हमखास शिकारीच्या माझ्या काही युक्त्या.

Submitted by सचिन काळे on 14 April, 2017 - 07:25

'आपण सर्व जण लहानपणापासूनच एक उत्तम शिकारी असतो' हे माझे वक्तव्य तुम्हांस फारच धाडसाचं वाटतंय ना!! तर मग आठवा बरं! आपल्या बालपणी आपण किती किड्यामुंग्यांच्या शिकारी केल्यात ते!!! कसं त्यांना एका फटक्यात चारीमुंड्या चित केलंय. कसं त्यांना दोरा बांधून घरभर फिरवलंय. कसं त्यांच्यावर झडप टाकून, त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना बाटलीच्या पिंजऱ्यात बंदीवान केलंय. हो ना!?

बालपणी जसं आपल्याला कळायला लागतं, तसं निसर्गाविषयी आपली उत्सुकता वाढू लागते. चंद्र, सूर्य, तारे, नदी, झाडे ह्याबरोबरच आपल्या घरात आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याबरोबर वावरणारे, रहाणारे कीटक, पशु, पक्षी यांचे आपण निरीक्षण करू लागतो. त्यांना स्पर्श करून आपण त्यांच्याशी जवळीक साधू पहातो. त्यांना जवळ घेऊ, कुरवाळू पहातो. आपल्या बालसुलभ बुद्धीप्रमाणे आपण त्यांच्याशी खेळू पहातो.

पण ते काही आपण बोलावल्यावर सहजासहजी आपल्याशी खेळायला येत नाहीत. आणि मग आपल्या अजाणतेपणी जन्माला येतो त्यांना जबरदस्तीने आपल्याशी खेळायला बोलावण्याचा एक खेळ. त्यांना पकडण्याचा, त्यांची शिकार करण्याचा खेळ.

मला खात्री आहे, की बहुतेक सर्वांनी आपल्या बालपणी हा शिकारीचा खेळ नक्कीच खेळला असणार. मीसुद्धा लहानपणी एक पट्टीचा शिकारी होतो. हो! पण मी कधी कुत्र्यामांजरांच्या वाटेला गेलो नाही. आणि नशीब माझे की तेही कधी माझ्या वाटेत आडवे आले नाहीत. नाहीतर त्यांनीच माझी वाट लावली असती. असो!

माझी शिकार करण्याची कला ही फक्त लहानसहान किड्यामुंग्याच्या बाबतीतच मर्यादित होती. त्यांचे जवळून निरीक्षण करणे मला फार आवडे. त्यांची तिरकी, नागमोडी, दबकी चाल बघताना मला फार गंमत येई. ते एके ठिकाणी स्थिर उभे असले तरी ते करीत असलेल्या त्यांच्या पंखांची, मिशांची, हातांची हालचाल पहाणे मला मोहवीत असे. प्रसंगी मायेने मी त्यांना खायला खाऊही देत असे. आणि कधी माझे ऐकले नाही तर मात्र रागाने त्यांना कधी एक नाजूक फटकाराही मारे. पुन्हा एकदा असो!

तर माझा सांगायचा मुद्दा हा होता, की मी ह्या किड्यामुंग्यांच्या शिकारीत चांगलाच तरबेज झालेलो होतो. त्यांची काय हिंम्मत होती, की ते मला हुलकावणी देतील! चला तर मग, माझ्या ह्याच कलेची काही गुपिते आणि त्यात हमखास यशस्वी होण्याचा मार्ग मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्यायोगे तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच एक यशस्वी शिकारी होऊ शकता.

