' वारस ' (विज्ञानकथा) भाग २

Submitted by Vaibhav Gilankar on 8 April, 2017 - 09:27

' वारस ' (विज्ञानकथा) भाग १ http://www.maayboli.com/node/62272

भाग दुसरा

.....तेजस्विनीच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित गोंधळलेले भाव होते, तिला काहीच कळत नव्हते. तेवढ्यात खोलीला असलेला तो समोरचा दुसरा दरवाजा उघडला गेला, पियानोचे सूर तेथूनच येत होते. ती पण एक मोठी खोलीच होती, खोलीत मधोमध तो पियानो ठेवलेला होता आणि एक व्यक्ती त्या दरवाज्याकडे पाठ करून स्टूलवर बसून तो पियानो वाजवत होती. त्या दोघांची चाहूल त्याला लागली आणि त्याने पियानो वाजवणे थांबवले. वकीलसाहेबांनी त्याला हाक मारली, "झ्यूस!, बघ तर तुला कोण भेटायला आलंय". तेजस्विनी त्याच्याकडे पाहत होती, झ्यूस स्टुलवरून उठला आणि तो मागे वळल्याबरोबर तेजस्विनीला मोठ्ठा धक्का बसला!!

हुबेहूब मानवी शरीर, कपडेदेखील मानवासारखेच, कोट, शर्ट, पॅन्ट, शरीरावर मानवी कातडी आणि चेहरा...............……........
चेहरा अगदी जिवंत वाटावा असा, एक वेगळीच चमक त्या चेहऱ्यावर होती. एखाद्या तरुण मुलासारखा, त्यात विष्णूच्या आणि तेजस्विनीच्या, दोघांच्या चेहऱ्याची झाक होती. त्या दोघांचा चेहरा मिसळूनच जणू झ्यूसचा चेहरा बनला होता. गायकवाड तेजस्विनीचा अचंबित झालेला चेहरा पाहून म्हणाले, "मी एकदाच झ्यूसला भेटलो होतो, तेव्हा मी विष्णूला याच्या चेहऱ्यामागचं रहस्य विचारलं तेव्हा त्याने सांगितलं कि त्यांना स्वतःच मुलबाळ नाही त्यामुळे तुमची आणि विष्णूची चेहरेपट्टी (Physiognomy) मिसळून सिलिकॉन फायबर आणि पॉलीथिनच्या मिश्रणाने त्याने ह्याचा चेहरा बनवला जेणेकरून हा तुम्हा दोघांची संतान वाटेल."
तेजस्विनी बिथरून मागे मागे जाऊ लागली. वकीलसाहेबांनी तिला सावरलं, झ्यूस देखील पुढे आला आणि म्हणाला, "प्लीज मॅडम, स्वतःला सावरा, शांत व्हा. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, तुमचे पती माझे निर्माते होते, माझे पिता होते . आता मलाच तुमच्या मदतीने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे". त्याचे दिसणे आणि बोलणेसुद्धा इतके मानवी होते कि तो यंत्रमानव आहे यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. तेजस्विनी इतकावेळ काहीच बोलली नव्हती, ती झ्यूसला म्हणाली, "हे बघ झ्यूस, मी खरेतर विष्णूच्या मृत्यूला पूर्णपणे हा प्रकल्पच जबाबदार आहे असे मानले आणि ठरवले होते पण तेव्हा मला तुझ्याबद्दल किंवा तुझ्या निर्मितीमागच्या कारणाबद्दल काहीच माहित नव्हते, पण आता ज्याअर्थी विष्णूने तुला इतक्या विश्वासाने बनवले आणि स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ते पाहता मी तुझ्या वाटेत अजिबात येणार नाही. तेव्हा आता वेळ न दवडता मी तुला हि कंपनी सांभाळण्याची परवानगी देते. उद्यापासून तू कंपनीची धुरा सांभाळू शकतोस, आज तू आमच्यासोबत घरी चल, तू जरी यंत्र असला तरी विष्णूने तुला इतके मानवी बनवले आहे कि तुला एकटे ठेवणेही बरोबर वाटत नाहीये".
झ्यूसच्या चेहऱ्यावर एक यांत्रिक स्मित पसरलं पण तेजस्विनी गंभीरपणे बोलत होती. स्वतः झ्यूसने गायकवाडसाहेबांची गाडी चालवत बंगल्यावर आणली, झ्यूस आणि तेजस्विनीने गायकवाडसाहेबांचा निरोप घेतला आणि बंगल्यात प्रवेश केला. झ्यूस हॉलमध्ये इकडे तिकडे एकटक बघत फिरत होता त्याच्या यांत्रिक चेहऱ्यावर एक कुतूहल दिसत होतं. तेजस्विनीला कळले कि हा कधीच कंपनीच्या बाहेर पडला नव्हता, तेजस्विनीने वरच्या मजल्यावर एका खोलीत त्याला जायला सांगितले, झ्यूस वरती गेला, खोलीत जाऊन त्याने दार लावून घेतले. पूर्ण दिवसभर तो तसाच खोलीत दार बंद करून न जाणो काय करत बसला होता, रात्री जेवणाची वेळ झाल्यावर नोकराने तेजस्विनीला विचारले, "मॅडम, आपल्या