याकने Lol समीर आणि असीम कंडोम नक्कीच वापरतात हा सुद्धा लेखकाने स्वत:पुरता राखीव ठेवलेली लिबर्टी वाटते Wink

हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूट्स मोस्टली सेफ असतात म्हणून कोणी त्या वस्तुचा वापर करेल असे खात्रीशिर नाही Proud आणि नियमन करण्यास गोळ्या आहेतच त्यामुळे सुद्धा कंडोम लॉजिक पटले नाही.

त्याऐवजी काही नॅनोसर्जरी सारखे काही माइक्रो रोबोटिक एलेमेन्ट जे बॉडी मध्ये शिरुन ऑर्गन डैमेज / ब्रेन हैमरेज करून पुनः बाहेर पडेल अशी हाय प्रोफाइल केस बनू शकली असती

थोडा अजून विचार केल्यावर जाणवलं की सेफ्टी व्हॉल्टमध्ये काँडोम्स असणे हे समीरला वेगळे वाटणार नाही का? इतकी कॉमन गोष्ट एवढ्या बंदोबस्तात ठेवली आहे म्हटल्यावर त्याला काहीच संशय येणार नाही? शिवाय अशी अजब गोष्ट तो केशवला अजिबातच सांगत नाही, हे पण जरा अशक्य वाटतं.

<त्याऐवजी काही नॅनोसर्जरी सारखे काही माइक्रो रोबोटिक एलेमेन्ट जे बॉडी मध्ये शिरुन ऑर्गन डैमेज / ब्रेन हैमरेज करून पुनः बाहेर पडेल अशी हाय प्रोफाइल केस बनू शकली असती>

नॅनो आणि मायक्रो वेगवेगळे आहेत. शिवाय हे साध्य करणं मुंबईतल्या त्या फ्लॅटमध्ये अशक्य आहे. अशी काही शक्यता कथेत आणायची असेल, तर ती 'अवैज्ञानिक' विज्ञानकथा वगैरे होईल.

बर्र .......डॉ साहेब
नॅनो सर्जरी मुंबई सारख्या शहरात अशक्य आहे असे आपले म्हणणे ग्राह्य मानु आणि कंडोम थिअरी योग्य ठरवू

कथा मांडणी आणि संकल्पना खुप छान Happy ह्यासाठी बर्ग ह्यांचे अभिनंदन !
आणि सर्वांचे तर्क आणि प्रतिसाद ह्यामुळे अधिक मज्जा आली वाचायला

New Doc 2017-06-07.jpg

बायदवे, कॅमेराच्या खालुन व्यक्ती पास होते आणि ते रेंज मध्ये नाही हे समजू श़कतो, पण समीर ओटीपीने घरात शिरलाय. सो राजरोस मेन डोरवर त्याने पिन टाईप केला आहे. मेन डोरवर कॅमेराचा अ‍ॅन्गल नाही हे केवळ अशक्यच. >>> अमित हा असा फ्लोरप्लान डोक्यात होता माझ्या. २०२ आणि २०१ कडे जाणारे जिने टेरेसकडे ही जातील.

एवढ्या सुविधा असताना फ्लॅट्समधे आत काहीही सेक्युरिटी मॉनिटरिंग नसणार, पोलिसांनी सर्व घरांचे एंट्री / एक्जिट लॉग्स तपास्ले नसणार हे थोडे खटकले. कोठारी आजोबा घराच्या बाहेर पडले की नाही हे तरी नक्कीच शोधायला हवं होतं पोलिसांनी .
वरच्या प्लॅन मधे फ्लॅटचा एंंट्रंस कुठे आहे ? कॅमेराच्या अँगलच्या बाहेर असेल तर तो मोठाच डिझाइन फ्लॉ म्हणायला हवा.

थोडा अजून विचार केल्यावर जाणवलं की सेफ्टी व्हॉल्टमध्ये काँडोम्स असणे हे समीरला वेगळे वाटणार नाही का? इतकी कॉमन गोष्ट एवढ्या बंदोबस्तात ठेवली आहे म्हटल्यावर त्याला काहीच संशय येणार नाही? शिवाय अशी अजब गोष्ट तो केशवला अजिबातच सांगत नाही, हे पण जरा अशक्य वाटतं.>>>> + १
Unless शहांनीच त्याला सांगितलं असेल आणि फक्त त्याच्यासाठी पुरवून वापरायला सांगितलं असेल, अजून कोणाला सांगू नकोस असंही सांगितलं असेल Happy

एक शंका हाबर्ग. कंडोमच्या लुब्रीकंटमध्ये जर विष मिसळले तर त्याचे पाकीट फोडावे लागेल ना? दारू नशेच्या धुंदीतही इस्कॉर्ट सोबत माजा करताना कंडोम वापरणारा माणूस फाटक्या पाकिटातील कंडोम का वापरेल? एकवेळ समीर गंडेल आसीमचे काय??

