'इर्शाद'च्या निमित्ताने...

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
<1’

irshaad.jpeg

मला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.

त्यानंतर जवळपास पंधरावीस वर्षं कविताच केंद्रबिंदू असलेला असा इतर कुठला प्रयोग झालेला निदान माझ्या माहितीत नाही. संदीप खरेंचा 'आयुष्यावर बोलू काही' क्षितिजावर उगवला आणि पुन्हा एकदा मराठी कवितेला लोकाश्रय मिळाला म्हणण्यापेक्षा पुन्हा मराठी लोकांना संदीपने कवितेच्या आश्रयाला खेचून आणलं. सहजसोपी भाषा, खेळकर शैली, आणि त्यामागे लपलेली मानवी भावभावनांबद्दलची एक सखोल, समंजस, क्षमाशील जाण हे संदीपच्या कवितांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य. त्यामुळे वयाने तरूण आणि मनाने तरूण अशा सगळ्याच पिढ्यांना त्याच्या कविता आपल्याश्या वाटल्या यात नवल नाही.

कविता आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं.
कवी William Carlos Williams म्हणतो त्याप्रमाणे 'It is difficult to get news from poems, yet men die miserably everyday for the lack of what is found there.'

म्हणूनच एक काव्यप्रेमी म्हणून संदीप खरे यांचे आभार मानावेत तेवढे कमी वाटतात मला.

कविता आयुष्यात असणं महत्त्वाचं, कवी आयुष्यात असणं तर भाग्याचंच! वैभवशी असलेल्या, नव्हे कवितेमुळेच जुळलेल्या मैत्रीमुळे हाही एक राजस अनुभव दैवाने गाठीशी जमा केला. वैभवने आंतरजालावर लिखाणाला सुरुवात केली तेव्हापासून गेलं एक तप त्याचा प्रवास मी बर्‍यापैकी जवळून पाहिलेला आहे. तो जितक्या सातत्याने लिहितो, जितकं वैविध्यपूर्ण लिहितो, आणि ज्या सातत्याने दर्जेदार लिहितो त्याची मला कायमच कमाल वाटत आलेली आहे.

'बरं आहे बुवा तुम्हाला सुचतं!' असं म्हणणं हे काहीसं क्रूर अतिसुलभीकरण ठरेल. त्यामागे साधना असतेच. वैभवच्या बाबतीत बोलायचं तर कवितांमध्ये इतका आकंठ बुडालेला माणूस माझ्या पाहण्यात दुसरा नाही. त्याच्या डोक्यात कविता दैनंदिन धबडग्याच्या बॅकग्राउंडला सुरू नसते, कविताच सुरू असते आणि बाकी गोष्टी नुसत्याच काही फुटांवरून वाहून जात असतात.
एखादा सुचलेला खयाल नेमका आणि सर्वात परिणामकारक पद्धतीने कसा मांडता येईल इथपासून ते मुळात कविता म्हणजे काय? काव्यात्मक गद्य कुठे संपतं आणि कविता कुठे सुरू होते? मुक्तछंदालाही आपली एक लय असते का? असावी का? कविता आयुष्याचा आटीव अर्क म्हणावा तशी संक्षिप्त चांगली की लाटालाटांनी येऊन भिडण्याचा खेळ मांडण्याइतक्या अवकाशावर तिने हक्क सांगावा? चांगल्या कवितेने तत्काळ काळजाला भिडून टाळी घ्यावी की ती अनुभवांती उलगडून दीर्घकाल स्मृतीत रेंगाळावी? कलेच्या संदर्भात चांगलंवाईट असं काही असतं का? असावं का? - हे आणि असे अनेक प्रश्न त्याला सतत पडत असतात, नव्हे तो ते सतत स्वत:ला पाडून घेत असतो. कालची उत्तरं उलटसुलट करून पुन्हा आज पडताळून पाहत असतो. हा एका अर्थी 'स्व'चा शोध आहे. कवितेच्या संदर्भात आपली विद्यार्थीदशा त्याने हट्टाने संपू दिलेली नाही, आणि त्यामुळेच त्याचा कविता लिहिण्यातला रोमान्स टिकून राहिला आहे असं मला वाटतं.
हा रोमान्स असाच आजन्म सुरू राहो!

