मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by अदित्य श्रीपद on 4 April, 2017 - 06:10

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव), न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काही काळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही ही अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविकदृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालय असे समजून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर ही रक्कम वाढते. नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला की,

तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या. २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची! लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार की ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागदपत्र वगैरे सोपस्कार झाले. बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला की त्याची विश्वासार्हता संपते). आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून…जाऊ दे…) माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने- मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला सांभाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र )! आता आम्ही दोघेही गचकलो..! आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळं सगळं पूर्ण केलं. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला.

कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती. त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोड नावाच्या समाजसेवकाने सांगितले की

मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर(यशोदा-नंदासारख) म्हणून मुलगी तुमच्याकडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत की गाडी उचलून नेतात तसे.)

शिवाय त्याची अपेक्षा होती की त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी. नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या एका रिटायर्ड नायब तहसिलदाराच्या मुलीचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे). मी म्हटले, “देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार”, तो आढेवेढे घेऊन तयार झाला…हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत की काय? आमची आपली मनाची एक समजूत झाली अन काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली. ती तारीख होती ८ मार्च २०११- जागतिक महिला दिन, पण हा मात्र खरोखर एक योगायोग होता. राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले.

मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात ही केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बलाच..!) नेहमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची ही पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत? त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची!). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला,

सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या. पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो.

म्हटलं,

१०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.

पण न्यायाधीश महाराजांना काय सुरसुरी आली काय माहित? आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त! आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढंच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर? नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो,

तुम्ही म्हटलात १०.३० ला या आम्ही १०.०० वाजताच आलो. तुम्ही म्हटलात १० मिनिटात मोकळं करतो आता ५ तास होऊन गेले ३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ५-५,६-६ तास उभे राहतो. तुम्हाला काही लाज वाटत नाही ?असं आणि काय काय बोललो असेल
वकील शांतपणे म्हणाला,

माझ्यासमोर काय चिडायचं ते चिडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही. बघा बुवा!

झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा ही मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो. जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हत. पण अचानक मिहीकाने (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले. (माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले,

अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?

घ्या! आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त.

जज म्हणाला, ( sorry म्हणाले)

हा, घ्या ह्यांचे पेपर्स…काय करता तुम्ही?

मी म्हणालो,

टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.( आपण साध्या लोकांनी जज ला मिलाड , युवर ओनर वगैरे म्हणायची गरज नसते साधे साहेब किंवा सर पुरते.)

जजने विचारले,

टाटा मोटर्स, ते काय आहे?

(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो.-हे आम्ही मनात)

सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे....

बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?इति जज

(वा काय प्रश्न आहे!)

नाही सर, नीट सांभाळू.- मी

अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?

आता याचं काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं,

नाही नाही , नीट सांभाळू.

पण टाकली तिला तर, तिने काय करायचे? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?

हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले,

नाही ठेवले

मग ठेवले पाहिजेत की नाही? किती ठेवाल? – जज म्हणाला ( sorry म्हणाले)

म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे

जज म्हटला, ( sorry म्हणाले)

ठीक आहे. १८ वर्षांसाठी १ लाखाची FD करा तिच्या नावाने, पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा.( का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात!) आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना.(हुश्श!)

आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही...असो!
जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

आता ही FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला, तर ते म्हणाले जास्ती जास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते सुद्धा सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले.

FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे. बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे, त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली.( नशीबाने ह्यावेळी मुलगी बायको असे लाटांबर न्यायाची गरज पडली नाही )तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला! तो काढायचा आणि बाप म्हणून माझे नाव लावायला पाहिजे ना! म्हणून गेलो नांदेड महानगर पालिकेत तर , तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते, हे अनाथाश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही.) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले, नांदेडच्या तहसीलदाराचे न हरकत प्रमाणपत्र, आता ते आणि कशाकरता लागते ?असले प्रश्न विचारायचे नाहीत (नायब तहसील दाराने तर आम्ही खरेच मुलगी दत्तक घेतली आहे का ते सुद्धा विचारले नाही.फक्त कोर्ट ओर्डर बघितली आणि त्याची एक प्रत आणि ेआमचा अर्ज ठेऊन घेतला पण ४ खेट्या आणि ५ दिवस लावले ) अन इतर असले सगळे सोपस्कार केले. त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम पूर्ण केले. सगळे सोपस्कार होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, घ्या “झालं सगळ तुमच काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” जसं काही ह्या बाईनेच सरकारी कार्यालयात खेट्या घालून चपलेच्या टाचा झिजवल्या होत्या. एरवी मी चिडलो असतो. काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांचं birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपणा नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे हा – biological child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, तसे आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता. शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली, तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटतं!
तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तु शिकव मला आता तुला ९ महिने पोटात वाढवलय…वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.
----आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूल लहान असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण मोठे म्हणजे ३ वर्षाच्या वर असेल तर सूर जुळायला वेळ लागतो आणि क्वचित जर १०-१२ वर्षाच्या वर असेल तर समुपदेशकाची मदत लागतेच लागते. आई बाबा जर जास्त वया चे असतील तर त्यांना लहान मूल दत्तक देत नाहीत. त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज ८० पेक्षा अधिक नसावी. अन्यथा मग मोठे मूल दत्तक घ्यायचा सल्लादिला जातो . पण नाते संबंधात दुरावा हा येतोच. मुलाला ते दत्तक आहे हे सांगायचे कि नाही हा सर्वस्वी आई बाबांचा प्रश्न असतो , पण शक्यतो सांगावे. साधारण १२-१३व्या वर्षांपासून हळू हळू कल्पना द्यावी अशा मताचा मी आहे, पण काय वाट्टेल ते झाले तरी मुलाला त्याच्या नैसर्गिक माता पित्यांची माहिती कळत नाही. कळू शकत नाही . ती संपूर्ण कागदपत्रे नष्ट केली जातात.

<<१समजा मुलाचे आईवडील दारिद्र्यामुळे अथवा / आणि त्यांच्या पालनपोषणाच्या क्ष्मतेहून अधिक मुले असल्यामुळे मूल दत्तक देत असतील
२आई किंवा वडील यांच्यापैकी एकजण हयात नसल्यास दुसरा मुलास दत्तक देऊ करत असेल
३आई व वडील दोघेही हयात नसल्याने मुल दत्तक दिले जात असेल >>>
पहिल्या दोन प्रकारात नैसर्गिक पालक हयात असल्याने साधे सरळ दत्तकविधान करून ते कोर्टात रजिस्टर करून हे करता येते . जी काय थोडीफार फी असेल ती भरावी लागते पण हे करावे जरूर आणि त्यात सगळ्या बाबी ( खऱ्या आई बाबांची ओळख सांगणे / न सांगणे , शिक्षण, वारसा हक्क इ.)असू द्याव्यात . तिसर्या प्रकारात आई वडील दोघेही हयात नसल्यावर कुणा नातेवाईकाला त्या मुलाचे कायदेशीर पालकत्व आधी (legal guardianship ) कोर्टातून घ्यावे लागते ( ती अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे त्या ऐवजी एखाद्या सरकारमान्य विश्वस्त कंपनीशी- उदा. The Maharashtra Executer and trustee co ltd, pune) करार करून त्या मुलाचे पालकत्व त्यांना देऊन आपण म्हणजे सदर नातेवाईकांनी त्याचे सदस्य व्हावे. म्हणजे त्यामुलाच्या शिक्षण, इलाज, जेवण खाणे चा खर्च वैद्यकीय खर्च , वारसा हक्काने मिळालेल्या संपतीची सोय ते अगदी दत्तक देणे व नंतरची त्या मुलाची काळजी वगैरे सर्व बाबींची व्यवस्थित सोय लावता येते पण हा मामला थोडा खर्चिक असतो... पन ते बरे पडते) आणि मग तो इच्छुक व्यक्तीला मूल दत्तक देऊ शकतो तरीही दिवंगत माता पितरांच्या संपत्ती वरचा मुलाचा हक्क अबाधित राहतो.
ह्यावर आणखी एक उपाय असतो. तो म्हणजे अशा प्रकारे अनाथ झालेल्या मुलाला दत्तक घ्यायची इच्छा जे पालक व्यक्त करतात त्यांनीच त्या मुलाचे कायदेशीर पालकत्व घ्यावे आणि इतर नातेवाईकांकडून त्या संबंधात ना हरकत अनुज्ञप्ती घ्यावी... हे करताना सगळ्या बाबी नजरेखालून घालणे हि जबाबदारी नातेवाईकांचे असते. शिवाय काही झाले तरी विश्वस्त कंपनीत त्या मुलाच्या नावाने ठराविक रक्कम ठेवून उद्या कदाचित हे पालक निर्वतले किंवा त्यांना ते मूळ नकोसे झाले तर त्या मुलाची सोय लावता येईल