पाहुण्यांना जेवायला बोलावू?" तेजस्विनीला त्या अवस्थेतही हसू आले. आपल्याकडे भरपूर पाहुणे आजपर्यंत आले आहेत पण हा पाहुणा मानव नाही. तिने नोकराला नाही म्हणून सांगितले, ती एकटीच जेवली आणि नंतर झोपायला गेली पण तिला एकसारखे कुतूहल वाटत होते हा अदभूत असा यंत्रमानव आपल्या नवऱ्याने तयार केला आहे, तो आता काय करत असेल? झोपला असेल? नाही... यंत्र कधी झोपतात का? मग त्याच्या निर्मात्याच्या आठवणीत गुंतला असेल? पण आठवणी तर फक्त मानवांना येतात, त्याच्याकडे जरी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तरी ती स्वप्नं पाहू शकत असतील?
विचार कर-करून ती झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ११:००वाजता झ्यूस आणि तेजस्विनी, गायकवाडांकडे गेले आणि तेथून ते तिघेजण कंपनीकडे जायला निघाले. एवढ्या पूर्ण प्रवासात झ्यूस गाडी चालवत होता, तेजस्विनी आणि वकीलसाहेब, दोघांनी हेरलं की झ्यूसचे हवाई गाडी चालवण्याचे कौशल्य खूपच उत्कृष्ट आहे. अर्ध्या-पाऊण तासात ते कंपनीच्या लँडिंग पॅडवर आले.
विष्णूच्या केबिनमध्ये ते तिघे आले, वकीलसाहेब तेजस्विनीला कंपनीच्या व्यवहारांबद्दल, कागदपत्रांत महत्वाच्या मुद्द्यांबद्दल समजावून सांगत होते पण झ्यूस मात्र केबिनमध्ये लावलेल्या विष्णूच्या फोटोंकडे, त्याला मिळालेल्या पारितोषकांकडे बघत होता. वकीलसाहेबांना वाटलं कि त्याचं 'लक्ष' नाहीये त्यामुळे त्यांनी त्याला आवाज दिला, त्यावर झ्यूस म्हणाला, "मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे गायकवाडसाहेब. मी यंत्र आहे, मला एकाच वेळी दोन तीन कामं करता येतात, तर आपण आता प्रोडक्शन विभागात जाऊया का?" वकिलांनी तेजस्विनीकडे पाहिलं, तिने होकारार्थी मान हलवली. ते तिघे प्रॉडक्शन विभागात गेले, प्रॉडक्शन विभाग पूर्णतः स्वयंचलित यंत्रांवरच चालायचं, सर्व रिऍक्टर तयार करणाऱ्या यंत्रांवर नियंत्रण ठेवणारा एक मुख्य संगणक तिथल्याच एका कॅबिनमध्ये ठेवला होता ज्याच्यावर संपूर्ण प्रॉडक्शन अवलंबून होतं. झ्यूस त्या मुख्य संगणकाजवळ गेला, वकील आणि तेजस्विनी तो काय करतो ते पाहू लागले. झ्यूसने मुख्य संगणकाच्या सीपीयूवर असणाऱ्या एका पोर्टमध्ये आपल्या मनगटावरील एक वायर काढून जोडली. तो मिनिटभर तरी तसाच उभा होता आणि तेवढ्यात प्रॉडक्शन विभागातली सर्व यंत्र लगेच सुरु झाली! अगदी अतिवेगाने आणि नव्यासारखी! मग त्याने चाचणी करणाऱ्या मुख्य संगणकातही तेच केलं, पूर्ण इमारतीतले यंत्र, दिवे चालू झाले होते. झ्यूसने एकदा त्या दोघांकडे पाहिलं; त्या दोघांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. झ्यूसने त्यांच्याकडे पाहून स्मित केलं आणि म्हणाला," माझ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जिचं नाव आहे लायटनिंग बोल्ट अल्फा (lightning bolt- α) ती स्वतः माझ्या वडिलांनी बनवली आहे, लायटनिंग बोल्टमुळेच मी स्वतः 'विचार करू शकतो'. मी ती आता या इमारतीतल्या मुख्य संगणकांमध्ये घातली आहे, आता ते सर्व संगणक माझ्या नियंत्रणावर चालतील. प्रॉडक्शन रेट वाढला आहे, तयार मालाची चाचणी आता १००% बरोबर होईल." त्यावर तेजस्विनी म्हणाली, "अरे पण आधी मागण्या तर येऊ देत, आपल्याला काही जुन्या ग्राहकांशी संपर्क साधावा लागेल." त्यावर झ्यूस म्हणाला, "त्याची काही आवशक्यता नाही मॅडम. विश्वास ठेवा, जुनेच नाही तर नवे ग्राहकसुद्धा स्वतःहूनच येतील. आता मी माझ्या वडिलांच्या कंपनीची पूर्ण जबाबदारी घेतो. तुम्हाला मी १००% खात्री देतो कि तुमच्या भविष्यच रक्षण करण्याची जबाबदारी माझी! आणि हो मॅडम, तुम्हाला जर का प्रसारमाध्यमांनी कंपनीच्या भविष्याबद्दल विचारलाच तर बिनदिक्कत त्यांना खरं काय ते सांगा." असा म्हणून झ्यूस पुन्हा आजूबाजूची यंत्रं तपासण्यात गुंतला.

