मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by अदित्य श्रीपद on 4 April, 2017 - 06:10

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव), न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काही काळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही ही अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविकदृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालय असे समजून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर ही रक्कम वाढते. नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला की,

तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या. २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची! लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार की ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागदपत्र वगैरे सोपस्कार झाले. बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला की त्याची विश्वासार्हता संपते). आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून…जाऊ दे…) माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने- मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला सांभाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र )! आता आम्ही दोघेही गचकलो..! आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळं सगळं पूर्ण केलं. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला.

कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती. त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोड नावाच्या समाजसेवकाने सांगितले की

मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर(यशोदा-नंदासारख) म्हणून मुलगी तुमच्याकडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत की गाडी उचलून नेतात तसे.)

शिवाय त्याची अपेक्षा होती की त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी. नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या एका रिटायर्ड नायब तहसिलदाराच्या मुलीचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे). मी म्हटले, “देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार”, तो आढेवेढे घेऊन तयार झाला…हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत की काय? आमची आपली मनाची एक समजूत झाली अन काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली. ती तारीख होती ८ मार्च २०११- जागतिक महिला दिन, पण हा मात्र खरोखर एक योगायोग होता. राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले.

मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात ही केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बलाच..!) नेहमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची ही पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत? त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची!). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला,

सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या. पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो.

म्हटलं,

१०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.

पण न्यायाधीश महाराजांना काय सुरसुरी आली काय माहित? आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त! आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढंच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर? नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो,

तुम्ही म्हटलात १०.३० ला या आम्ही १०.०० वाजताच आलो. तुम्ही म्हटलात १० मिनिटात मोकळं करतो आता ५ तास होऊन गेले ३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ५-५,६-६ तास उभे राहतो. तुम्हाला काही लाज वाटत नाही ?असं आणि काय काय बोललो असेल
वकील शांतपणे म्हणाला,

माझ्यासमोर काय चिडायचं ते चिडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही. बघा बुवा!

झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा ही मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो. जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हत. पण अचानक मिहीकाने (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले. (माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले,

अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?

घ्या! आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त.

जज म्हणाला, ( sorry म्हणाले)

हा, घ्या ह्यांचे पेपर्स…काय करता तुम्ही?

मी म्हणालो,

टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.( आपण साध्या लोकांनी जज ला मिलाड , युवर ओनर वगैरे म्हणायची गरज नसते साधे साहेब किंवा सर पुरते.)

जजने विचारले,

टाटा मोटर्स, ते काय आहे?

(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो.-हे आम्ही मनात)

सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे....

बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?इति जज

(वा काय प्रश्न आहे!)

नाही सर, नीट सांभाळू.- मी

अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?

आता याचं काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं,

नाही नाही , नीट सांभाळू.

पण टाकली तिला तर, तिने काय करायचे? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?

हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले,

नाही ठेवले

मग ठेवले पाहिजेत की नाही? किती ठेवाल? – जज म्हणाला ( sorry म्हणाले)

म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे

जज म्हटला, ( sorry म्हणाले)

ठीक आहे. १८ वर्षांसाठी १ लाखाची FD करा तिच्या नावाने, पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा.( का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात!) आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना.(हुश्श!)

आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही...असो!
जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

आता ही FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला, तर ते म्हणाले जास्ती जास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते सुद्धा सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले.

FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे. बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे, त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली.( नशीबाने ह्यावेळी मुलगी बायको असे लाटांबर न्यायाची गरज पडली नाही )तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला! तो काढायचा आणि बाप म्हणून माझे नाव लावायला पाहिजे ना! म्हणून गेलो नांदेड महानगर पालिकेत तर , तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते, हे अनाथाश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही.) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले, नांदेडच्या तहसीलदाराचे न हरकत प्रमाणपत्र, आता ते आणि कशाकरता लागते ?असले प्रश्न विचारायचे नाहीत (नायब तहसील दाराने तर आम्ही खरेच मुलगी दत्तक घेतली आहे का ते सुद्धा विचारले नाही.फक्त कोर्ट ओर्डर बघितली आणि त्याची एक प्रत आणि ेआमचा अर्ज ठेऊन घेतला पण ४ खेट्या आणि ५ दिवस लावले ) अन इतर असले सगळे सोपस्कार केले. त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम पूर्ण केले. सगळे सोपस्कार होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, घ्या “झालं सगळ तुमच काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” जसं काही ह्या बाईनेच सरकारी कार्यालयात खेट्या घालून चपलेच्या टाचा झिजवल्या होत्या. एरवी मी चिडलो असतो. काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांचं birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपणा नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे हा – biological child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, तसे आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता. शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली, तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटतं!
तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तु शिकव मला आता तुला ९ महिने पोटात वाढवलय…वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.
----आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती धावपळ झाली हो तुमची!
पण जाउदे ...मिहिका मिळाली ना तुम्हाला...मस्त आहे तुमची मुलगी... Happy
लेख खूप छान पद्धतीने लिहिलाय...

शेवट गोड झाला हे छान झालं.
पण तुमचा लेख वाचुन थोडं टेंशन आलं. मी पण अर्ज केलाय दत्तकासाठी आत्ता. आता centralized process असल्याने कदाचित इतका त्रास होणार नाही अशी आशा आहे. पण वेळ तेव्ह्डाच लागणारे, २-३ वर्ष.

बाप रे केवढा हा खटाटोप!
पण मिहिकाचा फोटो बघुन लगेच जाणवले, इट मस्ट हॅव बीन वर्थ इट!

किती धावपळ झाली हो तुमची!
पण जाउदे ...मिहिका मिळाली ना तुम्हाला...मस्त आहे तुमची मुलगी.. > +१ गोड आहे लेक तुमची !

छान लिहिलंय.
भारतात तसंही कुठलंही सरकारी काम करताना स्वतः की एजंट असे दोन पर्याय ऑफिशीयली (!) निर्माण झालेत.

दत्तक केसेससाठी वेगळं न्यायालय हवं असं वाटतं.
खरं तर न्यायालयाची गरजच काय, एखादं ऑफिस आणि तिथे आपली सगळी डॉक्युमेंट्स छाननी करायची सिस्टीम अशीही व्यवस्था चालू शकेल.
जजच्या मानसिकतेचा विचार करता असं वाटतं की आपल्याला एक दत्तक पालक म्हणून खूप नवलाई असते तशी जजेसना नसणार, दुसरं म्हणजे त्यांनी कित्येक केसेस अशा मुली दत्तक घेऊन नंतर वार्‍यावर सोडलेल्या, विकलेल्या पाहिल्या असणार.
दत्तक मूल घेऊन नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आतच किंवा त्यानंतर नवराबायकोंत बेबनाव झालेला पाहिला असणार.
कारण काहिही असो, जजला समोरचा माणूस जेन्युईन आहे की नाही कळत असणारच. अशांना त्रास देऊ नये.

इतक्या सगळ्या दिव्यांतून जात एक गोड मुलगी 'झाल्याबद्दल' तुमचे अभिनंदन!
आणि हो ते नऊ महिने वगैरे तुमच्या पत्नीचे योग्यच आहे.
नऊपेक्षा जास्त महिने तुम्ही सगळ्यांनी खस्ता सहन केल्यात.

Hats off to your patience. She is so cute n mom too. me and my husband are thinking for adoption. Thanks for the idea of whole process. We should be prepared for worst process.

