सणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 March, 2017 - 11:05

असं म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. पण सणाला खरेदी केल्याने खरेच काही फायदा होतो का?

झाले काय, आमच्या एका फ्रिजने आज गचके देत आचके सोडले. तात्काळ नवीन घ्यायची वेळ झाली. पण नेमके परवाच गुढीपाडवा उलटला. तेवढीच कुठेतरी ‘लूट लो’ ऑफर मध्ये घुसलो असतो तर चार पैसे फायदा झाला असता. पण नजीकच्या काळात कुठलाही सण दृष्टीक्षेपात नाही जो रेफ्रिजरेटर घेत साजरा करता येईल. तर नाईलाजाने आताच घ्यावा लागणार. पण त्या आधी मनाचे समाधान म्हणून हा धागा.

फ्रिज कुठला घ्यायचाय हा सल्ला मी फ्रिजच्या एखाद्या जुन्या धाग्यावर मागेनच. पण एकूणच सणासुदीच्या दिवसांत एखाद्या ऑफरला बळी न पडता असे मधल्या एखाद्या दिवशी फ्रिज, टीव्ही, एसी वगैरेंची खरेदी केल्यास काही फायदा / तोटा होतो का? सणवारांना मिळणारी सूट बोले तो डिस्काऊंट साधारण टक्केवारीत किती असते? जर समजा माझे फ्रिजचे बजेट २५ हजार असेल तर आता २५ हजारला मिळणारा फ्रिज एखाद्या पंधरा ऑगस्टच्या वा दिवाळीच्या सेलला मला कितीला पडेल? कि असे तर नाही ना, दिवाळीच्या महिनाभर आधी त्या फ्रिजची किंमत २५ वरून २८ हजार करायची आणि मग ३ हजार डिस्काऊंट दिल्याचा आव आणायचा?

तसेच मागे एक जण म्हणालेला की अश्या सेल मध्ये जुना न खपलेला माल बाहेर काढतात. तर त्यावर विरोध करताना दुसरा मित्र म्हणालेला की आरे हाट, उलट नव्या स्टॉकची निर्मिती अश्या सणवारांनाच होते. आणि मग उर्वरीत वर्ष त्यातलाच उरलेला माल विकत राहतात.
तर यातले काय खरे समजावे?
म्हणजे पैसेही ज्यादा गेले आणि मालही खरकटा मिळाला असे नको ना व्हायला Sad

धागा काढलाच आहे तर एक प्रश्न ज्यादा विचारतो,
ऑनलाईन शॉपिंगच्या वाटेने फ्रिज घेणे ही चांगली आयडीया आहे का?
तुम्ही अश्या वस्तू कधी ऑनलाईन घेतल्या आहेत का? आणि अनुभव कसे आलेत? खात्रीशीर चांगला अनुभव असेल तरच मला हिरवा झेंडा दाखवा. कारण माझ्या आईला समजले की मी दुकानात न जाता ऑनलाईनच फ्रीज बूक करतोय तर ती देव पाण्यात ठेवेल आणि मला घराबाहेर काढेन Happy

धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स,
ऋन्मेष १

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझेही लॅपटॉप नेमके डिसेंबरमध्ये, ब्लॅक फ्रायडे सेल होऊन गेल्यावर बंद पडतात. योगच असतो काहींच्या नशिबात...

असो, पुढचा सण येईपर्यंत माठातलं पाणी पी.

केंव्हाहि खरेदी केली तरी व्यापाराचा फयदाच असतो. अगदी प्रचंड मोठे सेलसुद्धा फार गणिते करून ठरवलेले असतात.
गिर्‍हाईक प्रत्येक वस्तूची किंमत वेगळी वेगळी धरून विचार करतो की ही वस्तू या किंमतीला घेतली तर स्वस्त की महाग. व्यापारी सहसा एकच विचार करतात - गेल्या महिन्यात सबंध दुकानात माल भरायला २५ लाख रु. घातले, महिना अखेर मला त्यावर फायदा झाला पाहिजे - मग फ्रीज स्वस्त नि मायक्रोवेव्ह महाग की काय ते महत्वाचे नाही. कुणितरी तो माल घ्या. स्वस्त फ्रीज घ्यायला दुकानात येऊन इतर दहा गोष्टी घ्या, म्हणजे गोळाबेरीज मला हवे तेव्हढे पैसे मिळतील.

हो खूप फायदा होतो. नवीनच प्रॉडक्त मिळतात. ऑनलाईन डिल्स असतील तर मस्त. एसी, टीव्ही घेतलंय ऑनलाईन. फ्रिज नाही. दुकानात चांगलं डील मिळाल, दसऱ्याला.

माझ्या माहितीत ज्यांनी ज्यांनी फ्रिज ऑनलाइन घेतला त्या सगळ्या​च लोकांना पश्चाताप करावा लागला....