जबरदस्त प्रयत्न! अभिनंदन. जोपर्यंत मूल असण्याची तीव्र आस नसेल तोपर्यंत इतके प्रयत्न शक्य नाहीत.
कितीही प्रोसिजर समजून घेतली आणि वेळ लागणार हे गृहित धरले तरी मनस्ताप होणे थांबत नाही, कारण तो त्या प्रक्रियेमुळे नव्हे तर तुम्हाला गुन्हेगार समजूनच जी वागणूक मिळते त्यामुळे होतो. माझी भावना सच्ची असतानाही मला हे सर्व का सिद्ध करावे लागत आहे याचा त्रास जास्त. पण तो सच्चेपणा मोजण्याची कोणतीच यंत्रणा न्यायालय वा इतर कुठे अस्तित्वात नाही हाच तिढा आहे.

आदित्य.. पण आपण तर बरेचदा पेपर मधे वाचतो की जर्मनीहून अथवा नेदर लँड्स हून कुणी मुलगी आली आपल्या ओरीजीनल आई ला भेटायला २० वर्षांनी वगैरे....

त्यांना कसा काय पत्ता लागतो बायॉलॉजीकल आईबापांचा? तुम्ही तर म्हणताहात की कागदपत्रे जाळून टाकतात वगैरे.....

आदित्य जी, तुमचे कौतुक करावे तितके थोडेच अन तुम्ही हा अख्खा भयावह अनुभव मॅटर ऑफ फॅक्ट घेतला.
त्या नालायक न्यायाधिशाला जोडे मारले पाहिजेत. किती असंवेदनशील !!!

{{{ मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? }}}

आता ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येऊ नये असे वाटत असेल तर मी विचारलेले प्रश्न आणि त्याला धागालेखक आणि लिंबूटिंबू यांनी दिलेली उत्तरे पाहता एक सुलभ पद्धत सुचवावीशी वाटते.

ज्यांना मूल दत्तक पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशी एक सविस्तर जाहिरातच वर्तमानपत्रात द्यावी. म्हणजे मुलगा हवा की मुलगी? वय किती असावे इत्यादी. आता या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून एखादे प्रामाणिक अनाथालय किंवा एखाद्या मुलाचे गरीब आईवडील / नातेवाईक / पालक जाहिरातदारास संपर्क साधतील. त्यांचा खरेपणा तपासून पुढे कायदेशीर कटकटी निर्माण होऊ नयेत अशा बेताने सुलभ प्रक्रिया पार पाडणे जिथे चटकन जमेल असा पर्याय स्वीकारावा आणि मूल दत्तक घ्यावे.

छान लिहिलंय .
किती गोड आहे मिहिका .
तिला आणि तुम्हा उभयतांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

चांगला लेख. सरकारी खाकीपणाचे वास्तव अगदी योग्य लिहीले आहे.
अर्थात कहाणीचा शेवट गोड आहे. त्यामुळे ते मनस्ताप आता विसरले जातील.

माझ्या माहितीतील जाणीवपूर्वक दत्तक घेणाऱ्या दोन भावांची कथा सांगतो.
मोठ्याला स्वताची एक मुलगी झाली. नंतर त्या जोडप्याने असा विचार केला. दुसरे मूल स्वताचे नको कारण लोकसंख्या वाढीला आपल्याकडून अजून हातभार नको. पण, मुलीला भावंड तर असावे वाटले. म्हणून दुसरे अनाथालयातून दत्तक घ्यायचे ठरले. आता ते मुलगा की मुलगी? तर मुलगीच ठरले कारण तेथील मुलग्यांपेक्षा मुलींचे भवितव्य अधिक बिकट असते असे त्याचे मत. मग मुलगीच दत्तक घेतली. आता हे चौकोनी कुटुंब सुखात आहे.
धाकट्याने मोठ्याचाच आदर्श ठेवून एक पाउल पुढे टाकले. तो म्हणाला की पहिले मूल तरी स्वताचे कशाला हवे? नकोच आपल्याकडून लोकसंख्येत भर. त्यामुळे त्याची एकमेव मुलगी ही दत्तक घेतलेली आहे. हे त्रिकोणी कुटुंबही मस्त जगते आहे.

या दोघांबद्दल मला खूप आदर वाटतो.