खूप सारा बरावाईट तपशील दिला आहेत..... इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
जे दत्तक घेऊ इच्छितात, त्यांना ही माहिती उपयोगी पडेल.
इतके सारे करुन तुम्ही हे दत्तकप्रकरण निभावलेत त्याबद्दल खरे तर तुम्हालाच शाबासकी द्यायला हवी. Happy
तुम्हा उभयतांना अन तुमच्या बाळाला मनःपूर्वक शुभेच्छा Happy

इतके सारे करुन तुम्ही हे दत्तकप्रकरण निभावलेत त्याबद्दल खरे तर तुम्हालाच शाबासकी द्यायला हवी. +१
छान माहिती..

आणि हो ते नऊ महिने वगैरे तुमच्या पत्नीचे योग्यच आहे.
नऊपेक्षा जास्त महिने तुम्ही सगळ्यांनी खस्ता सहन केल्यात.>>>+१
छान लिहिले आहे.
जे दत्तक घेऊ इच्छितात, त्यांना ही माहिती उपयोगी पडेल.>>+११

बापरे ! मूल दत्तक घ्यायला किती ह्या खस्ता खाव्या लागतायत! कमीतकमी २/३ वर्षे लागतात म्हणता! मग दत्तक घेणाऱ्याचा उत्साह रहात असेल का? आणि ह्या पद्धतीत आपल्याला तान्हे बाळ दत्तक हवे असल्यास मिळणे शक्यच नाही.

आणि ते हिन्दी पिक्चरमध्ये कायपण दाखवतात. सापडलं कुठं तरी मूल, आणि घेतलं सांभाळायला! Third party (सरकार)ची involment शून्य.

खूप सारा बरावाईट तपशील दिला आहेत..... इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
जे दत्तक घेऊ इच्छितात, त्यांना ही माहिती उपयोगी पडेल.
इतके सारे करुन तुम्ही हे दत्तकप्रकरण निभावलेत त्याबद्दल खरे तर तुम्हालाच शाबासकी द्यायला हवी. Happy
तुम्हा उभयतांना अन तुमच्या बाळाला मनःपूर्वक शुभेच्छा >>>>+१

सचिन काळे,
ते अजूनही करतातच की लोक.
हे दत्तक बित्तक फक्त कायदेशीर लोकांसाठी आहे.
Happy

नऊपेक्षा जास्त महिने तुम्ही सगळ्यांनी खस्ता सहन केल्यात. >>>> +१००

छान माहिती. तुम्हाला झालेला त्रास तर कमी होणार नाही, पण भविष्यात मुलं दत्तक घेऊ पाहणार्‍या पालकांना मात्र स्वतःच्या मानसिक तयारीसाठी या लेखाचा नक्कीच उपयोग होइल.

तुम्हा उभयतांना अन तुमच्या लेकीला मनःपूर्वक शुभेच्छा

मुलगी क्युट आहे. आणि दत्तक घेण्याच्या निर्णयाबद्दल अभिनंदन.

उर्वरीत लेखात तक्रारीचा सूर जास्त होता आणि तो अधिक लाऊड करायचा प्रयत्न वाटला. या अनुभवातून तर प्रत्येकालाच जावे लागते. नावाजलेल्या डॉक्टरकडेही वेटिंग असतेच की. लोकसंख्याच एव्हढी आहे म्हटल्यावर मनाची तयारी करूनच जायला हवे होते. जज्जने जे प्रश्न विचारले ते त्यांच्या रुटीनचा भाग आहेत. असे काम त्यांना बिनडोकपणे करावेच लागते. प्रत्येक ठिकाणची प्रोस्सिजर ही नव्या माणसाला मूर्खपणाची वाटू शकते. पण त्यामागे कारणे असू शकतात.

अनाथालय चालवणे हे किती दगदगीचे काम असू शकते याची आपल्यासारख्यांना कल्पना येणे शक्य नाही. देणग्या उभ्या करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मग एखाद्याला मूल दत्तक हवे असेल त्याच्याकडून जर अपेक्षा ठेवली गेली तर त्यात गुन्हा केल्यासारखे का पहायचे ? ..

