मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by अदित्य श्रीपद on 4 April, 2017 - 06:10

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव), न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काही काळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही ही अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविकदृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालय असे समजून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर ही रक्कम वाढते. नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला की,

तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या. २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची! लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार की ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागदपत्र वगैरे सोपस्कार झाले. बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला की त्याची विश्वासार्हता संपते). आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून…जाऊ दे…) माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने- मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला सांभाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र )! आता आम्ही दोघेही गचकलो..! आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळं सगळं पूर्ण केलं. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला.

कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती. त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोड नावाच्या समाजसेवकाने सांगितले की

मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर(यशोदा-नंदासारख) म्हणून मुलगी तुमच्याकडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत की गाडी उचलून नेतात तसे.)

शिवाय त्याची अपेक्षा होती की त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी. नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या एका रिटायर्ड नायब तहसिलदाराच्या मुलीचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे). मी म्हटले, “देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार”, तो आढेवेढे घेऊन तयार झाला…हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत की काय? आमची आपली मनाची एक समजूत झाली अन काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली. ती तारीख होती ८ मार्च २०११- जागतिक महिला दिन, पण हा मात्र खरोखर एक योगायोग होता. राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले.

मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात ही केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बलाच..!) नेहमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची ही पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत? त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची!). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला,

सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या. पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो.

म्हटलं,

१०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.

पण न्यायाधीश महाराजांना काय सुरसुरी आली काय माहित? आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त! आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढंच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर? नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो,

तुम्ही म्हटलात १०.३० ला या आम्ही १०.०० वाजताच आलो. तुम्ही म्हटलात १० मिनिटात मोकळं करतो आता ५ तास होऊन गेले ३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ५-५,६-६ तास उभे राहतो. तुम्हाला काही लाज वाटत नाही ?असं आणि काय काय बोललो असेल
वकील शांतपणे म्हणाला,

माझ्यासमोर काय चिडायचं ते चिडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही. बघा बुवा!

झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा ही मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो. जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हत. पण अचानक मिहीकाने (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले. (माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले,

अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?

घ्या! आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त.

जज म्हणाला, ( sorry म्हणाले)

हा, घ्या ह्यांचे पेपर्स…काय करता तुम्ही?

मी म्हणालो,

टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.( आपण साध्या लोकांनी जज ला मिलाड , युवर ओनर वगैरे म्हणायची गरज नसते साधे साहेब किंवा सर पुरते.)

जजने विचारले,

टाटा मोटर्स, ते काय आहे?

(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो.-हे आम्ही मनात)

सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे....

बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?इति जज

(वा काय प्रश्न आहे!)

नाही सर, नीट सांभाळू.- मी

अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?

आता याचं काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं,

नाही नाही , नीट सांभाळू.

पण टाकली तिला तर, तिने काय करायचे? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?

हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले,

नाही ठेवले

मग ठेवले पाहिजेत की नाही? किती ठेवाल? – जज म्हणाला ( sorry म्हणाले)

म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे

जज म्हटला, ( sorry म्हणाले)

ठीक आहे. १८ वर्षांसाठी १ लाखाची FD करा तिच्या नावाने, पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा.( का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात!) आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना.(हुश्श!)

आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही...असो!
जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

आता ही FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला, तर ते म्हणाले जास्ती जास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते सुद्धा सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले.

FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे. बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे, त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली.( नशीबाने ह्यावेळी मुलगी बायको असे लाटांबर न्यायाची गरज पडली नाही )तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला! तो काढायचा आणि बाप म्हणून माझे नाव लावायला पाहिजे ना! म्हणून गेलो नांदेड महानगर पालिकेत तर , तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते, हे अनाथाश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही.) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले, नांदेडच्या तहसीलदाराचे न हरकत प्रमाणपत्र, आता ते आणि कशाकरता लागते ?असले प्रश्न विचारायचे नाहीत (नायब तहसील दाराने तर आम्ही खरेच मुलगी दत्तक घेतली आहे का ते सुद्धा विचारले नाही.फक्त कोर्ट ओर्डर बघितली आणि त्याची एक प्रत आणि ेआमचा अर्ज ठेऊन घेतला पण ४ खेट्या आणि ५ दिवस लावले ) अन इतर असले सगळे सोपस्कार केले. त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम पूर्ण केले. सगळे सोपस्कार होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, घ्या “झालं सगळ तुमच काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” जसं काही ह्या बाईनेच सरकारी कार्यालयात खेट्या घालून चपलेच्या टाचा झिजवल्या होत्या. एरवी मी चिडलो असतो. काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांचं birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपणा नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे हा – biological child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, तसे आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता. शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली, तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटतं!
तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तु शिकव मला आता तुला ९ महिने पोटात वाढवलय…वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.
----आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मला जरी वरील अनुभव दोन - तीन अनाथालयांबाबत आला तरी त्यामुळे मी सर्वच अनाथालय अशीच असतात, असे स्टेटमेंट करत नाहीये. आणि मला जेवढी मदत देता येते, ती मी कंटिन्यू करत आहे. त्यामुळे निदान त्याबाबत सल्ला नको>>
अगदी सहमत ...आम्हीही आमच्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतच आहोत.
तक्रार असली तरी मनात अढी मात्र अजिबात नाही.त्यांच्याकडून जे काही काम होते आहे ते हि काही कमी नाही. सुधारणेला नेहमीच वाव असतो. आपल्या कडे जरा जास्तच आहे ...

अनाथालये चालवणा-यांना जर कायदे माहीत नसतील तर कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागते. हौसिंग बोर्डातल्या एका अनाथालयाचे वर लिहीलेच आहे. दापोडीत एक बाई सोडून दिलेल्या मुलांना घरी आणून त्यांचा सांभाळ करतात. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर अनाथालय चालवतात म्हणून केस टाकण्यात आली. इतकेच नाही तर संबंधित खात्याला तक्रार करण्यात आली.
कारण त्या मुलांचे होत असलेले हाल संबंधितांना पाहवले नाहीत म्हणे..
http://www.mid-day.com/articles/36-children-vanish-into-thin-air-at-orph...

पण जर या बाईंना मार्गदर्शन केले असते, देणग्या मिळवून द्यायला मदत केली असती, कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मद्दत केली असती तर ? केलेली तक्रार चुकीची आहे असे अजिबात म्हणणे नाही. पण याचा अर्थ त्या बाई वाईट हेतूनेच काम करत होत्या असेही नाही. सुशिक्षित मंडळींना दत्त घेताना कायदे कळतात. दुर्दैवाने सुशिक्षित नोकरदार कुणीही स्वतः अनाथ आश्रम चालवण्याच्या फंदात पडत नाही.

मग एखाद्याला मूल दत्तक हवे असेल त्याच्याकडून जर अपेक्षा ठेवली गेली तर त्यात गुन्हा केल्यासारखे का पहायचे ? ..>>> देणगी हि ऐच्छिक असायला हवी ना? आणि हे तर मुलगी दत्तक घेत होते, विकत नाही. आपल्याच अनाथाश्रमातून मुलगी एका चांगल्या घरी जाते तर त्यात आनंद वाटायला नको का? कि घेणार्‍यालाच देणगी द्या म्हणून गळ घालायची.

सरकार कडून एच आय व्ही बाधीत मुलाकरता विशेष अनुदान मिळते ( अर्थात हि परवानगी सगळ्या अनाथालायांना नसते )म्हणून धड धाकट मुल एच आय व्ही बाधीत दाखवतात.

फारच धक्कादायक आहे... एच आय व्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे इतके सोपे नसते...