का कुणास ठाऊक पण तेजस्विनीला झ्यूसवर विश्वास ठेऊ नये असंच वाटत होतं कारण झ्यूस काही केल्या एक यंत्रच होता, आणि त्याचे ते पुन्हा-पुन्हा 'विश्वास ठेवा' सांगणे तिला खटकत होते, शिवाय त्याने प्रसारमाध्यमांना सगळे काही खरे सांगण्याचा सल्ला का दिला हेही तिला कळत नव्हते पण तिने ह्या शंका पोटातच ठेवल्या कारण विष्णूने मेहनतीने उभारलेली कंपनी वाचवण्याचा दुसरा मार्गही नव्हता. आधीच त्याचे काही स्पर्धक ती कंपनी गिळंकृत करण्यासाठी टपलेले होते. झ्यूसने दिलेला सल्ला मात्र तिला काही दिवसांतच वापरावा लागला कारण झ्यूसने कंपनी सांभाळण्याच्या दोनच दिवसांनी काही मोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी स्वतः तिच्याशी संपर्क केला. त्यांना जाणून घ्यायचे होते कि कर्ज फेडण्यासाठी ती कंपनी विकणार होती कि नाही, तेव्हा तेजस्विनीने त्यांना झ्यूसबद्दल सर्व काही सांगितले तसेच आता ती कंपनी कधीच विकली जाणार नाही हेही सांगितले. त्यावर पूर्ण प्रसारमाध्यम, व्यवसायजगत आणि तंत्रज्ञानजगत हादरून गेले!!