धाकट्याने मोठ्याचाच आदर्श ठेवून एक पाउल पुढे टाकले. तो म्हणाला की पहिले मूल तरी स्वताचे कशाला हवे?>>>१+

सीम्पली ग्रेट

{ज्यांना मूल दत्तक पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशी एक सविस्तर जाहिरातच वर्तमानपत्रात द्यावी. म्हणजे मुलगा हवा की मुलगी? वय किती असावे इत्यादी. }

लग्नाच्या जाहिरातीत जातीचा उल्लेख लोकांना समर्थनीय वाटतो. या दत्तक साठीच्या जाहिरातीत जातीचा उल्लेख जातीयवादी ठरेल की नाही असा विचार मनात आला.
अवांतराबद्दल क्षमस्व

व्यत्यय,
तुमचा मुद्दा मला व्हॅलीड वाटतो,
तुम्ही या धाग्याचा संदर्भ देऊन "लग्नाच्या जातीसापेक्ष जाहिराती" वर हा प्रश्न विचारणे जास्त संयुक्तिक ठरेल असे वाटते.

<<<<आदित्य.. पण आपण तर बरेचदा पेपर मधे वाचतो की जर्मनीहून अथवा नेदर लँड्स हून कुणी मुलगी आली आपल्या ओरीजीनल आई ला भेटायला २० वर्षांनी वगैरे....
त्यांना कसा काय पत्ता लागतो बायॉलॉजीकल आईबापांचा? तुम्ही तर म्हणताहात की कागदपत्रे जाळून टाकतात वगैरे.....>>>
अशा केसेस मुळेच पुढे हा कायदा झाला. मला नक्की नाव आठवत नाही पण एक मुलगा जो जर्मनीतील पालकांनी दत्तक घेतला होता त्याला त्याच्या आईची माहिती मिळाली आणि तो तिला जाऊन भेटला आणि त्या आईचे पूर्वायुष्य माहित नसलेल्या , चांगल्या व्यवस्थित संसारात ह्यामुळे वादळ निर्माण झाले. आमच्या वकिलानेच हि गोष्ट सांगितली....पण आता मात्र काहीही झाले तरी मुल मात्या पित्यांचे नाव काळात नाही... उत्सुकतेपोटी मी अनाथालयात मिहिकाच्या आईचे नाव पहायला मिळेल का विचारले पण त्यांनी सांगितले नाही रजिस्टर मध्य आईच्या नावाच्या जागी संस्थेचे नाव होते....

खूप छान लेख लिहिला आहे. तपशीलातून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

इथे अनेक जणांचा सरकारी प्रक्रियेबद्द्लचा आणि न्यायाधिशांच्या संवादाबद्दल तक्रारीचा सूर वाटतो आहे. तुम्हाला दिलेली वेळ न पाळणे , उगीच पुन्हा पुन्हा चकरा मारायला लावणे याबद्दल त्रास होणे आणि राग येणे साहजिकच आहे.

पण व्यक्तिशः मला न्यायाधिशांनी तुम्हाला विचारलेले प्रश्न वाचून खूप बरे वाटले आणि भारतीय न्यायपद्धतीबद्दलचा आदर थोडा वाढला. सरकारी लालफितीतल्या काही नियमांबद्दल नव्याने आदर निर्माण झाला.
१) दत्तक घेऊन मुलांचा (आणि विशेषतः मुलिंचा) वाईट वापर करून घेणार्‍या अनेक केसेस पूर्वी झाल्या आहेत. काही वेळेस नवीन पालकांनी त्या मुलांना गुलामासारखे वागवले आहे. तुम्ही असे करणार नाही हे तुम्हाला कितिही ठामपणे वाटत असले तरी न्यायव्यवस्थेने सगळ्यांना एकाच पद्धतीने पाहणे आवश्यक आहे.
२) सगळीच दत्तक मुले नवीन घरात रुळतीलच असे नाही. काही वेळेनंतर पालकांना पश्चाताप होऊ शकतो. त्यासाठी मुद्दाम काही महिने दिले जातात. "बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?" हा न्यायाधीशांचा प्रश्न चुकीचा वाटत असला तरी प्रत्यक्ष घडलेल्या केसेस चा इतिहास पाह्ता तो योग्यच वाटतो.
३) आज पोटचे मूल असतानाही , आई वडील घटस्फोट घेताना मुलांचा विचार करतीलच असे नाही. उदा. मुलाला/मुलीला काही आजन्म व्याधी निघाली तर त्याची कस्टडी दोघानाही नकोशी असू शकते. इथे जर दत्तक मुलाला तशी व्याधी निघाली तर त्याच्याकडे कोण बघणार.
४) ज्यानी जन्म दिला ते दोघेही आईवडील अकाली निवर्तल्यावर इतर नातेवाईकांनी मुलांची काळजी घेण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या समाजात आहे. इथे तर हे मूल दत्तक असणार आणि नातेवाईकांना थोडासाही भावनीक बंध नसणार.
५) अनेक देशात (हो आपल्याही भारतातही) दत्तक घेऊन मुलांना वाममार्गाला लावले अशी उदाहरणे आहे. इतर काही देशात अतिरेकी बनवले आहे. अमेरिकेतही "बाहेरच्या देशातून मुलांना दत्तक म्हणून आणून त्यांना वाममार्गाला लावणारी टोळी पकडली" अशा बातम्या वर्षातून १-२ तरी असायच्या. आता बहुतेक सगळ्या देशानी , देशाबाहेर मूल दत्तक देण्याअगोदर तपासण्यासाठी जास्त कडक नियम किंवा काही बाबतीत बंदी घातली आहे.