खूप चांगला लिहिला आहात लेख.प्रोसेस इतकी मोठी आहे माहीत नव्हते.पण एक आयुष्य स्वतःच्या आयुष्यात आणण्याची किंमत मोठी असणारच.
सरकारी अनुदान जिथे पोहचायला हवे तिथे पूर्ण पोहचत नाही हे वाचून वाईट वाटले पण मनाच्या कोपर्यात कुठेतरी अपेक्षित होते.देव करो आणि थोडेतरी पोहचत असो.
मिहिकाला आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!!

छान माहिती. तुम्हाला झालेला त्रास तर कमी होणार नाही, पण भविष्यात मुलं दत्तक घेऊ पाहणार्‍या पालकांना मात्र स्वतःच्या मानसिक तयारीसाठी या लेखाचा नक्कीच उपयोग होइल.
तुम्हा उभयतांना अन तुमच्या लेकीला मनःपूर्वक शुभेच्छा!
<<<+१

छान. अभिनंदन आणि शुभेच्छा Happy सविस्तर लिहिल्यामुळे इतर इच्छुक पालकांना उपयोग होईल. मात्र शिर्षक निगेटिव्ह/डिसकरेजिंग वाटते मला (उद्देश तसा नसला तरी).

अरे कसली गोड मुलगी आहे. खटपट वसूल झाली तुमची Happy

लेखही छान मार्गदर्शनपर झालाय. त्रास बराच आहे हे दत्तक मूल घेणार्‍यांना आधीच कळेल. ज्यांना खरेच मनापासून आयुष्यभरासाठी एखादे मूल दत्तक घ्यायचेच अश्यांना हा त्रास किस झाड की पत्ती.... पण जे या त्रासाला बघून मागे हटतील त्यांच्यासाठीही तेच योग्य राहील असे म्हणू शकतो.

दत्तक मूल सांभाळतानाचे अनुभव वाचायलाही आवडतील.. अर्थात, लिहायचे की नाही आपलीच ईच्छा

खूप गोड आहे मिहिका Happy
मात्र शिर्षक निगेटिव्ह/डिसकरेजिंग वाटते मला (उद्देश तसा नसला तरी).>>+१११

अदित्य श्रीपद :: अगदी योग्य शब्दात तुमचा अनुभव मांडलेला आहे तुम्ही.. कुठेही तक्रारीचा सुर वगैरे वाटत नाही.
जे आहे तुम्ही ते अगदी स्पष्ट लिहलेल आहे..

असे बरेच जण असतात कि सरकारी प्रोसिजर मधे आधी आपले काम झाले पाहीजे कारण आपण भारत देशाचे नागरीक आहोत वगैरे वगैरे विचार असतात. पण रांगेतले इतर लोकही त्याच देशाचे नागरीक असतात. देवळात देवदर्शनालाही रांगा लावायला लागतात. पर्य्टनाला गेले तर तिथेही तिकीट काढायला रांग असतेच असते.
Submitted by सपना हरिनामे >>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे उदाहरण अगदीच ओढुन ताणुन दिल्या सारख आहे...

जेव्हा प्रोसिजर प्रमाणे काम होत तेव्हा रांग मोडुन माझ काम अगोदर करा अस कोणी म्हणत नसत. तिथे आपेक्षा असते ती ते काम केव्हा होईल याची योग्य माहीती मिळने व त्या दिलेल्या वेळी काम होने.
वाट पहायला लोक तयार असतात पण ते वाट पहाण arbitrary नसाव ही आपेक्षा असते, त्या वाट पहाण्याला लोक वैतागतात...

आणि जेव्हा आपन "प्रोसिजर" म्हणतो म्हणजे एस्टीमेटेड टाइम कळणे हि अपेक्षा असणे यात काहीच चुकीच नाही...

सुरेख लेख... दत्तक घ्यायचय मूल असं म्हणून घेता येत नाही... मोठ्ठा द्राविडी प्राणायाम आहे. स्वतःचं नऊ महिने पोटात वाढवण्याहीपलिकडचे कष्टं आहेत.
मिहिका खरच गोड आहे. खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरट्याला.