मच्छरांची शिकार कशी करावी : मच्छर हा भयंकर त्रास देणारा कीटक. ह्याच्याशी माझी कधी दोस्ती झाली नाही. रात्री मी चादर डोक्यावर घेऊन झोपलो, तरी का कोण जाणे तो चादरीच्या कुठल्याशा तरी फटीतून हमखास आत प्रवेश करी. मी झोपण्याच्या तयारीत असे, आणि त्याला माझ्याशी खेळण्याची लहर येई. नको म्हटले तर त्याला फार राग येई. मग तो जोराने माझ्या कानाजवळ भुणभुण करी. "ये ना! ये ना! खेळायला" तरी मी नाही ऐकले तर माझा एक सणसणीत चावा घेई. मी जोराने कळवळे "आई गं!!" मग काय!? टाळकंच सटकायचं ना माझं. "आई शप्पथ! अब तो तू गया!" आणि मी त्या मच्छराची शिकार करण्याचा निर्धार करी. मग मी चादर बाजूला करून हळूच गादीवर उठून बसे. दोन्ही हात पुढे करून त्याला खोट्या खोट्या लाडाने म्हणे "ये! ये! बस माझ्या हातावर. चल आपण झिम्मा फुगडी खेळू" मच्छराला मात्र कसला तरी संशय येई. तो हातावर बसायला कां कूं करे. आता मी त्याला पुन्हा हळूच चुचकारे. माझ्या प्रेमाने केलेल्या आवाहनाला मच्छर बळी पडे. आणि अलगद माझ्या हातावर येऊन बसे. आणि मग मी......

बास्! इथेच तुम्ही फसता. तुम्हाला वाटतं, की आता मी ह्या क्षुद्र मच्छराला हाताच्या एका चापटीसरशी एका झटक्यात यमसदनाला पाठवतो. आणि तुम्ही एक सणसणीत चापटी मच्छरावर ठेऊन देता. पण कसचं काय!? हातावर चापटी पडायच्या अगोदरच तो मच्छर भुर्रर्रकन् उडून गेलेला असतो. आणि तुम्ही मात्र हात चोळत बसलेले असता.

इथेच माझ्या शिकारीचं चातुर्य दिसून येतं. मी काय करतो ते सांगतो. मच्छराला हातावर बसू देतो. त्याला थोडावेळ दम खाऊ देतो. मच्छरसुद्धा हातावर बसल्यावर लगेच चावत नसतो. तो एकदम सावध असतो. थोडी वाट बघतो, कोणी आपल्याला चापटी मारतोय का ते! आपल्या लांब मिशा हलवत वेळ काढतो. आणि ऑल लाईन क्लियर दिसली, की मगच रक्त प्यायची सोंड आपल्या हातामध्ये घुसवून निर्धास्तपणे रक्त प्यायला सुरवात करतो. ह्या प्यायलेल्या रक्तापासून आपली वंशावळ वाढवण्याची स्वप्ने पाहू लागतो. बास्!!! हीच ती वेळ!! अगदी सुवर्णकांचन योग!! ठेऊन द्या एक सणसणीत चापटी त्या निर्दयी मच्छरावर. पडलाच पाहिजे तो धारातीर्थी. आणि मग करा आनंद साजरा, आपल्या शिकारीच्या कलेत अजून एक मानाचा तुरा खोवल्याचा.

माशीची शिकार कशी करावी : माशी काही आपल्याला चावत वगैरे नाही. पण ती आपल्याला फार गुदगुल्या करते, बुवा! आणि का कोण जाणे, आपल्या तोंडावर बसणे हा तर ती तिचा जन्मसिद्ध अधिकार समजते. कधी कधी तर ती आपल्या कानात नाहीतर नाकात शिरायचा प्रयत्न करते, तेव्हा तिला उडवताना आपण आपल्याच थोबाडीत मारून बसतो. मला मात्र माशीचे निरीक्षण करणे भारी आवडायचे. तिचे ते उभ्या जागी जोडीने दोन दोन पाय उचलून, व्यायामाचे विविध प्रकार करून दाखवणे तर एकदम झकास! ते व्यायामाचे प्रकार नीट दिसण्याकरिता मी तर माझे तोंड जास्तीत जास्त तिच्याजवळ नेऊन तन्मयतेने तिला बघत बसे. अहाहा! काय तिचे ते मान खाली घालुन पुढच्या दोन पायांनी स्वतःचे डोके गरागरा चोळणे. तर कधी मागचे दोन्ही पाय (की हात? कारण तिला सहा पाय असतात ना! त्यामुळे हात कोणाला म्हणायचे आणि पाय कोणाला, की सगळ्यांनाच पाय म्हणायचे, हा मला नेहमी प्रश्न पडतो.) आपण सुरीला धार काढतो तसे एकमेकांवर सतत चोळत रहाणे. तर कधी मागच्या दोन्ही पायांनी आपले पंख सारखे सारखे साफ करणे. डायनींग टेबलवर जेव्हा पाच पंचवीस माश्यांचा झुबका बसलेला असेल, तेव्हा त्यांना हाताने झपकन् उडवून लावताना त्या आपणांस अवर्णीय आनंद मिळवून देतात.