आता हे वाचल्यावर , पुन्हा लेख वाचून पहा आणि त्यातले कित्येक नियम का आहेत, त्याचा मुलांच्या सरक्षणासाठी कसा फायदा होत असावा हे तुम्हाला कदाचित वेगळ्या नजरेतून दिसेल.
(मी काही वर्षे अनेक न्यायाधिशांच्या शेजारी रहात असे आणि अशा अनेक केसेस ऐकल्या आहेत. याच क्षेत्रात काम करणार्‍या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला यामागची कारणे आणि इतिहास समजून शकेल).

अजय +1. मलाही न्यायाधिशांचे प्रश्न खटकले नाहीत. आणि मुलांच्या नावे एफ डी करायला सांगणे प्रोसिजरचा भाग आहे.

अजय यांची पोस्ट पटली. त्यांची पोस्ट वाचून लेख परत वाचला तेव्हा मलाही न्यायाधीशाचे काही चुकले असे काही वाटले नाही. खरतर सरकारी नियम/काम म्हटले की आपल्या मनात काहीसं निगेटिव्हपणा येतो . तस काहीसं झालं असावं .सगळ्या प्रोसिजर फॉलो करून घेतल्या गेल्या हे उत्तम. अजयनी म्हटल्याप्रमाणे काही गैरफायदा घेण्याऱ्याना आळा बसण्यासाठीच हे नियम बनवले आहेत .