आमची कंपनी (रिटेल) नवीन उत्पादन सणालाच आणते (थॅन्क्स गिव्हिंग- ब्लॅक फ्रायडे च्या साधारण २ आठवडे आधी ऑन श्लेफ) त्यानंतर ख्रिसमस पर्यंत रिटेल दुकानदार मार्केट प्राईसवर सेल लावून काही टक्के कमीने ते विकतात. त्यानंतर किंमत वाढते.
अ‍ॅपलायंसेस सेल असताना घेतले तर नक्कीच फायदा होतो. या या गोष्टीवर पुढचा सेल कधी असणार आहे याची अमेरिका/ कॅनडा मध्ये तरी सेल्स पर्सन योग्य माहिती देतात.
माल रिफरबिश्ड आहे हे जर तुमचा दुकानदार पाटी लावून सांगत नसेल तर एखादा माल आज रिफरबिश्ड नाही, आणि सेल असतानाच रिफरबिश्ड आहे यात आतली माहिती असल्याशिवाय कोण कसं सांगू शकेल? जनरलायझेशन करणारा फेकतोय.
रुन्मेश्वाव तुम्ही माठातलं पाणी कसं गारेगार आणि फळं भाज्या फ्रीज मध्ये का ठेवू नयेत, आणि आईस्क्रिम उन्हाळ्यात खा सांगून परराष्ट्रीय (एमएनसी हो) कंपन्या कसा फायदा करतात यावर व्हॉटस अप फोर्वार्ड लिहा. धंदा जोरात बंदा कोमात. टाईप र्हाईमिंग वर्ड विसरू नका. (नोट: धागे काढून लिहू नये)
आणि हो... कॅन्सर, एड्स हे गार पाणी पिऊन होतात. लोक माठातलं पाणी प्यायचे तेव्हा एडस झालेला ऐकलाय का कोणी?
दादा कोंडके जोक आठवला.. पण परत कधीतरी.

फ्रिजचे पाणी मी असेही पित नाही. त्याने सर्दी होते. एकवेळ तुमचा तो एडस परवडला. हल्ली एडसग्रस्तांना सहानुभुती देण्याचे फॅड आले आहे. पण सर्दी झालेल्यांपासून लोक दूर पळतात. स्वत:ची गर्लफ्रेन्ड चार फूट अंतरावर नाक दुमडून बसते तर ईतरांच्या विचारायलाच नको.

बाकी ऑनलाईन च्या फंदात पडायचे नाही, रिस्क असते हे समजले.

तसेच आता फ्रिज घेण्यात घाटा आहे हे देखील समजले.

जुन्या काळात ऐंशीच्या दशकात लोक फ्रिज शिवाय कशी गुजराण करायचे हे आता शोधायला हवे. ईथे दूध सकाळचे फ्रिजमध्ये टाकयला विसरलो तर संध्याकाळी फाटते. चिकनमटण आणि मासे आठवडाभर पुरवून खाणे आता विसरायलाच हवे. आईसक्रीम खायचा मूड आला की तेव्हाच जाऊन दुकानातून आणावे लागेल किंवा तिथेच खावे लागेल. रात्री बेरात्री दोनतीन वाजता झोपेतून उठून आईसक्रीम खायची चंगळ तर आता बंदच होईल. अरे देवा आणखी विचार करता बरेच काही आठवत आहे. या फ्रिजच्या जागी टीव्हीच फुटला असता तर परवडले असते.

तर त्यावर विरोध करताना दुसरा मित्र म्हणालेला की आरे हाट, उलट नव्या स्टॉकची निर्मिती अश्या सणवारांनाच होते. आणि मग उर्वरीत वर्ष त्यातलाच उरलेला माल विकत राहतात.
तर यातले काय खरे समजावे?
म्हणजे पैसेही ज्यादा गेले आणि मालही खरकटा मिळाला असे नको ना व्हायला

सणांच्या सेल मधून उरलेला फ्रिज माल म्हणजे खरकटा माल ?
जरी नविन स्टॉक वर्षभर खपवत असतील तरी (खरं तर दुसरा कुठला मोठा खरेदी मूहूर्त असणारा सण वर्षाच्या आतच येईल, तरी पूर्ण वर्ष गृहीत धरलेय) समजा आपण घेतलेला फ्रिज १ वर्षापूर्वी उत्पादित केला होता आणि फ्रिजचे लाइफ १५ वर्षाचे आहे तर आपल्याला तो एक वर्ष कमी म्हणजे १४ वर्ष साथ देइल. फार तर सुरवातीला कोल्ड स्टार्टची एखादी छोटीशी तक्रार उद्भवू शकते, जी आपसूकच अथवा वॉरंटी सर्व्हीस मध्ये सॉल्व्ह होईल.
सणासुदीला खप वाढतो तरी सुद्धा वर्षभर खप सुरुच असतो आणि प्रॉडक्शन वर्षभर सुरुच असते.