काल संदीप खरे आणि वैभवचा मराठी विश्वने आयोजित केलेला 'इर्शाद' कार्यक्रम 'घडला' आणि त्यानिमित्ताने हे मनोगत मांडावंसं वाटलं.
सुरांची वा इतर कसलीही साथसंगत, काही ठराविक आकृतीबंध, काही काही नसताना हे दोन कवी केवळ शब्दसामर्थ्य आणि अप्रतिम सादरीकरण यांतून जी जादू घडवतात त्याला तोड नाही.
शास्त्रीय संगीतासारखाच कवितेच्या कार्यक्रमाला येणारा प्रेक्षकही काहीसा uptight असतो सुरुवातीला. प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारत, कोपरखळ्या देत हे दोघे वातावरणातला ताण पाहता पाहता घालवून टाकतात आणि मग पोतडीतून एकेक मौजेच्या आणि मौल्यवान चिजा बाहेर काढतात. आपण दिपून गेलो हेही प्रेक्षकाला कळत नाही कारण तो त्या उजेडाचा भाग झालेला असतो.

कवितांचं सादरीकरण हा सहसा दुर्लक्षित / अन्डरएस्टिमेटेड विषय आहे. त्याचंही तंत्र असतं, त्यालाही रियाज लागतो, व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, त्यातही प्रेक्षकाची नस आणि त्यावेळचा मूड पाहून आयत्यावेळी बदल करण्याइतकी लवचिकता लागते. संदीप आणि वैभव यांनी त्यांच्या कार्यक्रमांतून काव्यसादरीकरणाचा एक वस्तुपाठच घालून दिलेला आहे.

कलेचं अ‍ॅनालिसिस करता येत नाही. या विषयावर कितीही बोललं तरी शब्दांत न पकडता येणारी चार अंगुळं उरतातच. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी हा कार्यक्रम चुकवू नका अशी आग्रहाची विनंती करून इथेच थांबते.

प्रकार: 

स्वाती, छानच लिहिलं आहेस.

> सुरांची वा इतर कसलीही साथसंगत, काही ठराविक आकृतीबंध, काही काही नसताना हे दोन कवी केवळ शब्दसामर्थ्य आणि अप्रतिम सादरीकरण यांतून जी जादू घडवतात त्याला तोड नाही.

काल याची नेमकी प्रचिती आली. सर्वांना बरोबर घेऊन झायचं असल्यामुळे मात्र डीप विषय असलेल्या जास्त कवीता घेता येत नाहीत हे जाणवलं. पण ते ही ठिकच आहे. या निमित्ताने जास्त लोक कवितेकडे आकर्षीत झाले तर आनंदच आहे.

कवीता सादर करत असतांना मधेच थांबून रिलेटेड अनेक गोश्र्टी सांगत पुन्हा बरोब्बर तिथेच परत येण्याची हातोटी विलक्षण - दोघांचीही.

लोकली (LA मध्ये) असं काही करण्याचे विचार सुरु झाले आहेत. सध्या इतरांच्याच कविता Wink

> ईर्शाद भारतात ऐकायला मिळाला नाहीये. इथे (सिडनीत) व्हावा(च)..

दाद, त्यांचा सिंगापूर आणि अॉस्ट्रेलिया दौरा होणार आहे.