>>>
छान माहिती. तुम्हाला झालेला त्रास तर कमी होणार नाही, पण भविष्यात मुलं दत्तक घेऊ पाहणार्‍या पालकांना मात्र स्वतःच्या मानसिक तयारीसाठी या लेखाचा नक्कीच उपयोग होइल.

तुम्हा उभयतांना अन तुमच्या लेकीला मनःपूर्वक शुभेच्छा!
<<<
अनुमोदन.

<<उर्वरीत लेखात तक्रारीचा सूर जास्त होता आणि तो अधिक लाऊड करायचा प्रयत्न वाटला. या अनुभवातून तर प्रत्येकालाच जावे लागते. नावाजलेल्या डॉक्टरकडेही वेटिंग असतेच की. लोकसंख्याच एव्हढी आहे म्हटल्यावर मनाची तयारी करूनच जायला हवे होते. जज्जने जे प्रश्न विचारले ते त्यांच्या रुटीनचा भाग आहेत. असे काम त्यांना बिनडोकपणे करावेच लागते. प्रत्येक ठिकाणची प्रोस्सिजर ही नव्या माणसाला मूर्खपणाची वाटू शकते. पण त्यामागे कारणे असू शकतात.>>
तक्रार आहेच कारण ह्या प्रक्रियेला उशीर अशा करता होत नहि कि अनथ मुल उपलब्ध नसते, तर त्याची चक्क बोली असते ३ लाख ४ लाख ५ लाख काय वाटेल ते. एक मुदत ठेव सोडली तर उत्साहाने मुल दत्तक घेऊन परत आणून सोडल्या गेलेल्या मुलांसाठी काहीही सोय होत नाही. ( आता ते बदलले आहे म्हणे, मिलाकातीताला हिस्सा नावावर करून द्यावा लागतो म्हणतात खरे असेल तर देवच पावला त्या मुलांना )अनाथालय चालवणे जिकीरीचे हे खरेच पण तुम्हाला सांगतोएकदा अनाथ मुल दाखल झाले कि सरकारकडून त्याला मासिक अनुदान आणि शिवाय दुध पावडर , कपडे ,पाळणे अगदी खेळणी सुद्धा सर्व सरकारकडून येतात पण ती मुलांना मिळत नाहीत. मुल जरी फोस्टर केअर म्हणून पालकांकडे सुपूर्द केले तरीही हे अनाथालय चालवणारे शासनाला कळवत नाहीत , दर महिन्याला येणारा शिधा ( जो मुल ३ -४ वर्षाचे होईपर्यंत येत राहतो ) तो तसाच येत राहतो आणि कुठे जातो हे मी काय सांगायला हवे का? म्हणून ह्या प्रक्रियेला ३-४ वर्षे लागतातच ... सगळे जण सामील असतात ह्यात ... सुज्ञाला अधिक सांगणे न लगे... कोर्टाची तर्हा वेगळीच, नवरा ,बायको ,लग्न आणि मुलांचा ताबा ह्या तील दाव्यासाठी कौटुंबिक न्यायालये असतात पण त्यात ह्या दत्तक विधानाच्या केसेस चालवत नाहीत. असे का? प्रश्नाला उत्तर नाही . अक्षरश: चोर खुनी दरोडेखोर ह्यांच्या सानिध्यात आपल्याला तिथे बसावे लागते . हे बदलले पाहिजे.

किती ती दमछाक! मुलगी दत्तक घ्यायला पैसे लागत नाही हे वाचुन जराही नवल वाटले नाही .
शेवटच्या वाक्याशी सहमत ! भारतात सामान्य नागरिकाला गोस्टी सहजसाध्य होवु नये अस काहिशी सिस्टिमची रचनाच असते... प्रत्येक अनुभव सवार्थाने लक्षात राहिलाच पाहिजे!
तुम्हाला आणि मिहिकाला अनेक शुभेच्छा!