ऑनलाईन शॉपिंगच्या वाटेने फ्रिज घेणे ही चांगली आयडीया आहे का?
तुम्ही अश्या वस्तू कधी ऑनलाईन घेतल्या आहेत का? आणि अनुभव कसे आलेत? खात्रीशीर चांगला अनुभव असेल तरच मला हिरवा झेंडा दाखवा.
>>>
दुकानातून घेतलेल्या मालाबाबत दुकानदारानी सर्व्हिस द्यायचे गेले ते दिन गेले.
फ्रिज अगदी ब्रँडेड दुकानातून (क्रोमा, रिलायन्स डिजिटल, ई-झोन वगैरे) घेतला काय, ब्रँड स्पेसिफिक शोरूम ( सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल वगैरे) मधून घेतला काय, कोपर्‍यावरच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून घेतला काय, किंवा ऑनलाईन घेतला काय इन्स्टॉलेशन अन डेमो पासून सर्व सर्व्हिस ही कॉल सेंटरला कॉल करूनच मिळवावी लागते. ती द्यायलाही थर्ड पार्टी काँट्रॅक्टरचे लोक येतात. ही पार्टीही बदलत राहते.
त्यामुळे ऑनलाईन खरेदीनी काहीही फरक पडत नाही. (सर्व पावत्या, वॉरंटी कार्ड वगैरे गोष्टी सांभाळून ठेवल्या म्हणजे झालं)

मी स्वतः वॉशिंग मशीन (पेटीएम), लॅपटॉप (स्नॅपडील), एसी (क्रोमा) या वस्तू ऑनलाईन घेतल्या आहेत.
अन (टचवुड) काहीही प्रॉब्लेम नाही.

या फ्रिजच्या जागी याचा लॅपटॉप , कीबोर्ड फुटला असता तर परवडले असते.>>> Lol
लांडगा आला रे आला... ह्या गोष्टीतल्या मुलासारखी काहीशी परिस्थिती आहे ऋन्मेश यान्ची इथे...
खरोखर मदतीची गरज असली...तरीही कोणी सिरियसली घेत नाही...

हिंदू रितीरिवाजानुसार अखंड भारतात पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरांबरोबर जे जे जोडलेले होते ते अत्याधिक महत्त्वाचे होते. आपले शास्त्र आणि आपले पुर्वज यांनी नीट प्रचंड विचार करून ही परंपरा चालू केली होती. त्यामागे शास्त्रशुध्द पध्दतीचे शास्त्र वैज्ञानिक कारणे आहे. जे आताच्या पाश्चात्य वैज्ञानिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आपली हिंदुत्त्वसंस्कृतीही जगात महान अशी आहे जीची तुलना करण्यासाठी विश्वात दुसरी कुठली संस्कृती अस्तित्वात याआधी आली नाही आणि त्यानंतर येणार ही नाही थोडक्यात आपली संस्कृती ही अतुलनिय आहे. हे सर्वप्रथम तु लक्षात घे.
अशा महान अतुलनिय संस्कृती साजरे केले जाणारे विविध सण हे मानवाच्या कल्याणानासाठी आणि संवंर्धनाकरिता आहे. अगदी गुढीपाडवा ते दिवाळी विविध सणामागे शास्त्रोत्क वैदिक कारणे आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता कल्याणाकरीता आपले सण हे जगात आदर्श निर्माण करतात.
आपले सण हे सरळ दैवी शक्तींशी जोडले गेले आहे. त्यामुळे ते साजरे करताना आपल्यात दैवी शक्तींचा संचार होतो त्यांचा आशिर्वाद प्राप्त होतो.

पुन्हा आपल्या सणांवर प्रश्न उभे करू नकोस Happy


* जाहीर सांत्वना *

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टूव्हीलर्स घेणार्‍यांच्या दु:खाची आम्हास कल्पना आहे.
ह्या दु:खातून सावरण्याचे बळ आपणास मिळो, हीच प्रभूचरणी प्रार्थना!

कावेरि, मदत करणे ही एक वृत्ती असते, ज्यांची ती असते ते लोकं मदत करतातच Happy

वर अँकी यांनी नं १ माहिती दिली आहेच. एखाद्या शोरूममध्ये जाऊन मॉडेल बघून यायचे आणि घरून ऑनलाईन बूक करायचे, या पर्यायात जर काही ऑनलाईन डिल मिळत स्वस्त पडणार असेल तर चांगलेच आहे. पण ते तसे स्वस्त पडते का हे बघायला हवे.

अवांतर - गुढीपाडवा आणि टूव्हीलर हे काय मध्येच? काही लेटेस्ट न्यूज आहे का?