जसे मच्छर, तशाच माशाही फार हुशार असतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या आपल्या हातात सहसा सापडतच नाहीत. आपण कितीही सावकाश आणि गुपचूप माशीजवळ आपला हात नेला, आणि आपल्याला वाटले की मी आता माशीवर झडप टाकून तिला जेरबंद करेन, तर तो आपला भ्रम ठरतो. माशी आपल्या हातावर तुरी देऊन कधीचीच सटकलेली असते. आणि म्हणून मी आज तुम्हाला यशस्वीरित्या माशीची शिकार कशी करायची त्याची टीप देणार आहे.

ऐका तर मग! समजा, टेबलावर एक माशी बसलेली आहे. तिचा बसल्या बसल्या मघाशी मी सांगितला तसा मस्तपैकी व्यायाम चाललेला आहे. आणि आता आपल्याला तिला पकडायचंय. तुम्ही काय कराल? आपल्या हाताची मूठ उघडून हळूहळू माशीच्याजवळ न्याल. आणि संधी मिळताच, झटदिशी आपला हात, वाटी उपडी ठेवतात तसा माशीच्या अंगावर ठेवाल. आणि पट्कन मूठ बंद करून घ्याल. तुम्हाला वाटेल माशी आली आपल्या हातात. पण हाय रे, कर्मा! माशीने तुम्हाला कधीचाच गुंगारा दिलेला असेल. आणि दूर कुठेतरी जाऊन तुमच्यावर हसत बसलेली असेल. म्हणून मी सांगतो तसं करायचं. काय करायचं, की माशी जिथे बसलेली असेल, तिच्यापासून साधारण एक दीड फूट अंतरावर, आपल्या हाताची मूठ उघडी ठेऊन आपला हात न्यायचा. आणि मनातल्या मनात आपले १.२.३. आकडे मोजून पूर्ण होताच एका झटक्यात, सट्कन  अगदी ५० च्या स्पीडने माशीच्या अंगावरून, पण साधारण ५-६ इंच उंचीवरून हात फिरवायचा. आणि त्याचवेळी, जेव्हा आपला हात माशीच्या अंगावरून जात असेल, तेव्हाच आपल्या हाताची मूठ पट्कन बंद करून घ्यायची. माशी आपल्या मुठीत कैद होणारच, ह्याची शंभर टक्के ग्यारंटी!!

क्रिया काय होते तेे मी सांगतो. आपला हात तिच्याजवळ येताना जेव्हा माशीला दिसतो, तेव्हा ती पट्कन उड्डाण घेते. पण आपण आपल्या हाताची मूठ तिच्या अंगाच्या वर ५-६ इंच उंचीवर बंद केल्याने ती हमखास आपल्या मुठीत येऊन बंद होते. हाय काय!! आणि नाय काय!!