मेधा जिथे फ्लॅट्सचे नंबर लिहिले आहेत तोच फ्लॅटचा एंट्रन्स आहे. (माझे ड्रॉईंग स्कील यथातथाच आहे Wink ) हे एंट्रन्स कॅमेरा अँगल च्या बाहेर होते आणि हा डिझाईन फ्लॉ आहे हे ईनवेस्टिगेटिंग टीम ने आधीच ओळखले होते.
चावी वापरून कोणी आत गेल्यास किंवा आतून दरवाजा ऊघडून बाहेर आल्यास त्याचा लॉग कसा बनणार?. आणि ईलेक्र्टॉनिक लॉकिंग सिस्टिम चे लॉग चेक करायला हवे होते ही ईनवेस्टिगेटिंग टीमची चूक होतीच म्हणून मी आधीच 'ईनवेस्टिगेटिंग टीम' ने काय चुका केल्या किंवा कुठे बघायला हवे होते ह्या अँगलने ही विचार करा अशी हिंट दिली होती.
बाहेर एवढी सिक्युरिटी असतांना घराच्या आतमध्ये, प्रायवेट स्पेस मध्ये मॉनिटरिंग सिस्टिम कोण ठेवेल आणि ती तशी असती तर मग समीर कसा मेला हेच कॅप्चर झाले असते.

श्र्द्धा,
अतिशय मौल्यवान वस्तुंबरोबर एखादी साधी वस्तू सापडली तरी 'हे काही तरी मुल्यवानच असले पाहिजे त्याशिवाय का कोणी असे सेफ्टी वॉल्टमध्ये सांभाळून ठेवेल' असा विचार करणार नाही का कोणीही अ‍ॅवरेज माणूस? आणि शेवटी स्ट्राँग डीझायर टू यूज सारासार विवेक बुद्धीला डॉमिनेट करतेच करते. अन्यथा लिटिल हँगलटन मध्ये गॉण्टच्या हिडन शॅक मध्ये सापडलेल्या रिसरक्शन स्टोनची अंगठी डंबलडोर सारख्या प्रचंड हुशार माणसाने का घातली असती? Happy

चीकू
ऊलट शहांनी कारण नसतांना 'ते पण जरूर घे हो आणि पुरवून पुरवून वापर' असे भोचक पणाने सुचवले असते तर समीर चा संशय बळावला नसता का? काँडोम बघितल्यावर त्याने 'शहा ही अजून अ‍ॅक्टिव आहे वाटते' असाच आणि एवढाच विचार केला असेल.

केपी.. एवढे डेडली ल्युब्रिकंट डीवाईज करू शकणार्‍या ब्रेन्सना एक साधे विश्वसनीय वाटेल असे रॅपर का बनवता येणार नाही? रॅपर फाटके नव्हते.

रच्याकने Lol समीर आणि असीम कंडोम नक्कीच वापरतात हा सुद्धा लेखकाने स्वत:पुरता राखीव ठेवलेली लिबर्टी वाटते Wink >> अंबज्ञ , लिबर्टी नाही वरती स्प्ष्टं ऊल्लेख केलेला आहे. हाऊसक्लीनरने काय गोष्टी कचरा म्हणून फेकून दिल्या त्या पॅराग्राफ मध्ये ऊल्लेख आहे.

हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूट्स मोस्टली सेफ असतात म्हणून कोणी त्या वस्तुचा वापर करेल असे खात्रीशिर नाही Proud आणि नियमन करण्यास गोळ्या आहेतच त्यामुळे सुद्धा कंडोम लॉजिक पटले नाही. >> सेफ असतात? हे कसे सांगणार? थोडाफार शिकलेला आणि आयुष्य जगण्याची ईच्छा असलेला कोणीही अ‍ॅवरेज माणूस तुम्ही म्हणता तशी रिस्क घेणार नाही. आणि गोळ्यांचा समीर सारख्यांना काय ऊपयोग?

