द ‘बिटर’ ट्रुथ.. (निगेटीव्ह सत्यकथेवर आधारीत)

Submitted by बोधीसत्व on 13 May, 2017 - 01:40

तळटीप -
०१. हा ‘हलकट’पणा नसून ‘हलकासा’ प्रयत्न आहे.. मायबोलीच्या (विहीरीतल्या) खवळलेल्या लाटांवर स्वार होण्याचा.. ‘वल्हवासकट होडी बुडणार’ म्हणजे ‘आयडीसकट धागा उडणार’ ह्याची खात्री असून उडी मारतोय..
०२. माबोच्या बाहूबली योद्ध्यांपुढे मी म्हणजे केस खेत की आयडी... अनुल्लेखानं मारलंत तर शेवटपर्यंत वाचणार नाही. (म्हणजे मी वाचेन, पण तुम्ही लेख वाचणार नाही..) म्हणुन तळटीप उजळ माथ्यावर टाकली आहे..
०३. ‘मेरा वचन ही है शासन’ असं आपलं काही नाहीये.. त्यामुळं लेखात लिहलेल्या मतांशी लेखक स्वतःसुद्धा प्रामाणिक नाहीये. फारच जोडे पडले तर लेखक पलटी खाऊ शकतो..
०४. घडा भरला.. आता सुरु करतो.. (पापाचा घडा नाही हो.. नमनाचा.)

स्थळ - माबोचे संस्थळ
बीबी - कोतबो
पात्र - काल्पनीक (म्हणजे डू आय का काय म्हणतात ते...)

लेख - द बिटर ट्रूथ...

तिनं शब्द दिला होता... ‘तेहतीस कोटीं देवांच्या साक्षीनं तुला भेटेन’ असं म्हणाली होती.. म्हणजे गोठ्यात असणार. कारण गाईच्या पोटातच ३३ कोटी देव असतात. तिची कोटी आवडली मला.. मी गोठ्याबाहेर उभा राह्यलो.. इतक्यात ती गोठ्यातली कामधेनू उठली आणि माझ्याकडे कटाक्ष टाकून ठुमकत ठूमकत बाहेर निघुन गेली.. मी ही तिच्या मागे गेलो.

वातावरण पावसाळी होते.. एक बारीकसे गांडूळ जमिनीतल्या ह्या होलमधुन त्या होलमध्ये चालले होते.. एक माजावर आलेले झूरळ फुलपाखरासारखे उडत होते.. इतक्यात गाईने माझ्याकडे पाहिले.. माझ्या डोळ्यात तारूण्य... तिच्या डोळ्यात कारूण्य.. पोटातून एक कळ आली.. आणि गाईने शेण टाकले.. पुन्हा शेण टाकले.. पुन्हा शेण टाकले.. आणि मग.. पुन्हा शेण टाकले..

क्रमशः

प्रतिसाद -

- शीऽऽऽऽ अतिशय भिकार लेख आहे.. मुळात लेखाचा विषयच कळत नाहीये.. नक्की कशावर लिहायचय लेखकाला... संचारमुक्त गोठा...? बाल्यावस्थेतील गांडूळ आणि त्याचे स्थलांतर..? की झूरळाचा प्रजननकाळ..? आधी ठरवा आणि मग लिहा.. उगाच उचलला हात आणि लावला कीबोर्डला..

- ही बघा.. ही आली कंपूवनातली एकेक श्वापदं.. आता फाडून खातील बिचा-याला लेखकाला.. बाई, अहो किती घाई...? निदान शेवटची ओळ तरी वाचा की..

- काय आहे त्यात वाचण्यासारखं.. गाईने शेण टाकले.. पुन्हा शेण टाकले.. पुन्हा शेण टाकले.. आणि मग पुन्हा शेण टाकले.. गाय शेण टाकतीये आणि तुम्ही सारवा सारवी करताय...

- ते नाही हो.. त्या शेणाखाली काय आहे ते पहा....

- ह्या शेणाखाली दडलय काय..?