तुम्हा उभयतांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक! मिहीका गोड आहे एकदम Happy
तुमच्या ह्या प्रांजळ अनुभवकथनाचा अनेक वाचकांना नक्की फायदा होईल!

तुम्ही ज्ञा भ्रष्टाचाराबद्दल लिहीले आहे त्याचे समर्थन नाही केलेले. तुम्ही या संस्था टाळून बाहेरची संस्था निवडली होती ना ? तिथे बोली नव्हती बहुधा , कि मी वेगळं काही वाचलेय ?
ज्यांना सरकारी अनुदान आहे अशा संस्था बड्या धेंडाच्या असतात. पण काही अशा संस्थाही आहेत ज्यांना अनुदान मिळत नाही. हैसिंग बोर्डात एक जण संस्था चालवत होते. खटपटी करून एका उद्यानात जागा मिळव्ली. तिथल्या राजकीय पुढा-याच्या डोळ्यात ती सलू लागली. त्याने त्या संस्थेच्या पदाधिका-यांना जेलमधे पाठवले. हे सर्व लोक पदरमोड करून अनाथ मुलांचा सांभाळ करत होते. त्या मुलांचं पुढे काय झालं माहीत नाही.

आणखी एक , कुणी जर हां लेख वाचून मुल दत्तक घेण्याच्या विचारापासून परावृत्त झाला तर मला अत्यंत दु:ख होईल, त्या निष्पाप मुलाला तुमच्या मदतीची अत्यंत निकड आहे. सुरुवातीला हा शासकीय त्रास जरी पालकांना होत असेल तरी कुणी जर दत्तक नाही घेतले मुलांना ह्या पेक्षा भयंकर अन्यायाला सामोरे जावे लागू शकते नव्हे लागतेच तेव्हा ज्यांना मनातून असे काही करायची इच्छा आहे त्यांनी दृढ निश्चय करून आणि कंबर कसून तयारी करा . आतापर्यंत हा लेख मी फेस बुक, मिसळ पाव ,मराठी पिझा जिथे जमेल तिथे टाकलेला आहे. अनेक ( अनेक नाही खरेतर एकूण५ जणांनी) ह्यावरून मुल दत्तक घेण्याचा आपण निर्णय घेतल्याचे कळवले आहे ३ लोकांनी खरोखर घेतल्याचे कळले आहे. १ जणतर परदेशात आहेत आणि त्यांना परदेशस्थ नागरिकाना मुल दत्तक घ्यायचे असेल तर कसे घ्यायचे ह्याची माहिती हवी होती , त्यांना जमेल तशी मदत ही करत आहे . पण फार म्हणजे फार गुंतागुंत आहे ( काय सांगू , भारत सरकार निरोगी मुल परदशी स्थित नागरिकांना दत्तक घेऊ देत नाही किंवा फार जास्त त्रास देते ,( म्हणून अनाथालय निरोगी मुल हे अपंग आहे असे खोटेच दाखवतात कागदोपत्री पण परदेशातील सरकार व्यंग असलेले मुल सहजासहजी दत्तक घेऊ देत नाहीत . भयानक त्रांगडे आहे ) जे काही बेकायदेशीर कृत्य करणारे, असतात ते ह्या प्रक्रियेत पडताच नाहीत सरळ पैसे चारून मुल घेऊन जातात . पण कायदेशीर मार्गाने जाणरे पापभिरू सन्मार्गी लोक विनाकारण छळ सोसतात.

मग देणगी दिली ( जरी चेक ने दिली तरी पावते घेतली तरी ) ते काय असते. जिल्हा सहकारी बँकेत भरला तो चेक त्यांनी . कसले औदीट झाले असेल काय नांदेड जवळच्या आडगावात ....मी जर म्हटले असते कि दत्तक विधान पूर्ण झाल्यावर देतो तर त्याने ऐकले असते काय ?