आपल्याच अनाथाश्रमातून मुलगी एका चांगल्या घरी जाते तर त्यात आनंद वाटायला नको का? कि घेणार्‍यालाच देणगी द्या म्हणून गळ घालायची. >>> बरं. (त्यांना काही खर्च येतच नसेल किंवा आपल्यासारखे आहेतच की मदतीला !! )

जेव्हा प्रोसिजर प्रमाणे काम होत तेव्हा रांग मोडुन माझ काम अगोदर करा अस कोणी म्हणत नसत. तिथे आपेक्षा असते ती ते काम केव्हा होईल याची योग्य माहीती मिळने व त्या दिलेल्या वेळी काम होने.
वाट पहायला लोक तयार असतात पण ते वाट पहाण arbitrary नसाव ही आपेक्षा असते, त्या वाट पहाण्याला लोक वैतागतात...
आणि जेव्हा आपन "प्रोसिजर" म्हणतो म्हणजे एस्टीमेटेड टाइम कळणे हि अपेक्षा असणे यात काहीच चुकीच नाही. >>> ऑ !!! रांगेत कधी काम होईल याचा एस्टीमेटेड टाईम माहीत असतो ? आणि शिर्डी किंवा इतर संस्थानांत जास्त देणगी देणा-यांना स्पेशल देवदर्शन मिळते कि नाही ? काही असो. मुद्दा कळाला नसेल तर आग्रह नाही काही. तुमचंच बरोबर.

दत्तक मूल सांभाळतानाचे अनुभव वाचायलाही आवडतील ----मला नाही वाटत जन्म दिलेल्या मुलांपेक्षा काही वेगळे अनुभव असतील. बाळासाठी तेच आई-वडील आणि आई-वडिलांसाठी तेच त्यांचं मूल. लेबलिंग बाहेरच्यांना असतं. Excitement, आनंद, भीती, काळजी ह्या भावना त्याच असतात.

राजसी, अगदीच तान्हे बाळ असेल तर फारसा फरक नाही म्हणू शकतो. कळत्या वयातले बाळ असेल तर नक्कीच दोन्हीकडून ती बॉन्डींग जमायला वेळ जात असेल. ती प्रोसेस बरेच अनुभव देत असेल. अगदी तान्हे बाळ असले तरी किमान आपल्याला ठाऊक असते ते दत्तक आहे. तसेच ते मोठे झाल्यावर ईतरांकडून त्यालाही याबद्दल कळतेच. अर्थात तरीही आपण म्हणता तसे काही फरक नसेल तर हे लिहिणे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे की. ते वाचून दत्तक मूलाबाबत विचार करणारे आणखी सकरात्मक विचार करतील.

अतिशय सुरेख लिहिलयतं. खरतरं किती इमोशनल सिच्युएशन मधून गेला आहात पण तुमचा अ‍ॅटीट्युड केवढा पॉझिटीव्ह आहे. फार आवडलं.
मुलगी फार गोड आहे.

>>>> आणि तक्रारीचा सूर किंचितसा कमी केला असता तर छान लेख झाला असता. <<<<
सपनाजी, मग ते वास्तवापासुन दूर पळणे झाले असते , अन तक्रार केली, वा बर्‍याबरोबर वाईट सांगायलाच नको असा काही नियम आहे का? "सर्वसामान्यांना" सगळेच गुडी गुडी लिहलेले वाचायला आवडते हे मान्य, पण कधीकधी वास्तवाचे अंजनही डोळ्यात घालुन घ्यावे, ते अशा लेखाने साध्य होते.
मलाही तो तक्रारीचा सूर सुरवातीला थोडा बोचला होता, पण मग लक्षात आले की माझ्या सुखी जीवनात हातावर हात धरुन बसुन रहाताना मला तो बोचणे साहजीकच असेल, पण हेच मीच जर त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीतुन गेलो, तर त्यांच्यापेक्षाही कितीतरी मोठा भोकाड पसरुन तक्रारीचा सूर लावला असता हे देखिल सुनिश्चित. Happy (या वाक्यातील "मी" च्या जागी स्वतःला बसवुन पाहिले तरी चालेल , बर्का... Wink )

या क्षेत्रात काय काय चालते याची सत्य परिस्थिती !!!