- उगाच फाल्तुपणा करयाचा असेल तर तुमच्या बीबीवर जा.. इथं कुणीतरी त्याच्या मनाची व्यथा मांडतय.. मी शेणाखाली पहा म्हणजे त्या ओळीखाली पहा असं लिहलय.. चक्क क्रमशः लिहलय.. पुढच्या भागात कळेल की नक्की विषय काय आहे..

- काही कळणार नाहीये. ह्यांचं लिखाण हे असंच असतं.. मी अजिबात वाचत नाही.. आमच्या त्या ह्यांच्या धाग्यावर सुद्धा इतके भिकार लेख नसतात..

- आणि क्रमशः लिहलय ह्याची जास्त भिती.. कारण पुन्हा गाईने शेण टाकण्यापासून सुरवात होणार... मी सांगते, त्या गाईपेक्षा भरकटणार हे लिखाण...

- तुम्हाला लेख आवडला नसेल तर तसं लिहा आणि सूटा इथनं.. तुमचे अंदाज कुणीही विचारलेले नाहीत...

- त्या शेणाखाली काय आहे ते पहा....>>>>> कुठं पाहयचय.. नक्की कळत नाहीये..

- नावाचा आणि लेखाचा संबंध काय ते कळत नाहीये.. आधी बिटर वाचून मला वाटलं कुणा एक कंपूविषयी लिहलय.. पण हे तर भलतच काहीतरी निघालं.. प्रतिसाद देण्याच्या लायकीचा लेख नाहीये. हेमाशेपो

- एक भाबडी शंका... ते झूरळ माजावर आलं होतं हे लेखकाला कसं समजलं..? म्हणजे व्हिलन रंजीत सारखं एखादी झुरळबाई पाहून ‘एहऽऽऽऽऽ’ असा गलिच्छ उद्गार त्या झूरळानं काढला होता काय..? की शक्ती कपूर सारखं दुस-या एखाद्या झूरळणीकडे पाहून ‘आऊ, ललीता’ असं म्हणालं होतं..??

- :फिदीफिदी:

- :फिदीफिदी:

- :फिदीफिदी:

- ते झूरळ माजावर आलं होतं हे लेखकाला कसं समजलं..? ...>>>>>>> माजावर नसेल हो.. माझ्यावर असेल. उगाच एकेक शब्द घ्यायचा आणि लेखकाचे लचके तोडत रहायचं.. तुम्हाला काम ना धाम.. दिवस ढकलण्यासाठी ह्या ना त्या धाग्यावर टवाळी करणार तुम्ही.. तुम्हाला उपचारांची गरज आहे.. गेट वेल सून...

- गेट वेल सूनची गरज तुम्हाला आहे.. मी लेखकाविषयी अवाक्षरही काढलेलं नाहीये. दाखवुन द्या.. आपण ग्रेस असल्याच्या थाटात हे काहीही लिहून टाकतात.. पण लिखाणात शून्य ग्रेस.. ग्रेस मार्क मिळवुन पास होणारे लेखक हे.. आणि तुमच्यासारखी निर्बुद्ध माणसं तळी उचलायला तयार.. दिवे घ्या..

- नाहीतर काय.. अगदी अगदी.... +१११११११.... असंच म्हणते..

- अतिशय सुंदर लेख आहे.. ‘ती येणार का’ ही उत्सुकता लागुन राह्यली आहे.. आता भाग दोन वाचावाच लागणार.. पावसाळी वातावरणाचे तपशील आवडले.. आमच्या गावी घराबाहेर असेच गांडूळ निघायचे.. त्याची आठवण झाली.. फोटो मिळाला की टाकतो.. झुरळाचे फुलपाखरु ही कल्पना अंगावर शहारा आणुन गेली. आणि तारूण्य कारुण्य ही तुलना भावली.. पुलेशू..

- हा लेख आहे...?? देवाऽऽऽऽऽ शेवटच्या वाक्यात गाईने पोटातला नव्हे तर लेखकाने त्याच्या डोक्यातला ऐवज टाकलेला आहे. झुरळाचाही आयक्यू ह्यापेक्षा जास्त असेल.