शेवटचा प्रतिसाद आवडला. असे बरेच जण असतात कि सरकारी प्रोसिजर मधे आधी आपले काम झाले पाहीजे कारण आपण भारत देशाचे नागरीक आहोत वगैरे वगैरे विचार असतात. पण रांगेतले इतर लोकही त्याच देशाचे नागरीक असतात. देवळात देवदर्शनालाही रांगा लावायला लागतात. पर्य्टनाला गेले तर तिथेही तिकीट काढायला रांग असतेच असते.

खरं म्हणजे अनाथ मुलाचा सांभाळ करणे हे माणुसकीचे काम आहे. पण तिथे बोली का लागते ? कुणी तरी देणारे असतील ना ? ते का देतात पैसे या मानसिकतेत प्रश्नांची उत्तरे आहेत. वंशाला दिवा पाहीजे, मूल होत नाही म्हणून टोमणे मिळतात इत्यादी कारणांनी दत्तक घेणारे असतात. अशांना जर मूल झाले तर दत्तक मुलाचे हाल होऊ नयेत म्हणून नियम कडक आहेत. मूलं पळवून नेऊन अनाथालयाच्या माध्यमातून विकली जाऊ नयेत म्हणूनही नियम आहेत. त्याचा त्रास करून घेऊ नये.

माफ करा, पण तुम्ही सुद्धा हे हेतू माहीत करून घेतले असते आणि तक्रारीचा सूर किंचितसा कमी केला असता तर छान लेख झाला असता. शेवटच्या परिच्छेदात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तो परिणाम साधला जावा या शुभेच्छा !

<<ज्यांना सरकारी अनुदान आहे अशा संस्था बड्या धेंडाच्या असतात. पण काही अशा संस्थाही आहेत ज्यांना अनुदान मिळत नाही. हैसिंग बोर्डात एक जण संस्था चालवत होते. खटपटी करून एका उद्यानात जागा मिळव्ली. तिथल्या राजकीय पुढा-याच्या डोळ्यात ती सलू लागली. त्याने त्या संस्थेच्या पदाधिका-यांना जेलमधे पाठवले. हे सर्व लोक पदरमोड करून अनाथ मुलांचा सांभाळ करत होते. त्या मुलांचं पुढे काय झालं माहीत नाही.>>
पहा चांगल्या लोकांना मग ते पालक असो वा समाज सेवक त्यांना त्रास होतोच. जे लोक बेकायदेशीर काम करतात त्यांना काहीही त्रास नाही . पुण्यात जर मी २-३ लाख चारले असते तर सोफोश मधून बिनबोभाट काम झाले असते विना त्रास. पण गाडी घर किंवा अगदी कुत्र्याचे पिल्लू विकत घेतो तसे मुल विकत घेणे मनाला पटत नव्हते म्हणून नांदेड पर्यंत गेलो , वेळ पडली असती तर अजून लांब ही गेलो असतो तो प्रश्न नाही पण भ्रष्टाचार फक्त मुल दतक घेताना होत नाही सगळ्याच बाबतीत होतो . अहो काय सांगू सरकार कडून एच आय व्ही बाधीत मुलाकरता विशेष अनुदान मिळते ( अर्थात हि परवानगी सगळ्या अनाथालायांना नसते )म्हणून धड धाकट मुल एच आय व्ही बाधीत दाखवतात. कायद्याने असे मुल दत्तक देता येत नाही. त्या मुलाच्या नशीबाशी असा खेळ होतो. इच्छुक आई बाप तरी शहानिशा कशी आणि का करतील ? त्यामुळे त्या मुलाला घर मिळतच नाही ...

अभिनंदन !

मला हा अनुभव फार लाउड वाटला नाही. कारण मी ही अनाथालयाची कामे काही वर्षे जवळून पाहिली आहेत.