आणि प्रॉडक्शन वर्षभर सुरुच असते. >>> हे मात्र खरेय. हा विचार केलाच नव्हता. आणि सणाचे तरी कुठे गरमागरम जिलेब्या तळल्यासारखे असणार .. त्यांचेही प्रॉडक्शन काही महिने आधीपासूनच करत असतील ना

गुढीपाडवा आणि टूव्हीलर हे काय मध्येच? काही लेटेस्ट न्यूज आहे का?---+++ आता सगळंच नाही सांगणार आयतं! बातम्या बघत जा हो जरा Sad

व्हॉटसपवर हे आलेले..

होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव

मुंबई: सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे. तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.

आज आणि उद्यापर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही.

तुम्हाला कोणत्या शहरात, कोणती बाईक हवी आहे, हे कंपनीला तातडीने कळवावं लागले. किंवा थेट डिलरशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेता येईल.

आज आणि उद्या या बाईक खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच त्याची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणं आवश्यक आहे. कारण 1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली आहे.

1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि नोंदणी करता येणार नाही, असा निर्णय काल दिला आहे. त्यामुळे BS-III इंजिन असलेल्या जवळपास 6 लाख दुचाकींसह एकूण 8 लाखापेंक्षा अधिक नवी वाहनं शोरुममध्ये उभी आहेत.

ही वाहनं खपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी आता मोठी आणि भरघोस सूट दिली आहे.

कोणत्या गाडीवर किती डिस्काऊंट?

1) ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर – 12 हजार 500 रु. सूट

2) HFडिलस्क सिरीज – 5 हजार रुपये सूट

3) स्प्लेंडर प्लस – 5 हजार सूट

4) ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 – 7 हजार 500 सूट

मिरजेतील टीव्हीएस शोरुममध्ये किती सूट?

ज्युपिटर – 9 हजार सूटव्हिक्टर – 9 हजार सूटस्कूटी – 5 हजार सूटअपाचे – 9 हजार सूटXL 100 – 5 हजार सूटTVS वि गो – 8 हजार सूटफिनिक्स – 12 हजार सूट

औरंगाबादेत गाड्या खरेदीसाठी गर्दी

होंडाकडून ही ऑफर जाहीर होताच औरंगाबादमध्ये गाड्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. औरंगाबदेतील होंडा शोरुममध्ये BS3 इंजिन असलेल्या गाड्यांवर 10 ते 22 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

यामध्ये

अॅक्टिव्हा 3G –13 हजारपर्यंत सूट

सीबीआर स्पोर्ट्स बाईक – 22 हजार हजारपर्यंत सूट

होंडा नवी – 20 हजारापर्यंत सूट

आज-उद्या बिलिंग, उद्या नोंदणी

दरम्यान, औरंगाबादेतील होंडाच्या शोरुममध्ये BS3 इंजिन असलेल्या सर्व गाड्यांसाठी ऑफर देण्यात येत आहे. या गाड्यांचं आज आणि उद्या बिलिंग होईल आणि उद्या पासिंग होईल, असं औरंगाबादच्या होंडा शोरुमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं.

गाडी पुन्हा विक्रीला काहीही अडचण नाही

दरम्यान, आज-उद्या गाडी खरेदी करुन, तिची नोंदणीही झाल्यास, ती गाडी पुन्हा विकण्यास काहीही अडचण नसेल. कारण एकदा नोंदणी झालेल्या गाडीचा मालक बदलेल, त्यामुळे भविष्यात कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असंही व्यवस्थापकांनी सांगितलं.

BS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी : सुप्रीम कोर्ट

BS-III इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्रीच बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला.

पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे BS-III इंजिन असलेल्या तब्बल 8 लाख 14 हजार गाड्यांच्या विक्रीवर संक्रात आली आहे.

या निर्णयामुळे भारतात आता केवळ BS IV इंजिन असलेल्या गाड्यांच्याच खरेदी-विक्रीला परवानगी असेल.

BS-III आणि BS IV इंजिन म्हणजे काय?

BS म्हणजे भारत स्टॅण्डर्ड स्टेज. इंजिनाच्या अंतर्गत वहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी, केंद्र सरकारने दिलेलं मानक म्हणजे BS होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवतं.BS मानकं ही भारतात धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी लागू आहेत.भारतात जसं BS मानकं आहेत, तशी युरापोत Euro, अमेरिकेत Tier 1, Tier 2 अशी मानकं आहेत.वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी BS मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. BS IV हा त्याचाच भाग असून, कमीत कमी वायू प्रदूषणाच्या दृष्टीने आता भारतात वाहनांमध्ये BS IV इंजिन बंधनकारक आहे.

कावेरि, मदत करणे ही एक वृत्ती असते, ज्यांची ती असते ते लोकं मदत करतातच>>> हो,बरोबर आहे... Happy
मी फक्त गम्मत केली होती....