त्याऐवजी काही नॅनोसर्जरी सारखे काही माइक्रो रोबोटिक एलेमेन्ट जे बॉडी मध्ये शिरुन ऑर्गन डैमेज / ब्रेन हैमरेज करून पुनः बाहेर पडेल अशी हाय प्रोफाइल केस बनू शकली असती >> Lol मला ह्याबाबतीत काहीच ज्ञान नाही हो.

शिवाय अशी अजब गोष्ट तो केशवला अजिबातच सांगत नाही, हे पण जरा अशक्य वाटतं. >> समीर आणि केशव मध्ये सगळे आलबेल नव्हते हे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून दिसते, पण ते एकमेकांच्या जीवावर ऊठले होते हा अंदाज काढणे स्ट्रेच ठरेल असे मला वाटते. सार्थक जैनला ऊधार पैशांवरून मारहाण आणि १५ कोटी खात्यात असूनही पैसे देण्यावरून भांडण ह्यावरून दिसते की समीर नुकत्याच हातात आलेल्या खजान्याबद्दल केशवला का सांगेल? आणि जर त्याला ते काँडोम ही काही तरी मौल्यवान गोष्टं वाटत असेल तर तीही तो केशव बरोअबर शेअर करणार नाही. युटिलिटी मॅक्झिमायझिंग जनरल ह्युमन टेंडन्सी !!!!

भारी कथा हायझेनबर्ग.
मी कोडं सोडवायचं म्हणून अजिबात वाचलं नाही. पण डोक्यत पहिल्यांदा बॅसिलिस्कच आला.

मी सगळं बारकाईनी, मागचे पुढचे संदर्भ लावत, वाचलेलं नाहीए, त्यामुळे हा प्रश्न रिपीट झालेला असेल तर माफ करा.

समीर, शहांच्या व्हॉल्टमधून ती जी काही मौल्यवान वस्तू किंवा पैसे काढून आणतो, ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात सापडत नाही का? तपासात त्या वस्तू/पैशांचा माग काढायची गरज पडत नाही का?

तपास करण्यासाठी मुळात त्याच्याकडे ती आहे हेच शहा सोडून कुणाला माहीत नाही. आणि नंतर अर्थातच ते पैसे वगैरे त्याने स्वतःच्या फ्लॅटच्या सेफ्टी व्हॉल्टमध्ये ठेवले असणार जे नंतर शहांना आपसूक परत मिळाले.

समीर, शहांच्या व्हॉल्टमधून ती जी काही मौल्यवान वस्तू किंवा पैसे काढून आणतो, ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात सापडत नाही का? >>> चांगला प्रश्नं भरत.
सीक्रेट सेफ्टी वॉल्ट हे पॅराडाईझ वासीयांचं पर्सनल सीक्रेट (द्विरुक्ती) आहे त्यामुळे पोलिसांना अशी काही गोष्टं अस्तित्वात आहे ह्याचा पत्ता लागणे कठीण. कोणी पॅराडाईझ वासी स्वतःहून पोलिसांना ही माहिती सांगणार नाही. पुन्हा ह्या वॉल्टची जागा फ्लॅट आणि फ्लॅट मालकाबरहुकूम वेगवेगळी आहे. समीरने शहांच्या घरातून आणलेल्या वस्तू त्याच्या स्वतःच्या सेफ्टी वॉल्ट मध्ये ठेवलेल्या असतील.

तपासात त्या वस्तू/पैशांचा माग काढायची गरज पडत नाही का? >> समीर ने शहांच्या घरात जाऊन काही आणले होते हेच मुळात ठाकुरांची ईनवेस्टिगेटींग टीम अजून डीड्यूस करू शकलेली नाहीये.

ओके. म्हणजे समीरने घर विकतानाच सीक्रेट व्हॉल्टची जागा आणि कोडही शहांना सांगितले असं मानावं लागेल.

ओके. म्हणजे समीरने घर विकतानाच सीक्रेट व्हॉल्टची जागा आणि कोडही शहांना सांगितले असं मानावं लागेल. >> हो शक्य आहे किंवा १५ मेला ताबा देतांना तो सांगणार असेल. पण त्याने काही फरक पडत नाही कारण ते पूर्ण घरंच आता शहांचं आहे आणि ह्या घरात कुठेतरी एक सीक्रेट वॉल्ट आहे एवढी माहिती शहांसाठी पुरेशी आहे.