आता शेवटचं, फुलपाखराची शिकार कशी करावी : अशी कोणती व्यक्ती आहे जिला कधीच फुलपाखराला हात लावावासा वाटला नाही? सगळ्यांनाच फुलपाखरे आवडतात. त्यांचे सुंदर नक्षी आणि रंग असलेले नाजूक पंख आपणांस मोहवितात. त्यांचे पंख फडफडवीत उडण्याची आपल्याला भुरळ पडते. लहानपणी आमच्या घराभोवतीसुद्धा पुष्कळ फुलझाडे आणि त्या फुलांवर बागडणारी, जर्द पिवळ्या रंगांची, एक रुपयांच्या नाण्याच्या आकाराएवढी फुलपाखरे असत. त्यांना पकडायला आम्ही मुले त्यांच्या मागे मागे पळत असू. इतर मुलांच्या ती हाती लागत नसत. पण त्यांना हमखास पकडण्याची एक पद्धत मी शोधून काढली होती, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

हो! पण प्रथम त्याकरिता तुम्हाला एक चिमटा बनवावा लागणार आहे. लोखंडी तारेचा नव्हे, तर आपल्या हातांच्या बोटांचा. चिमटा कसा बनवायचा त्याची पद्धत ऐका. समजा, तुम्ही आपल्या हाताच्या अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या बोटांमध्ये एक काडेपेटी पकडलेली आहे. आणि दुसऱ्या हाताने ती काडेपेटी हळूच काढून घेतली. तर आपला अंगठा आणि तर्जनीची न हलविता जी स्थिती रहाते, तो झाला आपला फुलपाखरे पकडण्याचा बोटांचा चिमटा.

आता ह्या बोटांच्या चिमट्याने फुलपाखरू कसे पकडायचे ते ऐका. फुलपाखरू उडता उडता कुठेतरी जाऊन हमखास बसते. त्यावेळी त्याच्या पंखांची स्थिती ही उभी, आपले दोन्ही पंख मिटलेल्या अशा अवस्थेची असते. अशावेळी त्याच्या मागे आपण हळूच दबकत जायचे. आपल्या बोटांचा चिमटा बाहेर काढायचा. आणि तो अलगद असा सरकवायचा की फुलपाखराचे मिटलेले पंख बरोबर आपल्या दोन बोटांच्या चिमट्याच्या मधोमध उभे आले पाहिजेत. मग एक मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि मनातल्या मनात आपले १.२.३. आकडे मोजून पूर्ण होताच एका झटक्यात, सट्कन  अगदी ५० च्या स्पीडने आपल्या दोन बोटांचा चिमटा बंद करायचा. फुलपाखरू शंभर टक्के आपल्या बोटांच्या चिमट्यात अडकलेच म्हणून समजा. पुन्हा! हाय काय!! आणि नाय काय!!

तर मित्रांनो, ह्या होत्या माझ्या मच्छर, माशी आणि फुलपाखरू यांच्या शिकार करण्याच्या युक्त्या. तुम्हीसुद्धा त्या वापरून पहा. शंभर टक्के यश मिळण्याची खात्री!!! पण हो!! ह्या युक्त्यांचा कॉपीराईट © माझ्याकडे सुरक्षित आहे. ह्या युक्त्या वापरून शिकार केल्यास, माझी रॉयल्टी तेवढी मला पाठवून द्यावी ही विनंती.

माझा ब्लॉग :
http://sachinkale763.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, वेळकाढू आहेत हो या युक्त्या. त्या पेक्षा चायनिस बॅडमिंटन रॅकेट बरी. मच्चर आणि माशी एक फटक्यात मरतील. फुलपाखरे मारायची वेळ आणि इच्छा अजून झाली नाही.

लेख छान लिहिलाय.

असा बहुमूल्य माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.
परवानगी असल्यास काही प्रश्न -

जसे माशी च्या ५-६ इंच वर हात ठेवायचा नि ५० च्या स्पीडने मारायचे तसे डासाच्या बाबतीत काय? चापट मारण्या आधी किती उंच हात धरावा, काय स्पीडने चापट द्यावी?
फुलपाखरापासून किती लांब अंतरावर उभे रहावे? किती जोरात चिमटा पुढे करून फुलपाखरू पकडावे? हाताच्या चिमट्या ऐवजी कपडे वाळत घालताना वापरतात तसा प्लास्टिक किंवा लाकडाचा चिमटा चालेल का? की फुलपाखरू पकडण्याचे चिमट्याच्या आतल्या बाजूने रबर लावलेले स्पेशल चिमटे विकत मिळतात? नसतील तर आपण लगेच एक धंदा काढू, जाहिरात नक्की करू, म्हणजे अमेरिकेत नक्की खपेल. भारतातले लोक हुषार असतात, ते नाही फसणार.