एक सुचना करावीशी वाटते, या लेखातील काही उल्लेख आंणि वाक्ये, कोर्टाचा अवमान म्हणून गणली जाण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास ते टाळा.

ते मोठे झाल्यावर ईतरांकडून त्यालाही याबद्दल कळते---- इतरांकडून नाहीं, आई-वडिलांनी च मुलाला हे सांगणे अपेक्षित आणि सुयोग्य आहे. Its part of growing up. माझ्या बघण्यात तान्ही मुलं दत्तक घेतली गेली आहेत.

बहुतेक एक वर्षं वयापर्यंत मूल दत्तक गेले नाही तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर दत्तक waiting list मध्ये जाते. सहसा काहीतरी health issue असतो म्हणून काही मुलं दत्तक जात नाहीत. बहुतेक, एप्रिल'2016 पासून पूर्ण दत्तक विधान प्रोसेस एकाच नॅशनल प्लॅटफॉर्म वर आहे. आई-वडिलांची कागदपत्रे वर संगीतल्याप्रमाणेच करावी लागतात आणि मूल हातात मिळाले तरी birth certificate वर नाव यायला, पालकांना अशीच प्रोसेस आणि procedure आहे. मूल allot झाल्यापासून 7 दिवसांत final करावे लागते. आणि final केल्यावर 15 दिवसांत ते एक महिन्यांत पालकांनी हालचाली करून मूल ताब्यात घ्यायचं. Deadlines meet केल्या नाहीतर परत पालकांचं नंबर राष्ट्रीय waiting list वर शेवटी जातो. मुलांसाठी 100%फायद्याची आणि पालकांना actual जन्माला घालण्याइतका त्रास देणारी प्रोसेस आहे.
If someone can't / unable go through it, then should really take a break and think about decision because what lies ahead is 10 times tougher the process and procedures.

छान लेख. प्रवास खुप कष्टप्रद वाटला. घेतलेला निर्णय अनेक अडचणीन्ना सामोरे जात पुर्णत्वास नेल्याबद्दल तुम्हा दोघान्चे अभिनन्दन.

लेकीला लाख शुभेच्छा...

ते मोठे झाल्यावर ईतरांकडून त्यालाही याबद्दल कळते---- इतरांकडून नाहीं, आई-वडिलांनी च मुलाला हे सांगणे अपेक्षित आणि सुयोग्य आहे. 
>>>>>
कुठूनही का कळेना. आपला मूळ मुद्दा काय होता. पोटच्या मुलाला वाढवणे आणि दत्तक मुलाला वाढवणे या अनुभवात फरक आहे की नाही. आणि वरच्या पोस्टमध्ये तुम्ही हा एक फरकच सांगितला की, म्हणजे दत्तक मुलाला हे सांगावे लागते, तसेच पटवून द्यावे लागते की असे असले तरी आपल्या नात्यात कसलाही कच्चेपणा नाहीये. हा वेगळा अनुभव नाही का जो पोटच्या पोराबाबत नसतो. असे कैक अनुभव असतील त्याबद्दलच तर वाचायला आवडेल असे लिहिले होते.

अनाथाश्रमाद्वारे मूल दत्तक घेण्यापेक्षा थेट ओळखीच्या लोकांकडून मूल दत्तक घेण्याची काय प्रक्रिया आहे?

  1. समजा मुलाचे आईवडील दारिद्र्यामुळे अथवा / आणि त्यांच्या पालनपोषणाच्या क्ष्मतेहून अधिक मुले असल्यामुळे मूल दत्तक देत असतील
  2. आई किंवा वडील यांच्यापैकी एकजण हयात नसल्यास दुसरा मुलास दत्तक देऊ करत असेल
  3. आई व वडील दोघेही हयात नसल्याने मुल दत्तक दिले जात असेल

या सर्वांकरिता काय प्रक्रिया आहेत?
वरीलपैकी शक्यता क्रमांक २ मध्ये समजा मुलाचे वडील हयात नाहीत आणि आईला दुसरे लग्न करायचे आहे किंवा इतर काही कारणाने स्वतःचे मूल दत्तक द्यावयाचे आहे अशा वेळी मुलाच्या वडिलांचे आईवडील किंवा इतर सख्खे नातेवाईक हरकत घेऊ शकतात का?
तसेच शक्यता क्रमांक ३ मध्ये मूल दत्तक देण्याचे अधिकार कुणाला असतात?