फारच थरारक.
खरंतर शहांनी पैशांबरोबर तो कंडोम तिथे ठेवून चान्सच घेतला... समीर तो कंडोम वापरेलच अशी हमी कुणी दिली? त्याने तो वापरलाच नसता तर?
दुसरं म्हणजे असीम ला पण तशाच प्रकारचा मृत्यू आला म्हणजे शहांनी एकापेक्षा अधिक कंडोम ठेवले होते का? असीम ला ते कुठे मिळाले? असे विशेष कंडोम शिवाय तुम्ही म्हणताय की त्याचं कव्हर फाटकं नव्हतं, मग शहांनी कव्हर वगैरे कुठे केले ते कंडोम? आणि ते कंडोम विषारी करताना त्यांचा स्वतःचा संपर्क आलाच असेल की त्या पदार्थाशी.

खरंतर शहांनी पैशांबरोबर तो कंडोम तिथे ठेवून चान्सच घेतला... समीर तो कंडोम वापरेलच अशी हमी कुणी दिली? त्याने तो वापरलाच नसता तर? >>> ते काँडोम हे एक लीथल वेपन असल्या कारणाने आणि ते भविष्यात दुसर्‍या कुणावर तरी वापरण्याचे पक्के असल्याने सेफ्टी वॉल्ट मध्ये ठेवलेले होते. शहांना समीरचा वीकनेस माहित असल्याने (समीर - मनाली प्रकरणावरून त्यांचा समीरवर राग असू शकतोच) त्यांनी ते काँडोम समीर ला अ‍ॅक्सेसिबल करून दिले, ईतकेच. चान्स घेतला का? तर हो! कॅल्क्यूलेटेड चान्संच घेतला. समीरने ते घेतले नसते किंवा घेवून फेकून दिले असते किंवा कधी वापरलेच नसते किंवा काही दिवसांनी वापरले असते अशी शक्यता होतीच. पण त्याने ते लगोलग वापरल्यानेच पुढचे घटनाचक्र सुरू झाले. अन्यथा आपल्याकडे केसंच आली नसती.
एखाद्याच्या गाडीचे ब्रेक करायचे आणि तो कधीतरी गाडी वापरेलच तेव्हा मरेल... असे आपण हिंदी सिनेमात खूप वेळा बघितलेले चान्स घेणे

दुसरं म्हणजे असीम ला पण तशाच प्रकारचा मृत्यू आला म्हणजे शहांनी एकापेक्षा अधिक कंडोम ठेवले होते का? असीम ला ते कुठे मिळाले? >> असीम रहात असेलेले घरंच शहांचे होते. थोडक्यात तो शहांच्या घरातंच रहात असल्यासारखा होता. मग कॅलिफोर्नियाला जातांना त्यांनी त्याच्या ड्रॉवरमध्ये वा जिथे कुठे त्याच्या पर्सनल गोष्टी तो ठेवत असेल वा त्या अ‍ॅक्सेसिबल असतील तिथे ते नुसते ठेवून दिले.

असे विशेष कंडोम शिवाय तुम्ही म्हणताय की त्याचं कव्हर फाटकं नव्हतं, मग शहांनी कव्हर वगैरे कुठे केले ते कंडोम? >>> जेमतेम दहा रुपयाच्या काँडोमचे एखादा रुपया किंमत असलेले सीलबंद कवर बनवणे फारंच सोपी आणि सिंपल गोष्टं आहे. Happy मी तुम्हाला डेरी मिल्क/ फाईवस्टार त्याचे कवर ओपन करून आतल्या चॉकलेटचा तुकडा काढून पुन्हा त्याच रॅपर-कवरमध्ये बेमालूमपणे ठेवून दाखवू शकतो. पेशन्स, प्रिसिजन टूल्स आणि स्टेडी हँड असलेला कोणीही हे करू शकतो. Happy

आणि ते कंडोम विषारी करताना त्यांचा स्वतःचा संपर्क आलाच असेल की त्या पदार्थाशी. >>> 'स्पेसिफिक मेल बॉडी फ्लुईडच्या' संपर्कात आल्याशिवाय ल्युब्रिकेशन मधला म्युटेशन रिअ‍ॅक्शन घडवून आणणारा कॅटालिस्ट अ‍ॅक्टिवेट होत नाही. त्यामुळे ते हाताळणार्‍या पुरूषाला वा फीमेल पार्टनर ला काही धोका नाही, त्यामुळे एस्कॉर्टनाही काही धोका झाला नाही.

Pages