चायनिस बॅडमिंटन रॅकेट बरी.
यावर काही अधिक माहिती उपलब्ध आहे का? जसे फोरहँड की बॅकहँड. का नुसती वर नेऊन खाली आपटायची? तसेच वरील पद्धतीत ५० च्या स्पीडचा उल्लेख आहे, त्याहून कमी स्पीड चालेल का? किती कमी?
शिवाय या पद्धतीत माशी किंवा डास मेल्याचे दु:ख नाही, पण फुलपाखराला ही पद्धत योग्य नाही असे माझे मत आहे, चिरडून गेलेले फुलपाखरू बघून मला रडू येईल. तर फुलपाखरासाठी चिमटा पद्धतच योग्य असे माझे मत आहे. तुमचे मत कळवावे. धन्यवाद.

छान आहे लेख !
लहानपणी मी देखील या क्षुद्र किड्यांचा बाबत फार निर्दयी होतो. वाईट सवयच म्हणा ना ..
ईथे बघू शकता -

माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या
http://www.maayboli.com/node/57095

ईथे मी मुंग्या, झुरळ, पाली, चतुर, ऊंदीर असे कैक निष्पाप जीव कसे क्रूरतेने मारले आहे याच्या युक्त्या आणि वर्णने आहेत,

पुढे मोठा झालो. अक्कल आली. किंबहुना प्रगल्भता आली. तसे समजले की जे प्राणी आपल्याला खायचे असतात तेच मारावेत. जे खायचे नसतात त्यांना मारूही नये आणि पाळूही नये. फार तर पळवून लावावे.

तुमच्या लेखातील माश्यांचाही उल्लेख आहे,
तर नवी पोस्ट न लिहिता त्यातीलच ऊतारा ईथे देतो,

पावसाळ्यात आम्ही दादरावर सार्वजनिक पॅसेजमध्ये कॅरम खेळायचो. तिथे मोठमोठ्या माश्या घोंघावत यायच्या. बरेचश्या सुस्तावलेल्या असायच्या. त्यांना मारण्याऐवजी मी चिमटीत पकडायचो आणि कॅरमवर टांगलेल्या बल्बचा त्यांना चटका द्यायचो. हेतू हा की त्यांच्यावर माझी दहशत बसावी, त्यांनी जाऊन त्यांच्या ईतर सवंगड्यांना सांगावे की त्या कॅरमवरच्या दादाला त्रास देऊ नका, तो पकडून नको तिथे चटका देतो.
माश्यांवरून आठवले, पावसाळ्यात लोकांच्या दारात कपडे वाळत घातलेले असायचे. त्यातील नाड्यांवर माश्यांचा झुबकाच बसलेला असायचा. त्यावर मूठ मारताच एकाच वेळी किमान सात-आठ माश्या मुठीत कैद व्हायच्या. मग ती बंद मूठ कोणाच्या तरी तोंडासमोर नेऊन उघडायची. अचानक नाकातोंडावर झालेल्या भुणभुणीने ती व्यक्ती भणभणूनच निघायला हवी. पण मग कधी असा एखादा गिर्हाईक नाही मिळाला तर त्या माश्या मुठीतच जीव सोडायच्या. त्यांना मूठमातीही न देता हात झटकून मोकळा व्हायचो. एकाच वेळी सात-आठ जीवांच्या रक्ताने रंगलेले हात असा हा प्रसंग विरळाच.