अजय तुम्ही जर मागील प्रतिक्रिया वाचल्यात तर तुम्ही मांडलेल्या बहुतेक मुद्द्यावर उहापोह झालेला आहे असे दिसून येईल. न्यायाधीशांनी प्रश्न विचारणे मला अशाकरिता खटकले कि ह्या सर्व आणि ह्याहुनही अधिक बाबी तपशीलात जाऊन समाजसेवकाच्या सर्च रीपोट मध्ये आलेल्या असतात. न्यायाधीशांच्या सहाय्यकाने त्याची शहनिशा करायची असते. दुसरा मुद्दा हे सगळे सोपस्कार कौटुंबिक न्यायालयात होउ शकतात त्याकरता सत्र न्यायालयात जायची गरज नसली पाहिजे. त्याबाबतीत होणार त्रास लिहिला आहेच फक्त न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देऊ नका संपूर्ण लेख जमे ला धरावा हि विनंती आणि मला आलेले अनुभव आणि त्यावरची मते मी मोकळेपणा ने मांडली आहेत मला जर एखादी गोष्ट खटकत असेल तर तसे मांडायचा मला अधीकार आहेच, नाहीका ?
तक्रार न्यायाधीशाबद्दलच आहे, प्रक्रिया बदलली आहे असे म्हणतात - वैयक्तिक अनुभव नाही. एखाद्याने कटकट केली म्हणून त्याला वर्षानुवर्षे खेट्या घालायला लावणे ह्यात नक्की न्यायाधीशांचा कोणता उदात्त हेतू असू शकतो ? तुम्ही तुमच्या पद्धतीने संगती लावून सांगा. मला तर हा कोत्या मनोवृत्तीचा भाग वाटतो. आणि आम्ही देखील ६-७ तासांच्या खोळंब्यानंतरही न्यायाधीश आणि न्यायालयीन प्रक्रियेचा मान ठेवण्यासाठी नाही तर त्यांच्या उपद्रवमूल्याला घाबरूनच गप्प बसलो....
आणि जर का नियम गैर फायदा घेऊ नये म्हणून बनवत असतील तर त्यांचा काडीचाही उपयोग नाही कारण एकदा मूल दत्तक दिल्यावर अनाथालय( काही सन्माननीय अपवाद वगळून)परत तिकडे ढुंकून ही पाहत नाही. त्याबद्दल न्यायालय त्यांना खडसावून विचारात नाही. आमची दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याला आज साधारण ४ वर्षे होत आली आहेत, पहिल्या वर्षीचे एक दोन फोन सोडले तर आजतागायत अनाथालय, समाजसेवक आणि माननीय न्यायालयाने मिहिकाची काहीही दाखल घेतली नाही कि आम्ही तिला कसे वाढवतो आहोत, काही गैरप्रकार तर करत नाहीना? ह्या बाबतीत नियम आहेत पण ते सरसकट पायदळी तुडवले जातात.(आम्ही मिहिकाची काळजी नीट घेत आहेत ना हे पाहण्याची जबाबदारी अनाथालयाची आहे. तसे त्यांना आपण होऊन दाखवण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही साधारण वर्ष दोन वर्षातून तिकडे जातो आणि अनथालयाला भेट देऊन तिथल्या मुलांना खाऊ कपडे इ. देतो पण प्रत्येक वेळी मिहिका बरोबर नसते )
आणखी एक , कुणी जर हां लेख वाचून मुल दत्तक घेण्याच्या विचारापासून परावृत्त झाला तर मला अत्यंत दु:ख होईल, त्या निष्पाप मुलाला तुमच्या मदतीची अत्यंत निकड आहे. सुरुवातीला हा शासकीय त्रास जरी पालकांना होत असेल तरी कुणी जर दत्तक नाही घेतले तर मुलांना ह्या पेक्षा भयंकर अन्यायाला सामोरे जावे लागू शकते, नव्हे लागतेच तेव्हा ज्यांना मनातून असे काही करायची इच्छा आहे त्यांनी दृढ निश्चय करून आणि कंबर कसून तयारी करा. आतापर्यंत हा लेख मी फेस बुक, मिसळ पाव ,मराठी पिझा जिथे जमेल तिथे टाकलेला आहे. अनेक ( अनेक नाही, खरेतर एकूण५ जणांनी) ह्यावरून मुल दत्तक घेण्याचा आपण निर्णय घेतल्याचे कळवले आहे ३ लोकांनी खरोखर घेतल्याचे कळले आहे. १ जणतर परदेशात आहेत आणि त्यांना परदेशस्थ नागरिकाना मुल दत्तक घ्यायचे असेल तर कसे घ्यायचे ह्याची माहिती हवी होती , त्यांना जमेल तशी मदत ही करत आहे . पण फार म्हणजे फार गुंतागुंत आहे ( काय सांगू , भारत सरकार निरोगी मुल परदशी स्थित नागरिकांना दत्तक घेऊ देत नाही किंवा फार जास्त त्रास देते ,( म्हणून अनाथालय निरोगी मुल हे अपंग आहे असे खोटेच दाखवतात कागदोपत्री पण परदेशातील सरकार व्यंग असलेले मुल सहजासहजी दत्तक घेऊ देत नाहीत . भयानक त्रांगडे आहे ) जे काही बेकायदेशीर कृत्य करणारे, असतात ते ह्या प्रक्रियेत पडताच नाहीत सरळ पैसे चारून मुल घेऊन जातात . पण कायदेशीर मार्गाने जाणरे पापभिरू सन्मार्गी लोक विनाकारण छळ सोसतात.

जे काही बेकायदेशीर कृत्य करणारे, असतात ते ह्या प्रक्रियेत पडताच नाहीत सरळ पैसे चारून मुल घेऊन जातात . >> म्हणजे काय?? नीट समजलं नाही. अनाथाश्रमातून मुलांना दत्तक घेताना कायद्याची/ कागदपत्रांची पूर्तता करावीच लागत असेल ना?? मग फक्त पैसे देऊन मुलं कसं काय घेऊन जाता येईल??

@ निधी ताई , अहो सरळ पैसे देऊन मूल नेतात, कागदपत्र काही नाही. न्यायाधीशांसमोर केस जातच नाही. सगळे मॅनेज केले जाते .... अनाथालयच का सरकारी दवाखान्यातून मूल पळवतात, आई बाप असताना , ते गरीब बिचारे पोलीस स्टेशनात थोडाकाळ खेट्या घालतात , काही दाद लागत नाही हे पाहून , आपले नशीब! म्हणून पोट पाण्याच्या उद्योगाला लागतात .... कमाल आहे तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारांची कल्पना नाही ?

अदित्य श्रीपद हे स्वतःला काहीतरी विशेष समजत असा वेत किंवा आम्ही मूल दत्तक घेतो आहोत म्हनजे जगावर उपकार करीत असल्याने आम्ही कायद्याच्या वर आहोत आणि आम्हाला सामन्य माणसाप्रमाणे वागवू नये असा काहीतरी त्यांचा गंड असावा असे वाटते.

माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही.>>
अजय! बाकी कोर्ट प्रोसिजर जरुरी असण अगदी व्हॅलिड आहे पण या उदाहरणाबाबत मात्र ते जास्त नाही झाले? ७ वर्श?
आपल्याकडे सरकारी काम, कोर्टाची काम याचा अनुभव सुखद नसणे हे क्रमप्राप्त असल्यासारखे असते , कुठेही सामान्य पब्लिकला कफर्टेबल वाटल तर रोज कोर्टात येवुन बसतील अशी भिती असते बहुधा.

आणखी एक , कुणी जर हां लेख वाचून मुल दत्तक घेण्याच्या विचारापासून परावृत्त झाला तर मला अत्यंत दु:ख होईल,>>> आधिच्या प्रतिक्रियेत लिहणार होते पण आता लिहते, शिर्षिकापासुन हा लेख (अनाथ) मुल दत्तक घेणे म्हणजे एक किचकट प्रोसेस असल्याचा फिल देतो त्यामुळे पुर्ण लेखाचा सुर ( शेवटचा पॅरा आणि फोटो वगळता) अकारण निगेटिव्ह लागलाय.

अदित्य श्रीपद हे स्वतःला काहीतरी विशेष समजत असा वेत किंवा आम्ही मूल दत्तक घेतो आहोत म्हनजे जगावर उपकार करीत असल्याने आम्ही कायद्याच्या वर आहोत आणि आम्हाला सामन्य माणसाप्रमाणे वागवू नये असा काहीतरी त्यांचा गंड असावा असे वाटते.
असे तुम्हाला का वाटते हे मला कळले नाही पण ह्या केसेस कौटुंबिक न्यायालयात चालाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि नंतर तशी मागणी केलेली आहे. माझी पत्नी आहामाद्नागाराच्या रिमांड होम च्या मुलांसाठी नंतर काम करीत असताना ह्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत पण अर्थात त्याला फळ यायला वेळ लागेल , शिवाय मुंबईच्या न्यायाधीशांच्या ट्रेनिंग कॉलेजात एक तिने एक सेशन ही घेतला होता त्यात हा आणि असे मुद्दे विचारार्थ घेतले गेले, पाहू पुढे काय होते . असो मी आता ह्या विषयावर प्रतिक्रिया देणे थांबवतो आहे . आपणा सर्वाना जर ह्यातून खूप निगेटिव फिलिंग येत असेल तर क्षमस्व, आपण सांगितले तर मी हा लेख इथून काढून टाकतो म्हणजे कुणाला ह्यामुळे दत्तक घेण्यापासून परावृत्त व्हायला नको...पुन्हा एकदा मनापासून दिलगीर आहे.
---आदित्य

हा लेख वाचल्यापासून मला माझ्या वडिलांची प्रतिक्रिया वा या लेखावरील मत मागायचे होते. ते अनाथालय व या दत्ताकविधान प्रक्रियेशी अनेक वर्षे जवळून संबंधित आहेत. ही प्रतिक्रिया त्यांचे मत म्हणून पाहावी. त्यांनी या लेखाखालील प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत.
हा लेख वाचून एका तटस्थ वाचकाने दिलेली प्रतिक्रिया समजा.

+++++++++++++++++++++++++++

मूल दत्तक घेणे या संदर्भातील गैरप्रकार, , भ्रष्टाचार वगैरे बद्दलची तक्रार अंशतः खरी आहे. पण एकंदर लेख 'लाऊड' आहे.

मी अनेक वर्षे या विषयाशी सामाजिक कार्यकर्ता आणि वकील म्हणून संबंधीत आहे. मला एकाही केसमध्ये एकाही जज्जकडून असा अनुभव नाही. प्रत्येक काम दाखल केल्या पासून सहा महिने ते एक वर्षात पूर्ण झाले. फक्त दोन किंवा तीन वेळा पालकांना व मुलाला यावे लागले. योग्य प्रकारे पूर्तता केली तर मूल पहिल्या-दुसर्या भेटीत पालक अनाथालयातून नेऊ शकतात. कोर्टातील काम नंतर 6-8 महिन्यात पूर्ण होते.