दापोडीमधील एका अनाथालयाच्या मालकाच्या नौकरी न करणार्‍या मुलांनी ( जे तेथील झोपडपट्टीत राहतात, टोटली गरीब वगैरे आणि ज्यांच्या घरी दर महिण्यात निदान एकदा नेहमी जात होतो ) एका महिण्यात एकदम भारी DSLR घेतला. जो त्या रुम मध्ये ठेवलेला मला दिसला, विचारल्यावर तो त्या बाईच्या मुलांचा ( जैविक ) आहे हे कळला. त्या महिण्यानंतर मी देणगी देणे बंद केले. ती मुलं नौकरी वगैरे करत नव्हती, आणि तो कॅमेरा देणगी म्हणून मिळालेला नव्हता.

त्या अनाथालयाच्या बाजूलाच आणखी एक अनाथालय आहे. त्यांच्याकडेही मी जात होतो. तेथील मालका ह्या अनाथालयाविरूद्ध तक्रारी करत आणि येथील बाईने त्यांच्या विरुद्ध तक्रारी करणे आणि मी त्या ऐकणे हे नेहमीचेच होते. दोघेही मालक काही न करता अनाथालय काईंड ऑफ धंदा म्हणून चालवत होती हे नंतर माझ्या लक्षात आले. तो मुद्दा ह्या वरच्या लेखात पण अधोरेखित झाला आहे.

आदित्य हे एक पालक म्हणून गेले तर मी एक देणगीदार म्हणून. दोघांच्या अनुभवात फरक आहे. पण मुळ मुद्दा पैसे कमवणे हा आहे.

दत्तक घेणे, ही एक किचकट प्रक्रिया आहे ह्यात वादच नाही. तरी भारतातल्या भारतात कमी कष्टाची अन खर्चाची आहे. ( हो असेच म्हणावे लागेल. दुसर्‍या देशात जसे अमेरिका वगैरे, ही प्रक्रिया खूप खर्चिक आणि अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करणारी आहे. ) पण अनेक प्रगत देशात फोस्टर पेरेंट्सना अचानक भेट देणे वगैरे असते, जे आपल्याकडे नाही, ती पण तरतुद असायला हवी असे वाटते.

एकुणच ही प्रक्रिया थोडीशी सोपी करणे जरूरी आहे.

अर्थात मला जरी वरील अनुभव दोन - तीन अनाथालयांबाबत आला तरी त्यामुळे मी सर्वच अनाथालय अशीच असतात, असे स्टेटमेंट करत नाहीये. आणि मला जेवढी मदत देता येते, ती मी कंटिन्यू करत आहे. त्यामुळे निदान त्याबाबत सल्ला नको. Happy

ऑर्कुटवर काही मुलामुलींनी बोपोडी येथील संस्य्थेला (जी डबघाईला आली होती ) सोळा लाखांची देणगी गोळा करून दिली होती. ज्यांनी हे काम पुढाकार घेऊन केले ते मायबोलीवर आहेत . अशा कित्येक संस्था आहेत. प्रत्येक संस्थेला प्रसिद्धी मिळतेच असे नाही. सगळ्या संस्था भ्रष्ट असतातच असे नाही. बोपोडीच्या केशरनानी असं काही तरी त्यांचं नाव आहे. दीडशे मुलं मुली आहेत त्यांच्याकडे. अशिक्षित असल्याने ही मुलं दत्तक देता येतात किंवा काही देणग्या मिळू शकतात याची कल्पना नव्हती.

सातारा येथील एका शिक्षकाने निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून अनाथ मुलांसाठी मोफत हॉस्टेल बांधले होते. त्याचा खर्च झेपेना. कुणीतरी ही बातमी सकाळला दिली होती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला होता.

ऑर्कुटच्या त्या ग्रुपने पुण्यातच कार्यरत असलेल्या ४० पेक्षा जास्त संस्थांचे सर्वेक्षण केले होते आणि जमेल तशी मदत करण्याचा संकल्प केला होता. ते ही बिनबोभाट. हे सगळे चांगले माहीत असल्याने राहवलेच नाही म्हणून लिहीले, नाहीतर इग्नोर मारणार होते...

Pages