ऋन्मेSSष,
धोक्याचा इशारा! मागे इथे फटाक्यांनी एकाचा हात भाजला होता. त्याचे कारण लहानपणी मुंग्यांना उदबत्ती लावून जाळले म्हणून असे झाले असे त्यांनी म्हंटले होते, नि कर्मसिद्धांताचे उदाहरण म्हणून हे लिहीले होते.

शेकडो किड्यामुंग्यांचा आपण अख्खा जीव घेतो आणि आपला मात्र फक्त एखादा अवयवच निकामी होतो... किती अन्यायकारक आहे हा कर्मसिद्धांताचा नियम. मनुष्य म्हणजे जगातला सर्वात महान सजीव हा अहंकार यातून दिसून येतो.

हाहाहाहा.... मस्तय ... चालुद्या ...

झुरळं पण पकड्लेलीत का ? त्याही टिप्स येऊ द्या

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांचे जाहीर आभार!!!

झुरळं पण पकड्लेलीत का ?
झुरळं पकडणार्‍यांना वर्षभर नुसती झुरळेच पकडत बसावे लागते, इथे येऊन लिहायला वेळ मिळत नाही.
जसे मला काहीच उद्योग नाही, मी काहीच पकडत नाही. म्हणूनच काहीतरी पकडण्याचा संपूर्ण अभ्यास करावा या हेतूने मी सर्व प्रश्न विचारले आहेत. आता डास फुलापाखरे येण्याचे दिवस आले आहेत. ते पकडण्याचा उद्योग करावा असे मनात आहे, म्हणून तयारी करतो आहे.

ह्या लेखाचे शीर्षक अगोदर 'मच्छर, माशी आणि फुलपाखरू यांची शिकार कशी करावी?' असे होते. ते मी बदलून 'हमखास शिकारीच्या माझ्या काही युक्त्या' असे केले आहे, त्याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे.

हा लेख मायबोलीवर टाकल्यापासून आतापर्यंत फक्त आठ दहाच प्रतिसाद आलेत. बरे, येथे किती वाचकांनी हा लेख उघडलाय हे समजण्याचीही सोय नाही. म्हणून मला शंका येऊ लागली की कदाचित ह्या लेखाला मी पहिले दिलेले शीर्षक तर चुकले नसेल? शीर्षक वाचूनच कदाचित वाचकांना, विशेषकरून स्त्रीवाचकांना शिसारी येऊन त्या हा लेख उघडतच तर नसतील ना?

हाच लेख मी माझ्या ब्लॉगवर सुद्धा टाकलेला आहे. तिथेही मला हाच अनुभव आला. वाचक माझा ब्लॉग तर उघडताहेत. पण इतर लेखांच्या वाचनांचीच संख्या वाढताना दिसतेय. पण ह्या लेखाची वाचनसंख्या आहे तेव्हढीच राहतेय.

माबोवरील कुमार१, यांच्या 'भुकेले आणि माजलेले' ह्या लेखातील त्यांचे पुढील मनोगत वाचनात आले. "जर लेखाचे शीर्षक वाचकाला आकर्षक वाटले तरच तो त्यावर टिचकी मारून आत शिरेल. म्हणून मी त्याबदलाचा निर्णय घेतला." म्हणून मी प्रयोग करून पाहू या उद्देशाने माझ्या ब्लॉगवरील ह्या लेखाचे शीर्षक बदलून 'हमखास शिकारीच्या माझ्या काही युक्त्या' असे ठेवले. आणि काय आश्चर्य पहा. तेथे ह्या लेखाची वाचन संख्या भराभर वाढू लागली की!!!

आणि म्हणूनच मी माबोवरील ह्या लेखाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतलाय. बघूया पुन्हा येथे कसा प्रतिसाद मिळतोय, ते!!!

{{{आणि म्हणूनच मी माबोवरील ह्या लेखाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतलाय. बघूया पुन्हा येथे कसा प्रतिसाद मिळतोय, ते!!!}}}

वाचकांची शिकार करायची ही एक हमखास युक्ती आहे.

@ कुमार१, बिपीन चंद्र, मंजूताई,
लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांचे जाहीर आभार!!!