शनिवारी राम कृष्ण मोरे चिंचवडला शो आहे इर्शादचा
आत्ताच बूक केला
आय लव्ह संदीप आणि वैभव तर आपलाच आहे Happy

वैभव जोशी, अरे तुरे करायला नकोय खरं तर मी.. कसा मराठी क्रिकेट रसिकाला 'सच्या' कसा आपला वाटतो तसा वैभवदा मला कायम 'आपलं माणुस' वाटत आलाय.. मायबोली मुळे असेल कदाचित Happy
माझी मायबोलीशी ओळख झाली आणि पाठोपाठ वैभव जोशी या नावाशी.. त्याच्या गझला/ कविता मी गेल्या ५ वर्षांपासून अनेकदा ऐकत आलेय. माझ्या दुर्दैवाने त्याला प्रत्यक्ष ऐकायचा चान्स कधीच मिळाला नव्हता मला. तो परवा मिळाला #इर्शाद च्या निमित्ताने...

संदिप खरेच्या कवितांवर माझं निस्सिम प्रेम आहे.. त्याबद्दल मी काही सांगायलाच नको. 'आयुष्यावर बोलू काही' चे शक्य तितकी पारायणं मी केली आहेत पण खरं सांगू का माझी भुक कुठे तरी कायमच अपुरी रहात होती . मला फक्त 'संदिप' ला ऐकायचं होतं, त्याचे शब्द शब्द दुसर्‍या कोणाहीकडून ऐकताना मला थोडंस चुकचुकायला व्हायचं.. खरंच सांगते मी आयुष्यावर बोलू काही पाहून/ ऐकुन झाल्यावर पुन्हा येऊन 'मौनाची भाषांतरे' वाचून काढायचे. तेंव्हा वाटून जायचं की हा वेगळा शो काही नाही करत? फक्त कवितांचा.. आणि ती परवा माझं ते स्वप्नही पुर्ण होता ना पाहिला मिळालं #इर्शाद च्या निमित्ताने...

अतिशय टॅलेंटेड आणि स्वतःला सिद्ध केलेल्या २ कवींनी काव्यरसिकांसाठी ही मेजवानी आणली आहे.

#इर्शाद ! काय आहे नेमकं हे? मी म्हणेन साधना आहे.. २ मनस्वी कवींनी त्यांच्या कवितेची केलेली साधना, कवितेवर प्रेम असणार्‍या प्रत्येकाला तल्लिन करून सोडणारी साधना, काही तरी फार सुंदर अनुभुती देणारी साधना.. किती सुंदर लिहावं एखाद्याने आणि किती सुंदर रित्या पुढच्या पर्यंत पोहचवावं?

मी मुद्दामच एखाद्या दुसर्‍या कवितेचा उल्लेख करायचं टाळतेय कारण प्रत्येक कार्येक्रमात सारख्या कविता नसणारेत आणि हिर्‍यांच्या पोतडीतून एखादा बेस्ट हिरा शोधणं शक्य नाही.. पण अगदी कवितेतला ओ की ठो न कळणार्‍या व्यक्तीने ही नक्की #इर्शाद एकदा अनुभवून पहा असं सांगेन मी... मला आठवतंय कार्येक्रम संपल्यावर एका टिनेजर टाईप दिसणार्‍या मुलाने येऊन वैभवदाला सांगितलं होतं की ' मला वाटलं काही झेपणार नाही पण आवडला मला कार्येक्रम'..... खरं सांगू? इथे हिट्ट झाला #इर्शाद Happy

मी तर म्हणेन की नुसता कवितांचा कार्येक्रम म्हणजे बोअर होणार म्हणणार्‍या व्यक्तीचं कवितेवर प्रेम नाही पण तरीही संदिप आणि वैभवदाची
ही जादुई मैफिल अशा व्यक्तीलाही कवितेच्या प्रेमात पाडेल याची मला खात्री आहे.
कारण #इर्शाद काही नुसती कवितांची मैफिल नाहीये, तो नितांत आनंददायी अनुभव आहे... तेंव्हा अनुभवून पहाच!!!!

स्वाती, तुम्ही हा तुमचा लेख फेसबूक वर टाकला असेल तर प्लिज #इर्शाद # Irshaad वापराल का त्यात?
मी इर्शाद साठी # टॅग सुरू करायचा विचार करतेय Happy

या अशा सुंदर गोष्टी नव्या जनरेशन पर्यंत पोहचायला हव्यात

ओके. Happy

Pages