आता केन्द्र सरकारने 2016 पासून लागू केलेल्या नवीन CARA guidelines नुसार सर्व काम centralised केले आहे. अनाथालयाला मुलाची माहिती त्या साईटवर upload करावी लागते. ती इच्छुक पालकांना open and easily accessible असते. भारतातील कोणत्याही आश्रमातील उपलब्ध मूल कोणीही online बघू व फाॅर्मली क्लेम करू शकतो. नंतर दिलेल्या अल्प मुदतीत समक्ष पाहून दत्तक घेऊ शकतो. अर्थात इतर (वय, health, इ.) criteria पूर्ण करत असेल तरच. अनाथालय कोणाला नाकारू किंवा परस्पर देऊही शकत नाही. भ्रष्टाचार व गैरप्रकारांना वाव नाही. ही माहिती थोडक्यात दिली आहे. इच्छुक पालकांनी योग्य व पूर्ण माहिती स्वतः घ्यावी, नाउमेद होऊ नये.

मूल दत्तक घेणे ही गोष्ट इतक्या लाईटली घेऊ नये.

हे, इतर सर्व प्रयत्न करून थकल्यावर मूल दत्तक घेणारे पालक आधी डॉक्टरकडे किती पैसे खर्च करतात, हेलपाटे घालतात, चित्रविचित्र अनुभव घेतात? नैसर्गीकपणे मुलाला जन्म देणारे किती व्यापताप सहन करतात? इथे तुमचे नसलेले, संस्थेने सांभाळलेले एक जिवंत मूल शासनाने स्वतः जबाबदारी घेऊन तुम्हाला द्यायचे आहे. ही सामान्य वाटली तरी सामान्य बाब नाही याचे भान ठेवले पाहिजे.

प्रश्नाला इतर अनेक बाजू आहेत पण सर्वांचा तपशील देणे मोठा विषय आहे. एखाद्याला आलेला व्यक्तीगत अनुभव खेदजनक असेल पण त्याचा फार मोठा बाऊ करणे टाळावे. थट्टा - टिंगल करू नये. या व्यवस्था आणि कारदेशीर यंत्रणा आवश्‍यक आहेत.

थोडक्यात, नियम आणि पध्दत असणे आणि त्यातून जाणे आवश्यक आहे. तो अन्याय समजू नये. तुम्हाला एक तुमचे नसलेले मूल कायमसाठी तुमचे कायदेशीर मूल म्हणून मिळणार आहे ही लहान बाब नाही.

खूप टचिंग लेख.
==================
पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका. >>>>>>>> म्हणून मला बर्‍यापैकी सगळे क्रीम भारतीय लोक परदेशात स्थिरावल्याचं सतावतं. हे हाय एनर्जी मोलेक्यूल्स इथे असते, तर इथल्या व्यवस्था (सेवा देणारे वा घेणारे म्हणून ) आहेत त्या पेक्षा शतपट चांगल्या असत्या.
============
मिहिकेला आशिर्वाद.

संस्था एच आय व्ही बाधित नसलेल्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी एच आय व्ही बाधित दाखवते किंवा अपंग नसलेल्या मुलाला अपंग दाखवते , असा वरच्या लेखात उल्लेख आहे. मला तरी तो अतिशयोक्त वाटतो.. हे इतके सोपे नसते. एच आय व्ही / अपंगत्व यांचे दाखले असे सहजासहजी मिळत नाहीत .. शिवाय अशा मुलांवर संबंधित सरकारी डिपार्टमेंटची नजर असते.
शिवाय एच आय व्ही रिपोर्ट हा गोपनीय असतो. दुसर्‍या कुणाचाही रिपोर्ट तिसर्‍या मनुष्याला विनाकारण दिला जात नाही. जवळच्या एआर्टी सेंटरवरुन त्याची नियमित तपासणी व लागेल तशा तपासण्या व उपचार होत असतात.

तपासण्या व उपचार सरकारी दवाखान्यात फुकट उपलब्ध असतात. त्या सगळ्याचे काटेकोर रेकॉर्ड ठेवावे लागते.
क्वचित प्रसंगी एखाद दुसरी तपासणी , औषध बाहेरचे दिले तर त्यालाच त्यांच्याकडे पैसे नसतात. मोठ्या सिव्हिल हस्पिटलात पाठवायची वेळ आली तर यायला जायला पैसे नसतात .. शिवाय अशा मुलाबरोबर संस्थेचा एखादा मनुष्यही बरोबर असावा लागतो, त्याचे येणेजाणे - तो खर्च वेगळाच .
मदत म्हणून दहा वीस दिवसांचे रेशन , वह्यापुस्तकांचा खर्च / किंवा वस्तू रुपात मदत ... फार्फार तर इतकेच मिळते.
एच आय व्ही आहे, म्हणून त्या मुलाला लाखाचे घबाड भेटणार नसते.

Pages