अनेकदा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातासारख्या दुर्घटनांमध्ये अनेक मुले पोरकी होतात. त्यांचा सांभाळ करावयाला किंवा त्यांना दत्तक घ्यायला जे लोक पुढे येतात त्यांना कुठल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात?

दत्तक मुलाला हे सांगावे लागते, --- जन्मला घालतेली मुलं पण विचारतात, where I came from!
तसेच पटवून द्यावे ---- असं मी कुठे लिहिलंय

>>>>>२. आई किंवा वडील यांच्यापैकी एकजण हयात नसल्यास दुसरा मुलास दत्तक देऊ करत असेल<<<<
>>>> वरीलपैकी शक्यता क्रमांक २ मध्ये समजा मुलाचे वडील हयात नाहीत आणि आईला दुसरे लग्न करायचे आहे किंवा इतर काही कारणाने स्वतःचे मूल दत्तक द्यावयाचे आहे अशा वेळी मुलाच्या वडिलांचे आईवडील किंवा इतर सख्खे नातेवाईक हरकत घेऊ शकतात का? <<<<<< हो, जर ते स्वतःच त्या मुलाचा प्रतिपाळ करण्यास समर्थ असतील व तशी मान्यता देत असतील तर/ किंवा स्वतःच त्या मुलास दत्तक घेत असतील तर .
शिवाय यामध्ये मृत नवर्‍याच्या प्रॉपर्टीविषयक किचकट बाबी असतील तर बराच गोंधळ होऊ शकतो. जसे की, मृताच्या विधवेने दुसरे लग्न केले तर तिचा आधीच्या नवर्‍याच्या (जर वाटली गेली नसेल, तर) वडिलोपार्जित प्रॉपर्टिवरचा हक्क नाहीसा होतो. आधीच्या नवर्‍याची स्वकष्ट्रार्जित प्रॉपर्टी /पीएफ-ग्रॅच्युइटी वगैरे मात्र विधवेलाच मिळते. सहसा, तिथे आईवडिलांचा कसलाही हक्क असत नाही. मात्र, जोवर मृताचा मुलगा दत्तक जात नाही, तोवर भले विधवा आईने दुसरे लग्न केले, तरी मुलाचा जैविक वडीलांचे प्रॉपर्टीवरील हक्क अबाधित रहातो. बरेचदा, या स्थितीचा गैरवापर करुन घेण्याकडे कल असु शकतो. इथे मुलगा नाबालिग म्हणजे कायदेशीर दृष्ट्या सज्ञान नाही असे गृहित धरले आहे. तो सज्ञान झाल्यास, /झालेला असल्यास, दत्तक देणेघेणे होऊ शकते की नाही ही अजुन एक वेगळी परिस्थिती.
तरीही जनरलाईज्ड विधान करता येणे अवघड आहे, दोनही बाजू, जसे की मृताच्या घरचे आईवडिल वा मृताच्या पत्निकडचे - माहेरचे वा तिच्या नविन नवर्‍याकडचे, काय कारणाने कसला स्वार्थ कशात बघुन मृताचे अपत्याचा बुद्धिबळाच्या सोंगटीप्रमाणे वापर करतील हे सांगणे अशक्यप्राय आहे. इतकेच नव्हे, तर मृताच्या वारसांना (पत्नि/अपत्ये) वडिलोपार्जित वाट्यात हक्कच मिळू नये म्हणून बाकी हिस्सेदारांनी, वाटेतला काटा दूर करावा या पद्धतीने दूर सारण्याची उदाहरणेही विरळी नाहीत. व्यक्ति तितक्या प्रकृती, व समाजातील भयाण स्वार्थांधतेचे वास्तव भीषण आहे.

Pages