प्रसारमाध्यमांनातर अपेक्षा असलेल्यापेक्षाही मोठी बातमी मिळाली! जगभरात सगळीकडे फक्त व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिसच्याच बातम्या येत होत्या. एक यंत्रमानव एखादा व्यवसाय सांभाळतो तरी कसा याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. काही वर्तमानपत्रांमध्ये 'पहिलावहिला प्रयोग', 'यंत्र बनवते यंत्र', 'यंत्रमानव बनला वारस' अशा हेडलाईन्स होत्या तर काहींमध्ये 'मानव ठरलेत अकार्यक्षम', 'यंत्रांची जग काबीज करण्यास सुरुवात' अशा हेडलाईन्स होत्या. काही वर्तमानपत्रांनी तेजस्विनीला वेडं घोषित केलं होत तर काहींनी तिच्या हिंमतीची दाद दिली होती. हि सर्व गडबड चालू असताना काही व्यावसायिक लोक झ्यूससाठी तेजस्विनीला वाटेल तेवढी रक्कम द्यायला तयार होते पण तेजस्विनीने भले झ्युसवर संशय घेतला असता पण आपल्या पतीची शेवटची भेट आणि त्याचा झ्यूसवर असलेला विश्वास ती व्यर्थ जाऊ देणार नव्हती. सर्वत्र झ्यूसची चर्चा चालू असतानाच आणखी एक मोठा धक्का जगाला बसला तो म्हणजे झ्यूसने त्याच्यामध्ये विष्णूने बसवलेल्या रिऍक्टरपेक्षाही प्रगत असा रिऍक्टर स्वतः बनवला होता आणि त्याला त्याने विष्णू कुलकर्णींच्या नवे पेटंट करवून घेतलं. अर्थात, हि बातमी आल्यानंतर सर्व व्यावसायिकांनी आपलं लक्ष झ्यूसवरून काढून त्या नव्या रिऍक्टरवर केंद्रित केलं कारण सर्वांनी विचार केला की 'झ्युसपेक्षा प्रगत रिऍक्टर म्हणजे आपल्या जास्त फायद्याचं असणार आणि आपली यंत्रे सुद्धा त्याने जास्त काळ चालणार'. झ्यूसने सांगितल्याप्रमाणे भरपूर मागण्या आल्या होत्या, कंपनीचा प्रॉडक्शन रेट वाढल्यामुळे मालही भरपूर तयार होता. झ्यूसने पहिले 'राजन इंडस्ट्रीज' चा कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला, त्या कंपनीचे मालक राजन देशमुख यांनी आगाऊ ३०००० कोटीही दिले!! तेजस्विनीशी चर्चा करूनच हा सर्व व्यवहार पूर्ण झाला आणि 'राजन इंडस्ट्रीज'ला रिऍक्टर्स पाठवण्यात आले. राजन देशमुख त्या नव्या रिऍक्टरच्या कार्याने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अजून ५ वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिस सोबत केला. त्यांची प्रतिक्रिया लवकरच प्रसारमाध्यमांकरवी जगभरात पोहोचली आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपापल्या यंत्रमानवांसाठी रिऍक्टर्सची मागणी व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिसकडेच द्यायला सुरुवात केली.

वास्तविक कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी २ वर्ष उरली होती पण ह्या सर्व कंपन्यांकडून मिळालेले पैसे इतके जमले होते कि हा-हा म्हणता झ्यूसने १० महिन्यात कंपनीवरील सर्व कर्ज व्याजासकट फेडून टाकलं!
तेजस्विनीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता, तिच्या पतीची कंपनी आता फक्त वाचलीच नव्हती तर ती खूप मोठी प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सबळ अशी कंपनी झाली होती!
झ्यूसच्या या अद्भुत, अलौकिक कामगिरीवर ती खूप खुश झाली होती, तिच्या मनात प्रथम असलेल्या सर्व शंका कुशंका विरून गेल्या होत्या. फक्त तेजस्विनीच नव्हे तर पूर्ण व्यवसाय आणि तंत्रज्ञानजगतातील दिग्गजांनी एका यंत्रमानवाच्या अशा कामगिरीने तोंडात बोटे घातले होती. खरेतर आता झ्यूसदेखील तंत्रज्ञान आणि व्यवसायजगतातील दिग्गजच मानला जाणार होता. अवघ्या दोन ते अडीच वर्षांत तर 'व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिस' जगातील सर्वांत श्रीमंत आणि आदर्श अशी कंपनी झाली! तेजस्विनीचे आयुष्य आता अतिशय ऐषो-आरामात जात होते, विष्णूच्या इच्छेप्रमाणे तिचे भविष्य आता पूर्ण सुरक्षित होते पण तरीही तिचे पाय जमिनीवरच होते. वार्षिक उत्पन्नातले ५००० कोटी ती जगभरातल्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि जेवण मिळण्यासाठी, बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी आणि गरिबांना रहायला घरे मिळण्यासाठी दान करायची. तिचीही गणना आदर्श व्यक्तींमध्ये झाली होती. सर्वकाही चांगलं चाललेलं होत...आणि मग....
Part 2 Finish(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः :-(लवकर टाका पुढील भाग, उत्सुकता वाढलीय.

अरे वाह !! २रा भाग इतक्या लवकर आलासुद्धा . मस्त Happy
आभारी आहे . छान कथा आहे
खूप उत्सुकता आहे आता पुढील भागांबद्दल , पुलेशु

छान आहे.
काही तपशील वाचून "I, Robot" या ईंग्रजी सिनेमा ची आठवण झाली.

आधीचा एक भाग देखील वाचला.
फार अप्रतिम नृत्य आपल्या लेखणीतून कथा सादर झालेली आहे. कथा वाचायला जरा उशीरच झाला असला तरी, कथा तितकीच अपडेटेड वाटत आहे./strong>