- तोंड सांभाळून बोला.. आयक्यून घेतो म्हणून काही बोलू नका.. तुमची लायकी काय आहे हे त्या कवितांच्या धाग्यावर सगळ्यांना समजलीये.. तुम्हाला लेख कळत नसेल तर तुमच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे.. नीट वाचा आधी लेख..

- नीट वाचा आधी लेख....>>>> वाचला आणि म्हणुनच लिहतेय... काय लिहलय..?? कारूण्य काय.. तारूण्य काय.. काही मॅच तरी होतय का..?

- झुरळाचाही आयक्यू ह्यापेक्षा जास्त असेल....>>>> वेमा म्हणुन सांगतो.. कुणाच्याही आयक्यू विषयी लिहणं हे वैयक्तीक ताशेरे होतात.. तुम्हाला समज देण्यात आहे..

- द्यायचं तर मॅचींग द्या...

- हाईट आहे... ह्यांना मास्तर समज देतायेत आणि ह्या ती पण मॅचींग मागताहेत.. मास्तर काय ओटी भरुन ब्लाऊजपीस देतायेत का मॅचींग मागायला..? उगाच आपलं काहीतरी...

- ‘आपलं’ नसेल, ‘तुमचं’ असेल काहीतरी. मी ती मॅचींगची पोस्ट वरच्या अबकच्या पोस्टला उत्तर दिलं होतं..

- मग शेंडा ना बुडखा असं का लिहलत....? त्यांना उत्तर द्यायचं होतं तर बाहेर काढायचा ना..

- बाहेर काढण्याचं काम मास्तरांचं आहे. त्यांना सांगा..

- आयडीला बाहेर नाही हो.. त्यांचं वाक्य बाहेर काढा म्हणतोय मी.. तुम्ही नीट वाचत नाही का..? आधी दुस-यांची पोस्टी नीट वाचायला शिका.. मग अक्कल शिकवा..

- आणखिन एक भाबडी शंका... पोटातून कळ आली म्हणजे कोणाच्या.. गाईच्या की लेखकाच्या..?

- :फिदीफिदी:

- :फिदीफिदी:

- :फिदीफिदी:

- कहर आहे तुमच्या सगळ्यांचा.. त्या गाईनं जेवढं शेण टाकलं नसेल तेवढे प्रतिसाद टाकले आहेत तुम्ही... अगदीच राहवलं नाही म्हणुन परत आले.. पण ह्यावेळेस खरंच हेमाशेपो..

- वा.. आणखिन एक सुंदर लेख.. अतिशय उत्कंठावर्धक आहे. तुम्ही इतरांच्या कुजाट प्रतिसादाकडे लक्ष देऊ नका.. आम्ही तुमचे नियमीत वाचक आहोत, आमच्यासाठी लिहा..

- आमच्या गावातल्या गांडूळाचा फोटो...Gandul.jpg

- ही सत्यकथा आहे..?? विकृतपणाचा कळस आहे हा... ती गाय ह्यांच्याकडे कटाक्ष का टाकेल.. बरं.. टाकला तर टाकला, ठूमकत ठूमकत का जाईल.. बरं गेली.. हे तिच्या मागे का गेले...? आणि झूरळ काय पक्षी आहे का उडायला..? कैच्याकै..

- वेमा ह्या नात्यानं सांगतो.. तुम्हाला समज देण्यात येत आहे...

- झूरळ काय पक्षी आहे का उडायला..?...>>>>>> जरा ज्ञान वाढवा आपलं.. झुरळं उडू शकतात.. ही बघा लींक.... www.wiki/zural_udu_shakt_bar_ka

- लींक पाहिली.. ती स्पेनमधील झुरळे आहेत. पण लेखक स्पेनमध्ये असू शकत नाही.. कारणं दोन.. एक स्पेनमध्ये कुठला आलाय गोठा आणि गाई...? दोन तिथे गांडूळ नसतात..

- चुकीची माहिती. स्पेनमध्ये गांडूळ असतात.. आणि माझ्या ओळखिचा एक स्पॅनिश गाय आहे..

- विकृतपणाचा कळस आहे हा... ....>>>> विकृत तुम्ही आहात.. लेखक गाईच्या मागे मागे गेला कारण त्यांच्या वाग्दत्त वधूने त्यांना तेहतीस कोटी देवांच्या साक्षीने भेटण्याचे सांगितले होते.. गाय हलल्यावर देव पण हलणारंच ना..?

- वेमा ह्या जबाबदारीने सांगतो.. एकमेकांना विकृत म्हणु नका.. मी तुम्हाला समज देत आहे.

- ही प्रेमकथा आहे का..? मला तसं वाटलं.. आणि ती येणार नाही असंही वाटलं.. कारण शिर्षक एक निगेटीव्ह सत्यकथा असं आहे. प्रेमकथाच असणार..

- ये इश्क नहीं आसा.. बस इतना समझ लिजे.. एक शेण का दरीया है.. और डूब के जाना है..

- :फिदीफिदी:

:फिदीफिदी:

:फिदीफिदी:

- अतिशय आकसानं आणि पूर्वग्रहदुषित होऊन प्रतिसाद दिलेत.. ह्या कंपूला दुसरं काही जमत नाही का..?

- न जमायला काय झालं..? चार दाणे टाकले तर पक्षी सुद्धा जमतात.. आपण तर माणसं आहोत.. पण हे असले लेख आले तर कुणीही भडकणारंच ना..? हॅरेसमेंट आहे ही...

- लींक उघडत नाहीये.. कुठं पाहता येईल.. आणि ते शेणाखाली म्हणजे कुठं पाहायचं.. मायबोलीवर नविन आहे. मदत करा..

- लेखकाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.. स्वतःला तरूण समजणे म्हणजे कहरच झाला. तरी बरं अर्ध्या गव-या मसणात गेल्यात..

- तारूण्य डॊळ्यात आहे असं लिहलय.. उगाच काहीही बरळू नका..

- आमच्या त्या ह्यांच्याकडं करतात त्याला बरळणं म्हणतात... हे तुमच्या डोक्यावरुनच जाणार कारण यू आर मिसींग द होल पॉईंट..

- करेक्ट.. गांडूळ एका होल मधुन दुस-या होलमध्ये गेलं हे मिस केलं आपण..

- वेमा ह्या कर्त्यव्यानं सांगतो... मंडळी त्वरा करा.. अजुन थोडीच समज शिल्लक आहे... ती संपल्यावर धागा बंद करण्यात येईल...

- बिटर नाही शिटर ट्रूथ आहे.. आता आशहेमाशेतो.. (आईची शपथ... हे मा शे पो..)

- वेमा ह्या अधिकारानं सांगतो... तुम्हाला समज देण्यात येत आहे.. आणि हा धागा बंद करण्यात येत आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय.. फक्त ते प्रतिसाद वाचताना सुरवातीला थोडे अडखळायला होते. वाचक आणि लेखक प्रतिसाद उर्फ प्रत्युत्तरे आहेत हे लक्षात आले की मजा यायला लागते. बेफिकीरांच्या एक प्रवास वर्णन ची आठवण झाली. Happy Happy

लिहीत राहा हो असेच काहीतरी चांगले. काही आयडी बियडी उडत नाही.

मस्तच Lol
एक शेण का दरीया है.. और डूब के जाना है..>>>> Lol

- वेमा ह्या कर्त्यव्यानं सांगतो... मंडळी त्वरा करा.. अजुन थोडीच समज शिल्लक आहे... ती संपल्यावर धागा बंद करण्यात येईल...> Lol

प्रत्येक वाक्याला हसू आलं.. आणि साधं सुधं नाही.. पोट दुखेस्तोवर Rofl मजा आली एकदम.. टू गूड.. विनोदी सुपीक डोकं Happy

Pages